Thursday, February 3, 2022

'Shri N Chandrasekaran, the Chairman of Tata Sons called on PM Narendra Modi.'

हा पीक ट्विटरवर बघितला आणि त्यात लिहिले होते. 'Shri N Chandrasekaran, the Chairman of Tata Sons called on PM Narendra Modi.' खरंतर असं म्हणतात,'A single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story.' हा पीक खूप काही सांगून जातो आणि एअर इंडिया पुन्हा टाटा समूहाकडे गेली आहे. 

एन.चंद्रशेखरन अर्थात नटराज चंद्रशेखरन. आता यांची नवी ओळख म्हणजे पद्मभूषण एन.चंद्रशेखरन झाली आहे. यावर्षी २५ जानेवारी रोजी यांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असं असलं तरी टाटा समूहात बारा महिने चौदा काळ खोऱ्यानं महसूल ओढणाऱ्या 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' म्हणजे टीसीएस या कंपनीचे ते प्रमुख होते आणि आता 'टाटा सन्स' समूहाचे ते प्रमुख आहेत. या आधीचे या कंपनीचे प्रमुख रामादोराई यांच्याप्रमाणे श्री.एन.चंद्रशेखरन देखील खऱ्या अर्थानं याच समूहात लहानाचे मोठे झालेले आहेत.

तामिळनाडू मधील तिरुचेरा पल्ली इथल्या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'चे ते मान्यवर स्नातक आहे. पुढे कोईम्बतुर मधल्या संस्थेतूनच त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे. शास्त्रीय संगीत, छायाचित्रण अशा अभिजात कलांचे ते चाहते आहेत. अगदी सगळ्या टाटांसारखे शांत, सोज्ज्वळ असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे. प्रसिद्धीच्या मागे न राहता सतत कार्यमग्न राहणारे ते आहेत. दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत म्हणजे मॅरेथॉन स्पर्धांत धावणं, यात त्यांना कमालीचा आनंद आहे. जगात एकही अशी मॅरेथॉन नाही, की श्री.एन.चंद्रशेखरन यांनी पूर्ण केलेली नाही. न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये तर त्यांनी सलग ५ तास ५२ सेकंद धावण्याचा वैयक्तिक विक्रम केलेला आहे. हे सगळे टाटांच्या शैलीला साजेसंच आहे. म्हणजे १०० मीटरच्या शर्यतीतल्या कौशल्यापेक्षा दीर्घकाळ धावू शकणारा धावकच टाटांना हवा होता आणि समूहाला त्याचीच गरज होती. श्री. एन.चंद्रशेखरन यांना आपल्या कारकिर्दीच्या पुढच्या उंचीवर जाण्याचा योग होता की हा संयोग होता हे सांगणे कठीण आहे. कारण इतकी वर्षं टाटा समूहातल्या एकाच कंपनीचं नेतृत्व करणाऱ्या श्री.एन.चंद्रशेखरन यांनी समग्र समूहाचं नेतृत्व करायची तयारी दर्शवली. १२ जानेवारी २०१७ या दिवशी टाटा समूहाचे आगामी प्रमुख म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर पुढे आजतागायत त्यांनी एक नियम कसोशीनं पाळला. तो म्हणजे,जे काही झालं,त्यावर एक शब्ददेखील न काढण्याचा नियम ते आजतागायत पाळत आहे. २१ फेब्रुवारीला २०१७ ला  श्री. एन. चंद्रशेखरन यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आणि टाटा समूहाला नवा नायक मिळाला आणि समूहाच्या दीड शतकाच्या इतिहासात (आजवरच्या पारशी नसलेल्या माणसाने ) स्वतःच्या कर्तृत्ववाने ही मजल मारली आहे. प्रयत्न आणि कर्तृत्ववाने असाध्य ते साध्य करू शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे श्री. एन.चंद्रशेखरन यांचा प्रवास आहे.

✍️ सर्वेश फडणवीस