Saturday, January 20, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श राजा

भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक केवळ इतर राजांच्या राज्याभिषेकासारखाच नाही तर हा एक असाधारण अद्वितीय प्रसंग आहे. इतिहासाच्या ओघात असंख्य राजे सिंहासनावर बसले आणि त्यातील कितीतरी कालप्रवाहात विस्मरणाच्या गर्तेतही गेलेत. अनेक पुण्यश्लोक राजांचे इतिहासाला आजही आदराने स्मरण आहे. पण राजा राम वेगळेच. यांनी लोकहृदयाचा अद्भुत वेध घेतला. सर्वांना वेडच लावले. अतिप्राचीन काळापासून आजतागायत तपस्वी ऋषि-मुनि, वीतराग संत-महंत, प्रतिभासंपन्न साहित्यिक, श्रेष्ठ महाकवि, थोर लोकनेते आणि आबालवृद्ध सामान्यजन या सर्वांना जणू संमोहित करून स्व-स्मरणामध्ये गुंगवून ठेवणारे एकच राजा जगाने पाहिले- ते आदर्श राजा अर्थात राजा राम.

महाकाव्ये, लघुकाव्ये, नाटके, गद्य-पद्य स्फुटे, लेख, देवालये, तीर्थे, कथा-कीर्तन- प्रवचने, उत्सव आणि रामलीला अशा अनेक सर्व उपलब्ध साधनांनी रामराजा भारताच्या सर्व प्रदेशातून व भाषांतून आजही उत्कटपणे नित्यस्मरणात आहे व नि:संशय तो तसाच नित्य राहणार आहे. ही खरंतर असंख्य सदगुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामांच्या विभूतिमत्वाची जादू आहे. त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय, बोलल्याशिवाय, ऐकल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय भल्याभल्यांनाही राहवतच नाही, हे गुणप्रकर्ष अद्भुत आहे. ते इतके अद्भुत आहे की, काही बिचाऱ्यांना राम काल्पनिकही वाटू लागले. तत्त्वदर्शी महात्म्यांना तर तेच परम-सत्य-स्वरूप आहे. लोकमनातील राम असे अढळ आहे. याचे कारण प्रत्येकाला रामामध्ये आपल्याला अपेक्षित व स्वतःमध्ये असाध्य चांगुलपणाच्या पूर्णत्वाचे सहज दर्शन होते. जे जे उत्तम, मंगल, उदात्त, सुंदर, महन्मधुर ते ते सर्व श्रीरामांमध्ये आढळल्याने त्यांच्या चिंतनात आपल्या मनाला विश्रांति मिळते.

खरंतर प्रजा ही श्रीरामचंद्रांचें काय नव्हती ? सीतेच्या परित्यागानंतर हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्या प्रसंगाने राम इतके विव्हळ झाले होते की, चार दिवस अश्रुमोचन करीत त्यांनी घालविले. या चार दिवसांत त्यांच्या हातून राज्यव्यवहार व लोकांची दु:खे समजावून घेण्याचें काम झालें नाही याचें त्यांना इतकें वाईट वाटत होतें की, लक्ष्मणाजवळ त्यांनी आपल्या अंतरीचे भाव व्यक्त करताना म्हटलें आहे :-

यच्च मे हृदये किंचिद्वर्तते शुभलक्षण ।
तन्निशामय च श्रुत्वा कुरुष्व वचनं मम ।।
चत्वारो दिवसाः सोम्य कार्यं पौरजनस्य च ।
अकुर्वाणस्य सौमित्रे तन्मे मर्माणि कृन्तति ॥ 
आहूयन्तां प्रकृतयः पुरोधा मन्त्रिणस्तथा ।
कार्यार्थिनश्च पुरुषाः स्त्रियो वा पुरुषर्षभ ।। 
पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ।। 
- वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग ५३

लक्ष्मणा, माझ्या हृदयाला जी एक गोष्ट दुःख देत आहे ती ऐकून घे व त्याप्रमाणे कर. या दुःखद घटनेने माझें हृदय इतके भारावलेलें होतें की, गेले चार दिवस मी पौरजनांचे कोणतेही काम करू शकलो नाही, याची जाणीव झाली की मला मर्मांतिक वेदना होतात. पुरोहित, मंत्री, प्रजेतील कार्यार्थी असे सर्व स्त्री-पुरुष यांना तू राजसभा त्वरित मोकळी कर. जो राजा प्रजेचीं कामें करीत नाही तो घोर नरकात जातो यांत काही शंका नाही. केवढे हें प्रजावात्सल्य व त्या बाबतीतल्या स्वकर्तव्याची तरी केवढी ही प्रखर जाणीव. प्रजेनेच जेथे त्यांना विश्रामाची आवश्यकता प्रतिपादावी त्या आयुष्यातील अत्याधिक दु:खद प्रसंगी देखील आपण प्रजेच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्याइतके भावनावश झालो ही जाणीवच त्यांच्या हृदयाला अधिक कष्टी करीत आहे. अशा या राजावर प्रजेचें किती विलक्षण प्रेम असेल. 

रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासवः ।। 
न च धर्मगुणैर्हीनः कौसल्यानन्दवर्धनः ।
न च तीक्ष्णो हि भूतानां सर्वभूतहिते रतः ।। 
वाल्मीकि रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ३७

प्रत्यक्ष शत्रूने रामाच्या रूपाने धर्म पृथ्वीवर अवतरल्याची कबुली द्यावी यापेक्षा त्यांच्या चारित्र्याच्या उदात्ततेचा आणखी कोणता पुरावा देणें अवश्य आहे? सर्व गुणांचे राम हें इतकें श्रेष्ठ परिमाण आहे की, मित्र तर काय पण शत्रूदेखील रामासारखा असावा अशीच अभिलाषा उत्पन्न व्हावी. 'रामो विग्रहवान् धर्मः' श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे, महर्षि वाल्मीकि म्हणतात :-

न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३७

जेथे राम राजा नाही तें राष्ट्रच नाही. तें वनच राष्ट्र होईल की जेथे राम राहतील. केवढी ही विलक्षण लोकप्रियता. जगातील राज्यसंस्थेच्या इतिहासात प्रजा आणि राज्यसंस्था यांचें सूर्य व त्याच्या प्रभेसारखें इतकें ऐक्य आजवर कधी झालें नाही व पुढे कधी होणार नाही. सर्व उदात्त जीवनमूल्यांचे एकत्रित उत्कट दर्शन ज्या व्यक्तिमत्वात होते त्याचे नाव 'श्रीराम' होय. श्रीरामांचा राज्याभिषेक म्हणजे या जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना आणि उद्या याच जीवनमूल्यांची पुर्नप्रतिष्ठापना होणार आहे. रामलला यांचा विग्रह उद्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहे. राम राज्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आपण होणार आहोंत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत हे राष्ट्र सुजलाम, सुफलाम बनवूया. ही चार भागात झालेली लेखन सेवा श्रीरामांच्या चरणी रुजू करतो.  पुन्हा भेटूच.. जय श्रीराम 

सर्वेश फडणवीस

Thursday, January 18, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श मित्र


श्रीरामचंद्रांनी ज्यांना स्वतःच्या बरोबरीचें स्थान देऊन आपले मित्र मानले होते अशा दोन व्यक्ति रामायणात आहेत. एक निषादाधिपति गुह आणि दुसरा वानरराज सुग्रीव हे होते. राजा गुहाची आणि रामचंद्रांची प्रगाढ मैत्री महर्षि वाल्मीकींनी,

तत्र राजा गुहो नाम रामस्यात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५०

या शब्दांनी व्यक्त केलेली आहे. राजा गुह स्वतः श्रीरामांवरील आपल्या प्रेमासंबंधी असें म्हणतो की,

न हि रामात्प्रियतमो ममास्ते भुवि कश्चन ।
ब्रवीम्येव च ते सत्यं सत्येनैव च ते शपे ॥
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५१

या संपूर्ण विश्वात रामाइतकें मला दुसरें कोणीही प्रिय नाही.रामा,  मी तुला सत्याचीच शपथ घेऊन सांगतो. रामचंद्रांचेंही गुहावर असेंच अत्यंत प्रेम आहे. वनवासातून आपण परत आल्याची पहिली वार्ता गुहालाच सांगण्याची ते हनुमंताला आज्ञा देतात. त्याच्या संबंधीचें आपलें प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात :-

श्रुत्वा तु मां कुशलिनमरोगं विगतज्वरम् ।
भविष्यति गुहः प्रीतः सममात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५

मी निरोगी, तापरहित व चांगल्या स्थितीत आहे हे ऐकून गुहाला अत्यंत आनंद होईल. कारण मी माझ्यावर जितकें प्रेम करीत असेन तितकेंच गुहावर करतो. तो माझा सखा आहे.

उपकारफलं मित्रं विदितं मे महाकपे ।।
वालिनं तं वधिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ५

मैत्रीचें फळ एकमेकांच्या उपयोगी पडणें हेंच आहे. म्हणून तुझ्या स्त्रीचें अपहरण करणाऱ्या वालीचा मी वध करीन. त्याच्या दुःखाशी श्रीराम इतके एकरूप झालेले आहेत आणि त्याच्या दुःखाचा अंत करण्याची इच्छा त्यांच्या अंत:करणात इतकी बळावलेली आहे. दोघे अशा प्रकारे बोलत असताना हनुमंताने दोघांना जरा थांबायला सांगितले. त्याने आपल्या एकदोन मित्रांना पाठवले आणि पटपट त्या ठिकाणी सामग्री आली. हनुमंताने लगेच त्या ठिकाणी एक वेदी बनवली, अग्नीची स्थापना केली आणि पुरोहित बनले. हनुमंतांना सगळ्या भूमिका पार पाडता येतात. त्याने दोघांच्या हातांत फुले दिली, पूजेची सामग्री दिली. राम आणि सुग्रीव यांनी अग्नीची पूजा केली, अग्नीभोवती परिक्रमा केली. दोघांनी अग्नीपुढे मैत्रीची प्रतिज्ञा केली 'देव ब्राह्मणअग्नि संनिधौ ।' यातून हनुमंतांना नेमके काय साधायचे होते? त्यांना मैत्रीचा करार करायचा नव्हता, तर सख्यत्वाचा संस्कार करायचा होता. करार मोडला जातो, संस्कार मोडला जात नाही. कराराला दोन्ही पक्ष तोपर्यंतच बांधील असतात जोपर्यंत एकजण नियम मोडत नाही. एकाने करार मोडला की, दुसरा मनुष्य करार मोडायला तयार असतो.

यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९

इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविकच आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासाच्या पृष्ठभागावर टाकलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--

एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग १०८

याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व राम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.

जय श्रीराम 🚩🚩

सर्वेश फडणवीस

#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला #day3

Tuesday, January 16, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श बंधु

लक्ष्मण व शत्रुघ्न हे बंधुत्वाचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. पण भरताचा त्याग गोस्वामी तुलसीदासांच्या प्रतिभेला तर श्रीरामापेक्षाही अधिक पूजार्ह वाटला आहे. तरीही रामचंद्रांच्या चरित्राचा जो जो विचार करू लागावें तो तो याही बाबतीत,

तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः

हा महर्षि वाल्मीकींचा अभिप्रायच मनावर ठसू लागतो. “ तुझ्या- ऐवजी भरताला हें राज्य द्यावें असें राजाच्या मनात आहे,” असें कैकेयीने म्हणताच रामचंद्र म्हणतात :-

अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान्धनानि च ।
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १९

भरताला हें राज्य देण्यासाठी स्वतः महाराजांनी मला आज्ञा करण्याचे काहीच कारण नाही. भरताला माझ्या अधिकार- क्षेत्रातली जी वस्तु हवी असेल ती मी त्याच्या ताब्यात देईन. मला नुसतें कळण्याचाच अवकाश आहे. राज्य, सीता, फार तर काय पण माझे प्राणही मी भरताच्या सहज स्वाधीन करीन. राज्यासाठी भरताला ठार मारण्याची इच्छा बोलून दाखविणाऱ्या लक्ष्मणाला रामचंद्रांनी जें उत्तर दिले आहे त्यात त्यांच्या बंधु- वात्सल्याचे संपूर्ण प्रतिबिंब उमटलें आहे. ते म्हणतात :-

यद् द्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥
धर्ममर्थं च कामं च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
इच्छामि भवतामर्थे एतत्प्रतिशृणोमि ते ।।
भातॄणां संग्रहार्थं च सुखार्थं चापि लक्ष्मण ।
राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे ।।
कथं न पुत्राः पितरं हन्युः कस्यांचिदापदि ।
भ्राता वा भ्रातरं हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ९७

मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ति मिळणार असेल ती मी कधीच घेणार नाही. विषमिश्रित अन्नाप्रमाणे ती सर्वस्वी त्याज्य आहे. लक्ष्मणा ! धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वी देखील मला केवळ तुमच्याचसाठी हवी आहे हें मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. मी शस्त्रावर हात ठेवून तुला सत्य सांगतो की, बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावें एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करीन, आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावें किंवा आपत्ति आली म्हणून आपल्या प्राणांसारख्या प्रिय बंधूंवर कोणी प्राणघातक वार करावा काय. वनवासातून परत येताना भरद्वाजाच्या आश्रमातून हनुमंताला अयोध्येला जावयास सांगताना ते म्हणतात :-

भरतस्तु त्वया वाच्यः कुशलं वचनान्मम ।
सिद्धार्थं शंस मां तस्मै सभार्यं सहलक्ष्मणम् ॥
एतच्छ्रुत्वा यमाकारं भरतो भजते ततः ।
स च ते वेदितव्यः स्यात् सर्वं यच्चापि मां प्रति ।।
ज्ञेयाश्च सर्वे वृत्तान्ता भरतस्येङ्गितानि च ।
तत्त्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभाषितेन च ।।
सर्वकामसमृद्धं हि हस्त्यश्वरथसंकुलम् ।
पितृपैतामहं राज्यं कस्य नावर्तयेन्मनः ।।
संगत्या भरतः श्रीमान् राज्येनार्थी स्वयं भवेत् ।
प्रशास्तु वसुधां सर्वामखिलां रघुनन्दनः ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५

भरताला माझें कुशल सांगून सीता आणि लक्ष्मणासहित मी प्रतिज्ञा पार पाडत परत आल्याचे सांग. ही वार्ता कानावर पडताच भरताच्या चेहऱ्यावर काय सूक्ष्म छटा उमटतात त्या तू नीट पाहिल्या पाहिजेस. त्याच्या हालचालींवरून, मुखवर्णावरून, दृष्टीत पडणाऱ्या फरकांवरून व उद्गारांवरून त्याच्या अंतरंगातील खरे भाव तुला ओळखता आले पाहिजेत. सर्व इच्छा पुरविण्या इतकें समर्थ, हत्ती, अश्व, रथ इत्यादिकांनी गजबजलेलें पितृपितामहांचें राज्य कुणाचें मन विचलित करणार नाही. राज्य चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे भरताला जर इतके दिवस स्वतः राज्यपद घेण्याची इच्छा झाली असेल तर त्याने सर्व पृथ्वीचें राज्य करावे अशीच माझी इच्छा आहे. केवळ भरताने प्राण त्यागाची सिद्धता केल्यामुळेच रामांनी राज्यपदाचा स्वीकार केला. त्यांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटल्याप्रमाणे केवळ बंधुसाठीच त्यांनी राज्य स्वीकारले. स्वतःचा हक्क म्हणून ते त्यांना नको होते.

भरतांचे रामावरील प्रेमही तितकेच अलोट आहे. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचे प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. श्रीभरतांचा स्वभाव प्रभु रामचंद्रांसारखा आहे. ते भगवान रामचंद्रांवर प्रेम करतात याचे कारण त्यांना आपल्या बालपणापासून एक गोष्ट जाणवलेली आहे की, आपला वंश हा अत्यंत श्रेष्ठ लोकांचा वंश आहे. स्वतःच्या वंशाचा गौरव जीवनात असावा. ज्यांच्या अंत:करणामध्ये स्वत:च्या वंशाचा गौरव नांदतो त्यांचेकडून जीवनात मोठमोठी कामे होतात आणि मोठमोठ्या चुका त्यांचेकडून घडत नाहीत. वंशाचा गौरव त्यांच्या चुकांच्या आड येतो. मी कोणाच्या घराण्यात जन्माला आलो ही गोष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नेहमी असते. भगवान श्रीरामचंद्रांना आणि भरतांना आपल्या वंशाचा अत्यंत मोठा गौरव आहे. दोघांना ठाऊक आहे की, आपल्या पूर्वजांमध्ये, आपल्या वंशात जन्माला आलेल्या प्रत्येक राजामध्ये कोणत्या ना कोणत्या दोन-चार गुणांचा प्रकर्षाने आविष्कार होता. राजा हरिश्चंद्रामध्ये सत्यनिष्ठा आहे, राजा दिलीपांच्यामध्ये गुरुभक्ती आणि गोभक्ती आहे, राजा रघूंच्यामध्ये पराक्रम आणि दानशीलता आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि भरतांना हेदेखील ठाऊक आहे की, माझ्या श्रीरामांमध्ये केवळ एकदोनच नव्हे, तर माझ्या पूर्वजांचे सगळे सद्गुण आणि त्याच्याव्यतिरिक्त अनेक सद्गुण पूर्णतेला पोहोचलेले आहेत. म्हणून श्रीरामचंद्रांना 'रघुवंशाची कीर्तिपताका' असे संबोधिले आहे. आणि म्हणून भरत श्रीरामचंद्रांच्या चरणी समर्पित आहेत. बंधू प्रेमाचे हे सर्वोत्तम आदर्श आहेत.

जय श्रीराम 🚩🚩

सर्वेश फडणवीस

Sunday, January 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श पुत्र


या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद तो आनंदसिंधु म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. गोस्वामी तुलसीदास म्हणतात-
जो आनंद सिंधु सुखरासी ।
सीकर ते त्रैलोक सुपासी ।।

त्या आनंदसिंधूच्या एका बिंदूवर हे सगळे जग वेडे झाले आहे. मग त्या आनंदसिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी आणि सगळ्या शास्त्रांनी श्रीरामांबद्दल जर कुठला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला असेल तर तो 'आनंद' आहे. राजा दशरथ अर्थात आपल्या पित्यासाठी रामचंद्रांनी पुत्रत्वाचा कोणता दिव्य आदर्श उत्पन्न केला हें रामकथेच्या वाचकाला सांगायला नको. ते स्वतःच एके ठिकाणी या संबंधाने कृतार्थचे उद्गार काढताना म्हणतात :--

न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः ।। 
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १८
माझ्यासारखा पुत्र मागे झाला नाही व पुढे होणार नाही.भावनेच्या पाण्याने पुत्रकर्तव्याचा रामचंद्रांच्या अंतःकरणातील बंध शिथिल करण्यासाठी भरत चित्रकूटावर आपल्या नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहवीत असताना रामांनी दिलेलें अखेरचें उत्तर त्यांच्या जीवनपटातील या विशिष्ट बाजूवर संपूर्ण प्रकाश टाकणारे आहे. 

लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ११२

अर्थात लक्ष्मी चंद्राला सोडून जाईल अथवा हिमालय आपली शीतलता सोडील. समुद्र मर्यादेचें उल्लंघन करील, पण मी माझ्या पित्याची प्रतिज्ञा कधीही भंग पावू देणार नाही. कर्तव्यमार्गाचा भरताला उपदेश करीत असताना राम उलटे भरतालाच असें म्हणतात :--

सोऽहं वनमिदं प्राप्तो निर्जनं लक्ष्मणान्वितः ।
सीतया चाप्रतिद्वन्द्वः सत्यवादे स्थितः पितुः ॥ 
भवानपि तथेत्येव पितरं सत्यवादिनम् ।
कर्तुमर्हसि राजेन्द्र क्षिप्रमेवाभिषेचनात् ॥ 
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः ।। 
एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः ।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ।। 
एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनन्दन ।
तस्मात्त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात्प्रभो ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०७

केवळ पित्याची आज्ञा पाळण्यासाठीच लक्ष्मण आणि सीता यांच्यासह मी निर्जन वनात आलो आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळणें हें तुझेंही कर्तव्यच नाही काय ? पिता सत्यवादी व्हावा यासाठी माझ्याकडे सोपविलेल्या त्यांच्या एका आज्ञेचें मी जसें परिपालन केलें तसेंच तूही त्याच्या दुसऱ्या आज्ञेचें परिपालन केलें पाहिजे. सत्यवादी पित्याने तुला राज्याभिषेक करून घेण्याची आज्ञा दिलेली आहे. पिता सत्यवादी ठरावा म्हणून ताबडतोब राजसिंहासनाचा अंगीकार करणें हेंच तुझें कर्तव्य आहे. नरकापासून जो पित्याला वाचवितो आणि सर्व प्रकारे अधःपतनापासून त्याचें संरक्षण करतो त्यालाच पुत्र असें म्हणतात. पुष्कळ गुणवान् पुत्र उत्पन्न करावेत म्हणजे निदान त्यांतला एक तरी गयेला जाऊन पित्याला सद्गति देईल व आपलें पुत्रकर्तव्य बजावील असें सर्व राजर्षि म्हणतात. इतर कोणाकरिता नाही तरी निदान माझ्याकरिता तू आपल्या पित्याला अधःपतनापासून वाचव व त्यासाठी तरी राज्याचा स्वीकार कर. भरताने त्यांना मी वनवास करतो व आपण राज्य करा म्हणजे विनिमयाने पित्याच्या आज्ञेचें परिपालन होईल असें सुचविल्यावर रामचंद्रांनी जें धीरोदात्त उत्तर दिलें आहे तें त्यांच्या पितृआज्ञा परिपालनाच्या कल्पना किती नाजूक व उदात्त होत्या हें दर्शवितें. ते म्हणतात :-

उपाधिर्न मया कार्यों वनवासे जुगुप्सितः । 

अर्थात राम- विनिमयाची कल्पनाच त्यांच्या अभिजात चारित्र्याला अत्यंत अपमानास्पद वाटते. ज्याला जी आज्ञा दिलेली आहे त्याच आज्ञेचें त्याने परिपालन केलें पाहिजे असें त्यांचे स्पष्ट मत आहे. श्रीरामांच्या हृदयातल्या पित्याविषयीच्या त्यांच्या खऱ्या उत्कट भावना वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकाण्डाच्या अठराव्या सर्गात उचंबळून आलेल्या आहेत. कारण तेथे त्यांच्या भावनांना मोकळे करण्यात आले आहे.

राम वनवासात निघतांना कैकेयीला राजा दशरथ म्हणतात, 
नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम् ।
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्यैव वक्ष्यति ।। 
यदि मे राघवः कुर्याद्वनं गच्छेति चोदितः ।
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १२

अर्थात माझ्या शब्दांवर राम एक अक्षर देखील बोलणार नाही अशी माझी खात्री आहे. मी वनात जा असे म्हटल्याबरोबर 'होय' असेंच तो म्हणेल. मी वनात जावयास सांगितल्यावर राम जर माझें न ऐकता प्रतिकूल वर्तन करील तर माझें अत्यंत प्रिय होईल. पण तो तसें करणार नाही (हीच अत्यंत दुःखाची गोष्ट आहे). राजाचा हा विश्वास किती यथार्थ होता ! सर्व विश्वाच्या नियमनाची प्रचंड शक्ति असूनही एखाद्या गवताप्रमाणे राज्यलक्ष्मीला लाथाडून रामांनी वनवासाचा मार्ग पत्करला. पित्यासाठी पुत्राने आपल्या महान् जीवनाचा नंदादीप स्वयंप्रेरणेने जाळला आणि केवढा हा पुत्रधर्माचा उदात्त आदर्श आहे. म्हणूनच आदर्श पुत्र श्रीराम या न्यायाने वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे आहे. समर्थ लिहितात, 

बहु चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जीवा मानवा हेची कैवल्य साचे ।।

जय श्रीराम…

सर्वेश फडणवीस

Saturday, January 13, 2024

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम


पुनर्जागरणाचा पर्वकाळ आलेला आहे. उद्या मकरसंक्रात अर्थात मकरसंक्रमण. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे मार्गक्रमण. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे वाटचाल. श्रीरामजन्मभूमी वरील राष्ट्रीय संक्रमणामध्ये आपण सहभागी होत असताना सहज मनात विचार आला की, श्रीरामचंद्रांचें मर्यादापुरुषोत्तमत्व जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतून व्यक्त झालेले आहे आणि याच मकरसंक्रात दिवसाचे औचित्य साधत "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" ही लेखमाला लिहायला घेतोय. श्रीरामांचें जीवन म्हणजे भावना व कर्तव्य यांचा एक विलक्षण संगम असून जीवनाच्या अखेरच्या प्रवासापर्यंत चाललेल्या या संगमात भावनेवर कर्तव्याचा नेहमीच विजय झालेला आहे. भरत, लक्ष्मण, सीता, मारुती अशी अनेक दैवी व्यक्तिचित्रणें रामायणात आहेत व तीं आपल्या अनुपम गोडीने आणि विलक्षण भव्यतेने कोणालाही सहज आकर्षित करतात; पण, तरीही राम हे ह्या सर्वांपेक्षा किती तरी वर आहेत हेंच मनाला पटतें. 

भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराच्या लोकार्पणाचा उत्सव अनुभवण्याची वेळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येणाऱ्या काही तासांत भव्य श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. खरंतर ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू असलेला संघर्ष आता पूर्णत्वास जातो आहे. पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या बलिदानाची ही यात्रा आहे. त्या सगळ्यांची श्रद्धा आणि निष्ठा रामनामात होती. या भव्य मंदिराच्या संकल्पनेला संघर्षाची किनार आहे आणि आता अयोध्येत भव्य मंदिर निर्माण होत आहे. 

मला कायम वाटतं संकल्प दृढ असेल तर संघर्ष पूर्णत्वास जातो आणि संकल्पाला कुठलीही कल्पना असेल तर ते कार्य सिद्धीस जाते.  'याची देही याची डोळा' या मंदिराचे लोकार्पण संपूर्ण जग अनुभवणार आहे. कारण श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. सात्विक संकल्पाच्या पूर्ततेचा क्षण अवघ्या काही तासांत अर्थात २२ जानेवारीला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पूर्णत्वास जाणार आहे. मनसा- वाचा- कर्मणा या न्यायाने मंदिर आता पूर्णाहुतीच्या दिशेने जनमानसात आनंदोत्सव प्रदान करणार आहे. 

महर्षि वाल्मीकींनी "तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः " असे म्हंटले आहे अर्थात ध्वज जसा प्रासादाहून उंच असतो, त्याप्रमाणे राम हे ह्या सर्वांहून अधिकच उच्च श्रेणीवर विराजमान झाले होते असें जें म्हटलें आहे तें अगदी यथार्थ आहे. कारण या प्रत्येकात कर्तव्यापेक्षा भावनेचें प्राबल्य अधिक दृष्टीस येतें. रामचंद्रांच्याही नेत्रांना भावनेच्या भराने पाणावण्याची सवय आहे; पण तरीही त्यांचें जीवनयंत्र अखेरीस कर्तव्याच्याच अधीन होतें, भावनेच्या नाही. कोणत्याही प्रसंगात भावनेचें त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित झालेले नाही. म्हणूनच भरत, लक्ष्मण असे महान् लोक हे व्यक्तिमत्त्वाच्या विकसनाचे उत्तुंग प्रासाद असतील; पण, राम हे त्या सर्वांहूनही उंच असे ध्वज आहेत. म्हणून ते 'मर्यादापुरुषोत्तम' आहेत. इतर कोणी या विशेषणाला पात्र ठरू शकत नाहीत आणि म्हणूनच आपण उद्यापासून चार भागात एकेका अवस्थेबद्दल या निमित्ताने जाणून घेणार आहोंत. 

जय श्रीराम 

#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला 

सर्वेश फडणवीस