Tuesday, August 18, 2020

परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा - मारबत !!

‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’.....

'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त आपल्या नागपूरातच आहे. लहानपणापासून बडकस चौकात  जाऊन मारबत बघतांना कायमच आनंद मिळत असतो. पोळ्याच्या दिवशी मारबत निघते. या काळात रोगराई वाढलेली असते त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’

अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. आणि ही आपली मारबत बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून पण अनेकजण येतात. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर समस्या, संकटे येत नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही पिवळी मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे. १८८१ साली नागपूरच्या राजे भोसले घराण्यातील बंकाबाई नावाच्या राणीने इंग्रजांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राजे भोसलेंचा पराभव झाला. पुर्वी, बंकाबाई हिने ईंग्रजांशी हातमिळवणी केली त्याचा निषेध म्हणुन बांकाबाईच्या, कागद व बांबू वापरुन केलेल्या पुतळयाची, तान्ह्या पोळ्याच्या दिवशी ( पोळ्याचा दुसरा दिवस) मिरवणुक काढण्यात येते व मग त्याचे दहन होते. 

या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बाकांबाईच्या नवर्‍यानेपण या तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणुन त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणुक काढतात. लहान मोठे सगळेजण मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात.  या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात. लहानपणी बाबांचा हात पकडून मीसुद्धा त्यातलाच एक असायचो. बाबा सुद्धा दरवर्षी मारबत बघायला घेऊन जायचे आम्ही  मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघायचो आणि सोबत एकप्रकारे जत्रेचीच मजा कारण अनेक फेरीवाले फुगे, खेळणी इ.वस्तु विकायचे.ईंग्रजांचे राज्य जाऊन आज कितीतरी वर्षे लोटली. परंतु, नागपूरकरांच्या मनात बांकाबाईच्या कुकृत्यामुळे झालेली जखम अजुन भळभळतेच आहे. आज ह्या शेकडो वर्षांच्या परंपरेला टिकवून आपले नागपूरची ओळख आणि वेगळेपण आजही टिकून आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#मारबत #परंपरा

संवाद..


समाज माध्यमांवर सतत नकारात्मक विचार ऐकून कंटाळा आला असाच एक विषय सध्या ह्या माध्यमातून सुरू आहे सुशांतसिंग राजपूत आत्महत्या की नैराश्यातून आत्महत्या ? आपल्याकडे माध्यमांनी समाजाभिमुख राहून समाजभान बाळगावे ही आणि एवढीच अपेक्षा आहे. नुकतेच एका counsellor ह्यांच्याशी ह्या विषयावर बोलणे झाले आणि जे वास्तव समोर ते भयानक आहे. वेळीच आवरले नाही तर पुढची परिस्थिती अधिक भीषण होईल ह्यात शंका नाहीच. सुशांतसिंग प्रकरणात सत्य समोर येईलच पण त्यामुळे आपण नैराश्य बाळगण्याचे कारणच काय हे समजलं नाही. आज नातं हे इतके लवचिक झाले आहे की आपण कुठल्याही गोष्टींवरून नैराश्याने ग्रस्त होऊ तर ते चूक आहे. 

पद,पैसा,प्रतिष्ठा या गोष्टी समाजात वावरताना गरजेच्या आहेतच पण त्या वैयक्तिक हितासाठी. सामाजिक स्वास्थ्याचा विचार केला तर  नाती टिकवून ठेवणं महत्वाचं आहे. ही नैतिक जबाबदारी प्रत्येकाची आहे. यात वरकरणी फायदा दिसत नसेलही पण नकळतपणे मना-मनांची वीण घट्ट होऊन समाजजीवनाला स्थिरता आणि प्रेम हे नात्यांमुळेच लाभत असते. नाती,कुटुंब,समाज ही भारतीय समाजाची अनोखी वैशिष्ट्ये आहेत. नात्यांची वीण घट्ट असली म्हणजे कुटुंबात स्वास्थ्य आणि समाजात समृद्धी आपोआप येते. एकमेकांना समजून घेण्यात जो आनंद आहे तो तर केवळ स्वर्गीय..! हा आनंद मिळवायचा असेल, टिकवायचा असेल तर नात्या-नात्यांमधील संवाद टिकवणे गरजेचे आहे. 

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने घरात सदस्यसंख्या जास्त होती. वडीलधाऱ्या मंडळीचा वावर जास्त असल्याने एकप्रकारचा वचक असायचा. सुख-दु:ख वाटून घेण्याच्या सवयीचं बाळकडू मिळाल्याने समाजात मिसळणे तुलनेनं सोप्प जायचं. त्यावेळची कुटुंबे म्हणजे प्राथमिक सामाजिक संस्थाच होती. सहज संवाद असल्याने बोलण्याचा संकोच नसल्याने नैराश्यानेग्रस्त वगरे ती मंडळी नसायची. हल्ली 'न्युक्लिअर' कुटुंबांची चलती आहे. बरीचशी कुटुंब चौकोनी. चार कोन चार दिशेस आणि त्यांना जोडणारा 'कर्ण'रुपी संवाद जवळजवळ पुसट झालेला. प्रत्येक जण पैशाच्या मागे धावतो आहे. कुटुंबाचे पालनपोषण व त्यांच्या गरजा भागवण्यासाठी तो आवश्यकच आहेच पण त्याच्याच मागे सगळा वेळ जात असल्याने नात्यांत ओलावा निर्माण करणारा 'संवाद' कुठेतरी हरवला की काय असे वाटते. चार लोक एकत्र आली तरी मोबाईल नामक एक शस्त्र सोबत आहेच त्यामुळे त्याचा फायदा काहीच नाही. म्हणून मग सल्लागार शोधून आपण आपलं मन हलकं करतोय. सुशांतसिंग च्या केस मध्ये मीडियामध्ये जी रस्सीखेच सुरू आहे ती मुळात चुकीची आहे. आपल्याकडे न्यायसंस्था आहेत त्यांच्या तपासातून योग्य निर्णय जेव्हा यायचा तेव्हा येईलच पण इथे चढाओढीत आपल्यावर तेच ते बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोना महामारीच्या अनुषंगाने आपण घरातच आहोत. शारीरिक कष्ट होत नसल्याने आपण सारखा तोच तो विचार करतोय पण ह्यातून बाहेर पडावे लागेचल.

संवादाचा अभाव हाच ज्वलंत प्रश्न आज समाजासमोर आ वासून उभा आहे. त्यामुळेच अशी विदारक चित्रे  आणि कटू प्रसंग निर्माण होत आहेत मात्र त्यावर तोडगा काढणे हेही आपल्याच हातात आहे. 
मला वाटतं की यावर एकमेव तोडगा म्हणजे ' संवाद '.  संवाद वाढवून नाती खुलवण्याचा प्रयत्न करायला हवा. माणसामाणसात प्रेम,आपुलकी,जिव्हाळा टिकवणं महत्वाचं आहे. नातं जीवाचं- जीवाशी, मित्रत्वाचं- मैत्रीशी,प्रेमाचं - प्रेमाशी जुळायला हवं. यातून खूप आनंद मिळेलच आणि ह्यामुळे नैराश्यही जवळ येऊन चिपकणार नाही. प्रयत्न करून तर बघू शकतोच. अश्या नट-नट्या आपले आदर्श असतील तर येणारा काळ कठीण आहे. सामान्य जीवन जगणाऱ्यांनी दुसऱ्यांचे आदर्श पुढे ठेवावेत; पण तसे वागणे कठीण हे ध्यानात घ्यावे. जे जे आदर्श वाटते त्यांचे जगणे, मरणे, कार्यकर्तृत्व याने आपण हरखून जातो. सहज बघितलं तर आपल्या आसपास एखाद चांगलं काम केलेल्या माणसाची गोष्ट घडलेली असेल. संवादातून तो आदर्श सांगण्याचा प्रयत्न करूया.. बदल नक्की घडेल मुळात बदलाची सुरुवात तर होईल.. 

✍️ सर्वेश फडणवीस

Saturday, August 15, 2020

योगी श्रीअरविंद !!


श्री. अरविंदांचे जीवन चरित्र म्हणजे या पृथ्वीतलावरील एका महर्षीचा एक अलौकिक असा जीवन प्रवास आहे. १८७२ ते १९५० असा एकूणातला ७८ वर्षांचा महायोगी श्री अरविंदांचा या भारत वर्षातील अस्तित्वाचा कालखंड म्हणजे सर्वोच्च ईश्वरी शक्तीची एक निर्णायक कृती होती. जीवनाच्या सर्वस्पर्शी अनुभवांना सामोरे जात परमेश्वरी चैतन्याच्या अत्युच्च अशा बिंदूपर्यंत महायोगी श्री अरविंद स्वसाधनेच्या माध्यमातून पोहोचले होते.

क्रांतिकारक ते योगी या अतिशय विलक्षण अशा जीवन प्रवासात योगी श्री. अरविंद पावलापावलावर नुसतेच एक महामानव म्हणून पुढे आले नाहीत तर अखिल जगतासाठी एक विलक्षण असे अवतारी व्यक्तिमत्त्व म्हणून दृग्गोचर होऊन बसले आहे.भारताच्या तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीला अध्यात्माचे अधिष्ठान देऊन भगवंत साधनेबरोबरच राष्ट्रतेजाची उपासना करण्याचा संदेश त्यांनी भारतवासीयांच्या पुढ्यात मांडला.त्याच बरोबर माणसामधील दिव्यत्वाला जागृत करून मानव प्रकृतीचे समग्र दिव्यतेमध्ये रूपांतर करणे व सर्वसामान्य माणसात सुप्तावस्थेत असलेल्या असीम अशा परमेश्वरी चेतनेला साधनेद्वारे पृथ्वीतलावर आणून सगळीकडे दिव्यत्व प्रस्थापित करणे हा उद्देश श्री.अरविंदांनी बाळगला होता.

डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते. श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते. १४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला.

श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे. ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत. त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात. या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे .

श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला . श्री.योगी अरविंदांनी भारताविषयी केलेले भाकित आज खरे होताना दिसत आहेत. ते भारताविषयी लिहितात,

“ India of the ages is not dead..has to do something for herself and for the world ”

प्राचीन युगांचा हा भारत मृत झालेला नाही. स्वतः करिता व विश्वाकरिता तो काहीतरी ( भले ) करणार आहे.

The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)

भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे वाटतात.

आज पहिल्यांदा ७३ वर्षात लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ह्यांनी आपल्या उद्बोधनाच्या सुरुवातीला योगी अरविंद ह्यांचा उल्लेख केला आणि त्याचवेळी कुठेतरी वाटलं की योगी अरविंद यांनी केलेलं भाकीत खरं होण्याची हीच तर वेळ नसेल..आज राष्ट्रीय नेतृत्वाची जी वर्धिष्णू वाटचाल सुरू आहे त्याने विश्वास आहेच की भारताचा सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकेल आणि तो दिवस आता जास्त दूर नक्कीच नाही.

✍️ सर्वेश फडणवीस

#१५ऑगस्ट #स्वातंत्र्य_दिन #योगी_अरविंद_जन्मदिवस

Thursday, August 13, 2020

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,जन्म ३१ मे १७२५ (ज्येष्ठ वद्य सप्तमी शके १६४७) मृत्यू १३ ऑगस्ट १७९५ (श्रावण वद्य चतुर्दशी शके १७१७) सत्तर वर्षांचे सुफळ संपूर्ण आयुष्य! दुःखाचे आघात सोसत,धैर्याने पुढे गेलेले व्यक्तिगत जीवन होते. स्वकीयांकडून सन्मान घेत घेत, त्यांच्याशी सामनाही देत देत पुढे गेलेले राजकीय जीवन अहिल्याबाई ह्यांचे होते. उत्तरोत्तर बहरत गेलेले जनकल्याणकारी जीवन त्यांचे होते. असा हा आयुष्याचा त्रिपदरी गोफ अहिल्याबाई होळकर ह्यांच्या चरित्राचा आहे. विवेक घळसासी काकांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला सांगितलं आणि संग्रही असावं असंच हे पुस्तक आहे. संदर्भसहित लेखन असलेले हे राजहंस प्रकाशन प्रकाशित असे चरित्र आहे. मुळात अहिल्याबाई होळकर ह्यांच्यावर लेखनच कमी आहे त्यामुळे हे चरित्रात्मक पुस्तक वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे.

अहिल्याबाई ह्यांच्या व्यक्तिगत जीवनात असे दिसते की, तत्कालीन पितृप्रधान समाजव्यवस्थेनुसार अहिल्याबाईंचा त्यांच्या हयातीतच त्यांच्या डोळ्यांसमोर निर्वंश झाला. अनुवंश शास्त्रानुसार मात्र अहिल्याबाईंच्या अंतकाळी त्यांचा वंश मुलीच्या बाजूने नातींपर्यंत पुढे चाललेला होता हे निश्चित आहे. अहिल्याबाईंची मुलगी मुक्ताबाई सती गेली. पण मुक्ताबाईला दोन मुली होत्या- रमा आणि राधा. महादजी शिंदे यांची बहीण आनंदीबाई निंबाळकर जेव्हा अहिल्याबाईंच्या भेटीला आली होती, तेव्हा अहिल्याबाईंची नात मुक्ताबाईची मुलगी रमाबाई हजर होती, असा उल्लेख आहे. पुढे मात्र तिचा उल्लेख कोठेही येत नाही. मुक्ताबाई सती गेल्यानंतर तिची दुसरी मुलगी राधाबाई बुळे अहिल्याबाईंना भेटायला येऊ इच्छीत होती, अशी नोंद एका पत्रात आहे. पण ती भेटायला आली किंवा नाही हे मात्र कळू शकत नाही. या मुलींना पुढे काय मुलेबाळे होती याचीही नोंद होळकर शाहीच्या पत्रांत मिळत नाही. पण मुलींच्या बाजूने अहिल्याबाईंचा वंश आजही कोठेतरी अस्तित्वात असू शकेल.

अठराव्या शतकाच्या कालपटाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय जीवनाकडे पाहताना जाणवते की, अहिल्याबाईंच्या मागच्यापुढच्या काळात मराठेशाहीत अनेक चौकस, कर्तृत्ववान स्त्रिया राजकारणात आल्या होत्या. पति-पुत्राला गादीवर बसविण्यासाठी त्या अटीतटीने सत्तासंघर्षात उतरल्या होत्या. त्या डावपेच खेळल्या होत्या. त्यांनी किल्ले लढवले होते. कधी यशस्वी झाल्या होत्या. कधी पराभूत झाल्या होत्या. कधी बळी ठरल्या होत्या. पण सत्तेच्या केंद्राभोवतीच घुमत राहिल्या होत्या. अहिल्याबाईंचे राज्यकारभारात येणे निराळे होते. त्यांची गुणवत्ता लक्षात घेऊन, त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना राज्यकारभारात आणले होते. इतरजणींपेक्षा अहिल्याबाई या बाबतीत सुदैवी होत्या. त्यांच्या गुणांची कदर करणारे सासरे त्यांना लाभले होते. त्यामुळे त्यांचा राज्यकारभारात फार सहजपणे प्रवेश झाला आणि कारभाराचे शिक्षणही मिळाले. पण इतरजणींप्रमाणे अहिल्याबाई पुत्रपौत्रांना सत्ता मिळवून देण्यासाठी राजकारण
खेळल्या नाहीत. अहिल्याबाईंचे फार मोठे श्रेय हे होते की, मल्हाररावांची मदतनीस असतानाच्या पूर्ण काळात अहिल्याबाईंनी राज्यकारभारात स्वार्थी ढवळाढवळ केली नाही. सासऱ्यांचे माधवराव पेशव्यांना साथ देत, घरभेद्या राघोबादादांशीही संधान बांधणे यासारख्या डावपेचांपासून त्या शक्य तेवढ्या दूर राहिल्या. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पुत्र त्यांच्या जागी आला, त्यावेळी मल्हाररावांचा उजवा हात म्हणून अहिल्याबाईंचा लौकिक मराठा राज्यात सर्वत्र पसरलेला होता. परंतु या लौकिकामुळेही त्या उन्मत्त राजकारणाकडे झुकल्या नाहीत.

गौतमाबाई अर्थात अहिल्याबाई ह्यांच्या सासूबाई तशाच. त्यांनी अहिल्येचं अंतरंग घडवलं .खूप निगुतीनं,काळजीपूर्वक,धर्माचा आधार घेतला होता. दोघीही अत्यंत धार्मिक.पूजापाठ,कीर्तने , प्रवचने यात मनापासून रमणार्‍या होत्या .पण त्यातीलही चोख तत्वज्ञान,संस्कार तेवढा वेचत आलेल्या होत्या. अहिल्या त्यांच्या हाताखाली सारं शिकली. त्यांचा जणू उपदेश होता ..  अहिल्ये,बाईपण,आईपण आणि राणीपण नीट समजून घे. नीट सांभाळ,मर्यादेत रहा,पण अमर्याद स्वप्नं पहा आणि त्यांनी अहिल्याबाई ह्यांना पदर घेण्याबाबत जो विचार दिला तो शब्दांच्या पलीकडचा आहे आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला,गौतमाबाई म्हणतात,

अहिल्ये ,पदर घे .
चारित्र्य जिवापाड सांभाळ .
अहिल्ये,पदरात घे .
रयतेची आई हो .
अहिल्ये ,पदर खोच . 
उभी रहा.खचू नको . 
अहिल्ये पदरमोड कर . 
कामे कर. पण खर्च मात्र सरकारी नाही,खाजगीतून कर. 
अहिल्ये,पदर पसरु नको .
देवाशिवाय कुणाहीपुढं .

त्यानंतर खरंच अहिल्याबाई पुण्यश्लोक झाली आणि आयुष्यभर कृतार्थ प्राणपणानं हे सारे संस्कार त्यांनी पाळले होते. ती काही दिल्लीच्या तख्ताची राणी नव्हती, पण सारा हिंदुस्थान तिनं पदराखाली घेतलेला होता. सारा खर्च खाजगीतून करुनही सुमारे सोळा करोड रुपयांची कामं,देवालयं- घाट -धर्मशाळा पाणपोया -अन्नछत्रं अशा माध्यमातून उभी केली. आज महेश्वर ला गेल्यावर अहिल्याबाई ह्यांचे अस्तित्व जाणवते आजही तिथला वाडा अहिल्येची साक्ष देत दिमाखात उभा आहे. नर्मदेच्या घाटावर अहिल्याबाई भेटतातच. काशी विश्वनाथाच देऊळ आजही पुण्यश्लोकांची साक्ष देत युगानुयुगे उभे आहेच. अहिल्याबाईंनी बांधलेले घाट इतके वर्ष होऊन सुद्धा टिकून आहेत. अहिल्याबाईंच्या बांधकामांसारखंच त्याचं व्यक्तित्व,चारित्र्यही अभेद्य होते. ती सत्ताधारी होती, पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती, पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती. ती पेशव्यांशी निष्ठावंत होती, पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती, पण ती संन्यासिनी नव्हती. जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकूमत हा सत्तेचा स्वभाव होता, तेव्हा तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे  मंगल प्रतिध्वनी भारतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या. अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली. कर्तुत्ववान स्त्रीला केलेला मानाचा मुजरा करणारे हे पुस्तक संग्रही असावे असेच आहे.

ज्ञात - अज्ञात
अहिल्याबाई होळकर
विनया खडपेकर
राजहंस प्रकाशन - पुणे

✍️ सर्वेश फडणवीस

Wednesday, August 12, 2020

आधुनिक भारताचे शिलेदार - डॉ. विक्रम अंबालाल साराभाई


आधुनिक भारताचे शिलेदार 

विक्रम अंबालाल साराभाई 

१२ ऑगस्ट १९१९ - ३० डिसेंबर १९७१

जन्मस्थान-अहमदाबाद (गुजरात)

भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार 

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बर्‍याच राजकीय व्यक्तींशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर,जवाहरलाल नेहरू,महात्मा गांधी ह्यांसारखी मातब्बर मंडळी त्यांच्या घरी येत असे आणि पुढे शिक्षण घेत असताना डॉ.विक्रम साराभाईं ह्यांना रवींद्रनाथ टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली,सूचना दिल्या,मार्गदर्शन केलं आहे. 

विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. विक्रम साराभाई ह्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची त्यांना आवड होती.आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटोपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही.रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४७ साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.

ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ.विक्रम साराभाई यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आज अवकाश क्षेत्रात भारत उंच भरारी घेत असताना,ज्या संस्था हे यश मिळवत आहेत त्यातील अग्रगण्य भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी १९५० च्या दशकातच सुरुवात केली होती.

२१ नोव्हेंबर १९६५ हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस आहे कारण याच दिवशी डॉ.विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नातून भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं. केरळ मधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आलं होतं. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरं जावं लागलं. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्र संघाने  पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं. आज हे केंद्र 'डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर' म्हणून ओळखलं जातं. तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार कोरण्यात आला आहे -

 "आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत."

नुकताच मागच्या वर्षी चंद्रयान २ मोहीम झाली. भारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेत 'विक्रम' या मून लँडरशी इस्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. या लँडरला 'विक्रम' हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं. ATIRA ची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL,UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आज डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या  जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे. डॉ.विक्रम साराभाईंचा प्रवास हा आम्हाला प्रेरणा देणारा असाच आहे. येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यन्त असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जे आधुनिक भारताचे शिलेदार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉ. विक्रम साराभाई छान लिहितात," He who can listen to music in the midst of noise can achieve great thing." 

✍️ सर्वेश फडणवीस 

#Builderes #ModernIndia

Tuesday, August 11, 2020

युगंधर !!


ह्या लॉकडाऊन मध्ये शिवाजी सावंत ह्यांचे युगंधर वाचून झाले. 
श्रीकृष्ण हे पात्र मुळात खरोखरच अलौकिक आहे. गेली पाच हजार वर्ष हे आम्हा भारतीयांच्या मनाला रुंजी घालत आहे. पण जसजसा काळ पुढे गेला तसतसे वाचतांना अधिक माहिती मिळत गेली. आजवर आपल्याला राधा सांगितली गेली ती श्रीकृष्णाची प्रेमिका याच रुपात. परंतु ह्यातील प्रस्तावनेतील सर्वप्रथम आपण राधा या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हा शब्द मुळातच एक जोड शब्द आहे. रा  म्हणजे मिळो  आणि धा म्हणजे मोक्ष. अर्थात राधा म्हणजे मोक्षासाठी तळमळणारा जीव. लेखक शिवाजी सावंत आपल्याला या गैरसमजांचे मुळ कारण प्रस्तावनेत सांगतात आणि पुस्तक वाचतांना विचार अधिक व्यापक होतो. 

मला वाटतं आज प्रत्येकाने एकदा तरी युगंधर वाचायला हवे. आजचा तरुण म्हंटलं की उत्साह,जिद्द,सामर्थ्य,काम करण्याची प्रचंड क्षमता असलेला, ठरवले ते मिळवण्याची ताकद असलेला अशा अनेक गुणांनी युक्त व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो. इच्छाशक्तीचा चिरंतन स्रोत म्हणजे आजचा युवक आहे. युवाशक्तीचा आविष्कार झाला की अलौकिक ध्येयनिष्ठ व्यक्तित्त्व निर्माण होतात आणि भारत भूमी ही तर अशा नररत्नाची खाण आहे. त्यातच आज जन्माष्टमी म्हणून साजरी करतात असा योगेश्वर,पुरुषोत्तम,युगंधर,पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण याचा जन्मदिवस. 

आज याच योगेश्वर कृष्णाच्या जवळ तरुणाईने जायला हवे असे वाटते. आजच्या तरुणांकडे असंख्य शक्ती आहेत. काम करण्याची जिद्द त्याच्याकडे आहे पण ज्या प्रमाणात शक्ती आविष्कृत व्हायला हवी तशी ती दिसत नाही व जाणवत ही नाही. श्रीकृष्ण हा सखा,रक्षक आहेच. त्याच्या प्रत्येक कृतीतून आपण बोध घेऊ शकतो. आता मैत्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण कृष्ण-सुदामा मैत्रीत आपल्याला दिसून येईल. समर्पण भावनेने आणि अपेक्षारहित केलेली मैत्री ही अशीच असेल. श्रीकृष्णाकडे यश, श्री,औदार्य,ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण आढळतात. माउलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीत उल्लेख केलेला आहे. 

ज्ञान,वैराग्य,ऐश्वर्य,यश,श्री,औदार्य।
हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत ।। 
- संत ज्ञानेश्वर

श्रीकृष्णाला अपयश हे महितीच नाही. श्री म्हणजे माझे सर्व मंगल व्हावे म्हणून श्री हा गुण आहे. त्यांनतरचा गुण म्हणजे औदार्य आज प्रत्येकाकडे असतो पण मर्यादित आहे. ज्ञान म्हणजे जगातील सर्व विषयांचे ज्ञान माझ्याजवळ असावे ही अपेक्षा असावी. इतकं सगळं असताना सुद्धा परिपूर्ण वैराग्य असावे म्हणून वैराग्य गुण. लक्ष्मी असतांना सुद्धा ऐश्वर्य म्हणजे प्रेम अपेक्षित आहे आणि कृष्णाचे प्रेम म्हणजे राधा म्हणजे प्रेम कसं करावं ते म्हणजे सुद्धा राधे सारखं, गोपिकेवर असलेलं पूर्ण समर्पण भावनेनं प्रेम ह्या सर्व गुणांनी युक्त कृष्णाचे चरित्र आहे. त्या ययुगंधर योगेश्वर श्रीकृष्णाचे प्रागट्य याचसाठी झाले आणि  गोकुळातला उत्सव नंदोत्सव ह्याबरोबर कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेल्या उपदेशाचे स्मरण करण्याची आवश्यकता आज आली आहे ह्यातील एक गुण तरी अंगिकारण्यासाठी असते जन्माष्टमी. 

आज आपल्या लोकसंख्येच्या ६५% लोकसंख्या तरुणांची आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. आज तरुणाईने त्या युगंधर कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा. तो प्रत्येक टप्प्यावर आपल्याला भेटत असतो. " सिदंती मम गात्राणि " आणि 'न योत्स्ये' असे म्हणणारा अर्जुन हा देखील तरुण युवा होता. अर्जुन सामर्थ्यशाली योद्धा होता परंतु द्वंद्वात अडकला होता. त्याला त्याचा स्व चा विसर पडला होता आणि अर्जुनाला स्वकीयांशी लढायचे होते म्हणून तो कर्तव्यच्युत झाला होता. आजचा तरुण स्वतःशी लढताना असाच होतो आहे अगदी अर्जुनासारखा आणि अशा संघर्षाच्या,संग्रामाच्या क्षणी जन्म होतो गीतेचा. 

जगद्गुरू श्रीकृष्णाने जी गीता कुरुक्षेत्रावर सांगितली ती गीता आज मार्गदर्शक आहे. खरंतर गीता रणभूमीवर जन्माला आली. योद्धा हा नेहमी तरुण असतो. अर्थात वृत्तीने,विचाराने तो तरुण असतोच. अशा तरुणाला " तस्मादुनतिष्ट कौंतेय युध्दाय कृतनिश्चय"  असे म्हणून गीता जागृत करते व आलेल्या संघर्षासाठी सिद्ध करते. खरंतर ही गीता आज तरुणाला मुखोद्गत असावी निदान त्यातील विचार तरी माहिती असावे ही अपेक्षा आहे. आपल्यावर आलेल्या प्रत्येक  संकटाचे निराकरण करण्याचे सामर्थ्य गीतेत आहे. गीता त्यागभावना शिकवते. व्यक्तिने आयुष्यात यशस्वी होऊन आनंदी होण्यासाठी काय करायला हवे हे गीता आपल्याला शिकवते. अशी ही श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आपल्या सर्व समस्या सोडवून वैयक्तिक उन्नती साधत राष्ट्रकार्यासाठी सज्ज होत हे राष्ट्र अधिक बलशाली करण्यासाठी योगेश्वर श्रीकृष्णच आदर्श असायला हवे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, August 4, 2020

भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण - श्रीरामजन्मभूमी 🚩🚩


हा सुवर्णक्षण अनुभवण्याची वेळ अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. ५०० वर्षांचा कलंक मिटण्याचा शुभ दिवस उद्या यावेळी संपन्न झालेला ही असेल. आपल्या राष्ट्राची ओळख , आपल्या समाजाचे आदर्श, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम. अखिल भारतीयांच्या परवलीचा शब्द अर्थात प्रभू श्रीराम. ह्या पूर्ण पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या पूजेची बंदी हिंदूंनी ५०० वर्ष मनात साठवून ठेवली होती. खरंतर ५ ऑगस्ट २०२० भाद्रपद शु. द्वितीया तिथी सुवर्णाक्षरात कोरून ठेवावी अशीच आहे.

अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य मंदिराचा उद्या शंखनाद होतो आहे. युगानुयुगे ज्या क्षणांची प्रतीक्षा समस्त हिंदू समाज करत होता तो क्षण जवळ आलेला आहे. कालपासून नागपूरात पावसाची संततधार सुरू आहे. वातावरणात ही अनामिक चैतन्य,उत्साह भारलेला आहे. जर का कोरोनाचे संकट नसते तर हा सोहळा आणखीन अभूतपूर्व झालेला असता आपल्यापैकी अनेकजण अयोध्येला गेले असते पण ह्या महामारीच्या अनुषंगाने आपण आपल्या घरीच हा सोहळा अनुभवणार आहोत. 

अर्थात काही स्वतःला बुद्धिवंत व पुरोगामी समजणारी मंडळी या घटनेचा निषेध करून त्यात विघ्न आणायला पुढे सरसावली आहेतच. इतक्या वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतून आता कुठे आपण मोकळा श्वास घेऊ लागले आहोत  पण त्यांना सदैव प्रतिगामी म्हणून हिणवणारे तथाकथित सेक्युलर,आपले नाक ठेचले जावे म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांना प्रत्येकाने योग्य प्रकारे उत्तर देणे आवश्यक आहे. पण आपण आपली मर्यादांचे भान ठेवण्याची नितांत गरज आहे. ही घटना संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीने आनंद देणारी आणि अभिमान वाटावी अशीच आहे. शक्य असल्यास आपल्या घरावर दीपमाळ लावावी. संध्याकाळी दीपोत्सव करावा. सध्या श्रावण असल्याने गोडधोड होंत आहेच पण उद्या श्रीरामासाठी काहीतरी जरुर करावं. ज्यावेळी राम अयोध्येला आले त्यावेळी गुढी उभारून नगरवासियांनी त्यांचे स्वागत केले होते. विजयाचे प्रतीक म्हणूनच गुढी उभारण्याची पद्धत आहे. शक्य झाल्यास गुढी उभारून आपला आनंद ह्या माध्यमातून द्विगुणित करूया.. 

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं -

राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं

जय श्रीराम 🚩🚩

✍️ सर्वेश फडणवीस 

#RamMandirNationalPride

Monday, August 3, 2020

बखर अयोध्येची !!


बखर अयोध्येची !!

राम मंदिर - भारताच्या इतिहासातील सातवे सोनेरी पान..

काही पुस्तकं अशी असतात की एकदा हातात घेतली की पूर्ण संपवल्याशिवाय बाजूला ठेवताच येत नाही. असंच एक पुस्तक नुकतंच वाचून काढले भारतीय विचार साधना पुणे प्रकाशित डॉ. गिरीश आफळे लिखित " बखर अयोध्येची " !! ह्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतच स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असते तर त्यांनी इतिहासातील सातवे सोनेरी पान असाच उल्लेख केला असता अशी नोंद आहे. 

आज इतिहासात सर्वात दीर्घ दिलेल्या लढ्याचे नाव सांगायचे झाले तर ते आहे रामजन्मभूमी आंदोलन आहे. आज राम जन्मभूमी आंदोलन यशस्वी झाले आहे त्यासाठी हजारो राम भक्तांचे बलिदान सार्थकी लागले. ५०० वर्षाच्या ऐतिहासिक लढ्यानंतर आता ५ ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू होईल येणाऱ्या काही वर्षात भव्य मंदिर पूर्णही होईल पण त्याचा इतिहास आणि त्या आंदोलनास समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचून संग्रही ठेवले पाहिजे कारण ह्याचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहीत करून देण्याचे दायित्व आपल्यावर आहे आणि आपणच हा ऐतिहासिक इतिहास जतन करून ठेवलाच पाहिजे कारण आपण खरतरं भाग्यवान आहोत की हे आपल्याला 'याची देही याची डोळा' हे अनुभवता येणार आहे. 

ह्या पुस्तकातील जो घटनाक्रम वाचला तो सर्वश्रुत आहेच ६ डिसेंबर  १९९२ ला ती वादग्रस्त वास्तू पाडून कार सेवकांनी ओट्यावर रामलला विराजमान केले आणि तब्बल २८ वर्षांनी मा.सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देऊन भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. या आंदोलन संदर्भातील संपूर्ण माहिती बखर अयोध्येची या पुस्तकात दिली आहे. ह्यातील माहितीचा खजिना शब्दातीत आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी केलेले सर्व फोटो या पुस्तकात आहेत. वैदिक परंपरेपासून सुरू झालेल्या अयोध्येचे वर्णन ह्या पुस्तकात संदर्भासहित मांडले आहे. येणाऱ्या नव्या पिढीला रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास  समजून घेण्यासाठी सर्वात योग्य व संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. बाबर सेनापती मिर बाकी याने रामजन्म भूमी मंदिर पडले तिथपासून ते ६ डिसेंबर १९९२ व त्यापुढील इतिहास ह्यात मांडलेला आहे.

पुस्तकात पूर्वकाळा पासून श्रीराम जन्मभूमी अयोध्येत एकूण ७९ लढायांचे दाखले दिले आहेत. आणि प्रत्येक वेळेस हिंदूंनी अतिशय कडवा संघर्ष कसा केला आहे याचे वर्णन केले आहे. १ फेब्रुवारी १९८६ रोजी प्रभू श्री रामचंद्रांची बंदिवासातून मुक्तता, राष्ट्रमंदिराचा शिलान्यास, अडवाणींनी संपूर्ण देशांत काढलेली रथयात्रा या प्रकरणांचे वर्णन खूपच मंत्रमुग्ध करणारे आहे. विश्व हिंदू परिषदेने उभारलेले  देशव्यापी आंदोलन, साधू, संत महंत यांचे मोलाचे योगदान यात संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन कसे झाले ? आणि दोन्ही कारसेवा कश्या पार पडल्या यांची अगदी अचूक क्रमशः मांडणी केली आहे. मुस्लिम हवालदाराने सांगितलेला अनुभव, कोठारी बंधूंची निर्दयी हत्या असे एक ना एक प्रसंग वाचताना भावूक होत आज ज्यावेळी भव्य मंदिराचा शिलान्यास होतांना जे भावनिक समाधान होतं ते अतिशय आनंद देणारे आहे. 

आपण सहजतेनं म्हणत होतो भव्य मंदिर निर्माण व्हावे पण ह्या मंदिरासाठी ज्यांचे बलिदान झाले त्यांचे स्मरण करणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी. कारण हे फक्त मंदिर नाही तर अखिल भारतीय मानवाच्या परवलीचा शब्द आहे राम आणि त्याचे जन्मभूमीवर असलेले मंदीर. ह्याचा रक्तरंजित इतिहास आपण जाणून आहोतच. आजवर अनेक लढाया ह्या परकीयांशी झाल्या पण ही लढाई स्वकीयांशी झाली आणि आज त्याच ठिकाणी आता भव्य राम मंदिर निर्माण होणार आहे. ५ ऑगस्टला तो सुदिन प्रत्येकासाठी सुवर्णक्षण असणार आहे. छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्णनासारखेच काहीसे हे भूमिपूजन ऐतिहासिक असणार आणि ह्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी आजवर झालेल्या आंदोलनाची यशोगाथा येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक.. " बखर अयोध्येची "


बखर अयोध्येची 

प्रकाशन- भारतीय विचार साधना पुणे 

मूल्य - ₹ २००

✍️ सर्वेश फडणवीस 

Saturday, August 1, 2020

लोकमान्यांचा गणेशोत्सव !


भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जनजागृतीसाठी उपयोगात आणायची होती. समाजाला एकसंध करण्यासाठी गणेशोत्सव सुरू झाला खरा पण केसरी-मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक झाला.'केसरी' संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. 

लोकमान्य पुण्यात पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान ह्या दहा दिवसांत होत असे. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे कायमच होत असत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती गायकवाड वाड्यात अर्थात कालांतराने केसरीवाडा येथे होऊ लागला.

१९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते आणि तो हेतू त्यांनी शेवटपर्यंत जपला होता. 

इंग्रजांच्या काळात भारतीय संस्कृती लयास जात होती, तसेच लोक एकत्र येत नव्हते. लोकमान्य टिळकांना वाटायला लागले स्वातंत्र्यासाठी लोकांनी एकत्र यायला हवेच त्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला आणि आपल्या घरातील गणपती त्यांनी चौकात आणून बसवला. इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. ते म्हणत, "आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का ? त्यांच्या मते भारतीयांच्या दुर्बलतेची कारणे त्यांचा हरवलेला आत्मविश्वास आणि एकीची भावना ही होती आणि जोपर्यंत लोकांचा त्यांच्या धर्म, संस्कृती आणि इतिहासाबद्दलचा आदर परत वृद्धिंगत होत नाही तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या गप्पा मारणे व्यर्थ आहे. त्यांच्या ग्रीक संस्कृतीच्या अभ्यासातून त्यांना असे जाणवले की, ज्युपिटर देवाच्या स्मरणार्थ दर चार वर्षांनी साजरे होणारे ऑलिंपिक खेळ विविध ग्रीक राज्यांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरले होते. याच धर्तीवर इ.स. १८९३ मध्ये त्यांनी जुन्या काळापासून प्रस्थापित गणेशोत्सवाचे नव्या स्वरूपात पुनरूज्जीवन केले. 

हिंदूंमध्ये घराघरांत गणेशोत्सव अनेक शतकांपासून साजरा केला जात पण टिळकांनी त्याला चतुर्थी ते चतुर्दशी ह्या दहा दिवस चालणार्‍या सामाजिक उत्सवाचे स्वरूप लोकमान्यांनी दिले. यामागे त्यांचे दोन उद्देश होते. एक म्हणजे या उत्सवाने ब्रिटिश-विरोधी मतप्रचारासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे आणि दुसरे म्हणजे याद्वारे हिंदू समाज जवळ येऊन त्यांच्यातील एकोपा वाढीस लागावा ह्याच हेतूने लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. 

टिळक यांनी दैनिक केसरीमध्ये पहिल्या गणेशोत्सवानंतर लिहिलेल्या अग्रलेखात त्या काळच्या वातावरणाचा उल्लेख केला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य टिळकांनी जनजागृती करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा केला. त्यापासून स्फूर्ती घेऊन गिरगावातील केशवजी नाईकांच्या चाळीतील उत्साही तरुणांनी १८९२ साली मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्यांना अभिप्रेत असलेला उत्सव व समाजप्रबोधनाचे कार्य तिथे होऊ लागले. केशव नाईकांच्या चाळींचा आदर्श ठेवून मुंबईतील त्या काळातील अनेक चाळींनी, वाडय़ांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात केली. देवघरातील गणपती सार्वजनिक गणेशोत्सव स्वरुपात घराबाहेर आणला हे एक क्रांतिकारी पाऊल होते असे म्हणायला हरकत नाहीच. कारण लोकमान्य क्रांतिकार्य करण्यासाठी कायमच तत्पर होते. १८९३च्या मुंबई आणि पुण्यातील हिंदू-मुस्लिम दंगलींमध्ये सरकारने मुस्लिमांची बाजू घेतली असे त्यांचे स्पष्ट मत होते व त्या पार्श्वभूमीवर हिंदूंना एकत्र करणे त्यांना गरजेचे वाटत होते. अनेक साम्राज्यांप्रमाणे इंग्रजाचा राजकीय बैठकींना विरोध होता पण धर्माच्या बाबतीत ते दोन हात दूर राहणेच पसंत करत. याचा फायदा टिळकांनी गणेशोत्सवाच्या पुनरुज्जीवनासाठी करून घेतला. थोड्याच अवधीत गणेशोत्सव सर्वदूर पोहोचला आणि अनेक लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापित झाली.

लोकमान्यांनी गणेशोत्सव फक्त आरती आणि प्रसाद ह्यावरच न ठेवता विविध विषयांवरील व्याख्यानमाला आयोजित करून तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळवून देणे,पौराणिक देखावे बनवून जनतेला संदेश देणे,जिवंत देखावे दाखवून जनतेला संदेश देणे,विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करून जनतेचे मनोरंजन करणे
आणि मुख्य म्हणजे समाज विधायक कामे करणे अशा रितीने धार्मिक पातळीवर लोकांना यशस्वीरीत्या एकत्र आणल्यानंतर टिळकांनी धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्‍न चालू केले. ज्यामुळे लोकांमधील आत्मविश्वास परत येऊ शकेल असा त्यांना विश्वास वाटला, 

दरम्यान १८ सप्टेंबर १८९४ रोजी 'केसरी'च्या अग्रलेखात ते लिहितात, 'यंदाचा भाद्रपद महिना व विशेषतः गेली अनंत चतुर्दशी वगैरे दिवस मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाच्या अक्षरांनी नोंदण्यासारखे लाभले. यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ जो वैश्यवर्ग अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसा मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, पाणी, उदमी इत्यादी औद्योगिक कामे करणाऱ्यातील लोकांना यंदा विलक्षण रीतीचे स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्याची जी काही मेहनत घेतली, ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यावर चकाट्या पिटीत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व या दारूच्या पायी बायकापोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये अचकट-विचकट गाणी ऐकत बसणारे या सर्वांना निदान काही काळापर्यंत तरी उपरती होऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजनपूजनात गेला, ही गोष्ट काही लहान, सामान्य नाही. मेळ्यांचा सरंजाम पाहून तर आमची मती गुंग झाली. मेळेवाल्यांचा पोशाख, ताल धरणाऱ्या काठ्या, त्यांचा आवाज, एकाच ठेक्याने चालणारी पावले, त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले ते गाणे, सर्वत्र स्वधर्माच्या स्तुतीने भारलेले ते कर्णमधुर आलाप, आमच्या मराठे बंधूंचा तो वीरश्रीयुक्त उत्साह आणि त्यांची ती भव्य निशाणे आहे. गणेशोत्सवा संदर्भात टिळकांनी आपली अशी भूमिका मांडली.

उत्सवाच्या फलश्रुतीसंदर्भात टिळक लिहितात, 'संकटसमयी एकमेकांस उपदेशाची, पैशाची, सल्लामसलतीची मदत करणे, एकमेकांस सज्ञान करण्यासाठी प्रयत्न करणे इत्यादी प्रेमसूचक गोष्टींनी आपले युग्म विशेष संलग्न होत जाणारे आहे. तेव्हा ज्या योगाने आपला संबंध निकटतर होत जाईल, त्या त्या गोष्टी करणे आणि करविणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.' गणेशउत्सवातील व्याख्यानांनी ज्ञान मिळते. मेळ्यातील पदांनी सामाजिक, धार्मिक गोष्टी कानांवर पडून अंतःकरणात भिनतात. १० दिवस उत्सव होऊन विसर्जनानंतर घरी गेल्यावर तुम्हाला कसेतरी वाटेल. ज्या गोष्टीची सवय होते, ती गोष्ट नाहीशी झाल्याने मनाला चटका लागणे स्वाभाविक आहे. यावर माझे सांगणे आहे, की हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही मिळवली, ती गोष्ट म्हणजे स्वराज्य! ते गेल्याबद्दल तुमच्या मनाला किती चटका लागला पाहिजे याचा विचार करा.

- लोकमान्य टिळक (१९०७ मध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या सांगतेनंतर केलेल्या भाषणातील अंश)

गणेश चतुर्थी ला सुरू झालेला गणेशोत्सव हा दहा दिवसांचा सोहळा असतो. सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्रपूर्व काळात जन जागृती, लोक संघटन, लोक संग्रह या कारणासाठी होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याचे स्वरूप बदलले आहे. लोकमान्य टिळक यांनी घरगुती गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले, ते पुणे शहरातून. स्वातंत्र्य चळवळीला बळ देण्यासाठी टिळक यांनी हे पाऊल उचलले. आज आपल्याला देशभरात आणि परदेशातही गणेशोत्सव पोहोचलेला दिसतो, त्याची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना आहे. हीच वैचारिक अधिष्ठानाची शृंखला ह्या ही काळात नेण्याचा प्रयत्न करायला हवा. 

✍️ सर्वेश फडणवीस

संत सानिध्यातील लोकमान्य !!


लोकमान्यांची देशभक्ती, त्यांचे कार्य याविषयी सर्वांना माहिती आहेच. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा आवाज,भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा कणा,भारतीय असंतोषाचा जनक,अशी कितीतरी गौरवपूर्ण बिरुदे त्यांना प्राप्त झाली आहेत. पण संतांच्या सानिध्यात असतांना संत श्री दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय ग्रंथांत लोकमान्य टिळकांचं मोठ्या प्रेमाने वर्णन केले आहे. ते लिहितात, 

टिळक बाळ गंगाधर। महाराष्ट्राचा कोहिनूर।

दूरदृष्टिचा सागर। राजकारणी प्रवीण जो॥

निज स्वातंत्र्यासाठी। ज्याने केल्या अनंत खटपटी।

ज्याची धडाडी असे मोठी। काय वर्णन तिचे करू? ॥

करारी भीष्मासमान। आर्य महीचे पाहून दैन्य।

सतीचे झाला घेता वाण। भीड न सत्यात कोणाची॥

वाक्चातुर्य जयाचे। बृहस्पतीच्या समान साचे।

धाबे दणाणे इंग्रजांचे। पाहून ज्याच्या लेखाला॥ 

कृति करून मेळविली। ज्याने लोकमान्य ही पदवी भली।

ती न त्यांना कोणी दिली। ऐसा होता बहाद्दर॥ 

-श्री गजानन विजय ग्रंथ अ-१५ (१०-१४)

मुळात लोकमान्यांची वृत्ती-प्रवृत्तीही अध्यात्मनिष्ठ होती. १९४५ मध्ये श्री. महादेव धोंडो विद्वांस यांनी ‘लोकमान्यांचे आध्यात्मिक जीवन’, ही एक पुस्तिकाच लिहिली होती. ती वाचनीय आणि संस्मरणीय आहे. त्याचबरोबर लोकमान्यांनी स्वत: लिहिलेली गीतारहस्याची प्रस्तावनाही अत्यंत बोलकी आहे. लोकमान्य लिहितात- ‘‘प्रस्तावना संपली. आता ज्या विषयाच्या विचारात आजपर्यंत पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो हा विषय…... ‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!’ उठा, जागे व्हा आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या. यातच कर्म-अकर्माचे सर्व बीज आहे. या धर्माचे स्वल्पाचरणही मोठ्या संकटातून सोडविते, असे (खुद्द भगवंताचेच) निश्चयपूर्वक आश्वासन आहे.’’ लोकमान्यांच्या जीवनात अनेक प्रसंग दिसून येतात ज्यावेळी ते संतांच्या सहवासात गेलेले आहेत. यातीलच पहिला प्रसंग हा सर्वश्रुत आहेच. श्री गजानन विजयग्रंथ वाचनात असणाऱ्या प्रत्येकाला तो मुखोद्गत आहे. 

टिळक आणि श्री संत गजानन महाराज ह्यांच्या भेटीचा प्रसंग. 

लोकमान्य टिळकांच्या अकोल्यातल्या एका सभेला श्रीगजानन महाराज उपस्थित होते, तारीख होती ४ मे १९०८,तिथी अक्षयतृतीया निमित्त होते शिवजयंतीच्या उत्सवाचे..! 

आपल्या भाषणाची सुरुवात करतांना टिळक म्हणाले....

"आजचा हा प्रचंड जनसमूह पाहून मला आनंद होत आहे. याप्रसंगी आपल्या प्रांतातील सिद्धपुरुषाचे या ठिकाणी आगमन होऊन त्यांचा अनुग्रह व्हावा हे खरोखर सुदैव होय. असा प्रसंग शिवाजी उत्सवाला यापूर्वी कधीही आला नव्हता. महाराजांना आपण आमंत्रण करून हा अपूर्व योग आपण घडवून आणला याबद्दल मी आपला फार आभारी आहे. श्रीगजाननमहाराजांची परंपरा श्रीशिवगुरु श्रीरामदासस्वामींपासून आहे हे आपणास माहीत आहेच. या उत्सव प्रसंगी यांनी हजर राहावयाचे मनात आणून व आपल्या विनंतीस मान देऊन येथे आगमन केले आहे. येथे येण्याचे त्यांनी मनात आणले,त्यामुळे आपल्या कार्याला यश येईल,अशी सद्बुद्धी माझ्या मनात उत्पन्न झाली आहे. कोणत्याही कार्यास परमेश्वराचा अनुग्रह पाहिजे व त्याचे चिन्ह आजचे महाराजांचे आगमन होय..या ठिकाणी येण्याची त्यांना बुद्धी व्हावी ,आमची वेडीवाकडी कृत्ये त्यांनी अवलोकन करावी व त्या कार्यांना त्यांचे पाठबळ मिळावे,यावरून हा दैवी योग आहे अशी माझी समजूत झाली आहे....या वेळेस माझ्या मनोवृत्ती इतक्या उचंबळल्या आहेत, विचार इतके प्रगल्भ झाले आहेत की त्यांचे स्पष्टीकरण करणे अशक्य झाले आहे. यासाठी त्यांनी आज जो अनुग्रह केला त्याबद्दल त्यांचे उपकार मानून व आमच्या चळवळीवर अशीच कृपादृष्टी ठेवावी ही त्यांस प्रार्थना करून व्याख्यानास आरंभ करतो."

यानंतर काहीच महिन्यात टिळकांना अटक झाली आणि मंडालेच्या कारागृहात पाठवले गेले, मंडलेला जाण्यापूर्वी गजानन महाराजांनी टिळकांना भाकरीचा प्रसाद पाठवला होता, महाराज म्हणाले होते,

सज्जनांसी त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।।

कंसाचा तो मनी आणा । इतिहास म्हणजे कळेल ।।

या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामगिरी ।। 

जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ।। 

-श्री गजानन विजय ग्रंथ - अ.१५(८७-८९)

टिळकांनी तो प्रसाद स्वानंद ग्रहण केला, पुढे मंडालेच्या कारागृहात अवघ्या चार पाच महिन्यात टिळकांनी साडेपाचशे ते सहाशे पानाचे  गीतारहस्य लिहून काढले. श्रीगजानन महाराजांचे शब्द खरे ठरले.

टिळक आणि श्री साईबाबा भेट ..

स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या वेगाने देशभर पसरत होती.लोकमान्यांचे नेतृत्व देशमान्य झाले होते. गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे स्नेही म्हणून परिचित होते. त्यांनी टिळकांना शिर्डीत जाण्याबद्दल सुचवले होते. खापर्डेंसह टिळक अमरावतीहून संगमनेरला आले. हे खापर्डे विद्वान वकील होते. व्यासंगी,प्रखर देशभक्त होते. फर्डे वक्ते, त्यांची अनेक भाषणे इंग्लडमध्ये गाजली होती. त्यांचा परिचय साईबाबा, गजाननमहाराज यांच्या सोबत होता. दादासाहेब यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. १८९४ ते १९३८ या कालावधीतील नोंदी आजही उपलब्ध आहेत

खापर्डे आपल्या डायरीत लिहितात की, सकाळी ८.३० वाजता वकील संत यांच्या घरी पानसुपारी झाल्यावर आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शिर्डीत पोहचलो. तेथे निवासाची व्यवस्था दीक्षित वाड्यात करण्यात आली होती. त्यावेळी तिथे माधवराव देशपांडे, बापूसाहेब बुट्टी,नारायण पंडित,बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर नोकर उपस्थित होते. सर्वजण मशिदीत गेल्यानंतर तेथे साईबाबांना वंदन केले. बाबांना दक्षिणा दिली. सर्वांनी येवल्याला पुढील कामासाठी जाण्याची परवानगी मागितली. त्यावर बाबा म्हणाले, वाटेत उष्म्याने मरायला जावेसे वाटते का? इथे तुम्ही तुमचे जेवण करा.त्यानंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यानंतर निघा. बाबांच्या आदेशानंतर माधवराव देशपांडे यांच्या घरी जेवण केले. विश्रांती घेऊन मशिदीत गेलो.

बाबा पहुडले होते. ते झोपले असे वाटले. लोकांनी लोकमान्यांना पानसुपारी दिली. मग परत मशिदीत गेलो. बाबांनी उदी दिली. निघण्याची अनुमती दिली. त्यानुसार पुढील प्रवास सुरू केल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी बाबा आणि लोकमान्य यांच्या सत्कारात उपयोगात आणलेली शाल शामा यांच्याकडे देण्यात आली. ती शाल पुढच्या पिढीने संगमनेर येथील साईबाबा मंदिराकडे प्रदान केली. संगमनेर येथे इंगळेबाबा यांनी अत्यंत श्रध्देने तिची जपणूक केली आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला तिची अत्यंत श्रध्देने पूजा करण्यात येते. 

या भेटी दरम्यान लोकमान्य आणि साईबाबा यांच्यात संवाद झाला आहे. त्या संवादाचा काही भाग खापर्डे यांनी डायरीत नमूद केला आहे. या भेटीत साईबाबा लोकमान्यांना म्हणाले की, लोक वाईट आहे, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा. तर येवल्याला जाण्याची परवानगी मागितली असता ती न देता जेवण करून जाण्याची आज्ञा केली. खरंतर खापर्डे हे बाबांच्या सहवासात अऩेक दिवस होते. ते लिहितात,बाबा आज या भेटीच्या वेळी जितके प्रसन्न होते तितके प्रसन्न त्यांना यापूर्वी कधीच पाहिले नाही. ही प्रसन्नता म्हणजे दोन महापुरूषांच्या तेजाचे प्रतिबिंब होते जणू.

टिळक आणि स्वामी विवेकानंद भेटीचा प्रसंग ..

स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या विंचूरकर वाड्यात झाली. ( याच वाड्यात गणेशोत्सवाच्या प्रसंगी टिळकांनी केलेले भाषण प्रसिद्ध आहे). या वाड्यात आजही भेटीसंदर्भातील फोटो बघायला मिळतात.  शिकागोच्या विश्वविख्यात व्याख्यानापूर्वीच लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती. एप्रिल ते सप्टेंबर १८५२ दरम्यान महाराष्ट्रात प्रवासात असलेल्या विवेकानंदानी पुण्यात टिळकांच्या घरी आठ ते दहा दिवस मुक्काम केल्याचा संदर्भ आढळून येतो. त्यांची अखेरची भेट १९०१ मध्ये कोलकाता येथे झाली होती. टिळकांनी आपल्या मित्रांसह बेलूर मठाला भेट दिली होती व स्वामी विवेकानंदांशी वार्तालाप केला होता. दरम्यानच्या काळात टिळक आणि विवेकानंद यांचा संवाद पत्रव्यवहाराने झाल्याचे संदर्भ आहेत. विवेकानंदांच्या कार्यांना ‘केसरी’मध्ये अतिशय ठळकपणे स्थान मिळत असे, कारण टिळकांना त्यांच्या कार्याविषयी नितांत आदर होता. या महात्म्यांना जोडणारा अजून महत्त्वपूर्ण दुवा होता, तो म्हणजे भगवद्‍गीतेतील ‘कर्मयोग’ या कालखंडातील स्वातंत्र्य चळवळ गीतेच्या तत्त्वज्ञानाने भारावलेली होती.

टिळक आणि श्री अण्णासाहेब पटवर्धन भेट..

लोकमान्य टिळक व अण्णासाहेब पटवर्धन यांचा संबंध तर लोकविश्रुतच आहे. श्री अप्रबुद्ध ब्रह्मर्षी श्री अण्णासाहबे पटवर्धन ह्यांच्या चरित्रात लिहितात, लोकमान्य हे मूळचे रानड्यांच्या तालमीतले. परंतु रानड्यांसारख्या शांतिब्रह्माच्या सहवासात त्यांच्या आंगच्या 'वीरो रस: किमयमेत्युत दर्प एवं' अशा क्षात्रवृत्तीला नीट वाव मिळेना व लौकरच रानड्यांच्याविषयी मनात अतिशय आदर असूनही त्यांना रानड्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली. मद्रासेस जाण्यापूर्वी डेक्कनस्टार व किरण यांचे रूपांतर मराठा व केसरी यांच्यात केल्यावर नामजोशी व टिळक यांचा विशेष संबंध आला. हाच अण्णासाहेब व टिळक यांच्या संबंधातील मधला दुवा आहे. अण्णासाहेब हे जवळ जवळ टिळकांच्या अखेरपर्यंत होते आणि सर्व महत्त्वाच्या बाबतीत त्यांचा सल्लाही घेतला जात असे. धैर्य, साहस, विलक्षण चिकाटी, प्रखर स्वाभिमान वगैरे दोघांच्याही आंगच्या गुणसाधर्म्यामुळे अण्णासाहेब यांचा टिळकांवर फार लोभ जडला. व उत्तरोत्तर तो वाढतच गेला. टिळकांच्या मनातही अण्णासाहेब यांच्याविषयी पराकाष्ठेचा आदर होता. किंबहुना राष्ट्रपुरुष या नात्याने अण्णासाहेब यांची योग्यता केवढी मोठी होती याची जाणीव असणारा पुण्यांत तेवढाच एक पुरुष होता. सर्व त-हेच्या अनुभवांच्या भट्टीतून बाहेर पडलेल्या अण्णासाहेब यांच्या धार्मिक सामाजिक वगैरे मतांचे व टिळकांचे पटणे अर्थातच शक्य नव्हते परंतु त्यामुळे त्यांच्या लोभात कधीच अंतर आले नाही. दोघांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा होता व टिळकांच्या सर्व प्रयत्नांस त्यांची सहानुभूती असे. लखनौ काँग्रेसच्या वेळेस टिळकांचा जयजयकार ऐकून अण्णासाहेब यांस झालेला आनंद ज्यांनी आळंदीस पाहिला त्यांनी तर शिवरायाकरिता तुझा तू वाढवी राजा म्हणून तुळजा भवानीची करुणा भाकिल्यावर आनंदवनभुवन

पाहणाऱ्या श्रीसमर्थांची आठवण झाल्यावाचून राहिली नसेल. लोकमान्य मंडालेहून आले त्यावेळी त्यांना कसा आनंद झाला ते वर्णनाच्या पलीकडचे आहे. अण्णासाहेब पटवर्धन नेहमी लोकमान्यांविषयी वडील माणसांनी होतकरू अशा गुणी मुलाचे कौतुक करावे त्याप्रमाणे अरे तुरे असा प्रयोग करून आनंदाने बोलत असता त्यांचा लोभ व्यक्त होई आणि लोकमान्यही तशाच जिव्हाळ्याने त्यांच्याशी वागत. टिळक मंडालेहून आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेऊन देवदर्शनास गेले असता प्रथमतः श्रीगणपती आणि अण्णासाहेब यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या व्यवहारास सुरुवात केली हे लक्षात ठेवण्याजोगे आहे.

मुळात टिळक ही संत सहवासात आल्याने त्यांच्या वृत्तीत कमालीची सुसूत्रता जाणवते. लोकमान्य मंडालेला तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत खानसामा म्हणून वासुदेव कुलकर्णी होते. वासुदेवांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, मंडालेत टिळकांना ठेवले होते ती खोली दोन मजली होती. मंडालेत टिळक सकाळी लवकर उठत. संस्कृत श्लोक म्हटल्यानंतर सुमारे दीड तास टिळक ध्यानस्थ बसत. त्यानंतर नित्यकर्म आटोपून जेवणानंतर ते लेखन- वाचनात गढून जात. वासुदेव कुलकर्णी आपल्या आठवणीत लिहितात, “टिळक महाराजांनी कधी एक पळही आळसात वाया घालवल्याचे मी पाहिले नाही. ते आपल्या लिहिण्या-वाचण्यात इतके गुंग होत की, त्यांच्याकडे जाऊन काही बोलू लागलो तरी त्यांचे लक्ष जात नसे.” मंडालेत संध्याकाळचे जेवण ५ वाजता होई. त्यानंतर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ तुरुंगातील खोल्या बंद केल्या जात. संध्याकाळी वरच्या माडीवर टिळक कुलकर्ण्यांना तुकाराम,ज्ञानोबा, एकनाथ,रामदासस्वामी,श्रीकृष्ण,राम,शिवाजी महाराज,कौरव-पांडव यांच्या गोष्टी सांगत. कधी दासबोध समजावून सांगत. कधी पेशवाई, तर कधी इंग्रजांच्या गोष्टी सांगत. मंडालेच्या तुरुंगात जगाचा एक नकाशा टिळकांनी सोबत ठेवला होता, तोही ते कधीतरी कुलकर्ण्यांना समजावून सांगत असत.

स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी केलेले प्रयत्न हे अतुलनीय होते हे खरेच पण तो त्यांचा लौकिक कार्याचा भाग होता. गीताशास्त्र पारलौकिकाकडे,ज्ञानमय जीवनमुक्ती किंवा मोक्षप्रत नेणारे,धर्माची आणि समाजाची विस्कळीत होणारी घडी वारंवार ठीकठाक करण्याचे कार्य निरंतर करीत राहणारे लोकमान्य असल्याने दासगणू महाराज श्री.गजानन विजय ग्रंथात म्हणतात,

यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । 

चिरंजीव निरंतर । राहील कीर्तीरूपाने ।। 

संदर्भ ग्रंथ - श्री गजानन विजय ग्रंथ - दासगणू महाराज 

दादासाहेब खापर्डे रोजनिशी 

ब्रह्मर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन चरित्र- अप्रबुद्ध 

लोकमान्य टिळक चरित्र- धनंजय कीर 

✍️ सर्वेश फडणवीस