आधुनिक भारताचे शिलेदार
विक्रम अंबालाल साराभाई
१२ ऑगस्ट १९१९ - ३० डिसेंबर १९७१
जन्मस्थान-अहमदाबाद (गुजरात)
भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बर्याच राजकीय व्यक्तींशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर,जवाहरलाल नेहरू,महात्मा गांधी ह्यांसारखी मातब्बर मंडळी त्यांच्या घरी येत असे आणि पुढे शिक्षण घेत असताना डॉ.विक्रम साराभाईं ह्यांना रवींद्रनाथ टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली,सूचना दिल्या,मार्गदर्शन केलं आहे.
विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. विक्रम साराभाई ह्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची त्यांना आवड होती.आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटोपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही.रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४७ साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.
ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ.विक्रम साराभाई यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आज अवकाश क्षेत्रात भारत उंच भरारी घेत असताना,ज्या संस्था हे यश मिळवत आहेत त्यातील अग्रगण्य भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी १९५० च्या दशकातच सुरुवात केली होती.
२१ नोव्हेंबर १९६५ हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस आहे कारण याच दिवशी डॉ.विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नातून भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं. केरळ मधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आलं होतं. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरं जावं लागलं. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्र संघाने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं. आज हे केंद्र 'डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर' म्हणून ओळखलं जातं. तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार कोरण्यात आला आहे -
"आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत."
नुकताच मागच्या वर्षी चंद्रयान २ मोहीम झाली. भारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेत 'विक्रम' या मून लँडरशी इस्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. या लँडरला 'विक्रम' हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं. ATIRA ची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL,UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आज डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे. डॉ.विक्रम साराभाईंचा प्रवास हा आम्हाला प्रेरणा देणारा असाच आहे. येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यन्त असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जे आधुनिक भारताचे शिलेदार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉ. विक्रम साराभाई छान लिहितात," He who can listen to music in the midst of noise can achieve great thing."
✍️ सर्वेश फडणवीस
#Builderes #ModernIndia
Excellent
ReplyDeleteThank You
Delete