Saturday, August 1, 2020

संत सानिध्यातील लोकमान्य !!


लोकमान्यांची देशभक्ती, त्यांचे कार्य याविषयी सर्वांना माहिती आहेच. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा आवाज,भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा कणा,भारतीय असंतोषाचा जनक,अशी कितीतरी गौरवपूर्ण बिरुदे त्यांना प्राप्त झाली आहेत. पण संतांच्या सानिध्यात असतांना संत श्री दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय ग्रंथांत लोकमान्य टिळकांचं मोठ्या प्रेमाने वर्णन केले आहे. ते लिहितात, 

टिळक बाळ गंगाधर। महाराष्ट्राचा कोहिनूर।

दूरदृष्टिचा सागर। राजकारणी प्रवीण जो॥

निज स्वातंत्र्यासाठी। ज्याने केल्या अनंत खटपटी।

ज्याची धडाडी असे मोठी। काय वर्णन तिचे करू? ॥

करारी भीष्मासमान। आर्य महीचे पाहून दैन्य।

सतीचे झाला घेता वाण। भीड न सत्यात कोणाची॥

वाक्चातुर्य जयाचे। बृहस्पतीच्या समान साचे।

धाबे दणाणे इंग्रजांचे। पाहून ज्याच्या लेखाला॥ 

कृति करून मेळविली। ज्याने लोकमान्य ही पदवी भली।

ती न त्यांना कोणी दिली। ऐसा होता बहाद्दर॥ 

-श्री गजानन विजय ग्रंथ अ-१५ (१०-१४)

मुळात लोकमान्यांची वृत्ती-प्रवृत्तीही अध्यात्मनिष्ठ होती. १९४५ मध्ये श्री. महादेव धोंडो विद्वांस यांनी ‘लोकमान्यांचे आध्यात्मिक जीवन’, ही एक पुस्तिकाच लिहिली होती. ती वाचनीय आणि संस्मरणीय आहे. त्याचबरोबर लोकमान्यांनी स्वत: लिहिलेली गीतारहस्याची प्रस्तावनाही अत्यंत बोलकी आहे. लोकमान्य लिहितात- ‘‘प्रस्तावना संपली. आता ज्या विषयाच्या विचारात आजपर्यंत पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो हा विषय…... ‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!’ उठा, जागे व्हा आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या. यातच कर्म-अकर्माचे सर्व बीज आहे. या धर्माचे स्वल्पाचरणही मोठ्या संकटातून सोडविते, असे (खुद्द भगवंताचेच) निश्चयपूर्वक आश्वासन आहे.’’ लोकमान्यांच्या जीवनात अनेक प्रसंग दिसून येतात ज्यावेळी ते संतांच्या सहवासात गेलेले आहेत. यातीलच पहिला प्रसंग हा सर्वश्रुत आहेच. श्री गजानन विजयग्रंथ वाचनात असणाऱ्या प्रत्येकाला तो मुखोद्गत आहे. 

टिळक आणि श्री संत गजानन महाराज ह्यांच्या भेटीचा प्रसंग. 

लोकमान्य टिळकांच्या अकोल्यातल्या एका सभेला श्रीगजानन महाराज उपस्थित होते, तारीख होती ४ मे १९०८,तिथी अक्षयतृतीया निमित्त होते शिवजयंतीच्या उत्सवाचे..! 

आपल्या भाषणाची सुरुवात करतांना टिळक म्हणाले....

"आजचा हा प्रचंड जनसमूह पाहून मला आनंद होत आहे. याप्रसंगी आपल्या प्रांतातील सिद्धपुरुषाचे या ठिकाणी आगमन होऊन त्यांचा अनुग्रह व्हावा हे खरोखर सुदैव होय. असा प्रसंग शिवाजी उत्सवाला यापूर्वी कधीही आला नव्हता. महाराजांना आपण आमंत्रण करून हा अपूर्व योग आपण घडवून आणला याबद्दल मी आपला फार आभारी आहे. श्रीगजाननमहाराजांची परंपरा श्रीशिवगुरु श्रीरामदासस्वामींपासून आहे हे आपणास माहीत आहेच. या उत्सव प्रसंगी यांनी हजर राहावयाचे मनात आणून व आपल्या विनंतीस मान देऊन येथे आगमन केले आहे. येथे येण्याचे त्यांनी मनात आणले,त्यामुळे आपल्या कार्याला यश येईल,अशी सद्बुद्धी माझ्या मनात उत्पन्न झाली आहे. कोणत्याही कार्यास परमेश्वराचा अनुग्रह पाहिजे व त्याचे चिन्ह आजचे महाराजांचे आगमन होय..या ठिकाणी येण्याची त्यांना बुद्धी व्हावी ,आमची वेडीवाकडी कृत्ये त्यांनी अवलोकन करावी व त्या कार्यांना त्यांचे पाठबळ मिळावे,यावरून हा दैवी योग आहे अशी माझी समजूत झाली आहे....या वेळेस माझ्या मनोवृत्ती इतक्या उचंबळल्या आहेत, विचार इतके प्रगल्भ झाले आहेत की त्यांचे स्पष्टीकरण करणे अशक्य झाले आहे. यासाठी त्यांनी आज जो अनुग्रह केला त्याबद्दल त्यांचे उपकार मानून व आमच्या चळवळीवर अशीच कृपादृष्टी ठेवावी ही त्यांस प्रार्थना करून व्याख्यानास आरंभ करतो."

यानंतर काहीच महिन्यात टिळकांना अटक झाली आणि मंडालेच्या कारागृहात पाठवले गेले, मंडलेला जाण्यापूर्वी गजानन महाराजांनी टिळकांना भाकरीचा प्रसाद पाठवला होता, महाराज म्हणाले होते,

सज्जनांसी त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।।

कंसाचा तो मनी आणा । इतिहास म्हणजे कळेल ।।

या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामगिरी ।। 

जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ।। 

-श्री गजानन विजय ग्रंथ - अ.१५(८७-८९)

टिळकांनी तो प्रसाद स्वानंद ग्रहण केला, पुढे मंडालेच्या कारागृहात अवघ्या चार पाच महिन्यात टिळकांनी साडेपाचशे ते सहाशे पानाचे  गीतारहस्य लिहून काढले. श्रीगजानन महाराजांचे शब्द खरे ठरले.

टिळक आणि श्री साईबाबा भेट ..

स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या वेगाने देशभर पसरत होती.लोकमान्यांचे नेतृत्व देशमान्य झाले होते. गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे स्नेही म्हणून परिचित होते. त्यांनी टिळकांना शिर्डीत जाण्याबद्दल सुचवले होते. खापर्डेंसह टिळक अमरावतीहून संगमनेरला आले. हे खापर्डे विद्वान वकील होते. व्यासंगी,प्रखर देशभक्त होते. फर्डे वक्ते, त्यांची अनेक भाषणे इंग्लडमध्ये गाजली होती. त्यांचा परिचय साईबाबा, गजाननमहाराज यांच्या सोबत होता. दादासाहेब यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. १८९४ ते १९३८ या कालावधीतील नोंदी आजही उपलब्ध आहेत

खापर्डे आपल्या डायरीत लिहितात की, सकाळी ८.३० वाजता वकील संत यांच्या घरी पानसुपारी झाल्यावर आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शिर्डीत पोहचलो. तेथे निवासाची व्यवस्था दीक्षित वाड्यात करण्यात आली होती. त्यावेळी तिथे माधवराव देशपांडे, बापूसाहेब बुट्टी,नारायण पंडित,बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर नोकर उपस्थित होते. सर्वजण मशिदीत गेल्यानंतर तेथे साईबाबांना वंदन केले. बाबांना दक्षिणा दिली. सर्वांनी येवल्याला पुढील कामासाठी जाण्याची परवानगी मागितली. त्यावर बाबा म्हणाले, वाटेत उष्म्याने मरायला जावेसे वाटते का? इथे तुम्ही तुमचे जेवण करा.त्यानंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यानंतर निघा. बाबांच्या आदेशानंतर माधवराव देशपांडे यांच्या घरी जेवण केले. विश्रांती घेऊन मशिदीत गेलो.

बाबा पहुडले होते. ते झोपले असे वाटले. लोकांनी लोकमान्यांना पानसुपारी दिली. मग परत मशिदीत गेलो. बाबांनी उदी दिली. निघण्याची अनुमती दिली. त्यानुसार पुढील प्रवास सुरू केल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी बाबा आणि लोकमान्य यांच्या सत्कारात उपयोगात आणलेली शाल शामा यांच्याकडे देण्यात आली. ती शाल पुढच्या पिढीने संगमनेर येथील साईबाबा मंदिराकडे प्रदान केली. संगमनेर येथे इंगळेबाबा यांनी अत्यंत श्रध्देने तिची जपणूक केली आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला तिची अत्यंत श्रध्देने पूजा करण्यात येते. 

या भेटी दरम्यान लोकमान्य आणि साईबाबा यांच्यात संवाद झाला आहे. त्या संवादाचा काही भाग खापर्डे यांनी डायरीत नमूद केला आहे. या भेटीत साईबाबा लोकमान्यांना म्हणाले की, लोक वाईट आहे, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा. तर येवल्याला जाण्याची परवानगी मागितली असता ती न देता जेवण करून जाण्याची आज्ञा केली. खरंतर खापर्डे हे बाबांच्या सहवासात अऩेक दिवस होते. ते लिहितात,बाबा आज या भेटीच्या वेळी जितके प्रसन्न होते तितके प्रसन्न त्यांना यापूर्वी कधीच पाहिले नाही. ही प्रसन्नता म्हणजे दोन महापुरूषांच्या तेजाचे प्रतिबिंब होते जणू.

टिळक आणि स्वामी विवेकानंद भेटीचा प्रसंग ..

स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या विंचूरकर वाड्यात झाली. ( याच वाड्यात गणेशोत्सवाच्या प्रसंगी टिळकांनी केलेले भाषण प्रसिद्ध आहे). या वाड्यात आजही भेटीसंदर्भातील फोटो बघायला मिळतात.  शिकागोच्या विश्वविख्यात व्याख्यानापूर्वीच लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती. एप्रिल ते सप्टेंबर १८५२ दरम्यान महाराष्ट्रात प्रवासात असलेल्या विवेकानंदानी पुण्यात टिळकांच्या घरी आठ ते दहा दिवस मुक्काम केल्याचा संदर्भ आढळून येतो. त्यांची अखेरची भेट १९०१ मध्ये कोलकाता येथे झाली होती. टिळकांनी आपल्या मित्रांसह बेलूर मठाला भेट दिली होती व स्वामी विवेकानंदांशी वार्तालाप केला होता. दरम्यानच्या काळात टिळक आणि विवेकानंद यांचा संवाद पत्रव्यवहाराने झाल्याचे संदर्भ आहेत. विवेकानंदांच्या कार्यांना ‘केसरी’मध्ये अतिशय ठळकपणे स्थान मिळत असे, कारण टिळकांना त्यांच्या कार्याविषयी नितांत आदर होता. या महात्म्यांना जोडणारा अजून महत्त्वपूर्ण दुवा होता, तो म्हणजे भगवद्‍गीतेतील ‘कर्मयोग’ या कालखंडातील स्वातंत्र्य चळवळ गीतेच्या तत्त्वज्ञानाने भारावलेली होती.

टिळक आणि श्री अण्णासाहेब पटवर्धन भेट..

लोकमान्य टिळक व अण्णासाहेब पटवर्धन यांचा संबंध तर लोकविश्रुतच आहे. श्री अप्रबुद्ध ब्रह्मर्षी श्री अण्णासाहबे पटवर्धन ह्यांच्या चरित्रात लिहितात, लोकमान्य हे मूळचे रानड्यांच्या तालमीतले. परंतु रानड्यांसारख्या शांतिब्रह्माच्या सहवासात त्यांच्या आंगच्या 'वीरो रस: किमयमेत्युत दर्प एवं' अशा क्षात्रवृत्तीला नीट वाव मिळेना व लौकरच रानड्यांच्याविषयी मनात अतिशय आदर असूनही त्यांना रानड्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली. मद्रासेस जाण्यापूर्वी डेक्कनस्टार व किरण यांचे रूपांतर मराठा व केसरी यांच्यात केल्यावर नामजोशी व टिळक यांचा विशेष संबंध आला. हाच अण्णासाहेब व टिळक यांच्या संबंधातील मधला दुवा आहे. अण्णासाहेब हे जवळ जवळ टिळकांच्या अखेरपर्यंत होते आणि सर्व महत्त्वाच्या बाबतीत त्यांचा सल्लाही घेतला जात असे. धैर्य, साहस, विलक्षण चिकाटी, प्रखर स्वाभिमान वगैरे दोघांच्याही आंगच्या गुणसाधर्म्यामुळे अण्णासाहेब यांचा टिळकांवर फार लोभ जडला. व उत्तरोत्तर तो वाढतच गेला. टिळकांच्या मनातही अण्णासाहेब यांच्याविषयी पराकाष्ठेचा आदर होता. किंबहुना राष्ट्रपुरुष या नात्याने अण्णासाहेब यांची योग्यता केवढी मोठी होती याची जाणीव असणारा पुण्यांत तेवढाच एक पुरुष होता. सर्व त-हेच्या अनुभवांच्या भट्टीतून बाहेर पडलेल्या अण्णासाहेब यांच्या धार्मिक सामाजिक वगैरे मतांचे व टिळकांचे पटणे अर्थातच शक्य नव्हते परंतु त्यामुळे त्यांच्या लोभात कधीच अंतर आले नाही. दोघांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा होता व टिळकांच्या सर्व प्रयत्नांस त्यांची सहानुभूती असे. लखनौ काँग्रेसच्या वेळेस टिळकांचा जयजयकार ऐकून अण्णासाहेब यांस झालेला आनंद ज्यांनी आळंदीस पाहिला त्यांनी तर शिवरायाकरिता तुझा तू वाढवी राजा म्हणून तुळजा भवानीची करुणा भाकिल्यावर आनंदवनभुवन

पाहणाऱ्या श्रीसमर्थांची आठवण झाल्यावाचून राहिली नसेल. लोकमान्य मंडालेहून आले त्यावेळी त्यांना कसा आनंद झाला ते वर्णनाच्या पलीकडचे आहे. अण्णासाहेब पटवर्धन नेहमी लोकमान्यांविषयी वडील माणसांनी होतकरू अशा गुणी मुलाचे कौतुक करावे त्याप्रमाणे अरे तुरे असा प्रयोग करून आनंदाने बोलत असता त्यांचा लोभ व्यक्त होई आणि लोकमान्यही तशाच जिव्हाळ्याने त्यांच्याशी वागत. टिळक मंडालेहून आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेऊन देवदर्शनास गेले असता प्रथमतः श्रीगणपती आणि अण्णासाहेब यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या व्यवहारास सुरुवात केली हे लक्षात ठेवण्याजोगे आहे.

मुळात टिळक ही संत सहवासात आल्याने त्यांच्या वृत्तीत कमालीची सुसूत्रता जाणवते. लोकमान्य मंडालेला तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत खानसामा म्हणून वासुदेव कुलकर्णी होते. वासुदेवांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, मंडालेत टिळकांना ठेवले होते ती खोली दोन मजली होती. मंडालेत टिळक सकाळी लवकर उठत. संस्कृत श्लोक म्हटल्यानंतर सुमारे दीड तास टिळक ध्यानस्थ बसत. त्यानंतर नित्यकर्म आटोपून जेवणानंतर ते लेखन- वाचनात गढून जात. वासुदेव कुलकर्णी आपल्या आठवणीत लिहितात, “टिळक महाराजांनी कधी एक पळही आळसात वाया घालवल्याचे मी पाहिले नाही. ते आपल्या लिहिण्या-वाचण्यात इतके गुंग होत की, त्यांच्याकडे जाऊन काही बोलू लागलो तरी त्यांचे लक्ष जात नसे.” मंडालेत संध्याकाळचे जेवण ५ वाजता होई. त्यानंतर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ तुरुंगातील खोल्या बंद केल्या जात. संध्याकाळी वरच्या माडीवर टिळक कुलकर्ण्यांना तुकाराम,ज्ञानोबा, एकनाथ,रामदासस्वामी,श्रीकृष्ण,राम,शिवाजी महाराज,कौरव-पांडव यांच्या गोष्टी सांगत. कधी दासबोध समजावून सांगत. कधी पेशवाई, तर कधी इंग्रजांच्या गोष्टी सांगत. मंडालेच्या तुरुंगात जगाचा एक नकाशा टिळकांनी सोबत ठेवला होता, तोही ते कधीतरी कुलकर्ण्यांना समजावून सांगत असत.

स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी केलेले प्रयत्न हे अतुलनीय होते हे खरेच पण तो त्यांचा लौकिक कार्याचा भाग होता. गीताशास्त्र पारलौकिकाकडे,ज्ञानमय जीवनमुक्ती किंवा मोक्षप्रत नेणारे,धर्माची आणि समाजाची विस्कळीत होणारी घडी वारंवार ठीकठाक करण्याचे कार्य निरंतर करीत राहणारे लोकमान्य असल्याने दासगणू महाराज श्री.गजानन विजय ग्रंथात म्हणतात,

यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । 

चिरंजीव निरंतर । राहील कीर्तीरूपाने ।। 

संदर्भ ग्रंथ - श्री गजानन विजय ग्रंथ - दासगणू महाराज 

दादासाहेब खापर्डे रोजनिशी 

ब्रह्मर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन चरित्र- अप्रबुद्ध 

लोकमान्य टिळक चरित्र- धनंजय कीर 

✍️ सर्वेश फडणवीस 

No comments:

Post a Comment