Saturday, October 31, 2020

" स्टॅच्यू ऑफ युनिटी " चे शिल्पकार ..


‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचे आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांचा पुतळा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार. आम्ही भारतीयांनी मनाशी पक्के ठरवले तर आम्ही जगही जिंकू शकतो ह्याची प्रचिती आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघतांना सहज येईल. भव्यदिव्य आणि विराट असा पुतळा साकारण्यात आमचे कारागीर नक्कीच कौतुकास पात्र आहे.

गुजरातच्या नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला १८२ मीटर उंचीचा हा पुतळा चीनमधील बुद्ध प्रतिमेपेक्षाही उंच आहे. या महाकाय पुतळ्याला साकारण्यामागची मेहनत आहे, ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची. नोएडामध्ये असलेल्या विशाल स्टुडिओत वयाच्या ९५ व्या वर्षीही ते कलेशी आजही एकरूप आहेत. इतिहासातील, पुराणातील विविध व्यक्तिमत्वांच्या प्रतिमा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी,नेहरू,पं.दीनदयाल उपाध्याय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक प्रतिमा साकारणार्‍या राम सुतार यांच्या नावे जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्याचा विक्रमही वयाच्या ह्या टप्प्यावर नोंदवला गेला आहे. ते मराठी असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच त्यांचे कार्य आणि कर्तृत्व आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात २०१३ मध्ये सुरू झाली होती. यावेळी त्यांच्यासह १०० जणांचे पथक काम करत होते. १८२ मीटर उंच इतक्या प्रचंड मूर्तीची घडवणूक करताना त्यातील बारकाव्यांकडे राम सुतार यांचे बारीक लक्ष असे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा बघतांना सुद्धा ते दिसून येते. शिल्पातील डोळे, खांदे, पाय आदींतून मनुष्याच्या प्रतिमेची ठेवण यांची हुबेहूब प्रतिमा साकारण्याची कला सुतार यांनी जोपासल्यामुळेच शिल्पांमध्ये जीवंतपणा आलेला दिसतो. सरदार पटेल यांच्या शिल्पाचा चेहरा ७० फूट उंच, डोळ्यांची बुबुळे दीड मीटर रूंद,१४० फूट रूंद खांदे आणि ८० फूट रूंद असलेली पादत्राणे ही दुरुनही स्पष्ट दिसतात. शिल्प साकारताना त्यात जीव ओतणार्‍या या कलेच्या महापुरुषाचा गौरव आज सातासमुद्रापार पोहोचला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली पद्मभूषण किताब  देवून गौरविले आहे आणि दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार पटेलांचे स्मरण करतांना हे ऐतिहासिक शिल्प प्रत्यक्ष कृतीतून  साकार करणाऱ्या राम सुतार ह्यांना स्मरणात ठेवावं लागणार आहेच.

✍️ सर्वेश फडणवीस

#StatueOfUnity #RashtriyaEktaDiwas #31october

Thursday, October 29, 2020

कोजागिरी पौर्णिमा 🌕✨


अगा विश्वैकधामा। तुझा प्रसादु चंद्रमा ।
करू मज पौर्णिमा। स्फूर्तीचि जी ।।

पौर्णिमा म्हणजे कोणत्याही पर्वाचे पूर्णत्व.अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा.सणांचा विचार करताना आपल्या पूर्वजांनी आरोग्याची पण किती काळजी केली आहे.शरद ऋतू.निसर्गतः पित्त वाढवण्याचा काळ आहे.  या काळात शारदीय शीतल चांदण आणि आटीव दूध या दोन्ही गोष्टी आपले पित्त कमी करण्याचे साधन आहे.

सध्याच्या वातावरणात ताण-तणाव कमी करण्यासाठी या हुन अधिक चांगला उपाय कुठला असू शकेल.हसत खेळत वातावरणात पित्ताचे शमन ही कमी होते.आपण अशा संस्कृती चे घटक आहोत की जिच्या प्रत्येक प्रथेमागे काही न काही तरी अर्थ दडलेला आहे.आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात आनंदी सुखाचे क्षण वेचत ही कोजागिरी ची रात्र नक्कीच आपल्याला वैभव प्राप्त करून देईल. पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे ही मनाला शीतलता प्रदान करतात. या रात्री पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.

कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव,वैभवाचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव आहे. देवी पण विचारते आहे “को जागर्ती ? ”आपण सांगू या वयं जागृयामः !! कारण आपल्या परिचयातील सुख,दुःखाच्या क्षणी  मदतीसाठी सदैव तत्पर असेल यासाठी जागा आहे. राष्ट्रहित जपण्यासाठी सदैव जागा आहे. आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करत सकारात्मकता देण्यासाठी  जागा आहे. हे जागं होणं म्हणजे एका रात्री नाही तर येणाऱ्या प्रत्येक रात्री मी जागा आहे. सर्वत्र सुखाची व मांगलिकतेची कामना करत आणि जागं राहून ही कोजागिरी साजरी करायची आहे.

कारण आयुष्यात आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर घालवलेल्या क्षणातून जो आनंद मिळतो तो कुठल्याही गोष्टीतुन मिळत नाही.आपली माणसं हा ही एक ठेवा आहे तो ठेवा नित्य निरंतर जपून ठेवावा . अशा या आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर चंद्राच्या शीतल छायेत व चांदण्या रात्री आटीव दुधाचा आस्वाद घेत हा आनंद अधिक दृढ करूया.

चंद्राचं शीतल चांदण आयुष्यभर सोबत राहील व त्याच्या प्रकाशाप्रमाणे आपले ही जीवन प्रकाशमय होईल हीच सदिच्छा !

सर्वेश फडणवीस

कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌕✨

#कोजागिरी

Friday, October 23, 2020

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी..🙏🌺🙏


सणवार असले की सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण असतं. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. 

सध्या नवरात्रात पारंपरिक आरती म्हणण्याचा प्रत्येकाकडे प्रघात आहेच. देवीच्या पारंपरिक आरती म्हणतांना वातावरणात जी ऊर्जा जाणवते ती शब्दांत व्यक्त होणारी नाहीच. काही क्षण हे अनुभूती घेण्याचे असतात आणि ते तसेच घ्यावे. हार,फुलं,तुळशी,बेल,प्रसाद आणि मंद तेवत राहणारी समई,शेजारी राळ व धूप ह्याने आपल्या आजूबाजूचं वातावरण चैतन्याने भारून जाते. मग आरती सुरू होते आणि ही आरती अगदी तल्लीनतेनं, श्रद्धेनं,भक्तिभावानं म्हटली की ब्रह्मानंदी टाळी लागते. आरती हा शब्द संस्कृतमधील आराभिक, आर्तिका अशा शब्दांवरून आला आहे. काही ठिकाणी आरतीला आर्तिक्य, महानिरांजन अशीही नावं आहेत, पण सर्वसामान्यपणे आरती हेच नाव जास्त प्रचलित आहे. प्रज्वलित तुपाचे निरांजन, पणती किंवा दिवा ताम्हणात ठेवून ओवाळणं म्हणजे आरती. 

आरतीद्वारे भक्त देवाची प्रार्थना करतो की, देवा माझी सगळी संकटं, अडचणी दूर करून माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचं रक्षण कर, कल्याण कर, त्यांना ऐश्वर्य व सद्बुद्धी दे कारण संकटं,अडचणी, दु:ख हे सगळे क्लेश भक्तालाच असतात. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते आणि आरतीचे हे वेगळेपण अद्भुत असेच आहे. माहूरगड निवासिनीं आई रेणुकेची पारंपरिक आरती नवरात्र पर्वकाळात म्हणतांना साक्षात रेणुकेचे रूपच डोळ्यासमोर येतं आणि खरंतर ज्या संतांनी देवीचे हे वर्णन केले आहे ते अद्भुत आहे.  दरवेळी आरती म्हणतांना हा अनुभव नकळतपणे येतो. अशी ही आरती,

ओवाळू आरती भवानी । माहुरगड वासीनी
भवानी मातापूर वासिनी।जगदम्बा जमदग्नी सती तु परशुराम जननी ।। धृ ।।

वाहे चरणी वैनगंगा । पुव्योदक वाहिनी । दुमदुमतो
गड एक सारखा । उदोकारवचनी ।। १ ।। ओवाळु आरती..

पंचप्राण मम पाजळुनी हे । घेऊनी निरांजनी
भक्तीने आरती मंदीरी । आलो घेवोनी ।
मंदावती फूलवाती भवभये । हालती बावरूनी ।
ज्योत वाढवी स्नेहाची तु । धारवरी धरूनी ।। २ ।। ओवाळू आरती

माय रेणुके अंबाबाई । करीतसे विनवणी ।
दीन लेकरू तुझपावंग । झडकरी ये धावुनी ।
मूळपीठ नाईके सत्वरी। दे मज मुळ धाडुनी ।
भावनसेहा मला येथूनी ने मज तव चरणी ।। ३ ।। ओवाळू आरती

मळवट लेपन तुझेच चिंतन मूर्ती तव नयनी
आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी
सत्यरूप तव मजला दावुनी, भवबाधा ना सुनी
विकास करण्या झणी मुक्ती दे। जीवन फळयोनी ।। ४।।

ओवाळु आरती भवानी माहुरगड वासीनि।भवानी मातापूर वासिनी । जगदंबा जमदग्नी सती तु परशुराम जननी ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

#शारदीय_नवरात्र

Thursday, October 22, 2020

जागर स्त्री शक्तीचा 🌟 🙌🙏

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. कल्पनांचा हळूहळू विकास होत गेला आणि शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. दिव्याती इति देवी, देवी ह्या शब्दाची उत्पत्ती आहे. दिव म्हणजे खेळणे,अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी,स्थिती,लय रूपाची क्रीडा देवी करत असते म्हणून ती देवी आणि ह्या शक्ती पर्वात तिचा जागर करण्यासाठी नवरात्र असावे. 

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला अर्थात आदिशक्तीच्या जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. ह्यावर्षी कोरोनामुळे स्थानिक मंदिर बंद आहेत पण तरी आपला परिसर उत्साहाने भारलेला आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. आज अनेकजण ह्या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. आजची स्त्री खरं तर पूजनीय,वंदनीय आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

स्त्री !! एक सुंदर ईश्वरी अविष्करण. आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे ही खरंच प्रत्येकासाठी गौरवाची बाब आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. तिच्या शक्तीला,भक्तीला त्यासाठी खरंतर शब्दच नाहीत. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी,नव्हे अग्रेसर असणारी स्त्री शक्ती आहे. आज ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे. सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

ही मनुस्मृतिची शिकवण आम्हाला परंपरेने मिळालेलं वैभव आहे. जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता सुद्धा निवास करतात आणि जिथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही तिथे केलेले सर्व कर्म निष्फळ ठरतात. खरंतर स्त्री या शब्दातच माया, ममता, आपुलकी, प्रेम,निरागसता आहे. स्त्री जन्मतःच या शब्दांच्या वलयात असते. कारण ती शक्तीचा स्रोत आहे.सर्वत्र सुखदायक आणि सर्वत्र विलक्षण उर्जा ही तिच्यात उपजतच असते. परमेश्वराची तिच्यावर अगाध श्रद्धा आहे. आज नवनिर्मितीचा मान ही तिच्याकडेच आहे. 

तिच्याकडे क्षमाशीलता हा गुण आहे. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला ती खंबीरपणे समोर जाते असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ती  असते आणि तो पुरुष कायम तिचे वर्णन करत असतो. आज जे जे उत्तम,उदात्त,आणि उन्नत आहे हे तिचेच देणे आहे. तिच्याकडून हे गुण घेतांना आपल्याला कधी ही कमीपणा वाटणार नाही. कारण हे देणं तिला इतिहासातून आणि अनेक युगानुयुगे मिळालेलं संचित आहे. आज या संचितावर ती यशस्वीपणे वाटचाल करते आहे. या बद्दल आपल्याला तिचा सार्थ अभिमान वाटायलाच हवा.

विनम्रता हा शब्द तिला तंतोतंत लागू पडतो. कारण त्याच साठी सारी दुनिया तुझ्यासमोर नतमस्तक होते.’मी’आणि ‘माझे’ हे शब्द ती स्वतःसाठी कधीही ठेवत नाही. विशाल गगनाप्रमाणे असलेले तिचे मन आम्हाला सदैव प्रेरणा देणारे आहेत आणि कायमच राहतील. आज जागतिकीकरणात ती स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तुत्वा ने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

(तळटीप - माझ्या ह्या माध्यमातील मित्र Himalay Patkar ह्याने रेखाटलेल्या ह्या चित्रातून हे विचार आले आहेत.)

Thursday, October 15, 2020

" रोबोटिक हात " निर्माण करणारे प्रशांत गाडे !!


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत प्रशांत गाडे. पारंपरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेले प्रशांत गाडे आज वेगळ्या वाटेवरून चालत रोबोटिक्स मध्ये संशोधन करत परदेशात मिळणाऱ्या बारा लाख रुपयांच्या कृत्रिम हात फक्त पन्नास हजार रुपयांत उपलब्ध करून देत आहेत. हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीकडे जाणारा आहे. मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध आयुष्य न जगता नवं काही तरी समाजाला देता ह्यावे ह्या भावनेतून त्यांचा इनाली फाऊंडेशन च्या माध्यमातून प्रवास सुरु आहे. 

मध्य प्रदेशातील खंडवा ह्या गावातील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्म झालेल्या प्रशांत गाडे ह्यांनी पारंपारिक शिक्षणातून स्वतःची सुटका करून घेत 'रोबोटिक्स ' मधील संशोधनाला सुरुवात केली आणि आज प्रशांत गाडे अमेरिकेत जात तेथील विद्यापीठात शोध निबंध सादर करून आले आहेत. ही सुरुवात म्हणावी तशी सोपी नाहीं. खडतर प्रवास करत आज इनाली फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांचे कार्य प्रगतीपथावर आहे. ४ मे २०१६ ला इनाली फाऊंडेशन ची स्थापना झाली. इनाली हे नाव त्यांच्या मैत्रिणीचे आहे ज्यांनी त्यांना ह्या कार्यासाठी पूर्ण साथ दिली आणि त्यांच्यात हे कार्य करण्याचा विश्वास निर्माण केला. खरंतर एकदा हात नसलेल्या एका लहान मुलीला पाहून आयुष्याचा अर्थ सापडलेल्या प्रशांत गाडे ह्यांना या देशातील हात गमावलेल्या गरीब लोकांना ‘रोबोटिक हात’ पूर्णपणे मोफत द्यायचा आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरवायचे आहेत पण आज ह्या तरुण वैज्ञानिकाचे साधे व प्रामाणिक प्रयत्न आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. 

या देशात दरवर्षी हजारो लोकांचे विविध कारणांमुळे हात आणि पाय जातात. या लोकांपैकी बहुसंख्य लोक हे कनिष्ठ वर्गातील असतात. त्यामुळे त्यांच्या अशा अकाली आलेल्या अपंगत्वामुळे या लोकांच्या कुटुंबाची व पर्यायाने कुटुंबाच्या भविष्याची अक्षरशः त्रेधातिरपीट होते. अशा लोकांना जर कृत्रिम हात किंवा पाय बसवायचा असेल तर त्याला भरपूर खर्च येतो जो त्या सामान्य माणसाला परवडत नाही. अशा माणसांच्या एकूणच कौटुंबिक गरजांना अधिक प्राधान्य दिलं जातं आणि ती व्यक्ती हातांशिवाय किंवा पायाशिवाय जगायला शिकते. पण प्रशांत गाडे ह्यांनी त्या हात नसलेल्या लहान मुलीला बघितले आणि दिवस-रात्र ते एकाच गोष्टीचा विचार करत राहिले की या छोट्या मुलीचे दुःख मी कमी करू शकतो का ? याच विचारात प्रशांत गाडे ह्यांना त्यांच्या जगण्याचे ध्येय सापडले आणि त्याच ध्येयाने त्यांच्या सारख्या झपाटलेल्या तरुण संशोधकाने बदल घडवला. जिद्द,चिकाटी प्रसंगी घरच्यांचा विरोधही पत्करला.

ह्या प्रवासात प्रशांत गाडे ह्यांनी आपले संशोधनाचे काही व्हिडिओज युट्युब वर अपलोड केले आणि ते विसरूनही गेले. पण म्हणतात ना कुणीतरी आपल्या कार्याची दखल घेत असतो आणि तसेच झाले २०१६ मध्ये त्यांना अमेरिकेतील एका प्राध्यापकांचा इमेल आला. त्यात त्यांनी सर्व खर्चासहित अमेरिकेला यायचे आमंत्रण दिले. प्रशांत गाडे ह्यांनी अर्थातच ते आमंत्रण स्वीकारले आणि अमेरिकेला गेल्यावर आपण काय संशोधन करतोय याचे एक प्रेझेंटेशन देखील दिले. प्रशांत गाडे ह्यांच्या संशोधनावर अमेरिकेमधील ते प्राध्यापक इतके खुश झाले की त्यांनी विचारले आपल्याला भेट म्हणून काय देता येईल आणि प्रशांत नी न सांगताच त्यांनी भेट म्हणून १० 3D प्रिंटर्स भेट म्हणून दिले. पुढे भारतात आल्यावर जयपूर फूट ह्या नामांकित संस्थेबरोबर त्यांनी आपले संशोधन कार्य सुरू केले आहे आणि आज तब्बल १५०० हुन अधिक जणांना कृत्रिम अवयव देऊन जगण्याची नवी प्रेरणा दिली आहे. गेल्या दोन वर्षात ७०० हून अधिक कृत्रिम हात तयार केली गेली आहेत आणि ती विनामूल्य देण्यात आली आहेत, तर सुमारे ३०० हात देशभरात विकले गेले आहेत.

आज बर्‍याच संशोधन आणि चाचण्यांनंतर त्यांनी एक कृत्रिम अवयव तयार करू शकले आहेत जो खांद्यावर आणि हातवारे करून वापरकर्त्याच्या बोटांवर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतो. स्नायूंच्या हालचालींशी जोडल्या गेलेल्या बहुतेक प्रोस्थेटिक्सविरूद्ध, इनाली आर्म्स मेंदूत सिग्नल शोधून ऑपरेट करतात. सध्या, प्रशांत गाडे ग्रामीण आणि शहरी भारतातील ज्या लोकांना कृत्रिम हात घेऊ शकत नाही किंवा त्याबद्दल काही माहिती नसेल त्यांना कमी किंमतीत इनाली अवयवांचे विनामूल्य वितरण करण्याच्या विचारात आहेत. खरंतर ही सुरुवात आहे. त्यांना त्यांचे कार्य पुढे व्यापक करण्याची इच्छा आहे. २०१९ चा प्रतिष्ठित इन्फोसिस फाऊंडेशन चा आरोहण सोशल इंनोवेशन अवॉर्ड प्रशांत गाडे ह्यांना सुधा मूर्ती ह्यांच्या हातून प्राप्त झाला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेतच. 

प्रशांत गाडे ह्यांना "आपण जगात कशासाठी येतो ? आपल्या असण्याचं प्रयोजन काय?" हा प्रश्न पडला. जन्मतः दोन्ही हात नसलेल्या एका मुलीसाठी एका इंपोर्टेड कृत्रिम हाताची किंमत बारा लाख ऐकल्यावर, त्याच्या डोळ्यांसमोर भारतात असे हात नसलेली आणि पैशाअभावी आयुष्यभर अपंगत्व जगणारी लाखो दुर्दैवी माणसं आली आणि अशा लोकांसाठी आपल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीतरी करायचं या ध्येयानं त्यांना झपाटलं आणि स्वतःच्या मेहनतीने पन्नास हजारात कृत्रिम हात बनवून यशस्विरित्या वापरता येतात हे सिद्ध करून दाखवलं. त्यांची स्वयं च्या व्यासपीठावरील यशोगाथा जरूर ऐका.. लिंक कमेन्ट बॉक्स मध्ये देतोय.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे  https://inalifoundation.com

वाचन प्रेरणा दिवस निमित्ताने...प्रभावी वाचनाच्या सवयी !!

शीर्षक वाचून जरा वेगळं वाटेल आणि मग सहज विचार येईल की वाचण्याच्या सवयीबद्दल पण कुणी पुस्तक लिहू शकतं का. पण नुकतंच एक पुस्तक हाती आले अमृत देशमुख यांचे" उत्तम वाचक घडवणाऱ्या सात सवयी अर्थात द सेवन हॅबीट्स ऑफ हायली इफेकटिव्ह रिडर्स ". 

पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. बुकलेट अँप च्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वाढावी यासाठी अमृत कार्यरत आहे. अमृत देशमुख यांच्या या पुस्तकात वाचनाच्या प्रभावी सात सवयीबद्दल निव्वळ छप्पन पानात अनेक महत्वाची माहिती आपल्याला सापडते. आज पुस्तक वाचन करत नाही अशी सर्वत्र ओरड असतांना अमृत देशमुख यांनी या पुस्तकात प्रभावी आणि अतिशय छोट्या छोट्या सवयी पुस्तकात मांडल्या आहेत. सहज कुणीही या सवयी आचरणात आणून प्रभावी वाचक होऊ शकेल. स्वतः प्रकाशित केल्यामुळे सर्वप्रथम अमृत यांनी पत्राद्वारे आपल्या वाचकांशी काही हितगुज केली आहे. जवळपास १३०० हुन अधिक पुस्तकं वाचल्यामुळे सहज आणि सोप्या शब्दात पुस्तक वाचनाच्या काही सवयी त्यांनी सांगितलेल्या आहेत. 

वाचनाला जास्त गांभीर्याने घेऊ नका. बरेचदा आपण पुस्तक वाचतांना आनंदाने सुरुवात करतो पण काही काळाने आपल्याला पुस्तक वाचायला कंटाळा येतो आणि आपण पुस्तक बाजूला ठेवतो. मग काही दिवसांनी उगाच आपल्याला वाटतं आपण चांगले वाचक होऊ शकत नाही. हे सर्वसामान्य पणे प्रत्येकाला वाटत असतं पण यात अमृत यांनी उत्तर दिले आहे कुठलेही पुस्तक पूर्ण वाचून संपवल्यावरच नवे पुस्तक हाती घ्यावे. 

पुढे ते लिहितात,वेळेला महत्त्व द्या. अनेकांची तक्रार असते की लहानपणी खूप वाचन करत होते पण आता वेळच मिळत नाही पण या सवयीला बदलण्याची क्षमता ही स्वतःत असावी हाच आग्रह आहे. आपण आपले आयुष्य बदलू शकत नाही पण दिवस हा आपला आहे आणि त्याचे नियोजन करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. वेळेचं नियोजन योग्य पध्दतीने झाले तर वाचनाला वेळ मिळेलच. 

सहज आणि आवडेल ते वाचा. अतिशय छोटीशी सवय आपले आयुष्य आणि दिवस बदलण्याची ताकद बनू शकते. अनेकदा वेळ असून सुद्धा आपण वाचत नाही. म्हणून वाचलेच पाहिजे हा आग्रह नाही तर आवडेल आणि सहज उपलब्ध असेल असे वाचले तर दिवसाचा आनंद अधिक द्विगुणित होईल. 

यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो वाचा आणि चर्चा करा. वाचल्यावर प्रत्येक गोष्ट लक्षात राहील हा आग्रह नाहीच. पण अनेकदा वाचून त्यावर चर्चा केली तर काही प्रमाणात ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. जेव्हा पुस्तके आणि त्यातील कल्पना आपल्या मनात आणि हृदयात असतात तेव्हा त्या जिवंत असतात.आणि म्हणूनच वाचून चर्चा करणे अधिक फायदेशीर आहे. 

अतिशय महत्त्वाची सवय ती म्हणजे वाचा आणि पुढे द्या. अतिशय चांगली सवय आपण स्वतःला लावून घ्यावी. अनेकांना आपली पुस्तकं द्यायला आवडत नाही पण आपण पुस्तक देतांना ती कुणाला दिली याबद्दल नोंद ठेवली तर ते अधिक फायदेशीर ठरेल आणि आपणही कुणाचे पुस्तक वाचायला आणले तर तेही वापस करण्याचा प्रयत्न करावा. 

आपण म्हणाल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकासाठी विचार आहे कारण अनेक प्रश्नांची उत्तरं यात आपल्याला सापडतील. वाचल्यावर लक्षात न राहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्याना वेळेअभावी वाचन करणे जमत नाही त्यांच्यासाठी आहे. लहानपणी बरेच पुस्तकं वाचायचे पण आता वाचन होत नाही त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून वाचन वाढवण्याचा अट्टहास अमृत देशमुख यांचा आहे हे प्रकर्षाने जाणवते. एक अत्यंत उपयोगी प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे छोटेखानी पुस्तक आहे. अनेकांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा उपयोगी असे हे पुस्तक आहे. वाचनाने आनंदाची अनुभूती घेण्यासाठी कायम काहीतरी सतत वाचत म्हणूया वाचू आनंदे.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

तळटीप :- bookletguy@gmail.com ह्या मेल आयडी वर संपर्क करून आपण नक्की मागवू शकता.

Monday, October 12, 2020

आदिवासींचे आशास्थान डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे. ह्यांच्या कार्याला जवळून बघण्याचे भाग्य लाभले आहे. आतापर्यंत ३ वेळा हेमलकसा येथे जाणे झाले. दिवाळीत सुद्धा एक दिवस तिकडे जाऊन आलो आहे त्यामुळे आता ऋणानुबंध आणि जवळीक निर्माण झाली आहे. हेमलकसाचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. 'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्‍या बाबा आमटे ह्यांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं, कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं आहे. विकास आणि प्रकाश या त्यांच्या कर्तृत्ववान मुलांनी बाबा आमटे ह्यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे. डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत आणि आज डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे ह्यांच्या रूपाने पुढची पिढी ही कार्यमग्न आहे. 

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात १९७२ साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. २३ डिसेंबर १९७३ साली हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. आरोग्यासोबतच शिक्षण,आदिवासींची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली चार दशके त्यांचे काम सुरू आहे. माडिया गोंड आदिवासी भूक,रोगराई,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे,शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर,वकील होत आहेत. वैद्यकीय उपचार अभावी होणार्‍या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे.

हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग पर्यटन म्हणून बघणार्‍यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी,अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी अशा परिस्थितीत राहणं हे काही दिवसांसाठी ठीक होतं पण ज्या हेतूने ते  इथे आले होते त्या आरोग्यसेवेला सुरुवात झाली.आरोग्यसेवेबरोबर हेमलकसाच्या आदिवासींमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर महत्त्वाचे होते ते म्हणजे शिक्षण. आदिवासीना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच मूळ उद्देश होता. हा उद्देश घेऊन प्रथम १९७६ साली निवासी आश्रमशाळा सुरू झाली. आज ह्या शाळेत ६५० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजूबाजूच्या दुर्गम भागात ही अनेक ठिकाणी नवीन शाळा सुरू झाल्या आहेत. ह्यांच्या प्रयत्नाने आज दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे. 

सुरुवातीला ज्यांच्यासाठी त्या जंगलात हे दाम्पत्य आले होते ते आदिवासी वार्‍यालाही उभे राहत नव्हते. एका अर्थानं त्यांचंही बरोबरच होतं. कारण त्यांना ही मंडळी परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार कारण त्यांची भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची म्हणजे त्यांच्याशी काहीतरी संपर्क व्हायला हवा होता; पण नेमका तोच होत नव्हता. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही. पण बर्‍याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात. तसंच काहीसं या बाबतीत झालं होतं. पण त्यावरही यशस्वी मात करत माडिया भाषा शिकून आज आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. 

डॉ. प्रकाश आमटेंनी जंगली प्राण्यांच्या नात्याला आज वेगळा नवा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका, असा शासकीय अधिनियम असताना गेली चार दशकं प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉ. प्रकाश आमटे आहेत. देश,काल,परिस्थितीनुसार आजही ते प्रसंगी शासनस्तरावर आपली बाजू भक्कमपणे मांडत असतात कारण हे सारे प्राणी हेमलकसाचे खरे आधारवड आहेत. 
प्राण्यांच्या या अनाथालयाला आज 'आमटेज् अनिमल आर्क' असं नाव देण्यात आलं. 'झू आऊटरिच ऑर्गनायझेशन'च्या संस्थापक सॅली वॉकर यांनी येथील प्राणी पाहून हे नाव सुचवलं आणि आज बिबट्या, कुत्रे, सिंह, हरीण, अस्वल असे अनेक प्राणी एकत्र सुखाने नांदताना दिसत आहेत. एरव्ही जंगलात हे सगळे प्राणी परस्परांचे शत्रू असतात. पण इथे सगळे गुण्यागोविंदाने एकत्र आहेत. हा प्रकल्प बघण्यासारखा आहे. प्रकाशवाट ह्या आत्मचरित्रात डॉ. प्रकाश आमटे लिहितात, आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन प्रत्येक परिस्थितीत वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आता सगळे खूप जवळ आलो आहे. पुढे सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं..जे अजूनही एकत्र आहे. 

बंड,अदम्य साहस आणि करूणा हेच तीन गुण जग बदलायला आवश्यक असतात आणि हे तिन्ही गुण एकत्र असणारी माणसं दुर्मिळ असतात. पण हीच माणसं आपलं जग बदलतात. आज हेमलकसा जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्या कार्याची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते आहे. अनेक पुरस्कारांचा वर्षाव त्यांच्या कार्यावर झालेला आहे. आज त्यांनी आपल्या कार्यातून नंदनवन फुलवले आहे आणि म्हणूनच ते सर्वार्थाने प्रत्येकाचे आशास्थान झालेले आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे #लोकबिरादरी #हेमलकसा #prakashamte

Thursday, October 8, 2020

चिखलगावच्या लोकसाधनेचे कल्पवृक्ष -डॉ राजा आणि रेणू दांडेकर

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.राजा आणि रेणू दांडेकर. आज दापोलीच्या चिखलगावामधील लोकसाधनेचे हे कल्पवृक्ष चिखलगाव ला सावली देणारे ठरले आहे. १९८२ साली एक दांपत्य पुण्याहून दापोलीजवळच्या चिखलगाव इथे वास्तव्यास आले आणि तेथूनच परिवर्तनाची नांदी सुरू झाली. खरंतर हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे आणि आज लोकसाधनेचे कार्य चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमधून सुरू आहे.

लोकमान्य टिळकांचे जन्मगाव असलेल्या चिखलगावात सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न डॉ. राजा आणि रेणू दांडेकर ह्यांनी केला आहे. कल्पक,निर्मितिक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम सुरू आहे. याला आज लोकमान्यता मिळत आहे आणि काम अधिक दृढ होत आहे. 

डॉ. राजा दांडेकर ह्यांनी बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली. परंतु समाजाचं ऋण फेडण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य या विषयांत कार्य करण्यासाठी ते पुन्हा गावाकडे आले आणि १९८२ पासून आजतागायत लोकसाधना ज्यांनी नित्यनूतन,जागृत,शाश्वत आणि वर्धिष्णू  ठेवलेलं आहे ते म्हणजे डॉ.राजा दांडेकर आणि त्यांना साथ देणाऱ्या रेणू दांडेकर आहे. रेणू दांडेकर साहित्य क्षेत्रातील एक अग्रणी नाव आहे. शिक्षण क्षेत्रात नवे क्रांतिकारी बदल घडवत, लेखन, मूल्याधिष्ठीत शिक्षण आणि संस्कार अशा अनेक विषयांवरील लेखनात त्यांचे विशेष योगदान आहे. अनेक दैनिकात लेखमाला आणि त्यांची  बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 

लोकसाधना, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने चिखलगाव इथे शिक्षण आणि ग्रामविकासाचा एक वटवृक्ष दिमाखात उभा आहे. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने तो वसवलेला आहे, त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर रुजवलेला आहे. संघटनात्मक काम न करता केवळ रचनात्मक काम करायचं, हे मनाशी पक्कं ठरवून हे दोघे चिखलगावी आले आणि १ ऑगस्ट १९८२ रोजी एका गोठ्यात त्यांची पहिली शाळा भरली. ही सुरुवात म्हणावी तितकी सोपी नव्हती. खरंतर गावकर्‍यांना शाळेचं महत्त्व पटवण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. जेम्स लेनची पाच सूत्रं ते आवर्जून नमूद करतात जी त्यांनी स्वतः आचरणात आणली - १. लोकांच्यात जा. २. लोकांसारखं राहा ३. लोकांपासून शिका. ४. तुम्हाला काय येतं हे विसरा. ५. लोकांच्या गरजांसाठी काम करा. ही सूत्रं घेऊन त्यांनी काम सुरू केलं आणि आज लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही इतर कुठल्याही शाळेसारखी नसलेली शाळा असण्याचं कारण म्हणजे वेगळा विचार करायची राजा आणि रेणू दांडेकर ह्यांची आग्रही भूमिका हेच एकमेव कारण आहे. गोठ्यात सुरू झालेली शाळा आज शासनाची दाद मिळवतेय. तिच्या वेगळेपणामुळे युनायटेड नेशन्सने तिला प्रमाणित केलेलं आहे. हसत खेळत,वेगवेगळ्या पद्धती आणि नवनवीन बदल घडवत इथे आज शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे . शाळा म्हणून खूप अशी शिस्त नसतेच,सहजपणे प्रत्येकजण प्रत्येकाचे नेमून दिलेले कार्य करत असतात. विद्यार्थी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी मात्र असते. शिक्षक म्हणूनही शाळेबद्दल आपलेपणाची भावना जपणारे इथले सगळे लोक आहेत. म्हणून आज शाळेचा आलेख वर्धिष्णू होतो आहे. 

शासन स्तरावर आणि प्रचलित शिक्षणपद्धतीत ज्या प्रकारे शाळा चालतात, त्या प्रकारे राजा आणि रेणू दांडेकर ह्यांना ही शाळा चालवायचीच नव्हती. त्यांनी वर्गात जाऊन कधीच शिकवलं नाही. 
शिक्षण हे प्रयोगशील आणि उत्पादक कसं होईल हा त्यांचा विचार होता. शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे,असे त्यांना कायम वाटत राहिले आणि त्यातूनच त्यांनी वेगळेपण हे जपले आणि विद्यार्थ्यांसमोर सुद्धा रुजवले आहे. आज बाहेरच्या देशांसारखी मल्टि स्किल्ड वर्कर किंवा  हँडी मॅन प्रकारची मुलं आपण निर्माण करायला हवीत, म्हणून शाळेतच तांत्रिक शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि बदलाचे वारे वाहू लागले. आज शासनाने आणि अनेक संस्थांनी त्यांच्या 'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी या कोर्सला मान्यता दिलेली आहे. अनेकांनी यशस्वीरीत्या हे शिक्षण पूर्ण करत गावातच चांगला उद्योग सुरू करून यशस्वी झाले आहेत. 

लोकमान्य टिळक विद्यामंदिरात शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. मातृभाषेतून शिक्षण व्हावं हीच ह्यांची आग्रही भूमिका आहे. या शाळेत पाचवीपासूनच मुलांना कौशल्याभिमुख किंवा स्किल बेस्ड शिक्षण दिलं जातं. व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीचं महत्त्व आज हळूहळू वाढतंय, पण लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ते गेली ३८  वर्षांपासून सुरू आहे. इथे होम सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट, मेकॅनिकल इत्यादी विषयक वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. इथे आठवी ते दहावीच्या मुलांना आय.बी.टी. म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा पर्याय मिळतो. हा एसएससी बोर्डाने मान्य केलेला व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. आठवड्यातला एक दिवस ही मुलं विविध तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यात घालवतात. त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी हा अधिक प्रगत अभ्यासक्रम आहे, ज्यात शेतीपासून ते बांधकामापर्यंत सर्व तंत्रांचं शिक्षण त्यांना मिळतं आहे. आज ह्यांचे कार्य यशोशिखरावर आहे. इथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही तितक्याच प्रेरक आणि प्रेरणादायी आहेत. 'अशी घडली माणसं' या डॉ.राजा दांडेकरांनीच लिहिलेल्या पुस्तकात त्या संकलित केलेल्या आहेत. वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

आज डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांचा प्रवास दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. ज्यावेळी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची होती त्यावेळी भारतरत्न नानाजी देशमुखांनी डॉ. राजा दांडेकर ह्यांना जो मंत्र दिला त्याने कार्याचा विस्तार उत्तरोत्तर बहरणारा आहे. श्रद्धेय बाबा आमटे ह्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांच्या लोकसाधनेचे कार्य उत्तुंग आणि प्रेरणादायी आहे. आज त्यांचा मुलगा कैवल्य दांडेकर ही गावातच स्थायिक झाला आहे आणि लोकसाधनेच्या कार्याचा रथ ओढतो आहे आणि मुलगी मैत्रेयी सुद्धा भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन या पदावर देशसेवेत आहे आणि स्नुषा धनश्री कैवल्य दांडेकर  सध्या चिखलगवच्या शाळेत अनेक शैक्षणिक प्रयोग करत आहे. अशी जगावेगळी माणसं आहेत म्हणून भारताचे वेगळेपण टिकून आहे. आपल्या कार्याला मनापासून शुभकामना आहेतच. संत तुकाराम महाराजांचे वचनच ह्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरेल,

बोले तैसा चाले । त्यांची वंदावी पाउले ॥

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे https://loksadhana.org

#loksadhana #chikhalgaon

Monday, October 5, 2020

नर्मदालयाच्या शिक्षणव्रती - भारती ठाकूर


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत भारती ठाकूर. नर्मदेच्या किनाऱ्यावरील लेपा येथे पूर्णकालीन शिक्षणव्रती म्हणून त्या आजही कार्यमग्न आहेत. मध्यंतरी  विवेक घळसासी काकांना चांगल्या पुस्तकांची सूची मागितली त्यात त्यांनी भारती ठाकूर ह्यांचे 'नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा' हे पुस्तक वाचायला सांगितले. खरंतर विलक्षण वाचनानंद देणारे हे पुस्तक आहे. लॉकडाऊनच्या काळात पुनर्वाचनाचा आनंद ही अनुभवला आहे. पुढे भारती ताईंच्या कामाबद्दल अधिक समजले ते त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून कारण त्यांनी एक छान लेखमाला ह्या कोरोनाच्या काळात वाचकांना उपलब्ध करून दिली. भारती ताईंचे काम अद्भुत आहे आणि त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

भारती ठाकूर. हे नाव नाशिकसाठी ओळखीचे आहे कारण त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. साहसाची आवड असल्यामुळे अनेक ट्रेकिंग, सायकलिंग अशा मोहिमा त्यांनी फत्ते केल्या आहे. काही काळ विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्यासाठी त्या आसाममध्ये गेल्या आहेत. कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्रात वास्तव्य असताना भरपूर वाचन,चिंतन,मनन,अनेक विद्वत मंडळींशी चर्चा यातून मनात वेगळेच काही तयार होत होते. अशातच त्यांना नर्मदा परिक्रमेची इच्छा झाली आणि पुढे परिक्रमा सुरू झाली.

१४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. ५ महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. केवळ निसर्गदर्शन,अध्यात्मिक अनुभव अशा गोष्टींचा विचार भारतीताईंच्या मनात नव्हता तर नर्मदेवर बांधल्या जाणाऱ्या धरणांमुळे लाखो वर्षांची प्राचीन परंपरा, नर्मदा खोऱ्यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण जैविक संपदा धरणाखाली जाण्यापूर्वी डोळे भरून पहावी, त्याच्या नोंदी ठेवाव्यात या विचाराने त्यांनी परिक्रमा करण्याचे ठरवले. नर्मदा किनाऱ्यावरील लोकजीवन आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून मार्गक्रमण करताना स्वत:शीच संवाद साधावा हे कारण ही होतेच. त्यांनी अनुभवलेला निसर्ग,भेटलेली माणसं सारं काही टिपून ठेवले आणि तेच अनुभव पुस्तक रूपाने आपल्याला 'नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा' ह्या त्यांच्या अंतर्मनाशी झालेल्या संवादात वाचायला मिळतात.  

आपल्या परिक्रमेत त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिलं. अवघी पाच-सात वर्षांची ही मुलं घाटात फिरून फुलं विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळं वास्तव पाहून भारती ठाकूर यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. पुढे त्यांनी स्वत:ला या कामात पूर्णवेळ वाहून घेतलं. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला हातावर मोजता येतील अशी मुलं या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ १७०० हुन अधिक मुलं आहेत.

खरं सांगायचं तर हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी त्यांनी कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले. सुरुवातीला त्यांनी एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या परिसरात, पाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पण या मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी भारती ठाकूर ह्यांनी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशिवार्दाने पुढे जाणाऱ्या कामातून एकेक माणूस जोडला जाऊ लागला. भारतीताई यांच्या प्रयत्नातून शाळेत आलेले विद्यार्थी त्यांना मदत करू लागले आणि या चळवळीला 'नर्मदा' या संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. ऑक्टोबर २००२ मध्ये 'नर्मदालय' संस्थेची स्थापना झाली आणि प्राथमिक ते हायस्कूल आणि आज व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून निमार प्रदेशातील पंधरा खेड्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे.

आज नर्मदालयाचा प्रमुख उद्देश हा औपचारिक व अनौपचारिक शिक्षण,व्यवसायाभिमुख शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या कामासाठी राहिला आहे. चांगल्या कामाला परमेश्वर पाठीशी असतोच इथं तर प्रत्यक्ष नर्मदा माई आहे. भारती ठाकूर ह्यांचे काम बघून एका नागा साधूने त्यांच्या आश्रमाची जागा व बाजूची जमीन नर्मदालय संस्थेला दिली. या जागेवर रामकृष्ण शारदा निकेतन सुरू आहे. औपचारिक शिक्षण व संस्कार याबरोबरच सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, माती परीक्षण याचे प्रशिक्षण देऊन हे विद्यार्थी ग्रामीण भागाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले आहे. केवळ या भागातील वंचित कुटुंबातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन व शिक्षण हे संपूर्णत: विनामूल्य दिले जाते. विशेष म्हणजे रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा बनली आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग,डॉक्टर आदी पदवी प्राप्त करते झाले आहेत. या केंद्रांमध्ये शिक्षिका म्हणून अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. या शिक्षकांना देण्यात येणारे ट्रेनिंग त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो आहे. 

नर्मदा संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे 'नचिकेत छात्रावास'. आजूबाजूच्या पाड्यांवरून शिक्षणासाठी येणारी मुले या छात्रावासात राहतात. लेपा पुनर्वास भागात शाळा व छात्रावासाच्या नजीकच एक गोशाळेचा उत्तम प्रकल्पही चालू आहे. नर्मदा संस्थेतर्फे या भागातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी 'नर्मदा निर्मिती' नावाने शिलाई विभाग सुरू करण्यात आला आहे. यातील तयार वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. आज भारती ठाकूर ह्यांचा कार्याचा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरतोय.भारती ठाकूर ह्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. कवी बा.भ.बोरकर ह्यांच्या ओळींच त्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरतील...

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।। 
 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे  https://narmadalaya.org

Thursday, October 1, 2020

काश्मीरशी "असीम" मैत्री करणारे सारंग गोसावी !!

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत सारंग गोसावी.आपण अनेकदा म्हणतो, 'मराठी पाऊल पडते पुढे !' पण खऱ्या अर्थाने आपल्या कार्यातून प्रत्यक्षात मराठी पाऊल जे आज सीमेवर आणि बहुचर्चित असलेल्या जम्मू काश्मीरमधील अनेक दुर्गम भागात प्रसंगी प्रत्यक्ष सीमा भागात आदराने नाव घेतले जाते आणि आजही प्रसिद्धीच्या झोतात न येता शांतपणे काम करणारे सारंग गोसावी आणि "असीम फाऊंडेशन" च्या माध्यमातून काम करणारी त्यांची संपूर्ण टीम आहे. 

शतकांपासून काश्मीर चे भारताशी सांस्कृतिक,शैक्षणिक, धार्मिक , ऐतिहासिक संबंध आहेत. भारताची उज्ज्वल ज्ञानाची परंपरा काश्मीर शिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रख्यात कवी, साहित्यिक, खगोलतज्ञ ,व्याकरणतज्ञ व तत्ववेत्ता आचार्य अभिनवगुप्त यांच्या अथक अभूतपूर्व प्रयत्नांमुळे कर्तृत्वामुळे काश्मीर ची ज्ञानपीठ, शारदापीठ अशी ओळख जगभरात निर्माण झाली. केरळच्या कालडी मधून आलेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू म्हणून याच भूमीतून ओळखले जाऊ लागले. अशा भव्यदिव्य ज्ञानाच्या परंपरेची गंगोत्री म्हणून काश्मीर ची ओळख आहे. 

पण हल्ली काश्मीरमध्ये सतत हल्ले होत असल्यानं तिथे खूप मोठ्या प्रमाणात लष्करी यंत्रणा कार्यरत आहे. कधी अतिरेकी, दहशतवादी हल्ले करतात, तर कधी लष्कराकडून हल्ला होतो. यात बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसं भरडली जातात. विकासाची कामं होत नाहीत. दहशतवादी हल्ला करतील ही भीती इतर ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात बसलेली आहे. अशा वेळी पुण्यातील सारंग गोसावी काश्मीरला जायचं फक्त तिकीट घेऊन गेले आणि गेली २० वर्षं जातच आहे तेही तिथलं निसर्गसौंदर्य,हवापालट म्हणून नाही, तर तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना ‘मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात’ हे सांगण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी,त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी, त्यांना भारत कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू आहे. 

काश्मीरमधला सगळा परिसर सारंग गोसावी फिरत राहिले. तिथल्या लष्कराची मानसिकता त्यांनी समजून घेतली, तसंच तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्नही प्रत्येक भेटीत कळत गेले. जन्माला आल्यापासून ज्या मुलाला आसपास बंदुकधारी सैनिक दिसत असतील, तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचारही करायला लागले. काश्मीरमधल्या दहशतवादाचा अभ्यासही होत गेला. आपण काय करू शकतो, आपल्यात काय क्षमता आहेत याचा विचार करून सारंग गोसावी ह्यांनी तिथल्या स्थानिक युवकांना Physics हा विषय शिकवायचं ठरवलं. ठिकठिकाणी जाऊन ते क्लासेस घ्यायला लागले. सुरुवातीला तिथल्या लोकांना हा बाहेरचा तरुण येऊन असं का करतोय का प्रश्न पडला; पण सहवासानं त्यांना त्यांचा हेतू कळला. आपल्याच घरातला हा एक मुलगा आहे हेही त्यांना वाटायला लागले. मुला-मुलींच्या संपर्कातून सारंग गोसावी प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचले आणि त्यांनी कुपवाडा इथं पहिलं केंद्र सुरू केलं. तिथली अलफैयाज नावाची शाळा शिक्षकांअभावी बंद पडली होती. सारंग गोसावी ह्यांनी ही बंद पडलेली शाळा सुरू करायचं ठरवलं. खरं तर हे सगळंच काम इतकं सोपं नव्हतं. बाहेरचा एक मुलगा येतो आणि इथं येऊन रोज काहीतरी नवीन गोष्टी सुरू करतो ही गोष्ट लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर नजर ठेवली आणि काही वेळा त्यांना त्रासही दिला. घरी फोन करून धमक्या द्यायलाही सुरुवात केली. सुरुवातीला घरी फोन जाताच त्यांची आई घाबरून रडायची,त्यांनी पुन्हा काश्मीरला जाऊ नये म्हणून विनवण्या करायची; पण सारंग गोसावी शांत होते, आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी त्या दहशतवाद्यांनाही आपण कुठल्याही अतिरेकी हेतूनं काही करायला आलो नसून,फक्त चांगलं काही तरी करू इच्छितो, जे काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी असेल, असं सांगायचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना सारंग गोसावी ह्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला आणि त्यांनी पुढे लक्ष दिले नाही. पुढे बडगाम येथे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू केले पण ज्यावर विश्वास ठेवला त्याने परस्पर कॉम्प्युटर विकले आणि हे प्रशिक्षण केंद्र बंद पडले. तरी न खचता जिद्दीने पुन्हा बिजबेरा गावी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले. पुण्यातून १७ जणांची टीम सोबत नेली. त्यांना प्रशिक्षण दिले. आज काश्मीर मधील मुले पुण्यात शिकायला येत आहेत. तेथील पालक सुद्धा विश्वासाने आपल्या मुलांना पुण्याला पाठवतात आणि सारंग गोसावी ह्या मुलांचे पालकत्व स्वीकारतात. 

काश्मीर मध्ये अक्रोड आणि सफरचंदं ह्यांची प्रचंड लागवड होते. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ह्यापासून बिस्कीट करण्याची कल्पना सारंग गोसावी ह्यांना सुचली आणि ती यशस्वी झाली. आज ही बिस्किटे दिल्ली, पुणे आणि श्रीनगरमध्ये हातोहात खपायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी काश्मीरमध्ये मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या अणि त्याही खूपच यशस्वी झाल्या. खेळामुळे गावागावांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. आज काश्मीर हे सारंग गोसावी ह्यांचे किंवा ‘असीम फाउंडेशन’चं अर्थातच दुसरं घर झालं आहे. तिथल्या घराघरात सारंग गोसावी ह्यांना लोक ओळखतात. इतकंच नव्हे तर काही गोंधळाची शक्यता वाटली, तर तिथलं लष्करही सामंजस्याचं, शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सारंग गोसावी ह्यांना बोलावून घेतं. 

आज सारंग गोसावी ह्यांची असीम फाउंडेशन ही पुणे येथील संस्था भारताच्या सीमावर्ती भागांत, मुख्यतः जम्मू-काश्मीरमध्ये काम करते. भारतीय समाजाला मुख्यतः तरुणांना राष्ट्रीय प्रश्नांना तोंड देण्याची उर्मी आणि जिद्द देण्याची गरज असीम फाऊंडेशनने जाणून घेतली. असीमला जाणवणार्‍या या राष्ट्रवादाची जागृती करण्याच्या गरजेला मूर्तिमंत रूप मिळाले. आज पुण्याजवळच्या चांदिवली येथे असीमच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय एकात्मता उद्यान साकारण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता उद्यान हा तरुणांना एकत्र येऊन राष्ट्रीय प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेला एक मंच आहे. या असीमच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळावी आणि तरुणांना असे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून समकालीन नायकांची गरज आहे हे असीमने जाणले आणि म्हणूनच असीमने भारताच्या २१ परम वीर चक्र विजेत्यांची माहिती देणारे shaurya नावाचे अँड्रॉइड अँप विकसित केले आहे. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच सारंग गोसावी ह्यांचे कार्य आहे. अशी जगावेगळी माणसं आपल्या अवतीभवती आहेत. असीम म्हणजे अमर्याद आणि ह्या फाऊंडेशन चा प्रवास उत्तरोत्तर प्रगती पथावर असावा हीच सदिच्छा आहे. ह्यांच्या कार्यास खूप शुभेच्छा आहेतच. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे