Sunday, June 25, 2023

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' हे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तक वाचले होते पण याचा अनुवादही वाचनीय झाला आहे. नुकतंच एक चांगले पुस्तक वाचून पूर्ण झाले याबद्दल सकारात्मक वाटतं आहे. देशाचे धोरण आणि रणनीती यांच्यावर अत्यंत बारकाईने विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे. 

खरंतर द इंडिया वे अर्थात 'भारत मार्ग' म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील काम करणाऱ्या एका व्यक्तीचा असा दृष्टीकोन आहे, जो जाणीवपूर्वक प्रत्यक्ष वास्तवाशी जोडलेला आहे. हे पुस्तक अनेक प्रकारच्या समूहांना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेले आहे. जगातील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे भारताच्या वैचारिक भूमिकेची एक सुव्यवस्थित मांडणी आहे. त्यातून जगाला याबाबत अधिक स्पष्टता येणे आणि त्यांची याबाबतीतील स्वीकारार्हता वाढणे अपेक्षित आहे. शेवटी जगात आपला प्रभाव वाढत जाताना जगाला आपला अधिक चांगला परिचय होणे आवश्यक आहे. या अंतरंग ओळखीमुळे सहकार्याच्या शक्यता वाढतील आणि गैरसमज होण्याच्या संभावनाही कमी होत जातील; पण हे पुस्तक त्या भारतीयांसाठीसुद्धा आहे, जे
परराष्ट्र धोरणाच्या प्रत्यक्ष संबंधात नाहीत. हे लक्षात घेतले पाहिजे, की आंतरराष्ट्रीय घटनांकडे ते लक्ष देत असोत वा नसोत, या घटनांच्या परिणामांपासून कुणाची सुटका नाही. 'एक बदल आणि चार हादरे' हा याचा ठोस पुरावाच आहे. याहीपलीकडे धोरण ठरवताना त्यांच्या स्वतःच्या हिताशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांत जे निर्णय घेतले जातील त्याच्या परिणामाचे ते भागीदार आहेत आणि कायम राहतील. 

या पुस्तकातून आपल्याला परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक ती कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या परराष्ट्र मंत्री म्हणून डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे हीच पर्वणी आहे.

भारत मार्ग या पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन पैलूंवर अधिक प्रकाश टाकलेला आहे. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ या तीन पैलूंवर विशेष भर देण्यात आला आहे. आणि त्याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मुद्देसूद मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही माहितीपूर्ण आहे. आत्ताची राजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात वाचायला मिळते. 

जागतिकीकरण ही आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारत मार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल हा विश्वास वाटतो. 

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे डॉ. जयशंकर यांनी या पुस्तकातून सांगितली आहेत. स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारानुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार या पुस्तकातून अधिक व्यापकता दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे. चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे. याबद्दल हे पुस्तक अधिक वाचतांना विचार देणारे पुस्तक आहे. 

डॉ. जयशंकर यात लिहितात," चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल." हे त्यांनी अनेक उदाहरणातून स्पष्ट केले आहे. 

आजवर कोणत्याही परराष्ट्र मंत्र्याला कार्यरत असताना परराष्ट्र धोरणावर पुस्तक लिहिण्यासाठी वेळ आणि इच्छा असल्याचे अभावानेच आढळून आले; पण राजनीतीत मुरलेले मुत्सद्दी डॉ. एस. जयशंकरांसारखे विद्वान जेव्हा सूत्रे हातात घेतात, तेव्हा सखोल विचारमंथनातून एखादे विस्तृत पुस्तक समोर येणे स्वाभाविक आहे. 'द इंडिया वे' अर्थात भारत मार्ग हे एका डोळस निरीक्षकाचे आत्मनिवेदनही आहे आणि भारत ऐतिहासिक बदलांशी कशा प्रकारे जुळवून घेत आहे, हे जगाला सांगण्याचे एक साधनही आहे. हे पुस्तक एका महत्त्वाकांक्षी देशाचे भवितव्य काय आहे याविषयी बरेच शिकवतो. भारताला आता व्यावहारिक राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे प्रखर आवाहन आहे आणि यात भारत मार्ग अग्रेसर असेल हाच विश्वास आहे. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'
लेखक डॉ.एस.जयशंकर - अनुवादिका - सारिका आठवले
प्रकाशक : भारतीय विचार साधना - पुणे 
मूल्य - ₹ ३०० 

सर्वेश फडणवीस 

Sunday, June 11, 2023

श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान निमित्ताने..

अवघा झाला आनंदू  !! 🚩🚩

"रामकृष्ण हरी". वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला अर्थात आज आळंदीहून प्रस्थान ठेवलेली ज्ञानेश्वर माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आज आपण ही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जात आहोत. कारण या परंपरचे महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेनी चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदानी कोंदून जाते. मैलोनगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, तहान, पाऊस, वारा, वादळ याची पर्वा न करता चालत असतात.

कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे. 

खरंतर एखादी प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी कुठल्याही मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवून विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे. 

आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले आहेत काही वेळाने आळंदीहुन माउलींच्या समवेत सर्वजण निघणार आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी. चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णाचा गजर करत.

सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माउली आज पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. नगर प्रदक्षिणा करत त्यांचा आजचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे आणि उद्या सकाळी माउली पुण्याच्या दिशेने  प्रस्थान ठेवेल.

'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'..

सर्वेश फडणवीस