येणे वाग्यज्ञे !!
Saturday, October 17, 2026
⚜️ सेवाभाविनी : डॉ. मंदाकिनी आमटे
Friday, October 16, 2026
⚜️ सुमधुरभाषिणी - डॉ.धनश्री लेले
Thursday, October 15, 2026
⚜️ सैन्यप्रचारिणी : अनुराधा प्रभुदेसाई
Wednesday, October 14, 2026
⚜️ न्यायदायिनी : मीरा खडक्कार
Tuesday, October 13, 2026
⚜️ भावार्थरुपिणी : आशा बगे
Monday, October 12, 2026
⚜️ समाजधारिणी : पद्मश्री निवेदिता भिडे
आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या नावातच विलक्षण माधुर्यभाव जाणवतो. पद्मश्री निवेदिताताई भिडे नावाचे वलय प्रत्यक्ष भेटूनच जाणवते. निवेदिताताईंसारख्या थोर व्यक्तिमत्वाची सावली सुद्धा आयुष्यात एक मोठ्ठ्या देवस्थानाच्या दर्शनाची पुण्याई मिळण्याजोगे आहे. १९७७ पासून विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती म्हणून असलेल्या पद्मश्री निवेदिताताई भिडे या वर्धेच्या आहेत. ग्रामविकास प्रकल्पाच्या कामांपासून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. शहरी आणि ग्रामीण भागात विवेकानंद केंद्राचे जे शैक्षणिक प्रकल्प चालविले जातात त्याच्या त्या प्रमुख होत्या. १९९३ पासून ईशान्येकडील राज्यात त्या कार्यरत होत्या. विवेकानंद केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या विवेकानंद ट्रस्ट ऑफ कल्चरच्या त्या समन्वयक म्हणूनही कार्य करीत होत्या. पूर्वोत्तर राज्यातील जनजातींमध्ये समन्वय निर्माण करणे, विविध संस्कृतींचा संगम घडवून आणणे आणि सौहार्द प्रस्थापित करण्याचे काम त्यांनी या ट्रस्टच्या माध्यमातून केले होते.
मूळच्या वैदर्भीय असलेल्या निवेदिता ताई २००१ पासून कन्याकुमारी भागात कार्यरत आहेत आणि केंद्राच्या कामानिमित्त त्यांचा सतत भारतभर प्रवास सुरु असतो. सध्या निवेदिताताई विवेकांनद केंद्राच्या विद्यमान राष्ट्रीय उपाध्यक्ष असून त्यांच्याकडे देशभरातील कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. वक्तृत्वकलेच्या धनी असलेल्या निवेदिताताईंची अभ्यासपूर्ण मांडणी आणि कार्यामुळे युनेस्को येथील परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ऑस्ट्रेलिया येथे जावून आल्या आहे. देश - विदेशातील विविध परिषदांमध्ये त्यांना विशेष निमंत्रित वक्ता म्हणून आमंत्रण असते. भारताने जेंव्हा G20 परिषदेचे आयोजन केले होते त्याच्याशी संलग्न C20 परिषदेच्या संयोजनात विवेकानंद केंद्राचा सहभाग होता आणि त्यानिमित्ताने त्यांनी देशात विविध विषयांवर बीजभाषण केले आहे. C20 ची एक बैठक नागपूर येथे झाली असता माता अमृतानंदमयी यांच्यासमवेत निवेदिताताईंचे अभ्यासपूर्ण पाथेय विचार देणारे होते. समाज संस्कृतीच्या संदर्भात देश - विदेशातील सहयोग वाढविण्यासाठी तसेच विविध परिषदांचे आयोजन करण्यासाठी त्यांचा सतत प्रवास सुरू आहे. भारतीयांचे बंधुत्व वैश्विक नागरिकांसमोर पोहोचवणे अशा कामांमध्ये निवेदिताताईंच्या नेतृत्वाने आजवर अप्रतिम कामगिरी बजावली आहे. निवेदिता ताईंचे विचार ऐकणे हे कायम अंतर्बाह्य, बौध्दिक आणि अध्यात्मिक आनंद देणारी अनुभूति असते.
विद्यमान केंद्र सरकारने २०१७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती मा. प्रणव मुखर्जी यांच्याकडून निवेदिताताईंना पद्मश्री ने अलंकृत केले. तसेच इतर अनेक पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी आहे. आजवर अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. अत्यंत सात्विक, ऋजु, मृदू, नम्र, आणि विनयशील असे व्यक्तिमत्त्व म्हणजे निवेदिता ताई. खरंतर एकदम गोड जशा त्या दिसतात तसेच त्यांचे शालीन बोलणे आहे. प्रचंड सकारात्मक वलय आणि ऊर्जा त्यांना भेटून जाणवते. गीतेच्या सहाव्या अध्यायातील आत्मसंयमयोगातील ४१ व्या श्लोकातून भगवंत हेच सांगतात,
" प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते " ।।
अर्थात योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. आपण जी साधना (मन आणि बुद्धीचे उन्नयन) करतो ती कधीच व्यर्थ जात नाही. जितका अभ्यास किंवा साधना या जन्मात करू, त्याचा लाभ पुढील जन्मात जरूर मिळतो आणि हीच श्रीमंती निवेदिता ताईंकडे बघून कायम जाणवते. अविरत सुरू असलेला विवेकानंद केंद्राचा ४९ वर्षांचा त्यांचा प्रवास बघूनच नतमस्तक होतो. आई कन्यका देवीने त्यांना या कार्यासाठी सदैव सुदृढ ठेवावे हीच तिच्या चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
#नवरात्र #लेखमाला #दिवस_तिसरा