Tuesday, October 13, 2026

⚜️ भावार्थरुपिणी : आशा बगे

 

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय हे नाव मराठी साहित्य विश्वात अनोख्या शैलीतून लिखाण करत मराठी मनावर अधिराज्य करणाऱ्या लेखिका म्हणून अलंकृत झाले आहे. आशा अरविंद बगे अर्थात पूर्वाश्रमीच्या आशा देशपांडे. लहानपणापासून आई आणि आजी कडून सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणात आशाताईंवर लेखनाचे प्रारंभिक संस्कार झाले. नागपुरातल्या महाल भागात दक्षिणामूर्ती मंदिराजवळ देशपांड्यांचा वाडा होता. एका बाजला नाट्य, संगीत, काव्य आणि कला क्षेत्रात रंगून जाणाऱ्या श्रीमंत बाबुराव धनवटे यांचे शेजारी तर दुसऱ्या बाजूला वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री  हरदास यांचा प्राचीन परंपरा जपणारा आध्यात्मिक सहवास अशा संपन्न वातावरणात आशाताई लहानाच्या मोठ्या झाल्या. कालांतराने हेच संस्कार त्यांच्या लेखणीतून उतरले आहे. 

२००६ ला प्रतिष्ठित साहित्य अकादमी सारख्या पुरस्काराची श्रीमंती पाठीशी असतांना सुद्धा आशाताई आजही साध्या, सरळ आणि ममत्व जपणाऱ्या आहेत. आशा ताई यांचे साहित्य म्हणजे निर्मळ गंगेप्रमाणे पवित्र ओघवता भाषा प्रवाह आहे. कारण त्यांच्या लिखाणाला असलेली आध्यात्मिक बैठक आणि यामुळे त्यांचे साहित्य वाचताना सुंदर जीवनानुभूति मिळते. त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यातील अनुभवविश्व मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरणारे असले तरी त्याची मांडणी वेधक आणि विचार करायला भाग पाडणारी आहे. 

स्त्रियांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार ही आशाताईंच्या लेखनाची ताकद आहे. मराठी साहित्यात कथा-वाङ्मयात आशा बगे यांचे नाव एका वेगळ्या परिमाणाच्या कथा लिहिणार्‍या लेखिका म्हणून स्थिर झाले आहे. २० हुन अधिक लघुकथा, ८ कादंबऱ्या आणि दोन ललित लेखांची पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. नुकताच आदिनाद हा कथासंग्रह मौजेने प्रकाशित केला आहे. हिंदी, बंगाली, कन्नड, मल्याळम या भारतीय व इंग्रजी आणि फ्रेंच या परकीय भाषांमधेही त्यांच्या कथा-कादंबऱ्याचे अनुवाद झालेले आहेत.

मराठी साहित्य आणि संगीताचे शिक्षण घेणाऱ्या आशाताईंनी कधीही नोकरीचा विचार केला नाही. घरसंसार सांभाळून लेखनाचा छंद जोपासणाऱ्या आशाताईंची सुरुवात ‘ सत्यकथे ’पासून झाली. अनेक मानसन्मान मिळूनसुद्धा त्यांचा साहित्य वर्तुळातील वावर कमीच राहिला. या वर्तुळात चालणाऱ्या राजकारणापासून त्यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले. लेखन करत राहायचे आणि वाचकांना नवनवीन साहित्य देत राहायचे हीच त्यांची इच्छा आहे. सहज भेटीत त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाबाबत विचारले असतांना त्या म्हणाल्या ," लेखन व संगीत हीच माझी साधना आहे, त्यात रमायला आवडतं." म्हणून त्याबाबतीत कधीच विचार केला नाही. 

आशाताईंचे कथासंग्रह, कादंबऱ्या आणि ललितलेखन हे वेगळ्याच धाटणीचे आहेत. मला आवडलेली कादंबरी "चक्रवर्ती". आपले सद्गुरू प.पू.श्री मामासाहेब देशपांडे ह्यांच्यावरती त्यांचे जे लिखाण आहे ते शब्दातीत आहे. शक्य असल्यास स्वतंत्रपणे आवर्जून वाचावी. त्यात त्यांनी प्रत्येक पात्राला जो न्याय दिला आणि चरित्र नायकाचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यांची साहित्यसंपदेची जाण होते आणि वाचतांना नकळत हात जोडले जातात. या कादंबरी निमित्ताने त्यांची पहिली भेट झाली त्यानंतर आशाताई आणि बगे कुटुंबीयांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहे. 

आशाताईंची राहणी अतिशय साधी आहे.  त्यांचा वावर अतिशय सहज असतो. कुठेही पुरस्कारांची श्रीमंती त्या मिरवत नाही. त्यांना जवळून भेटल्यावरच त्या अधिक समजतील असा अनुभव आहे. आता नव्वदीच्या उंबरठ्यावर लेखनाचा वेग काहीसा मंदावला असला, तरी शब्दांशी असलेले त्यांचे नाते अजूनही तितकेच जिवंत आहे. त्यांच्या खोलीत लाकडाचा एक कोरीव लेखनटेबल आहे. वर त्यांच्या काही महत्त्वाच्या पुस्तकांची नीटनेटकी मांडणी आहे. सध्या ज्ञानेश्वरी, श्रीमद्भगवद्गीता, अमृतबोध यांसारख्या संतवाङ्मयाचे वाचन त्या करतात. त्याचबरोबर समकालीन साहित्यावरही त्यांची नजर असते. वाचन आणि लेखनाविषयी बोलताना त्या म्हणतात, ‘वाचन ठरवून करता येते; पण लेखनाला वेळापत्रक नसते. एखादी कल्पना अचानक मनात येते आणि मी आजही टेबलाजवळ बसून लिहायला सुरुवात करते. ते सर्वच उत्कृष्ट असेल असे नाही; पण त्या माझ्या भावना असतात.’

कायम आनंदी, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघणाऱ्या आशाताईंना संगीताची खूप आवड आहे. संगीतावर त्यांनी अनेक लेखनही केलं आहे. त्यांच्या लेखनातसुद्धा संगीताचा संदर्भ हमखास येतोच. त्यांचे आयुष्य मोठय़ा व एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली आहे. आशय,अभिव्यक्ती आणि संगीताचे माध्यम या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित रसायनाने आशाताई  यांचे अनुभवविश्व म्हणजे भारतीय परंपरेला समर्पित झालेल्या स्त्रीचे समृद्ध अनुभवविश्व आहे. भारतीय जीवनातले कर्मकांड, व्रतवैकल्ये, सण, उत्सव, कीर्तनादी गोष्टींचे भरपूर ज्ञान सद्गुरूपरंपरेने त्यांना लाभले आहे आणि त्यामुळेच त्यांची शब्दश्रीमंती नित्यनूतन आणि वर्धिष्णू अशीच आहे. 

आशाताईंचे लिखाण हृदयाचे ठाव घेणार आहे. खरंतर त्यांचे लिखाण म्हणजे वाचकांच्या मनातला एक कप्पाच असतो. श्री.राम शेवाळकर यांच्या नावाने सुरू झालेला पहिलाच ‘साहित्यव्रती’ पुरस्कार मिळणे हा सुद्धा त्यांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीचा यथोचित गौरवच आहे. भावार्थरुपिणी हे नामाभिधान हीच त्यांची यथोचित ओळख होईल. गाभारा या पहिल्या पुस्तक प्रकाशनाला त्या आवर्जून व्यासपीठावर उपस्थित होत्या. पुस्तक वाचूनच येईल हा त्यांचा प्रेमळ आदेश होता आणि त्यानुसार त्यांनी सुंदर आणि प्रासंगिक विचार मांडले होते. आशाताईंसारख्या सिद्धहस्त लेखिका म्हणजे स्नेहाच्या मंद ज्योतीचा लख्ख प्रकाश अनुभवणे आहे. कारण स्नेहाची मंद ज्योत म्हणजे काय तर  निस्वार्थ प्रेम, जिव्हाळा, माणुसकी आणि समाधानाचा कधीही न विझणारा हळूवार प्रकाश असावा असेच वाटते. वाचकांना समृद्ध करत आशाताईंना आई रेणुकेने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 

#नवरात्र #लेखमाला #दिवस_चौथा

No comments:

Post a Comment