Thursday, October 6, 2022

अयाचित मंदिर


जुन्याकाळी सर्वात पुढारलेले मंदिर म्हणजे अयाचितांचे मंदिर होते. महालातील अयाचित मंदिर मुळात हे श्री बालाजीचे मंदिर, 
अयाचितानी श्री बालाजीची वालुका मूर्ति स्थापन करून छोटेसे मंदिर बांधले. कालांतराने पुष्कळ मंदिरांची भर पडली. अयाचित महाराजांनी ते बांधले म्हणून अयाचित मंदिर म्हणून आजही ओळखले जाते. कीर्तन, प्रवचन, यज्ञ-याग याने हा परिसर त्या काळात गजबजलेला होता. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रथयात्रेस लोक जमत आणि आजही ती परंपरा टिकून आहे. नागपूरचे हे वेगळेपण होते आणि आजही का होईना ते जपून ठेवले आहे.  

वेदशास्त्र संपन्न सदाशिव भट्ट महाराज यांनी महालातील हे अयाचित मंदिर त्यावेळच्या शहराच्या बाहेर बांधले होते. सदाशिव भट्ट महाराज मूळ चंद्रपूरचे. अध्यात्माचा ओढा असलेल्या सदाशिव भट्ट यांनी वयाच्या बाराव्या वर्षी चंद्रपूर सोडले आणि तीर्थयात्रा करण्यास निघाले. सर्वप्रथम तिरुपतीला जाऊन त्यांनी भगवान बालाजींचे दर्शन घेतले. तेव्हापासूनच असेच बालाजीचे मंदिर बांधावे, असा ध्यास त्यांनी घेतला होता. तीर्थयात्रा करताना कुणी आपणहून खाण्यासाठी दिले तरच ते खायचे अन्यथा तसेच राहायचे. मात्र, खाण्यासाठी त्यांनी याचना केली नाही. या अयाचित वृत्तीमुळेच लोक त्यांना अयाचित महाराज म्हणू लागले. तिरुपती यात्रेनंतर त्यांनी काशी यात्रा केली. त्यानंतर १७८५ साली ते नागपुरात आले. नागपूर शहराला परकोट होता. आजच्या अयाचित मंदिराचा परिसर गावाच्या बाहेर होता. या परकोटाची भिंत व दरवाजे इंग्रजांनी रस्ते करण्यासाठी पाडले. भंडार दरवाजाकडून अयाचित मंदिराकडे जाण्यासाठी लाकडी फळ्या व बांबूंचा पूल होता. तो लाकडी पूल म्हणून ओळखला जायचा. आता हा पूल नसला तरी आजही तो परिसर लाकडी पूल परिसर म्हणून ओळखला जातो. सदाशिव भट्टांचा कल आध्यात्मिक वृत्तीकडे अधिक असल्याने बालाजींची स्थापना करावी व बालाजींच्या भक्तीत जीवन व्यतीत करावे, असा विचार त्यांनी केला. नाग नदी त्या काळात स्वच्छ होती. नदीचे पाणी लोक पिण्यासाठी वापरत. लोक नदीवर येऊन स्नान करीत, कपडे धूत. नदीच्या काठावरील शुद्ध रेती त्यांनी घेतली व त्यात चिंचेचा पाला, इतर वनस्पती रस, जवस तेल व इतर आवश्यक पदार्थ घालून ती मूर्ती तयार केली. येथील सभामंडपची लांबी ३० फूट असून, रुंदी १२ फूट आहे. १६ लाकडी खांब असून, त्यावर कोरीव काम आहे. तिरुपतीला जशी बालाजीची दैनिक पूजा, नवरात्रोत्सव, ब्रह्मोत्सव, पुराणवाचन, आरती, रथयात्रा होते त्याचप्रमाणे आपल्या या मंदिरात व्हावे, अशी त्यांची इच्छा होती व तीच परंपरा त्यांनी नागपुरात सुरू केली.

तेथील रथाचीही कथा सर्वश्रुत आहे. देवासमोर आलेल्या पैशातून अयाचित गुरुजी यांनी लाकडे व साहित्य खरेदी करून तिरुपती येथील रथासारखाचा रथ तयार केला. रथोत्सवाच्यावेळी भाविक रथासह मंदिराला प्रदक्षिणा घालतात. येथील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे फावडे भात-(रूढशब्द-पावडे भात) कारण तो इतका होत असे कीं, त्याचा ढीग उकरावयाचा म्हणजे फावड्याचाच उपयोग करावा लागत असे. त्या दिवशीं सोवळे ओवळे जेमतेमच असत. येईल त्याला प्रसाद मिळत असतो. हा सोहळा कोजागिरी पौर्णिमेच्या नंतरच्या रविवारी साजरा होतो. शहराचे वेगळेपण हे असेच टिकून राहते. परंपरेचे पाईक होण्यात ही वेगळा आनंद असतो. पिढी दर पिढी तो आनंद संक्रमित करून शहराचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करुया. एकदा तरी आवर्जून दर्शनासाठी जावे असे अयाचित मंदिर. 

✍️ सर्वेश फडणवीस

Monday, October 3, 2022

⚜️ आधारवेल : स्वरमाउली लता दीनानाथ मंगेशकर


लता मंगेशकर !! या नावासोबत मुलायम आवाजातील सुंदर गीतांचं अस्तित्व आणि जनतेच्या मनातील त्यांच्याप्रती असलेला नितांत आदरभाव सामावला आहे. या नावाचे मोठेपणच उत्तुंग आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो वृद्ध असो वा बालक, गरीब असो वा श्रीमंत, शहरी भागातील असो वा ग्रामीण, सर्वांना हे नाव परिचित आहे. नुसते परिचितच नाही, तर त्या नावाबद्दल विलक्षण आपलेपणा, प्रचंड जिव्हाळा, अतिशय प्रेमसुद्धा आहे. एक महान गायिका म्हणून त्यांच्या विषयीचा आदर प्रत्येक भारतीयाच्या मनात ओतप्रोत भरला असेल याची मला खात्री आहे. मा. दीनानाथांच्या आधारवेलीवर लता मंगेशकर हे नाव बहरलेच नाही तर त्याचा वेलू गगनावरी गेला आहे.  

२८ सप्टेंबर, १९२९ शनिवारी रात्री साडे दहा वाजता इंदूरमधील शीख मोहल्ला आनंदून गेला. मा. दीनानाथ आणि माईंच्या ज्येष्ठ कन्येचा अर्थात लता दिदींचा जन्म झाला. जणू श्रीकृष्णाची मधुर बासरी पृथ्वीतलावर अवतरली. एका असामान्य प्रतिभेच्या सुरेल आवाजाचा, स्वर्गीय कंठाचा चमत्कार, लाखो लोकांना सुरांत भिजून आनंद देण्यासाठी भूतलावर प्रकट झाला. गीत-संगीताची अभिजात परंपरा असलेल्या घराण्यात लता दीदी हळूहळू मोठया होऊ लागल्या. मा.दीनानाथांसारख्या तेजस्वी सूर्यापासून निर्माण झालेल्या दीदींसह त्यांची पाच अपत्येही सूर्यासारखीच तेजस्वी निघाली. घराण्यामध्ये संगीताची जी अभिजात परंपरा आहे, ती मंगेशकर घराण्यातील प्रत्येकाने जोपासली. या घराण्याला दिव्यध्वनीचे दैवी वरदान तर लाभलेलेच आहे; पण परिश्रम, रियाज,सातत्य, संगीतकलेवरील निष्ठा या गुणांची जोड देऊन मंगेशकर कुटुंबीयांनी ते वरदान अधिक खुलवले आहे. 

पित्याचे प्रेमळ छत्र अकाली हरविल्यानंतर भावंडे आणि माईला
सांभाळण्याची जबाबदारी दीदींनी स्वतः उचलली. त्यांचे वय खेळायचे पण लहान वयातच त्यांना परिस्थितीची व जबाबदारीची जाण आली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांनी व्यवस्था केली. संगीतापलीकडचं लता दिदींचे आयुष्य चाळलं तरी हे लक्षात येतें की सुरांच्या साम्राज्यात, स्वरांच्याच विश्वात, गीतांच्या नादात आणि संगीताच्याच क्षेत्रातील लता दीदी संगीताशिवाय रिक्त राहतील. 

कंठातील देवदत्त गंधाराचं मंगल लेणं ल्येवून जन्माला आलेल्या ल-ता- मं-गे-श-क-र ह्या सप्तरंगी सुरांनी संगीतकलेला अतिशय ऐश्वर्यसंपन्न करून सर्वोच्च उंची प्रदान केली. जन्माने बहरलेली इंदोर नगरी, बाललीलांनी सुखावलेली करवीर नगरी, कर्मभूमीची शान बाळगणारी मुंबई महानगरी, कर्तृत्वाचा अभिमान मिरविणारी पुणे नगरी असली तरी त्यांच्या सुरेल दैवी स्वरांनी अवघ्या धरतीवर स्वर्गसुख अवतरले होते. 

मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट आणि अर्थपूर्ण शब्दोच्चार यांमुळे लता दिदींचे गाणे ऐकतांना आपले देहभान हरपून जाते. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले दिव्य स्वर कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत पोहोचविले. प्रचंड पुरस्कार, मानसन्मान, गौरव, लोकप्रियता त्यांच्या वाट्याला येऊन सुद्धा त्या निगर्वी होत्या हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 'साधी राहणी, उच्च विचारसरणी' हे तत्त्व त्यांनी संपूर्णतः अंगिकारले होते.

'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' या उक्तीप्रमाणे, दीदींचा
नवोदित गायिका ते सूरसम्राज्ञी हा प्रवास अत्यंत खडतर मार्गाने झाला. वाटेतल्या काट्यांनी त्यांना जखमा केल्या. पण दीदी घाबरल्या नाहीत. अतिशय कठीण मार्गातून वाटचाल करीत त्या देदीप्यमान यशोशिखरावर जाऊन पोहोचल्या आणि त्यामागे प्रचंड मेहनत,चिकाटी आणि जिद्द होती. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी रात्रीचा दिवस करून स्थळ, काळ, वेळ, भूक, तहान, यांची तमा न बाळगता त्यांनी रेकॉर्डिंग केले. खरंतर साठविता न येण्याइतके जनतेचे प्रेम दीदींना मिळाले. पूर्वजन्मीच्या पुण्याईनेच हे प्रेम मिळाले, असे त्या कायम म्हणायच्या, कोणतेही काम उत्कृष्ट रितीनेच करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. दीदींनी प्रत्येक गाणे समरसून गायले आहे आणि त्यांची बहुसंख्य गाणी लोकप्रियही झाली आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्याला स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र कहाणी आणि स्वतंत्र इतिहासही आहे.

भारताच्या ह्या महान गायिकेचा कार्यक्रम परदेशात असला तर मातृभूमीच्या अभिमानाने, दीदींसारख्या श्रेष्ठ कलासाधकावरील प्रेमाने दूरदूरच्या ठिकाणांवरून तेथील भारतीय कार्यक्रमासाठी धावून येत. पाश्चात्य जनताही दीदींचा स्वर ऐकण्यास उत्सुक होतीच. दीदींचा सुरेल सूर ऐकून रसिक तृप्त होत आणि हा स्वर हृदयात जतन करून ठेवत. खुद्द स्वरसम्राज्ञीला प्रत्यक्ष समोर बसून ऐकताना प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने उचंबळून आले नाही तर नवलच तरीपण, मायदेशातील जनतेने जसे अमाप प्रेम या श्रेष्ठ कलावंतावर केले, तद्वत्च परदेशातील जनताही दीदींवर प्रेम करण्यात कुठेही कमी पडली नाही. ज्यांनी एक जरी कार्यक्रम ऐकला-पाहिला, त्यांनी आयुष्यातील अविस्मरणीय आनंद अनुभवला असे मी म्हणेन. कारण ह्या आनंदाची ज्योत स्मृतिरूपाने त्यांच्या मनात सतत तेवत राहणार हे निश्चित आहे. 

मला कायम वाटतं, घरातील असह्य वाटणारा एकटेपणा सुसह्य होतो तो दीदींच्या गाण्यांमुळे. कंटाळवाणा प्रवास सुखकर होतो तो दीदींच्या गाण्यामुळे. आनंदमय प्रवास अधिक आनंदी होतो तो दीदींच्या गाण्यामुळेच आणि प्रातःकाळी चहाच्या कपासोबत कानांना आणि मनाला सुखावून जाणारा दीदींचा भक्तिरसाने ओथंबलेला अमृतस्वर सोबत असला, तर ते रसायन दिवसभर पुरेल एवढी शक्ती आणि स्फूर्ती देऊन जाते.

लता दीनानाथ मंगेशकर म्हणजे पृथ्वीवरचा अलौकिक चमत्कार होता. चमत्कार प्राचीन काळातच होत होते असे नाही, तर दीदींच्या रूपातील चमत्काराचे दर्शन ६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत 'याची देही याची डोळा' आपण प्रत्यक्षात अनुभवत होतो. लता दिदींचा आवाज म्हणजे मानवी ध्वनीच्या सृष्टीतील एक अद्भुत घटना आहे. ' सरस्वतीच्या वीणेचा झंकार, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण आणि मुरलीची साद ही सर्व एकवटून विधात्याने लता दिदींचा कंठ घडविला असला पाहिजे,' असे वर्णन करून आचार्य अत्रे यांनी दिदींच्या कंठाची महती गायली आहे. भारतीय संगीताचा उगम सामवेदांतून झाला हे जर खरे मानले, तर लता मंगेशकर या त्या संगीताची गायत्री आहे. लता दीदी म्हणजे, भारतीय गायनकलेच्या नंदनवनातील 'स्वरलता' आहे. भारताचे वातावरण आपल्या मंजूळ स्वरांनी भारून टाकणाऱ्या लता दिदींना "स्वरमाउली" ही उपाधी करवीर पीठस्थ शंकराचार्य यांनी प्रदान केली. अखिल जगतामध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांनी प्रस्थापित केलेल्या सूरसम्राज्याला कृतज्ञतापूर्वक नमन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळनववी

Sunday, October 2, 2022

⚜️ आधारवेल : तेजतपस्विनी वं.मावशी केळकर

 

वं मावशी तथा लक्ष्मीबाई केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका. साधं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर प्रसन्न आणि लोभस व्यक्तिमत्त्व उभं राहतं. खरंतर अंतःकरणातून सात्विक भाव दर्शविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वं. मावशी केळकर. राष्ट्र सेविका समितीच्या कार्यविस्ताराच्या आधारवेलीवर आजही त्यांची शिकवण अनमोल अशीच आहे. त्याकाळी रामायण प्रवचनांच्या माध्यमातून तरुण पिढीला संस्कारित करण्याचं घेतलेले व्रत आजन्म शेवटपर्यंत निष्ठेनं पाळलेल्या वं मावशींचे जीवन म्हणजे तीव्र लढा होता. ऐन तारुण्यात वं मावशींना वार्धक्य आले. घरातल्या कर्त्या पुरुषाचे आकस्मिक निधन झाल्यावर सर्व मुलं अज्ञान आणि प्रपंचाचा व्याप तर मोठा पण वं. मावशींनी मोठ्या धैर्याने आणि संयमाने आलेल्या प्रत्येक परिस्थितीला तोंड दिले.

साधारण १९३६ तो काळ. ज्या काळात साधनांची उपयुक्तता नव्हती. स्त्रियांना घराबाहेर वावरणेही कठीण होते. अशा सर्व कठीण परिस्थितीवर मात करत वर्धेसारख्या छोट्या गावातून लक्ष्मीबाई केळकर या अखिल विश्वात असणाऱ्या सेविकांची वं. मावशी झाल्या आणि हे सगळं स्वप्नवत असल्यासारखे वाटतं. ज्या काळात ‘अबला’ हे स्त्री समाजाला केले गेलेले दुर्बलत्व विशेषण पुसून टाकण्यासाठी आणि स्त्री शक्तीचा साक्षात्कार होऊन स्त्री जीवनाचे शास्त्र कोणते हे जाणण्याची त्यांना प्रेरणा झाली आणि या प्रेरणेचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे १९३६ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्र सेविका समिती या अखिल भारतीय स्त्री संघटनेचे त्यांनी केलेले बीजारोपण होते. 

१९३६ साली पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून नागपूरात परत जात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निर्माते डॉ. हेडगेवार यांनी वर्धेस मुक्काम केला. त्यावेळी संघ शाखेत डॉ. हेडगेवार यांचा बौद्धिक वर्ग ठेवण्यात आला. त्यासाठी स्वयंसेवकांच्या पालकांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले होते. याच वेळी ज्या पालकांची डॉ. ना भेटण्याची इच्छा होती त्यांना दुसऱ्या दिवशी भेटीसाठी निमंत्रित करण्यात आले. तेव्हा डॉ. हेडगेवार आणि वं मावशी यांची पहिली भेट झाली. ती भेट अल्पवेळाची होती पण वं. मावशींनी डॉ. ना भेटल्यावर संघाप्रमाणे स्त्री संघटन असावे अशी मनातील इच्छा प्रदर्शित केली. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात होते की स्त्री समाजाचा विचार करायचा असेल तर स्वतः स्त्रियांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न हाताळायायला हवा आणि काही काळाने परत आप्पाजी जोशी यांच्याकडे डॉक्टरांचे येणे झाले आणि त्यानंतर पुन्हा डॉ.हेडगेवार, आप्पाजी आणि वं.मावशी यांची भेट झाली. ही भेट अतिशय महत्त्वाची होती कारण डॉ. हेडगेवार यांनी तेव्हाच वं मावशींना सांगितले होते की संघ आणि समिती या दोहोत वैचारिक आणि कार्यक्रम विषयक साम्यता आणि यथायोग्य सहकार्य चालू राहिले तरी समिती संघाची स्त्री शाखा म्हणून कधीच गणली जाणार नाही. त्यांनी आगगाडीच्या रुळांचा दृष्टांत देऊन स्पष्ट केले. ते म्हणाले,‘ गाडीच्या रुळांप्रमाणे या दोन्ही संघटना समांतर असतील पण कधी एकत्र न येणाऱ्या राहतील. वं.मावशींची समिती कार्याबद्दलची कळकळ आणि कार्यधुरा संभाळण्यासंबंधीची कुवत याबाबत डॉ. हेडगेवार यांना अधिक विश्वास वाटला आणि त्यांनी तेव्हा स्त्री संघटनेचा विचार वर्धेपूरता न ठेवण्यासंबंधी वं मावशींना सुचवले.

आज समितीचे कार्य विश्वव्यापी आहे ती दृष्टी वं. मावशींच्या चरित्रातून जाणवते. आसेतुहिमाचल या एका ईश्वरी कार्यासाठी त्या सतत भ्रमण करत राहिल्या. वं.मावशींचा विश्वास होता की राष्ट्राची उभारणी,त्याचा गौरव,त्याची प्रतिष्ठा ही स्त्रीवरच अवलंबून आहे. कारण राष्ट्रधर्माची ती धारक, रक्षक आणि वाहक आहे. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी तिला याचे भान असायला हवे. वं.मावशींची स्त्रीविषयक संवेदनशीलता आणि सहृदयता यांचे प्रत्यंतर त्यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात जाणवते. एका ध्येयासाठी त्यांनी घेतलेले कष्ट,परिश्रम यांची पराकाष्ठा म्हणजे आजचे राष्ट्र सेविका समितीचे विश्वव्यापी स्वरूप असे म्हणता येईल.

वं. मावशींच्या स्वभावात धर्म, संस्कृती, शील आणि सचोटी हे गुण जन्मतःच होते. त्यामुळे हे सर्व सद्गुण समितीच्या माध्यमातून स्त्रियांमध्ये निर्माण करण्याचे त्यांनी त्यावेळी ठरवले. कोणाही व्यक्तीमध्ये सद्गुण निर्माण करण्याचे काम फार खडतर असते. वं.मावशींनी आपले जीवन तसे घडवले. वं.मावशींच्या जीवनात तत्व आणि शिस्त या दोन गोष्टींबाबत त्या अत्यंत कठोर आणि स्वयंसेविकेच्या बाबतीत अत्यंत हळुवार आहेत असे वाटते. भारतीय परंपरेने घालून दिलेल्या आदर्शानुसार हिंदू स्त्री सदैव सशक्त, नीतिमान आणि कार्यप्रवण राहावी या साठी तिला संघटनेच्या सूत्रात बद्ध करणे हे समितीचे कार्य आहे. राष्ट्राचे उत्थान व्हायचे असेल तर स्त्री शक्तीला एकत्रित आवाहन करण्याची आवश्यकता आहे. 

स्त्री ही राष्ट्राची जननी आहे. प्रेम आणि संस्कार करण्याचे गुण तिच्या अंगी असतात आणि पर्यायाने समाज घडविणे हे तिचे आद्य कर्तव्य आहे. ती विशेष कर्तव्यदक्ष आणि  कार्यकुशल असायलाच हवी ही  वं. मावशींची शिकवण आणि समिती स्थापनेच्या वेळी बघितलेले स्वप्न आज पूर्णत्वास होताना दिसत आहे. स्त्री शक्ती जागृतीचा वं मावशींनी आरंभिलेला हा यज्ञ अगणित अशा सेविकांच्या श्रद्धायुक्त श्रम आणि अजोड त्यागाच्या आहुतींनी सदोदित प्रज्वलीत ठेवला आहे.

वं. मावशींच्या व्यक्तिमत्त्वाच्या असंख्य पैलूंचे असाधारणत्व यात येऊ शकले नाही याची पूर्ण जाणीव आहे. वरवर शांत भासणारे परंतु अंतर्यामी असणारे त्यांचे जीवन सांगण्यापेक्षा अनुभवण्यासारखे आहे. ध्येयाबद्दल नितांत श्रद्धा, कार्यवाढीची कळकळ आणि कशाही परिस्थितीत कार्य करीत राहण्याची जिद्द ही त्यांची विशेषत्वाची त्रिसूत्री आहे. थोडक्यात त्यांचे जीवन म्हणजे साधरणत्वा कडून असाधारणत्वाकडे उंचावलेला आलेखच आहे असे म्हणता येईल. 

वं. मावशींच्या जीवन चरित्रातून कार्य करण्याची अक्षय स्फूर्ती राष्ट्र कार्य करण्याऱ्या प्रत्येकाने आत्मसात करावी. कारण हिंदू समाजाला शक्तीसंपन्न करून त्याला परम वैभवाकडे नेण्यासाठी कोणत्या तत्वज्ञानाची व कार्याची कास धरली पाहिजे याची जाणीव करून देण्याचे दायित्व आपल्यावरच आहे. वेळ फार थोडा आहे, तरीही प्रत्येकाने शर्थ करून समाजात तो बदल घडवून आणण्यासाठी व.मावशींसारख्या आधारवेलीच्या शिकवणीतून सदैव प्रेरणा देणाऱ्या, स्त्री शक्तीचा आविष्कार असलेल्या वं. मावशी केळकर यांच्या चरणी सादर नमन. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळआठवी

Saturday, October 1, 2022

माता तूं नांदसी सप्तशृंगगडावरी हो..

आदिशक्तीचे जागर पर्व अर्थात घट नवरात्राची सुरुवात झाली आहे. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे अहंकारी आणि क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले. नवरात्र म्हणजे देवीच्या शक्ती स्वरुपांचे पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्याचा प्रेरणादायक कालावधी आहे. या जागर पर्वात आज आपण महाराष्ट्रातील साडे तीन पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या वणीच्या श्री सप्तश्रृंगी आईच्या दर्शनार्थ जाणार आहोत. नासिक जिल्ह्यात चांदोर अर्थात चांदवड पर्वतश्रेणीत नासिकच्या उत्तरेला साधारणपणे ४४ किमी.वर सप्तशृंगी देवी आहे. वणीची देवी सप्तश्रृंगी अनेकांची कुलदेवता आहे. वणीला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. 

प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनातील शक्ती उपासनेला विशेष महत्त्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून, या शक्तिपीठांपैकीच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजेच सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवी, असे मानले जाते. सप्तशृंगी देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला योग्य मान दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. त्यानंतर सतीचा देह हातात घेऊन श्री शंकर संहार तांडव नृत्य करू लागला आणि सगळीकडे तो फिरू लागला सतीच्या शरीराचे ५२ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५२ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली. यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहुरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी देवी हे एक अर्ध पीठ आहे. 

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहायला मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुर लेपन केलेली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते.

सप्तश्रृंगीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सह्याद्रीच्या पूर्व-पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५६९ फूट उंचीवर आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. दंडकारण्यात राम-सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. वणीच्या बाजूने ३५० पायऱ्या लागतात.या पायऱ्या गिरमाजी रायराव नाईक यांच्या कान्हेरे,रूद्राजी व कृष्णाजी या तीन मुलांनी इ. स. १७६८-६९ दरम्यान बांधल्या. त्यांनी एक गणेशकुंड व गणेशमंदिर बांधल्याचाही उल्लेख पायऱ्यावरील पाच कोरीव लेखांत मिळतो. पायऱ्याच्या चढणीवर राम, हनुमान, राधा-कृष्ण आदींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. या पायऱ्या संपल्यावर विस्तृत पठार लागते. तेथे काली, सूर्य, दत्तात्रेय आदी कुंडे असून धर्मशाळा आहे. कोळ्यांची वस्तीही आहे. पठारापासून सप्तशृंगीनिवासिनी देवीपर्यंत सु. ४७२ पायऱ्याची चढण आहे. या पायऱ्या सेनापती खंडेराव दाभाडयंच्या पत्नी उमाबाई यांनी इ. स. १७१० मध्ये बांधल्या.

शिखरावर एका पूर्वाभिमुख खडकात १८ चौ. मी. गुहावजा दालनात देवीची २· ४३ मी. उंचीची भव्य मूर्ती खडकात कोरलेली असून तिला अष्टभुजा देवी संबोधतात परंतु प्रत्यक्षात देवीला अठरा हात असून बहुतेक हातांत शस्त्रास्त्रे आहेत.  दररोज देवीच्या माथ्यावर मुकुट ठेवून तिला साडी-चोळी नेसवितात व सणासुदीला दागिने घालतात. देवी सकाळी बाला, दुपारी तरूणी व सूर्यास्ताला वृद्धा भासते अशी श्रद्धा आहे. मंदिराच्या शिखरावर एक दुर्गम सुळका असून त्यावर यात्रेच्या वेळी निशाण  लावणे, हा साहसी कार्यकम असतो व तो मान बुरी गावच्या एका वतनदार घराण्याकडे जातो. दरवर्षी चैत्र आणि अश्विन महिन्यांत येथे मोठी यात्रा भरते.

सप्तश्रृंगी देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न भासते, तर शारदीय नवरात्रात देवीचे मुख गंभीर असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की, राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय, असे मानले जाते.

नुकत्याच सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धनाने मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर आई सप्तशृंगी देवीचे मूळ रूप पहिल्यांदाच समोर आले आहे. श्री भगवतीची ही मूर्ती जवळपास १० फूट उंच व आठ फूट रूट आकारात व एकूण १८ हातांत भिन्न प्रकारातील अस्त्र व शस्त्र असून, त्यात उजव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे अक्षरमाला, कमल, बाण, खडग, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, परशू, तर डाव्या हातात (खालील बाजूकडून वरील बाजूकडे कमंडलू, पानपात्र, धनुष्य, चर्म, कालदंड शक्ती, पाष, घंटा, शेख आहे. ही शस्त्र-अस्त्र विविध देवदेवतांची प्रतीके असल्याचे म्हटले जाते. मूर्ती संवर्धनाच्या कामानंतर भगवतीच्या रूपात झालेला मोठा बदल पाहायला मिळत आहे. मूर्तीचा कायापायलट झालेला दिसून येत आहे. खरंतर मातृत्व ही परमोच्च भावना आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक अवस्थेत आपण तिच्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे म्हणूनच म्हणावेसे वाटते.. 

उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो 

उदोकारे गर्जती कार महिमा वर्णू तिचा हो.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

8668541181

⚜️ आधारवेल : क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता


हिंदुत्वाची सेवा हेच जीवनाचे ध्येय, तीच एकमेव उपासना आणि त्या उपासनेतूनच ईश्वरप्राप्ती हा सेवाभावी मार्ग स्वीकारणाऱ्या मूळच्या इंग्लंडमधील मार्गारेट, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रभावित होऊन वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी २८ जानेवारी १८८८ रोजी भारतात आल्या. कलकत्ता येथे श्रीसारदादेवी यांच्या आश्रमात त्या इतर संन्यासिनींप्रमाणे राहिल्या आणि त्यांचा जीवनक्रम त्यांनी जवळून पाहिला प्रसंगी श्रीसारदादेवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या स्त्रियांच्या अडीअडचणी त्यांनी ऐकल्या, स्त्रियांवरील अनेक परंपरा आणि रूढींची त्यांना कल्पना आली. त्याचबरोबर त्यांनी हिंदू पोथी- पुराणांचे अध्ययन केले. येथील जीवनपद्धती समजून घेऊन त्या प्रवाहात त्या यशस्वीपणे सामील झाल्या. उदार मन, अपार करुणा आणि नम्र वाणी या गुणांमुळे त्यांनी लोकांना लवकरच आपलेसे करून घेतले. याच गुणांमुळे स्वामी विवेकानंद विचारांच्या आधारवेल असणाऱ्या मार्गारेट नोबल अर्थात भगिनी निवेदिता आहे. 

हिंदू समाजातील लोकांनीही मार्गारेटला आपले म्हणावे, त्यांना ती आपल्यातलीच वाटावी म्हणून स्वामीजी त्यांच्याशी तासन्तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असत. मार्गारेट यांची ग्रहणशक्ती अलौकिक होती. स्वामी विवेकानंद ज्या ज्या ठिकाणी जात त्या त्या ठिकाणी त्यांना बरोबर नेत होते. तेथे अवलोकन करून, त्यावर विचार करून, तेथील पद्धती आत्मसात करून त्यांनी या समाज प्रवाहात सामील व्हावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. कोलकात्याच्या लोकांना आपल्या या पाश्चिमात्य शिष्याची ओळख स्वामीजींनी ‘इंग्लंडकडून भारताला मिळालेली ही एक अमोल देणगी’ अशी करून दिली होती. भगिनी निवेदिता स्वयंप्रज्ञ होत्या. जरी गुरू म्हणून स्वामीजींच्या ठायी त्यांच्या सर्व निष्ठा समर्पित असल्या, तरी भारताच्या आणि भारतीयांच्या उत्कर्षासाठी काय करता येईल, याचे त्या स्वतंत्रपणे चिंतन करीत होत्या त्यामुळेच त्यांचे योगदान केवळ सेवाकार्ये आणि महिला शिक्षण यापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांच्या बहुआयामी व्यक्तित्वाने आधुनिक भारताच्या जडणघडणीत सर्वस्पर्शी योगदान दिले आणि म्हणूनच भगिनी निवेदिता आपल्याला वंदनीय आहेत. 

कोलकात्यात निलाम्बर मुखर्जींच्या बागेतील रामकृष्ण आश्रमात मार्गारेट यांनी आपले सेवाभावी व्रत स्विकारल्यानंतर गुरूचरणी त्यांनी आपले सर्वस्व समर्पण केले. त्यावेळी त्यांना स्वामीजींनी नवीन नावाने हाक मारली ‘निवेदिता’! आणि मार्गारेट हिने आपल्या या नवीन ओळखीसह भारतात सेवा कार्याला सुरुवात केली. 'निवेदिता' अर्थात जिने आपल्या आयुष्याचाच नैवद्य दाखवला आहे, अशी ती निवेदिता.

प्लेगच्या साथीत स्वामीजी आणि इतर शिष्यांच्या बरोबरीने त्यांनी रोगग्रस्तांची सेवा केली. स्वच्छतेचे महत्त्व स्वत: हातात झाडू घेऊन रस्ते, नाल्या साफ करून त्यांनी कृतीतून दाखवून दिले. केवळ वेदांताची चर्चा करणारी ही संन्यासिनी नाही तर कर्मयोग निष्काम बुद्धीने आचरणात आणणारी आहे, हे त्यांनी दाखवून दिले. रुग्णांना त्या देवदूताप्रमाणे भासत होत्या. स्वामी  विवेकानंदांच्या कार्याचा वसा चालविणारी निवेदिता या स्वशक्ती आणि स्वसामर्थ्यावर उभ्या राहिल्या होत्या. पुढे स्वामीजींबरोबर पंजाब, काश्मीर यात्रा करून सर्वसामान्य यात्रेकरूंप्रमाणे त्या अमरनाथ यात्रेत सामील झाल्या. भारतीय संस्कृतीचा वारसा अधिक डोळसपणे जपला जावा त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाची जाण मुलींना यायला हवी होती. त्या वेळी हिंदू समाजात बालविवाह पद्धत रूढ असल्याने बालविवाहित स्त्रियांची संख्याही मोठी होती. अशा अनाथ स्त्रियांना आपल्या पायावर उभे करण्यासाठी, स्वावलंबी बनविणारे क्रियात्मक शिक्षण, उपयुक्त घरगुती उद्योग शिकविणे आवश्यक होते. आपल्या पती आणि मुलांशी संवाद साधण्यासाठी वाचन,लेखन, इतिहास, भूगोल हे सर्व शिकविणेही भाग होते. त्यातूनच कर्तबगार स्त्रिया तसेच उद्याची भावी पिढी सक्षम, बलशाली होईल यावर त्यांचे ठाम मत होते. या कन्या, गृहिणी, माता होतील तेव्हाच राष्ट्र, कर्तबगार, बलशाली होईल हे त्यांनी ओळखले होते आणि त्यातून त्या हळूहळू बदल घडवत होत्या. 

नवरात्रात कालिपूजनाच्या दिवशी निवेदितांनी आपले ‘बालिका विद्यालय’ श्रीशारदादेवीच्या हस्ते मुलींना प्रवेश देऊन चालू केले. तरुण, प्रौढ, विधवांचा प्रश्न लक्षात घेऊन पुढे थोड्याच दिवसांत त्यांना उपयोगी पडेल अशा मातृमंदिराची स्वतंत्र स्थापनाही त्यांनी केली. घरोघरी जाऊन स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचा तो काळ होता. मूलींना शाळेत पाठवा म्हणून विनवण्या कराव्या लागत; पण निवेदितांनी अखंड परिश्रम करून शाळा नावारूपास आणली. त्यासाठी त्यांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. पुढे आयुष्यभर निवेदितांनी वेगवेगळी अनेक कामे उभी केली, शाळा आणि स्त्रीशिक्षण हा त्यांच्या सर्व कार्याचा केंद्रबिंदू होता. शाळेला आर्थिक चणचण नेहमीच भासे. पैसा जमविण्यासाठी त्यांनी लेखन, व्याख्याने, प्रवचने असा विद्याव्यासंग आयुष्यभर केला. आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल अशी मदत त्यांनी कधीही स्विकारली नाही. हेनरिटा मुल्लर या बाई ख्रिश्चन कल्पनांनुसार शिक्षण दिले तर आपली सर्व संपत्ती द्यायला तयार होत्या; पण निवेदितांनी ‘कालीमातेच्या कृपेने मला काही कमी पडत नाही’, असं सांगून पैसे घ्यायला स्पष्ट नकार दिला. ‘मी हिंदू आहे आणि या माझ्या मुली आहेत.’ ही धारणा त्यांच्यात पूर्णपणे रुजलेली होती. पुराण, इतिहासातील स्फूर्तिदायक गोष्टी त्या मुलींना कायम सांगत. त्या केवळ शाळेत नव्हे तर आसपासच्या घराघरांत, व्यावसायिकांत, दुकानदारांत, नोकरदारांत आदरणीय होत्या. ‘ही आपल्याला मदतीचा हात देईल, ही आपल्या पाठीशी आहे.’ असा विश्वास सर्व जनतेच्या मनात निर्माण झाला होता आणि हे सगळं त्यांच्यावर असलेल्या स्वामींजीच्या विचारांचा प्रभाव होता.  

पुढे भगिनी निवेदिता यांनी स्वातंत्र्य चळवळीतही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी वृत्तपत्रांतून ब्रिटिशांविरुद्ध प्रखरपणे लेखन केले आणि जाहीर भाषणे दिली. वंगभंग आणि स्वदेशीच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वामी विवेकानंदांच्या त्या मानसकन्या होत्या आणि स्वामीजींच्या विचारांच्या आणि कार्याच्या आधारवेल ही होत्या. ‘भगिनी निवेदिता’ या नावाने त्या विश्वविख्यात झाल्या. परंतु मार्गारेट नोबल ते स्वामीजींची शिष्या व मानसकन्या 'भगिनी निवेदिता' हा प्रवास अत्यंत खडतर होता. १३ ऑक्टोबर १९११ ला भारतातच, दार्जिलिंगमध्ये त्यांनी देह ठेवला. आज त्यांच्या विचारांनी भारताने आपले भारतीयत्व पुन्हा एकदा समजून घेण्याची नितांत गरज आहे. भगिनी निवेदिता यांना कोटी वंदन. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळसातवी