Saturday, August 27, 2022

तेथे भजा श्रीसिद्धीविनायका असे वास..

श्रावण संपताच गणेशोत्सवाचे वेध लागतात. पोळा झाला की प्रतिपदेपासून गणपतीच्या आगमनाची चाहूल लागते.सणासुदीला उत्साहाचे वातावरण असतांना सगळीकडे गणपती आणि गौरीची लगबग बघायला मिळते आहे. महाराष्ट्र आणि दूरस्थ परदेशात ही गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. येणाऱ्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत आज आपण विदर्भातील अष्टविनायकामधील असलेल्या केळझर येथील श्री वरदविनायक अर्थात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोंत. 

खरंतर अष्टविनायक म्हटले की मोरगाव-लेण्याद्री-पाली ही पश्चिम महाराष्ट्रातली ठिकाणं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. पुराणातील एका श्लोकामुळे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थाने उलगडली गेली. यातूनच अष्टविनायक यात्रेला महत्त्व प्राप्त झाले. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ आहे. फार मोठी प्राचीन परंपरा लाभलेला हा प्रदेश आहे. महाराष्ट्रातील विदर्भ प्रांतातही श्रीगणेशाची स्थाने असून, त्यातील निवडक आठ देवस्थाने मिळून 'विदर्भातील अष्टविनायक' ही संज्ञा तयार झाली. प्रवासासाठी पुरेशा संधी नसतानाच्या काळात, प्रत्येक भागात गणपतीची देवस्थाने निर्माण झाली आणि स्थलकालसापेक्ष त्यांचा विकास होत गेला. त्यातच विदर्भातील या अष्टविनायकांचा विकास होत आहे. 

दंडक राजाची कर्तृत्वभूमी असलेल्या विदर्भाला 'दंडकारण्य' असे संबोधिले जाते. इतिहासाचा आणि प्राचीन शिलालेखांचा अभ्यास केल्यानंतर विदर्भातही वाकाटक साम्राज्याच्या काळापासून गणेशाची उपासना होत असल्याचा दाखला मिळातो. वाकाटका नंतर प्रवर्शन राजाचे केळझर  हे गांव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले राजे कोल्हापूर वरुन नागपूर ला स्थलांतरीत होण्यापूर्वी त्यांचा केळझर येथे काही काळ मुक्काम झाल्याची नोंद आहे. विदर्भ या सर्वगुणसंपन्न अशा प्रदेशातदेखील मोठय़ा प्रमाणात गणपतीची मंदिरे आणि काही देखण्या मूर्ती आजही पाहायला मिळतात. त्याची भव्यता आणि प्राचीनता लक्षात घेता आश्चर्य वाटतं आणि सहज हात जोडले जातात.  गणपतींच्या २१ महत्त्वाच्या ठिकाणांपकी बरीच ठिकाणे विदर्भात आहेत. विदर्भातले अष्टविनायकसुद्धा खास बघण्यासारखे आहेत. संपूर्ण माहिती घेत दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा सुफळ संपूर्ण होऊ शकते. 

रामायण आणि महाभारत हे प्रत्येक भारतीयाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. एकचक्रा हे नावसुद्धा पांडवांशी संबंधित आहे. बकासुर नावाच्या राक्षसाचा भीमाने वध केला आणि याच एकचक्रा गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडीतून सुटका केल्याची दंतकथा सर्वपरिचित आहे. नागपूर-वर्धा रस्त्यावर सुमारे २५ कि.मी. अंतरावर केळझर किल्ला आहे. या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे. स्थानिक नागरिक याला पांडवकालीन गणेशस्थान असेही म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे. अर्थातच या गणेशालासुद्धा एकचक्रागणेश असे नाव प्रचलित आहे.  

केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला एक पुष्कर्णी आहे. ही पुष्कर्णी चौकोनी असून दगडांनी भक्कम बांधलेली आहे. विहिरीतील पाण्यापर्यंत जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधून काढल्या आहेत. रस्त्याच्या दक्षिणेकडे एक तलाव आहे. या तलावात बाहुबलीची काळ्या दगडाची एक मूर्ती सापडली होती. आजही ही मूर्ती बघायला मिळते. गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला काही भाविक सिद्धिविनायक असे म्हणतात.

एकचक्रा नावाचे अजून एक गाव पश्चिम बंगालमध्ये असून पांडवांनी बकासुराचा वध त्याच एकचक्रानगरीमध्ये केला असेही सांगितले जाते. वसिष्ठपुराण तसेच महाभारत यांमध्ये या मंदिराचे महत्त्व उल्लेखित आहे. दोन्ही धर्मग्रंथांमध्ये केेळझर गांवाचे नांव ‘एकचक्र नगर’ असल्याचा उल्लेख आढळतो. केळझर येथे काहीकाळ वसिष्ठऋषींचे वास्तव्य होते. वसिष्ठांनी भक्ती आणि पूजा यांकरिता या गणेशमूर्तीची स्थापना केल्याचा उल्लेखही आहे. त्याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो. वसिष्ठ पुराणाप्रमाणे या गणपतीचे नांव ‘वरद विनायक’ असून वर्धा नदीचे ‘वरदा’ हे नांव आहे. हा काळ प्रभु श्रीरामचंद्रांच्या जन्माच्या पूर्वीचा असून त्यांच्या जन्मानंतर वसिष्ठऋषींनी येथील वास्तव्य सोडले असेही काहीजण सांगतात. 

केळझर स्थित वरद विनायक अर्थात सिद्धिविनायक श्री गणेशमूर्ती १.४० मीटर उंच असून तिचा व्यास ४.४० मीटर आहे. ही मूर्ती अत्यंत मनमोहक आणि जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. या श्री गणेशाची स्थापना पांडवांनीच केली असे गणेशकोषात नोंद आहे. मूर्ती उजव्या सोंडेची असून गणेशाला शेंदूर लेपन केल्या जाते. त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून येणारे आहे. मंदिर परिसरात गणेशकुंड आहे. गणेशकुंडाची बांधणी दगडी चिर्‍यातील आहे. हा परिसर चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेला असून पावसाळ्यात हिरव्या कंच वनराईने तो अधिकच फुलून दिसतो. गावाच्या खोदकामात गंडकी पाषाणाच्या विष्णू मूर्तीसह अशोकचंद्र असलेला दगडही मिळाला आहे. येथील तलावात अनेक प्राचीन मूर्ती मिळाल्या आहेत. याशिवाय प्राचीन शिवपिंड सुद्धा आहे. १९९४ साली मंदिराचा जिर्णोद्धार करत असतांना पाण्याची गरज भासली तेव्हा मंदिर परिसरात उत्खनन करण्यात आलं. उत्खनन सुरु असतांना काही पुरातन मूर्ती आढळून आल्या. महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा उत्खननात मिळाली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे.

केळझर येथील वरद विनायक मंदिर विदर्भातील अष्टगणेशांपैकी एक आहे. मनाला शांती, सुख देणारा विघ्नहर्ता गणपती, अर्थात आपला सगळ्यांचा लाडका बाप्पा. जन्मोजन्मी त्याचा सहवास असाच लाभावा आणि त्याच्या सेवेत सदैव आपल्याला रममाण होता यावे एवढेंच त्याच्याकडे मागणे आहे. येणाऱ्या गणेशोत्सवासाठी आनंदी वातावरण करत, मनाची मरगळ दूर करत प्रसन्नतेची पहाट अखिल विश्वावर होऊ दे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 


Thursday, August 25, 2022

परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा - मारबत !!

परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा - मारबत !! 

‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’.....

'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच बघायला मिळतो. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरने १३८ आणि १४२ वर्षांपासून चालत आलेल्या या ऐतिहासिक वारशाचं जतन केलं आहे. बडग्या - मारबत या परंपरेमुळे नागपूरला ऐतिहासिक अशी ओळख मिळाली आहे. लहानपणापासून बडकस चौकात जाऊन मारबत बघतांना कायमच आनंद मिळत होता. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी मारबत निघायची आणि ती बघण्याचा योग अनेक वर्षे आला. खरंतर या काळात पावसामुळे रोगराई वाढलेली असते त्यामुळे साधारणत: दरवर्षीच ‘ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत’ अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. 

मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे असावा असे वाटते आणि ही मारबत बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातून पण अनेकजण येतात. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. जुन्या नागपूर भागात ही परंपरा आजही बघायला मिळते. काळी मारबत १३८ वर्षांपासून चालू आहे. या काळ्या मारबतीचा संबंध महाभारतकाळाशीही जोडल्या जातो. पुतना मावशीचे रूप धारण करून भगवान कृष्णाला मारण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णाच्या हातून तिचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी तिची धिंड अर्थात मारबत काढली आणि गावाबाहेर तिला जाळले. यामुळे गावावर पुन्हा कधीही समस्या, संकटे आली नाहीत, अशी आख्यायिका आहे. याच संदर्भाने नागपुरातही काळी - पिवळी  मारबत काढण्यात येते. या मारबतींना शहराच्या बाहेर जाळल्याने शहरातील कुरीती आणि संकटे संपतात, अशी मान्यता आहे. 

अशी ही कथा आहे की, इंग्रजी राजवटीत जनता त्रस्त होती. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी तसेच देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी सत्याग्रहींच्या गुप्त बैठकांसाठी १८८५ मध्ये जागनाथ बुधवारी परिसरात तऱ्हाणे तेली समाज बांधवांनी पिवळी मारबत उत्सव कमिटीची स्थापना केली. त्यावेळी दिवंगत आप्पाजी व बटानजी भाऊ खोपडे यांनी बांबुच्या कमच्या व कागद लावून ३ ते ४ फूट उंचीची बाहुलीसारखी मारबत तयार करून लोकांच्या मदतीने शहरात तिची मिरवणूक काढली आणि हा ऐतिहासिक उत्सव सुरू झाला. 

डॉ भालचंद्र अंधारे यांच्या नुसार बाकाबाईच्या मृत्यूनंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे १८८५ मध्ये तऱ्हाने तेली समाजाकडून मारबत उत्सव सुरू झाला आहे. मग बाकाबाईचा संबंध मारबत मिरवणुकीशी कसा काय ? तर त्याचे कारण असे की श्रावण अमावस्या शके १७८० म्हणजेच ७ सप्टेंबर १८५८ रोजी श्रीमंत बाकाबाईसाहेब भोसले यांचे निधन झाले आणि त्यादिवशी मोठा पोळा होता. ८ सप्टेंबर १८५८ रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी श्रीमंत बाकाबाई यांची अंत्ययात्रा निघाली होती आणि श्रीमंत बाकाबाई यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि त्याचा निषेध म्हणून पुढे मारबत मिरवणुकीचा संबंध श्रीमंत महाराणी बाकाबाई साहेबांशी जोडला गेला आणि तो आजतागायत कायम आहे. 

या मध्ये काळी व पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. चार दिवस तिची विधिवत स्थापना केली जाते. लहान मोठे सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने होतात. महाप्रसादाचे आयोजन केले जाते आणि तान्ह्या पोळ्याच्या दिवशी यांची मिरवणूक काढली जाते. आणि दहन केले जाते. लहान मोठे सगळेजण मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा उभे राहून मारबत व बडग्या बघतात. या दिवशी नागपूर व जवळपासच्या गाव-खेडयातील लोकं नागपूरला आपल्या लहानग्यांना घेउन येतात. आज या शेकडो वर्षांच्या परंपरेला टिकवून आपल्या नागपूरची ओळख आणि वेगळेपण आजही टिकून आहे आणि आज संध्याकाळी हे बघून आल्यावर तेथील सगळा एकंदरीत माहोल बघितल्यावर जाणवले की हे नक्की टिकून राहणार आहे. ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा अनेकांना कळावा यासाठी हे लेखन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#मारबत #परंपरा

Saturday, August 20, 2022

देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।

श्रावण महिन्यातील पौर्णिमेनंतर सर्वांना वेध लागतात, ते गोकुळाष्टमीचे. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला सगळीकडे आनंदात कृष्ण जन्माचा सोहळा पार पडला. प्राचीन आणि ऐतिहासिक संस्कृती हे आपल्याला मिळालेलं वैभव आहे. याच जन्माष्टमीचे औचित्य साधत प्राचीन मंदिराची साक्ष देत आजही दिमाखात उभे असलेल्या रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात आज आपण दर्शनार्थ जाणार आहोत. 

नागपूर शहराचा इतिहास, श्रीमंत राजे भोसले राजवंश व गोंड राजवंश यांच्या भोवतीचा आहे. या उभय राजवंशांनी नागपूरचे वैभव उभे केले होते. त्यातही विशेषतः द्वितीय रघुजी भोसले महाराजांच्या कारकीर्दीत नागपूरचा दर्जा सुशोभित अशा दिल्ली शहरासारखा होता. त्यावेळी बाग-बगीचे, पेठा, राजवाडे, मंदिर, मठ, स्थापत्य, स्मारक, स्तंभ यांच्या उभारणीची त्यांनी झपाट्याने सुरुवात केली होती. त्यातील त्यांनी बांधलेली मंदिर आजही या सगळ्या वैभवाची साक्ष देत उभे आहे. 

खरंतर श्रीमंत भोसले यांचे मंदिरस्थापत्य हा एक स्वतंत्र विषय आहे. पण त्यालाही मर्यादा आहे. नागपूर शहरातील भोसल्यांनी बांधलेल्या या मंदिरात भोंडा महादेव, पार्डीचे श्रीकृष्ण मंदिर, सोनेगावचे मधुसूदन मंदिर, सक्करदऱ्याचे श्रीलक्ष्मीनारायण मंदिर, महालातील असंख्य मंदिरे यांचा समावेश होतो. या सर्व मंदिराच्या स्थापत्याचा मुकुटमणी ठरावे असे महालातील श्रीरुक्मिणी मंदिर आहे. हे मंदिर डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. महालातील अनेक मंदिरात मंदिर स्थापत्याचे जाणकार श्रीपाद चितळे सरांसोबत जाणे आणि ते समजून घेणे म्हणजे पर्वणी असायची. हे ही मंदिर सरांसोबत बघितले आणि कायमच तिथे जाण्याची ओढ निर्माण झाली. शुक्रवार दरवाजा ते बॅ. अभ्यंकर पुतळ्याच्या मधोमध ही स्थापत्यकृती आहे, प्रवेशद्वार कमानी असून त्याकाळी बाजूच्या ओट्यावर द्वारपाल असत. त्यात हे मंदिरे आपल्या पूर्ण वैभवाने ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता आजही दिमाखात उभी आहेत. 

नागपूरमधील हे मंदिर म्हणजे स्थापत्यकृती, शिल्पप्रतिमा व सुशोभन यांचा परमोच्च बिंदू आहे. श्रीमंत राजे भोसल्यांनी साधारणपणे काही वर्षांपूर्वी ओरिसा, छत्तीसगड, बिहार व बंगाल जिंकला. साहजिकच तेथील कारागीर, शिल्पकार, मूर्ती कोरणारे स्थापती, तंत्रज्ञ, देवळे बांधणारे त्यावेळी नागपूरला आले. आणि  स्वाभाविकच नागपूरच्या अनेक मंदिर स्थापत्यावर ओरिसा छत्तीसगड स्थापत्याचा प्रभाव जाणवतो. श्रीरुक्मिणी मंदिर असेच आहे. श्रीमंत राजे भोसले यांच्या राजवाड्यास अगदी लागून असलेले हे मंदिर आहे. महाराष्ट्राच्या शिल्प परंपरेपेक्षा वेगळे स्थान असलेल्या श्रीरुक्मिणी मंदिरात संगमरवराचा गरुड मंडप असून त्यावर राजस्थानच्या कारागिरांचा प्रभाव जाणवतो. किंबहुना सर्व भारतात ही भोसले शैली म्हणून सर्वत्र ओळखली जाते. इ. स.१७८० ते १८०२ साली ही मंदिरे उभारलेली आहेत. श्रीमंत भोसलेंच्या काळात, चित्ताकर्षकता, विलोभनीयता व नेत्रदीपकता हे खास यांचे वैशिष्ट्य होते.  

नागपूरातील वास्तुकलेचे वेगळेपण म्हणजे दगडी बांधणी असलेली ही मंदिरे अनेक प्रकारच्या जाळीदार नक्षीने सुशोभित अशी आहेत. या मंदिरात काष्ठांचे काम पण भरपूर आहे, दोन्ही मंदिरांना भव्य प्रशस्त असा लाकडी सभामंडप असून गाभारा हे मुख्य मंदिराचे भाग ठरतात. नागपूरची मंदिरे सपाट छताची असून वर त्यांना गच्ची असते. गच्चीच्या सभोवताल सुरेख आणि मजबूत कठडा असतो. येथील सज्जा तर असा झोकदार आहे की पावसाचे पाणी क्षणभरही साचून रहात नाही. पानपट्टी नक्षीदार असून लाकडी पट्ट्यांचे तोरण म्हणजे एक नजाकत आहे व ती २००-२५० वर्षांपासून टिकून आहे. कठड्याखाली खास मराठी शैलीचे उमललेल्या कमळ कळ्या आणि केळी खांबाची नक्षी आढळते. सभामंडपाचा दगडी तळ गुळगुळीत आहे. नक्षीदार कमानींनी सभामंडपास नजाकत आणलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याचा आकार चौकोनी, शिखरांची रचना वर निमुळती होत जाते. मंदिराच्या बाहेरील भागात ओरिसाप्रमाणे मंदीर शिखरांच्या प्रतिकृती असून रचना भूमीज किंवा नागर वास्तुशिल्पकला परंपरेप्रमाणे आहे.

शिखरांच्या चारही कोनांवर रथ किंवा कलशापर्यंत उभे जाणारे पट्टे आहेत आणि त्यामुळे अक्षरशः प्रस्तरशिल्पांची अप्रतिम अशी रचना येथे बघायला मिळते. शिखरांच्या भोवताल छोट्या प्रतिकृती त्यावर चिन्हांकित आहेत. सिंह, व्याघ्र वर्गातील प्राणी यावर हुबेहूब कोरलेले दिसतात. या पट्ट्यावर उपशिखरांची योजना आहे. त्यावर उंच टोकदार खास नागपूरी शिखर आणि त्यावर राजाने मढविलेले धातूचे तबक व त्याची धातुशिल्पे, पाहतच राहावे असे आहे. 

वरच्या जाळीदार झरोक्यातून सरळ शिवलिंगाचे दर्शन होते. वास्तुकलेची ही सोय एकमेवाद्वितीय आहे. मंदिरासमोर दगडी जाळीच्या संगमरवरी खिडक्या, उलट्या कमलपुष्पासारखे शिखर असलेला सुरेख व टुमदार राजस्थानी थाटाचा गरुड मंडप पाहातच राहावा असा आहे. त्यात श्री नासिकाग्र मुद्रेचा टोकदार गरुड म्हणजे एक दिव्य अनुभवच आहे. मंडपात वर चढण्यास पायऱ्या असून चारीही बाजूस कठडे आहेत. मंडपाचा आकार चौकानी असून सभोवताल सज्जा आहे. त्यावर कमळ कलिकांची खास मराठा शैलीतील महिरप असून ती देखील सुशोभित आहे. उंच उंच होत जाणारी ही मंदिर मालिका म्हणजे श्रीमंत भोसल्यांनी भारतीय शिल्प परंपरेवर केलेले खूप मोठे स्थापत्य उपकारच ठरतात.

मंदिराच्या बाहेरील बाजूस भारतीय शिल्पविषयानुरुप रामायण, महाभारत, वाली-सुग्रीव युद्ध, श्रीकृष्णलीला, भागवत, अप्सरा, यक्ष, गंधर्व, किन्नर, देवी-देवता, व्याल, पुराणकथा, पौराणिक मिथक, राम-रावण युद्ध, शिवतांडव, प्रत्यक्ष मानवाकृती, त्यांच्या केशभूषा, वेशभूषा, पोषाख, अलंकार, दागिने, वस्त्रप्रावरणे, फेटे, पगड्या, अंगरखे, या सर्व शिल्पांवरून श्रीमंत भोसले काळातील नागपूर ची संपूर्ण साक्ष पटते. गाभाऱ्यात शिवपिंड व धातूचा नाग आहे. सभामंडपात चढण्यास उंच पायऱ्या असून काष्ठमंडपातील हळूहळू एकेक शिल्प पाहात त्याचा सौंदर्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास करत मन तृप्त होईपर्यंत हे वैभव लुटतच राहावे, असेच आहे. देवळास अष्टकोनी विहीर असून ती काळ्या दगडांनी बांधलेली आहे. अनेक वर्षे राजांनी फत्तेसिंह महाराज, जयसिंह महाराज, अजितसिंह महाराज, लक्ष्मणराव, रघुजी चतुर्थ आणि आजचे हयात राजे तृतीय मुधोजी व पंचम रघुजी व राजपुत्र येथे वेळोवेळी येत असत. महाल भागातील असलेले हे श्रीरुक्मिणी मंदीर म्हणजे पूर्ण शिल्प विकसित प्रस्तर काव्य आहे, असेच म्हणावेसे वाटते. एकदा तरी हे वैभव प्रत्यक्षात बघावे असेच आहे.

सर्वेश फडणवीस 


Saturday, August 13, 2022

प्रियम् शंकरम् सर्वनाथम् भजामि..

भारतात सर्वाधिक पूजला जाणारा देव म्हणजे महादेव. त्यांच्या लीला अगाध आहेत. वेदातील रुद्र म्हणजे पुराणातील शिव आहे. आणि याच रुद्राष्टकात तुलसीदासजी म्हणतात, 'प्रियम् शंकरम् सर्वनाथम् भजामि..' खरंतर भारतात शिव या देवतेचे असंख्य भक्त आहेत. इतर कोणत्याही देवतेपेक्षा शिव हा अधिक लोकप्रिय आहे. शिवपुराण, अग्निपुराण, यांतून याची अधिक महती कळते. श्रावणात सर्वत्र शिवाची मनोभावे पूजा केली जाते. याच श्रावण महिन्याचे औचित्य साधत आपण विदर्भातील रामटेक जिल्ह्यातील नगरधन येथील श्रीकोटेश्वर शिवलिंगाच्या दर्शनार्थ जाणार आहोत. 

सध्या या लेखमालेत आपण प्राचीन मंदिराचा आढावा घेतो आहे.  अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरातील गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जाऊन आलो आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक जवळील नंदीवर्धन अर्थात नगरधनच्या श्रीकोटेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आज जाणार आहोत. हे मंदिर फार पुरातन आहे. साधारणपणे इसवीसनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातील हे मंदिर असावे कारण विदर्भ आणि मध्यभारताचे सम्राट वाकाटक राजवंशाचा इतिहास या श्रीकोटेश्वर मंदिरात आजही बघायला मिळतो आहे. महापराक्रमी, बलवान, प्रजाहित दक्ष आणि सर्वधर्मसमभावी वाकाटक राजवंश म्हणजे विदर्भाची खरी ओळख आहे. वाकाटकांच्या राजवंशाच्या अनेक खुणा आजही या भागात आपल्याला बघायला मिळतात. 

वाकाटकांची प्राचीन राजधानी नंदीवर्धन अर्थात आताचे नगरधन असून हे रामटेकपासून अवघ्या ४ किमी. अंतरावर आहे. रामटेकपासून दक्षिण दिशेस हे छोटेसे गाव डांबरी रस्त्याने जोडले गेले असून तेथे रामटेक, नागपूर, भंडाऱ्याहून बसने जाता येते. याच गावात श्रीकोटेश्वर नावाचे अति प्राचीन ऐतिहासिक शिवालय बघण्यासारखे आहे. हेच प्राचीन अर्वाचीन श्रीकोटेश्वर मंदिर आहे. नंदीवर्धन अर्थात नगरधन राजधानीतून वाकाटकांनी अवघ्या महाराष्ट्र, विदर्भ, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर स्वतःचे राज्य केले. सम्राट समुद्रगुप्ताची नात व चंद्रगुप्त द्वितीय यांची कन्या प्रभावती नंदीवर्धन राजाच्या राजपुत्राची रुद्रसेनाची अग्रमहिषी (पट्टराणी) होती. उत्तरेत अर्थात उत्तरभारतात गुप्त राजे, तर दक्षिणेत वाकाटक सम्राट होते. 

कोटेश्वर गाव तसे छोटेसेच कमी लोकवस्तीचे आहे. मंदिराच्या दिशेने जातांना आजूबाजूला दुकाने, घरे, गोठे, गोदाम आणि पाटलांचे वाडे, असून त्यात पश्चिमेच्या शिवारात श्रीकोटेश्वराचे मंदीर दिमाखात  उभे आहे. श्री शिव कोटेश्वराचे मंदिर हेमांडपंथी मंदिर असून स्तंभ चतुर्भुजांकित आहेत. अंतराळ मात्र थोडे छोटे पण गर्भगृहात सुंदर शाळंकित शिवलिंग असून मध्यभागी त्या लिंगात खोल पोकळी आहे. या मंदिराची तीच विशेषता आहे. खरंतर ती पोकळी का आहे?  त्याची पण एक कथा आहे. या गावातील एक गवळण इतर पंचक्रोशीतल्या गावात दूध वाटायची. पण दुग्ध वाटपाआधी ती प्रथम या महादेवाच्या पिंडीस अभिषेक करायची. तिला घरी परतायला विलंब होई. त्यामुळे तिच्या अज्ञानी पतीराजाने मनात शंका धरली आणि तो आपल्या पतिव्रता पत्नीचा पाठलाग करू लागला. देवळाजवळ येऊन, आता पत्नीला मारणार एवढ्यात पत्नीने या महादेवाला साकडे घातले. देवाधिदेव महादेव वाचव अशी गर्जना तिने केली आणि लगेच शिवलिंग भग्न पावले. त्या पवित्र पतिव्रतेस या महादेवांनी आपल्या पोटात घेतले. अर्थात ते भग्न शिवलिंग तसेच राहिले. पतीराज पुढे गावात आले. 'गवळण मात्र शिवलोकात पोहचली. तिच्या पतिव्रत्यास नगरधनच्या रहिवाशाचा विनम्र प्रणाम आहे. ही दंतकथा येथील लोकांना आजही मुखोद्गत आहे. 

या शिवलिंगावर अष्टकोनी छत असून शिव पिंडीवर सतत दुग्धाभिषेक सुरू असतो. स्तंभ, छत, गणेशद्वार, प्रदक्षिणामार्ग, अवकाश, वितान, गवाक्ष सारेच प्रमाणबद्ध आहे. सभामंडपावर सपाट छत तर गर्भगृहात ऊर्ध्वगामी शिखर म्हणजे मंदिराची रचना आहे. इ.स.च्या चौथ्या शतकापासून बदलत बदलत वाकाटक राजवंश, राष्ट्रकूट राजवंश, परमार, यादव व पुढे गोंड, भोसले असे त्याचे आजचे स्वरूप संमिश्र आहे. मंदिराच्या आजूबाजूस प्रशस्त जागा आहे, भक्तनिवास असून महान तपस्व्यांच्या नाथ संप्रदायी मंडळींच्या नाम समाध्या आपल्याला मंदिराच्या उत्तरेस दिसतात.

पिंपळाखाली अनेक दगडी प्रतिमा आजही काळपट दाखवितात. शिव, गौरी, गणेश, हनुमंत, यक्ष, योगी यांच्या भग्न मूर्त्या असून केवळ नृसिंहाची (एकटा नृसिंह) छोटीशी शेंदूरलिंपीत प्रतिमा मात्र पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेकच्या, श्रीकेवलनृसिंह श्रीरुद्रनृसिंह प्रतिमा सारखीच ही पण छोटीशी आणि देखणी मूर्ती आहे. म्हणजेच केवळ नृसिंह मूर्तीचे पूजन जवळपास १००० वर्षे सुरू असले पाहिजे. या मंदिराच्या बाजूला सुंदर जलाशय असून त्यात कमळपुष्प डोलत असतात, पाणी स्फटिक शुभ्र, पण वृक्षांच्या सावल्या पडल्याने काळे भासते. बाजूला भक्कम तटबंदी, स्वयंपाकाची सोय, भांडीकुंडी, जलव्यवस्था सर्व उत्तम आहे. समोरचा दर्शनीय भाग अर्वाचीन अर्थात थोड्याफार प्रमाणात मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे पण प्रत्यक्ष मंदिर अतिप्राचीन आहे. अशा या श्रीकोटेश्वर अर्थात कोटे असलेला शिव म्हणजे तटबंदी युक्त शिवाचे दर्शन प्रत्यक्षात एकदा जाऊन बघण्यासारखे आहे. 

सर्वेश फडणवीस 


देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें ॥


आज या माध्यमातून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा बघितला आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक जागरूक झाली आहे हे जाणवले. अमृत महोत्सवी वर्षात "राष्ट्र प्रथम" ही भावना मनामनात रुजली आणि येणाऱ्या शतक महोत्सवात भारत नक्कीच जगाला दिशा देणारा असेल हे आपुसक वाटले. शक, हुण आदी राजांना परास्त केलेला, मुस्लिम राज्यकर्त्यांचा जाचाला कधी असंघटितपणे तर कधी संघटित होऊन ध्वस्त करणारा आपला भारतवर्ष मधुमंत्रित विषास बळी पडला आणि देश इंग्रजांच्या अधिपत्याखाली परतंत्र झाला. १८५७ ते १९४७ या काळात नानाविध वैचारिक कृतीमय क्रांतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ज्ञान विज्ञानाचे माहेर असणाऱ्या भारतभूमीत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यसूर्य उगवला. अगणित क्रांतिकारक स्वातंत्र्यसेनानींच्या सार्थक आहुतींनी मांडलेला हा स्वातंत्र्य यज्ञ फलश्रुत झाला. दहादिशा लक्ष्यपूर्तीच्या अमृतानंदाने उजळल्या. गेली पंच्यातर वर्षे आपण याच स्मृतींना उजाळा देत मोठ्या जल्लोषात १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो. 

त्याच भावनावेगात सहज मनात येऊन गेलं, की स्वातंत्र्यपूर्व काळातील ती जिद्द,'मी देशासाठी काम केलं पाहिजे', अशी मनात उठणारी ऊर्मी आजही अस्तित्वात आहे का ? विचारांती हो असं लगेच उत्तरही मिळालं. आपल्या तीनही सशस्त्र दलाचे जवान ! कधी नैसर्गिक रचना, कधी तांत्रिक त्रुटी पण सैनिकांचा कर्तव्यावरचा विश्वास कधीच ढळत नाही. माझी एकेक कृती फक्त भारतरक्षणार्थ असेल ही जिद्द त्यांच्याकडे बघतांना सतत अनुभवायला मिळते. हाच अनुभव मोठ मोठ्या पगारांच्या नोकऱ्या नाकारून भारतास शस्त्र, शास्त्र विषयात स्वयंभू बनवण्याचे वेड धारण करणाऱ्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या संदर्भातही आहेत. या सगळ्यांची या भारताविषयीची तळमळ बघितली की आपण निरुत्तर होतो. आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या माणसाना भेटलो आहे की देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची जिद्द बघितली की अभिमान आणि हेवा वाटतो. व त्यांच्या कार्यप्रति नकळतपणे हात जोडले जातात. 

खरंतर विचारांची शृंखला तुटते जेंव्हा समोर येते सर्व सुखसोई उपभोगणारी, सुरक्षित जीवन जगणारी आणि तरीही या ना त्या कारणाने स्वातंत्र्य कसे उपभोगता येत नाही, याचाच शंख करणारी सामान्य माणसाची प्रतिमा. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणे असा सोईस्कर अर्थ ठरवून मोकळी झालेली आजची आपली पिढी आहे. आज भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण करून शताब्दी कडे वाटचाल करणाऱ्या स्वातंत्र्याची अधोरेखित होत चाललेली ही व्याख्या बदलण्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो का ?

हक्कांसाठी सतत हपापलेल्या पण कर्तव्यांना सोईस्करपणे डावलणाऱ्या आजच्या जनमानसात आम्हाला स्वैराचार नकोय आम्ही स्वनियमनांनी तयार केलेले तंत्र विकसित करु इच्छितो, ज्यायोगे समाजहित, पर्यायाने देशहित जोपासले जाईल. असे रुजवण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस आपण करु या का ?

हजारो कृती, उदाहरणं म्हणून देता येतील. असे वैयक्तिक, सामूहिक नियम आपण करु शकतो, पण आजच्या दिवसापासून सुरुवात म्हणून एक नियम करु या. देव, देश, धर्म याच्यासाठी मी सदैव कार्य तत्पर असेल. सीमेवरील कठीण आणि नैसर्गिक परिस्थितीतही पाय रोऊन उभारलेल्या भारतीय सैन्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने मी त्यांच्याप्रती सदैव आत्मीयता बाळगेन. चला स्वातंत्र्याची खरी व्याख्या रुजवण्याचा संकल्प करत जुन्याच उत्साहाने पण नव्या उमेदीने स्वातंत्र्यदिनानिमित्त होत असलेल्या ध्वजवंदनात सहभागी होऊयात. 

औरों का भी हित हो जिसमें, हम ऐसा कुछ करना सीखें ।
देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखें ॥

सर्वेश

Friday, August 12, 2022

आधुनिक भारताचे शिलेदार :. विक्रम अंबालाल साराभाई


आधुनिक भारताचे शिलेदार :. विक्रम अंबालाल साराभाई

१२ ऑगस्ट १९१९ - ३० डिसेंबर १९७१

जन्मस्थान-अहमदाबाद (गुजरात)

भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार

विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बर्‍याच राजकीय व्यक्तींशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर,जवाहरलाल नेहरू,महात्मा गांधी ह्यांसारखी मातब्बर मंडळी त्यांच्या घरी येत असे आणि पुढे शिक्षण घेत असताना डॉ.विक्रम साराभाईं ह्यांना रवींद्रनाथ टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली,सूचना दिल्या,मार्गदर्शन केलं आहे.

विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. विक्रम साराभाई ह्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची त्यांना आवड होती.आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटोपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही.रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४७ साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.

ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ.विक्रम साराभाई यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आज अवकाश क्षेत्रात भारत उंच भरारी घेत असताना,ज्या संस्था हे यश मिळवत आहेत त्यातील अग्रगण्य भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी १९५० च्या दशकातच सुरुवात केली होती.

२१ नोव्हेंबर १९६५ हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस आहे कारण याच दिवशी डॉ.विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नातून भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं. केरळ मधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आलं होतं. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरं जावं लागलं. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्र संघाने  पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं. आज हे केंद्र 'डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर' म्हणून ओळखलं जातं. तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार कोरण्यात आला आहे -

"आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत."

नुकताच मागच्या वर्षी चंद्रयान २ मोहीम झाली. भारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेत 'विक्रम' या मून लँडरशी इस्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. या लँडरला 'विक्रम' हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं. ATIRA ची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL,UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आज डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या  जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे. डॉ.विक्रम साराभाईंचा प्रवास हा आम्हाला प्रेरणा देणारा असाच आहे. येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यन्त असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जे आधुनिक भारताचे शिलेदार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉ. विक्रम साराभाई छान लिहितात," He who can listen to music in the midst of noise can achieve great thing."

माहिती स्त्रोत - Builders of Modern India

✍️ सर्वेश फडणवीस

#builders  #ModernIndia #Repost

Sunday, August 7, 2022

तुजवीण शंभो मज कोण तारी..

चातुर्मास म्हणजे केवळ भरपूर सण, व्रतवैकल्य असे नसून, त्याचा संबंध अपआपल्या जीवनशैलीशी संबंधित आहे. ऋतुचक्राशी निगडीत असणारे हे सण आणि संपूर्ण व्रत वैकल्य एकूणच सात्त्विकतेशी जोडलेले आहेत. आषाढ महिन्यातील निसर्गाचे रौद्र रूप धडकी भरविणारे असते आणि या रौद्ररुपाला शांत होण्याचे साकडे घालण्यासाठी श्रावणात शिवपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. त्यामुळेच श्रावण हा शिवपूजन, उपासना, नामस्मरण, आराधना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोंत त्याबद्दल आपल्याला कायम अभिमानच वाटायला हवा.

याच श्रावणात शिव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी रीघ लागते. श्रावणात केलेला जलाभिषेक, रुद्राभिषेक अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या महाराष्ट्रातही अनेक शिव मंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहे. अशाच विदर्भातील नागपूर शहरातील प्राचीन भोंडा महादेव मंदिरातील गाभाऱ्यात आज आपण दर्शनार्थ जाणार आहोत. खरंतर वास्तुकलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे भोंडा महादेव मंदिर आहे.

भारतीय वास्तुकला ही कायमच जगमान्य आकर्षण ठरली आहे, वास्तूंना आकर्षक बनविण्यात आपल्या शिल्पकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. शिल्प कलेबद्दल बोलायचे झाल्यास भारताचा इतिहास हा सर्वात जास्त शिल्पकलेने नटल्या सारखा वाटतो. असंच हे भोंडा महादेव मंदिर अतिशय देखण्या रुपात आजही बघायला मिळते. हे भगवान शिवाचं एक प्राचीन मंदिर आहे . याला "मुंडा देव" असेही म्हणतात. नागपूर शहराच्या अगदी मधोमध हे प्राचीन मंदिर असून सुद्धा खूप कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे. मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करता क्षणी शिवस्तुतीतील पहिला श्लोक ओठावर आला,  

कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।

कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥

श्री भोंडा महादेव मंदिराच्या प्रवेश द्वारावरच नंदीची भव्य मूर्ती आहे. या मंदिराचे बांधकाम लहान असले, तरी मंदिर आणि मंदिराचा परिसर अतिशय आकर्षक आहे. मंदिरात इतके कोरीव काम आहे की, छत्रपती शिवाजी निवर्तले आणि त्यानंतर २०-२५ वर्षांनी छत्रपतींचे सरदार होळकर, शिंदे, भोसले, गायकवाड, पवार, इंगळे हे मुलुखगिरी करण्यास अनुक्रमे इंदूर, ग्वाल्हेर, नागपूर, बडोदा, पुणे परिसर, नर्मदा-धारकडे निघाले, कर वसूल करून पुण्याचा खजिना वाढवू लागले. नागपूरात प्रथम रघुजी राजे भोसल्यांनी भीम पराक्रम करून छत्रपतींचा झेंडा पार कटकपर्यंत पोहचवला. अवघा बंगाल, छत्तीसगड, बस्तर, उत्कल सर्व प्रांत रघुजींच्या पराक्रमाने दुमदुमून गेला होता. त्यांचा नातू द्वितीय रघुजी भोसले महाराजांनी आधुनिक नागपूरची मुहूर्तमेढ केली. बगीचे तयार केले. मंदिरे बांधली, राजवाडे पाडून महाल बांधले आणि नागपूरचे आजचे स्वरूप द्वितीय रघुजींच्या काळाचे आहे. अंबाझरी, तेलंगखेडी, कल्याणेश्वर, जागेश्वर, पाताळेश्वर, लक्ष्मीनारायण मंदिर, वेणुगोपाळमंदिर, श्रीकृष्ण मंदिर ही सर्व मंदिरे नागपूरचे राजे द्वितीय रघुजींच्या काळात निर्माण झाली. 

या सर्व मंदिरांचा मुकुटमणी ठरावे असे चित्ताकर्षक, नेत्रदीपक अत्यंत सुंदर व सुबक शिल्पांनी नटलेले मात्र अर्धवट राहिलेले मंदिर म्हणजे आपल्या सीताबर्डीवरील भोंडा महादेव मंदिर आहे. खरंतर सीताबर्डी नाव कसे पडले? तर या टेकडीच्या आधाराने दोन गवळी भाऊ  इ.स. च्या १५ व्या शतकात आपले पशुधन घेऊन आले. त्यांची नावे होती सितलप्रसाद व बद्रीप्रसाद आणि त्यांच्या नावावरून सितलाबद्री-सीतलबद्री-सिताबद्री-सीताबर्डी असे नाव प्रचलित झाले आहे. 

हात नसलेल्या व्यक्तीला आपण भोंडा म्हणतो. तसेच आज या मंदिराचे  केवळ गर्भगृहच शिल्लक आहे. याला सभामंडप नाही, स्तंभ स्थापत्य नाही, म्हणून या मंदिरास भोंडा मंदिर म्हणतात. या मंदिराचे वर्णन असे आहे की संपूर्ण मंदिर लालसर प्रस्तरतेचे असून दगडांच्या शिल्पाने ते नखशिखांत कोरलेले आहे. एक इंचही जागा रिकामी नाही इतकी सुंदर शिल्पाकृती मंदिराच्या आत आणि बाहेर कोरलेली आहे. या मंदिराच्या प्रत्येक भागात शिल्प, शिल्प आणि शिल्पच आहे.  त्या शिल्पाचे प्रकार तरी किती? रामायण, महाभारत, शिवप्रताप, ब्रह्मदेव, श्रीकृष्णलीला, गोपगोपीनृत्य, दशावतार, आजचे मानवी जीवन, कळ्या, पक्षी, प्राणी, सुशोभन, वादकवृंद, नृत्यांगना, नृत्यपुरुष, असे अनेक विषय नागपूरकर भोसलेंच्या कारागीरांनी हाताळले आहेत. या मंदिराचा आकार केवळ ५४० चौरस फूट म्हणजे अंदाजे २५ x २२ फूट क्षेत्रफळाचा आहे. मंदिरात केवळ लहानसेच पण अतिसुंदर गाभारा बघायला मिळतो. शिल्पकारांनी अगदी वरपर्यंत सुंदर नक्षीकाम केलेली शिल्प कोरलेली आहेत. त्या शिल्पांना प्रत्येक बाबतीत म्हणजे वेशभूषा, रंगभूषा दागिने, शस्त्र, अस्त्र, संगीत साधन, वाद्य, स्त्रियांचे अलंकार, वस्त्रे, वाहन, अंबाऱ्या, अश्व, गाय, रथ, हत्ती यांनी तर हे मंदिर नुसते खचाखच भरले आहे. 

नागपूरकरांनी हे मंदिर अगदी आजच जाऊन पहावे इतके ते सुंदर आहे. या मंदिरात दोन स्तंभाची मेहरेप आहे. त्यासमोर सुंदर सुशोभित असा नंदीमंडप असून त्यात नंदी विराजमान आहे. प्रतिमांमध्ये महिषासुरमर्दिनी, लव-कुश पराक्रम, रामरावण युद्ध, गोपगोपीनृत्य, राजाचे अंबारीशिल्प, श्रीकृष्णलीला,कालियामर्दन, मुष्टीर-चाणुक-बलराम,कृष्ण कुस्ती,  पौराणिक शिल्पांसह, भागवतकथा, दशावतार अशा अनेक शिल्पांनीयुक्त हे मंदिर बघितले की थक्क व्हायला होतं. गाभाऱ्यात शिवपिंड असून आज ते मंदिर अर्धवटच राहिलेय हे मात्र खरे आहे. सन १८०७ ते १८२६ या काळात दुसरा रेसिडेंट रिचर्ड जेन्किन्स नागपूर येथे कार्यरत होते. त्यांनीच इंग्रजांच्या निधीतून भोंडा महादेव मंदिराची निर्मिती केल्याचा उल्लेख आढळतो. आप्पासाहेब भोसले यांना जेन्किन्स यांनी कैद केले.

इ.स. १८१७ साली सीताबर्डीची लढाई झाली. नागपूरचे राजे श्रीमंत अप्पासाहेब भोसलेंना इंग्रजांनी कैद केले व आजच्या मॉरीस कॉलेज जवळ नजरबंद केले. श्रावणात अप्पासाहेबांनी येथे अभिषेक केल्याचे सांगतात. या मंदिरात श्रावणमास, सोमवार, नागपंचमी, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र हे सर्व शिवाविषयक सण-व्रत होतात. मंदिरात भरपूर जागा आहे. असं हे मंदिर प्रत्येकाने आवर्जून बघावे असेच आहे. 

सर्वेश फडणवीस 



Friday, August 5, 2022

विज्ञान परिमळू ..

काही घटना या स्वप्नवत वाटाव्या अशाच घडतात आपण जरी निमित्तमात्र असलो तरी ती घटना कायमस्वरूपी आनंद देणारी असते. असाच अनुभव यावेळी पुण्यात पोहोचल्यावर लगेच आला. गेली सहा दशके ज्यांनी आपले आयुष्य विज्ञान आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे असे ज्येष्ठ संशोधक पद्मश्री, पद्म भूषण, पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सरांची भेट ही कायमस्वरूपी लक्षात राहील अशीच होती. 'शोध नव्या भारताचा' पुस्तक वाचल्यावर सरांना एकदा भेटावे असे मनात होते. त्या पुस्तकाचा परिचय लिहिल्यावर सरांना तो मेल केला. मेल वर छानसा अभिप्राय आल्याने सरांशी अधिक जवळीक निर्माण झाली आणि त्यातूनच ही प्रत्यक्ष भेट होऊ शकली. या आधी दोनदा पुण्यात काही कामानिमित्त होतो पण सर एकदा लंडन आणि दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात होते. सतत प्रवासात असल्याने यावेळी जसं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी गौरवग्रंथ - सोनचाफा विशेषांकाची तारीख समजली त्यानंतर लगेच सरांच्या भेटीची वेळ घेतली आणि सरांनी पण शुक्रवार २९ जुलै २०२२ ला आपण ४ वाजता भेटू असा रिप्लाय दिला. दिलेल्या दिवशी सकाळी पोहोचायचे अशी व्यवस्था होती पण पावसामुळे ट्रेन पाच तास उशिराने पुण्यात पोहोचली. सकाळी ९ ला पोहोचणारी ट्रेन दुपारी २.३० ला पुणे स्टेशनला पोहोचली. मनात विचार येत होता की सरांना कळवावे की थोडं लेट होईल पण धावपळ करत ३ वाजून ५६ मिनिटांनी सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. आधीचे सगळे सोपस्कार पार पडले आणि ४ वाजून ५ मिनिटांनी सरांच्या केबीनमध्ये प्रवेश केला. आधी तर स्वप्नवत वाटावे असेच सगळे वातावरणात होते. प्रवेश करता क्षणीच सर स्वतः खुर्चीतून उठले आणि सामोरे आले म्हणाले " या या, बसा.." 

नमस्कार केला आणि बसलो. ट्रेनमध्ये वेळ मिळाल्याने ठरवून गेलो होतो की कुठल्या विषयावर बोलायचे पण सरांनी आधी कौटुंबिक चौकशी वगैरे केली आणि मग विविध विषयांवर जवळजवळ सव्वा तास सर बोलत होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त पुस्तकं दिसत होती. सरांच्या केबीनमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने पुस्तकांची रचना केलेली आहे. जिकडे बघावे तिकडे फक्त पुस्तकं आणि पुस्तकं होती. एका भिंतीवर १९९१ साली मिळालेला पद्मश्री, एका भिंतीवर २००० साली मिळालेला पद्म भूषण आणि त्यांच्या मागच्या भिंतीवर २०१४ साली मिळालेला पद्म विभूषण आहे. विविध पुरस्कारांची श्रीमंती त्यांच्या डाव्या बाजूला होती. पुण्यभूषण, महाराष्ट्रभूषण असे अनेक पुरस्कार तिथे छान रचून ठेवलेले आहे. हे सगळं बघतांना आश्चर्य वाटत होते आणि मनातून आदरयुक्त आपुलकीची भावना निर्माण होत होती. इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपुलकी, ममत्व आणि सर्वांविषयी प्रेम ही भावना स्पर्शून गेली. विविध विषयांवर बोलतांना सरांच्या अनुभवातून अनेक गोष्टी जाणून घेतांना आश्चर्य वाटत होते. 

बोलण्याच्या ओघात त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की सोशल मीडियावर शक्यतो सकारात्मक गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करा. गेली ८ वर्ष झाले ते स्वतः ट्विटर वापरत आहेत पण त्यात फक्त चांगल्या सकारात्मक आणि माहितीपूर्ण ट्विट ते करतात असंही आवर्जून सांगितले. ते म्हणाले आतापर्यंत विज्ञान संशोधन, विज्ञान नेतृत्व आणि वैचारिक नेतृत्व या साधनांशी कामामुळे सतत एकरूप झालो आहे आणि आज भारताच्या तरुणांकडून मी खूप आशावादी आहे. भारतीय तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे त्यामुळे भारताचे भविष्य उज्वल आहे. तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत वाटचाल करावी असेही त्यांनी आवर्जून सांगितले. खरंतर संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य जगाला आश्चर्य वाटावं असच आहे. 'Reinventing India By Raghunath Mashelkar' अर्थात मराठी अनुवादित असलेलं 'शोध नव्या भारताचा'  या पुस्तकाबद्दलच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, श्री प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असतांना त्यांनी राष्ट्रपती भवनात आलेल्या प्रत्येक परदेशी पाहुण्याला हेच पुस्तक भेट म्हणून देत होते. जवळपास ट्रकभर पुस्तकं त्यावेळी राष्ट्रपती भवनात गेली होती. 

त्यांच्या अनुभवांविषयी ऐकतांना स्फूर्ती मिळत होती. शेवटी ते म्हणाले, " कोणतही काम केलं तरी त्यात नैपुण्य मिळवा. आपलं काम जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगाला कसं येईल याचा विचार करा. कायमच शुभेच्छा आहेत." असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. वेळेची मर्यादा लक्षात घेता आम्ही बोलणं थांबवलं आणि पुन्हा भेटू या आशेने निघालो खरा पण निघतांना त्यांनी त्यांचे पुस्तक 'LEAP FROGGING TO POLE VALUNTING' हे भेट म्हणून दिले. त्यांनी फोटो काढण्यासाठी त्यांच्या सहाय्यकाला आवाज दिला. फोटो घेतला आणि नमस्कार करून निघालो. निघतांना पाण्याची बाटली सोबत दिली. असू द्या म्हणाले. हे क्षण आठवताना आजही मनात वेगळीच भावना निर्माण झाली आहे. हे शब्दबद्ध करण्याचं कारण इतकंच की ज्यावेळी हे वाचल्या जाईल तेव्हा पुन्हा तिथेच आहे ही भावना सतत स्मरणात राहील. ज्यावेळी २०१५ साली रिपब्लिक डे परेड साठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आले होते त्यावेळी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात, President Obama asked 'What science do you do? ' Mashelkar Sir responded by saying ‘I do science that works for all not just for some’. President Obama nodded in approval. खरंतर अशा माणसांची भेट होणें हाही ईश्वरी संकेत आणि पूर्वजन्मीचे संचित आहे असंच कायम वाटतं. आजच्या सोशल मीडियाच्या जगात गुरफटलेल्या तरुणांपर्यंत हा विज्ञान परिमळू  पोहचावा म्हणून हा लेखन प्रपंच आहे. 

सर्वेश फडणवीस 

नागपूर