Friday, April 30, 2021

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !! 🚩 🚩


महाराष्ट्र !! वैभवसंपन्न,ऐश्वर्यसंपन्न,शक्तीशाली. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मराठ्यांचा इतिहास लाभलेली भूमी आहे . संतांची भूमी आहे. साहित्यिकांची भूमी आहे. मनोरंजनाची भूमी आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. इतिहासाची साक्ष देणारे गडकोट किल्ल्यांची भूमी आहे. ऐतिहासिक वैभव जतन करून ठेवणारी भूमी आहे.सागर,नद्या यांची भूमी आहे.असंख्य वर्षांपासून वैभवाच्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करतो आहे. नवयुग निर्माण करण्याच्या दिशेने हा महाराष्ट्र अग्रेसर होतो आहे.

आज इतके वर्ष होऊन सुद्धा पण अनेक प्रश्नांच्या बाबतीत आपण मागेच आहोत.आज गडकोट किल्यांचे संवर्धनासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आज पाणीटंचाई आणि वाढतं तापमान ही देशासोबत महाराष्ट्रातील गंभीर बाब आहे. आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करावे लागणार आहे.कुपोषणावरही मात करायची आहे. प्रयत्नरत आहोत पण आणखीन सजग राहण्याची नितांत आवश्यकता आहे. 

विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रात त्याचा गौरव दिन साजरा करताना आपल्यातील असलेली माणुसकी पणाला लावून कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी तत्पर राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सर्वगुणसंपन्न आहेच आणि त्या दिशेने यशस्वी वाटचाल ही करतो आहे. महाराष्ट्र दिनाच्या जगभरातील मराठी बांधवांना शुभेच्छा . 

चला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया..

मी महाराष्ट्राचा , महाराष्ट्र माझा ।। 

✍️ सर्वेश फडणवीस

#महाराष्ट्र_दिन

Thursday, April 29, 2021

माणसाने माणसाशी माणसासम वागणे !!


गेले दोन-तीन दिवस समाज माध्यमातून एका विषयाला धरून सातत्याने काहीतरी पोस्ट येणे सुरू आहे. मुळात विषय आणि विषयाचे गंभीर्य हेच आपण समजलो नाही. कुणीतरी, कुणासाठी केलेली मदत पण त्या मदतीचे ही आपण भाग-भांडवल करायला निघालो आहोत. समाज आणि समाजातील घटक म्हणून आपण आपली नैतिक जबाबदारीचे भान सोडून व्यक्त होण्यासाठी धडपड करत आहोत. पण खरंच याची आवश्यकता आहे का ? सद्य परिस्थितीत आपली प्रत्येक कृती ही कशी असायला हवी याबद्दल या माध्यमात आपण कायम काहीतरी सतत वाचत असतो तरी झालेल्या घटनेवर आपण इतक्या खालच्या थरावर कसे गेलो याचा विचार प्रत्येकाने करण्याची नितांत गरज आहे. 

आज कुठल्याही विषयावर आपण स्वतः माहिती न घेता,विषयाची पूर्ण शहानिशा न करता व्यक्त होण्याच्या मागे लागलो आहे. व्यक्त होणे हे समाज माध्यमाचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे पण त्याचा उपयोग,प्रसंगी त्याचे गांभीर्य आपल्याला माणूस म्हणून कधी कळणार याबद्दल आता विचार करावा लागणार आहे. खरंतर मुळात माणूस हा संवेदनशील प्राणी आहे. माणसाला माणसाशी जुळण्याचे प्रसंगी सुख-दुःख वाटून घेण्याचे एक माध्यम म्हणून हे समाज माध्यम आपल्याला उपलब्ध झाले आहे. पण आज समाज माध्यमाचे हे रूप बघून उबग यायला लागली आहे. परिस्थिती आणि विषयाचे गांभीर्य बघून आपण व्यक्त झालो तर समाज माध्यमातून चांगला आणि सकारात्मक संदेश जाईल याची जाण प्रत्येकाने ठेवली तर चित्र बदलेल. आलेल्या परिस्थितीतून जातांना हीच सकारात्मकता आपल्याला अधिक बळ देणार आहे. 

सध्याची परिस्थिती बघावी तशी योग्य नाही. निराशा,उदासीनता ही वातावरणात जाणवते आहे. आपण खूप प्रयत्न करतोय की मी माझ्याभोवती सकारात्मकताच ठेवणार पण तरीही मन काही काळ त्यात रमणारे आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहे. पण मानसिक स्वास्थ्य आपल्याला जपून ठेवावे लागणार आहे. काही घटना ऐकल्या की खरंतर मन सुन्न होतं खरंच ह्यातून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला काही निर्बंध घालावे लागतीलच. ते वैयक्तिक,आपला समाज म्हणून सामाजिक आणि या आभासी पण प्रभावी माध्यमातून ही काही निर्बंध घालण्याची सुरुवात स्वतःपासून करावे लागतील. बदल घडेल आणि या बदलाची नोंद नक्की होईल. चला या बदलासाठी प्रयत्नशील राहूया.. 

ऊबंटू चित्रपटातील माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे गीत नाही तर ही प्रार्थना कायमच आवडणारी आहे. समीर सामंत यांनी लिहिलेले शब्द मनात कायम रुंजी घालणारे आहे. ते शेवटी छान लिहितात आणि त्यानेच शेवट करतोय.. ते लिहितात,

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले

पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले

घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

✍️ सर्वेश फडणवीस 

Wednesday, April 21, 2021

श्रीरामाची आरती..🚩 👏



सणवार असले की सगळीकडे आनंदी, प्रसन्न वातावरण असतं. गुढीपाडव्यापासून चाहूल लागते ती श्रीराम नवरात्राची. घरोघरी, आपल्या अवतीभवती असलेल्या मंदिरात नऊ दिवस रामरक्षेचे सूर,मारुती स्तोत्र,हनुमान चालीसा आणि त्याच्या सोबतीला आरती असं सगळं ऐकतांना मन कायमच वेगळ्या विश्वात रममाण होतं पण गेल्या वर्षीपासून आपण हे सगळं हरवून बसलो की काय असं होत असतांना ह्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना आपण आपले सण,उत्सव साजरे करतोय. प्रतिकात्मक का होईना पण परंपरा आणि संस्कार हेच आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिले आणि त्यावर आपण नियमित चालत आहोत. नृत्य, कीर्तन, प्रवचन,भजन ह्याने जन्मोत्सवाचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा होत असला तरी आज ह्या माध्यमातून आपले सण साजरे करतांना काही क्षण आनंद आणि उत्साह प्रदान करणारे ठरले आहे. नकारात्मकतेच्या गर्दीत ही सकारात्मकता खूप प्रसन्नता आणि आल्हाददायक आहे. अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. प्रसंगी टाळ, चिपळ्या, पेटी, तबला ह्यांच्या सोबतीने आरतीचा नाद वेगळाच असतो. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. 

पारंपरिक आरती म्हणण्याचा आपल्या प्रत्येकाकडे प्रघात आहेच. कुठल्याही देवतेची पारंपरिक आरती म्हणतांना वातावरणात जी ऊर्जा जाणवते ती शब्दांत व्यक्त होणारी नाहीच. काही क्षण हे अनुभूती घेण्याचे असतात आणि ते तसेच घ्यावे. अशा सण उत्सवाच्या काळात आरतीचा नाद घराघरातून दुमदुमत असतो. हार,फुलं,तुळशी,बेल,प्रसाद आणि मंद तेवत राहणारी समई,शेजारी राळ व धूप ह्याने आपल्या आजूबाजूचं वातावरण चैतन्याने भारून जाते. मग आरती सुरू होते आणि ही आरती अगदी तल्लीनतेनं, श्रद्धेनं,भक्तिभावानं म्हटली की ब्रह्मानंदी टाळी लागते. आरती हा शब्द संस्कृतमधील आराभिक,आर्तिका अशा शब्दांवरून आला आहे. काही ठिकाणी आरतीला आर्तिक्य,महानिरांजन अशीही नावं आहेत, पण सर्वसामान्यपणे आरती हेच नाव जास्त प्रचलित आहे. आरती म्हणजे प्रज्वलित तुपाचे निरांजन,पणती किंवा दिवा ताम्हणात ठेवून ओवाळणं म्हणजे आरती. 

आरतीद्वारे भक्त देवाची प्रार्थना करतो की, देवा माझी सगळी संकटं, अडचणी दूर करून माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचं रक्षण कर, कल्याण कर, त्यांना ऐश्वर्य व सद्बुद्धी दे कारण संकटं, अडचणी,दु:ख हे सगळे क्लेश भक्तालाच असतात. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते. आरतीचे वेगळेपण अद्भुत असेच आहे. अशीच श्रीरामाची पारंपरिक आरती आज श्रीरामनवमी च्या निमित्ताने ह्या माध्यमातून मांडताना छान वाटतं आहे. अमर दादाच्या आवाजातील ही आरती आपल्याला नक्की प्रसन्नता देईल हा विश्वास वाटतो. मला ही आरती फार आवडते. आज सकाळी अमर दादाशी बोलणे झाले आणि त्याने ही लगेच ही आरती पाठवली. 

विष्णुदास महाराजांनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे जे वर्णन केले आहे ते शब्दशः प्रत्यक्ष रामरायाचे दर्शन व्हावे असेच आहे. संध्याकाळी ७ वाजता आरतीची वेळ ही अनेक देवळात पाळली जाते. हीच सायं वेळ साधत चला आपल्या जागेवरूनच आर्ततेने ह्या आरतीचे गायन करूया. आरती म्हणतांना प्रत्येकाला काही अनुभव नकळतपणे येत असतो म्हणून हे लिहिण्याचे प्रयोजन आहे. तर अशी ही आरती,

श्रीराम जयराम जय जय राम ।
भारति ओवाळू पाहूं सुंदर मेघश्याम ।।धृ।।

त्रिभुवमंडित माळ गळा ।
आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ॥१॥

ठकाराचे ठाण वारी धनुष्य बाण ।
मारुति सन्मुख उभा कर जोडून ॥२॥

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती।
स्वर्गाहूनि देव पुष्पवृष्टि करीती ॥३॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी ।
आरती ओवाळू चौदा भुवनांच्या कोटी ॥४॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूते।
आरती ओवाळू पाहूं सीतापतीते ॥५॥

✍️ सर्वेश फडणवीस 

#ramnavmi21 #Day9 #रामो_विग्रहवान्_धर्मः


Monday, April 12, 2021

गुढीपाडवा- हिंदू नववर्षाचा आरंभ !!

वसंत ऋतूचे आगमन होताच वृक्षांना नवी पालवी फुटते. आंबा,कडुनिंब मोहरून जातो. पळसालाही बहर येतो. कोकिळा सुद्धा स्वर आळवायला सुरुवात करते. अशा या सुगंधित वातावरणात चाहूल लागते ती नववर्षाची. चैत्र शुद्ध प्रतिपदेची. गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ. नवीन वर्षाची सुरुवात. राम अयोध्येत आले तो दिवस ! चैत्री श्रीराम नवरात्र ! वासंतिक देवी नवरात्र आरंभ,विक्रम संवत आरंभ. संघ संस्थापक डाँ. हेडगेवार यांचा जन्मदिवस ! वसंत ऋतूचा आरंभ ! या काळात निसर्गाचे नवे रंग-रूप बघायला मिळतात. आंब्याचा मोहराचा सुगंध याच काळात पसरतो. खरंतर सर्व उत्सवांचे प्रवेशद्वार म्हणजे वर्षप्रतिपदा !! महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा हा सण म्हणजे नवे संकल्प,नव्या योजनांची सुरुवात असते. याच दिवशी या संकल्पनांची ,योजनांची अंमलबजावणी करून सर्वत्र गुढी उभारली जाते.

गुढी आमुची उभी राहते,आकाशी उंचावुन मान । 
भारतीयांची उच्च संस्कृती, मिरवीतसे अभिमान ।।

अशी ही गुढी संस्कृती आणि अभिमानाने मान उंचावून उभी असते. पृथ्वीच्या आपल्या कक्षेत सूर्याभोवती फिरणाऱ्या काळाला 'वर्ष' हे नाव आहे. हा काळ तीनशे पासष्ट दिवस,पाच तास अठ्ठेचाळीस मिनिटे व शेहेचाळीस सेकंद एवढा असतो. इंग्रजी वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचे मानले जाण्याचे कारण हेच. हिशेब पूर्ण होण्याच्या दृष्टीने त्यात दर चार वर्षांनी एक दिवस मिळवतात या वर्षालाच लीप इयर किंवा प्लुत वर्ष म्हणतात. भारतामध्ये वर्षगणना करण्याचे ब्राह्म, पित्र्यू ,दैव,प्रजापत्य, गौरव,सौर,सावन,चांद्र आणि नक्षत्र असे नऊ प्रकार मानले जातात. भारतात सौर गणना प्रचलित असून त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला कालगणना सुरू होते. तिलाच वर्षप्रतिपदा असे म्हणतात. शालीवाहनशकाचे वर्ष याच दिवसापासून सुरू होते. दक्षिण भारतात व इतरत्रही नूतन वर्षारंभ चैत्र प्रतिपदेसच होतो. यात काही धार्मिक विधीही करावयाचे असतात त्यात ब्रह्मपुजा हा प्रधान विधी असतो. त्याचा इतिहास आपल्याला स्वतंत्रपणे ब्रह्मपुराणात बघायला मिळतो. ब्रह्मदेवाने याच दिवशी सकाळी विश्वनिर्मिती केली व कालगणनाही सुरु केली. 

या दिवशी शुचिर्भूत होऊन दाराला तोरण बांधावे. देवपूजा करून गुढी उभारावी. खरं तर सोबत ध्वज ही उभारावा. सातत्याने होणाऱ्या परकीय आक्रमणामुळे ध्वजाचा अपमान होऊ नये म्हणून जरीचे वस्त्र उभारण्यास सुरुवात झाली.  “ब्रह्मध्वजाय नमः” असे म्हणून गुढीचे पूजन करावे. सर्व उत्सवाच्या प्रवेशद्वारावरील उत्सवाची मांडणी ही जाणीवपूर्वक व विचारानेच केली आहे. गुढीवरील कलश यशाचे प्रतीक तर कडुलिंब आरोग्यासाठी , पुष्पहार मांगल्याची खूण तर साखर गाठी माधुर्य भाव प्रदर्शित करण्यासाठी,जरीचे वस्त्र वैभवासाठी तर काठी सामर्थ्य उन्नतीसाठी. नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प. त्या संकल्पपूर्तीची गुढी उभारूया. वसंत ऋतू म्हणजे झाडाला नवी पालवी फुटण्याचा काळ. यातून निसर्गाशी ,ऋतूशी जवळीक साधण्याचा प्रयत्न अपेक्षित असावा. आणि सहजपणे वाटून जाते की आपल्या सणांची मांडणी ही जाणीवपूर्वक केली आहे. 

गुढीपाडव्यापासून सर्वत्र श्रध्दाकेंद्रामधून उत्सवी वातावरण असते. वाल्मिकी रामायण, अध्यात्म रामायण यांची पारायणे चालू असतात. राम नवरात्र ही ह्याच काळात असते. कीर्तने चालू असतात, गीत रामायण सारखी अजरामर काव्य सगळीकडे ऐकायला मिळतात त्यामुळे वातावरण भक्तीमय असते. रामनवमी संपली की हनुमान जयंतीची लगबग सुरू होते. रामाच्या मानाने हनुमानाची देवळे अधिक असतात. त्या सर्वठिकाणी मंडप उभारलेले जातात. तोरणे लावली जातात आणि हनुमानचालिसा पाठ सुरू असतात. रामजन्म ऐन माध्यान्ह आणि हनुमान जन्म सूर्योदयाचा . दोन्ही कार्यक्रम गैरसोयीचे असले तरीही भाविकांची गर्दी तुडूंब असते. कारण श्रद्धेला काळ आणि वेळेचे बंधन नसते. यावर्षी आणखीन गौरवशाली क्षणांचे आपण साक्षीदार होणार आहोत. अयोध्येतील रामजन्म भूमीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयात आला आणि भव्य मंदिर लवकरच डौलाने  उभे राहणार आहे. आपण भाग्यवान आहोत की या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार आहोत. 

या काळात सकाळ व संध्याकाळ अतिशय प्रसन्न असते. संध्याकाळी तर कातरवेळ असून सुद्धा हुरहूर लागत नाही. मंद व सुखद झुळूक वाहत असतात. स्वच्छ चांदण शीतलता प्रदान करत असतं. सगळीकडे धार्मिक वातावरण असताना मन आनंदून जातं. भुकेसाठी विविध फळ उपलब्ध असतात. प्यायला माठातील वाळामिश्रित थंड पाणी असतं. झोपेसाठी पतली पांघरूण असतात. रात्रीच्या वेळी बागेतील मोगऱ्याचा सुगंध अनुभवता येतो. हे सर्व मानवी मनाला चैतन्य, उत्साह व रमणीयता प्रदान करतात. पण सध्या कोरोना सारख्या विषाणू चे सावट संपूर्ण जगावर आहे. आणि या परिस्थितीत आपण आपली संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. लवकरच त्यातून आपण पूर्णपणे बाहेर येऊच हा विश्वास आहे. विश्वशांतीसाठी या प्लव संवत्सरात प्रार्थना करत सगळीकडे निरामय आरोग्य व शांतीसाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. 

भारतीय सणांमधील शास्त्रीय,सामाजिक,व धार्मिक कारणे समजून घेतले तर जाणीवपूर्वक हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल आणि त्याचा आनंद अधिक द्विगुणित करणारा असेल.आपल्याला येणारे नवे वर्ष सुख,शांती,समृद्धी व निरामय आरोग्य प्रदान करो हीच मंगलकामना. 

नूतन वर्षाभिनंदन !!

✍️ सर्वेश फडणवीस