Wednesday, November 15, 2023

✨ वाद्यमेळ : मृदंग


मृदंग हे नाव ऐकूनच मानवी मन एका वेगळ्याच विश्वात रममाण होते. याच्या नादाने सारा आसमंत आनंदून जातो. आवडीच्या वाद्याने वाद्य मेळाचा शेवट करावा अशी इच्छा निर्माण झाली. मृदंग हा शब्द ढोल शब्दाप्रमाणेच वेगवेगळ्या आडव्या ढोलांना उद्देशून सामान्य अर्थाने वापरला जातो. दक्षिणेत मृदंग एक विशिष्ट वाद्य आहे. त्यालाच तमिळ व तेलुगू भाषांत मद्दळम् व कानडीत मद्दळे म्हणतात. उत्तरेत मात्र पखवाज, खोल व पुंग ह्या वेगळ्या वाद्यांनाही मृदंगच म्हणतात.

मृदंगाचा सर्वांत प्राचीन उल्लेख आणव व काठक गृह्यसूत्रात (इसवी पूर्व ८०० ते ४००) सापडतो. शिवाय रामायण, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध त्रिपिटक, आदी ग्रंथांत या वाद्याचे उल्लेख आहे. भरताने प्रमुख वाद्यत्रयींत मृदंगाचा समावेश केला. शाङ्गदेवाच्या काळातही मृदंगाला वाद्यांत प्रमुख स्थान होते; त्याच्या पुष्कर त्रयींत मृदंग, मर्दल व मुरज हे तीन ढोल होते. आजही देशात मृदंग एक प्रमुख तालवाद्य आहे. मृदंगाविषयी तपशीलवार विवेचन नाट्यशास्त्रात आले आहे. हरीतकी, यव व गोपुच्छ असे त्याचे तीन प्रकार सांगून ते धरण्याच्या ऊर्ध्वक, आंक्य व आलिंग्य अशा तीन पद्धती वर्णन केल्या आहेत. ज्याचे अंग मातीचे आहे तो मृदंग (मृत+अंग) अशी व्याख्याही याबद्दल प्रचलित आहे. यावरून असे दिसते की पूर्वी मृदंग मातीचे बनवलेले असत व सध्याचे लाकडी मृदंग नंतर अस्तित्वात आले. या व्याख्येबाबत काही लोकांचे मत असे आहे की मातीचे अंग म्हणजे खोड नसून पुडीला मातीचा लेप देतात या अर्थी आहे. मतमतांतरे असले तरी मृदंग हे वाद्य आजही लोकप्रिय आहे.

दक्षिणेत ज्या विशिष्ट वाद्याला मृदंग म्हणतात त्याचे खोड फणसाच्या, निंबाच्या किंवा शिसवी लाकडाचे असते. स्वराच्या उंचीनुसार खोडाची लांबी ५५ ते ६० सेंटीमीटरच्या दरम्यान कमीअधिक असते. मधल्या फुगाऱ्याचा व्यास २५ ते ३० सेंटीमीटर असतो, पण फुगारा खोडाच्या मधोमध नसून डाव्या बाजूकडे असतो. अर्थातच डावी पुडी मोठी व उजवी लहान होते. डाव्या पुडीचा व्यास १८ ते १९·५ सेंटीमीटर असतो व तिला तोप्पी म्हणतात. उजव्या पुडीचा व्यास १५·५ ते १७ सेंटीमीटर असतो व तिला वलन्तलै म्हणतात. वलन्तलैमध्ये चामड्याचे तीन पापुद्रे असतात; त्यांपैकी मधल्या थरातील चामडे सबंध पुडीभर असते आणि उरलेली दोन चामडी म्हणजे गोल पट्ट्या असतात. सर्वांत खालची पट्टी बाहेर दिसत नाही; कारण तिच्यावर आणखी दोन पापुद्रे असतात. मधल्या चांदव्याला तामीळमध्ये कोट्टू तट्टू व तेलुगूत पाट म्हणतात. बाहेरच्या गोल पट्टीला तामीळमध्ये वेट्टू तट्टू किंवा मिट्टू व तेलगूत रेप्पा म्हणतात. 

मृदंगासारखेच बनवलेले व तितकेच प्रतिष्ठित दुसरे वाद्य म्हणजे पखवाज. ध्रुपद गायकीत व वीणावादनात पखवाजाची साथ अपरिहार्य होती. पण त्यांच्याबरोबर पखवाजही आता मागे पडला आहे व ख्यालगायकीबरोबर तबला पुढे आला आहे. आजही ध्रुपदगायनात, वीणावादनात व कथ्थक नृत्यात पखवाजाची साथ घेतात, पखवाजाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. कारण पखवाजात नादाचे व वादन तंत्राचे सात्त्विक गांभीर्य इतके भरले आहे की तबल्यातून ते कधीही निर्माण होऊ शकणार नाही. पखवाजाला मृदंगही म्हणतात; पण काही ठिकाणी दोघांत भेद करतात : मृदंग मातीचा असतो तर पखवाज लाकडाचा. पखवाज शब्द पक्ष-वाद्य म्हणजे बाजूने वाजवले जाणारे वाद्य शब्दाचा अपभ्रंश असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. पखवाज
दक्षिणी मृदंगापेक्षा लांबीत थोडा अधिक असतो व त्यात फुगाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे उतार मृदंगापेक्षा अधिक विषम असतात. 

आज भारतात प्रसिद्ध मृदंग वादकांचे नाव आदराने घेतले जाते त्यात पंडित मदन मोहन, पंडित भोलानाथ पाठक , पंडित अमरनाथ मिश्र अशा काही नावांचा उल्लेख आवर्जून करता येईल. आजही हे वाद्य अनेक ठिकाणी साथीला असते. कानाला नादाचा आनंद देण्याचे काम हे वाद्य लीलया करते. आज दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज. बीजेला साक्षी ठेवत मृदंग वाद्याच्या नादाने आनंद उत्साह कायम राहावा हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day5

Monday, November 13, 2023

✨ वाद्यमेळ : व्हायोलिन

 

व्हायोलिन हे वाद्य आकाराने तसे लहान आहे. पण ज्यावेळी त्यातून सूर उमटत जातात ते वाद्य अधिकाधिक आनंद आणि उत्साह देणारे आहे. व्हायोलिन कर्नाटकी संगीतात महत्त्वाचे वाद्य झाले आहे. उत्तरेत जो मान सारंगीला तोच दक्षिणेत व्हायोलिनला आहे; आता हळूहळू उत्तरेतही त्याचा प्रचार वाढत आहे. इतर वाद्यांच्या साथी इतकेच स्वतंत्र वादनातही व्हायोलिन आघाडीवर आहे. व्हायोलिन हे वाद्य मुळात भारतीय नसल्यास, मध्य आशियातून आले असावे. युरोपात ते बाल्कन देशातून गेले असा समज आहे. व्हायोलिन सारख्या दिसणाऱ्या वाद्याचे पहिले चित्रण नवव्या शतकाइतके जुने आहे. 

भारतात व्हायोलिनचा प्रचार प्रसार म्हणजे संगीतविश्वातील देवाणघेवाणीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. भारतात गजाची वाद्ये सुमारे एक हजार वर्षे होती. व्हायोलिनशी साम्य असलेल्या वाद्यांची शिल्पे विजयवाडा येथील मल्लिकार्जुन मंदिरात (दहावे शतक) व चिदंबरम् येथील नटराज मंदिरात (बारावे शतक) आढळतात. सध्याचे व्हायोलिन भारतात पोर्तुगीज, फ्रेंच व विशेषतः इंग्रज लोकांबरोबर आले. आधुनिक पाश्चिमात्य संगीताची भारताला ही एक उत्तम देणगी म्हणता येईल. व्हायोलिन वाद्य नादगुणात समृद्ध व बहुढंगी असल्यामुळे भारतीय संगीतात ते सहज मिसळून गेले.

व्हायोलिन वाद्याला अभिजात संगीतात प्रवेश देण्याचे श्रेय बालुस्वामी दीक्षितर (इ.स. १७८६ - १८५८) यांच्याकडे जाते. कर्नाटकी संगीताच्या अमर नायकत्रयीपैकी एक मुत्तुस्वामी यांचे बालुस्वामी धाकटे बंधू होते. त्यांचे वडील रामस्वामी मद्रासजवळ मनालीच्या व्यंकटकृष्ण मुदलियारांकडे गायक म्हणून सेवेला
होते. मुदलियार मद्रासला ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते, त्यामुळे त्यांना पाश्चिमात्य संगीत ऐकायला मिळत असे. मुदलियार आपल्याबरोबर दीक्षितर बंधूंनाही नेत असत. मुदलियारांनी बालुस्वामीला व्हायोलिन शिकवण्यासाठी एक गोरा संगीत शिक्षक ठेवला होता. बालुस्वामी लवकरच व्हायोलिन वादनात तरबेज झाले. त्यांच्या वडील बंधूंचे एक शिष्य वडिवेलू हे त्रावणकोर दरबारात होते. ते व्हायोलिन शिकले व दरबारातही वाजवू लागले. त्रावणकोरचे महाराज स्वाती तिरुनाल स्वतः नामवंत संगीतकार होते. वडिवेलूंचे व्हायोलिन ऐकून ते इतके खूष झाले की त्यांनी वडिवेलूच्या कलेचा सन्मान करण्यासाठी हस्तिदंती व्हायोलिन वडिवेलूंना बहाल केले. तेव्हापासून कर्नाटकी संगीतात व्हायोलिनचा प्रचार वाढत वाढत ते आज प्रमुख वाद्य होऊन बसले आहे. 

उत्तर हिंदुस्थानी संगीतात त्याचा प्रवेश गेल्या ५०–६० वर्षांत
झाला. व्हायोलिन दोन्ही बाजूंनी चपटे व दांड्याच्या मानाने बरेच लांब असते. खालचा भाग म्हणून दोन लाकडी फळ्या जरा अंतर ठेवून एकमेकास जोडतात. त्यांचा आकार कटिमध्य असलेल्या लंबवर्तुळासारखा असतो. वरच्या भागामध्ये फुगीर व बाजूंना उतरती असते. तिच्यावर दोन्ही बाजूंना अवग्रहाच्या आकाराच्या खाचा असतात. निरुंद लाकडी पट्टी काठांना जोडून ह्या दोन एकमेकींशी जोडल्या जातात. म्हणजे दोन भागामध्ये पोटासारखी पोकळी तयार होते. ह्या खालच्या मागच्या बाजूस तारा बांधण्यासाठी एक लाकडी पुच्छाकार दांडी पोटावर येईल अशा रीतीने बसवतात. दांडीवर चार तारा फिरकीच्या खिळ्यांनी बांधतात. या दांडीच्या पुढे पोटावर पातळ व वरून वक्राकार घोडी बसवतात. पोटाच्या दुसऱ्या अंगाला आखूड दांडा असतो व तो टोकाला गोल मुरडलेला असतो. त्या ठिकाणी चार खुंट्यांचा कोनाडा असतो. पुच्छाला बांधलेल्या तारा घोडीवरून खुंट्यांना गुंडाळतात. त्या सुरात लावण्यासाठी खुंट्या पिळतात व बारीक सूर साधण्यासाठी पुच्छावरील फिरकीचे खिळे फिरवतात.

काही भागात या वाद्याला बेला हे नाव आहे. चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे व्हायोलिन हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक सांगतात. व्हायोलिन अजरामर करणारे प्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रभाकर जोग होते. त्यांचे गाणारे व्हायोलिन आजही ऐकले जाते. पुण्यातील विदुषी स्वप्ना दातार यांच्या स्वर स्वप्न च्या माध्यमातून व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम होत असतात. लहान मुलांना व्हायोलिनचे शिक्षण देत त्या सर्वोत्तम वादक तयार करत आहेत. श्रुती भावे ही सुद्धा प्रतिथयश व्हायोलिन वादक कलाकार आहे. आज व्हायोलिन हे वाद्य अनेक कलाकारांच्या कृतीतुन यशस्वीपणे वाटचाल करते आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर अशीच याची भरभराट व्हावी हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day4

Saturday, November 11, 2023

✨ वाद्यमेळ : रुद्रवीणा


वीणा खरंतर भारतीय संगीतातील एक प्राचीन आणि प्रमुख तंतुवाद्य आहे. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात होते. त्यातीलच रुद्रवीणा हे वाद्य पहिल्यांदा पाहताक्षणीच मोहात पाडणारे असे वाद्य आहे. सुंदर नक्षीकाम आणि त्याचा एकंदर बाज बघता दिसायला जरा कठीण वाटत असलं तरी वाजवल्यावर नादमधुर आणि आल्हाददायक आनंद देणारे असे हे वाद्य आहे. वीणा या वाद्याचे अनेक प्रकार आपल्याला अलीकडे बघायला मिळतात. नागस्वरम्‌, सनई यांसारख्या वाद्यांनाही ‘मुखवीणा’ हेच नाव होते. वैदिक मंत्रांच्या स्वरगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीणेला ‘हस्तवीणा’ किंवा ‘गात्रवीणा’ म्हणत होते. हिंदीमध्ये ‘बीन’ हे नाव वीणा या प्रकारातील वाद्याला वापरल्या जाते. अलीकडे मात्र वीणा ही सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतु वाद्याला वापरली जाते.

वीणेचे अनेक प्रकार प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. धनुष्याक वक्रवीणा हे अतिप्राचीन तंतुवाद्य असून ईजिप्तमध्ये इ.स.पू.सु. चार हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे वाद्य प्रचारात असल्याचे उल्लेख आढळतात. हॉर्टेन्स पानुम या लेखिकेने स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्‌स ऑफ द मिडल्‌ एजिस, देअर ईव्हलूशन अँड डेव्हलपमेंट या ग्रंथात, वक्राकार वीणा सर्व वीणा प्रकारांतील मूळ प्रकार असून बाकीच्या वीणा नंतर निर्माण झाल्या,असे म्हटले आहे. वैदिक संगीतातही वीणावादन प्रचलित होते. यज्ञप्रसंगी उद्‌गाते गात असताना, यजमानपत्नी निरनिराळ्या वीणा वाजवत असल्याचे उल्लेख आहेत. वीणेचे विविध प्रकार प्राचीन काळी रूढ होते.

रूद्रवीणा या वाद्याचे अनेक प्रकारभेद आणि वेगवेगळी वर्णने आढळतात. याचे साम्य रबाब या वाद्याशी असल्याचे काही तज्ञ मानतात, तर काही दाक्षिणात्य वीणेशी याचा संबंध लावतात. 
रुद्रवीणा आता एक दुर्मिळ वाद्य बनले आहे जे जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते बनवणारे कारागीर तसेच त्याचे वादक दोघेही आता क्वचितच सापडतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरबहार, सतार आणि सरोद इत्यादी वाद्यांच्या विकासामुळे या वाद्याचे महत्त्व कमी झाले. 

रुद्रवीणा ही लाकडापासून बनलेली एक लांब ट्यूबलर रचना आहे. यात दोन मोठे गोल रेझोनेटर्स असतात, जे नळीच्या तळाशी, केंद्रापासून समान अंतरावर बसवले जातात आणि चांगल्या प्रतीच्या भोपळ्यापासून बनवलेले असतात. चार वाजवणाऱ्या तंतूंचा यात समावेश आहे, एक स्टीलचा आणि तीन तांब्याचा, खालच्या टोकाच्या हुकला बांधलेला आणि ट्यूबला समांतर ताणलेला आणि सजवलेल्या ट्यूनिंग पेगकडे नेणारा अशी या वाद्याची एकंदर रचना आहे. नळीच्या दोन्ही बाजूंच्या हुकवर दोन ड्रोन वायर आहेत ज्या आपापल्या वरच्या भागात ताणलेल्या असून त्या बांधलेल्या आहेत.

रुद्रवीणेचा विकास दक्षिण भारतात झाला असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तंजावर येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला पुढे त्यास प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजाश्रयामुळे आणि त्यांच्यामुळेच काही रुद्रवीणा वादक आपल्याला बघायला मिळतात. अलीकडच्या काळात विदुषी ज्योती हेगडे, सत्यवाणी पारंकुशम कुशल रुद्रवीणा आणि खंडारबणी घराण्यातील सितार कलाकार आहेत. त्या सर्वोत्तम रुद्रवीणा वादक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. आता रुद्रवीणा हे युनेस्कोने संरक्षित केलेले आणि प्रमोट केलेले जागतिक वारसा साधन आहे. आज लक्ष्मीपूजन या रुद्रावीणेच्या स्वरांसारखेच आपल्याही आयुष्यात ऐश्वर्य, धन-धान्य, समृद्धी आणि मांगलिकतेचा वर्षाव व्हावा हीच श्री लक्ष्मीमाते चरणी प्रार्थना आहे. दिवाळी निमित्त शुभचिंतन..

सर्वेश फडणवीस 

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day3







Friday, November 10, 2023

वाद्यमेळ : जलतरंग

जलतरंग या नावातच एक गूढ आणि आत्मिक अशी अनुभूती येते. तसंच हे वाद्य आहे. हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. जलतरंग या वाद्यामध्ये कुठलाही ताण नाही. त्यामुळे हे वाद्य ऐकून ऐकणाऱ्याचा ताण नाहीसा होतो. नादातली नजाकत आणि प्रसन्नता हे जलतरंग या वाद्याचं वैशिष्ट्य आहे. अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमी अधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते आणि असंच हे दुर्मिळ जलतरंग वाद्य आहे. 

जलतरंग हे अस्सल भारतीय वाद्य आहे. पूर्वी धातूच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाजवलं जाणारं हे वाद्य आता चिनी मातीचे बाउल वापरून वाजवलं जातं. दिसायला जरी सहज - सोपं असलं तरीही वाजवायला तितकंच अवघड आहे. जलतरंग वाजवायला अवघड आहे कारण त्यात महत्त्वाचे आहे ट्यूनिंग. जलतरंग ट्यून कसं करतात ? बाऊलचा आकार आणि त्यात असलेलं पाण्याचं प्रमाण यावर त्यातून येणारा स्वर अवलंबून असतो. मुळात बाऊलला स्वतःचा एक स्वर असतो. पाणी नसताना बाऊलमधून जो स्वर येतो त्यापेक्षा त्या बाऊलमध्ये पाणी घालून ३ ते ४ स्वर अधिक मिळवता येतात. बाऊलचा आकार जितका मोठा तितका त्यातून येणारा स्वर खालच्या सप्तकातला. बाऊलमध्ये जितकं पाणी कमी तितका त्याचा स्वर वरचा लागतो. त्यामुळे इतर वाद्यांसारखं ट्यूनिंग करताना स्वर चढवणं हे जलतरंगाच्या बाबतीत शक्य नसतं. म्हणूनच जलतरंग हे स्वर उतरवून ट्यून केलं जातं. 

या वाद्यातील ट्यूनिंगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा तापमानाचा आहे. जलतरंगासाठी वापरलं जाणारं पाणी एकदम थंड असेल तर जलतरंग वाजत नाही. गरम पाणी वापरलं तर एरवीपेक्षा कमी पाण्यात जलतरंग ट्यून करता येतं पण वाजवता वाजवता पाणी पुन्हा नेहमीच्या तापमानावर येतं तेव्हा ट्यूनिंग बिघडतं. पाण्यापेक्षा घनतेने हलक्या द्रवपदार्थानेही ते ट्यून करता येऊ शकते पण बऱ्याचदा अशा द्रव पदार्थांचं बाष्पीभवन लगेच होत असल्याने ते वापरणे व्यावहारिक नाही. जलतरंग हे वाद्य शास्त्रीय राग वाजवण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नाही असा एक विचारप्रवाह आज आहे. 

जलतरंगाचा सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथात पाहायला मिळतो. पाण्याने भरलेल्या विविध पेल्यांत संगीताचे जल-तरंग निर्माण करून सूरनिर्मिती केली जात असे. तसेच याचा उल्लेख मध्ययुगीन "संगीत पारिजात" या ग्रंथामध्येही करण्यात आला होता, ज्यामध्ये या वाद्याला घन-वाद्य असे म्हंटले आहे. जल - तरंगला मध्ययुगीन काळात जल - यंत्र, जल तंत्री वीणा देखील म्हटले जात असे चित्रपट संगीतामधे देखील या वाद्याचा भरपूर वापर केला गेलेला आहे. पंख होते तो उड आती रे.. मधु बन मे राधिका नाचे रे… . अशी अनेक गाण्यांचे उदाहरणे देता येतील. तसेच कृष्णावर कविता लिहिणाऱ्या कवींनीदेखील या साधनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. ऐकतांना लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते.

भारतात आज जलतरंगवादनाचे पूर्णवेळ कार्यक्रम करणारे खूपच मोजके लोक आहेत. त्यात पुण्यातील  पं.मिलिंद तुळाणकर हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. G20 च्या वेळी जे वाद्य वादक होते त्यात जलतरंग साठी पं. मिलिंद तुळाणकर यांचा समावेश होता. असे हे जलतरंग वाद्य तरंगाच्या नादातून आनंद देणारे आहे. कायम वाटतं की खरोखरच संगीतामध्ये ही जादू आहे की आपण सर्व जग विसरून जातो. असंच हे जलतरंग वाद्य आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day2

Thursday, November 9, 2023

वाद्यमेळ : सुरबहार


सुरबहार हे नाव ऐकूनच या वाद्याबद्दल प्रसन्नता जाणवते. आपल्याकडे काही वाद्यांची नावं पण इतकी छान आहेत की ते नाव वाचून सुद्धा मनात आल्हाददायक भावना सहज निर्माण होतात. असेच वाद्य म्हणजे सुरबहार आहे. सुरबहार हे वाद्य लाकूड, तुमडी आणि रेशीमपासून बनवलेले तार वाद्य आहे. हे एक पारंपारिक वाद्य आहे जे उत्तर भारतातील विविध भागात आजही प्रचलित आहे. आज सुरबहार हे प्रामुख्याने उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये शास्त्रीय संगीतकारांकडून एकल वाद्य म्हणून वापरले जाते. या वाद्याच्या एकल वादनाने सुद्धा अनेक मैफिली अजरामर झाल्या आहेत. हे वाद्य सतारीच्या जवळपास जाणारे आहे. हे वाद्य सतारीहुन थोडे मोठे असते त्याच्या खालचा गोलाकार भागही सतारीपेक्षा बराच मोठा असतो व दांड्यावरील पडदे मात्र धारदार आणि पातळ असतात. हे वाद्य विलंबित आलापीला योग्य आहे. परंतु याचा स्वर कमी आहे. अत्यंत सुंदर दिसणारे हे वाद्य पहिल्यांदा बघतांना सतारीसारखे वाटते पण त्याहूनही थोड्या वेगळ्या धाटणीचे हे वाद्य आहे.

सुरबहार हे वाद्य साधारण १३० सेमी पेक्षा जास्त मोठे आहे. यात रेझोनेटर म्हणून वाळलेल्या करवंदाचा वापर केल्या जातो आणि त्याच्याकडे खूप रुंद फ्रेट असतात. या फ्रेट मान टूना किंवा महोगनी लाकडापासून बनविली जाते. यात साधारणपणे ३-४ मी ताल तार ( चिकारी ), चार वाजवणाऱ्या तार (सर्वात रुंद १ मिमी), आणि १०-१२ सहानुभूती स्ट्रिंग आहेत. या वाद्याला दोन पूल आहेत; वाजवता येण्याजोग्या तार मोठ्या पुलावरून जातात, जे तबलीला लहान पायांनी जोडलेले असतात, आणि जागोजागी चिकटलेले असतात. यातील सहानुभूतीच्या तारा थेट तबलीवर चिकटलेल्या छोट्या पुलावरून जातात. पुलांना स्ट्रिंगच्या समांतर वरच्या पृष्ठभागावर थोडासा वक्र असतो ज्यात कंपन होताना स्ट्रिंग स्पर्श करतात, या वाद्याचा मुख्य भाग सतारी सारखाच आहे, ज्यामध्ये ते एका बाजूला कोरलेल्या लाकडाच्या मुखासह मोठ्या वाळलेल्या करवंदाचे बनलेले आहे आणि कोरीव लाकडी गळ्याला जोडलेले आहे. बहुतेक सुरबहारांमध्ये खालचा भाग मोठा असतो आणि काही प्रमाणात झुकलेली असते आणि तळ वाद्याच्या मागील बाजूस असतो.

सुरबहार वादक वाकलेल्या स्टीलच्या ताराच्या प्लेक्ट्रमचा वापर करून ती तार वाजवतो, मिझरब , जो वादकाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर स्थिर असतो. सुरबहारवर आलाप , जोर आणि झाला या धृपद शैलीत वाजवण्यासाठी पहिल्या तीन बोटांवर तीन प्लेक्ट्रम वापरतात. याची खासियत म्हणजे धृपद शैलीत, सितारखानी आणि मासितखानी गाण्यांऐवजी, वादक पखावाजांच्या साथीने धृपद रचना वाजवतात आणि हे ऐकताना ऐकणारा आनंदून जातो.

काही संशोधकांचा असा विश्वास आहे की सुरबहारचा शोध १८२५ च्या आसपास लागला आहे. त्यावेळी, देवी सरस्वतीशी संबंधित एक पवित्र वाद्य मानली जाणारी वीणा फक्त वीणा वादकांच्या वंशजांनाच शिकवली जात होती. त्यानंतरच्या काळात सुरबहारचा विकास काही प्रमाणात वीणाप्रमाणेच झाला आहे. सुरबहारचा शोध ओमराव खान बीनकर यांनी लावला होता आणि गुलाम मोहम्मद हे त्यांचे शिष्य होते. ओमराव खान बीनकर हे रामपूरच्या वजीर खान यांचे आजोबा होते. या आविष्काराचे श्रेय उस्ताद साहेबदाद खान यांनाही जाते.

खरंतर सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य अलीकडच्या काळात लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी एक प्रतिभावंत कलाकार होत्या. अन्नपूर्णादेवी गेली काही वर्षे एकांतवासात होत्या आणि त्यांचे नाव आजही सुरबहार या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते. २००४साली 'संगीत नाटक अकादमी'ने त्यांना 'रत्न' म्हणून नावाजले. अन्नपूर्णा देवी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, त्यांनी जास्त जाहीर कार्यक्रम केले नाहीत, रेकॉर्डही काढल्या नाहीत, तरीही भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरबहार उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून कायम नावाजल्या गेल्या आहेत. असे हे सुरबहार वाद्य आजही प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी एक दुर्मिळ वाद्य म्हणून संगीत क्षेत्रांत नावाजलेले आहे. आता देशात केवळ तीन ते चारच सूरबहार वादक आहेत. आज धनत्रयोदशी या सुरबहार सारखे आपल्याही आयुष्यात धन धान्य ऐश्वर्य आणि निरामय आरोग्य सदैव राहावे हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आहे.

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day1

Wednesday, November 8, 2023

भारत वाद्य दर्शनम् ..

आवाज कोणाचा? म्हणजे फटाक्यांचा असतोच पण त्या गलक्यात जरा या वाद्यांचा आवाज ही ऐकुया. सप्टेंबर महिन्यात जी20 बैठकी निमित्ताने आलेल्या सगळ्या राष्ट्र प्रमुखांसमोर तब्बल ७८ विविध भारतीय वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यातूनच ही संकल्पना सुचली आणि त्यातील पाच वाद्य यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोंत.

एके ठिकाणी छान वाचनात आले की, हिंदु तत्त्वज्ञानाने सर्व ध्वनिद्रव्याचा आरंभ एका शब्दातून केला आहे. त्या एका शब्दाला नादब्रह्म, ॐ किंवा प्रणव म्हणतात. ॐ हाच ध्वनीचा आदिस्फोट. म्हणूनच वेणू (कृष्ण), वीणा (सरस्वती) व डमरू (शिव) या वाद्यांना दैवी संकेत प्राप्त झाले आहेत. ही संगीताची गर्भावस्था आदिम वाद्यांत दिसून येते. संगीतमय म्हणता येईल असा निश्चित नाद या वाद्यांतून निघत नाही.

कमरेला बांधलेली वाळलेल्या फळांची माळ, ही प्राथमिक अवस्थेतील संगीताची साधने होती. नंतरच्या अवस्थेत काठ्या चिरलेली लाकडे, तबकड्या, दांड्या, ढोल, वीणा व वेणू यांचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. पण आदिम वाद्यांचा उपयोग केवळ संगीतासाठीच होत होता असे म्हणता येत नाही. शंख जसा
रणवाद्य होता तसाच अभिषेकपात्रही होता. त्यात तीर्थ ठेवले जात होते. नगारा व धुम्सा ही सुद्धा रणवाद्ये होती. चर्मजडित वाद्ये खुणांच्या बोलीसाठी वापरली जात होती.

खरंतर संगीत वाद्य म्हणजे संगीतोपयोगी नाद निर्माण करण्यासाठी वापरलेले कोणतेही साधन. या अर्थी, मानवी देह, विशेषतः मानवी आवाज, हेच सर्वांत प्राचीन संगीत वाद्य म्हणता येईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यालाच ‘गात्रवीणा' म्हटले आहे. टाळ्या वाजवणे, मांड्या व कुल्ले थोपटणे. जमिनीवर पाय
आपटणे, ह्या क्रिया आदिम वाद्यक्रियाच होत्या. वेदमंत्र गाताना, हातावर आवाज न करता बोटांनी विशिष्ट पद्धतीने जी लयगणना केली जात असे तिला हस्तवीणा म्हणत असत. अशा दैहिक क्रियांचेच रूपांतर हळूहळू स्वतंत्र वाद्ये घडवण्यात झाले. हातोडी किंवा पेचकससारखी अवजारे जशी उद्योगी हाताची कार्यक्षमता वाढवणारी यांत्रिक क्लृप्ती म्हणून निर्माण झाली तशीच टिपरी व कोलाट्टम् कट्टेसारख्या काठ्या किंवा करताल व चिपळ्यांसारखी टाळ्या देणारी वाद्ये मानवी हाताने आपली क्षमता वाढवण्यासाठी तयार केली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ वाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता. मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा, सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या या वाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आज अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.

आता वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. वाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके तयार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात. फरीदसाहेब यांच्यानंतर वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे नेली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात खूप गाजली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील वाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. वाद्यनिर्मितीची ही कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये वाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. अशा वाद्यांच्या पाठीमागील काही कथा,  त्या वाद्यांच्या इतिहासाचा मागोवा या निमित्ताने दिवाळीच्या पांच दिवस " वाद्यमेळा " शीर्षकांतर्गत वाद्यांची कहाणी, परंपरा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा उद्यापासून वाद्यमेळात भेटूच..

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023