Sunday, May 12, 2024

◆ आचार्य शंकर !! 🚩


श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्।
नमामि भगवत्पाद शंकरं लोक शंकरं।।

शंकराचार्य हे नांवच मुळी मंत्रमुग्ध करणारे आहे. त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसात अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होऊन वैदिक धर्माला ग्लानी आली होती. देवकार्य साधण्यासाठी जे म्हणून देवमानव अवतीर्ण झाले, त्या सगळ्यांचा आविर्भाव अलौकिक रीतीनेच झाल्याचे आढळते. त्यांचा जन्म ईश्वरी इच्छेने आणि अप्राकृत व अलौकिक अशा पद्धतीने होतो. ऐतिहासिक युगात जे देवमानव धर्मसंस्थापनेसाठी भूतलावर अवतीर्ण झाले, आणि या जगात धर्मस्थापनेसाठी ज्या दैवीगुणसंपन्न महापुरुषांचा अवतार झाला त्या सर्वांमध्ये आजही आचार्य शंकरांचे अगदी निराळे स्थान आहे. 

ज्याप्रमाणे ढगांना भेदून सूर्याचे किरण बाहेर पडावेत त्याप्रमाणे काळ आणि कल्पनाविलास यांना भेदून प्रगट होणारी शंकराचार्यांची भव्यदिव्य मूर्ती आजही आपणास स्मरणीय आहे.  शंकराचार्य यांची अलौकिक प्रतिभा, मूलग्राही तत्त्वज्ञान, असामान्य चरित्रबल, लोककल्याणाची तळमळ आदी त्यांचे गुण आजही दृश्यमान असले तरी त्याची प्रतिभा आपल्याला जाणवते आणि त्यांच्या अस्तित्वाची चिन्हे ठायींठायी जाणवतात. 

ह्या तरुण संन्याशाने अखंड भ्रमण केले. आपल्या भारतभूमीत पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सर्व टोकांपर्यंत तर त्यांनी पदयात्रा केलीच पण इतर देशांतही ते गेले. कालप्रवाहामध्ये वेदान्तधर्म जणूकाही चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा झाला होता. त्याला त्यांनी मुक्त केले आणि त्याची पुनर्स्थापना केली. वेदान्तधर्माचे उज्ज्वल स्वरूप त्यांनी जगासमोर ठेवले. इतकेच नव्हे तर, त्याला त्यांनी व्यावहारिक रूप दिले. त्यांनी नित्य आचरणीय धर्म सुप्रतिष्ठित केला. सनातन वैदिक आदर्शांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.

शंकराचार्य यांनी भारताच्या चार दिशांना असलेल्या चार प्रांतांत धर्मदुर्गांची म्हणजे चार मठांची स्थापना केली. हे चार मठ म्हणजे जणू काही चाही दरवाजांवर उभे असलेले चतु:सीमेचे रक्षण करणारे पहारेदारच आहेत. त्यांच्या रूपाने जणू चार वेदांचा सर्वत्र उद्घोष होत आहे. त्यांच्यामुळे हिंदूधर्माची विजयपताका आज सगळ्या जगात फडकत आहे. एखाद्या दिग्विजयी सेनापतीची राष्ट्राच्या संरक्षणाची योजना असावी, तशीच ही शंकराचार्यांची धर्मनीती आहे. त्यांनी प्रचलित केलेल्या अद्वैत वेदान्ताचा प्रभाव आज भारतात सर्वत्र आढळतो आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात - "अहो, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी जे लिहिले ते वाचून आधुनिक सभ्यजग विस्मयचकित झाले आहे."

आचार्य शंकर केवळ एक प्रतिभावान दार्शनिकच नव्हते, तर अपरोक्ष अनुभूती आणि तिच्यापासून उत्पन्न झालेली दिव्य प्रेरणा, हेच त्यांच्या जीवनाचे फार मोठे वैशिष्ट्य होते. देहधारी असूनही ते विदेही होते. मानव असूनही ते अमानवी होते. सर्वसामान्य लोकांत वावरत असूनही ते लोकोत्तर होते आणि म्हणूनच ते जगद्गुरू झाले. त्यांनी दिलेला

न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्।।'

हाच मंत्र आमच्या हृदयात सुप्रतिष्ठित व्हायला हवा. त्यायोगे आम्हाला ज्ञानलाभ होवो, अर्थात स्वरूपप्राप्ती होवो. हिंदू धर्माला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे एकरूप करणारे एकमेवाद्वितीय आदिगुरु आचार्य शंकर होते. अगदी अल्पवयांत 'जगद्गुरू' सन्माननीय पदवी त्यांनी संपादित केली, खरंतर विशालता कधीच कवेत घेता येत नाही पण या प्रातः स्मरणीय असणाऱ्या दिव्य भव्य महापुरुषाच्या चरणी सादर प्रणाम. 

सर्वेश फडणवीस

Friday, May 3, 2024

सहवासाच्या चांदण्यात 🌠

चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.

काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.

अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.

पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.

मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात  येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.

वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.

सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर

सर्वेश फडणवीस

Thursday, May 2, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


स्वरगंधर्व सुधीर फडके. १ मे महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात घडलेले आणि मराठी गीतविश्वाला आपल्या संगीताने जागतिक पटलावर घेऊन जाणारे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा बायोपिक बघण्याचा अमृतयोग आला. सुधीर फडके उर्फ बाबूजी तमाम मराठी रसिकांना जीवापेक्षा प्रिय होते. त्यांच्याविषयी सर्व जाणून घेण्याची ओढ आजही मराठी माणसात भरभरून आहे. बाबूजींची संगीतमय कारकीर्द प्रचंड आहे आणि या प्रवासात अनेक किस्से, गोष्टी, प्रसंग असे आहेत, जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट १७० मिनिटे पण पहिला मध्यांतर होईपर्यंत वेळ कसा जातो कळतच नाही. बाबूजींचा प्रवास हा अनेकांना ऐकून माहिती आहे कुणी तो वाचला आहे पण प्रत्यक्ष पडद्यावर बघतांना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दुपटीने वाढणारा आहे. 

बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष  दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात. 

चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.

प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.

सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा. 

नुकतीच रामनवमी झाली. मराठी  रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही  अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक  पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या  प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल. 


या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने

गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे

वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!


सर्वेश फडणवीस 

Wednesday, April 17, 2024

राम- जीवनाची समग्रता !

श्रीरामाने उभारलेल्या सेतूला वाल्मीकींनी 'अभूतपूर्व' म्हटले आहे.'अभूतपूर्वं रामेण सागरे सेतुबन्धनम्।' हे विशेषण समुद्रातल्या सेतूला जितके लागू पडते तितकेच रामाने जोडलेल्या मानवी सेतूलाही. श्रीरामाने नरांना वानरांशी, आर्यांना अनार्य म्हणविल्या जाणाऱ्यांशी जोडले. खरदूषणांचा नाश करून आर्यावर्त किष्किंधेशी जोडला. रावणाशी लढताना समुद्रातील सेतूइतकाच हा मानवी सेतूही उपयोगी पडला आहे. नर, वानर, राक्षस, ऋक्ष (जांबुवान),लंकेहून आलेले रावणाचे चार मंत्री, हे सर्वजण रामाच्या बाजूने रावणाशी लढलेत. खरे तर रामरावणयुद्ध हे 'विषमयुद्ध' म्हणावे लागेल. रावणाचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते, प्रशिक्षित होते आणि संख्येनेही जास्त होते.

रामाकडे शस्त्रांची कमतरता होती. ८७ दिवस चाललेल्या ह्या युद्धात पहिले ८० दिवस रामाकडे साधा रथही नव्हता. शौर्य आणि धैर्य ह्या दोन चाकांवर चालणारा त्याचा 'धर्मरथ' मात्र मजबूत होता. बल, विवेक, दम आणि परोपकार हे त्याच्या रथाचे घोडे होते आणि सत्याची पताका त्या रथावर डौलाने फडकत होती. सद्गुरुकृपेचे अभेद्य चिलखत घालून राम लढत होता. रावणाची सेना 'शिस्त'बद्ध होती तर रामाची सेना रामप्रेमाच्या तंतूंनी 'बद्ध' होती. म्हणून तर युद्धाच्या शेवटच्या दिवशी स्वतः महर्षी अगस्ती रामाच्या राहुटीत आले आणि त्यांनीच दिलेल्या बाणाने रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा अंत झाला. त्याही प्रसंगी प्रभु रामाचे संस्कारशील आचरण आपल्याला अन्तर्मुख करते.

मरणान्तानि वैराणि ! निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो, ममाप्येष यथा तव ॥

मृत्यूनंतर वैर शिल्लक ठेवू नये हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र. उदारता आणि उदात्तता शिकविणारे 'मरणान्तानि वैराणि' हे वाक्य सुभाषिताचा दर्जा लेवून सर्वतोमुखी झाले आहे. 'हा जसा तुझा, तसाच माझाही भाऊ आहे असे समजून याची उत्तरक्रिया कर' असे शब्द फक्त प्रभु रामाच्याच तोंडून निघू शकतात. रामाचा वनवास संपला आणि सीतेची अशोकवनातून, सर्व देवांची रावणाच्या बंदिवासातून आणि समस्त जंबुद्वीपीयांची दहशतीतून सुटका झाली. रामाचे ध्येय साकारले. ऋषींची स्वप्ने पुरी झाली. पण नुसती दहशत मिटवून भागत नसते. नव्या मनूची नवी घडी बसवायची तर आदर्शांचीही स्थापना करावी लागते. तिचा प्रारंभ इथूनच झाला. सीतेच्या पावित्र्याची पूर्ण खात्री असूनही, तिच्या शुद्ध चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर असावा ह्या हेतूने रामाने तिला अग्निदिव्य करायला सांगितले आणि तिनेही ते अगदी हसत केले. इक्ष्वाकूंच्या सिंहासनाला पुसटसाही डाग लागू नये ह्या बाबतीत रामाइतकीच तीही जागरूक होती. राम-सीता वेगळे होतेच कुठे ? एकाच चित्शक्तीची ती दोन रूपे होती.

सीतेवरील उत्कट प्रेम हे श्रीरामाच्या एकपत्नीव्रतामागचे कारण होते हे तर खरेच, पण कदाचित त्याला दुसराही एक आयाम असू शकतो. त्या काळी विशेषतः राजघराण्यात - बहुभार्यापद्धत सर्रास प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांच्या मनाची घुसमट तर होतच असे, शिवाय राजघराण्यातील अंतःस्थ कारवायांनाही खतपाणी मिळत असे. बहुपत्नीप्रथा नसती तर मंथरा कैकेयीच्या मनात सापत्नभावाचे बीज पेरू शकली नसती कदाचित ह्यामुळेही प्रभु रामचंद्राने सर्व नृपतींना एकपत्नीव्रताचा सर्वस्वी नवा असा एक आदर्श घालून दिला असावा. कारण रामाच्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्राच्या उन्नतीचाच विचार असतो.

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी बिभीषण, सुग्रीव, अंगद, जांबुवान, हनुमान हे सर्वजण उपस्थित होते. राज्याभिषेकाचा सोहळा उत्साहात, आनंदात पार पडला. पण बिभीषण आणि सुग्रीव ह्यांना प्रभुचरण सोडून जावेसे वाटत नव्हते. वस्तुतः दोघेही समृद्ध राज्याचे अभिषिक्त राजे पण प्रभुरामाच्या सहवासापुढे त्यांना ती सत्ता आणि वैभवही तुच्छ वाटत होते.रामाची सेवा करत अयोध्येतच रहावे अशी मनीषा त्यांनी लक्ष्मणापाशी बोलून दाखवली. रामाची महती जाणत असल्यामुळे लक्ष्मणालाही त्यात काही वावगे वाटले नाही. रामाला त्याने तसे सुचवले देखील. रामाने त्यांचा मानसन्मान केला आणि गोड शब्दात निरोप दिला, पण ठेवून मात्र घेतले नाही कारण अयोध्येत त्याला परकी संस्कृती रुजू द्यायची नव्हती शिवाय लंकेत पुन्हा राक्षसी संस्कृती फोफावू नये म्हणूनही बिभीषणासारखा परमभागवत तेथेच असावा हाही विचार त्यामागे होता. तसेच किष्किंधेतही राक्षस धार्जिण्या वानरांवर वचक ठेवण्यासाठी सुग्रीवाचे तेथे असणे गरजेचे होते. हेच प्रभु रामाचे द्रष्टेपण होते. अयोध्येचे 'अ'योध्यपण त्याने भंगू दिले नाही. मातृभूमीचे स्वत्व जपणे हेच तर देवत्वाचे लक्षण. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' ही भावना जपणारा राम जन्मभूमीच्या सीमासुरक्षेसाठी असा तत्पर होता.

सर्व देवदेवतांच्या मूर्ती पूर्वाभिमुख असतात, पण रामाचा लाडका हनुमान मात्र दक्षिणमुखी असतो, त्याचेही कारण रामाचे द्रष्टेपण असावे असे वाटते. - लंका भारताच्या दक्षिणेला आहे. भगवद्भक्त बिभीषण तेथे होता हे खरे, पण तो मुळातच संन्यस्त वृत्तीचा. भविष्यात त्याने राज्य कुणा दुसऱ्या राक्षसवंशीयाला सोपवून वनाचा मार्ग धरला तर ?सीमासंरक्षणासाठी दक्षिणेवर सतत नजर ठेवण्याची कामगिरी प्रभुरामाने चिरंजीवित्व लाभलेल्या हनुमंतावर सोपविली असेल. प्रभु रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे. नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. त्याच्या चरित्राचे मनन करता करता, कथेचे पारायण करता करता 'रामपरायण' व्हावे आणि शेवटला 'राम' म्हणण्यापूर्वी, याचि देही याचि 'डोळा 'राममय' व्हावे ह्यातच 'राम' आहे ! नाही का ?

॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day9 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Tuesday, April 16, 2024

तद् वनं भविता राष्ट्रम्

प्रतिभावान कवींच्या कल्पनाशक्तीला 'कैकेयी' ह्या एकाच पात्राने भरपूर खाद्य पुरविले आहे. गीतरामायणकारांनी भरताच्या तोंडून 'माता न तू वैरिणी' असे वदविले तर भासासारख्या श्रेष्ठ नाटककाराने तिला त्यागाचा आणि मातृत्वाचा आदर्श बनविले आहे. पुत्रविरहाने मृत्यू होण्याचा शाप दशरथाला होता. तेव्हा रामाच्या मृत्यूमुळे तसे न होता फक्त 'विरहाने' व्हावे म्हणूनव सिष्ठांच्या सल्ल्याने कैकेयीने रामाला वनवासाला पाठविले आणि सर्वांचा रोष ओढवून घेऊनही रामाचे प्राण वाचविले असे भासाने रंगविले.

कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की 'वैरिणी' ? वाल्मीकिरामायणातली कैकेयी मात्र या दोन्ही टोकांना स्पर्श करत नाही. ती मुळात निष्पापच आहे. रामावर तिचे मनापासून प्रेम आहे आणि रामाचा राज्याभिषेक तिला अपेक्षितच होता. म्हणून तर ती बातमी मिळताच ती आनंदली. पुढे मंथरा म्हणाली की “अगं, आनंदित काय होतेस ? राज्याभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे!” तेव्हाही तिचे उत्तर आहे की 'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' शिवाय रामाच्या सद्गुणांवर तिचा पूर्ण विश्वास आहे. तिच्या मनात विष कालवले ते मंथरेने. तिनेच तिला दशरथाकडे 'उधार' असलेल्या वरांबद्दल भरीस घातले. राम राजा झाल्यावर तुझी दुर्दशा होईल असे भयंकर भडक चित्र तिच्यासमोर रेखाटले. त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या सवतीमत्सराचे काल्पनिक वर्णन करून, राजमाता झाल्यावर कौसल्या तुझा सूड उगवेल ही भीती घातली आणि जुन्या वरांची आठवण करून दिली - मग मात्र कैकेयी बिथरली. 

आपले बोट चाकाच्या आसात घालून ते सावरले अशी कथा सांगितली जाते. त्यातले सार हेच की ती सारथ्यकर्मकुशल होती आणि मोडलेले चाक दुरुस्त करण्याचेही ज्ञान तिला होते, म्हणून ऐन रणधुमाळीतही स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने दशरथाचा रथ ताब्यात घेतला आणि त्याला सुखरूप छावणीत पोचवले. पतीचे प्राण वाचविणे हा मुळी धर्मच आहे अशी तिची धारणा. त्यात आपण विशेष काही केले असे तिला वाटतच नाही. म्हणून, दशरथाने तिला देऊ केलेले वरही तिने हसून नाकारले. आधीच रूपवती, त्यात प्राणदायिनी म्हणून ती दशरथाला अधिकच प्रिय झाली. कैकेयी मात्र दशरथाच्या व चारही मुलांच्या प्रेमातच मग्न होती. तृप्त, संतुष्ट होती. अशी वाल्मीकीने रंगविलेली कैकेयी थोडी अल्लड आहे, पण राक्षसी महत्त्वाकांक्षा तिच्यात नाही. मंथरेने आठवण करून दिली तोपर्यंत त्या दोन वरांचीही गोष्ट ती विसरून गेली होती. पण तरीही रामाच्या वनवासगमनाला आणि दशरथाच्या मृत्यूला मात्र तीच कारणीभूत ठरली. मंथरेने केलेल्या बुद्धिभेदामुळे. 

वनवासाची सूचना ऐकूनही राम अविचलच राहिला आहे. उलट, वनात राहून मुनिजनांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने कैकेयीचे उपकारच मानले. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता जोपासण्याची आणि त्यातून मार्ग काढून कर्तव्यांना नवे आयाम देण्याची ही रामाची वृत्ती नुसती मननीयच नाही तर अनुकरणीयही आहे. 'राजा हा प्रजेचा उपभोगशून्य रक्षक असतो' हीच प्रभु रामाची धारणा. भरतही माझ्याप्रमाणेच प्रजेला सुखात ठेवील ही खात्रीही रामाला होती. त्यामुळे सिंहासनावर कुणी का बसेना, रामाला काहीच फरक वाटला नाही. अनासक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समदृष्टी ह्यांचे इतके वेधक रसायन इतरत्र कुठे दिसणार? भरताबद्दल रामाला वाटणारी खात्री त्याने पुढे चित्रकूटावर लक्ष्मणापाशी बोलूनही दाखविली आहे आणि रामाच्या वनवासकालात राज्याची भरभराट करून, रामाला वाटणारा भरवसा अनाठायी नव्हता हे भरतानेही सिद्ध केले आहे. अहर्निश राष्ट्राचीच चिंता करणारे शासक असले,तर रामराज्य कलियुगातही अवतरू शकेल.

अयोध्येला शोकसागरात लोटून राम निघाला. आता अयोध्याच विस्तारणार होती. सर्व राष्ट्रच आता 'अ'योध्य होणार होते, कारण राक्षसी आतंक संपणार होता. राजप्रासादातील अन्य कोणतीही वस्तू न घेता फक्त आपले परमप्रतापी कोदंड घेऊन राम निघाला. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमीवर झालेले भव्य श्रीराम मंदिर आणि श्रीरामललाचा कोदण्डधारी विग्रह हे याचेच द्योतक तर नव्हे. आता - तद् वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day8 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Monday, April 15, 2024

युगांतर

कथांच्या ओघात प्रवास कसा संपला हे कळलेच नाही. विश्वामित्र
रामलक्ष्मणांसह मिथिलेला पोचले. शिवधनुष्य पाहण्यासाठी दोघेही उत्सुक होते कारण त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे अत्यंत कठीण आहे असे विश्वामित्रांनी सांगितले होते. जनक' हे विशेषनाम नाही. ते मिथिलेच्या अधिपतीचे पद आहे. त्या वेळी सीरध्वज नामक जनक राजपदी आरूढ होते. त्यांच्याकडे वंशपरंपरेने शिवधनुष्याची पूजा होत असे. 'त्या अलौकिक धनुष्याला प्रत्यंचा लावणाऱ्यालाच माझी कन्या सीता देईन' अशी प्रतिज्ञा जनकाने केली होती. विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता कळताच जनकराजा आपल्या शतानंद नामक राजपुरोहिताला पुढे करून स्वतः सामोरा गेला. त्यांच्यासोबत
असणाऱ्या राजपुत्रांना पाहून जनकाने कुतूहलाने त्यांचा परिचय विचारला. विश्वामित्राने कौतुकाने त्यांचे सिद्धाश्रमातले वास्तव्य, राक्षसांचा त्यांनी केलेला वध, अहल्योद्धार हे सर्व सांगून 'महाधनुषि जिज्ञासां कर्तुमागमनं तथा ।' असे नमूद केले. त्यांचा पराक्रम ऐकून प्रभावित झालेल्या जनकाने लगेच धनुष्य तेथे आणविले. ते विशाल धनुष्य एका आठ चाकी गाडीवरून स्वयंवरस्थानी आणले गेले. जनकाने धनुष्याचा महिमा आणि स्वयंवराची अट सांगितली.

स्वयंवरासाठी अनेक राजे- राजपुत्र मिथिलेला आले. प्रत्येकाने शिवधनुष्य उभे करण्याचा प्रयत्न केला पण पराभूत झाले. त्या सर्वांचा पराभव होत असतानाच उद्वेगाने जनकाच्या तोंडून 'निर्वीरमुर्वीतलम्' अर्थात पृथ्वीतलावर एकही वीर उरला नाही असे शब्द निघाले. हे सर्व ऐकून विश्वामित्रांनी रामाला उठण्याची खूण केली आणि 'वत्स राम धनुः पश्य' अशी आज्ञा केली. विश्वामित्रही किती धोरणी होते पहा. श्रीरामाला आधीच पाठवले असते, त्याने प्रत्यंचा चढवला असता तर इतर राजपुत्र म्हणाले असते की ' हे तर आम्हीही करू शकत होतो, पण आम्हाला संधीच मिळाली नाही. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला प्रणाम केला, मग शांतपणे प्रदक्षिणा घातली आणि पटकन ते उभे केले. आता प्रत्यंचा  लावणार तोच कर्णभेदी आवाज झाला.आणि ते धनुष्य भंगले.

ह्या संदर्भात स्वामी गोविन्ददेव गिरि ह्यांच्या प्रवचनातून छान कथा ऐकायला मिळाली. ते म्हणतात की इतर राजेही बलवान होते, महाप्रतापी होते. त्यांना जे जमले नाही ते किशोरवयीन श्रीरामाला साधले ह्याचे मर्मही त्यांच्या विश्वामित्रांसोबतच्या प्रवासात दडलेले आहे. त्यांनी रामाला चौपन्न दिव्यास्त्रांचे ज्ञान दिले होते. ही अस्त्रे त्यांना साक्षात् महादेवाकडून प्राप्त झाली होती. हे धनुष्यही महादेवाचेच. श्रीरामाने प्रथम प्रणाम केला. शिवाचा अनुग्रह जागवला. मग दिव्यास्त्रांचे स्मरण केले. प्रदक्षिणा घालतेवेळी चारही बाजूंनी त्या धनुष्याचे जवळून निरीक्षण केले आणि ओळखीची कळ नजरेस पडताच तिच्या साह्याने धनुष्य सर्रकन उभे केले. इतर राजांकडे ताकद होती, पण हे ज्ञान नव्हते. एकपाठी रामाने सर्व दिव्यास्त्रांचे मनोभावे ग्रहण केले होते म्हणूनच हे अघटित घडू शकले.

धनुर्भंगानंतर श्रीराम जानकीचा विवाह झाला आणि रामाच्या तिघाभावांचा सीतेच्या तिघी बहिणींशी विवाह झाला हे सर्वश्रुतच आहे. पण त्या वेळची एक बाब उल्लेखनीय आहे. जनकाचा कुलपुरोहित शतानंद हा अहल्येचा पुत्र. विश्वामित्रांशी भेट होताक्षणीच तो विचारतो, "माझ्या मातेचा उद्धार झाला ना? पिताश्रींनी तिचा स्वीकार केला ना?" त्यावर विश्वामित्र शांतपणे उत्तरतात, "हो. जसे ठरले होते तसेच सर्व घडले." गौतमही बोलले होते की, "रामा, मिथिलेत तुला शतानंद भेटेल." ह्याचाच अर्थ असा की श्रीरामाच्या बाबतीत सर्व ऋषींची पूर्वयोजना आणि परस्परप्रेरणा (telepathy) जबरदस्त होती.

श्रीरामाच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे बारीक लक्ष होते, कारण रामाच्या रूपातच त्यांना उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत होता. विवाहविधी आटोपल्यावर विश्वामित्र दशरथाला म्हणाले, "राजन्, तुमचा राम तुम्हाला सोपवला. माझे काम झाले. आता मी निघतो,' ह्या शब्दांचा फार खोल अर्थ आहे. अयोध्येहून निघतानाचा अनुभवी राम आणि आता अयोध्येला परतणारा पुरुषार्थी राम ह्यात कमालीचे अंतर आहे. हे कर्तृत्व विश्वामित्राचे. हे काम पूर्ण करून विश्वामित्र तपस्येसाठी निघून गेले आणि ते रामाला परत कधी भेटलेही नाहीत. ते निघताना राम प्रणाम करतो आणि गुरुदक्षिणेबद्दल विचारतो, तेव्हा ते उद्गारतात, "मी सांगितलेल्या ध्येयानुसार आचरण हीच माझी गुरुदक्षिणा मला हवी" कर्तव्यपूर्ततेत कसूर करायची नाही पण कुठे ममत्वभावाने अडकायचेही नाही असा 'पद्मपत्रमिवाम्भसा' वृत्तीचा वस्तुपाठ ब्रहार्षि विश्वामित्रांच्या ठायी येथे प्रत्यक्ष दिसतो. 'राम' घडतो तो अशाच संस्कारांमुळे आणि हेच पुढच्या योजनेचे युगांतर होते.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day7 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Sunday, April 14, 2024

संस्कारयात्रा

एका त्राटिकेचा वध करून श्रीरामाने कितीतरी गोष्टी साधल्या. एक ओसाड प्रदेश वसतीयोग्य बनला, कारण त्राटिकरूपी दहशत दूर झाली. मुख्य म्हणजे रावणी साम्राज्याला एक हादरा बसला आणि धर्मनिष्ठांना मानसिक बळ मिळाले. त्राटिकावधानंतरच्या प्रवासात विश्वामित्रांनी रामालाच दिव्यास्त्रे दिली असा निर्देश रामायणात आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कथांच्या माध्यमातून त्यांनी रामाला दिलेले संस्कारधन. ते अधिक मूल्यवान आहे. 

अयोध्येहून विश्वामित्र रामलक्ष्मणासमवेत षष्ठीला निघाले ते नवमीला सिद्धाश्रमात पोचले. नंतर सहा दिवस यज्ञ चालला तेव्हा विश्वामित्रांनी मौनव्रत धारण केले होते असे वाल्मीकी सांगतात. ह्या यज्ञात मारीच आणि सुबाहू ह्या राक्षसांच्या टोळीने विघ्ने आणायचा प्रयत्नही केला होता. पण श्रीरामाने सुबाहूचा आणि त्याच्या साथीदारांचा वध केला आणि मारीचाला बाणाने कैक योजने दूर फेकून दिले. यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्या आश्रमाचे' सिद्धाश्रम' हे नाव यज्ञ सिद्धीस गेल्यामुळे सार्थ ठरले. 

यज्ञाच्या सांगतेनंतर पंचमीला विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन मिथिलेला निघाले, ते अष्टमीला पोचले असा उल्लेख रामायणात आहे. ह्या दोन्ही प्रवासात (अयोध्या ते सिद्धाश्रम आणि सिद्धाश्रम -मिथिला) अनेक कथा मुनींनी दोघा रघुकुमारांना सांगितल्या आहेत. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून ह्या कथा सांगितल्या असाव्यात असे वरवर विचार करणाऱ्याला वाटेल, पण अन्तःस्थ हेतू आहे श्रीरामलक्ष्मणांच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याचा . ती एक संस्कारयात्रा आहे.

त्राटिकावधानंतर सिद्धाश्रमाला जाताना विश्वामित्रांनीस मुद्रमंथनाची कथा सांगितली आहे. देव-दानवांच्या एकजुटीमुळेच समुद्रमंथनासारखे प्रचंड आणि अवघड कार्य सिद्धीस जाऊ शकते, पण फलप्राप्तीच्या वेळी मात्र श्रेयाचा धनी कोण असा अन्तःकलह माजला तर तो एकाला संपवूनच शांत होतो हे दोन संदेश श्रीरामाला ह्या कथेतून मिळाले आहेत.

दुसऱ्या दिवशी गंगाकिनारी पोचल्यावर रामाच्या मनात ध्येयवाद जागविण्यासाठी विश्वामित्रांनी गंगावतरणाची कथा सांगितली आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सागर-सगरपौत्र अंशुमान-दिलीप-भगीरथ अशा तब्बल चार पिढ्या खपल्या आहेत. महत्कार्य साकारावयाचे असेल तर सातत्याने अथक प्रयत्न करावेच लागतात आणि त्यात दोन-तीन पिढ्या गारद झाल्या तरी खचायचे नसते हा संदेश ह्या कथेद्वारे दिला गेला आहे.

पुढे वनवासाच्या चौदा वर्षात कितीतरी आपत्ती श्रीरामावरको सळल्या. तरीही त्याच्या प्रयत्नात कधी खंड पडला नाही. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत त्याने रामराज्याची स्थापना केली, ती ह्या संस्कारांमुळेच. 'यत्न तो देव जाणावा' असे शब्द फक्त 'राम'दासाच्याच मुखातून येऊ शकतात. विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथांपैकी सर्वात महत्त्वाची दूरगामी परिणाम करणारी कथा आहे बळीराजाची. राक्षसांच्या वरवरच्या आचरणाला भुलू नये आणि जिंकलेल्या प्रदेशांबद्दल लोभ बाळगू नये हे दोन महत्त्वाचे संदेश विश्वामित्रांनी रामाला ह्या कथेद्वारे दिले आहेत आणि सुज्ञ रामाने विश्वामित्रांच्या संदेशांचे पुढे तंतोतंत पालन केले आहे. 

वालीचे निर्दालन करून किष्किंधा सुग्रीवाला सोपवली आहे आणि रावणाचा बीमोड करून बिभीषणाला राज्याभिषेक केला आहे. अशाच तऱ्हेच्या इतर अनेक कथा या संस्कारयात्रेत श्रीरामाने ऐकल्या. मदनदहनाच्या कथेतून कामविकारावर नियंत्रण ठेवण्याचा, कार्तिकेयाच्या कथेतून सेनानेतृत्वाची लक्षणे जोपासण्याचा तर गौतमाने इन्द्राला दिलेल्या शापाच्या माध्यमातून 'व्यभिचाराला क्षमा नाही', ह्या तत्त्वाचा संस्कार श्रीरामाने ग्रहण केला. मूळच्या लखलखत्या हिऱ्याला आता अनेक तेजस्वी पैलू पडत होते. संस्कारयात्रा सफल होत होती.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day6 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏



Saturday, April 13, 2024

आपदाम् अपहर्ता राम


श्रीरामाची विमनस्कता घालवून त्यांच्यात उत्साहाचे बीज पेरण्याचे काम वसिष्ठांनी केले आणि त्या बीजाला वाढवून अंकुरविण्याचे, अंकुराला योग्य दिशेला वळविण्याचे काम महर्षी विश्वामित्रांनी केले. एक दिवस दशरथाकडे येऊन विश्वामित्र म्हणाले,“राक्षस आमच्या यज्ञात नेहमीच विघ्ने आणतात. मला येत्या नवमीला सहा दिवसांचा यज्ञ करायचा आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी तुझे राम-लक्ष्मण मला दे. "

मुळात विश्वमित्रांना रामाला बाहेर काढायचे होते. घडवायचे होते. त्याचे तन-मन कणखर बनवायचे होते. भावी उद्दिष्टांचे (जी उद्दिष्टे पुत्रकामेष्टीच्या वेळीच ठरली होती, त्यांचे) बीजारोपण करायचे होते, ज्या दिव्यास्त्रांचे ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष महादेवाकडून प्राप्त करून घेतले ती दिव्यास्त्रे रामाला प्रदान करायची होती. रामलक्ष्मणांना जाऊ देण्यास दशरथ कचरतो आहे हे पाहिल्यावर गुरु वसिष्ठांनी हस्तक्षेप केला आणि विश्वामित्रासारख्या समर्थ ऋषीच्या सहवासात राजपुत्रांचे भलेच होईल ह्याची ग्वाही देऊन त्यांना विश्वामित्रासोबत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

श्रीरामाचे व्यक्तित्व घडवून आणण्यात दोघांचे एकमत आहे. राष्ट्रहित साधायचे असेल तर वैयक्तिक हेवेदावे बाजूलाच ठेवायचे असतात ह्या गोष्टीचा त्यांना कधीच विसर पडत नाही. जेव्हा असे होते तेव्हाच 'राम'राज्याची पायाभरणी होत असते. गुरूच्या आज्ञेचा अधिक्षेप रघुवंशीयांनी कधीही केला नाही, म्हणूनच दशरथाची अनुज्ञा मिळाली आणि रामलक्ष्मण विश्वामित्रासह सिद्धाश्रमाकडे निघाले. दशरथाने रथ देऊ केला तोही विश्वामित्रांनी नाकारला. दोघांना मुद्दामच पायी नेले.  त्या तिघांचा पहिला पडाव पडला शरयूतीरावर. तेथे विश्वामित्रांनी 'बला' आणि 'अतिबला' ह्या विद्या शिकविल्या. ह्या विद्यांमुळे तहान, भूक आणि निद्रा ह्यांवर ताबा ठेवता येतो. निर्णयक्षमताही वाढते. या विद्या म्हणजे वस्तुतः अस्त्रेच होत. ही अस्त्रे जया आणि सुप्रभा ह्या दोन स्त्रियांनी निर्माण केली होती हे विशेष. ह्या दोघी दक्षप्रजापतीच्या कन्या आणि कश्यपांच्या भार्या होत्या.

दुसऱ्या दिवशी ते कन्दर्पऋषींच्या आश्रमाकडे निघाले. जाताना प्रत्येक प्रदेशाची माहिती विश्वामित्र देत होते. तिथल्या समस्यांचा परिचय करून देत होते. पूर्वी तीर्थाटनाच्या वेळी ज्या समस्या पाहून रामाचे मन नैराश्याने काळवंडले होते, त्याच समस्यांकडे राम आता त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पाहात होता. 'आपदाम् अपहर्ता' तयार होत होता. तिसऱ्या दिवशी नावेत बसून तिघांनी गंगा पार केली. जो पहिला मुनी रावणाच्या पारिपत्याची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरला होता, त्या अगस्तीचा आता उजाड नि भकास झालेला आश्रम विश्वामित्रांनी दाखविला. त्याची दहा मुले राक्षसांनी खाऊन टाकली होती आणि त्यामागे त्राटिकेचा हात होता हे सांगत असतानाच त्राटिका तेथे अवतरली.  खरे तर ही त्राटिका मुळात राक्षसी नव्हती. सुकेतु नामक एका सदाचारसंपन्न यक्षाची ती कन्या अपत्यहीन सुकेतूने अपत्यप्राप्तीसाठी मोठे तप केले. त्यामुळे संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे ही कन्या त्याला झाली. त्याच्याच वराद्वारे तिला सहस्र गजांचे बळ प्राप्त झाले. जंभपुत्र सुंदाशी तिचा विवाह झाला. पुढे अगस्ती मुनींच्या शापाने सुंद मरण पावला तेव्हापासून ती क्रुद्ध आणि बेफाम बनली आणि अगस्तींच्या प्रदेशाचा विध्वंस करत फिरत होती. तीच त्राटिका आता रामलक्ष्मणांपुढे उभी होती. श्रीरामाने त्राटिकेचा वध केला.

अहल्योद्धाराची घटनाही ह्याच प्रवासात घडली आहे. रामलक्ष्मणासह विश्वामित्र गौतमाश्रमापाशी आले आणि त्यांनी हकीकत सांगितली की 'गौतमपत्नी अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या. एक दिवस गौतम ऋषी घरी नसताना इन्द्र संधी साधून तिच्याकडे आला. मुनिवेष घेऊन. तिने त्याला ओळखले, पण तीही मोहवश झाली. नको ते घडले. इन्द्र कुटीतून निघत असताना गौतम परतले आणि तेथेच त्यांनी इन्द्राला शाप दिला. देवांचा राजा असला तरी अशा अपराधाला क्षमा नाही. अहल्येला प्रायश्चित्त सांगताना ते म्हणतात

वातभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी ।
अदृश्या सर्वभूतानामाश्रमेऽस्मिन् वसिष्यसि ।।
अर्थात् - ह्याच आश्रमात तू तप करत, अन्नपाण्याचा त्याग करून धुळीत पडून रहा. कुणाच्या संपर्कात येऊ नकोस. म्हणजेच दगडाधोंड्याप्रमाणे निश्चल, निर्विकार आणि निराहार रहा. तिला असा आदेश देऊन गौतमही तपश्चर्येसाठी निघून गेले. तेव्हापासून हा आश्रम ओसाड पडला आहे. जेव्हा ते तिघेजण आत शिरले तेव्हा एका शिळेआड तपस्यारत अहल्या त्यांना दिसली. तिच्या हातून चुकून, तेही एकदाच पाप घडले होते. पण आता ती अक्षरश: दगड झाली होती. पतीच्या आदेशाचे तिने सर्वतोपरी पालन केले होते. श्रीरामाने पुढे होऊन तिला नमस्कार केला असे वर्णन वाल्मीकीने केले आहे. ज्या क्षणी श्रीराम तिच्यापुढे नमस्कारासाठी वाकला, त्याच क्षणी सिद्ध झाले की तिची पापे धुतली गेली. तिच्या मनाचा झालेला 'दगड' वितळला. ती पुन्हा अहल्या झाली. तिचे डोळे पाझरू लागले. रामाने तिचे आतिथ्य स्वीकारले आणि सिद्ध केले की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतेही किल्मिष नाही. त्याच वेळी गौतमही तप संपवून परतले होते. रामाने दोघांनाही प्रणाम केला. गौतमांचेही नेत्र पाणावले. या पुनर्भेटीनंतर दोघांनी जोडीने श्रीरामाची पूजा केली. त्यांच्या पुनर्मीलनाचे प्रतीक म्हणून रामाने ती स्वीकारली.

अचूक शरसंधान करून त्राटिकेला संपविणारा 'पुरुषार्थी' राम आणि अहल्योद्धार करणारा 'पतितोद्धारक' राम ही दोन्ही रूपे 'आपदाम् अपहर्ता' रामाचीच. म्हणूनच म्हणतात ना,

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day5 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Friday, April 12, 2024

रामो रमयतां वरः

रामायणात वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, वाल्मीकि, अत्रि, शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्ती अशा अनेक ऋषींचा उल्लेख आढळतो. ह्या प्रत्येक ऋषीचा आश्रम म्हणजे एकेक सांस्कृतिक केंद्रच होते. हे ऋषि आत्मज्ञानी होते, पण आत्मकेंद्रित नव्हते. धर्मनिष्ठ लोकांची रावणाने केलेली गळचेपी त्यांना अस्वस्थ करत होती. 'बुडती हे जन, देखवेना डोळा' अशी अवस्था झाली होती. त्यांच्याकडे ब्राह्मतेज होते, पण त्याला क्षात्र तेजाची जोड हवी होती. ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती एकत्र आल्याशिवाय रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा सामना करणे शक्य नाही हे त्यांना जाणवत होते, पण हे घडावे कसे ?

शब्दवेधी दशरथाचा बाण चुकून श्रावणबाळाला लागला पण दशरथ हा रघुवंशी राजा आहे. शूर आहे, पण निष्ठुर नाही. पापभीरू आहे. त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्या सत्यनिष्ठ राजाने राजकुलगुरु वसिष्ठांकडे मन मोकळे केले. वसिष्ठांनी त्याला अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. वर्षभर चालणाऱ्या ह्या यज्ञप्रसंगी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यातले सर्व प्रमुख ऋषिवर अयोध्येत एकत्र आले होते. यज्ञकृत्ये आटोपल्यानंतरच्या वेळात त्यांचा विचारविनिमय चालत असे. तिथेच ही योजना ठरली की दशरथाला होणाऱ्या पुत्राच्या हातूनच रावणरूपी अनिष्ट दूर करायचे.

पुत्रकामेष्टी यज्ञ विभांडकपुत्र महर्षि ऋष्यशृंगाच्याच हातून व्हावा असा आग्रह वसिष्ठांनी धरला. त्याचेही खास कारण आहे. वस्तुतः स्वतः वसिष्ठांचा अधिकार कमी नव्हता. त्यातून रघुवंशाचे ते कुलगुरू होते. तरीही हा आग्रह कारण ऋष्यशृंगाचे जीवन आणि मन्त्रोच्चारही तपःपूत होते. पण तसे तर प्रत्यक्ष वसिष्ठांचेही होते पण ऋष्यशृंगाला वनौषधींचेही परिपूर्ण ज्ञान होते. दशरथाला दिव्य गुणयुक्त पुत्र व्हावा ह्याच हेतूने वसिष्ठांनी ऋष्यशृंगाबद्दलचा आग्रह धरला आहे. यज्ञ संकल्प केल्यापासून वर्षभर दशरथ आणि तिन्ही राण्या व्रतस्थ आहेत. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करताहेत. आहारही मोजका आणि विशिष्ट आहे. त्यानंतरच दशरथाला मंत्रसिद्ध दिव्य पायसाची प्राप्ती झाली आहे. पट्टराणी म्हणून कौसल्येला आणि आवडती म्हणून कैकेयीला दशरथाने तो पायस अर्धाअर्धा दिला. पण दोघींच्याही मनाचा मोठेपणा की दोघींनीही आपापल्या पायसातला अर्धाअर्धा भाग सुमित्रेला दिला. सुमित्रेला जुळी मुले होणे आणि त्यापैकी लक्ष्मण कौसल्यानंदनाचा आणि शत्रुघ्न कैकेयीपुत्राचा अनुचर होण्यामागे हेच कारण असू शकते.

चैत्र शु. नवमी मंगळवार माध्याह्न वेळी पुनर्वसु नक्षत्रावर कौसल्येला पुत्रलाभ झाला. चैत्र शु. दशमी बुधवार सूर्योदयापूर्वी पुष्य नक्षत्रावर कैकेयीला पुत्रलाभ झाला आणि चैत्र शु. एकादशी गुरुवार माध्याह्न वेळी पुष्य नक्षत्रावर सुमित्रेला पुत्रद्वय झाले. कुलगुरु वसिष्ठांनी ज्येष्ठ पुत्राचे नाव ठेवले 'राम' 'रमन्ते योगिनोऽस्मिन्' असा तो राम. कैकेयीपुत्राचे नाव ठेवले 'भरत'. 'भरणात् भरतः भरणपोषण करणारा तो भरत. सुमित्रेच्या पुत्रांपैकी मोठ्याचे नाव वसिष्ठांनी 'लक्ष्मण' ठेवले. लक्ष्मीवान् स लक्ष्मणः वाल्मीकि रामायणात लक्ष्मणाला श्रीरामाचा 'बहिश्चर प्राण' म्हटले आहे. रामभक्ती हीच लक्ष्मणाची लक्ष्मी आहे. त्याच्या भावाचे नाव शत्रुघ्न. शत्रुं हन्ति इति शत्रुघ्नः संत तुलसीदास म्हणतात की तो शत्रूला मारतो म्हणून शत्रुघ्न नव्हे, तर ज्याचे नुसते नाव घेतले तरी शत्रू नामोहरम होतो म्हणून तो शत्रुघ्न. 'जाके सुमिरन ते रिपु नासा'। महर्षी वसिष्ठांनी चारी राजकुमारांची जी नावे ठेवली ती चौघांनीही सार्थ करून दाखवली. चौघेही एकाच वयाचे. पुढे चौघांचेही विद्याध्ययन वसिष्ठांच्याच आश्रमात झाले.

'सत्यं वद । धर्मं चर। स्वाध्यायात् मा प्रमदः।' या उपदेशाचे त्यांनी गुरुकुलात अक्षरश: पालन केले. चारही भावांचे अध्ययन संपले. वाल्मीकिमहर्षि म्हणतात -
सर्वे ज्ञानोपसम्पन्नाः, सर्वे समुदिता गुणैः।
सर्वे वेदविदः शूराः, सर्वे लोकहिते रताः ॥

खरे तर हे वर्णन चौघाही भावांचे आहे. चौघेही ज्ञानसम्पन्न, गुणी, सुशील आहेत. पण तेषामपि महातेजा रामः सत्यपराक्रमः असे नोंदवायला वाल्मीकि विसरले नाहीत. प्रभु राम 'आपदाम् अपहर्ता' आणि 'सर्वसम्पदां दाता' बनला तो अशा संस्कारांनी. महर्षि वसिष्ठांच्या उपदेशामुळे उत्साहाने परिपूर्ण बनलेल्या रामाच्या व्यक्तित्वाला नंतर अधिक पैलू पाडले ते ब्रह्मर्षि विश्वामित्रांनी. दशरथपुत्र राम हा खऱ्या अर्थाने 'रमयतां वरः' घडला तो ह्या दोन महर्षीमुळे.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day4 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Thursday, April 11, 2024

रामो विग्रहवान् धर्मः


प्रभु रामचन्द्राच्या परमेशत्वाचे मर्म जाणण्यासाठी त्यांच्या जन्माआधीच्या परिस्थितीचा आढावा घेणे योग्य ठरेल. तसे केल्यास स्पष्ट दिसून येते की त्यावेळी जम्बुद्वीपाची परिस्थिती मुळीच समाधानकारक नव्हती. तसे पाहता रामाची राजधानी अयोध्या. त्या नगरीत कमालीची सुबत्ता होती असे महर्षि वाल्मीकी म्हणतात.

'अयोध्या नाम नगरी तत्रासीत् लोकविश्रुता।' असे सांगून वाल्मीकींनी म्हटले आहे की

तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः ।

नरास्तुष्टा धनैः स्वैः स्वैरलुब्धाः सत्यवादिनः ॥

अयोध्येच्या नागरिकांविषयीही आदिकवीचे उद्गार आहेत की

 'द्रष्टुं शक्यमयोध्यायां नाविद्वान्न च नास्तिकः।' 

अयोध्येत ही सुबत्ता रघुवंशीय नृपांच्या पुण्याईमुळे नांदत होती. पण इतरत्र ? अखिल जम्बुद्वीपाचा विचार केल्यास मात्र स्थिती सन्तोषजनक नव्हती असेच म्हणावे लागेल आणि जम्बुद्वीपाचे राजकीय चित्र केविलवाणेच होते. 

रावणासारख्या अत्याचाऱ्यांचे फावते ते ह्यामुळेच. रावण हा काही सामान्य नव्हता. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून, शिवशंकराकडून वरदान प्राप्त करू शकणारा तो तपस्वी होता. मन्त्रवेत्ता होता. मंत्रांचा संबंध चित्तशुद्धीशी नाही, तर प्राणशक्तीच्या स्पन्दनांशी असतो. म्हणून उद्दाम असूनही रावणापाशी मंत्रांचे बळ आहे, शस्त्रांचे तर आहेच, शिवाय शास्त्रांचेही आहे. तो प्रकांड पंडित होता. वेदांचा पदपाठ त्यानेच केला असे म्हणतात. त्याचे शिवताण्डवस्तोत्र म्हणजे उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. मात्र रावण उन्मत्त आहे. सुजन नाही. शस्त्र, शास्त्र आणि मंत्र ही तिन्ही बळे (हत्यारे, ज्ञान आणि तंत्र - technique) जेव्हा दुर्जनाकडे एकवटतात तेव्हा राक्षसी प्रवृत्तीला ऊत येतोच.'साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव ते मताः।

श्रीरामाच्या जन्माआधी रावणाचे प्रस्थ माजण्यामागे एक अंग होते - सांस्कृतिक भेदभावनेचे. उत्तरेकडील लोक स्वत:ला 'आर्य' म्हणवून घेत. म्हणूनच त्यांचा प्रदेश 'आर्यावर्त'. किष्किंधेतील लोकांना ते वेगळे मानत. पुत्रकामेष्टीच्या वेळी दशरथाने कितीतरी राजांना निमंत्रित केले होते, पण किष्किंधेच्या राजाला मात्र आमंत्रण नव्हते हे येथे उल्लेखनीय आहे. आर्य लोक त्यांना 'वानर' म्हणत. हे वानर म्हणजे एक मानववंशच. वानरांचा तोंडवळा, राहणीमान नागर आर्यांपेक्षा वेगळे असले तरी आर्य संस्कृतीचाच तो एक वेगळा कप्पा होता. उन्हापावसाची पर्वा न करता रानावनात हिंडणे, निवाऱ्याची आवश्यकता नसणे, शिजलेल्या अन्नाऐवजी फळांनी पोट भरणे इत्यादी वानरसदृश चेष्टितांमुळे कदाचित् त्यांना वानर म्हणत असावेत. किंवा  वानरबहुल प्रदेशात वास्तव्य असल्यामुळेही त्यांना 'वानर' संज्ञा मिळाली असावी. पण काही झाले तरी ते मानवच होते. तरीही आर्यावर्तापासून तुटलेले होते. आर्य-वानरात कधीही सख्य नव्हते. रोटीबेटीव्यवहार तर दूरच पण एकूणच, उत्तर-दक्षिण जम्बुद्वीपात मानसिक दुरावा होता. अशा तऱ्हेने दुभंगलेल्या देशावर हल्ला करणे शत्रूला सोपे जातेच. मुत्सद्दी रावणाने नेमका ह्याचाच फायदा घेतला होता आणि म्हणूनच, सुशासन आणि सुबत्ता असूनही जम्बुद्वीप वासीयांना शेकडो मैल दूर असणाऱ्या रावणाची दहशत वाटत होती. थोडक्यात सांगायचे तर रामजन्माआधी संपूर्ण जम्बुद्वीप आतून पोखरलेले होते.

पं. सातवळेकरांच्या मते, 'रामायणकथा हा चार मानववंशांच्या संबंधाचा इतिहास आहे.' देव, मानव, राक्षस व वानर हे ते चार वंश. वालीशी सख्य करून रावणाने वानरांचे पाठबळ मिळविले होते आणि देव + मानव विरुद्ध राक्षस + वानर अशा ह्या संघर्षांत राक्षसांचे पारडे जड होते. वानर मुळात अत्याचारी वा आततायी नव्हते. ती एक शूर पण भाबडी जमात. योग्य वाट दाखविणारा त्यांना कुणी लाभला नव्हता, म्हणून तर वाली रावणाकडे खेचला गेला. त्याच्या शब्दव्यूहात अडकला. येथे रामाचे कर्तृत्व हे की त्या वानरांना त्याने आधी आपलेसे केले. (केवट, गुह, शबरी इत्यादिकांशीही रामाची वागणूक आपुलकीची होतीच.) समाजातली उच्च - नीचतेची दरी श्रीरामाने बुजवली, वानरांना जवळ केले आणि अत्याचारी रावणाची अर्धी शक्ती कमी केली. जे पूर्वीच्या अनेक पिढ्यांना शक्य झाले नव्हते ते 'रामराज्य' श्रीरामाने स्थापित केले! - (शेतीशिवाय इतर काहीही न जाणणाऱ्या मावळ्यांना हाताशी घेऊन, त्यांच्या मनात स्वराज्यस्थापनेचा स्फुल्लिंग चेतवून हिंदुपदपातशाही स्थापणाऱ्या शिवछत्रपतीला माता जिजाऊने ह्या रामाची कथा ऐकवूनच घडविले होते ना!) हेच श्रीरामाच्या परमेशत्वाचे मर्म. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day3 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏


Wednesday, April 10, 2024

प्रभाते मनी राम चिन्तीत जावा

जेव्हा आपण म्हणतो की "या गोष्टीत काही 'राम' नाही" तेव्हा 'राम' हा शब्द 'तथ्य' शब्दाचा पर्याय झालेला असतो. 'रामबाण उपाय' हा वाक्प्रयोग मराठीतही आहे, हिन्दीतही आहे आणि बहुधा सर्वच भारतीय भाषात तो आढळतो. 'रामबाण' हे मुळात एक सामासिक नाम ! पण ते विशेषण बनून येतं आणि 'अचूक, अमोघ' हा अर्थ दर्शवितं. प्रात:काळचा शुद्ध, मंगल प्रहर आपल्या भाषेत 'रामप्रहर' होऊन उगवतो. हिन्दीत तर मिठाला 'रामरस' म्हणतात. किती समर्पक ! चिमूटभर मिठावाचून जसं ताटभर भोजन बेचव, तसंच सूक्ष्म रामतत्त्वावाचून दीर्घ जीवनही निरर्थक! इथे 'राम' शब्द रसवत्तेचं अधिष्ठान आहे. - भेटल्यावर 'नमस्ते' म्हणणं ही आधुनिक पद्धत. (आता तर good morning - good evening मुळे तीही लोपत चालली आहे!) पण खेड्यात अजूनही 'रामराम' म्हटलं जातं. दोन हिन्दीभाषी भेटले की 'जै (जय) रामजी की' हे शब्द उत्स्फूर्ततेनं निघतात. नमस्ते नमः ते = तुला नमस्कार) पेक्षा 'जय रामजी की'ची खुमारी काही वेगळीच ! ते नमन असतं अन्तर्यामी वसणाऱ्या 'आत्मा' रामाला ! म्हणजे अवघ्या जीवनातली सार्थकता ('राम' असणे) अचूकपणा (रामबाण), विशुद्धता (रामप्रहर), रसवत्ता (रामरस) आणि सर्वव्यापित्व (रामराम) ह्या सर्व भावना व्यक्तविण्याचं सामर्थ्य 'राम' ह्या एकाच शब्दात आहे! जीवनातला परमोच्च आदर्श म्हणजे राम!

प्रभु रामाचं चरित्र अनेकांनी गायिलेलं आहे. मराठीत भावार्थरामायण आहे, रामविजय आहे, हिन्दीत रामचरितमानस आहे, बंगालीत कृत्तिवास-रामायण, गुजरातीत गिरधरकृत रामायण, तेलुगु भाषेत रंगनाथ रामायण, उडियामध्ये कवि बलराम दाश यांनी रचलेले जगमोहन रामायण तर तमिळमध्ये कंबरामायण ! रामाची कथा प्रत्येक भाषेला 'आपली' वाटली, आणि प्रत्येक कवीनं आपापल्या कल्पनेनुसार त्यात अनेक उपकथानकं जोडून ती कथा अधिकाधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला! पण त्यामुळे एक गोंधळ झाला! स्थल-कालांच्या संदर्भात फरक दिसू लागला. कोणत्या रामकथेला खरं मानावं? उत्तर एकच ! रामाचा समकालीन असणाऱ्या महर्षि वाल्मीकींच्या लेखणीतून अवतरलेली मूळ रामकथाच प्रमाण मानायची !

मूळ वाल्मीकिरामायण, पं. सातवळेकरांचं भाष्य, वं. मावशींची (केळकर) प्रवचनं, श्रद्धेय गुरुचरण स्वामी गोविंददेवगिरि यांची प्रवचनं, या सर्वांतून मी 'राम' शोधत गेलो. त्यातून मला जे आणि जितकं उमगलं, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात आहे. तटस्थ दृष्टीनं विचार केला तर राम हा एक क्षत्रिय राजकुमार. श्रीरामानं स्वतः कधीच म्हटलं नाही की मी ईश्वराचा अवतार आहे. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' हे त्याचं प्रांजळ वचन वाल्मीकीनं नोंदवलं आहे.

व्यष्टीपेक्षा समष्टी श्रेष्ठ आहे हा विवेक श्रीरामाला क्षणभरही सोडून गेला नाही. त्यामुळेच तो नराचा नारायण झाला. प्रत्येकाच्या मुखी येऊ लागलं की,
माता रामो, मत्पिता रामचन्द्रः ।
स्वामी रामो, मत्सखा रामचन्द्रः ॥
प्रभु राम हा आदर्शाचा, मांगल्याचा, अचूकतेचा नि रसवत्तेचा पर्याय बनला, आणि सुजनांच्या मनात दाटून आलं की 'प्रभाते मनी राम चिन्तीत जावा'.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day2 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

लोकाभिराम श्रीराम 🙌

आजपासून रामनवमी पर्यंत रोज एक नवा विचार ह्या माध्यमातून पोस्ट करणार आहे. सकारात्मक विचार ही आजची गरज आहे. मला वैयक्तिक रित्या आवडलेला ग्रंथ म्हणजे डॉ. लीना रस्तोगी यांचा " मला उमगलेला राम " हा लेखसंग्रह. हे छोटेसेच पण सुंदर पुस्तक आहे. या पुस्तकाला यावर्षी एक तप अर्थात बारा वर्षे पूर्ण झाले आणि याच वर्षी अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदिराची पूर्णाहुतीही जगाने अनुभवली. ५०० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर यंदा रामजन्मोत्सव होणार आहे. 'लोकाभिराम श्रीराम' अंतर्गत विचार चिंतन वाचायला नक्की आवडतील असा विश्वास आहे. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचे आशीर्वचन ग्रंथाला लाभले आहे. स्वामीजी लिहितात,

श्रीराम प्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा,
भावविश्वाचा केंद्रबिंदू. आबालवृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित, आस्तिक- नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध-सर्वांच्याच मनात रामाला काही ना काही तरी स्थान आढळतेच. अगदी पाश्चात्य विचारधारेने ज्यांचे अंत:करणच पाश्चात्यीभूत झालेले असते त्यांनाही सश्रद्ध भारतीयांच्या अंत:करणात विराजमान झालेल्या रामप्रभूंच्या मूर्तीचे भंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यातच मोठा पुरुषार्थ वाटतो. मग स्वतःच्या बुद्धीची परिसीमा गाठणाऱ्या चिकित्सक बुद्धिमंतांना याच प्रभुचरित्राचा पुनश्च धांडोळा घेऊन त्याचे एक नवेच रूप लोकांसमोर मांडण्यात कृतकृत्यता वाटावी यात काय नवल ?

याच मालिकेतील एक अगदी अलीकडचा यशस्वी प्रयत्न म्हणजे
नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्कृत विदुषी डॉ. लीना रस्तोगी यांचे 'मला उमजलेला राम' हा चिमुकला ग्रंथ. 'चिमुकला' असे म्हटले ते याच्या जेमतेम ७०पृष्ठव्याप्तीकडे पाहून. पण सूत्रं जशी 'अल्पाक्षर' पण 'सारगर्भ' असतात त्याप्रमाणे या लेखांमधून ही 'अनंता हरिकथा', तिचे अनंत पैलू आकळण्याचा अत्यंत प्रभावी प्रयत्न केला आहे.

पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आदिकवी वाल्मीकीने लिहिले आहे. ते 'रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. वाल्मीकीचा श्रीराम जसा थोर आहे, आदर्श आहे, तसा एक मानवही आहे. वाल्मीकीने त्याला ईश्वर बनविले नाही. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' म्हणजे 'मी स्वतःला दशरथाचा पुत्र राम समजतो', हे वचन वाल्मीकीने रामाच्या तोंडी घातलेले आहे. श्रीराम मानव असल्यामुळे त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनीही युक्त आहे. श्रीरामाला दुःख झालेले आहे. श्रीरामाला क्रोध आलेला आहे. सोन्याचा मृग पाहून त्याला मोहही झाला आहे आणि श्रीरामाने विनोदही केला आहे. पण या भावभावनांच्या आहारी मात्र ते गेले नाही. त्यांच्यावर मात केली म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम आहे.

✍️  सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day1 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Monday, February 26, 2024

न पाठवलेलं पत्र : महात्रया रा

न पाठवलेलं पत्र हे पुस्तक वाचून झालं. अध्यात्मिक गुरू असलेले महात्रया रा यांनी लिहिलेले Unposted Letter या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. या आधी याची समरी ऐकली होती. बुकलेट अँपच्या माध्यमातून मिशन मेक इंडिया रीड याचा ध्यास घेतलेला मित्र अमृत देशमुख याने आजवर जवळपास २१०० हुन अधिक पुस्तक वाचली आहेत. त्याच्या बऱ्याच मुलाखतीत प्रश्न असतो की तुझ्या आवडीचे पुस्तक कुठले त्यात त्याने अनेकवेळा Unposted Letter By Mahatria Ra या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. 

उत्सुकता होती म्हणून मग ऍमेझॉनवरून मागवले आणि हे पुस्तक आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांपैकी एक चांगले असे पुस्तक आहे असं म्हणता येईल. छोट्या कथांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या आशयाच्या गोष्टी,विचार अत्यंत साध्या शब्दांत या पुस्तकात मांडल्या आहेत. एकेक पान म्हणजे एकेक तत्त्व आहे. प्रत्येक पान कुणाशीही संवाद साधतं. तुम्ही दुःखात असा की सुखात, यशस्वी असा की अयशस्वी - जेव्हा जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो, तेव्हा तेव्हा आपल्याला छानच वाटतं आणि अरेच्या हे आपल्या बाबतीत पण घडून गेलं इतकं सहज संवाद या पुस्तकातून महात्रया रा यांनी मांडला आहे. कुटुंबातील प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. यातील काही विचार आणि ती वाक्य प्रचंड आवडली ती मार्क करून ठेवली होती त्यातील काही देतोय. 

प्रेम म्हणजे लाड करणारं प्रेम नव्हे. प्रेम म्हणजे परिवर्तन घडवून आणणारं प्रेम. लाड तुम्हाला क्षीण बनवतात. प्रेम तुम्हाला निर्माण करतं. कोणीच परिपूर्ण नसतं. सुधारणेसाठी अपरंपार वाव असतो. जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्याखेरीज कोणालाच तुमच्यात सुधारणा होत आहे की नाही ह्याच्याशी काही कर्तव्य नसतं. 

प्रत्येकापाशी स्पष्टीकरण असतं आणि प्रत्येकाला शेवटचा शब्द आपला असावा असं वाटतं. मी स्वतः प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटचा शब्द आपलाच ठेवण्याकरिता धडपडत असतो, ही जाणीव मला संकोचकारक वाटते. मी स्वतःला सांगत आलो आहे की आयुष्यातल्या सगळ्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींबाबत मी समोरच्याला शेवटचा शब्द ठेवू देईन आणि त्याद्वारे खूप वेळ, शक्ती, परिश्रम आणि अवकाश यांची बचत करीन. स्पष्टीकरण देण्याच्या सहजप्रवृत्तीवर निर्बंध घालणं आणि दुसऱ्यांचा शब्द 'शेवटचा' ठरू देणं (अर्थात बिनमहत्त्वाच्या गोष्टींबाबतच फक्त) ह्यामधे प्रचंड स्वातंत्र्य सामावलेलं आहे. सुदैवानं सर्व प्रश्नांपैकी ९०% प्रश्न अगदी बिनमहत्त्वाचे असतात.

घाई, जलदी हे सगळ्यात मोठं व्यसन आहे. जे निर्णय आपण एरवी सहसा घेणार नाही ते घाई आपल्यावर लादते. आपण ज्या प्रकारे वागू इच्छित नाही त्या प्रकारे वागण्याची सक्ती घाई आपल्यावर करते. ती आपल्याला असं भासवून गुंगवते की दोष आपला नसून परिस्थितीचा आहे. '१० मिनिटं लवकर' हा नियम सुरुवातीला चक्रमपणाचा वाटेल, पण आजकालच्या तणाव ग्रस्ततेसाठी तो चांगला प्रतिबंधक उपाय आहे. '१० मिनिटं लवकर' हे आज माणसाला तोंड द्यावं लागणाऱ्या बहुतांश तणावसंबंधी समस्यांवरचं रामबाण औषध आहे.

ज्या नात्यांमध्ये लोक एकमेकांकडे अगदी थोड्याच अवधीत आकृष्ट होतात ती नाती तुटायला एखादा गैरसमज, एखादी क्षुल्लक घटना, एखादा छोटासा वाद पुरेसा ठरतो. जी नाती दृढ होण्यासाठी. परस्परविश्वास वाढण्यासाठी, पारदर्शकता आणि जवळीक निर्माण होण्यासाठी थोडासा काळ घेतात, त्यांच्यामधेच काळाच्या कसोटीवर उतरण्याइतकी स्थिरता निर्माण होते.

तुमच्यापाशी सर्व उत्तरं नसली तर बिघडत नाही. महत्त्व आहे ते तुमच्यापाशी योग्य प्रश्न आहेत का, ह्या गोष्टीला. तुमची प्रज्ञा प्रतीक्षा करीत आहे... विचारा, म्हणजे तुम्हाला मिळेल.

परिवर्तनावर देखरेख ठेवली आणि ते दीर्घकाळ टिकवून ठेवलं तर त्याचं संस्कृतीत परिवर्तन होतं. परिवर्तन हे आव्हान नसतं, तर त्या परिवर्तनाचं संस्कृतीत रूपांतर होणं हे आव्हान असतं.

पाप कृतीमध्ये नसून ते कृतीमागच्या हेतूमधे असते ह्या दृष्टिकोनातून आपण जगाकडे पहात असलो तरी आपण ही जाणीव नेहेमीच बाळगली पाहिजे की जग मात्र आपल्या कृतींवरूनच आपलं मूल्यमापन करणार आपले हेतू काहीही असले तरी.

आपल्याला आपल्या बाहेरचं कोणीतरी मार्गदर्शन करण्यासाठी हवं असतं. गुरू हा जणू आपला आरसाच असतो, ज्यात आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. तो आपल्याला आपली शक्तिस्थानं दाखवतो, ज्यांच्या जोरावर आपण आपल्या कमजोरींशी लढू शकतो. आपली कौशल्यं अधिक परजण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते. आपल्या ज्ञानाचा अधिक विस्तार करण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता असते.

यश मोठ्या गोष्टींत असतं.
समाधान छोट्या गोष्टींत असतं.
ध्यान शून्यात असतं.
ईश्वर सर्व गोष्टींत असतो. 

सर्वेश फडणवीस

Saturday, January 20, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श राजा

भगवान श्रीरामांचा राज्याभिषेक केवळ इतर राजांच्या राज्याभिषेकासारखाच नाही तर हा एक असाधारण अद्वितीय प्रसंग आहे. इतिहासाच्या ओघात असंख्य राजे सिंहासनावर बसले आणि त्यातील कितीतरी कालप्रवाहात विस्मरणाच्या गर्तेतही गेलेत. अनेक पुण्यश्लोक राजांचे इतिहासाला आजही आदराने स्मरण आहे. पण राजा राम वेगळेच. यांनी लोकहृदयाचा अद्भुत वेध घेतला. सर्वांना वेडच लावले. अतिप्राचीन काळापासून आजतागायत तपस्वी ऋषि-मुनि, वीतराग संत-महंत, प्रतिभासंपन्न साहित्यिक, श्रेष्ठ महाकवि, थोर लोकनेते आणि आबालवृद्ध सामान्यजन या सर्वांना जणू संमोहित करून स्व-स्मरणामध्ये गुंगवून ठेवणारे एकच राजा जगाने पाहिले- ते आदर्श राजा अर्थात राजा राम.

महाकाव्ये, लघुकाव्ये, नाटके, गद्य-पद्य स्फुटे, लेख, देवालये, तीर्थे, कथा-कीर्तन- प्रवचने, उत्सव आणि रामलीला अशा अनेक सर्व उपलब्ध साधनांनी रामराजा भारताच्या सर्व प्रदेशातून व भाषांतून आजही उत्कटपणे नित्यस्मरणात आहे व नि:संशय तो तसाच नित्य राहणार आहे. ही खरंतर असंख्य सदगुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामांच्या विभूतिमत्वाची जादू आहे. त्याच्याबद्दल वाचल्याशिवाय, बोलल्याशिवाय, ऐकल्याशिवाय आणि लिहिल्याशिवाय भल्याभल्यांनाही राहवतच नाही, हे गुणप्रकर्ष अद्भुत आहे. ते इतके अद्भुत आहे की, काही बिचाऱ्यांना राम काल्पनिकही वाटू लागले. तत्त्वदर्शी महात्म्यांना तर तेच परम-सत्य-स्वरूप आहे. लोकमनातील राम असे अढळ आहे. याचे कारण प्रत्येकाला रामामध्ये आपल्याला अपेक्षित व स्वतःमध्ये असाध्य चांगुलपणाच्या पूर्णत्वाचे सहज दर्शन होते. जे जे उत्तम, मंगल, उदात्त, सुंदर, महन्मधुर ते ते सर्व श्रीरामांमध्ये आढळल्याने त्यांच्या चिंतनात आपल्या मनाला विश्रांति मिळते.

खरंतर प्रजा ही श्रीरामचंद्रांचें काय नव्हती ? सीतेच्या परित्यागानंतर हृदय पिळवटून टाकणाऱ्या त्या प्रसंगाने राम इतके विव्हळ झाले होते की, चार दिवस अश्रुमोचन करीत त्यांनी घालविले. या चार दिवसांत त्यांच्या हातून राज्यव्यवहार व लोकांची दु:खे समजावून घेण्याचें काम झालें नाही याचें त्यांना इतकें वाईट वाटत होतें की, लक्ष्मणाजवळ त्यांनी आपल्या अंतरीचे भाव व्यक्त करताना म्हटलें आहे :-

यच्च मे हृदये किंचिद्वर्तते शुभलक्षण ।
तन्निशामय च श्रुत्वा कुरुष्व वचनं मम ।।
चत्वारो दिवसाः सोम्य कार्यं पौरजनस्य च ।
अकुर्वाणस्य सौमित्रे तन्मे मर्माणि कृन्तति ॥ 
आहूयन्तां प्रकृतयः पुरोधा मन्त्रिणस्तथा ।
कार्यार्थिनश्च पुरुषाः स्त्रियो वा पुरुषर्षभ ।। 
पौरकार्याणि यो राजा न करोति दिने दिने ।
संवृते नरके घोरे पतितो नात्र संशयः ।। 
- वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग ५३

लक्ष्मणा, माझ्या हृदयाला जी एक गोष्ट दुःख देत आहे ती ऐकून घे व त्याप्रमाणे कर. या दुःखद घटनेने माझें हृदय इतके भारावलेलें होतें की, गेले चार दिवस मी पौरजनांचे कोणतेही काम करू शकलो नाही, याची जाणीव झाली की मला मर्मांतिक वेदना होतात. पुरोहित, मंत्री, प्रजेतील कार्यार्थी असे सर्व स्त्री-पुरुष यांना तू राजसभा त्वरित मोकळी कर. जो राजा प्रजेचीं कामें करीत नाही तो घोर नरकात जातो यांत काही शंका नाही. केवढे हें प्रजावात्सल्य व त्या बाबतीतल्या स्वकर्तव्याची तरी केवढी ही प्रखर जाणीव. प्रजेनेच जेथे त्यांना विश्रामाची आवश्यकता प्रतिपादावी त्या आयुष्यातील अत्याधिक दु:खद प्रसंगी देखील आपण प्रजेच्या कार्याकडे दुर्लक्ष करण्याइतके भावनावश झालो ही जाणीवच त्यांच्या हृदयाला अधिक कष्टी करीत आहे. अशा या राजावर प्रजेचें किती विलक्षण प्रेम असेल. 

रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानामिव वासवः ।। 
न च धर्मगुणैर्हीनः कौसल्यानन्दवर्धनः ।
न च तीक्ष्णो हि भूतानां सर्वभूतहिते रतः ।। 
वाल्मीकि रामायण, अरण्यकाण्ड, सर्ग ३७

प्रत्यक्ष शत्रूने रामाच्या रूपाने धर्म पृथ्वीवर अवतरल्याची कबुली द्यावी यापेक्षा त्यांच्या चारित्र्याच्या उदात्ततेचा आणखी कोणता पुरावा देणें अवश्य आहे? सर्व गुणांचे राम हें इतकें श्रेष्ठ परिमाण आहे की, मित्र तर काय पण शत्रूदेखील रामासारखा असावा अशीच अभिलाषा उत्पन्न व्हावी. 'रामो विग्रहवान् धर्मः' श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे, महर्षि वाल्मीकि म्हणतात :-

न हि तद्भविता राष्ट्रं यत्र रामो न भूपतिः ।
तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ३७

जेथे राम राजा नाही तें राष्ट्रच नाही. तें वनच राष्ट्र होईल की जेथे राम राहतील. केवढी ही विलक्षण लोकप्रियता. जगातील राज्यसंस्थेच्या इतिहासात प्रजा आणि राज्यसंस्था यांचें सूर्य व त्याच्या प्रभेसारखें इतकें ऐक्य आजवर कधी झालें नाही व पुढे कधी होणार नाही. सर्व उदात्त जीवनमूल्यांचे एकत्रित उत्कट दर्शन ज्या व्यक्तिमत्वात होते त्याचे नाव 'श्रीराम' होय. श्रीरामांचा राज्याभिषेक म्हणजे या जीवनमूल्यांची प्रतिष्ठापना आणि उद्या याच जीवनमूल्यांची पुर्नप्रतिष्ठापना होणार आहे. रामलला यांचा विग्रह उद्या जन्मभूमीवर विराजमान होणार आहे. राम राज्याचे स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आपण होणार आहोंत. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवत हे राष्ट्र सुजलाम, सुफलाम बनवूया. ही चार भागात झालेली लेखन सेवा श्रीरामांच्या चरणी रुजू करतो.  पुन्हा भेटूच.. जय श्रीराम 

सर्वेश फडणवीस

Thursday, January 18, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श मित्र


श्रीरामचंद्रांनी ज्यांना स्वतःच्या बरोबरीचें स्थान देऊन आपले मित्र मानले होते अशा दोन व्यक्ति रामायणात आहेत. एक निषादाधिपति गुह आणि दुसरा वानरराज सुग्रीव हे होते. राजा गुहाची आणि रामचंद्रांची प्रगाढ मैत्री महर्षि वाल्मीकींनी,

तत्र राजा गुहो नाम रामस्यात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५०

या शब्दांनी व्यक्त केलेली आहे. राजा गुह स्वतः श्रीरामांवरील आपल्या प्रेमासंबंधी असें म्हणतो की,

न हि रामात्प्रियतमो ममास्ते भुवि कश्चन ।
ब्रवीम्येव च ते सत्यं सत्येनैव च ते शपे ॥
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५१

या संपूर्ण विश्वात रामाइतकें मला दुसरें कोणीही प्रिय नाही.रामा,  मी तुला सत्याचीच शपथ घेऊन सांगतो. रामचंद्रांचेंही गुहावर असेंच अत्यंत प्रेम आहे. वनवासातून आपण परत आल्याची पहिली वार्ता गुहालाच सांगण्याची ते हनुमंताला आज्ञा देतात. त्याच्या संबंधीचें आपलें प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात :-

श्रुत्वा तु मां कुशलिनमरोगं विगतज्वरम् ।
भविष्यति गुहः प्रीतः सममात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५

मी निरोगी, तापरहित व चांगल्या स्थितीत आहे हे ऐकून गुहाला अत्यंत आनंद होईल. कारण मी माझ्यावर जितकें प्रेम करीत असेन तितकेंच गुहावर करतो. तो माझा सखा आहे.

उपकारफलं मित्रं विदितं मे महाकपे ।।
वालिनं तं वधिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ५

मैत्रीचें फळ एकमेकांच्या उपयोगी पडणें हेंच आहे. म्हणून तुझ्या स्त्रीचें अपहरण करणाऱ्या वालीचा मी वध करीन. त्याच्या दुःखाशी श्रीराम इतके एकरूप झालेले आहेत आणि त्याच्या दुःखाचा अंत करण्याची इच्छा त्यांच्या अंत:करणात इतकी बळावलेली आहे. दोघे अशा प्रकारे बोलत असताना हनुमंताने दोघांना जरा थांबायला सांगितले. त्याने आपल्या एकदोन मित्रांना पाठवले आणि पटपट त्या ठिकाणी सामग्री आली. हनुमंताने लगेच त्या ठिकाणी एक वेदी बनवली, अग्नीची स्थापना केली आणि पुरोहित बनले. हनुमंतांना सगळ्या भूमिका पार पाडता येतात. त्याने दोघांच्या हातांत फुले दिली, पूजेची सामग्री दिली. राम आणि सुग्रीव यांनी अग्नीची पूजा केली, अग्नीभोवती परिक्रमा केली. दोघांनी अग्नीपुढे मैत्रीची प्रतिज्ञा केली 'देव ब्राह्मणअग्नि संनिधौ ।' यातून हनुमंतांना नेमके काय साधायचे होते? त्यांना मैत्रीचा करार करायचा नव्हता, तर सख्यत्वाचा संस्कार करायचा होता. करार मोडला जातो, संस्कार मोडला जात नाही. कराराला दोन्ही पक्ष तोपर्यंतच बांधील असतात जोपर्यंत एकजण नियम मोडत नाही. एकाने करार मोडला की, दुसरा मनुष्य करार मोडायला तयार असतो.

यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९

इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविकच आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासाच्या पृष्ठभागावर टाकलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--

एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग १०८

याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व राम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.

जय श्रीराम 🚩🚩

सर्वेश फडणवीस

#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला #day3

Tuesday, January 16, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श बंधु

लक्ष्मण व शत्रुघ्न हे बंधुत्वाचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. पण भरताचा त्याग गोस्वामी तुलसीदासांच्या प्रतिभेला तर श्रीरामापेक्षाही अधिक पूजार्ह वाटला आहे. तरीही रामचंद्रांच्या चरित्राचा जो जो विचार करू लागावें तो तो याही बाबतीत,

तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः

हा महर्षि वाल्मीकींचा अभिप्रायच मनावर ठसू लागतो. “ तुझ्या- ऐवजी भरताला हें राज्य द्यावें असें राजाच्या मनात आहे,” असें कैकेयीने म्हणताच रामचंद्र म्हणतात :-

अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान्धनानि च ।
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १९

भरताला हें राज्य देण्यासाठी स्वतः महाराजांनी मला आज्ञा करण्याचे काहीच कारण नाही. भरताला माझ्या अधिकार- क्षेत्रातली जी वस्तु हवी असेल ती मी त्याच्या ताब्यात देईन. मला नुसतें कळण्याचाच अवकाश आहे. राज्य, सीता, फार तर काय पण माझे प्राणही मी भरताच्या सहज स्वाधीन करीन. राज्यासाठी भरताला ठार मारण्याची इच्छा बोलून दाखविणाऱ्या लक्ष्मणाला रामचंद्रांनी जें उत्तर दिले आहे त्यात त्यांच्या बंधु- वात्सल्याचे संपूर्ण प्रतिबिंब उमटलें आहे. ते म्हणतात :-

यद् द्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥
धर्ममर्थं च कामं च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
इच्छामि भवतामर्थे एतत्प्रतिशृणोमि ते ।।
भातॄणां संग्रहार्थं च सुखार्थं चापि लक्ष्मण ।
राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे ।।
कथं न पुत्राः पितरं हन्युः कस्यांचिदापदि ।
भ्राता वा भ्रातरं हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ९७

मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ति मिळणार असेल ती मी कधीच घेणार नाही. विषमिश्रित अन्नाप्रमाणे ती सर्वस्वी त्याज्य आहे. लक्ष्मणा ! धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वी देखील मला केवळ तुमच्याचसाठी हवी आहे हें मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. मी शस्त्रावर हात ठेवून तुला सत्य सांगतो की, बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावें एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करीन, आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावें किंवा आपत्ति आली म्हणून आपल्या प्राणांसारख्या प्रिय बंधूंवर कोणी प्राणघातक वार करावा काय. वनवासातून परत येताना भरद्वाजाच्या आश्रमातून हनुमंताला अयोध्येला जावयास सांगताना ते म्हणतात :-

भरतस्तु त्वया वाच्यः कुशलं वचनान्मम ।
सिद्धार्थं शंस मां तस्मै सभार्यं सहलक्ष्मणम् ॥
एतच्छ्रुत्वा यमाकारं भरतो भजते ततः ।
स च ते वेदितव्यः स्यात् सर्वं यच्चापि मां प्रति ।।
ज्ञेयाश्च सर्वे वृत्तान्ता भरतस्येङ्गितानि च ।
तत्त्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभाषितेन च ।।
सर्वकामसमृद्धं हि हस्त्यश्वरथसंकुलम् ।
पितृपैतामहं राज्यं कस्य नावर्तयेन्मनः ।।
संगत्या भरतः श्रीमान् राज्येनार्थी स्वयं भवेत् ।
प्रशास्तु वसुधां सर्वामखिलां रघुनन्दनः ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५

भरताला माझें कुशल सांगून सीता आणि लक्ष्मणासहित मी प्रतिज्ञा पार पाडत परत आल्याचे सांग. ही वार्ता कानावर पडताच भरताच्या चेहऱ्यावर काय सूक्ष्म छटा उमटतात त्या तू नीट पाहिल्या पाहिजेस. त्याच्या हालचालींवरून, मुखवर्णावरून, दृष्टीत पडणाऱ्या फरकांवरून व उद्गारांवरून त्याच्या अंतरंगातील खरे भाव तुला ओळखता आले पाहिजेत. सर्व इच्छा पुरविण्या इतकें समर्थ, हत्ती, अश्व, रथ इत्यादिकांनी गजबजलेलें पितृपितामहांचें राज्य कुणाचें मन विचलित करणार नाही. राज्य चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे भरताला जर इतके दिवस स्वतः राज्यपद घेण्याची इच्छा झाली असेल तर त्याने सर्व पृथ्वीचें राज्य करावे अशीच माझी इच्छा आहे. केवळ भरताने प्राण त्यागाची सिद्धता केल्यामुळेच रामांनी राज्यपदाचा स्वीकार केला. त्यांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटल्याप्रमाणे केवळ बंधुसाठीच त्यांनी राज्य स्वीकारले. स्वतःचा हक्क म्हणून ते त्यांना नको होते.

भरतांचे रामावरील प्रेमही तितकेच अलोट आहे. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचे प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. श्रीभरतांचा स्वभाव प्रभु रामचंद्रांसारखा आहे. ते भगवान रामचंद्रांवर प्रेम करतात याचे कारण त्यांना आपल्या बालपणापासून एक गोष्ट जाणवलेली आहे की, आपला वंश हा अत्यंत श्रेष्ठ लोकांचा वंश आहे. स्वतःच्या वंशाचा गौरव जीवनात असावा. ज्यांच्या अंत:करणामध्ये स्वत:च्या वंशाचा गौरव नांदतो त्यांचेकडून जीवनात मोठमोठी कामे होतात आणि मोठमोठ्या चुका त्यांचेकडून घडत नाहीत. वंशाचा गौरव त्यांच्या चुकांच्या आड येतो. मी कोणाच्या घराण्यात जन्माला आलो ही गोष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नेहमी असते. भगवान श्रीरामचंद्रांना आणि भरतांना आपल्या वंशाचा अत्यंत मोठा गौरव आहे. दोघांना ठाऊक आहे की, आपल्या पूर्वजांमध्ये, आपल्या वंशात जन्माला आलेल्या प्रत्येक राजामध्ये कोणत्या ना कोणत्या दोन-चार गुणांचा प्रकर्षाने आविष्कार होता. राजा हरिश्चंद्रामध्ये सत्यनिष्ठा आहे, राजा दिलीपांच्यामध्ये गुरुभक्ती आणि गोभक्ती आहे, राजा रघूंच्यामध्ये पराक्रम आणि दानशीलता आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि भरतांना हेदेखील ठाऊक आहे की, माझ्या श्रीरामांमध्ये केवळ एकदोनच नव्हे, तर माझ्या पूर्वजांचे सगळे सद्गुण आणि त्याच्याव्यतिरिक्त अनेक सद्गुण पूर्णतेला पोहोचलेले आहेत. म्हणून श्रीरामचंद्रांना 'रघुवंशाची कीर्तिपताका' असे संबोधिले आहे. आणि म्हणून भरत श्रीरामचंद्रांच्या चरणी समर्पित आहेत. बंधू प्रेमाचे हे सर्वोत्तम आदर्श आहेत.

जय श्रीराम 🚩🚩

सर्वेश फडणवीस

Sunday, January 14, 2024

मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श पुत्र


या अवघ्या जगाचा जो संपूर्ण आनंद तो आनंदसिंधु म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. गोस्वामी तुलसीदास म्हणतात-
जो आनंद सिंधु सुखरासी ।
सीकर ते त्रैलोक सुपासी ।।

त्या आनंदसिंधूच्या एका बिंदूवर हे सगळे जग वेडे झाले आहे. मग त्या आनंदसिंधूची कल्पना करा. वेदांनी, उपनिषदांनी आणि सगळ्या शास्त्रांनी श्रीरामांबद्दल जर कुठला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरला असेल तर तो 'आनंद' आहे. राजा दशरथ अर्थात आपल्या पित्यासाठी रामचंद्रांनी पुत्रत्वाचा कोणता दिव्य आदर्श उत्पन्न केला हें रामकथेच्या वाचकाला सांगायला नको. ते स्वतःच एके ठिकाणी या संबंधाने कृतार्थचे उद्गार काढताना म्हणतात :--

न सर्वे भ्रातरस्तात भवन्ति भरतोपमाः ।
मद्विधा वा पितुः पुत्राः सुहृदो वा भवद्विधाः ।। 
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १८
माझ्यासारखा पुत्र मागे झाला नाही व पुढे होणार नाही.भावनेच्या पाण्याने पुत्रकर्तव्याचा रामचंद्रांच्या अंतःकरणातील बंध शिथिल करण्यासाठी भरत चित्रकूटावर आपल्या नेत्रांतून अश्रूंचा पूर वाहवीत असताना रामांनी दिलेलें अखेरचें उत्तर त्यांच्या जीवनपटातील या विशिष्ट बाजूवर संपूर्ण प्रकाश टाकणारे आहे. 

लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् ।
अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ११२

अर्थात लक्ष्मी चंद्राला सोडून जाईल अथवा हिमालय आपली शीतलता सोडील. समुद्र मर्यादेचें उल्लंघन करील, पण मी माझ्या पित्याची प्रतिज्ञा कधीही भंग पावू देणार नाही. कर्तव्यमार्गाचा भरताला उपदेश करीत असताना राम उलटे भरतालाच असें म्हणतात :--

सोऽहं वनमिदं प्राप्तो निर्जनं लक्ष्मणान्वितः ।
सीतया चाप्रतिद्वन्द्वः सत्यवादे स्थितः पितुः ॥ 
भवानपि तथेत्येव पितरं सत्यवादिनम् ।
कर्तुमर्हसि राजेन्द्र क्षिप्रमेवाभिषेचनात् ॥ 
पुन्नाम्नो नरकाद्यस्मात्पितरं त्रायते सुतः ।
तस्मात्पुत्र इति प्रोक्तः पितॄन्यः पाति सर्वतः ।। 
एष्टव्या बहवः पुत्रा गुणवन्तो बहुश्रुताः ।
तेषां वै समवेतानामपि कश्चिद्गयां व्रजेत् ।। 
एवं राजर्षयः सर्वे प्रतीता रघुनन्दन ।
तस्मात्त्राहि नरश्रेष्ठ पितरं नरकात्प्रभो ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १०७

केवळ पित्याची आज्ञा पाळण्यासाठीच लक्ष्मण आणि सीता यांच्यासह मी निर्जन वनात आलो आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळणें हें तुझेंही कर्तव्यच नाही काय ? पिता सत्यवादी व्हावा यासाठी माझ्याकडे सोपविलेल्या त्यांच्या एका आज्ञेचें मी जसें परिपालन केलें तसेंच तूही त्याच्या दुसऱ्या आज्ञेचें परिपालन केलें पाहिजे. सत्यवादी पित्याने तुला राज्याभिषेक करून घेण्याची आज्ञा दिलेली आहे. पिता सत्यवादी ठरावा म्हणून ताबडतोब राजसिंहासनाचा अंगीकार करणें हेंच तुझें कर्तव्य आहे. नरकापासून जो पित्याला वाचवितो आणि सर्व प्रकारे अधःपतनापासून त्याचें संरक्षण करतो त्यालाच पुत्र असें म्हणतात. पुष्कळ गुणवान् पुत्र उत्पन्न करावेत म्हणजे निदान त्यांतला एक तरी गयेला जाऊन पित्याला सद्गति देईल व आपलें पुत्रकर्तव्य बजावील असें सर्व राजर्षि म्हणतात. इतर कोणाकरिता नाही तरी निदान माझ्याकरिता तू आपल्या पित्याला अधःपतनापासून वाचव व त्यासाठी तरी राज्याचा स्वीकार कर. भरताने त्यांना मी वनवास करतो व आपण राज्य करा म्हणजे विनिमयाने पित्याच्या आज्ञेचें परिपालन होईल असें सुचविल्यावर रामचंद्रांनी जें धीरोदात्त उत्तर दिलें आहे तें त्यांच्या पितृआज्ञा परिपालनाच्या कल्पना किती नाजूक व उदात्त होत्या हें दर्शवितें. ते म्हणतात :-

उपाधिर्न मया कार्यों वनवासे जुगुप्सितः । 

अर्थात राम- विनिमयाची कल्पनाच त्यांच्या अभिजात चारित्र्याला अत्यंत अपमानास्पद वाटते. ज्याला जी आज्ञा दिलेली आहे त्याच आज्ञेचें त्याने परिपालन केलें पाहिजे असें त्यांचे स्पष्ट मत आहे. श्रीरामांच्या हृदयातल्या पित्याविषयीच्या त्यांच्या खऱ्या उत्कट भावना वाल्मिकी रामायणाच्या अयोध्याकाण्डाच्या अठराव्या सर्गात उचंबळून आलेल्या आहेत. कारण तेथे त्यांच्या भावनांना मोकळे करण्यात आले आहे.

राम वनवासात निघतांना कैकेयीला राजा दशरथ म्हणतात, 
नालं द्वितीयं वचनं पुत्रो मां प्रतिभाषितुम् ।
स वनं प्रव्रजेत्युक्तो बाढमित्यैव वक्ष्यति ।। 
यदि मे राघवः कुर्याद्वनं गच्छेति चोदितः ।
प्रतिकूलं प्रियं मे स्यान्न तु वत्सः करिष्यति ।। 
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १२

अर्थात माझ्या शब्दांवर राम एक अक्षर देखील बोलणार नाही अशी माझी खात्री आहे. मी वनात जा असे म्हटल्याबरोबर 'होय' असेंच तो म्हणेल. मी वनात जावयास सांगितल्यावर राम जर माझें न ऐकता प्रतिकूल वर्तन करील तर माझें अत्यंत प्रिय होईल. पण तो तसें करणार नाही (हीच अत्यंत दुःखाची गोष्ट आहे). राजाचा हा विश्वास किती यथार्थ होता ! सर्व विश्वाच्या नियमनाची प्रचंड शक्ति असूनही एखाद्या गवताप्रमाणे राज्यलक्ष्मीला लाथाडून रामांनी वनवासाचा मार्ग पत्करला. पित्यासाठी पुत्राने आपल्या महान् जीवनाचा नंदादीप स्वयंप्रेरणेने जाळला आणि केवढा हा पुत्रधर्माचा उदात्त आदर्श आहे. म्हणूनच आदर्श पुत्र श्रीराम या न्यायाने वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारे आहे. समर्थ लिहितात, 

बहु चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ।
करी मूळ निर्मूळ घेता भवाचे । जीवा मानवा हेची कैवल्य साचे ।।

जय श्रीराम…

सर्वेश फडणवीस

Saturday, January 13, 2024

मर्यादापुरुषोत्तम श्रीराम


पुनर्जागरणाचा पर्वकाळ आलेला आहे. उद्या मकरसंक्रात अर्थात मकरसंक्रमण. संक्रमण म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे मार्गक्रमण. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेकडे वाटचाल. श्रीरामजन्मभूमी वरील राष्ट्रीय संक्रमणामध्ये आपण सहभागी होत असताना सहज मनात विचार आला की, श्रीरामचंद्रांचें मर्यादापुरुषोत्तमत्व जीवनाच्या प्रत्येक अवस्थेतून व्यक्त झालेले आहे आणि याच मकरसंक्रात दिवसाचे औचित्य साधत "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" ही लेखमाला लिहायला घेतोय. श्रीरामांचें जीवन म्हणजे भावना व कर्तव्य यांचा एक विलक्षण संगम असून जीवनाच्या अखेरच्या प्रवासापर्यंत चाललेल्या या संगमात भावनेवर कर्तव्याचा नेहमीच विजय झालेला आहे. भरत, लक्ष्मण, सीता, मारुती अशी अनेक दैवी व्यक्तिचित्रणें रामायणात आहेत व तीं आपल्या अनुपम गोडीने आणि विलक्षण भव्यतेने कोणालाही सहज आकर्षित करतात; पण, तरीही राम हे ह्या सर्वांपेक्षा किती तरी वर आहेत हेंच मनाला पटतें. 

भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण श्रीरामजन्मभूमीवरील मंदिराच्या लोकार्पणाचा उत्सव अनुभवण्याची वेळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. येणाऱ्या काही तासांत भव्य श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. खरंतर ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू असलेला संघर्ष आता पूर्णत्वास जातो आहे. पूर्वजांचे स्मरण आणि त्यांच्या बलिदानाची ही यात्रा आहे. त्या सगळ्यांची श्रद्धा आणि निष्ठा रामनामात होती. या भव्य मंदिराच्या संकल्पनेला संघर्षाची किनार आहे आणि आता अयोध्येत भव्य मंदिर निर्माण होत आहे. 

मला कायम वाटतं संकल्प दृढ असेल तर संघर्ष पूर्णत्वास जातो आणि संकल्पाला कुठलीही कल्पना असेल तर ते कार्य सिद्धीस जाते.  'याची देही याची डोळा' या मंदिराचे लोकार्पण संपूर्ण जग अनुभवणार आहे. कारण श्रीराम जन्मभूमीवरील भव्य मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. सात्विक संकल्पाच्या पूर्ततेचा क्षण अवघ्या काही तासांत अर्थात २२ जानेवारीला सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पूर्णत्वास जाणार आहे. मनसा- वाचा- कर्मणा या न्यायाने मंदिर आता पूर्णाहुतीच्या दिशेने जनमानसात आनंदोत्सव प्रदान करणार आहे. 

महर्षि वाल्मीकींनी "तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः " असे म्हंटले आहे अर्थात ध्वज जसा प्रासादाहून उंच असतो, त्याप्रमाणे राम हे ह्या सर्वांहून अधिकच उच्च श्रेणीवर विराजमान झाले होते असें जें म्हटलें आहे तें अगदी यथार्थ आहे. कारण या प्रत्येकात कर्तव्यापेक्षा भावनेचें प्राबल्य अधिक दृष्टीस येतें. रामचंद्रांच्याही नेत्रांना भावनेच्या भराने पाणावण्याची सवय आहे; पण तरीही त्यांचें जीवनयंत्र अखेरीस कर्तव्याच्याच अधीन होतें, भावनेच्या नाही. कोणत्याही प्रसंगात भावनेचें त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित झालेले नाही. म्हणूनच भरत, लक्ष्मण असे महान् लोक हे व्यक्तिमत्त्वाच्या विकसनाचे उत्तुंग प्रासाद असतील; पण, राम हे त्या सर्वांहूनही उंच असे ध्वज आहेत. म्हणून ते 'मर्यादापुरुषोत्तम' आहेत. इतर कोणी या विशेषणाला पात्र ठरू शकत नाहीत आणि म्हणूनच आपण उद्यापासून चार भागात एकेका अवस्थेबद्दल या निमित्ताने जाणून घेणार आहोंत. 

जय श्रीराम 

#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला 

सर्वेश फडणवीस