Thursday, April 11, 2024

रामो विग्रहवान् धर्मः


प्रभु रामचन्द्राच्या परमेशत्वाचे मर्म जाणण्यासाठी त्यांच्या जन्माआधीच्या परिस्थितीचा आढावा घेणे योग्य ठरेल. तसे केल्यास स्पष्ट दिसून येते की त्यावेळी जम्बुद्वीपाची परिस्थिती मुळीच समाधानकारक नव्हती. तसे पाहता रामाची राजधानी अयोध्या. त्या नगरीत कमालीची सुबत्ता होती असे महर्षि वाल्मीकी म्हणतात.

'अयोध्या नाम नगरी तत्रासीत् लोकविश्रुता।' असे सांगून वाल्मीकींनी म्हटले आहे की

तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः ।

नरास्तुष्टा धनैः स्वैः स्वैरलुब्धाः सत्यवादिनः ॥

अयोध्येच्या नागरिकांविषयीही आदिकवीचे उद्गार आहेत की

 'द्रष्टुं शक्यमयोध्यायां नाविद्वान्न च नास्तिकः।' 

अयोध्येत ही सुबत्ता रघुवंशीय नृपांच्या पुण्याईमुळे नांदत होती. पण इतरत्र ? अखिल जम्बुद्वीपाचा विचार केल्यास मात्र स्थिती सन्तोषजनक नव्हती असेच म्हणावे लागेल आणि जम्बुद्वीपाचे राजकीय चित्र केविलवाणेच होते. 

रावणासारख्या अत्याचाऱ्यांचे फावते ते ह्यामुळेच. रावण हा काही सामान्य नव्हता. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून, शिवशंकराकडून वरदान प्राप्त करू शकणारा तो तपस्वी होता. मन्त्रवेत्ता होता. मंत्रांचा संबंध चित्तशुद्धीशी नाही, तर प्राणशक्तीच्या स्पन्दनांशी असतो. म्हणून उद्दाम असूनही रावणापाशी मंत्रांचे बळ आहे, शस्त्रांचे तर आहेच, शिवाय शास्त्रांचेही आहे. तो प्रकांड पंडित होता. वेदांचा पदपाठ त्यानेच केला असे म्हणतात. त्याचे शिवताण्डवस्तोत्र म्हणजे उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. मात्र रावण उन्मत्त आहे. सुजन नाही. शस्त्र, शास्त्र आणि मंत्र ही तिन्ही बळे (हत्यारे, ज्ञान आणि तंत्र - technique) जेव्हा दुर्जनाकडे एकवटतात तेव्हा राक्षसी प्रवृत्तीला ऊत येतोच.'साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव ते मताः।

श्रीरामाच्या जन्माआधी रावणाचे प्रस्थ माजण्यामागे एक अंग होते - सांस्कृतिक भेदभावनेचे. उत्तरेकडील लोक स्वत:ला 'आर्य' म्हणवून घेत. म्हणूनच त्यांचा प्रदेश 'आर्यावर्त'. किष्किंधेतील लोकांना ते वेगळे मानत. पुत्रकामेष्टीच्या वेळी दशरथाने कितीतरी राजांना निमंत्रित केले होते, पण किष्किंधेच्या राजाला मात्र आमंत्रण नव्हते हे येथे उल्लेखनीय आहे. आर्य लोक त्यांना 'वानर' म्हणत. हे वानर म्हणजे एक मानववंशच. वानरांचा तोंडवळा, राहणीमान नागर आर्यांपेक्षा वेगळे असले तरी आर्य संस्कृतीचाच तो एक वेगळा कप्पा होता. उन्हापावसाची पर्वा न करता रानावनात हिंडणे, निवाऱ्याची आवश्यकता नसणे, शिजलेल्या अन्नाऐवजी फळांनी पोट भरणे इत्यादी वानरसदृश चेष्टितांमुळे कदाचित् त्यांना वानर म्हणत असावेत. किंवा  वानरबहुल प्रदेशात वास्तव्य असल्यामुळेही त्यांना 'वानर' संज्ञा मिळाली असावी. पण काही झाले तरी ते मानवच होते. तरीही आर्यावर्तापासून तुटलेले होते. आर्य-वानरात कधीही सख्य नव्हते. रोटीबेटीव्यवहार तर दूरच पण एकूणच, उत्तर-दक्षिण जम्बुद्वीपात मानसिक दुरावा होता. अशा तऱ्हेने दुभंगलेल्या देशावर हल्ला करणे शत्रूला सोपे जातेच. मुत्सद्दी रावणाने नेमका ह्याचाच फायदा घेतला होता आणि म्हणूनच, सुशासन आणि सुबत्ता असूनही जम्बुद्वीप वासीयांना शेकडो मैल दूर असणाऱ्या रावणाची दहशत वाटत होती. थोडक्यात सांगायचे तर रामजन्माआधी संपूर्ण जम्बुद्वीप आतून पोखरलेले होते.

पं. सातवळेकरांच्या मते, 'रामायणकथा हा चार मानववंशांच्या संबंधाचा इतिहास आहे.' देव, मानव, राक्षस व वानर हे ते चार वंश. वालीशी सख्य करून रावणाने वानरांचे पाठबळ मिळविले होते आणि देव + मानव विरुद्ध राक्षस + वानर अशा ह्या संघर्षांत राक्षसांचे पारडे जड होते. वानर मुळात अत्याचारी वा आततायी नव्हते. ती एक शूर पण भाबडी जमात. योग्य वाट दाखविणारा त्यांना कुणी लाभला नव्हता, म्हणून तर वाली रावणाकडे खेचला गेला. त्याच्या शब्दव्यूहात अडकला. येथे रामाचे कर्तृत्व हे की त्या वानरांना त्याने आधी आपलेसे केले. (केवट, गुह, शबरी इत्यादिकांशीही रामाची वागणूक आपुलकीची होतीच.) समाजातली उच्च - नीचतेची दरी श्रीरामाने बुजवली, वानरांना जवळ केले आणि अत्याचारी रावणाची अर्धी शक्ती कमी केली. जे पूर्वीच्या अनेक पिढ्यांना शक्य झाले नव्हते ते 'रामराज्य' श्रीरामाने स्थापित केले! - (शेतीशिवाय इतर काहीही न जाणणाऱ्या मावळ्यांना हाताशी घेऊन, त्यांच्या मनात स्वराज्यस्थापनेचा स्फुल्लिंग चेतवून हिंदुपदपातशाही स्थापणाऱ्या शिवछत्रपतीला माता जिजाऊने ह्या रामाची कथा ऐकवूनच घडविले होते ना!) हेच श्रीरामाच्या परमेशत्वाचे मर्म. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day3 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏


No comments:

Post a Comment