Wednesday, April 17, 2024

राम- जीवनाची समग्रता !

श्रीरामाने उभारलेल्या सेतूला वाल्मीकींनी 'अभूतपूर्व' म्हटले आहे.'अभूतपूर्वं रामेण सागरे सेतुबन्धनम्।' हे विशेषण समुद्रातल्या सेतूला जितके लागू पडते तितकेच रामाने जोडलेल्या मानवी सेतूलाही. श्रीरामाने नरांना वानरांशी, आर्यांना अनार्य म्हणविल्या जाणाऱ्यांशी जोडले. खरदूषणांचा नाश करून आर्यावर्त किष्किंधेशी जोडला. रावणाशी लढताना समुद्रातील सेतूइतकाच हा मानवी सेतूही उपयोगी पडला आहे. नर, वानर, राक्षस, ऋक्ष (जांबुवान),लंकेहून आलेले रावणाचे चार मंत्री, हे सर्वजण रामाच्या बाजूने रावणाशी लढलेत. खरे तर रामरावणयुद्ध हे 'विषमयुद्ध' म्हणावे लागेल. रावणाचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते, प्रशिक्षित होते आणि संख्येनेही जास्त होते.

रामाकडे शस्त्रांची कमतरता होती. ८७ दिवस चाललेल्या ह्या युद्धात पहिले ८० दिवस रामाकडे साधा रथही नव्हता. शौर्य आणि धैर्य ह्या दोन चाकांवर चालणारा त्याचा 'धर्मरथ' मात्र मजबूत होता. बल, विवेक, दम आणि परोपकार हे त्याच्या रथाचे घोडे होते आणि सत्याची पताका त्या रथावर डौलाने फडकत होती. सद्गुरुकृपेचे अभेद्य चिलखत घालून राम लढत होता. रावणाची सेना 'शिस्त'बद्ध होती तर रामाची सेना रामप्रेमाच्या तंतूंनी 'बद्ध' होती. म्हणून तर युद्धाच्या शेवटच्या दिवशी स्वतः महर्षी अगस्ती रामाच्या राहुटीत आले आणि त्यांनीच दिलेल्या बाणाने रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा अंत झाला. त्याही प्रसंगी प्रभु रामाचे संस्कारशील आचरण आपल्याला अन्तर्मुख करते.

मरणान्तानि वैराणि ! निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो, ममाप्येष यथा तव ॥

मृत्यूनंतर वैर शिल्लक ठेवू नये हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र. उदारता आणि उदात्तता शिकविणारे 'मरणान्तानि वैराणि' हे वाक्य सुभाषिताचा दर्जा लेवून सर्वतोमुखी झाले आहे. 'हा जसा तुझा, तसाच माझाही भाऊ आहे असे समजून याची उत्तरक्रिया कर' असे शब्द फक्त प्रभु रामाच्याच तोंडून निघू शकतात. रामाचा वनवास संपला आणि सीतेची अशोकवनातून, सर्व देवांची रावणाच्या बंदिवासातून आणि समस्त जंबुद्वीपीयांची दहशतीतून सुटका झाली. रामाचे ध्येय साकारले. ऋषींची स्वप्ने पुरी झाली. पण नुसती दहशत मिटवून भागत नसते. नव्या मनूची नवी घडी बसवायची तर आदर्शांचीही स्थापना करावी लागते. तिचा प्रारंभ इथूनच झाला. सीतेच्या पावित्र्याची पूर्ण खात्री असूनही, तिच्या शुद्ध चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर असावा ह्या हेतूने रामाने तिला अग्निदिव्य करायला सांगितले आणि तिनेही ते अगदी हसत केले. इक्ष्वाकूंच्या सिंहासनाला पुसटसाही डाग लागू नये ह्या बाबतीत रामाइतकीच तीही जागरूक होती. राम-सीता वेगळे होतेच कुठे ? एकाच चित्शक्तीची ती दोन रूपे होती.

सीतेवरील उत्कट प्रेम हे श्रीरामाच्या एकपत्नीव्रतामागचे कारण होते हे तर खरेच, पण कदाचित त्याला दुसराही एक आयाम असू शकतो. त्या काळी विशेषतः राजघराण्यात - बहुभार्यापद्धत सर्रास प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांच्या मनाची घुसमट तर होतच असे, शिवाय राजघराण्यातील अंतःस्थ कारवायांनाही खतपाणी मिळत असे. बहुपत्नीप्रथा नसती तर मंथरा कैकेयीच्या मनात सापत्नभावाचे बीज पेरू शकली नसती कदाचित ह्यामुळेही प्रभु रामचंद्राने सर्व नृपतींना एकपत्नीव्रताचा सर्वस्वी नवा असा एक आदर्श घालून दिला असावा. कारण रामाच्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्राच्या उन्नतीचाच विचार असतो.

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी बिभीषण, सुग्रीव, अंगद, जांबुवान, हनुमान हे सर्वजण उपस्थित होते. राज्याभिषेकाचा सोहळा उत्साहात, आनंदात पार पडला. पण बिभीषण आणि सुग्रीव ह्यांना प्रभुचरण सोडून जावेसे वाटत नव्हते. वस्तुतः दोघेही समृद्ध राज्याचे अभिषिक्त राजे पण प्रभुरामाच्या सहवासापुढे त्यांना ती सत्ता आणि वैभवही तुच्छ वाटत होते.रामाची सेवा करत अयोध्येतच रहावे अशी मनीषा त्यांनी लक्ष्मणापाशी बोलून दाखवली. रामाची महती जाणत असल्यामुळे लक्ष्मणालाही त्यात काही वावगे वाटले नाही. रामाला त्याने तसे सुचवले देखील. रामाने त्यांचा मानसन्मान केला आणि गोड शब्दात निरोप दिला, पण ठेवून मात्र घेतले नाही कारण अयोध्येत त्याला परकी संस्कृती रुजू द्यायची नव्हती शिवाय लंकेत पुन्हा राक्षसी संस्कृती फोफावू नये म्हणूनही बिभीषणासारखा परमभागवत तेथेच असावा हाही विचार त्यामागे होता. तसेच किष्किंधेतही राक्षस धार्जिण्या वानरांवर वचक ठेवण्यासाठी सुग्रीवाचे तेथे असणे गरजेचे होते. हेच प्रभु रामाचे द्रष्टेपण होते. अयोध्येचे 'अ'योध्यपण त्याने भंगू दिले नाही. मातृभूमीचे स्वत्व जपणे हेच तर देवत्वाचे लक्षण. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' ही भावना जपणारा राम जन्मभूमीच्या सीमासुरक्षेसाठी असा तत्पर होता.

सर्व देवदेवतांच्या मूर्ती पूर्वाभिमुख असतात, पण रामाचा लाडका हनुमान मात्र दक्षिणमुखी असतो, त्याचेही कारण रामाचे द्रष्टेपण असावे असे वाटते. - लंका भारताच्या दक्षिणेला आहे. भगवद्भक्त बिभीषण तेथे होता हे खरे, पण तो मुळातच संन्यस्त वृत्तीचा. भविष्यात त्याने राज्य कुणा दुसऱ्या राक्षसवंशीयाला सोपवून वनाचा मार्ग धरला तर ?सीमासंरक्षणासाठी दक्षिणेवर सतत नजर ठेवण्याची कामगिरी प्रभुरामाने चिरंजीवित्व लाभलेल्या हनुमंतावर सोपविली असेल. प्रभु रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे. नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. त्याच्या चरित्राचे मनन करता करता, कथेचे पारायण करता करता 'रामपरायण' व्हावे आणि शेवटला 'राम' म्हणण्यापूर्वी, याचि देही याचि 'डोळा 'राममय' व्हावे ह्यातच 'राम' आहे ! नाही का ?

॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day9 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

No comments:

Post a Comment