Friday, April 12, 2024

रामो रमयतां वरः

रामायणात वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, वाल्मीकि, अत्रि, शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्ती अशा अनेक ऋषींचा उल्लेख आढळतो. ह्या प्रत्येक ऋषीचा आश्रम म्हणजे एकेक सांस्कृतिक केंद्रच होते. हे ऋषि आत्मज्ञानी होते, पण आत्मकेंद्रित नव्हते. धर्मनिष्ठ लोकांची रावणाने केलेली गळचेपी त्यांना अस्वस्थ करत होती. 'बुडती हे जन, देखवेना डोळा' अशी अवस्था झाली होती. त्यांच्याकडे ब्राह्मतेज होते, पण त्याला क्षात्र तेजाची जोड हवी होती. ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती एकत्र आल्याशिवाय रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा सामना करणे शक्य नाही हे त्यांना जाणवत होते, पण हे घडावे कसे ?

शब्दवेधी दशरथाचा बाण चुकून श्रावणबाळाला लागला पण दशरथ हा रघुवंशी राजा आहे. शूर आहे, पण निष्ठुर नाही. पापभीरू आहे. त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्या सत्यनिष्ठ राजाने राजकुलगुरु वसिष्ठांकडे मन मोकळे केले. वसिष्ठांनी त्याला अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. वर्षभर चालणाऱ्या ह्या यज्ञप्रसंगी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यातले सर्व प्रमुख ऋषिवर अयोध्येत एकत्र आले होते. यज्ञकृत्ये आटोपल्यानंतरच्या वेळात त्यांचा विचारविनिमय चालत असे. तिथेच ही योजना ठरली की दशरथाला होणाऱ्या पुत्राच्या हातूनच रावणरूपी अनिष्ट दूर करायचे.

पुत्रकामेष्टी यज्ञ विभांडकपुत्र महर्षि ऋष्यशृंगाच्याच हातून व्हावा असा आग्रह वसिष्ठांनी धरला. त्याचेही खास कारण आहे. वस्तुतः स्वतः वसिष्ठांचा अधिकार कमी नव्हता. त्यातून रघुवंशाचे ते कुलगुरू होते. तरीही हा आग्रह कारण ऋष्यशृंगाचे जीवन आणि मन्त्रोच्चारही तपःपूत होते. पण तसे तर प्रत्यक्ष वसिष्ठांचेही होते पण ऋष्यशृंगाला वनौषधींचेही परिपूर्ण ज्ञान होते. दशरथाला दिव्य गुणयुक्त पुत्र व्हावा ह्याच हेतूने वसिष्ठांनी ऋष्यशृंगाबद्दलचा आग्रह धरला आहे. यज्ञ संकल्प केल्यापासून वर्षभर दशरथ आणि तिन्ही राण्या व्रतस्थ आहेत. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करताहेत. आहारही मोजका आणि विशिष्ट आहे. त्यानंतरच दशरथाला मंत्रसिद्ध दिव्य पायसाची प्राप्ती झाली आहे. पट्टराणी म्हणून कौसल्येला आणि आवडती म्हणून कैकेयीला दशरथाने तो पायस अर्धाअर्धा दिला. पण दोघींच्याही मनाचा मोठेपणा की दोघींनीही आपापल्या पायसातला अर्धाअर्धा भाग सुमित्रेला दिला. सुमित्रेला जुळी मुले होणे आणि त्यापैकी लक्ष्मण कौसल्यानंदनाचा आणि शत्रुघ्न कैकेयीपुत्राचा अनुचर होण्यामागे हेच कारण असू शकते.

चैत्र शु. नवमी मंगळवार माध्याह्न वेळी पुनर्वसु नक्षत्रावर कौसल्येला पुत्रलाभ झाला. चैत्र शु. दशमी बुधवार सूर्योदयापूर्वी पुष्य नक्षत्रावर कैकेयीला पुत्रलाभ झाला आणि चैत्र शु. एकादशी गुरुवार माध्याह्न वेळी पुष्य नक्षत्रावर सुमित्रेला पुत्रद्वय झाले. कुलगुरु वसिष्ठांनी ज्येष्ठ पुत्राचे नाव ठेवले 'राम' 'रमन्ते योगिनोऽस्मिन्' असा तो राम. कैकेयीपुत्राचे नाव ठेवले 'भरत'. 'भरणात् भरतः भरणपोषण करणारा तो भरत. सुमित्रेच्या पुत्रांपैकी मोठ्याचे नाव वसिष्ठांनी 'लक्ष्मण' ठेवले. लक्ष्मीवान् स लक्ष्मणः वाल्मीकि रामायणात लक्ष्मणाला श्रीरामाचा 'बहिश्चर प्राण' म्हटले आहे. रामभक्ती हीच लक्ष्मणाची लक्ष्मी आहे. त्याच्या भावाचे नाव शत्रुघ्न. शत्रुं हन्ति इति शत्रुघ्नः संत तुलसीदास म्हणतात की तो शत्रूला मारतो म्हणून शत्रुघ्न नव्हे, तर ज्याचे नुसते नाव घेतले तरी शत्रू नामोहरम होतो म्हणून तो शत्रुघ्न. 'जाके सुमिरन ते रिपु नासा'। महर्षी वसिष्ठांनी चारी राजकुमारांची जी नावे ठेवली ती चौघांनीही सार्थ करून दाखवली. चौघेही एकाच वयाचे. पुढे चौघांचेही विद्याध्ययन वसिष्ठांच्याच आश्रमात झाले.

'सत्यं वद । धर्मं चर। स्वाध्यायात् मा प्रमदः।' या उपदेशाचे त्यांनी गुरुकुलात अक्षरश: पालन केले. चारही भावांचे अध्ययन संपले. वाल्मीकिमहर्षि म्हणतात -
सर्वे ज्ञानोपसम्पन्नाः, सर्वे समुदिता गुणैः।
सर्वे वेदविदः शूराः, सर्वे लोकहिते रताः ॥

खरे तर हे वर्णन चौघाही भावांचे आहे. चौघेही ज्ञानसम्पन्न, गुणी, सुशील आहेत. पण तेषामपि महातेजा रामः सत्यपराक्रमः असे नोंदवायला वाल्मीकि विसरले नाहीत. प्रभु राम 'आपदाम् अपहर्ता' आणि 'सर्वसम्पदां दाता' बनला तो अशा संस्कारांनी. महर्षि वसिष्ठांच्या उपदेशामुळे उत्साहाने परिपूर्ण बनलेल्या रामाच्या व्यक्तित्वाला नंतर अधिक पैलू पाडले ते ब्रह्मर्षि विश्वामित्रांनी. दशरथपुत्र राम हा खऱ्या अर्थाने 'रमयतां वरः' घडला तो ह्या दोन महर्षीमुळे.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day4 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

No comments:

Post a Comment