Saturday, April 13, 2024

आपदाम् अपहर्ता राम


श्रीरामाची विमनस्कता घालवून त्यांच्यात उत्साहाचे बीज पेरण्याचे काम वसिष्ठांनी केले आणि त्या बीजाला वाढवून अंकुरविण्याचे, अंकुराला योग्य दिशेला वळविण्याचे काम महर्षी विश्वामित्रांनी केले. एक दिवस दशरथाकडे येऊन विश्वामित्र म्हणाले,“राक्षस आमच्या यज्ञात नेहमीच विघ्ने आणतात. मला येत्या नवमीला सहा दिवसांचा यज्ञ करायचा आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी तुझे राम-लक्ष्मण मला दे. "

मुळात विश्वमित्रांना रामाला बाहेर काढायचे होते. घडवायचे होते. त्याचे तन-मन कणखर बनवायचे होते. भावी उद्दिष्टांचे (जी उद्दिष्टे पुत्रकामेष्टीच्या वेळीच ठरली होती, त्यांचे) बीजारोपण करायचे होते, ज्या दिव्यास्त्रांचे ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष महादेवाकडून प्राप्त करून घेतले ती दिव्यास्त्रे रामाला प्रदान करायची होती. रामलक्ष्मणांना जाऊ देण्यास दशरथ कचरतो आहे हे पाहिल्यावर गुरु वसिष्ठांनी हस्तक्षेप केला आणि विश्वामित्रासारख्या समर्थ ऋषीच्या सहवासात राजपुत्रांचे भलेच होईल ह्याची ग्वाही देऊन त्यांना विश्वामित्रासोबत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

श्रीरामाचे व्यक्तित्व घडवून आणण्यात दोघांचे एकमत आहे. राष्ट्रहित साधायचे असेल तर वैयक्तिक हेवेदावे बाजूलाच ठेवायचे असतात ह्या गोष्टीचा त्यांना कधीच विसर पडत नाही. जेव्हा असे होते तेव्हाच 'राम'राज्याची पायाभरणी होत असते. गुरूच्या आज्ञेचा अधिक्षेप रघुवंशीयांनी कधीही केला नाही, म्हणूनच दशरथाची अनुज्ञा मिळाली आणि रामलक्ष्मण विश्वामित्रासह सिद्धाश्रमाकडे निघाले. दशरथाने रथ देऊ केला तोही विश्वामित्रांनी नाकारला. दोघांना मुद्दामच पायी नेले.  त्या तिघांचा पहिला पडाव पडला शरयूतीरावर. तेथे विश्वामित्रांनी 'बला' आणि 'अतिबला' ह्या विद्या शिकविल्या. ह्या विद्यांमुळे तहान, भूक आणि निद्रा ह्यांवर ताबा ठेवता येतो. निर्णयक्षमताही वाढते. या विद्या म्हणजे वस्तुतः अस्त्रेच होत. ही अस्त्रे जया आणि सुप्रभा ह्या दोन स्त्रियांनी निर्माण केली होती हे विशेष. ह्या दोघी दक्षप्रजापतीच्या कन्या आणि कश्यपांच्या भार्या होत्या.

दुसऱ्या दिवशी ते कन्दर्पऋषींच्या आश्रमाकडे निघाले. जाताना प्रत्येक प्रदेशाची माहिती विश्वामित्र देत होते. तिथल्या समस्यांचा परिचय करून देत होते. पूर्वी तीर्थाटनाच्या वेळी ज्या समस्या पाहून रामाचे मन नैराश्याने काळवंडले होते, त्याच समस्यांकडे राम आता त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पाहात होता. 'आपदाम् अपहर्ता' तयार होत होता. तिसऱ्या दिवशी नावेत बसून तिघांनी गंगा पार केली. जो पहिला मुनी रावणाच्या पारिपत्याची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरला होता, त्या अगस्तीचा आता उजाड नि भकास झालेला आश्रम विश्वामित्रांनी दाखविला. त्याची दहा मुले राक्षसांनी खाऊन टाकली होती आणि त्यामागे त्राटिकेचा हात होता हे सांगत असतानाच त्राटिका तेथे अवतरली.  खरे तर ही त्राटिका मुळात राक्षसी नव्हती. सुकेतु नामक एका सदाचारसंपन्न यक्षाची ती कन्या अपत्यहीन सुकेतूने अपत्यप्राप्तीसाठी मोठे तप केले. त्यामुळे संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे ही कन्या त्याला झाली. त्याच्याच वराद्वारे तिला सहस्र गजांचे बळ प्राप्त झाले. जंभपुत्र सुंदाशी तिचा विवाह झाला. पुढे अगस्ती मुनींच्या शापाने सुंद मरण पावला तेव्हापासून ती क्रुद्ध आणि बेफाम बनली आणि अगस्तींच्या प्रदेशाचा विध्वंस करत फिरत होती. तीच त्राटिका आता रामलक्ष्मणांपुढे उभी होती. श्रीरामाने त्राटिकेचा वध केला.

अहल्योद्धाराची घटनाही ह्याच प्रवासात घडली आहे. रामलक्ष्मणासह विश्वामित्र गौतमाश्रमापाशी आले आणि त्यांनी हकीकत सांगितली की 'गौतमपत्नी अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या. एक दिवस गौतम ऋषी घरी नसताना इन्द्र संधी साधून तिच्याकडे आला. मुनिवेष घेऊन. तिने त्याला ओळखले, पण तीही मोहवश झाली. नको ते घडले. इन्द्र कुटीतून निघत असताना गौतम परतले आणि तेथेच त्यांनी इन्द्राला शाप दिला. देवांचा राजा असला तरी अशा अपराधाला क्षमा नाही. अहल्येला प्रायश्चित्त सांगताना ते म्हणतात

वातभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी ।
अदृश्या सर्वभूतानामाश्रमेऽस्मिन् वसिष्यसि ।।
अर्थात् - ह्याच आश्रमात तू तप करत, अन्नपाण्याचा त्याग करून धुळीत पडून रहा. कुणाच्या संपर्कात येऊ नकोस. म्हणजेच दगडाधोंड्याप्रमाणे निश्चल, निर्विकार आणि निराहार रहा. तिला असा आदेश देऊन गौतमही तपश्चर्येसाठी निघून गेले. तेव्हापासून हा आश्रम ओसाड पडला आहे. जेव्हा ते तिघेजण आत शिरले तेव्हा एका शिळेआड तपस्यारत अहल्या त्यांना दिसली. तिच्या हातून चुकून, तेही एकदाच पाप घडले होते. पण आता ती अक्षरश: दगड झाली होती. पतीच्या आदेशाचे तिने सर्वतोपरी पालन केले होते. श्रीरामाने पुढे होऊन तिला नमस्कार केला असे वर्णन वाल्मीकीने केले आहे. ज्या क्षणी श्रीराम तिच्यापुढे नमस्कारासाठी वाकला, त्याच क्षणी सिद्ध झाले की तिची पापे धुतली गेली. तिच्या मनाचा झालेला 'दगड' वितळला. ती पुन्हा अहल्या झाली. तिचे डोळे पाझरू लागले. रामाने तिचे आतिथ्य स्वीकारले आणि सिद्ध केले की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतेही किल्मिष नाही. त्याच वेळी गौतमही तप संपवून परतले होते. रामाने दोघांनाही प्रणाम केला. गौतमांचेही नेत्र पाणावले. या पुनर्भेटीनंतर दोघांनी जोडीने श्रीरामाची पूजा केली. त्यांच्या पुनर्मीलनाचे प्रतीक म्हणून रामाने ती स्वीकारली.

अचूक शरसंधान करून त्राटिकेला संपविणारा 'पुरुषार्थी' राम आणि अहल्योद्धार करणारा 'पतितोद्धारक' राम ही दोन्ही रूपे 'आपदाम् अपहर्ता' रामाचीच. म्हणूनच म्हणतात ना,

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day5 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

No comments:

Post a Comment