Saturday, February 27, 2021

लडाख येथे ३८ किमी रस्ता निर्माण करणारे सुलतानाम चोंजोर !!


लडाखच्या ७९ वर्षीय सुलतानाम चोंजोर यांनी स्वतःची पूर्ण संपत्ती विकून लडाख मधील झनस्कर सारख्या दुर्गम भागात ३८ किमी रस्ता बनवला आहे. चोंजोर ह्यांनी संपत्ती विकून ५७ लाखाचे जेसीबी मशीन विकत घेत रस्ता निर्माण केला आहे. ह्या अद्वितीय कार्यासाठी त्यांना ह्यावर्षी पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 

लडाख हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश आहे. २०१९ साली त्याला मान्यता मिळाली. भारतीय उपखंडातील उत्तर भागात आणि काराकोरमच्या आसपास आहे. एकेकाळी लडाखला आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गांच्या महामार्ग रस्त्यावरच्या जागेचे अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. परंतु, चिनी अधिकाऱ्यांनी १९६० च्या दशकात लडाखची तिबेट व मध्य आशिया यांच्यामधली सीमा बंद केल्यामुळे पर्यटन वगळता आंतरराष्ट्रीय व्यापार कमी झाला. १९७४ पासून, भारत सरकारने लडाखमधील पर्यटनवृद्धीस यशस्वीरीत्या प्रोत्साहित केले आहे. रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेला जम्मू-काश्मीरचा लडाख हा भाग असल्याने या भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. पण ह्याच बरोबर आज लडाख मध्ये सुलतानाम चोंजोर ह्यांचे नावही आदराने घेतले जाते कारण जगावेगळं कार्य त्यांनी प्रत्यक्षात साकारले आहे.

लडाखमधील कारगिल जिल्ह्यातील जानस्कर भागात आपली वडिलोपार्जित संपत्ती विकून स्थानिक लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी रस्त्याचे प्रकल्प त्यांनी हाती घेतले. हा प्रवास तसा सोपा नव्हता. लडाखमधून हिमाचल व इतर भागाकडे जाण्यासाठी अनेक दिवस चालल्यानंतर स्थानिकांना वाहनांसाठी मोठी रक्कम मोजावी लागत होती आणि ह्यातून वेळ आणि शारीरिक कष्ट दोन्ही लागत असत. ह्यांतूनच मार्ग काढत सुलतानाम चोंजोर ह्यांनी जम्मू-काश्मीर मधील रामजाक ते जानसकरमधील करग्यक पर्यंत ३८ किमी लांबीचा रस्ता तयार केला. मे २०१४ ते जून २०१७ पर्यंत त्यांनी ३८ किमी लांबीचे अंतर त्यांनी पूर्ण केले. १९६५ - २००० ह्या प्रदीर्घ कालावधीत राज्य हस्तशिल्प विभागात सुलतानाम चोंजोर कार्यरत होते. 

रस्ता निर्मितीसाठी काही स्थानिक लोकांकडून, नगरसेवक आणि  व्यापाऱ्यांकडूनही त्यांना पैशांची मदत मिळाली कारण स्थानिक लोक ह्या कामासाठी त्यांच्या बाजूने उभे होते. इतरांच्या वेदना व त्रास पाहून त्यांना रस्ता तयार करण्याची प्रेरणा मिळाली. वर्षातून फक्त ३-४ महिने त्यांना काम करता येत असे कारण वातावरण आणि बर्फवृष्टीमुळे रस्त्यावर काम करणे शक्यच नव्हते. पण ह्या अवघड परिस्थितीही त्यांनी हाती घेतलेले कार्य पूर्ण केले. पुढे B.R.O ने ह्या रोडचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण केले आहे. 

सुलतानाम चोंजोर साधी राहणीमान पसंत करतात, म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणात आज आर्थिक मदतीची गरज नाही. राज्य सरकारकडून मिळत असलेल्या नियमित मासिक पेन्शनवर त्यांचा उदरनिर्वाह आणि आनंदी आयुष्य सुरू आहे. आज त्यांची एवढीच इच्छा आहे की लडाख मधील बाकी जिल्ह्यात रस्ते निर्माण व्हावे आणि संपूर्ण लडाख प्रदेश रस्त्यांनी एकमेकांना जोडला जावा ज्यामुळे स्थानिकांना त्याचा लाभ घेता येईल. लोककल्याणासाठी कटिबद्ध असलेले सुलतानाम चोंजोर ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #tsultrimchonjor#prideofsocialwork #prideofladakh#PeoplesPadma


Friday, February 26, 2021

"आग्रह मराठीचा"

"माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके ।

ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।। "

ही ओवी संत ज्ञानेश्वर माउलींनी सातशे वर्षापूर्वी रचली आहे त्यांनंतर जे पसायदान माउलींनी विश्वात्मक देवाकडे मागितले ती प्रार्थना जेव्हा युनोच्या वार्षिक आमसभेत एकत्र म्हंटल्या जाईल तो मराठीचा सुवर्णदिन म्हणता येईल आणि तो दिवस खऱ्या अर्थाने  मराठी गौरव  दिवस म्हणून साजरा होईल. दरवर्षी ‘जागतिक मराठी दिन’ आपण अतिशय उत्साहात साजरा करतो. परंतु भाषेच्या सर्वांगीण विकासाबाबत आपण कायमच उदासीन राहतो. राजदरबाराची उदासीनता अलाहिदा;  परंतु जनताजनार्दनच मराठी भाषेची उपेक्षा करत आहे असे वाटत असतांना आता सोशल मीडियाच्या जमान्यात चित्र सकारात्मकता दर्शविणारे आहे. अभिजात भाषेचा दर्जा पात्रतेचे सर्व निकष पूर्ण होत असताना का मिळत नाही, हेही एक न उलगडणारे कोडे आहे. आज प्रत्येकाला मराठीचा अभिमानच नाही तर माज असायला हवा. अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठीची आज काय स्थिती झाली आहे याचा प्रत्येकाने आजच्या दिवशी जरूर विचार करावा.

मराठी भाषेचा विचार करता प्रामुख्याने पाच मुद्द्यावर प्रकाश टाकतोय.

• मराठी साहित्य • मराठी बोली
• मराठी शाळा • प्रवाही भाषा
• भाषा आणि संस्कृती

काळच्या सीमा ओलांडत कायम अजरामर ठरेल असे समृद्ध साहित्य मराठी भाषेत लिहिले गेले. असंख्य साहित्यिकांनी आपापल्या ताकदीनिशी जमेल तसे  योगदान या मराठी भाषेला दिले.  पण मग चूक कुठे झाली ? मराठी साहित्य आपण खरंच वाचतोय का ? आपल्या संग्रही मराठी पुस्तकं आहेत का ? आपण लोकांना भेट म्हणून मराठी पुस्तक देतो का ? आज मराठी पुस्तक विक्रेत्यांची काय अवस्था झाली आहे हे एकदा बघण्यासारखे आहे. जर आजच्या दिवशी आपण पुस्तक विक्रेत्याकडून एकतरी पुस्तक  विकत घेतले तर त्याला भरपूर आनंद होईल आणि आपल्याकडूनही अक्षरवांग्मयाची अल्प सेवाही घडेल.

त्यानंतर मराठी- संवादाचे माध्यम. आज मराठी बोलायला सर्वजण घाबरतात, प्रसंगी कमीपणाही वाटतो. हे कुठे तरी कमी व्हायला हवे.  यापुढे दोन मराठी भाषिक एकत्र आले तर मराठीतच बोलण्याचा आग्रह धरूया, मग क्षेत्र कुठलंही असेल. आज तसा संकल्प करूया, मराठी बोलण्याचा. प्रसंगी इंग्रजी आणि इतर भाषा ही यायला हव्यातच आणि त्यांवरही मराठी भाषेइतकंच प्रभुत्व असावं पण निदान पारचितांकडे,मित्र परिवारात मराठी बोलण्याचा आग्रह धरुया.

मराठी शाळा  - आज निदान प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेत असायला हवं. आजचं स्पर्धेचं युग बघता इंग्रजी भाषा महत्वाची आहेच पण संस्कृती आणि मातीशी नाळ जोडली जाण्यासाठी प्राथमिक शिक्षण मराठीतच व्हायला हवे असे वाटते आणि ते शक्य नसल्यास घरी पालकांनी,थोरल्या मोठ्यांनी तरी आपल्या घरीच तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा.

प्रवाही भाषा- कोणत्याही संवादाची मनातल्या भावनांसह परिपूर्ण अभिव्यक्ती ज्या माध्यमातून समोरच्याच्या मनावर प्रथम होते ती म्हणजे मराठी भाषा आहे. जागतिकीकरणाचा डोलारा आज पाश्चात्यांनी सावरल्याने त्यांच्या भाषा आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. पण आपल्या लेखणीतून आपल्या विचारातून मराठी जागी ठेवण्याची गरज आहे. मराठीतून संगणक शिकणे, विज्ञान शिकणे या फारच अवघड गोष्टी आहेत. आर्टीफिशियल इटीलिजंन्स, स्पेस सायन्स, बायो-टेक या तर दूरच्या गोष्टी;  त्या इंग्रजी मधून शिकलेल्याच योग्य आहे. कितीतरी वेगळ्या शाखा आहेत जिथे मराठी प्रतिशब्दच देता येणार नाहीत. भाषा ही प्रवाही असावीच या मताचा मी आहे.

भाषा आणि संस्कृती - कोणतीही भाषा आत्मसात करताना ती तिच्यासोबत तिची संस्कृतीही थोड्याफार प्रमाणात घेऊन येत असते. त्यामुळे पाश्चात्य संस्कृती आपल्या अंगवळणी पडत असेल तर ते साहजिक म्हणावं लागेल. कारण जी संस्कृती शक्तिशाली आहे, विकसित आहे, आघाडीवर आहे तिचंच अनुकरण करणं हा मानवी स्वभाव आहे. पण त्यासोबत आपल्या भाषेतून आलेल्या संस्कृतीचा सारासार विवेक आणि विचार  करून स्वीकार करणे अथवा तिचा त्याग करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. कारण चांगले सांस्कृतिक पायंडे हे भाषेशिवाय देखील नव्या रुपात जिवंत राहू शकतात म्हणून आपली संस्कृती आहे तशी पठडीबद्धचं राहावी, तिचे स्वरूप बदलत्या काळानुसार बदलू नये असा दुराग्रह ठेवला तर उलट तो त्या संस्कृतीच्या अंताला कारणीभूत ठरेल.भाषाविकासाचा अभ्यास करत त्यावर अधिक जोमाने प्रयत्न केले तर तेही पूर्ववत होईल. फक्त प्रयत्न हे मराठी मनाला करावे लागेल. ही मराठी शे-दोनशे नव्हे तर तब्बल अडीच हजार वर्षांपासून मानवाला व्यक्त होण्यासाठीचे समर्थ माध्यम बनली आहे. अनेक थोर संत, साहित्यिक,कवी, लेखक या मराठीसाठी आग्रही होते आणि आजही आहेत. मराठीचा गोडवा,तिचे वैचारिक अधिष्ठान आणि तिचा समृद्ध वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असायला हवे. हाच ‘मराठीचा आग्रह’ जागतिक मराठी दिनानिमित्त दृढ करत मराठी भाषा दिग्विजयी करण्याचा प्रयत्न करणे अधिक उचित ठरेल.

✍️ सर्वेश फडणवीस

#मराठी #मराठीभाषादिवस 

Tuesday, February 23, 2021

आसामी महिलांसाठी सहकारी बँक काढणाऱ्या लखिमी बरूआ !

आसाम मधील जोरहाट येथे ७१ वर्षीय समाजसेविका लिखिमी बरूआ ह्यांनी फक्त महिलांसाठी पहिली सहकारी बँक स्थापन केली आहे. ह्या अनोख्या कार्यासाठी त्यांना ह्यावर्षी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आसामी महिलांसाठी 'लक्ष्मी माँ' म्हणून त्या परिचित आहेत. शून्यातून लखिमी बरूआ ह्यांचा प्रवास सुरु झाला , आसाम मध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी लखिमी बरूआ ह्यांचे नाव आदराने घेतले जाते. लखिमी बरूआ ह्यांनी १९९८ मध्ये 'कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेची' स्थापना केली. त्यांनी महिलांना रोजगार देत त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. जोरहाट,शिवसागर,गोलघाट ह्या जिल्ह्यातील अनेक महिला सहकारी बँकेच्या सदस्य आहेतच पण उत्पन्न वाचवत ,सुलभ कर्ज घेत त्याचे हफ्ते फेडत आहेत. ह्या बँकेत येणाऱ्या जवळपास ७५% हुन अधिक महिला ह्या निरक्षर आहेत. 


लखिमी बरुआ ह्यांच्या आईचे त्यांच्या जन्माच्यावेळी निधन  झाले. वडिलांनी सांभाळ केला पण पुढे तारुण्यात असतांना वडील सोडून गेले आणि त्यानंतर नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतली आणि त्यांनीच महिलांसाठी आर्थिक सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. कठीण परिस्थितीत सुद्धा त्यांनी स्वतःला सिद्ध केले आणि आठ वर्षे संघर्ष करत आज सहकार क्षेत्रांत आसामी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. 


लखिमी बरुआ ह्यांना जाण होती की, अत्यंत गरीब स्त्रियांना पैशांच्या अभावामुळे किंवा विविध महिला गटांमध्ये गुंतवणूकीत पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांना कुठल्या समस्या येवू शकतात आणि त्या जाणिवेतून त्यांनी बँक सुरू केली. बहुतेक महिलांना तर बँक कशी चालते ह्याबद्दल ही माहिती नव्हती. पण परिस्थितीत बदल होत गेला. लखिमी बरुआ ह्यांनी १९९० साली भारतीय रिझर्व्ह बँकेला महिलांसाठी सहकारी बँक स्थापन करण्यासाठी अर्ज केला. १९९८ मध्ये मंजुरी मिळाली आणि दोन वर्षांनंतर जोरहाटमध्ये ८.५० लाख आणि १५०० महिला सदस्यांच्या आरंभिक गुंतवणूकीसह पहिली सहकारी बँक स्थापन झाली. 


बँकेत केवळ महिलाच काम करतात आणि आता 'कोनोक्लोटा महिला सहकारी बँकेच्या चार शाखा आहेत. २१ नियमित कर्मचारी आणि ३४,००० खातेदार आहेत आणि बऱ्यापैकी खातेदार ह्या महिला आहेत. २१ महिला कर्मचारी सरकारी योजनांचा लाभ ह्या निरक्षर महिलांना सांगतात आणि महिला शून्य शिल्लक किंवा २० रुपये इतक्या कमी किमतीने आपली खाती उघडुन आत्तापर्यंत त्यांनी ८,००० हून अधिक महिलांना आणि सुमारे १२०० महिला बचत गटाला कर्ज दिले आहे. गेल्या वर्षातील त्यांची उलाढाल जवळपास १५ कोटीहुन अधिक होती आणि ३० लाख नफा होता. अत्यंत गरीब महिलांच्या ठेवी ह्या बँकेमार्फत चालतात. खासदार किंवा आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी संबंधित सरकारी योजना किंवा त्या संबंधित कामे त्यांच्या बँकेमार्फत केल्या जातात. अधिकाधिक महिलांना मदत मिळावी हाच त्यांचा उद्देश आहे. आसाम मधील ३३ जिल्ह्यात कमीतकमी १ शाखा उघडण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आसाम सारख्या दुर्गम आणि सुदूर भागात सहकारी बँकेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक क्षेत्रात आत्मनिर्भर करणाऱ्या  लखिमी बरुआ ह्यांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #lakshmima #prideofsocialwork #prideofassam #PeoplesPadma



Saturday, February 20, 2021

पाच दिवसांत दोनदा एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला अंशु जम्सेंपा !!

अंशु जम्सेंपा. ४१ वर्षीय अरुणाचल प्रदेशातील बोंबडीला भागातील गिर्यारोहण करणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सलग पाच दिवसात दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा मान त्यांच्या नावे आहे. अंशु जम्सेंपा
नॉर्थ-ईस्ट टुरिझम च्या ब्रँड अँबेसेडर आहेत. आजवर अंशु जम्सेंपा ह्यांनी पाच वेळा एव्हरेस्ट वर चढाई केली आहे. ह्यावर्षी अद्वितीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत झाल्या आहेत. 

जर आपला प्रचंड आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. याचं एक सुंदर उदाहरण म्हणजे अंशु जम्सेंपा. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी एखादा डोंगरावर चढावे,एखादे शिखर सर करावे हे वाटत असतेच. जणूकाही आपल्याला खूप मोठं बक्षिसं मिळाल्याचा आनंद त्यातून मिळतो. अंशु जम्सेंपा ह्यांनी २०१७ मधील मे महिन्यात सलग १६ मे आणि २१ मे ह्या दोन दिवशी माऊंट एव्हरेस्ट सर केला होता. ८८४८ मीटर म्हणजे (२९,०२८ feet) अंतर त्यांनी पार केले आहे. आज एव्हरेस्टमधील सर्वात वेगवान डबल क्लाइंबिंग करण्याचा बहुमान त्यांच्या नावाने आहे.

१६ मे रोजी इतर १७ गिर्यारोहकांसह अंशु जम्सेंपा एव्हरेस्टच्या शिखरावर चढून सकाळी ९.१५ वाजता त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकला. पुन्हा १९ मे रोजी नेपाळी गिर्यारोहक फूरी शेर्पाबरोबर त्यांची दुसरी चढाई सुरू झाली जवळजवळ कुठेही न थांबता त्यांनी गिर्यारोहण सुरू ठेवले. शिखर दरवाढीच्या अगोदर थोड्या थोड्या वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि शेवटी २१ मे रोजी सकाळी ७.४५ वाजता जेनिथ गाठली. मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना ११८ तास ३० मिनिटे लागली.

२००९ पासून अंशु जम्सेंपा ह्यांच्या गिर्यारोहण प्रयत्नांना सुरुवात झाली. त्यांनी बर्‍याच रॉक क्लाइंबिंग आणि साहसी खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे. अरुणाचल माऊंटिनेरिंग आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन मधून गिर्यारोहक म्हणून सुरुवात केली आणि 
ह्यासाठी घरच्यांनी कायमच प्रोत्साहित केले. एकदा सुरुवात केल्यावर मागे वळून पाहण्याची त्यांच्यावर कधीही वेळ आली नाही. प्रशिक्षण कोर्सच्या वेळी जाणवले की डोंगरात उभे राहायला आवडतं आणि कुठेतरी माउंट एव्हरेस्टला भेटायचे विचार त्यातून पुढे आले. पहिल्यांदा ही भावना फारच जबरदस्त होती. त्यासाठी त्यांनी सर्वप्रकारचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. माऊंट एवरेस्ट चढाई करण्याच्या आधी त्यांनी इतर लहानमोठ्या शिखरांवर चढाई  केली कारण त्यांना जाण होती मोठ्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करण्यासाठी हे करावे लागणार होतेच. हा प्रवास ही शून्यातून सुरू झाला आहे. लहानपणी लवकर लग्न झाल्याने आणि अत्यंत गरीब परिस्थितीत असतांना प्रसंगी जमीन विकून त्यांनी गिर्यारोहक म्हणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे. 

आज अरुणाचल प्रदेश सारख्या दुर्गम आणि सुदूर भागातील असून सुद्धा जिद्द आणि काही करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि गिर्यारोहक म्हणून वेगळी वाट त्यांनी निवडली. त्यांच्या पराक्रमाची ओळख पटवून देत केंद्र सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #anshu_jamsenpa
#prideofsport #prideofarunachalpradesh #PeoplesPadma

Friday, February 19, 2021

शिवबा आणि आपण !!


शीर्षक थोडं वेगळं आहे. पण विचार करता जे भावलं ते शब्दात मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. १९ फेब्रुवारी तारखेनी महाराजांचा जन्मदिवस. पण सध्या तिथी आणि तारीख असा घोळ सुरू असतानाच ३६५ दिवस छत्रपतींचे स्मरण केले तर ते अधिक चांगले राहील. मी स्वतःला  खरंतर भाग्यवान समजतो की, त्यांचा जन्म ज्या मातीत झाला त्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो. १५ ऑगस्टला रायगडावर जाता आले हा पण मी नशीबाचा एक भाग आहे असे समजतो. ‘झाले बहु होतील बहु परंतु यासम हा’ असं समर्थ म्हणतात हे पूर्णपणे खरं आहे. 

कारण महाराजांच्या संपूर्ण चरित्रात बघितले की समजतं ,
राजा आणि प्रजा यांचे नाते पूर्णतः वेगळेच होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक हा राजा प्रजेशी एकनिष्ठ होता.  त्याचे निर्णय प्रजा पूर्णपणे ऐकत होती. त्याचे नाते इतके घट्ट होते की प्रसंगी मावळे आम्ही असताना आमच्या राजाला लढावं लागू नये यासाठी सदैव तत्पर होते. छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर जे अष्टप्रधान मंडळ महाराजांनी तयार केले आज त्यावर अधिक चिंतन व्हायला हवे. युद्धनीती, राज्यनिती ह्यावरही अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. निवडक मावळे एकत्र करत ज्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली आणि घेतलेली प्रतिज्ञा शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.  

या राजाकडे कुठले गुण नव्हते ? सर्वगुण संपन्न असा हा राजा होता. इतिहासातील वेड लावणारं असं हे व्यक्तिमत्व. मैत्रभाव, निष्ठा, राजकारण, सावधपणा, बलोपासक, धर्मनिष्ठ, असे अनेक पैलू आणि गुण आमच्या राजात होते. आज त्यांची जयंती साजरी करताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. आजचा तरुण महाराजांसारखी दाढी ठेवतो आहे इतपत ठीक पण तोच दाढीतला व्यक्ती पानठेल्यावर सिगरेट किंवा खर्रा खाताना दिसतो त्यावेळी वाईट वाटतं.. याला राजांचे विचार समजलेच नाही असं वाटतं.  हे कुठं तरी कमी व्हावं किंवा बंद व्हावं हीच इच्छा आहे. आज समाज जीवनात वावरतांना श्री छत्रपतींचा कुठला तरी एक गुण तरी सर्वांनी अंगिकारला तर हे राष्ट्र नक्की जगद्गुरु पदी बसेल आणि जे परं वैभवाचं स्वप्न बघतोय ते ही लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास वाटतो पण जयंतीचे सोहळे करायला लागल्यावर तो सोहळा फक्त त्या दिवसापूर्ती मर्यादित राहीला आणि विचार हे पुन्हा पुस्तकातच बंदिस्त झाले. बदल घडवायचा आहे तो आपल्याला ती ताकद आणि ते सामर्थ्य फक्त आपल्याकडेच आहे.

माझ्या मते राज्यशकट हाकताना अजाणतेपणीही न चुकलेला जगातील एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती..  राज्यकारभार, युद्धनीती, नैतिकता, चारित्र्य, नातेसंबंधातली कर्तव्ये, भविष्याचा वेध, भूतकाळाची जाणीव, वर्तमानातल्या घडामोडींचे अचूक आकलन आणि विश्लेषण, स्थापत्य, शस्त्र आणि शास्त्र, नियोजन, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, माणसे जोडण्याची आणि टिकवून ठेवण्याची किमया अशा सगळ्याच आघाड्यांवर यशस्वी झालेला जगातील एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती ..

आजचे विद्यमान सरकार छत्रपतींचे पाईक आहे असे म्हणता येईल. ज्या राष्ट्राचा पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणवतो प्रसंगी राजतिलक होण्याअगोदर ज्यास्थानी आमच्या राजाचा राज्याभिषेक झाला अशा रायगडावर जाऊन जी व्यक्ती नतमस्तक होते हे ही उत्साहवर्धक असेच आहे . 

काळाच्या कराल जबड्यातून ज्यांनी स्वराज्यारूपी सुर्य ओढून काढला, सह्याद्रीचा झुकलेला माथा ज्यांनी उन्नत केला,त्यांच्या अश्वाच्या खुरांनी उधळलेली ही पवित्र धूळ माथ्यावर तिलक करून,प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो हे खरा आणि सच्चा मावळा आहे. 

सर्वेश फडणवीस

Wednesday, February 17, 2021

९५ वर्षीय व्हायोलिन वादक अण्णावरापू रामास्वामी !!


व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे,भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत आणि विविध घराणी आता ह्यात ही आली आहेत आणि ह्याच धारेत कर्नाटक घराण्यातील ९५ वर्षीय ज्येष्ठ व्हायोलिन वादक अण्णावरापू रामास्वामी यांना " पद्मश्री "बहुमान ह्यावर्षी मिळाला आहे. 

भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज संपूर्ण देशामध्ये कुठल्याही गायन मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. हे वाद्य जितके मधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरांत लावल्या की, मनात येईल ते संगीत साकार करता येते.

२३ मार्च १९२६ रोजी आंध्र प्रदेशच्या सोमावरपाडू गावात जन्मलेल्या श्री अण्णावरापू रामास्वामी एक शास्त्रीय कर्नाटक व्हायोलिन उस्ताद आहे. सुरुवातीला एम. जगन्नाथम चौधरी त्यानंतर  पारूपल्ली रामकृष्णन् ह्यांच्या कडून कर्नाटक संगीताचे शिक्षण त्यांनी घेतले. परूपल्ली रामकृष्णन्य पंतुलु, एम बालामुरलीकृष्ण, अर्याकुडी रामानुज अय्यंगार, चेंबई वैद्यनाथ भागवतार यासारख्या कर्नाटक संगीतकारांसमवेत त्यांनी साथ दिली. वंदना रागम, श्री दुर्गा रागम, तिनेटराडी तळा आणि वेदादी तळा अशा नवीन रागांची रचना अण्णावरापू रामास्वामी ह्यांनी केली आहे. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेल्या ख्यातनाम व्हायोलिन वादक अण्णावरापू रामास्वामी सात दशकांपासून विनामूल्य व्हायोलिन प्रशिक्षण देत आहेत. सात दशकांपर्यंत गाण्यात समर्पित यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी नित्य साधनेच्या बैठकीला कधीही दुर्लक्षित केले नाही. कर्नाटक संगीताच्या अतुलनीय प्रतिभेस त्यांच्या रचना इतकेच ते सच्चे ‘उपासक’ आहेत. आज अनेक पुरस्करांची श्रीमंती त्यांच्या पाठीशी असतांना आजही सतत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते म्हणतात,प्राचीन सांस्कृतिक कलांचे संरक्षण आणि त्याबद्दल प्रोत्साहन आपण दिलें पाहिजे आणि आता तो त्यांचा ध्यास झाला आहे. सर्व प्राथमिक शाळांमध्ये संगीत सुरू केले जावे आणि या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संगीत महाविद्यालय सुरू केले जावे हीच त्यांची इच्छा आहे. 

वयाच्या ह्या टप्प्यावर असतांना आजही त्यांचा सांगीतिक मार्गावरील प्रवास सुरु आहेच. सर्वात ज्येष्ठ व्हायोलिन वादक म्हणून त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही ठिकाणी शेकडो पुरस्कार मिळाले  आहेत आणि व्हायोलिन वादनासाठी जगभर त्यांचा प्रवास झाला आहे. अण्णावरापू रामास्वामी ह्यांना निरामय आरोग्य परमेश्वराने प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #annavarapuramaswamy
#prideofart #prideofandhrapradesh
 #PeoplesPadma

Saturday, February 13, 2021

भिल्ल आदिवासी पिठोरा चित्रकार भूरी बाई !!

मध्य प्रदेश आदिवासी संग्रहालयात चित्रकार म्हणून काम करणाऱ्या भिल्ल चित्रकार भुरीबाई बारिया हे नाव आज कला आणि सांस्कृतिक जगातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांच्या पारंपरिक चित्रांनी मध्य प्रदेश संग्रहालयापासून सुरुवात करत सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत आपली मजल मारली आहे. ह्यावर्षी भूरीबाई ह्या पद्म पुरस्काराने अलंकृत झाल्या आहे. 

मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील मोरी बावडी परिसरातील पिटोल गावात राहणाऱ्या भूरी बाई यांचे वय आज ५२ वर्षे आहे. त्या भिल्ल आदिवासी समाजातील आहे. त्यांच्या गावातील बहुतेक लोक विशिष्ट प्रकारचे पिठोरा चित्रकला करायचे. त्यामुळे लहानपणापासूनच भूरीबाईंचा संबंध चित्रकलेशी जुळत गेला. त्यानंतर मध्यंतरी त्या काही काळ परिस्थितीमुळे मोलमजुरी करू लागल्या पण भोपाळ मधील भारत भवनात मोलमजुरी करतांना प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामीनाथन ह्यांनी त्यांना जी प्रसिद्धी मिळवून दिली त्यामुळे भूरीबाई हे नाव आज जागतिक पटलावर पिठोरा चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहे. खरंतर भूरीबाई ह्यांचा प्रवासही अतिशय प्रेरणादायी आहे. ज्यांना साधे हिंदी बोलता येत नव्हते,त्यांचा ह्या कलेच्या माध्यमातून थेट अमेरिकेपर्यंत प्रवास झाला. 

भूरीबाई २०१२ साली भोपाळ येथे आपल्या पती आणि मुलांसमवेत मोलमजुरीसाठी आल्या. भारत भवनमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात त्या वाळू मळण्याचे काम करत होत्या, त्या कामाचे त्यांना सहा रुपये रोजी मिळत होती. रिकाम्या वेळात, चुन्यात लाकूड बुडवून मुलांसाठी काही विचित्र चित्रे त्या बनवत होत्या. एकदा या चित्रांवर एका व्यक्तीची नजर गेली त्यांनी चित्रांबद्दल भूरीबाई ह्यांना विचारले त्यावेळी भूरीबाई ह्यांना हिंदी सुद्धा समजत नव्हते. भूरीबाई सांगतात," त्या व्यक्तीस मी ओळखत नव्हते आणि आजवर कॅनव्हास देखील पाहिला नव्हता. प्रयत्न करून चित्रांची मालिका केली. मग मला कळले की ते सामान्य माणूस नाही तर एक प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामिनाथन आहे." पुढे ह्या चित्रांमधूनच त्यांना आदिवासी संग्रहालयाच्या भिंती रंगवण्याची संधी मिळाली आणि पुढे या भिंतींनीच त्यांना आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.

भील्ल आदिवासी जमातीचे लोक पिठोरा चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या घराच्या भिंती पिठोरा चित्रांनी रंगवलेल्या असतात. बडोद्यापासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या तेजगड गावात (मध्य गुजरात) राहणार्‍या राठवा,भील्ल आणि नायक आदिवासींनी ही चित्रे भिंतींवर बनविली आहे. असे मानले जाते की ते शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या चित्रांमध्ये भील्ल जमातीच्या भोज जातीचे जीवन,प्राणी,पक्षी आणि सणांची नोंद आहे. पिठोरा बाबा त्यांच्यासाठी खूप खास आणि पूजनीय आहेत. जे लोक जास्तीत जास्त पिठोरा पेंटिंग्ज घरात ठेवतात त्यांचा समाजात खूप आदर असतो. पिठोरा चित्रकाराला लखारा असे म्हणतात आणि जे या चित्रांचा लेखाजोखा ठेवतात त्यांना झोखरा असे म्हणतात. आदिवासींचा असा विश्वास आहे की केवळ पुरुषच हे चित्र बनवू शकतात. 

भूरीबाईंनी आपल्या वडिलांना लहानपणी पिठोरा चित्र काढताना पाहिले होते. त्यांच्या जातीमध्ये केवळ पुरुषांनाच चित्र काढण्याचा अधिकार होता त्यामुळे भूरीबाईंनी वडील गेल्यानंतर जंगलातील झाडांच्या खोडावर ह्या चित्रांचा सराव केला. पुढे जनजाती संग्रहालयात ह्या चित्रांचे काम मिळाल्यावर समाजातील लोकांनी तीव्र विरोध दर्शवला पण स्वतःला आणि कुटुंबाला खायला मिळावे ह्यासाठी त्यांचे काम सुरू होतेच. आता भूरीबाई आणि त्यांच्या चित्रांना इतका आदर मिळाल्यावर कुणीही तक्रार करत नाही. त्या मुलाखतीत सांगतात,“आम्ही अजूनही आमच्या खेड्यात,आपल्या कुटूंबाशी फारच जुळलो आहोत. घरात लग्न असेल तर गावातूनच काम करतो. भूरीबाई आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबाने ही कला जपली आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना ही पिठोरा पेंटिंग शिकवले आहे,कारण त्यांचा विश्वास आहे की कुठली कला कधीच मरत नाही. 

आज भूरीबाई गावातील तरुणांना हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत कारण ही कला रोजगाराची संधी देणारी आहे. भूरीबाईंचा विश्वास आहे जर आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिले तर ही कला आगामी काळात आणखी जतन होईल. म्हणून जेव्हा संधी मिळेल तेव्हा भूरीबाई कार्यशाळा घेण्यास जातात. भुरीबाईंचा पारंपरिक भिंती रंगवण्यापासून मोठ्या कॅनव्हास रंगवण्याचा प्रवास आज पद्म पुरस्काराने अलंकृत झाला आहे. आज भिल्ल आदिवासी यांची पिठोरा चित्रकला प्रत्येकाला दिशा आणि सन्मान मिळवून देणारी ठरावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #Bhuribai
#prideofart #prideofmadhyapradesh #PeoplesPadma

Tuesday, February 9, 2021

सेंद्रिय शेती करणाऱ्या १०७ वर्षीय पप्पअम्माल !!

Age is just a number !! खरंच वय कोणत्याही गोष्टीसाठी अडथळा ठरू शकत नाही आणि नेहमीच लक्षात ठेवावे की कठोर परिश्रम करण्यासाठी कुठलाही पर्याय कधीच असू शकत नाही. कारण तामिळनाडू मधील १०७ वर्षीय पप्पअम्माल ह्या सेंद्रिय पद्धतीने गेल्या नऊ दशकापासून शेती करत आहेत. जमिनीची सुपीकता शाश्वत ठेवायची असेल तर सेंद्रिय खतांचा आणि पदार्थांचा वापर पिकांमध्ये,फळझाडांमध्ये करणे आवश्यक आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी पप्पअम्माल ह्यांना ह्यावर्षी पद्म पुरस्काराने अलंकृत करण्यात आले आहे. पप्पअम्माल ह्यांचा प्रवास ही शून्यातून सुरू झाला आहे. 

आज रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती, या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले आहेत. पारंपरिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण मानले गेले. पण,पप्पअम्माल अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि अलीकडच्या काळात त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे.

एम.पप्पअम्माल उर्फ ​​रंगममल यांचा जन्म १९१४ साली कोईम्बतूर मधील देवळापुरम गावात मारुथाला मुदलीयार आणि वेलममल ह्यांच्या पोटी झाला. लहान वयातच त्यांनी आईवडीलांचे छत्र गमावल्याने त्या व त्यांच्या दोन बहिणी थेकमपट्टी भागात आपल्या 
आजोळी आल्या. त्यांचे पालनपोषण त्यांच्या आजीने केले. गावात कुठलीही शाळा नव्हती त्यामुळे शिक्षणाचा दुरान्वये संबंध नव्हता. लहानपणापासून पप्पअम्माल ह्यांना शेतीविषयक आवड होती. पुढे आजीच्या निधनानंतर,त्यांना थेकमपट्टी येथे एक लहान दुकान वारसा हक्काने मिळाले. त्या दुकानात थोडेफार बदल करत तेथे त्यांनी शीतपेय आणि घरघुती खानावळ सुरू केली. पुढे व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून पप्पअम्माल ह्यांनी गावात सुमारे ५ एकर जमीन खरेदी केली आणि बहिणींचे लग्न करून दिले. त्यांना कोणतीही अडचण नसल्यामुळे त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलांचा सांभाळ स्वतः केला. बहिणींना अडीच एकर जमीन दिली व स्वतः अडीच एकर जमीन ठेवली आणि आज त्याच अडीच एकर जमिनीत सेंद्रिय पद्धतीने ज्वारी,डाळ,भाजीपाला ह्याची लागवड त्यांनी केली आहे.

सुश्री पप्पअम्माल आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातही राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सक्रिय राहिल्या आहेत. १९९५ मध्ये त्या थेकमपट्टी पंचायत मधून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. गेल्या शतकात पप्पअम्माल ह्यांनी दोन जागतिक युद्धे,भारताचे स्वातंत्र्य,अनेक नैसर्गिक आपत्ती आणि आता कोविड १९ सारखे अनेक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत. त्यांना कुणी भेटायला गेल्यावर आजही त्या आठवणींच्या गावात सहज फेरफटका मारतात. 

सात वर्षांपूर्वी पप्पअम्माल ह्यांच्या १०० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत संपूर्ण ग्रामपंचायत एकत्र आली आणि सर्वांनी एकत्र येत त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्या मेळाव्यात जवळजवळ ३००० लोक उपस्थित होते. त्या सांगतात,"त्यादिवशी उत्सव असल्यासारखे गाव सजले होते. सगळ्यांना जेवणात पायसम(खीर)आग्रहाने देण्यात येत होती. सगळीकडे मोठे फ्लेक्स लागले होते. ते बघून मला आनंद वाटत होता." आजही जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना विशेषत्वाने बोलावले जाते आणि त्याही जातात. हल्ली अनेकजण भेटायला येणारे सेल्फी काढण्यासाठी कसे आग्रह धरतात ह्याबद्दलही त्या भरभरून बोलत असतात. 

त्यांच्या यशस्वी जीवनाचे आणि दीर्घायुष्यासाठीचे रहस्य विचारल्यावर त्या सहज सांगतात, कठोर परिश्रम करा,पुढे जात राहा,आनंदी आणि समाधानी रहा आणि मुख्य म्हणजे मानसिक चिंतांपासून मुक्त रहा. आज लाखमोलाचा संदेश त्या आपल्याला देतात. जेव्हा आजची पिढी वयाच्या ५०-६० व्या वर्षानंतर निवृत्त होण्याचा विचार करीत आहे, तेव्हा पप्पअम्माल हे केवळ एक उदाहरणच नाही तर एक प्रेरणा आहे, निवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्न अनेकांना पडत असतो त्यांनी पप्पअम्माल यांच्याकडून नक्कीच बोध घेण्यासारखा आहे. कारण आजही पहाटे ३ वाजता त्या उठतात,आपल्या शेतात जातात,शेती करतात. सेंद्रिय शेती करणे तसे कठीणच आहे पण जिद्द,चिकाटी आणि मेहनतीने अडीच एकर मध्ये त्यांनी नंदनवन फुलवले आहे. आत्मनिर्भर भारताची सुरुवात सुश्री पप्पअम्माल ह्यांनी पूर्वीच सुरू केली आहे. आज पप्पअम्माल यांच्यासारखी वेगळ्या वाटेवरची माणसं प्रेरणादायी आहेत आणि अशी माणसं बघितली की ह्या देशात जन्माला आल्याचा सहज अभिमान वाटतो. सुश्री पप्पअम्माल ह्यांच्या भावी कार्यासाठी मनापासून सदिच्छा आहेत. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच त्याच्याचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri #Pappammal
#prideofagriculture #prideoftamilnadu #PeoplesPadma

Saturday, February 6, 2021

पारंपरिक मणिपूरी विवाह पोशाख बनवणाऱ्या राधे देवी !!

मणिपूर! ईशान्य भारतातील एक अलौकिक रत्न! भारत व आग्नेय आशिया यांच्यातील सांस्कृतिक दुवा. भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय संपन्न प्रदेश. ह्याच प्रदेशातील ८८ वर्षीय हंजाबम राधे देवी ह्यांना पद्म पुरस्काराने ह्यावर्षी अलंकृत करण्यात आले आहे. अगदी प्राचीन काळापासून वस्त्र व वस्त्रोद्योग हे भारतातील समाजजीवनाचे आणि सांस्कृतिक परंपरेचे एक प्रमुख अंग बनले आहे.

हंजाबम राधे देवी ह्यांचा प्रवासही शून्यातून सुरू झाला. मणिपूर नववधूचे पारंपरिक वस्त्र तयार करण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे. गेली ५८ वर्षे त्या सातत्याने ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मणिपूर भागात नववधू जे पारंपरिक वस्त्र परिधान करते त्याला पोटलोई सेपी अर्थात स्कर्ट म्हणतात. पोटलोईमध्ये ताठ दंडगोलाकार स्कर्ट, ब्लाउज, कंबरभोवती विणलेला पट्टा आणि एक नाजूक मलमल शाल यांचा समावेश असतो. आतापर्यंत राधे देवी ह्यांनी एक हजाराहून अधिक पोटलोई अर्थात ब्राइडल वेअर तयार केले आहेत.

राधे देवी ह्यांना प्रेमाने लोक अबोब राधे म्हणतात, मणिपूरी भाषेत अबोब म्हणजे आजी. राधे देवी ह्यांचे १५ व्या वर्षी लग्न झाले. हंजाबम वर्मा हे त्यांचे यजमान ज्योतिषी होते आणि जवळच्या मंदिरात काही कामही करत असे. त्यांना सात अपत्य होती आणि त्या गृहिणी होत्या. कुटूंबाला हातभार लागावा आणि आर्थिक अडचण दूर व्हावी ह्या हेतूने त्यांनी पोटलोई बनवणे सुरू केले. वयाच्या २५ वर्षी त्या पोटलोई बनवणे शिकल्या. शेजारी असणाऱ्या बाईंना मदत करता यावी म्हणून त्यांनी त्यांच्याकडून पोटलोई बनवण्याचे शिक्षण घेतले आणि पुढे ५ वर्ष सातत्याने त्यांच्याकडे काम केल्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आपल्या व्यवसायातून कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करणे हाच त्यांचा उद्देश होता. सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीचा पोशाख बनवला. फक्त ५ दिवसांत संपूर्ण पोशाख बनवल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

पोटलोई अर्थात स्कर्टला कडक आकार देण्यासाठी राधे देवी ह्यांना सुशोभित स्कर्टच्या आतील बाजुला कापडाचे नऊ थर टाकावे लागत असत. हे बनवणे तसे सोपे नव्हते. सुरुवातीला तांदळाच्या स्टार्चने धुवून उन्हात वाळवावे लागल्यावर ते तयार होत असे. त्यामुळे एक पोटलोई बनवायला पंधरा दिवस लागत असत परंतु आता स्कर्टला कडक आकार येण्यासाठी एक पातळ रबर शीट वापरली जाते. त्यामुळे आता त्यांना एक पोटलोई बनवायला ५-७ दिवस लागतात. सुरुवातीला प्रति पोषाख ५०० रुपये कमाई होत असे. आज जवळपास १०,००० ते १५,००० च्या दरम्यान प्रति पोटलोई विकल्या जाते. प्रत्येक पोटलोई हस्तकलेच्या गुंतागुंतीवर अवलंबून असते आणि त्यानुसार त्याची किंमत ठरते. स्वतः राधे देवी आजही काळजीपूर्वक बाजारपेठेतून दागिने निवडतात आणि पोटलोईच्या डिझाईन्सशी जुळवतात ज्यामुळे भारी किंमतीत त्यांचे पोटलोई सहज विकल्या जातात. आज त्याला अधिक मागणी आहे.

खरं तर, जर आपण पोटलोईचा इतिहास पाहिला तर आपल्याला महाभारतात आणि कृष्णकथेत जावे लागेल ज्यावेळी कृष्णकथेत रासलीलेचे वर्णन येते त्या रास लीला नृत्यात गोपींनी घातलेला पोटलोई हा पोशाख होता आणि नंतर ईशान्य भारतात नववधूंच्या लग्नाचा पोशाख म्हणून अधिक लोकप्रिय झाला. लग्नसराई संपली की, राधे देवी निष्क्रिय राहात नाही. त्या वेगवेगळ्या आकारात लहान पोटलोईच्या पोशाखांमध्ये बाहुल्या बनवतात आणि मणिपूर मधील हस्तकला,शिल्पकला प्रदर्शन आणि छोट्या-मोठ्या दुकानात विक्रीस ठेवतात. २० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत त्यांच्या बाहुल्या विकल्या जातात.

समाजाचे आपण देणे लागतो ह्या भावनेतून त्यांचे सामाजिक कार्य  सुरू आहे. राधे देवी ह्यांचे योगदान केवळ सर्जनशील कार्यापुरते मर्यादित नाही. त्यांना महिला सक्षमीकरणाबद्दल खूप उत्कट इच्छा आहे आणि त्या मणिपूर मधील स्थानिक संस्थांशी संबधित आहे. राधे देवी यांनी अंमली पदार्थांचे व्यसन आणि राज्यातील महिलांच्या रोजगारासारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण केली आहे. आज त्यांनी ह्या उद्योगामध्ये रोजगारनिर्मितीची प्रचंड क्षमता महिलांना उपलब्ध करून दिली आहे. सातत्य आणि चिकाटी ह्यामुळे राधे देवी ह्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आणि आत्मनिर्भर करणारा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पद्म_गौरव #padmashri_Radhedevi
#prideofart #prideofmanipur #PeoplesPadma

Tuesday, February 2, 2021

वंचितांचे ‘दोन रुपयांचे डॉक्टर’ !!

शीर्षक वाचून आश्चर्य वाटेल पण होय दोन रुपयांचे डॉक्टर होते डॉ. तिरुवेंगडम वीरराघवन. तामिळनाडू मधील डॉ. वीरराघवन व्यासारपडी येथे रुग्णांकडून दोन रुपये फी घेत असत. नुकतंच १६ ऑगस्ट २०२० रोजी त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आणि केंद्र सरकारने त्यांना ह्या वंचितांच्या समाजसेवेसाठी पद्मश्री (मरणोत्तर) देवून अलंकृत केले आहे. व्यक्तिगत फायद्याचा विचार न करता सारे आयुष्य देशासाठी, समाजासाठी देण्याच्या भावनेतून अव्याहतपणे काही जण काम करतात. खरंतर समाजाचे कल्याण व्हावे, हीच भावना त्यामागे असते आणि ह्याच भावनेतून तामिळनाडू येथे डॉ.वीरराघवन ह्यांनी जवळपास ५ दशके वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. 

डॉ. तिरुवेंगडम वीरराघवन चेन्नईच्या व्यासरपडी येथे लहानाचे मोठे झाले. एकत्र कुटुंब पध्दती असल्याने लहानपणापासून समाजसेवेचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. त्यांनी पुढे चेन्नईच्या स्टॅनले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यास पूर्ण केला आणि समाजासाठी आणि आपल्या गावासाठी काहीतरी करायचे आपल्या शिक्षणाचा फायदा  समाजातील वंचितांना व्हावा ह्या भावनेतूनच त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. १९७३ पासून त्यांनी व्यासरपडीतील झोपडपट्टी रहिवाशांची सेवा सुरू केली. 'दोन रुपयाचे डॉक्टर’ म्हणून ओळखले जाणारे,तिरुवेंगडम दिवसा व्हेलाचेरी येथील कॉर्पोरेट रूग्णालयात काम करत असत आणि रात्री आठ वाजेपासून मध्यरात्री पर्यंत उत्तर चेन्नईतील श्री कल्याणपुरम आणि इरुकंनचेरी येथील त्यांच्या खासगी दवाखान्यात रुग्णांची तपासणी करत असत. 

हळूहळू त्यांची प्रॅक्टिस चांगली चालत असतांना पुढे त्यांच्याच रूग्णांनी त्यांना फी वाढवायला भाग पाडले आणि जर फी वाढवली नाहीं तर त्याऐवजी त्यांच्या रूग्णांनी त्यांना त्यांच्या सोयीनुसार जेवण,फळं असे देण्याचा आग्रह धरला आणि डॉ. वीरराघवन ह्यांनी जेवण आणि कोणत्याही प्रकारच्या खाण्यापिण्याशिवाय पैसे घेण्याची तयारी दर्शविली आणि त्यानंतर त्यांनी पाच रुपये फी घेणे सुरू केले कारण ते घेण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. परंतु त्या भागातील डॉक्टर बंधूवर्गाकडून वाढत्या दबावामुळे फी कमीत कमी १०० रुपये पर्यंत वाढवावी असा अट्टहास होता पण ते त्याला बळी पडले नाही आणि ५ रुपये फी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत घेतली.

डॉ. वीरराघवन ह्यांचे बहुतेक बॅचमेट आणि त्यांचे कुटुंब आणि नातवंडे घेऊन परदेशात स्थायिक झाले आहेत. महाविद्यालयीन काळापासून त्यांचा सर्वात चांगला मित्र, सरकारी रॉयपेट्टा रुग्णालयात (जीआरएच) सर्जन म्हणून निवृत्त झाला आहे आणि आता तो एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. पण डॉ. वीरराघवन ह्यांनी आपले काम नियमितपणे सुरूच ठेवले त्यात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यमग्न होते ह्यातून त्यांना जे आत्मिक समाधान मिळत असे त्यातून ते विख्यात डॉक्टर म्हणून गणले जायचे. आणि ह्याच निःस्वार्थ भावनेतून त्यांना ह्यावर्षी अर्थात २०२१ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार मरणोत्तर जरी असला तरी त्यांच्या कार्याचा अवाका किती मोठा असेल ह्याची कल्पना सहज येते. 

त्यांची पत्नी सरस्वती रेल्वे अधिकारी ह्या पदावरून काही वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा टी दीपक आणि मुलगी टी प्रीती यांनी मॉरिशसमधील महाविद्यालयात औषधांचा अभ्यास केला आहे. त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येत त्यांच्याबरोबर काम करावे आणि व्यासपारडीत रूग्णालय बांधण्याचे व तेथील रहिवाशांची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. खरंतर आज डॉ. वीरराघवन ह्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देऊन सरकारने समाजासाठी झटणाऱ्या निरलस कार्यकर्त्याचा गौरव केला आहे.कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती ह्यांच जीवनसूत्रावर ज्यांची वाटचाल झाली असे डॉ. वीरराघवन ह्यांचे कार्य खरोखर प्रेरणादायी आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पद्म_गौरव #padmashri_Tveeraraghwan

#prideofmedicine  #prideoftamilnadu