शीर्षक थोडं वेगळं आहे. पण विचार करता जे भावलं ते शब्दात मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. फाल्गुन वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. १९ फेब्रुवारी तारखेनी महाराजांचा जन्मदिवस. पण सध्या तिथी आणि तारीख असा घोळ सुरू असतानाच ३६५ दिवस छत्रपतींचे स्मरण केले तर ते अधिक चांगले राहील. मी स्वतःला खरंतर भाग्यवान समजतो की, त्यांचा जन्म ज्या मातीत झाला त्या महाराष्ट्रात मी जन्माला आलो. १५ ऑगस्टला रायगडावर जाता आले हा पण मी नशीबाचा एक भाग आहे असे समजतो. ‘झाले बहु होतील बहु परंतु यासम हा’ असं समर्थ म्हणतात हे पूर्णपणे खरं आहे.
कारण महाराजांच्या संपूर्ण चरित्रात बघितले की समजतं ,
राजा आणि प्रजा यांचे नाते पूर्णतः वेगळेच होते. हिंदवी स्वराज्य संस्थापक हा राजा प्रजेशी एकनिष्ठ होता. त्याचे निर्णय प्रजा पूर्णपणे ऐकत होती. त्याचे नाते इतके घट्ट होते की प्रसंगी मावळे आम्ही असताना आमच्या राजाला लढावं लागू नये यासाठी सदैव तत्पर होते. छत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर जे अष्टप्रधान मंडळ महाराजांनी तयार केले आज त्यावर अधिक चिंतन व्हायला हवे. युद्धनीती, राज्यनिती ह्यावरही अधिक अभ्यास करणे गरजेचे आहे. निवडक मावळे एकत्र करत ज्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली आणि घेतलेली प्रतिज्ञा शेवटच्या श्वासापर्यंत पाळली.
या राजाकडे कुठले गुण नव्हते ? सर्वगुण संपन्न असा हा राजा होता. इतिहासातील वेड लावणारं असं हे व्यक्तिमत्व. मैत्रभाव, निष्ठा, राजकारण, सावधपणा, बलोपासक, धर्मनिष्ठ, असे अनेक पैलू आणि गुण आमच्या राजात होते. आज त्यांची जयंती साजरी करताना आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो. आजचा तरुण महाराजांसारखी दाढी ठेवतो आहे इतपत ठीक पण तोच दाढीतला व्यक्ती पानठेल्यावर सिगरेट किंवा खर्रा खाताना दिसतो त्यावेळी वाईट वाटतं.. याला राजांचे विचार समजलेच नाही असं वाटतं. हे कुठं तरी कमी व्हावं किंवा बंद व्हावं हीच इच्छा आहे. आज समाज जीवनात वावरतांना श्री छत्रपतींचा कुठला तरी एक गुण तरी सर्वांनी अंगिकारला तर हे राष्ट्र नक्की जगद्गुरु पदी बसेल आणि जे परं वैभवाचं स्वप्न बघतोय ते ही लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास वाटतो पण जयंतीचे सोहळे करायला लागल्यावर तो सोहळा फक्त त्या दिवसापूर्ती मर्यादित राहीला आणि विचार हे पुन्हा पुस्तकातच बंदिस्त झाले. बदल घडवायचा आहे तो आपल्याला ती ताकद आणि ते सामर्थ्य फक्त आपल्याकडेच आहे.
माझ्या मते राज्यशकट हाकताना अजाणतेपणीही न चुकलेला जगातील एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती.. राज्यकारभार, युद्धनीती, नैतिकता, चारित्र्य, नातेसंबंधातली कर्तव्ये, भविष्याचा वेध, भूतकाळाची जाणीव, वर्तमानातल्या घडामोडींचे अचूक आकलन आणि विश्लेषण, स्थापत्य, शस्त्र आणि शास्त्र, नियोजन, राष्ट्रनिष्ठ, धर्मनिष्ठ, माणसे जोडण्याची आणि टिकवून ठेवण्याची किमया अशा सगळ्याच आघाड्यांवर यशस्वी झालेला जगातील एकमेव राजा म्हणजे शिवछत्रपती ..
आजचे विद्यमान सरकार छत्रपतींचे पाईक आहे असे म्हणता येईल. ज्या राष्ट्राचा पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणवतो प्रसंगी राजतिलक होण्याअगोदर ज्यास्थानी आमच्या राजाचा राज्याभिषेक झाला अशा रायगडावर जाऊन जी व्यक्ती नतमस्तक होते हे ही उत्साहवर्धक असेच आहे .
काळाच्या कराल जबड्यातून ज्यांनी स्वराज्यारूपी सुर्य ओढून काढला, सह्याद्रीचा झुकलेला माथा ज्यांनी उन्नत केला,त्यांच्या अश्वाच्या खुरांनी उधळलेली ही पवित्र धूळ माथ्यावर तिलक करून,प्रौढप्रतापपुरंदर क्षत्रियकुलावंतस सिंहासनाधिश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो हे खरा आणि सच्चा मावळा आहे.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment