Tuesday, August 15, 2023

।। श्रीतुकाराममहाराजांची गाथा ।।

मध्यंतरी प्रसाद देशपांडे दादाच्या घरी गेल्यावर त्याने गीताप्रेसची श्रीतुकाराममहाराजांची गाथा (पारायणप्रत) भेट म्हणून दिली. यावर्षी अधिक श्रावण महिन्यात काहीतरी नवे वाचावे असे मनात असतांना श्रीतुकाराममहाराजांची गाथेचे वाचन सुरु केले. वाचतांना अनेक अभंग परिचित होते. लताबाईंनी आपल्या अजरामर स्वरांनी या अभंगाना स्वरसाज चढवला असल्याने वाचतांना काही अभंग त्याच चालीत वाचल्या गेले. खरंतर श्रीतुकाराममहाराजांनी सामान्य माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगांमधून सांगितलं आहे. हे तत्त्वज्ञान त्यांच्या कठोर आत्मपरीक्षणामधून आणि सदसद्विवेक बुद्धीतून तयार झाल्याने त्याला एक कालातीत अशी आंतरिक नीतिमत्ता आहे. व्यापक मानवतेची, मानवी हक्कांची आणि समतेची बैठक आहे. तीव्र संवेदनशीलता, शोषणाचा तिटकारा आणि मानवजातीविषयी प्रेम हा श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांचा आत्मा आहे. या गुणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रीतुकारामांचे अभंग आजही ऐकायला आणि म्हणायला लोक एकत्र येतात आणि अनेक ठिकाणी याचे नियमित पारायण होत असते. 

या अभंगरचनेविषयी एक कथा आहे. एकदा संतश्रेष्ठ नामदेवांनी
श्रीपांडुरंगाच्या पुढे प्रतिज्ञा केली की, " हे देवा! मी शतकोटी अभंग रचून तुमची कीर्ती वर्णन करीन." देव म्हणाले, "नामया! ही कसली प्रतिज्ञा करून बसलास ! अरे या कलियुगात माणसाचे आयुष्य थोडे. त्यात विघ्ने फार. अशा स्थितीत तुझी प्रतिज्ञा पूर्ण कशी व्हावी ?" नामदेव म्हणाले, "देवा! मी तुमच्या भरवशावर बोललो. आता माझी प्रतिज्ञा तडीस नेणे तुमच्या हाती. अनंत कोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या तुम्हांला काय अशक्य आहे. शिवाय भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुमचे ब्रीदच आहे. म्हणून आता जे काही करायचे, ते तुम्हीच करायचे. नामदेवांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकताच देवांनी सरस्वती देवीला आज्ञा केली की, "तू नामदेवांच्या जिव्हेवर राहून त्याच्या तोंडून माझी वेदप्रणीत स्तुती मराठीत वदवावी. सरस्वती म्हणाली,आपली आज्ञा प्रमाण. पण नामदेव बोलतील, तेव्हा चपळाईने लिहून घेणारा कोणीतरी लेखक पाहिजे.

यांवर ज्यांची वेदशास्त्रे स्तुती करतात, व्यास-वाल्मीकी आदी कवींनी ज्यांचे वर्णन केले, ते भगवंत वैकुंठ, क्षीरसागर, शेषशय्या सोडून हातात लेखणी घेऊन नामदेवांचे काव्य लिहीत बसले. नामदेवांच्या तोंडून केव्हा काय निघेल, हे सांगता येणार नाही, म्हणून ते आळस, झोप सोडून अखंड नामदेवांच्या संगतीत राहिले. असे होता होता एकदा एकूण अभंग किती झाले, हे मोजून पाहाता ते चौऱ्याण्णव कोटी एकोणपन्नास लक्ष भरले. भगवंतांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी नामदेवाची पाठ थोपटली. पण नामदेवांचा प्रयाणकाळ जवळ आल्यामुळे त्यांची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी नामदेवांना तुकारामांच्या स्वप्नात नेले आणि तुकारामांना आज्ञा केली की, "या नामदेवाने शतकोटी अभंगरचना करून माझे वर्णन करण्याचा संकल्प केला होता. त्यातील पाच कोटी एकावन्न लक्ष अजून बाकी आहेत. ते तू पूर्ण कर." या आज्ञेनुसार तुकारामांनी अभंगरचनेस प्रारंभ केला आणि तो पूर्णत्वासही गेला. 

श्रीतुकाराममहाराजांच्या या सार्थ अभंगांतून व्याकूळ भक्ताची प्रेमळ विनवणी, भगवंतांशी प्रेमकलह, सत्संगमहिमा, दंभावर कोरडे, सदाचाराचे महत्त्व, दुर्जनांची निंदा इत्यादी असंख्य विषय आलेले आहेत. व्यवहारात राहूनही परमार्थ कसा करता येतो, हे त्यांचे अभंग वाचून समजते. श्रीतुकाराममहाराजांच्या भाषेवर संस्कृताचा प्रभाव नाही. अतिशय मोजक्या शब्दांत विषय स्पष्ट करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या अभंगातील ओळी सुभाषितांसारख्या व्यवहारात प्रचलित आहेत. या अभंगांत पांडुरंगाचा महिमा, वारकरी संप्रदायाची थोरवी, नामसंकीर्तनाचे महत्त्व, पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य, असे कितीतरी विषय आलेले आहेत. त्यांच्या अभंगांची भाषा खास मराठी वळणाची आहे. त्यांतील शब्द, वाक्ये, साधी, सुटसुटीत, समर्पक व मनाचा वेध घेणारी आहेत. श्रीतुकाराममहाराजांचे अभंग हे अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.

गेली कित्येक शतके झाली हे अभंग रचलेले आहेत पण आजही प्रत्येक घटनेकडे बघण्याची दृष्टी आणि योग्य आणि शास्त्रीय शिकवण देण्याची ताकद या गाथेत पानापानावर दिसते. एका अर्थाने मानसशास्त्रीय ग्रंथ म्हणूनच याची ओळख सार्थ ठरेल. अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या शब्दातील सर्वपरिचित उदाहरणे समाविष्ट असलेल्या गाथेतील अभंग म्हणजे प्रत्येक साधकाला विचार देणाऱ्या आहेत. आवर्जून संग्रही ठेवावे आणि एकदा तरी वाचावे अशीच श्रीतुकाराममहाराजांची गाथा आहे. या छानशा भेटीसाठी मनापासून धन्यवाद प्रसाद दादा.'अधिकस्य अधिकं फलं' या नात्याने वारंवार वाचन व्हावे ही श्रीभगवंताचरणी प्रार्थना आहे..

सर्वेश फडणवीस