Wednesday, April 29, 2020

आनंदघन प.पू.विजय काका !! 🚩🙏



प.पू.श्री.विजय काका पोफळी. दत्तसंप्रदायकवर्धक प.पू. पंडित काका धनागरे यांचे उत्तराधिकारी हीच त्यांची मर्यादित ओळख न राहता आज त्यांचे नाव आपल्या सद्गुरुंच्या संकल्पपूर्तीसाठी अत्यंत कष्टपूर्वक पूर्णत्वास नेलेल्या साधकाचे आदर्श जीवन कसे असावे ह्याचे आदर्शवत सद्गुरू म्हणून गौरव व्हावा असेच प.पू. काकांचे कार्य आहे. 

विजयादशमीच्या सुमुहुर्तावर नागपूर येथे प.पू. काकांचा जन्म झाला. लहानपणापासून लाभलेल्या एका थोर दत्तावतारी संतपुरुषाचा सहवास,मार्गदर्शन व कृपाछत्रामुळे आणि हे अधिकारी सत्पुरुष म्हणजे प.पू. समर्थ सद्गुरू श्री पंडित काका धनागरे महाराज होते. ब्र.प.प.श्री टेंब्येस्वामी महाराजांनी संपादित केलेली दत्तभक्तीची वेल पुढील संवर्धनाकरिता इंदोरचे संतश्रेष्ठ प.पू.श्री नाना महाराज तराणेकर यांना सुपूर्द केली. नाना महाराजांच्या करकमलाद्वारे प्राप्त झालेल्या दत्तभक्ती संप्रदायवर्धनाचे व्रत अखंडपणे आयुष्यभर जोपासणाऱ्या प.पू.पंडित काकांनी आपले शिष्योत्तम प्रिय अशा प. पू.श्री.विजय काका पोफळी यांना गुरुवार दि.१ नोव्हेंबर २००७ रोजी,अश्विन कृ.सप्तमी १९२९ (पूर्ण गुरुपूष्यामृत योग) या सुमुहुर्तावर गुरुपदी आरुढ केले आणि आपले उत्तराधिकारी म्हणून घोषीत केले. आज प.पू. विजय काकांच्या रुपात प्रत्यक्ष पंडित काकाच कार्यरत आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. सुदैवाने काकांच्या कार्यावर शब्दांची ओंजळ वाहताना गुरुपुष्यामृत योग यावा हा सुद्धा मी कृपाशीर्वाद समजतो.  

प.पू.श्री विजयकाकांनी २०१५ च्या फेब्रुवारी महिन्यात वाशीम येथील श्री वासुदेव आश्रमाचे रुपांतर एका भव्य दिव्य अशा दत्त नर्मदा मंदिरात केले. प.पू.श्री पंडित काकांनी तीन वर्षात केलेली नर्मदा परिक्रमा व प.पू.श्री विजयकाकांनी सद्गुरूमाऊली दत्तलीन झाल्यानंतर नेमक्या तीन वर्षात एकहाती निर्माण केलेले दत्तनर्मदा मंदिर या गुरुशिष्यांचे अलौकिक सामर्थ्य,तादात्म्य भक्तोद्धार्णाकरिता कार्यरत असल्याची प्रचिती आपल्याला येते. याही सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले होते.

गुरुपौर्णिमा,कुष्मांड नवमी, मंदिरस्थापना वर्धापनदिन,वाशीम येथील उन्हाळी संस्कार शिबीर यासारख्या असंख्य प्रसंगविशेष व नित्य उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य,संसारिक माणसांना उपासनेच्या माध्यमातून कर्मशुद्धी घडवणाऱ्या,नित्य संध्या-गायत्रीच्या उपदेशातून,वासुदेवाश्रम अभ्यासिकेच्या माध्यमातून प.पू.सद्गुरू श्री विजयकाकांचा अखंड प्रवास सुरु आहे. 

प.पू.श्री पंडितकाका देहात असतांना प.पू.श्री विजयकाका म्हणाले होती की आपला अमृतमहोत्सव आपण भव्यदिव्य व थाटामाटात साजरा करू. पण दैवी योजनेनुसार पंडित काका दत्तचरणी लीन झाले पण सद्गुरूंना दिलेले वचन हा मानस धरून पू.श्री विजयकाकांनी चतुर्वेद संहिता स्वाहाकार करण्याचे योजिले. वर्षभर दर महिन्याच्या शुद्ध नवमीला मास माहात्म्य साधून श्रीपवमान याग,श्रीदत्त याग,श्रीसौर याग,श्रीरुद्र याग,श्रीमन्यु याग, श्रीमहालक्ष्मी याग,श्रीविष्णुपंचायतन याग,श्रीनवग्रह याग,श्रीगायत्री याग,श्री नर्मदा याग संपन्न केले. यागाची सांगता श्रीचतुर्वेद संहिता स्वाहाकाराने झाली.भव्य दिव्य या स्वाहाकारात उपस्थित राहून ती अनुभूती सद्गुरू कृपेने मी अनुभवली आहे. माझ्या पाहण्यात 'न भूतो न भविष्यती' असा पहिला श्रीचतुर्वेद स्वाहाकार सोहळा आहे. 

सद्गुरूकृपेने मला या आश्रमात जाण्याचा योग ३-४ वेळा आला आहे. तेथील मनःशांती,पावित्र्य,देवांच्या अस्तित्वाची जाणीव व प.पू.विजय काकांच्या आदरातिथ्य हे सगळं दुर्मिळ आहे हे प्रकर्षाने जाणवते. आपण ही एकदा नक्की जाऊन या मग एकदा गेलात की जातच राहाल इतका सुंदर आश्रम व दत्तनर्मदा मंदिर परिसर आहे.दत्तसंप्रदायवर्धक प.पू. काकांचे कृपाशीर्वाद सदैव असावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 

नर्मदे हर !!

✍️ सर्वेश फडणवीस 

#आयुष्य_जगणारी_माणसं

निवेदनातील रेणुका !! 🎤


रेणुका देशकर..सप्ताक्षरीचा शब्द मंत्र असंच यांचा गौरव करण्यात येईल. आज निवेदन आणि सूत्रसंचालन या अनोख्या क्षेत्रांत गेली वीस वर्षे,जवळपास साडेतीन हजार हुन अधिक कार्यक्रमांची अनुभवांची शिदोरी त्यांच्याजवळ आहे. नागपूर आणि नागपूरकरांना अभिमान आणि हेवा वाटेल असेच रेणुका देशकर यांचे कार्य आहे. 

आज कुठलाही कार्यक्रम असो रेणुका देशकर यांच्या निवेदन अथवा सूत्रसंचालन याने कार्यक्रम प्रत्येकवेळी वेगळीच उंची गाठतो. अनेक श्रोते याच साठी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात की त्यांना रेणुका देशकर यांच्या निवेदनाची मेजवानी मिळेल. अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनोखी शैली ही रेणुका देशकर यांच्या निवेदनाची उत्तम आणि जमेची बाजू आहे. अभ्यासोनी प्रगटावे या समर्थ उक्तीचे रेणुका देशकर यथार्थ पालन करतांना जाणवतात. कारण त्याचा प्रत्यय श्रोत्यांना त्यांच्या निवेदनातून कायमच जाणवत असतो.'वाचन आणि प्रचंड वाचन' हीच त्यांच्या निवेदनाची शैली म्हणता येईल. कायम श्रोत्यांना नवनवीन माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि ह्याच शैलीसाठी त्या आज साता-समुद्रापार अमेरिकेत सुद्धा कार्यक्रम सादर करून आल्या आहेत. 

नवविधाभक्तीचे सारे पैलू त्यांच्या निवेदनात दिसतात. आवाजाची बाजू सुद्धा अतिशय समृद्ध आहे. वाचनाचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. घराण्यात निवेदन वा सूत्रसंचालन याचा वारसा नसतांना आज स्वतःच्या जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी वेगळी उंची गाठली आहे. रेणुका देशकर हे खरंतर अष्टपैलू आणि एकमेवाद्वितीय असं व्यक्तिमत्त्व म्हणता येईल. आज त्या सप्तकच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना सादर करत असतात आणि नागपूरकर रसिक त्यांना भरभरून उपस्थिती दर्शवत आशीर्वाद देत असतात. 

खरं सांगायचं तर प्रत्येक व्यक्ती मध्ये कुठला तरी सुप्तगुण असतो. आपल्या संपर्कातील असलेल्या व्यक्तीचा तो गुण अंगिकारण्याचा प्रयत्न करावा आणि यशस्वी वाटचाल करावी हाच जगण्याचा नियम आहे आणि आज रेणुका देशकर यांची कारकीर्द उंचावर आहे पण तरीही पाय जमिनीवर आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमात ते कायमच जाणवते. उपजतच असलेला गुण आणि त्याला छान खत, पाणी दिले की झाड छान आनंदाने बहरत असते आणि रेणुका देशकर यांचे निवेदन क्षेत्र असेच बहरत आहे आणि त्या स्वतःला कायम एकलव्याचा आदर्श समोर ठेवून वाटचाल करत आहेत त्यांची एकलव्यासारखी कायम नवनवीन आणि नाविन्यपूर्ण शिकण्याची वृत्ती समर्पक आहे आणि येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक व दिशादर्शक आहे. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने रेणुका देशकर यांचे कार्य सुरू आहे.  त्यांच्याशी भेटल्यावर त्या कायम एक मंत्र देत असतात त्या म्हणतात,"आपण जे कार्य करतो त्यातही समाधान महत्वाचे आहे आणि तेच अधिक महत्वाचे आहे कारण त्यातूनच आपण  एक दिवस नक्कीच यशोशिखरावर जात असतो." त्यांच्या कार्यशैलीसाठी त्या सदैव चिरपरिचित राहणार आहेत यात शंकाच नाही. आपल्या कार्यातील जिद्द आणि चिकटीला सलाम आणि भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा !! 💐🙏

✍️ सर्वेश फडणवीस 


Saturday, April 25, 2020

भृगुनंदन-भगवान परशुराम !!

भृगकुलभूषण "भगवान परशुराम",भारताच्या प्राचीनतम इतिहासातलं एक असं नाव की ज्या नावापुढे एकीकडे अनेकानेक मस्तकं आदरानं झुकतात तर दुसरीकडे कैक अहंकारी , गर्वोन्नत आणि दुर्वर्तनी नेस्तनाबूत होतात.

भगवान परशुरामांच नाव जरी उच्चारल तरी,कोणाच्याही मनःचक्षुपुढे एक महाबलाढय,गौरकाय तेजस्वी अशी दिव्य आकृति उभी राहते.मुशीतून काढावी तशी प्रमाणबद्ध शरीरयष्टी लोहकांबी सारखे सुदृढ़ हातपाय,भरदार वक्ष दाढीमिशानी आच्छादित रौद्र चेहरा,कमरेला नेसलेल्या आखूड शुभ्र वस्त्रावर घट्ट आवळून बांधलेली मुंजगवताची मेखला,पाठीवर मृगाजिन आणि बाणाचा अक्षय्य भाता,एका हातात परशू तर दुसऱ्या खांद्यावर वैष्णव धनुष्य, दंड-मनगटावर, जटांवर बांधलेल्या आणि गळ्यात रूळणाऱ्या रुद्राक्षमाळा,तर खदीरांगासारख्या आरक्त नेत्रातून बरसणारा क्रोधाग्नी,परशुराम असे एका योद्ध्याच्या रुपात जनमानसात ठरलेले आहेत.

परशुरामांच हे रूप जितकं सत्य आहे,तितकंच हेही सत्य आहे की,याच बलदंड देहात एका अत्यंत तपोनिष्ठ आणि जनकल्याणाची कळकळ असणाऱ्या ऋषीचं वास्तव्य आहे आणि त्या ऋषीचं रुपही  त्याच्या विचारांइतकंच प्रसन्न,शांत,गंभीर आणि आश्वासक आहे.भ्रूगुंच्या परंपरेला शोभणारी सुहास्य मुद्रा,तेजस्वी नेत्र,हातात शस्त्रांच्या जागी जपमाळ घेतलेले,शरीरावर रुधिराऐवजी भस्माचे विलेपन केलेले,वरमुद्रा धारण केलेले परशुराम खूप कमी लोकांना माहिती आहेत.जेव्हा गरज असेल तेव्हा समाजकल्याणाची कळकळ असणारांनी शास्त्र बाजूला ठेवून शस्त्र धारण करणं हाच त्यांचा खरा धर्म आहे.

शौर्य हे नेहमीच विकराळ असतं आणि अधिकार,सत्ता,संपत्ती,शास्त्रविद्येतील निपुणता ज्यांच्या जवळ आहे ,त्यांनी त्यांच्या याच क्षमतांच्या आधारावर समाजातल्या अन्य घटकांवर वर्चस्व गाजवण्याची आणि त्यांना क्षत करण्याची वृत्ती जोपासली,तर त्यांच निर्दालन करण्यासाठी अशा विकराळ शौर्याला अवतीर्ण व्हावं लागलं.या अवतरणाची जबाबदारी परशुरामांवर आली,त्यांनी ती अत्यंत कुशलतेने आणि कठोरपणे पार पाडली.आपल्या या कार्यानंतर त्यांनी सर्वस्वाच दान केलं आणि महेंद्रगिरीवर तपस्येसाठी निघून गेले.

लेखीकेशी बोलताना हा विषय समजला. लेखिका डाँ. सौ.भारती सुदामे यांची याच विषयाची अभ्यासपूर्ण कादंबरी आहे. ७०० पानांच्या या कादंबरीत व्यापक शब्दांत परशुरामांच्या जीवनकार्याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे अशी ही विजय प्रकाशन प्रकाशित कांदबरी "भृगुनंदन" आणि सांगायला आनंद आहे की याची हिंदी आवृत्ती सुद्धा निघाली आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

 #भगवान_परशुराम #भृगुनंदन #परशुराम_जयंती

Saturday, April 18, 2020

रामो विग्रहवान धर्म: !! 🚩🚩


श्रीराम म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे असे महर्षि वसिष्ठ यांनी वर्णन केले आहे.श्रीराम हेच राष्ट्राचे चैतन्य आहेत. राष्ट्र निमार्णासाठी भक्ती निर्माण करणे महत्त्वाचे आहेच. पण राम म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्र म्हणजे राम हे समीकरणच आहे.भारतीय संस्कृती निसर्गाशी सुसंगत आहे. मोठा इतिहास असलेल्या या संस्कृतीमध्ये अनेक राजे होऊन गेले. त्यांनी त्यांच्या आचार विचाराने या राष्ट्राला सशक्त केले. त्यातच श्रीराम यांनी आपल्या सुसंस्कृतपणाने परंपराच निर्माण केली.राष्ट्रभक्ती काय असते हेच श्रीरामाने सांगितले. श्रीरामांकडील युद्ध आणि राजनीती सर्वसमावेशक होती.सर्वांना समान न्याय उच्चनीच असा कसलाच भेदभाव नाही असे हे श्रीराम आहेत. क्षात्रधर्माचे मूर्तिमंत स्वरूप श्रीराम रणकर्कश आहेत. कोदंड हे त्यांचे प्रतीक आहे. प्रेमासाठी प्रेम,कर्तव्यासाठी कर्तव्य आणि चरित्र्यासाठी चारित्र्य हे रामराज्याचे मूळ सूत्र आहे. भारतीय सांस्कृतिक आदर्शाचा चिरंतन दीपस्तंभ म्हणजे रामायण वा रामकथा. 

कोरोनानामक महामारीने आज संपूर्ण जग त्रस्त आहे. रोजचे आकडे ऐकताना याची भीषणता अधिक जाणवते. आणि ह्याच जाणीवांचा विचार करत विद्यमान सरकारने ऐतिहासिक मालिका रामायण दाखवून,रामनामाने जी ऊर्जा,मानसिक धैर्य दिले त्याने विद्यमान सरकार अभिनंदनास पात्र आहे. खरंतर कुठल्याही कलाकृतीला बनवायला जी मेहनत लागते त्यासाठी शब्दच नाही. १९८८ मध्ये जेव्हा रामायण ही कलाकृती प्रेक्षकांच्या समोर आली असेल तेव्हा किती गोष्टींना सामोरे जावे लागले असेल देवच जाणो. पण तरी रामायण हे आजही तसंच नितांत सुंदर, गोड आणि आनंददायी आहे.  नुकतंच हे ही समजलं की दूरदर्शन वरील रामायण मालिकेने सर्व रेकॉर्ड मोडले. रामनामाची गोडी मुळातच अवीट आहे. रोज सकाळी आणि रात्री दूरदर्शनवर रामायण बघण्याची सवयच लागली होती. सगळे प्रसंग ऐकून,वाचून माहिती होतेच पण ते चित्रमय बघतांना वेगळाच भाव असतो.कधी कधी हे ही मनात येतं की सरकारला माहिती असावे की चैतन्याची स्फूर्ती ही श्रीराम आहेत आणि म्हणूनच पहिला निर्णय रामायण दाखवण्याचा घेतला. कारण या संकटात सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करते आहेच. पण रामनामाच्या नौकेत आपण तल्लीन होतो आणि जवळपास महिनाभर रामकथेत आपण मंत्रमुग्ध झालो होतो. हे दिवस कसे गेले समजले सुद्धा नाही. 

खरतरं ही असंख्य सद्गुणांच्या लोकोत्तर रसायनाने साकारलेल्या श्रीरामांच्या विभूतीमत्त्वाची जादू असंच म्हणता येईल.त्यांच्याबद्दल वाचल्याशिवाय, बोलल्याशिवाय, लिहिल्याशिवाय,ऐकल्याशिवाय भल्याभल्याना राहता येत नाहीच.जे उत्तम,उदात्त,उन्नत आणि मधुर ते  सर्व श्रीरामांमध्ये आढळल्याने त्यांच्या चिंतनात आपल्या मनाला सुखद आनंद मिळतो. राष्ट्रपुरूष श्रीरामांच्या सर्वांगीण चारित्र्याचा आदर्श आपण सर्व जण आपला ध्येयविषय बनवून आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तत्पर राहुया.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#रामायण #दूरदर्शन #लॉकडाऊनडायरी

Monday, April 13, 2020

कुटुंबाची कोरोनावर मात !!

संपूर्ण जगाला कोरोना अर्थात कोविड १९ नामक महामारीने ग्रासले आणि जग आज वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. ह्या वाटचालीत अनेक देश एकत्र येत जगाला एकात्मतेचा, समतेचा संदेश देत आहे. नुकतीच भारताने अमेरिकेला केलेली मदत आपण बघितली आहेच. पण ह्या सर्व वाटचालीत आपल्या सर्वांना पुन्हा एकत्र आणले ते आपल्या कुटुंबव्यवस्थेनं जे आपल्याला पिढ्यानपिढ्या मिळालेलं संचित म्हणता येईल. आज भारताने या महामारीत आलेल्या परिस्थितीला व्यवस्थित पद्धतीने हाताळले आहे आणि हाताळते आहे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ नक्कीच जाणार आहे. 

जगाला भारताने दिलेली अनमोल देणगी म्हणजे कुटुंब . “वसुधैव कुटुंबकम” ही आपली संस्कृती आहे. या कुटुंब व्यवस्थेनेच शतकानुशतके भारताची नीती जागृत ठेवली.माउली अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की “हे विश्वची माझे घर”. खरंच या संस्कृती चे  आपण पाईक आहोत यासाठी आपण स्वतःला नशिबवान समजायला हवे असे वाटते. जन्म देणारी आई आणि सगळ्या जगाची ओळख करून देणारे बाबा,लाड करणारे आत्या मामा,मावशी,काका,काकू ओघाने आलेच. आजी,आजोबा म्हणजे तर हक्काचे २४ तास लाडाने सांभाळण्याचं एक केंद्र आहे आणि कुठंतरी बाहेरच्या जगात नाते जोडत असतांना ह्यांना गृहीत धरून आपण कार्य करत असतो पण तरी ही आपली प्रेमाची हक्काची माणसं आज आपल्या सोबत पूर्ण वेळ आहे. 

खरंतर प्रत्येकाच्या जगण्याचा एक भक्कम आधार म्हणजे कुटुंब आहे. आयुष्यात सर्वाधिक काळ आणि प्रसंगी आनंद व्यक्त करण्याचे आधारवड म्हणजे कुटुंब आहे आणि आज या विश्वव्यापी महामारीने जग होरपळून निघतांनाच आपण आपल्या कुटुंबातील हक्काच्या माणसांच्या कुशीत स्वतःला सांभाळून इतरांचा ही सांभाळ करतो आहे. जगामध्ये ह्याची चर्चा नक्कीच होईल.भारत विश्वगुरु कधी होणार हे आत्ता सांगता येणार नाही पण या काळात कुटुंबातील एकत्र येत आपल्या जाती व समाज बांधवांसाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत राहील आणि कुठेतरी कृतार्थतेंन कार्य करत असताना सगळे जण ह्या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील. माणूस जन्माला येतो तेव्हा काही   सर्वगुणसंपन्न,सर्वशक्तिमान नसतो,त्याला समाजाची आपल्या माणसांची गरज लागते त्यातूनच जन्माला आलेली व्यवस्था म्हणजे कुटुंब आहे आणि जग त्यासाठी भारताकडे आस लावून बघत आहे. जगण्याचे सारे पैलू एका सशक्त कुटुंबात शिकायला मिळतात.सगळ्यांच्या आवडी,निवडी,स्वभाव सांभाळण्याचं तंत्र शिकवलं जातं ते या कुटुंबातच आणि या कुटुंबातूनच बनतो समाज आणि राष्ट्र. 

सकलसंत,साधू,समाजसुधारक,क्रांतिकारक या कुटुंब व्यवस्थेनेच जगाला दिले त्यामुळेच कुटुंब हे भारतीय समाजाचे एकक आहे असे म्हणता येईल. या कुटुंबातील सगळ्यांना त्यात वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या वयोगटातील माणसांना बांधून ठेवते ती प्रत्येक घरातील स्त्री. म्हणून तिला "आधार शक्ती" ह्या संबोधनाने तिचा गौरव करावा लागेल. आज आलेल्या परिस्थितीला मातृशक्ती ज्या समर्पण भावनेनं कार्य करते आहे ते कुटुंबापुरते मर्यादित नाही तर राष्ट्र जागृती, आपल्या अवतीभवती असलेल्या समाजासाठी समर्पित होऊन कार्य करते आहे. कुटुंबातील इतर सदस्य सोबत आहेत म्हणून ती वेळप्रसंगी स्वतःला पूर्ण झोकून कार्य करते आहे.

कालांतराने आज संयुक्त कुटुंब वेगळी होऊन विभक्त झाली आहे. आता त्या कुटुंबाचा आकार ही अगदी लहान झाला आहे. पण टेक्नॉलॉजी ने पुन्हा सर्वांना एकत्र आणलं आणि पुन्हा चांगला संवाद सुरू झाला आहे.आज आपल्या व्हाट्स अँप ग्रुप वर प्रत्येकाला कुटुंब,आजोळ,फॅमिली,परिवार ह्यांसारखे ग्रुप बघायला सहज मिळतात. आता कार्य व सणवार प्रसंगी एकत्र येणारे आपण ते कुटुंब टिकवण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची आवश्यकता आहे. प्रेम, आधार आणि विश्वास देण्याचे माध्यम म्हणजे आपले कुटुंब आहे. आणि या कुटुंबातील प्रत्येक नात्यात प्रेम,आपुलकी चिरकाल टिकून राहील या साठी सदैव कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. आज कोरोनाने आपल्याला हीच शिकवण दिली बाहेरचं जग कितीही सुंदर असलं तरी आपली कुटुंबातील हक्काची माणसं शेवटी आपली असतात. आणि ह्या आपल्या माणसाच्या सहवासात आपली सकारात्मकता कुटुंबासाठी नक्कीच आनंद देणारी व चिरकाल टिकणारी ठरावी हीच सदिच्छा !!

✍️ सर्वेश फडणवीस

#कुटुंब #family_first #IndiaFightsCorona

Tuesday, April 7, 2020

कोरोना कमांडो !!

आज देशामध्ये खरी लढाई लढत आहेत, ते म्हणजे डॉक्टर,सफाई कामगार,पोलीस अधिकारी आणि कोरोनाला हरवण्यासाठी अत्यावश्यक कामं करणारा प्रत्येक कर्मचारी. देशभरातून या 'कोरोना कमांडो'ची प्रशंसा केली जात आहे. कोरोना व्हायरस दिवंसेदिवस रौद्ररुप धारण करत आहे. कोरोनाचे सावट आज संपूर्ण जगावर आहे. आज त्याने कहर माजवलेला आहे. आपण प्रत्येकजण केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निर्देशांचे पालन करत आहोत आणि आलेल्या या संकटाशी घरूनच लढाईच्या तयारीत आहोत. 

पण या लढाईत प्रत्यक्ष युद्ध भूमीवर लढणारे डॉक्टर, पोलीस कर्मचारी,सफाई कामगार,जनतेने निवडून दिलेले सेवक,सामाजिक भान जपत सेवा कार्य करण्याऱ्या सेवा भावी संस्था,परिसर स्वच्छ राहण्यासाठी सकाळी येत असलेले सफाई कामगार आणि इतर ज्ञात-अज्ञात जे या संकटाशी आपल्या प्रकृतीला जपत कार्य करणारे सारे जण सर्वप्रथम यांच्याबद्दल आदरयुक्त कृतज्ञता अर्पण करण्याची आवश्यकता आहे. ज्या परिस्थितीत हे लढत आहे यानें मनाच्या कोपऱ्यात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. यांच्या कौतुकास्पद कार्यासाठी शब्द सुद्धा कमी पडतील इतकं मोठं काम ही सारी मंडळी करतात आहे. आज कोरोनाशी सगळ्यात जवळचा संबंध हा आरोग्य विभागाचा आहे तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संबंध हा प्रत्यक्ष आहे. ही सगळी मंडळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळताना दिसत आहेत. समाजातील बरीच दानशूर व्यक्ती व संस्थांनी आर्थिक मदत दिली आहेच पण या लढाईत सर्व डॉक्टर, नर्स आणि आरोग्य विभागाच्या संबंधित प्रत्येकाने देशासाठी आपलं जीवन वाहून घेतलेले सकारात्मक चित्र देशाने बघितले आणि बघतोय आणि ह्यासाठी खरंच संपूर्ण देश यांच्या अतुलनीय कार्यासाठी सदैव ऋणात राहील हीच अपेक्षा आहे. 

वर्दीतला देवमाणूस अर्थात पोलीस. प्रत्येक वेळी ड्युटी करून जेव्हा घरी जात असेल तेव्हा त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट चालू असेल. आपल्यामुळे आपल्या घरच्यांना तर काही होणार नाही ना. आपण सतत बाहेर असतो, शेकडो लोकांच्या संपर्कात येतो, आपल्याला काही झालं तर ठीक पण आपण हा आजार घरी तर घेऊन जाणार नाही ना घरातल्या कुठल्याही गोष्टीला हात लावताना मनात भीती तर असेलच..शेवटी ती सुद्धा माणसेच आहे. पोलीस कर्मचारी आता तर या संकटाशी संपूर्ण समर्पण भावनेने सामना करत आहेत, कुठल्याही साधनेशिवाय दिलेले कार्य करतात आहे. आम्ही पूर्ण क्षमतेने, प्राणपणाने लढू हा त्यांचा विश्वास आहे आणि ते दिवसरात्र एकत्र करत काम करत आहे आणि आम्हाला काळजी फक्त आमच्या कुटुंबियांची आहे. 

सफाई कामगार ह्या दोघांच्या खालोखाल ह्यांचे कार्य सुद्धा त्याच पूर्ण समर्पित भावनेने सुरू आहे. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी ते काम करत आहे. घरचा कचरा रोज बाहेर पडावा त्याची विल्हेवाट लागावी यासाठी कचऱ्याची गाडी रोज २-३ दा दारात येते. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्यांच्या डोक्यात सतत हेच चालू असत. हे संकट लवकर टळावे आणि पुन्हा सारे सुरळीत व्हावे. सगळे सफाई कर्मचारी आलेलं काम पूर्ण करत आहेत कुणीच टाळाटाळ करत नाहीत. 

कृपया सहकार्य करा,घरातच रहा,विनाकारण बाहेर पडूच नका, ह्या संकटाशी लढणाऱ्या कोणत्याच पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, डॉक्टर, सफाई कामगार किंवा ह्याबाबत संबंधित कोणताही कर्मचारी ह्यांच्याशी वाद घालू नका ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत हे समजा आणि सहकार्य करा. 

पुढच्यावर्षी ऑस्कर,गोल्डन ग्लोब अवॉर्ड, फेमिना,आयफा यांसारखे पुरस्कार सोहळे नकोच,ते नट नट्या,खेळाडू रेड कार्पेट वर चालणारे नकोच,पुढच्यावर्षी ह्या आलेल्या संकटात धैर्याने समोर गेलेली माणसं अर्थात डॉक्टर,नर्स,आरोग्य विभाग संबंधित सारे जण,सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते,समाजसेवक,दुकानदार, घरपोच सामान आणून देणारे कार्यकर्ते,पोलीस,सफाई कर्मचारी हे सारे जण त्या रेड कार्पेट वर चालावे आणि त्यांचा गौरव व्हावा. कारण खरं तर आज हे धन्यवादास पात्र आहेत आलेल्या परिस्थितीला  धैर्याने समोर जात आहेत आणि आज आपण ह्यांच्यामुळे सुखाचे चार घास एकत्रितपणे येऊन खाऊ शकतो आहे. ह्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकणार नाहींच. आपण आपल्या कर्तव्याची जाण ठेवत सकारात्मक दिशेने वाटचाल करण्याची आवश्यकता आहे. 

स्वस्थ रहा,घरी रहा,काळजी घ्या…

✍️ सर्वेश फडणवीस 

#IndiaFightsCorona  #Corona_commando

Sunday, April 5, 2020

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे..🚩 🇮🇳


भारत !! 'भा' म्हणजे तेज व 'रत' म्हणजे रममाण झालेला. तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत होय. अशा या भरतभूमीत जन्माला येणं खरंतर ही भाग्याची गोष्ट म्हणायला हवी. विष्णू पुराणातला पहिला श्लोक भारत या नावाची ओळख करून देतो.

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् । 
वर्षं तद्भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।।

म्हणजे समुद्रापासून उत्तरेला आणि हिमालयापासून दक्षिणेला समुद्रापर्यंत अशी जी भूमी तिचे नाव आहे भारत अन् त्या भारतभूमीची संतती ते भारतीय आहेत. अतिशय चिरपुरातन इतिहास आपल्या भूमीला लाभलेला आहे. आणि ह्यात आपण जन्माला आलो आहे ही म्हणजे नक्कीच पूर्वसंचिताचे देणं आहे. गीतेत भगवंतांनी सुद्धा सांगितलं आहे..

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत I
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम II
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम I
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे II

हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. 

आज देशाला ७० वर्षांनंतर जे नेतृत्व लाभलं आहे यात नक्कीच विलक्षण असं काहीतरी असावं हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी या माणसाबद्दल काय बोलायचे. काल पुन्हा त्यांनी कोट्यवधी जनतेच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण केलं. २१ दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये कुठे थोडं जीवावर येत असताना वातावरणात चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांनी छोट्याशा कृतीतून जगाला दाखवले. दीपोत्सव ह्या छोट्या ९ मिनिटांच्या कृतीतून अंधःकारावर विजय मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न देशभरात उत्साहाने संपन्न झाला. आलेल्या परिस्थिती मध्ये नेतृत्वावर किती विश्वास असावा याचे ते द्योतक मानायला हवे. समाजातील प्रत्येक घटकाने त्याला जी उंची मिळवून दिली ती शब्दातीत अशीच आहे. आज छोट्या छोट्या कृतीतून त्यांनी या जागतिक महामारीत सगळ्या देशातील जनतेला जे सांभाळले आणि सांभाळत आहेत त्याने पुन्हा प्रत्येकाच्या मनांत घर केलं आणि त्यांची प्रत्येक कृती आणि त्या कृतीतून सामाजिक जाणिव करून देण्याचे आश्वासन ते कायमच देत असतात. आज जगाला भारताच्या भविष्याची जाणीव झाली आहे. 

श्री.योगी अरविंद यांनी भारताविषयी केलेले भाकित खरे होताना दिसत आहेत असे वाटते.

" India of the ages is not dead..has to do something for herself and for the world "

प्राचीन युगांचा हा भारत मृत झालेला नाही. स्वतः करिता व विश्वाकरिता तो काहीतरी ( भले ) करणार आहे.

The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)

भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे वाटतात. 

कर्तृत्ववान व्यक्तीकडून अपेक्षा ही तश्याच ठेवल्या जातात त्यामुळे या प्रधानसेवकाकडून १३० कोटी देशवासियांनी अपेक्षा ठेवल्या त्या रास्त आहे. आणि या जागतिक महामारीतून आपण सुखरूप बाहेर पडणार हा विश्वास वाटतो. कदाचित जगाची जी वाटचाल सुरू आहे त्याने नवा इतिहास नक्कीच लिहिला जाणार आहे आणि याचे जजीवंत आपण साक्षीदार असणार आहोत. कुठेतरी वाटतं की योगी अरविंद यांनी केलेलं भाकीत खरं होण्याची हीच तर वेळ नसेल. पण आज राष्ट्रीय नेतृत्वाची जी वर्धिष्णू वाटचाल सुरू आहे त्याने विश्वास आहेच की भारताचा सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकेल. शेवटी ह्याच संघगीताच्या ओळी मनात येतात,

विश्व में गूँजे हमारी भारती जन जन उतारे आरती
धन्य देश महान धन्य हिंदुस्थान 

✍️ सर्वेश फडणवीस

#9baje9minute #9Pics

Saturday, April 4, 2020

रामायण - आनंदमय अनुभूती !!

या lockdown च्या दिवसांत बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. कारणही तसेच आहे रामायण सारखी मालिका पुन्हा टीव्हीवर आली आणि तोच गोडवा आणि माधुर्य आजही कायम आहे.  नुकतंच एक आर्टिकल वाचनात आले त्यात सगळ्यात जास्त टीआरपी सध्या या मालिकेचा आहे. खरंतर ही मालिका पहिल्यांदा प्रक्षेपित झाली १९८७ मध्ये म्हणजे ३३ वर्षांपूर्वी पुढे २००८ मध्ये पुन्हा प्रक्षेपण झाले आणि आज पुन्हा १२ वर्षांनी त्याचा टीआरपी तसाच आहे. रामानंद सागर यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आजही या मालिकेच्या तोडीस दुसरी कुठलीही मालिका नाही. इतकेच नाही तर २०१५ पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे.

सध्या रामायण लागलं की घरी त्याच्या आठवणी रोजच निघतात,रामायण संपल्यावर,जेवण्याच्या टेबलावर याचे वेगवेगळे किस्से ऐकायला छान वाटत. रामायण बघणे म्हणजे त्याकाळी एक उत्सव असायचा. सगळेजण ९ ते १० हे टीव्हीसमोर बसले असायचे. अनेकांच्या घरी टीव्ही नसल्याने लोक आजूबाजूला जात असत आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे त्यांना आपल्या घरी येऊ देत असत. ज्यावेळी रामायण लागत त्यावेळी रस्त्यावर करफ्यु सारखी परिस्थिती असत. मग समजा लाईट गेली तर लोक विद्युत वितरण कार्यालयावर दगडफेक करत. आणि लग्न रविवारी असेल मुहूर्त ९ ते १० च्या दरम्यान असेल तर अनेकजण टीव्ही लावण्याचा आग्रह धरीत असत. अनेकजण तर रामायण संपल्यावर लग्नात जात असत. लहान मुलांना आदल्यादिवशी सांगितले जायचे जास्त अभ्यास असेल तर आजच करून ठेवा कारण उद्या रामायण येणार आहे. मग सगळी मुलंसुद्धा त्या आनंदात सगळा अभ्यास करून ठेवत असत. शनिवारी सर्वजण लवकर झोपत असत कारण रविवारी रामायण लागेल म्हणून सकाळी घाईघाईने आवरून तयार राहत असत. लहानमुलं सकाळी लवकर उठून तयार होत टीव्हीसमोर बसायची. मालिकेचा परिणाम असा झाला की धनुष्यबाण आणि गदा ही खेळण्याच्या रुपात घरोघरी आली . 

रामायण सुरू असतांना स्वयंपाकघर पूर्ण बंद असे. सगळेजण फक्त तो एक तास टीव्हीच्या समोर बसून राहत. ही मालिका सुरू असतांना कुणाच्या घरी साध्या कुकर च्या शिट्टीचा सुद्धा आवाज येत नव्हता. रामायण मालिकेचे त्याकाळी लोकांना प्रचंड अप्रूप होते. लोक टीव्हीला नमस्कार करत असत. प्रसंगानुरूप भावुक होत सहज अश्रू तरळत असत. रावण दिसला की आपसूक वाईट बोलत असत. राम आणि सीता ही भूमिका करणारे कलाकार तर अगदी लोकांच्या मनात भरले होते. कुठेही दिसले की लोक सहजपणे नमस्कार करत असत.,पुढे त्याचा परिणाम असा झाला की सीता हे पात्र रंगावणारी कलाकार गुजरातमधून प्रचंड मताने निवडून येऊन लोकसभेत खासदार झाली. 

खरंतर आजही तीच परिस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने अनेकजण मालिका बघतात आहे आजही अनेकांची तीच भावना आहे. अनेकजण आजही सकाळी लवकर आवरून रामायण बघतात त्यानंतर पूजा होते आणि मग जेवण वगरे. खरंतर काळाचा महिमा अगाध आहे. ३३ वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती तशीच आजही आहे. माझी भाची इरा साडे चार वर्षांची आहे पण सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता आवर्जून रामायण बघते. घरातले सगळेजण पुन्हा एकत्र येत रामायण बघत आहेत. तो आनंद शब्दातीत आहे. आपल्यापैकी जे रामायण बघत असतील त्यांचा हाच अनुभव असेल. आजही कुणी फोनवर बोलत असतील तर सरळ सांगतात की रामायण बघण्याची वेळ झाली आहे मी नंतर फोन करतो. या मालिकेने रसिकांच्या मनावर जे अधिराज्य मिळवले आहे ते अजूनही नित्यनूतन आहे. ८० च्या दशकात लोकांकडे कलर टीव्ही नव्हते. मुळात टीव्हीचे प्रमाणच कमी होते आणि आज ही दूरदर्शन ह्या राष्ट्रीय चॅनेलवर त्याच आनंदाने रसिक या रामायण मालिकेचा आनंद घेत आहेत. आज कलर टीव्हीआले,टीव्ही ची उंची वाढली केबल,डिश टीव्ही आलेत पण दूरदर्शनवर रामायण बघण्याचा आनंद देवदुर्लभ असाच आहे. आल्हाददायक वातावरण निर्मिती आणि मनाला तोच आनंद देण्याचा विद्यमान सरकारचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे त्यात रामानंद सागर यांचे रामायण म्हणजे तर विलक्षण सकारात्मक वातावरण निर्मिती ही होतीच पण संस्कार देण्याचे चालतेबोलते विद्यापीठ होते, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी निर्मिती म्हणजे रामायण आहे आणि सदैव राहील. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#Ramayan #Doordarshan #ThrowBackShow