Monday, April 13, 2020

कुटुंबाची कोरोनावर मात !!

संपूर्ण जगाला कोरोना अर्थात कोविड १९ नामक महामारीने ग्रासले आणि जग आज वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. ह्या वाटचालीत अनेक देश एकत्र येत जगाला एकात्मतेचा, समतेचा संदेश देत आहे. नुकतीच भारताने अमेरिकेला केलेली मदत आपण बघितली आहेच. पण ह्या सर्व वाटचालीत आपल्या सर्वांना पुन्हा एकत्र आणले ते आपल्या कुटुंबव्यवस्थेनं जे आपल्याला पिढ्यानपिढ्या मिळालेलं संचित म्हणता येईल. आज भारताने या महामारीत आलेल्या परिस्थितीला व्यवस्थित पद्धतीने हाताळले आहे आणि हाताळते आहे सगळी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ नक्कीच जाणार आहे. 

जगाला भारताने दिलेली अनमोल देणगी म्हणजे कुटुंब . “वसुधैव कुटुंबकम” ही आपली संस्कृती आहे. या कुटुंब व्यवस्थेनेच शतकानुशतके भारताची नीती जागृत ठेवली.माउली अर्थात संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की “हे विश्वची माझे घर”. खरंच या संस्कृती चे  आपण पाईक आहोत यासाठी आपण स्वतःला नशिबवान समजायला हवे असे वाटते. जन्म देणारी आई आणि सगळ्या जगाची ओळख करून देणारे बाबा,लाड करणारे आत्या मामा,मावशी,काका,काकू ओघाने आलेच. आजी,आजोबा म्हणजे तर हक्काचे २४ तास लाडाने सांभाळण्याचं एक केंद्र आहे आणि कुठंतरी बाहेरच्या जगात नाते जोडत असतांना ह्यांना गृहीत धरून आपण कार्य करत असतो पण तरी ही आपली प्रेमाची हक्काची माणसं आज आपल्या सोबत पूर्ण वेळ आहे. 

खरंतर प्रत्येकाच्या जगण्याचा एक भक्कम आधार म्हणजे कुटुंब आहे. आयुष्यात सर्वाधिक काळ आणि प्रसंगी आनंद व्यक्त करण्याचे आधारवड म्हणजे कुटुंब आहे आणि आज या विश्वव्यापी महामारीने जग होरपळून निघतांनाच आपण आपल्या कुटुंबातील हक्काच्या माणसांच्या कुशीत स्वतःला सांभाळून इतरांचा ही सांभाळ करतो आहे. जगामध्ये ह्याची चर्चा नक्कीच होईल.भारत विश्वगुरु कधी होणार हे आत्ता सांगता येणार नाही पण या काळात कुटुंबातील एकत्र येत आपल्या जाती व समाज बांधवांसाठी काहीतरी करू शकलो याचे समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत राहील आणि कुठेतरी कृतार्थतेंन कार्य करत असताना सगळे जण ह्या संकटातुन सुखरूप बाहेर पडतील. माणूस जन्माला येतो तेव्हा काही   सर्वगुणसंपन्न,सर्वशक्तिमान नसतो,त्याला समाजाची आपल्या माणसांची गरज लागते त्यातूनच जन्माला आलेली व्यवस्था म्हणजे कुटुंब आहे आणि जग त्यासाठी भारताकडे आस लावून बघत आहे. जगण्याचे सारे पैलू एका सशक्त कुटुंबात शिकायला मिळतात.सगळ्यांच्या आवडी,निवडी,स्वभाव सांभाळण्याचं तंत्र शिकवलं जातं ते या कुटुंबातच आणि या कुटुंबातूनच बनतो समाज आणि राष्ट्र. 

सकलसंत,साधू,समाजसुधारक,क्रांतिकारक या कुटुंब व्यवस्थेनेच जगाला दिले त्यामुळेच कुटुंब हे भारतीय समाजाचे एकक आहे असे म्हणता येईल. या कुटुंबातील सगळ्यांना त्यात वेगवेगळ्या स्वभावाच्या वेगवेगळ्या वयोगटातील माणसांना बांधून ठेवते ती प्रत्येक घरातील स्त्री. म्हणून तिला "आधार शक्ती" ह्या संबोधनाने तिचा गौरव करावा लागेल. आज आलेल्या परिस्थितीला मातृशक्ती ज्या समर्पण भावनेनं कार्य करते आहे ते कुटुंबापुरते मर्यादित नाही तर राष्ट्र जागृती, आपल्या अवतीभवती असलेल्या समाजासाठी समर्पित होऊन कार्य करते आहे. कुटुंबातील इतर सदस्य सोबत आहेत म्हणून ती वेळप्रसंगी स्वतःला पूर्ण झोकून कार्य करते आहे.

कालांतराने आज संयुक्त कुटुंब वेगळी होऊन विभक्त झाली आहे. आता त्या कुटुंबाचा आकार ही अगदी लहान झाला आहे. पण टेक्नॉलॉजी ने पुन्हा सर्वांना एकत्र आणलं आणि पुन्हा चांगला संवाद सुरू झाला आहे.आज आपल्या व्हाट्स अँप ग्रुप वर प्रत्येकाला कुटुंब,आजोळ,फॅमिली,परिवार ह्यांसारखे ग्रुप बघायला सहज मिळतात. आता कार्य व सणवार प्रसंगी एकत्र येणारे आपण ते कुटुंब टिकवण्यासाठी प्रयत्नरत राहण्याची आवश्यकता आहे. प्रेम, आधार आणि विश्वास देण्याचे माध्यम म्हणजे आपले कुटुंब आहे. आणि या कुटुंबातील प्रत्येक नात्यात प्रेम,आपुलकी चिरकाल टिकून राहील या साठी सदैव कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करणे हे आपले उत्तरदायित्व आहे. आज कोरोनाने आपल्याला हीच शिकवण दिली बाहेरचं जग कितीही सुंदर असलं तरी आपली कुटुंबातील हक्काची माणसं शेवटी आपली असतात. आणि ह्या आपल्या माणसाच्या सहवासात आपली सकारात्मकता कुटुंबासाठी नक्कीच आनंद देणारी व चिरकाल टिकणारी ठरावी हीच सदिच्छा !!

✍️ सर्वेश फडणवीस

#कुटुंब #family_first #IndiaFightsCorona

1 comment:

  1. खरचं आहे तुझ म्हणणं अप्रतिम सर्वेश 👌👌👌

    ReplyDelete