Saturday, April 4, 2020

रामायण - आनंदमय अनुभूती !!

या lockdown च्या दिवसांत बालपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. कारणही तसेच आहे रामायण सारखी मालिका पुन्हा टीव्हीवर आली आणि तोच गोडवा आणि माधुर्य आजही कायम आहे.  नुकतंच एक आर्टिकल वाचनात आले त्यात सगळ्यात जास्त टीआरपी सध्या या मालिकेचा आहे. खरंतर ही मालिका पहिल्यांदा प्रक्षेपित झाली १९८७ मध्ये म्हणजे ३३ वर्षांपूर्वी पुढे २००८ मध्ये पुन्हा प्रक्षेपण झाले आणि आज पुन्हा १२ वर्षांनी त्याचा टीआरपी तसाच आहे. रामानंद सागर यांच्या या जुन्या मालिकेने पुन्हा एकदा टीआरपीचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. आजही या मालिकेच्या तोडीस दुसरी कुठलीही मालिका नाही. इतकेच नाही तर २०१५ पासून ते आतापर्यंतच्या मनोरंजक मालिकांमध्ये ही मालिका टॉपवर आहे.

सध्या रामायण लागलं की घरी त्याच्या आठवणी रोजच निघतात,रामायण संपल्यावर,जेवण्याच्या टेबलावर याचे वेगवेगळे किस्से ऐकायला छान वाटत. रामायण बघणे म्हणजे त्याकाळी एक उत्सव असायचा. सगळेजण ९ ते १० हे टीव्हीसमोर बसले असायचे. अनेकांच्या घरी टीव्ही नसल्याने लोक आजूबाजूला जात असत आणि ते सुद्धा उत्स्फूर्तपणे त्यांना आपल्या घरी येऊ देत असत. ज्यावेळी रामायण लागत त्यावेळी रस्त्यावर करफ्यु सारखी परिस्थिती असत. मग समजा लाईट गेली तर लोक विद्युत वितरण कार्यालयावर दगडफेक करत. आणि लग्न रविवारी असेल मुहूर्त ९ ते १० च्या दरम्यान असेल तर अनेकजण टीव्ही लावण्याचा आग्रह धरीत असत. अनेकजण तर रामायण संपल्यावर लग्नात जात असत. लहान मुलांना आदल्यादिवशी सांगितले जायचे जास्त अभ्यास असेल तर आजच करून ठेवा कारण उद्या रामायण येणार आहे. मग सगळी मुलंसुद्धा त्या आनंदात सगळा अभ्यास करून ठेवत असत. शनिवारी सर्वजण लवकर झोपत असत कारण रविवारी रामायण लागेल म्हणून सकाळी घाईघाईने आवरून तयार राहत असत. लहानमुलं सकाळी लवकर उठून तयार होत टीव्हीसमोर बसायची. मालिकेचा परिणाम असा झाला की धनुष्यबाण आणि गदा ही खेळण्याच्या रुपात घरोघरी आली . 

रामायण सुरू असतांना स्वयंपाकघर पूर्ण बंद असे. सगळेजण फक्त तो एक तास टीव्हीच्या समोर बसून राहत. ही मालिका सुरू असतांना कुणाच्या घरी साध्या कुकर च्या शिट्टीचा सुद्धा आवाज येत नव्हता. रामायण मालिकेचे त्याकाळी लोकांना प्रचंड अप्रूप होते. लोक टीव्हीला नमस्कार करत असत. प्रसंगानुरूप भावुक होत सहज अश्रू तरळत असत. रावण दिसला की आपसूक वाईट बोलत असत. राम आणि सीता ही भूमिका करणारे कलाकार तर अगदी लोकांच्या मनात भरले होते. कुठेही दिसले की लोक सहजपणे नमस्कार करत असत.,पुढे त्याचा परिणाम असा झाला की सीता हे पात्र रंगावणारी कलाकार गुजरातमधून प्रचंड मताने निवडून येऊन लोकसभेत खासदार झाली. 

खरंतर आजही तीच परिस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने अनेकजण मालिका बघतात आहे आजही अनेकांची तीच भावना आहे. अनेकजण आजही सकाळी लवकर आवरून रामायण बघतात त्यानंतर पूजा होते आणि मग जेवण वगरे. खरंतर काळाचा महिमा अगाध आहे. ३३ वर्षांपूर्वी जी परिस्थिती होती ती तशीच आजही आहे. माझी भाची इरा साडे चार वर्षांची आहे पण सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता आवर्जून रामायण बघते. घरातले सगळेजण पुन्हा एकत्र येत रामायण बघत आहेत. तो आनंद शब्दातीत आहे. आपल्यापैकी जे रामायण बघत असतील त्यांचा हाच अनुभव असेल. आजही कुणी फोनवर बोलत असतील तर सरळ सांगतात की रामायण बघण्याची वेळ झाली आहे मी नंतर फोन करतो. या मालिकेने रसिकांच्या मनावर जे अधिराज्य मिळवले आहे ते अजूनही नित्यनूतन आहे. ८० च्या दशकात लोकांकडे कलर टीव्ही नव्हते. मुळात टीव्हीचे प्रमाणच कमी होते आणि आज ही दूरदर्शन ह्या राष्ट्रीय चॅनेलवर त्याच आनंदाने रसिक या रामायण मालिकेचा आनंद घेत आहेत. आज कलर टीव्हीआले,टीव्ही ची उंची वाढली केबल,डिश टीव्ही आलेत पण दूरदर्शनवर रामायण बघण्याचा आनंद देवदुर्लभ असाच आहे. आल्हाददायक वातावरण निर्मिती आणि मनाला तोच आनंद देण्याचा विद्यमान सरकारचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे त्यात रामानंद सागर यांचे रामायण म्हणजे तर विलक्षण सकारात्मक वातावरण निर्मिती ही होतीच पण संस्कार देण्याचे चालतेबोलते विद्यापीठ होते, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी निर्मिती म्हणजे रामायण आहे आणि सदैव राहील. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#Ramayan #Doordarshan #ThrowBackShow

No comments:

Post a Comment