Sunday, May 12, 2024

◆ आचार्य शंकर !! 🚩


श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्।
नमामि भगवत्पाद शंकरं लोक शंकरं।।

शंकराचार्य हे नांवच मुळी मंत्रमुग्ध करणारे आहे. त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसात अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होऊन वैदिक धर्माला ग्लानी आली होती. देवकार्य साधण्यासाठी जे म्हणून देवमानव अवतीर्ण झाले, त्या सगळ्यांचा आविर्भाव अलौकिक रीतीनेच झाल्याचे आढळते. त्यांचा जन्म ईश्वरी इच्छेने आणि अप्राकृत व अलौकिक अशा पद्धतीने होतो. ऐतिहासिक युगात जे देवमानव धर्मसंस्थापनेसाठी भूतलावर अवतीर्ण झाले, आणि या जगात धर्मस्थापनेसाठी ज्या दैवीगुणसंपन्न महापुरुषांचा अवतार झाला त्या सर्वांमध्ये आजही आचार्य शंकरांचे अगदी निराळे स्थान आहे. 

ज्याप्रमाणे ढगांना भेदून सूर्याचे किरण बाहेर पडावेत त्याप्रमाणे काळ आणि कल्पनाविलास यांना भेदून प्रगट होणारी शंकराचार्यांची भव्यदिव्य मूर्ती आजही आपणास स्मरणीय आहे.  शंकराचार्य यांची अलौकिक प्रतिभा, मूलग्राही तत्त्वज्ञान, असामान्य चरित्रबल, लोककल्याणाची तळमळ आदी त्यांचे गुण आजही दृश्यमान असले तरी त्याची प्रतिभा आपल्याला जाणवते आणि त्यांच्या अस्तित्वाची चिन्हे ठायींठायी जाणवतात. 

ह्या तरुण संन्याशाने अखंड भ्रमण केले. आपल्या भारतभूमीत पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सर्व टोकांपर्यंत तर त्यांनी पदयात्रा केलीच पण इतर देशांतही ते गेले. कालप्रवाहामध्ये वेदान्तधर्म जणूकाही चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा झाला होता. त्याला त्यांनी मुक्त केले आणि त्याची पुनर्स्थापना केली. वेदान्तधर्माचे उज्ज्वल स्वरूप त्यांनी जगासमोर ठेवले. इतकेच नव्हे तर, त्याला त्यांनी व्यावहारिक रूप दिले. त्यांनी नित्य आचरणीय धर्म सुप्रतिष्ठित केला. सनातन वैदिक आदर्शांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.

शंकराचार्य यांनी भारताच्या चार दिशांना असलेल्या चार प्रांतांत धर्मदुर्गांची म्हणजे चार मठांची स्थापना केली. हे चार मठ म्हणजे जणू काही चाही दरवाजांवर उभे असलेले चतु:सीमेचे रक्षण करणारे पहारेदारच आहेत. त्यांच्या रूपाने जणू चार वेदांचा सर्वत्र उद्घोष होत आहे. त्यांच्यामुळे हिंदूधर्माची विजयपताका आज सगळ्या जगात फडकत आहे. एखाद्या दिग्विजयी सेनापतीची राष्ट्राच्या संरक्षणाची योजना असावी, तशीच ही शंकराचार्यांची धर्मनीती आहे. त्यांनी प्रचलित केलेल्या अद्वैत वेदान्ताचा प्रभाव आज भारतात सर्वत्र आढळतो आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात - "अहो, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी जे लिहिले ते वाचून आधुनिक सभ्यजग विस्मयचकित झाले आहे."

आचार्य शंकर केवळ एक प्रतिभावान दार्शनिकच नव्हते, तर अपरोक्ष अनुभूती आणि तिच्यापासून उत्पन्न झालेली दिव्य प्रेरणा, हेच त्यांच्या जीवनाचे फार मोठे वैशिष्ट्य होते. देहधारी असूनही ते विदेही होते. मानव असूनही ते अमानवी होते. सर्वसामान्य लोकांत वावरत असूनही ते लोकोत्तर होते आणि म्हणूनच ते जगद्गुरू झाले. त्यांनी दिलेला

न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्।।'

हाच मंत्र आमच्या हृदयात सुप्रतिष्ठित व्हायला हवा. त्यायोगे आम्हाला ज्ञानलाभ होवो, अर्थात स्वरूपप्राप्ती होवो. हिंदू धर्माला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे एकरूप करणारे एकमेवाद्वितीय आदिगुरु आचार्य शंकर होते. अगदी अल्पवयांत 'जगद्गुरू' सन्माननीय पदवी त्यांनी संपादित केली, खरंतर विशालता कधीच कवेत घेता येत नाही पण या प्रातः स्मरणीय असणाऱ्या दिव्य भव्य महापुरुषाच्या चरणी सादर प्रणाम. 

सर्वेश फडणवीस

Friday, May 3, 2024

सहवासाच्या चांदण्यात 🌠

चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.

काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.

अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.

पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.

मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात  येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.

वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.

सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर

सर्वेश फडणवीस

Thursday, May 2, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


स्वरगंधर्व सुधीर फडके. १ मे महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात घडलेले आणि मराठी गीतविश्वाला आपल्या संगीताने जागतिक पटलावर घेऊन जाणारे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा बायोपिक बघण्याचा अमृतयोग आला. सुधीर फडके उर्फ बाबूजी तमाम मराठी रसिकांना जीवापेक्षा प्रिय होते. त्यांच्याविषयी सर्व जाणून घेण्याची ओढ आजही मराठी माणसात भरभरून आहे. बाबूजींची संगीतमय कारकीर्द प्रचंड आहे आणि या प्रवासात अनेक किस्से, गोष्टी, प्रसंग असे आहेत, जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट १७० मिनिटे पण पहिला मध्यांतर होईपर्यंत वेळ कसा जातो कळतच नाही. बाबूजींचा प्रवास हा अनेकांना ऐकून माहिती आहे कुणी तो वाचला आहे पण प्रत्यक्ष पडद्यावर बघतांना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दुपटीने वाढणारा आहे. 

बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष  दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात. 

चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.

प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.

सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा. 

नुकतीच रामनवमी झाली. मराठी  रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही  अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक  पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या  प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल. 


या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने

गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे

वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!


सर्वेश फडणवीस