श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम्।
नमामि भगवत्पाद शंकरं लोक शंकरं।।
शंकराचार्य हे नांवच मुळी मंत्रमुग्ध करणारे आहे. त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसात अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होऊन वैदिक धर्माला ग्लानी आली होती. देवकार्य साधण्यासाठी जे म्हणून देवमानव अवतीर्ण झाले, त्या सगळ्यांचा आविर्भाव अलौकिक रीतीनेच झाल्याचे आढळते. त्यांचा जन्म ईश्वरी इच्छेने आणि अप्राकृत व अलौकिक अशा पद्धतीने होतो. ऐतिहासिक युगात जे देवमानव धर्मसंस्थापनेसाठी भूतलावर अवतीर्ण झाले, आणि या जगात धर्मस्थापनेसाठी ज्या दैवीगुणसंपन्न महापुरुषांचा अवतार झाला त्या सर्वांमध्ये आजही आचार्य शंकरांचे अगदी निराळे स्थान आहे.
ज्याप्रमाणे ढगांना भेदून सूर्याचे किरण बाहेर पडावेत त्याप्रमाणे काळ आणि कल्पनाविलास यांना भेदून प्रगट होणारी शंकराचार्यांची भव्यदिव्य मूर्ती आजही आपणास स्मरणीय आहे. शंकराचार्य यांची अलौकिक प्रतिभा, मूलग्राही तत्त्वज्ञान, असामान्य चरित्रबल, लोककल्याणाची तळमळ आदी त्यांचे गुण आजही दृश्यमान असले तरी त्याची प्रतिभा आपल्याला जाणवते आणि त्यांच्या अस्तित्वाची चिन्हे ठायींठायी जाणवतात.
ह्या तरुण संन्याशाने अखंड भ्रमण केले. आपल्या भारतभूमीत पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण सर्व टोकांपर्यंत तर त्यांनी पदयात्रा केलीच पण इतर देशांतही ते गेले. कालप्रवाहामध्ये वेदान्तधर्म जणूकाही चिखलात रुतलेल्या राजहंसासारखा झाला होता. त्याला त्यांनी मुक्त केले आणि त्याची पुनर्स्थापना केली. वेदान्तधर्माचे उज्ज्वल स्वरूप त्यांनी जगासमोर ठेवले. इतकेच नव्हे तर, त्याला त्यांनी व्यावहारिक रूप दिले. त्यांनी नित्य आचरणीय धर्म सुप्रतिष्ठित केला. सनातन वैदिक आदर्शांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली.
शंकराचार्य यांनी भारताच्या चार दिशांना असलेल्या चार प्रांतांत धर्मदुर्गांची म्हणजे चार मठांची स्थापना केली. हे चार मठ म्हणजे जणू काही चाही दरवाजांवर उभे असलेले चतु:सीमेचे रक्षण करणारे पहारेदारच आहेत. त्यांच्या रूपाने जणू चार वेदांचा सर्वत्र उद्घोष होत आहे. त्यांच्यामुळे हिंदूधर्माची विजयपताका आज सगळ्या जगात फडकत आहे. एखाद्या दिग्विजयी सेनापतीची राष्ट्राच्या संरक्षणाची योजना असावी, तशीच ही शंकराचार्यांची धर्मनीती आहे. त्यांनी प्रचलित केलेल्या अद्वैत वेदान्ताचा प्रभाव आज भारतात सर्वत्र आढळतो आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात - "अहो, वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी जे लिहिले ते वाचून आधुनिक सभ्यजग विस्मयचकित झाले आहे."
आचार्य शंकर केवळ एक प्रतिभावान दार्शनिकच नव्हते, तर अपरोक्ष अनुभूती आणि तिच्यापासून उत्पन्न झालेली दिव्य प्रेरणा, हेच त्यांच्या जीवनाचे फार मोठे वैशिष्ट्य होते. देहधारी असूनही ते विदेही होते. मानव असूनही ते अमानवी होते. सर्वसामान्य लोकांत वावरत असूनही ते लोकोत्तर होते आणि म्हणूनच ते जगद्गुरू झाले. त्यांनी दिलेला
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः
चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्।।'
हाच मंत्र आमच्या हृदयात सुप्रतिष्ठित व्हायला हवा. त्यायोगे आम्हाला ज्ञानलाभ होवो, अर्थात स्वरूपप्राप्ती होवो. हिंदू धर्माला पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे एकरूप करणारे एकमेवाद्वितीय आदिगुरु आचार्य शंकर होते. अगदी अल्पवयांत 'जगद्गुरू' सन्माननीय पदवी त्यांनी संपादित केली, खरंतर विशालता कधीच कवेत घेता येत नाही पण या प्रातः स्मरणीय असणाऱ्या दिव्य भव्य महापुरुषाच्या चरणी सादर प्रणाम.
सर्वेश फडणवीस
छान लिहिलंय सर्वेश!
ReplyDelete