Saturday, July 30, 2022

वैनगंगेच्या तीरी, प्रकटले श्रीहरि जगदिश्वरा ।

हिंदू पंचागांतील श्रावण हा महिना व्रत वैकल्यांचा महिना म्हणून मानला जातो. श्रावण महिना निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो कारण पावसामुळे वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झालेले असते. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी लोक मान्यता आहे. विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. श्रावण महिना सुरू होताच सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे खास सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी- गणपतीही खुणावत असतात. याच श्रावण महिन्याचे औचित्य साधत आपण आज विदर्भातील प्राचीन महादेव मंदिर अर्थात विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंभोऱ्यातील चैतन्यश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत. 

नागपूर - भंडारा रस्त्यातील हे अत्यंत रमणीय ठिकाण अंबानगरी अर्थात अंभोरा आहे. अति उंच कडा विदर्भात अंभोरे गावात असून याच पार्श्वभूमीवर त्यास कोलासुरानचे पहाड म्हणतात. आकाशात झेप घेणारे पक्षी हमखास सरळ चैतन्यश्वराच्या प्राचीन मंदिराच्या छतावर येऊन स्थिरावतात.वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं अंभोरा हे देवस्थान आहे त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. भरगच्च पसलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि या निसर्ग सौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दु:ख विसरायला लावणारे आहे. कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. कारण चैतन्य इथल्या कणाकणात ठासून भरल्याचे बघता क्षणीच जाणवते. 

अंभोरा येथे पाच नद्यांचा संगम, मुकुंदराजाची समाधी, चैतन्यश्वरांचे पितळी कळस, धर्मशाळा, भूगर्भाचा तुटलेला कडा, नद्यांचे पाणी आणि घनदाट अरण्य असे निसर्गाचे अद्भुत दर्शन बघायला मिळते. या अंभोरा नगरीचे प्राचीन नाव अंबनगरी, त्याची झाली अंबानगरी व आता आपण तिचे आधुनिक नाव ठेवले श्रीक्षेत्र अंभोरा आहे. आपल्या मायमराठीचे आद्य ग्रंथ समजतात ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी. पण या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या १०० वर्षे आधी आपल्या विदर्भातील एका विद्वानाने "विवेकसिंधु" नावाचा ग्रंथ लिहिला. त्या विद्वानाचे नाव आहे मुकुंदराज. ते एका अर्थाने मराठीचे आद्य ग्रंथकार ठरतात. त्यांची भूमी श्री क्षेत्र अंभोरा आहे. अंभोऱ्यात अनेक पुरातन अवशेष आहेत. पण पूर्व दिशेच्या उंच कड्यावर असलेल्या श्रीचैतन्यश्वरांचे देऊळ त्या सर्व पुरावशेषात सर्वोत्तम असेच आहे. अंभोरा हे एका अर्थाने पाच नद्यांच्या संगामावरील बेट असून त्याच्या मध्यभागी पूर्व दिशेस उंच जाणाऱ्या पायऱ्यांनी वर चढत गेलो की, आपण त्या प्राचीन मंदिरात पोहोचतो. वरच्या माथ्यावरून जो निसर्ग सौंदर्याचा देखावा दिसतो तो शब्दांच्या पलीकडचा आहे. 

माथ्यावरून खाली दिसणाऱ्या पाच नद्या हातात हात घालून वैनगंगेच्या कुशीत विसावतात. आपले पाणी एकजीव करतात. वैनगंगेच्या पात्रात कोट्यावधी वर्षांपूर्वी डोंगराची रांग होती.  वैनगंगेच्या प्रवाहाने त्यात खिंडार पडली. त्यामुळे जगातील भूगर्भ शास्त्रज्ञ हा झालेला बदल पाहण्यास येथे येतात. देवस्थानच्या परिसरात उंचावरून वाहणारे वारे आपल्याला एका जागी खिळवून ठेवतात. चैतन्यश्वराचे मंदिर हे महादेवाच्या पुरातन मंदिरासारखेच आहे. पांढर्‍या चुन्याने रंगविलेले हे मंदिर दुरुनही लक्ष वेधून घेते. १२ वर्षाच्या महाव्रतानंतर ब्रम्हगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्यश्वर प्रगट झाले असे म्हणतात. त्यामुळे सर्व दु:ख विनाशक आणि सुखाचा वर्षाव करणारा इथला महादेव चैतन्यश्वर म्हणून भक्तप्रिय आहे.

प्रवेशद्वारातून आत जाताच पूर्वाभिमुख चैतन्यश्वराचा सभामंडप नजरेत भरतो. सभामंडपातून पूर्वेकडचे दृश्य केवळ कल्पनाचित्र असावे असे आहे. येथील स्तंभ संगमरवरी असून गर्भगृह छोटे आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे बांधकाम आहे. गर्भगृहात शिवाची जागृत पिंड असून काशीच्या विश्वनाथाचा अंश त्यात आहे. व तो एका दिव्य पुरुषाने श्रीहरिहरनाथ नावाच्या व्यक्तीने तो अंश आणला. चैतन्यश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असून कळस हा द्रविडीय पद्धतीचा असून त्यावर उत्तर भारतीय प्रभाव स्पष्ट दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडीवर पितळ्याचा पंचमुखी नागराज आहे. या मंदिरातील घंटेचा नाद जेव्हा आसमंतात निनादतो. तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवते. स्वच्छ, सुंदर नीट नेटका परिसर बघून मन प्रफुल्लित होते. महाशिवरात्र, प्रदोष, श्रावण सोमवार व शिवपंचमीस प्रचंड मोठी यात्रा भरते. 

या मंदिराच्या निर्माणाची एक कथा सांगितली जाते. या अंभोऱ्यात साधारणपणे हजारो वर्षांपूर्वी हरिहरनाथ नावाची व्यक्ती जन्मास आली. हरिहर जातीने ब्राह्मण होते. त्यांनी १२ वर्षे पाशुपत्य व्रत केले. काशीस अनुष्ठान केले. पट्टशिष्य रघुनाथ ऊर्फ रामचंद्र यांच्या समवेत ते व्रतस्थ राहिलेत. हरिहरांनी आपल्या अलौकिक शक्तीने मुकुंदराज नावाच्या ज्योतिषास प्रभावित केले. त्याची गंमत अशी, हरिहरचा शिष्य रघुनाथ माधुकरी मागण्यास मुकुंदराजांच्या घरी गेले व परतताना त्यांना म्हणाले, उद्या तुझा मृत्यू आहे. रघुनाथ घाबरले, कारण मुकुंदराज ज्योतिषी होते. (पण ज्योतिषाने कधीही कुणाचा मृत्यू सांगायचा नसतो. ती चूक त्यांच्याकडून झाली) रघुनाथाने हा प्रसंग गुरुंना कथित केला. घाबरू नको, मी चटईवर निद्रा घेईन. तू माझे पाय चेपत बस. झाले यम आले पण चटईला स्पर्श न करता यमदूत निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुनः रघुनाथ 'ओम भवती भिक्षा देही' म्हणत मुकुंदाकडे आले. अरे तू जिवंत कसा? महाराज माझ्या गुरुंना विचारा. तुझे गुरु मृत्यू टाळू शकणारे गुरु आध्यात्मिक उंचीचे असले पाहिजे. मुकुंदराज आले आणि त्यांना शरण गेले. गुरुशिष्य संपर्कात पुढे त्यांनी शके १११० मध्ये विवेकसिंधु हा ग्रंथ लिहिला. आज त्यांच्या समाध्या तेथे सुस्थितीत आहेत. 

अर्थातच वर सांगितल्याप्रमाणे पाशुपत्य व्रत समाप्तीनंतर हरिहरनाथांनी पंचनद्यांच्या संगमात यज्ञ केला. शिव प्रसन्न झाले हरिहरा मी लघुअंशाने अभोऱ्यात स्थिरावलो आहे असे म्हणून यज्ञ ज्वालेतून साक्षात शिवाने त्यांना दर्शन दिले, तेव्हापासून नाथसंप्रदायाची काशी असे या स्थळाचे नामाभिधान झाले. मुकुंदराज लिहितात, 'वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी' येथे प्रकटले श्रीहरि जगदिश्वरा, विवेकसिंधु ग्रंथ प्रकट जाहला . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या शंभर वर्षे आधी हा ग्रंथ जन्माला आला आहे, 

चैतन्यश्वर मंदिर परिसरात धर्मशाळा, पटांगण, वृंदावन, पाकगृह, हरिनाथ-रघुनाथ समाधी, गणेश विठ्ठल रुख्मिणी नाथसंप्रदायी समाध्या जागोजागी आहेत. पुढे या स्थळाचा विकास ठवकर परिवाराने केला. या कार्यात त्यांना इतर भक्तांनी साथ दिली. तर असे या विदर्भाच्या काशीस व उंच कड्यामुळे रम्य वाटणाऱ्या अंभोरा नगरीचे दर्शन आपण घ्यायलाच हवे. मनोहर अंबानगरी व विवेकसिंधु ग्रंथाचे जन्मस्थान म्हणून हीच ती अंभोरा नगरी होय, येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान श्रीचैतन्येश्वर आपणा सर्वांना दीर्घ आयुरारोग्य देवो व आपल्या मनोकामना पूर्ण करो,हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

सर्वेश फडणवीस 



Sunday, July 24, 2022

जय भगवान चिंतामणी देवा वरदेशा ।



भारतीयांचे आवडते आराध्य दैवत म्हणजे श्री गणेश आहे. हिंदू धर्मीयांच्या कोणत्याही पूजेचा प्रारंभ श्री गणेशाच्या पूजेनेच होतो. त्यामुळे श्री गणेशाच्या पूजेला व भक्तीला अग्रगण्य स्थान आहे. भारतात श्रीगणेशाची २१ अतिशय  महत्त्वाची स्थाने मानलेली आहेत. त्यापैकीच एक व श्री गणेशाचे चिंताहरण व मायामोहाचा विनाश करणारे मूर्त रूप श्री चिंतामणी गणेशाचे स्थान ‘श्री क्षेत्र कळंब’ येथील श्री चिंतामणी देवस्थान आहे. आज आपण याच श्री चिंतामणी गणपतीच्या मंदिरातील गाभाऱ्यात जाणार आहोत. 

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असलेले हे गणपतीचे मंदिर यवतमाळ नागपूर या राज्य महामार्गावर यवतमाळ शहरापासून सुमारे २३ कि. मी. अंतरावर असलेल्या कळंब गावात आहे. चिंतामणीचे मंदिर गावाच्या सामान्य भूपातळीपेक्षा सुमारे ३५ फूट खोल आहे. मंदिराच्या प्रवेश द्वारातून पायर्‍या उतरून खाली गेल्यावर समोर एक कुंड दिसते. या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. यातून सुमारे दर १२ वर्षांनी आपोआप पाणी वर येते. हे कुंड गणपतीने अंकुशाच्या प्रहाराने तयार केले तर या मंदिराची स्थापना देवराज इंद्राने केली असल्याचे मानतात.

या कळंबच्या एका ऋषीचा गृत्समदांचा उल्लेख वैदिक वाङ्मयात मोठ्या सन्मानाने येतो. पण मुळात गृत्समद हे वाचकमुनी यांचे सुपुत्र नसून इंद्र व वाचकमुनीची पत्नी मुकुंदा याचे अपत्य होते ही कथा आली आहे. त्यानंतर शापवाणी, गृत्समदास ही व्याधी अशा सर्व कथा या कळंब चिंतामणी स्थानात गुंतून पडल्या आहेत. गृत्समद ऋषी मोठे शेतीतज्ज्ञ व गणिती होते. वेदवाङ्मयात मात्र फक्त 'अतसी' म्हणजे लोकरीचा उल्लेख येतो. याच गृत्समद ऋषीने कापसाच्या बोंडापासून कापूस वेगळा करून त्याचे तंतू केले व त्या तंतूचे जाडेभरडे वस्त्र विणले. आज मानवास कापसाचे वरदान मिळाले आहे. अर्थात कापडाचा जनक म्हणून गृत्समदांचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. याच क्षेत्री अहिल्या तिच्या सौंदर्यावर भाळणारे गौतम ऋषी, प्रत्यक्ष इंद्रदेव यांच्या कथा विणल्या आहेत. श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा
उद्धार त्रेतायुगात श्रीरामांनी केला. शापवाणीने इंद्राचे कुष्ठ, गृत्समदाची व्याधी गणेश कुंडातील जलस्पर्शाने नाहिशी झाल्याची दंतकथा येथेच घडली आहे अशी लोकमान्यता आहे. 

'गणानां त्वा गणपतिं हवामहे,
कविं कवीनांमुपश्रवस्तम्,
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणपस्ते,
आ नः शृण्वन्नूतिभिः सीद सादनम्'

हा मंत्र गृत्समदांनी रचला आहे. या मंत्रात ते म्हणतात, 'हे बृहस्पते, आपण सर्वगणांचे गणपती म्हणजे गणांचे प्रमुख
आहात, सर्व कवींमध्ये श्रेष्ठ आहात.' बृहस्पती वाणीचे अधिदैवत आहे. म्हणजे बृहस्पती एका अर्थाने गणपतीच आहेत. ॐकार शब्द ब्रह्मवाचक आहे. ब्रह्मणस्पती म्हणजे वाङ्मयाची किंवा साहित्याची देवता, असे उपनिषदकारांचे म्हणणे आहे. कदाचित म्हणूनच गणपतीची मूर्ती ही ॐकाराच्या आकाराची घडविली असावी, असे वाटते.

श्रीगणेशपुराण आणि श्रीमद् मुद्गलपुराण यांत उल्लेखित असा हा चिंतामणी आहे. महर्षि गौतम ऋषींनी इंद्रदेवास शापमुक्त होण्यासाठी विदर्भातील कदंबक्षेत्री जाऊन श्री गणेशाची तपश्‍चर्या करण्यास सांगितलेले ते हेच कळंब स्थान आहे, इंद्राच्या घोर तपश्‍चर्येने प्रकट झालेले श्री गणेश येथेच आहे. इंद्रास शापमुक्त करणारा चिंतामणी गणेश भक्तांना चिंतामुक्त करणारा आहे. देवराज इंद्राने श्री गणेश पूजनास्तव पृथ्वीजल न वापरता प्रत्यक्ष स्वर्गातून श्री गंगेला आवाहन करून त्या पाण्याने श्री पूजन केले आणि प्रत्येक १२ वर्षांनी श्री गंगेस श्रीचरण धुत रहाण्यास सांगितले. त्यानुसार प्रत्येक १२ वर्षांनी येथील कुंडातील पाण्याची पातळी वाढते आणि श्री चिंतामणीचा पदस्पर्श झाला, की पाण्याची पातळी आपोआप कमी होऊ लागते.

कळंब येथील चिंतामणीच्या गाभाऱ्यात इ.स. २००७ साली गंगा आली होती व त्याने गाभारा पूर्ण भरला होता. या कळंबचे स्थान आज तालुक्याचे असते तरी पूर्वी ते खेडे होते आज गावात प्रचंड आर्थिक उलाढाल वाढली आहे व गावाच्या केंद्रस्थानी श्री कळंबराज चिंतामणी आले आहे. मुळात हे मंदिर म्हणजे एका पाताळ गुंफेतील स्थान आहे, असे सुप्रसिद्ध पुरातत्व तज्ज्ञ डॉ. पु. नि. फडके म्हणतात. म्हणजेच त्यांच्या सिद्धांतानुसार या महापाषाणयुगीन गुंफेत श्रीची स्थापना झाली. मुळात मंदिराचे स्थापत्य पाताळस्थापत्य शैलीचे ठरते. एखाद्या विहिरीत आपण उतरतो की काय असा भास होतो. व याच भूगर्भात चिंतामणीचे गर्भगृह आहे. 

कळंबच्या गणपती स्थानापर्यंत जाण्यास म्हणजेच खाली उतरण्यास मजबूत पायऱ्याचे जिने आहेत. एका बाजूने जायचे व दर्शनार्थीनी दर्शन झाले की दुसऱ्या जिन्याने वर यायचे अशी ती रचना आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे तळामध्ये एक अष्टकोनी कुंड असून त्यास गणेशकुंड म्हणतात व या कुंडाच्या उभय बाजूंना दोन व्हरांडे असून तळात २५-३० भक्त एकावेळेस सहज मावू शकतात. येथील गणेश प्रतिमा चतुर्भुजांकित असून ती मध्यभागी असलेल्या गर्भगृहात विराजमान आहे. प्रतिमा शेंदूरलिपीत असल्याने आपण तिला केवळ बाह्यरेषांनी बघू शकतो . 

चिंतामणी गणेशाचा मुकूट मात्र मूर्तीलाच असावा. सोंड मात्र वामहस्ताजवळ असून २ ते ३ फूट उंच आहे. विशाल भालप्रदेश, बारीक पण अत्यंत तेजस्वी नेत्रद्वय, शूर्पकर्ण, लंबोदर, उदर बंधांकित, डावा पाय दुमडून यक्षराज वामसुर वासनात आहेत. विशेष पूजा अर्चेच्या दिवशी चिंतामणींना अलंकार घालण्याची प्रथा आहे. प्रतिमा अत्यंत मनोहर आणि रेखीव आहे. 

देवालयाचा जीर्णोद्धार यादव कालखंडात झाला असून प्रतिमेच्या उभय बाजूस शिवलिंग आहे. येथील एका खोदकामात एक सर्वतोभ्रद गणेश प्रतिमांही आढळली असून ती अगदी पायऱ्यांच्या आधीच्या भव्य सभामंडपात प्रतिष्ठित आहे. सर्वतोभद्र म्हणजे स्तंभाच्या चारही बाजूंना गणपतींचे अंकन असते तसे ते येथे आहे. आज मंदिरात प्रशस्त धर्मशाळा असून चांगल्या सोयी झाल्या आहेत व अक्षरशः रोज हजारो भक्त व विशेष गणेशोपासक या मंदिरात भेट देतात. कळंबच्या श्री चिंतामणी दर्शनाने मन तृप्त आणि शांत होते. तर अशा या विदर्भ अष्टविनायकातील कळंबच्या चिंतामणी मंदिरास एकदा नक्की भेट द्यायला हवी. कै. गजाननशास्त्री पुंड रचित आरतीत म्हणतात, 

जय भगवान चिंतामणी देवा वरदेशा । 
पंचारती करितो तुज कदंबक्षेत्रेशा ।।  

सर्वेश फडणवीस 

Sunday, July 17, 2022

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी,अशक्य ही शक्य करतील स्वामी

गुरू..या शब्दातच विलक्षण आत्मीय भाव आहे. आपण सर्वजण गुरू या शब्दाचे महत्त्व जाणतोच. गुरूगीतेतही गुरूचे, गुरूभक्तीचे सुंदर विवेचन आहे. गुरू म्हणजे गु कार अंध काराचा अन रु कार तेजाचा. म्हणजे जो अज्ञानाच्या अंधःकारापासून ज्ञानाच्या उजेडाकडे नेतो तो गुरू. जो लघु नाही तो गुरू. अशा व्याख्या बघितल्या की गुरूंचा संबंध हा शिष्याच्या जीवनातील अविद्या,अज्ञान अतृप्ती,अकार्यक्षमता, आणि अहंपणा नाहीसा करण्यासाठीच येत असतो हे लक्षात येते. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. याचे औचित्य साधत आज आपण अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या श्री वटवृक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात जाणार आहोत. 

अक्कलकोटची भूमी ही स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. अक्कलकोटचे संस्थान हे दत्त संप्रदायातील मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. सोलापूर हून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे शहर सोलापूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र आणि  कर्नाटकच्या सीमेवर असणारे क्षेत्र कायम भक्तांनी गजबजलेलं असतं. श्री समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. 

अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे या स्थानाने झाला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. अक्कलकोट ला स्वामींचे बराच काळ वास्तव्य होते या ठिकाणी स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. या परिसरात प्रवेश करताच  मन स्वामीचरणी गुंतून जाते. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात  वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त या ठिकाणी व चोळप्पाचे मठात होता. अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही  या ठिकाणी  येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. या वटवृक्ष मंदिरात सकाळी अभिषेक, रुद्रापठण  चालते. या ठिकाणी गेल्यावर अनेक जुने छायाचित्रे येथे बघायला मिळतात. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. 

अक्कलकोटच्या स्वामी समर्थ वटवृक्ष मंदीरात पोहोचल्यावर श्रीस्वामी महाराजांची शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंभाव आपसुक गळून पडतात. त्या आनंदाचे विश्लेषण करता येणे अशक्य असते, परंतु डोळ्यात आपोआप आनंदाश्रु तरळतात. ही कोणती शरणागती असते जी देताना राग लोभ, मत्सर, मोह व मायेने ग्रासलेल्या मनुष्यासही आनंद देते, कळत नाही. असे वाटते की जगात हेच एकमेव चरणद्वय आहेत जेथे डोके टेकवून आपले सुख दुःख, पाप-पुण्य, सारे मनोगत, मनोरथ सांगून टाकावे. खरतर, स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होवून आपल्या सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे!

अनन्यभावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले असे ही सांगितले जाते.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.

अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन, असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते.

श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वर्णिलेला आहे. आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरूषांचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बळवंत फडके हे एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात देऊन आशिर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते. त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहित असावे. त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकर्‍याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितले. वा. ब. फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले. बराच वेळ बसून सुध्दा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून फडके निराश झाले व तशीच तलवार घेऊन परत आले. श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील "अजून क्रांतीला योग्य वेळ आलेली नाही" असा फडक्यांना इशारा दिला होता.

श्री स्वामी समर्थांनी समाजातील वाईट प्रवृत्ती संपवून त्याऐवजी चांगले विचार समाजात पेरण्याचे महान कार्य केले. समाजात दुःखी माणसांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम स्वामी करत. स्वामींच्या भक्तांना ते नेहमी जपायचे त्याचप्रकारे स्वामी श्रीमंत आणि गरीब यांना सारखेच मानायचे. मानव आणि इतर जीवांवर स्वामींचे अपार प्रेम होते. याच कारणाने त्यांनी कुणाचा भेदभाव केला नाही. असे हे वटवृक्ष मंदिर स्वामी महाराजांचे स्थान आजही सुस्थितीत आहे. एकदा तरी या ठिकाणी जात दर्शन घ्यावे आणि गाभाऱ्यातील स्वामींच्या चरणी अनन्यभावाने लिन व्हावे हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 




Sunday, July 10, 2022

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ।

आज देवशयनी आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. खरंतर कित्येक वर्षांआधी उत्पन्न झालेल्या पुराणांपासून आषाढी एकादशीला मानाचे स्थान देण्यात आले आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आजच्याच दिवशी भुवैकुंठ असलेल्या पंढरपूरात वैष्णवांचा मेळा जमला आहे. श्री हरी विठ्ठलाची गर्जना करत आणि रामकृष्ण हरी हा नामघोष करत लाखो वारकरी पंढपूरला पायी चालत आले आहेत. 

परंतु पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंग गुरुपौर्णिमेला विदर्भातील धापेवाड्यात येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच दिवशी पंढरपूरचे मुख्य मंदिरही बंद असते. विदर्भ पंढरी म्हणून आज धापेवाड्याची ओळखल्या जाते आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधत प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ओळख सर्वदूर झाली आहे अशा विदर्भातील धापेवाडा या तीर्थक्षेत्रातील पांडुरंगाच्या गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत. 

अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री विठ्ठलाचे रुक्मिणी माते बरोबर असलेले हे मंदिर आणि श्रद्धेय कोलबा स्वामी या संताच्या पुनीत व पवित्र चरणस्पर्शाने अभिमंत्रित झालेले हे मध्ययुगीन काळातील मंदिर आहे. येथील चंद्रभागा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते मंदिराच्या  बाजूची हिरवीगार झाडी, श्रीविठ्ठलांचे सुंदर प्रशस्त आणि नयनमनोहर मंदिर परिसर याने मन मोहवून टाकणारे आहे. 

धापेवाडा गावाच्या बस स्टॅण्डपासून साधारण पाऊण कि.मी. वर हे पवित्र स्थान असून दर्शनीय कक्षेचा प्रचंड विस्तार असल्याने हे मंदिर लगेच मनात भरते. साधारण वर्षभर भाविकांनी गजबजलेले हे मंदिर म्हणजे एका चौकोनी वाड्यासारखे असून तटबंदीची भिंत सर्व वास्तुस आपल्या कवेत घेणारी आहे. आपण प्रवेश मार्गावर पोहोचल्यावर वरचे कठडे सुंदर सुशोभीत असून त्याचे समान आकार आहेत. व्हरांड्यात चहू बाजूंना अतीव सुंदर व प्रशस्त असे स्तंभ असून मंदिराचे सर्व वजन जणू त्यांनी पेललेले आहे. आत शिरताच प्रशस्त अशा ओवऱ्यांनी मंदिर पूर्णपणे सुसज्ज आहे. मध्यभागी श्रीविठ्ठलाचे मंदिर आहे. आजूबाजूला असणाऱ्या चार ही ओवऱ्यावर कदाचित प्राचीन काळी तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय असावी. आतल्या चौकात उतरण्यास पायऱ्या असून त्यातूनच चढून ओट्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. आता जीर्णोद्धार झाल्याने  मंदिर प्रशस्त आणि अधिक देखणे झाले आहे. 

आज या मंदिराचे नवीन रूप बघतांना देवदर्शनाच्या आधीच डोळे तृप्त होतात. लाकडी मेहरपी कमानी, लाकडी स्तंभ, त्यावरील सुशोभन, कोरीव छत त्यातून झुंबरे बघत या सभामंडपातूनच आपण आत गर्भगृहात जातो. आज सभामंडपाचा तळ मात्र आधुनिक टाईल्सनी सजविला आहे. यामुळे  सभामंडपाची रंगसंगती तर इतकी आकर्षक आहे की, त्यातील रंगसंगती सूर्याच्या प्रकाशात अधिकच चकाकते. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सूर्यनारायण आपल्या किरणाने श्रीविठ्ठलरुखमाईस वेगळीच आभा निर्माण करतात. मंदिराच्या मधल्या भागातून आत गेल्यावर सुंदर मूर्ती बघायला मिळतात. कंबरेवर हात ठेऊन श्रीविठ्ठल उभे आहेत, सोबतीला जगन्माता रुक्मिणीही आहे. या मूर्ती अत्यंत सुंदर व लावण्यमयी आहेत. गर्भगृह, प्रदक्षिणा पथ तसेच कळस अतिशय प्रमाणबद्ध आहे. गर्भगृहास दक्षिणेकडूनही मार्ग आहे. गर्भगृहात गेल्याबरोबर आपण पंढरपुरात तर नाही, असा भास होतो. आज प्रवेश मार्गावर जीर्णोद्धार झाल्याने गर्भगृहाची शोभा अधिकच वाढली आहे. विठ्ठल - रखुमाई चे दर्शन घेताच मन प्रसन्न होतेच, पण एका वेगळ्याच भावविश्वात भक्त जातात.

नागपूर पासून अवघ्या २८ किमीवरील हे स्थळ म्हणजे श्रद्धेय श्रीकोलबा स्वामींचे जणू एक जिवंत स्मारकच होय. मंदिराच्या शेजारी  स्वामींची जीवन चित्रे, काही पौराणिक चित्र, प्रसंग आदी अतीव सुंदर रुपात चित्रीत केलेली दिसतात. चित्रांचे भाव, रंगसंगती, प्रसंगानुरूप वस्तुनिष्ठता यांमुळे सर्वच चित्र भावस्पर्शी आहेत. या मंदिराची एक आख्यायिकाही सांगितली जाते. इ.स. १६५७ साली उमरेड तालुक्यात बेला या छोट्याशा गावी कोलाबा स्वामींचा जन्म झाला. ते पांडुरंगाचे निःस्सीम भक्त होते. वडील वासुदेव व आई देवकी म्हणजे ते भगवान श्रीकृष्णांचे वंशजच म्हणायचे. पंढरपुराची त्यांना प्रचंड ओढ होती, पण विठुरायांना त्यांनी धापेवाडा नगरी जावे अशी आज्ञा केली. धापेवाड्यास येताच त्यांचा संबंध धर्मशेट्टी बाबांशी झाला. पुढे ते आदास्यास त्यांना घेवून गेले व मकरंदपूरी गोसाव्यांच्या सान्निध्यात त्यांनी हे जग सोडले. कोलबा स्वामी अत्यंत व्यथित झाले. आदास्याच्या देवळात त्यांनी वर्षभर मुक्काम ठोकला. एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. कोलबाजी धापेवाड्यास जा, चंद्रभागेच्या बाहुली या विहिरीत मी तुला दर्शन देईन. स्वप्न खरे ठरले साक्षात परमेश्वरांनी त्यांना दर्शन दिले. सोबत उमाजी बाबा सुरतसिंह जमादार, विठ्ठलजी पेंढणे आदी संत होते. इ.स. १७४१ ला तेथे श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमांची प्राण प्रतिष्ठा झाली, कालांतराने पुढे नंदीघाट, रंगशाळा, सभामंडप आदी बांधण्यात आले. पुढे देवालयाचे अधिक बांधकाम श्रीगोविंदसिंह, सीतारामसिंह, वेळेकर, खोलकुटे, जमादार, गडकरी, निंबाळकर आदी भक्त यांनी केले. येथील श्रीविठ्ठलांच्या मस्तकी शिवपिंड असून ही मूर्ती स्वयंभू आहे असे म्हणतात. 

आषाढी-कार्तिकी एकादशी, पौर्णिमा, प्रतिपदा या तिथींना तेथे यात्रा भरते. पायी दिंड्या येण्याचे हे विदर्भातील एकमेव स्थान आहे. श्रीभगिरथी बाई जमादार यांनी इ.स. १९०६ साली १२ चाकांचा सागवानी लाकडाचा रथ परमेश्वरचरणी अर्पण केला. पुढे रुद्र प्रतापसिंहांनी जुन्या माहितीच्या आधारे २००१ साली चित्रमय ग्रंथ लिहिला, त्यात एकूण २६ चित्रे आहेत. स्वयंभू विठ्ठल-रुख्मिणीच्या प्राण-प्रतिष्ठेनंतर २१ वर्षांनी वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि आजही त्यांच्या विशाल मठात ती जागृत समाधी आहे. पुढे हे स्थळ संतांचे जणू माहेरघरच ठरले. त्यात आडकुजी बाबा, आनंदीबाबा, घुसंत महाराज, वारामाई, ब्रह्मचारी महाराज, झेंडेवाले महाराज अशा अनेक संतांच्या परीसस्पर्शाने धापेवाडा पवित्र झाले. वर्षभराचे विविध कार्यक्रम, महापूजा, दिंड्यांची व्यवस्था, भोजन-निवास व्यवस्था, आदी सर्व सोई मंदिरांचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने करतात. त्यात महापूजेला येणाऱ्या अतिथींचे यथोचित स्वागत तसेच इतर सर्व कार्यक्रम अतिशय योजनाबद्ध होतात. अशा या विदर्भातील पंढरपुर असणाऱ्या धापेवाडा येथे सावळे सुंदर अशा श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनार्थ एकदा नक्की जायला हवे.

रामकृष्ण हरी .. 

सर्वेश फडणवीस 

Monday, July 4, 2022

स्नेहवन ज्ञानग्रामाचे उद्गाते - अर्चना व अशोक देशमाने


मला कायम वाटतं भारत हा वैविध्यपूर्ण आहे. इथं पावला पावलावर आपल्याला अफलातून आणि अजब माणसं मिळतात. कधी त्यांच्या कार्यातून तर कधी त्यांच्या उपकारातून ही माणसं लाखमोलाचा संदेश देऊन जातात. यांच्या सहवासातून पण जी उर्जा मिळते त्याला तोडच नाही. कालचा अनुभवही खऱ्या अर्थाने समृद्ध करणारा होता. आळंदी पुणे येथील स्नेहवनाच्या माध्यमातून ५० मुलांचे पालकत्व स्वीकारणारे अशोक देशमाने यांची भेट झाली. नागपूरला समरसता संमेलना निमित्ताने ते आले होते. येण्याच्या आधी कळवल्याने निवांत भेट झाली. अशोक देशमाने आणि अर्चना देशमाने हे दाम्पत्य आज ५० मुलांचे पालक आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार, यांच्या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाचे अद्भुत काम हे दोघे करतात. नुकतीच तिशी ओलांडणारे हे दोघेजणही खूप चांगले कार्य आळंदी येथे स्नेहवनाच्या माध्यमातून करतात आहे. 

अशोक देशमाने दादा कवी मनाचे आणि संवेदनशील माणूस आहेत. वारकरी संप्रदायाचे पाईक. घरात वारीची परंपरा आहे. मूळ मराठवाड्यातील असलेले अशोक दादा २०१२ साली सॉफ्टवेअर क्षेत्रांत कार्य करण्यासाठी पुण्यात आले. परंतु या कामात त्यांचे मन रमले नाही आणि चाकोरीबद्ध आयुष्य न जगता काहीतरी वेगळं करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. स्वामी विवेकानंद, बाबा आमटे, प्रकाश आमटे यांच्या कार्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि स्नेहवन चे काम २०१७ साली पूर्णपणे सुरू झाले. 

२०१२-२०१७ मध्ये आपल्या पगारातील दहा टक्के रक्कम वंचित मुलांच्या शिक्षणासाठी ते देतच होतें आणि प्रसंगी शनिवार -रविवार वंचित, फुटपाथवर असणाऱ्या मुलांना शिकवायला देखील जात होते. पण विदर्भ, मराठवाड्यातील नैराश्यग्रस्त शेतकरी आत्महत्या करत असतांना त्यांच्या मुलांचे भविष्य कसे असेल या जाणीवेने ते अस्वस्थ होते आणि त्यातूनच स्नेहवनाची सुरुवात झाली. त्यांच्याशी बोलतांना त्यांनी काही छायाचित्र दाखवली आणि ती भीषण परिस्थिती बघून वाईट वाटले. आपण सुखासीन आयुष्य जगत असतांना आपल्या गावातील, प्रसंगी राज्यातील आपल्या भावावर दोन वेळ खाण्याची आबाळ असतांना शिक्षण तर दूरच आधी त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढून त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करायचे या उद्देशाने स्नेहवनाची सुरुवात झाली. खरंतर या दाम्पत्याचा लग्न करून गुण्यागोविंदाने संसार करण्याचा हा काळ पण 'आयुष्यभर कोणतीही तक्रार करायची नाही' या अटीवर अशोक दादा व अर्चना वहिनी दोघे विवाहबद्ध झाले. लग्न झाल्यावर अर्चना देशमाने यांनी २० मुलांच्या संसाराला आकार दिला. दहा बाय दहाच्या दोन खोलीत 'स्नेहवन' चालायचे, या दाम्पत्याचा हा संघर्ष डॉ. रवींद्र कुलकर्णी व त्यांची पत्नी अनुभवत होते. आणि त्यातूनच त्यांनी 'स्नेहवन'ला दोन एकर जमीन दिली. आळंदीजवळील कोयाळी फाटा येथील या जागेवर ही संस्था आता उभी आहे, खरंतर आज कुठल्याही शासकीय मदतीशिवाय या संस्थेत ५० मुलं एकत्र निवासी आहेत.

स्नेहवनात मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागांतील ५० निवासी मुले तसेच १३० वंचित घटकातील कचरा गोळा करणारी, भीक मागणारी दुसरी ते बारावीपर्यंतची मुले आहेत. स्वतःच्या ३ वर्षाच्या आनंदी या मुलीसह या १८० लेकरांचे हे तरुण दाम्पत्य मायबाप आहे. ही मुले बाहेरील शाळेत शिक्षण घेतात. संपूर्ण खर्च व जबाबदारी स्नेहवन उचलते आहे. आपल्यासारख्या दातृत्वाची भावना असलेली चांगली माणसं आज स्नेहवन बरोबर आहेत. १० ते ५ शाळा झाली की या वेळेनंतर 'स्नेहवन' म्हणजे जीवनशिक्षणाची कार्यशाळा, पुस्तकी ज्ञानाशिवाय कृतियुक्त शिक्षणावर अधिक भर देणारी आहे. येथे दहा गायींची गोशाळा आहे. त्याच्या व्यवस्थापनासह तीन हजार लीटर बायोगॅसची निर्मिती रोज होते. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी इथे १२ हजार पुस्तकांचे वाचनालय आहे. वाचलेल्या पुस्तकांवर मुले स्वतंत्र चर्चा करतात. मुलांनी झाड-वेलीसारखे फुलावे, बहरावे तसेच मुलांनी मुलांसाठी काम करावे ही व्यवस्था देशमाने दाम्पत्याने प्रेमाने निर्माण केली आहे. 

कोरोना काळात परिस्थिती बिकट होती पण ज्ञानेश्वर माउलीच्या कृपेने सगळं निभावले. प्रत्यक्षात अजून स्नेहवनात गेलो नाही पण जे ऐकलं त्यातून आता पुण्याला गेलो की सगळ्यात पहिले स्नेहवन ला भेट देण्याची मनस्वी इच्छा आहे. पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरातील मित्र यादीतील मित्रांना आग्रहाची विनंती आहे आपण आळंदी ला माउलींच्या दर्शनार्थ गेलात तर स्नेहवन ला आवर्जून भेट द्या. अशोक दादांच्या कार्याला सोबत करू शकलात तर त्यांना आनंद होईल. ही जगा वेगळी माणसं झुक्या दादामुळे या माध्यमातून प्रत्यक्षात अनुभवता आली त्याबद्दल त्याचे विशेष आभार आहे. स्नेहवनला आवर्जून भेट द्या. 

Snehwan- A Ray of Hope

संपर्क - अशोक देशमाने - स्नेहवन संस्था - आळंदी, पुणे
           8796400484 / 8237277615

✍️ सर्वेश फडणवीस

P.C - Shama Deshpande

Sunday, July 3, 2022

समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् !!

संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे सकल संतांचे लाडके संत ज्ञानेश्वर अर्थात माउली. गेली  ७२५ वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे; आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे सकल संतांचे आराध्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहे. 

ज्ञानदेव म्हणजे माय मराठीचे हृदय. निसर्ग हाच श्रीकृष्ण, जाणीव हाच अर्जुन, यांच्या संवादातला मर्माभ्यास ही ज्ञानेश्वरी. जाणिवेच्या पातळीवरील सखोल चिंतन ही चांगदेव पासष्टी. मननाचा मन:पूत महोत्सव हाच अमृतानुभव. मानसिक शुद्ध स्नान म्हणजे हरिपाठ. सगुण अनुभवाची कोजागिरी म्हणजे ज्ञानदेवांची भजने होत', अशा समृद्ध शब्दांत ज्येष्ठ अभ्यासक यशवंत पाठक यांनी संत ज्ञानेश्वरांचे आणि त्यांच्या साहित्याचे वर्णन केले आहे. मुळात माउली आणि आळंदी म्हंटले की मनात आत्मीयतेची वेगळीच भावना निर्माण होते. याच माउलींच्या संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आणि आषाढी एकादशी पालखी प्रस्थानाचे औचित्य साधत आपण संजीवन समाधी मंदिरातील गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत. 

ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार या दिवशी माउली समाधिस्थ झाले. खरंतर आळंदीचे नाव ऐकले की, ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यप्रेमाने ओसंडून जात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती एकदम डोळ्यांपुढे उभी राहते. सासरीअसलेल्या लेकीची, आईचे नाव ऐकले म्हणजे जी अवस्था होते, अगदी तशीच स्थिती तुम्हा आम्हा मराठी लेकरांची, श्रीज्ञानेश्वर माऊलींसंबंधी काही ऐकले की होते. मग तो मराठी माणूस सोलापूरचा असो, नाहीतर नागपूरकडील असो, उलट तो जितका दूर राहत असेल तितके त्याला ज्ञानेश्वर माउलींचे आकर्षण अधिक असते. 

आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या (राजगुरुनगर) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून हे नाव पडले. याचे कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने हिच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज तिच्या काठीच राहिले, तेव्हा ती ज्ञानोबा- तुकारामाची 'इंद्रायणी' म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसली. साधू हे तीर्थांना तीर्थत्व प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मूळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे. याचे अनेक पौराणिक संदर्भ ही सापडतात आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या ६४ व्या अध्यायात आळंदीची वारूणा, अलका, कणिका, आनंद व सिद्ध क्षेत्र अशी नावे आलेली आहेत. मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते; म्हणून या आळंदीस 'सिद्धेश्वर' म्हटलेले असावे. ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे. आजही हा संपूर्ण परिसर अतिशय देखण्या आणि सुस्थितीत आहे. 

श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ज्या इमारतीत आहे, त्याला 'देऊळवाडा' म्हणतात. या इमारतीचे आवार भव्य आणि प्रशस्त आहे. चारी दिशांना मोठ्या भिंती आहेत. दक्षिण बाजूखेरीज बाकीच्या तीन भिंतीत उंच दरवाजे आहेत. पूर्वेच्या बाजूस गणपती आहे म्हणून त्या बाजूच्या डावीकडील दरवाजाला 'गणेशद्वार' म्हणतात आणि आत उजवीकडे 'हनुमानद्वार' देखील आहे. पश्चिमेस नदी आहे. तेथून पूर्वी पाणी आणीत; म्हणून त्या दरवाजाला 'पाणदरवाजा' म्हणतात. उत्तरेकडील दरवाजाला 'महाद्वार' म्हणतात. त्या दारातून आपणास आत जाता येते आणि तेथून समाधी सन्मुख दिसते.

देवळात प्रवेश करताना एक गोष्ट चटकन डोळ्यांत भरते; ती ही की देवळाची जी पहिली पायरी आहे, त्या पायरीचे दर्शन सर्वजण प्रथम घेतात. भाविक वारकरी या पायरीवर पाय न ठेवता ती ओलांडून आत जातात. याचे कारण या पायरीच्या मध्यभागी हैबतबाबा या भक्ताचा देह विसर्जित केला आहे. पंढरपूरला विठोबाच्या देवळाच्या प्रवेशद्वारी जशी नामदेवाची पायरी आहे, तशीच ही हैबतबाबांची पायरी आहे. माऊलींचे भक्त देवळात जाताना त्या पायरीला वंदन करतात. 

तेथून पुढे गेल्यावर काळी तुकतुकीत घडीव शिळा दिसते. यालाच श्री ज्ञानेश्वर महाराजांची समाधी म्हणतात. याच्याखालील जागेत सुमारे सातशे वर्षांपूर्वी ज्ञानदेव स्वतःच्या पायाने चालत जाऊन आसन घालून ध्यानस्थ बसले. ती जागा बंदिस्त केल्यामुळे त्यांचा देह आपल्याला दिसू शकत नाही, पण तेथून ते भक्तांची काळजी वाहत आहेत याचे प्रत्यंतर हमखास येते. सन १७५० मध्ये पुरंदर येथील आंबेकर देशपांडे यांनी या जागेवर सध्याचा गाभारा बांधला. नंतर १८७१ मध्ये या गाभाऱ्यावर शिखर बांधण्याचे काम त्या वेळचे पुण्याचे प्रसिद्ध शिल्पकार नंदराव नाईक यांनी केले. १९७७ साली या गाभाऱ्यात बिर्लाशेटजींच्या जयश्री चॅरिटी ट्रस्टने संगमरवरी दगड बसवून दिला आहे. त्यामुळे गाभारा स्वच्छ व प्रसन्न दिसतो. या गाभाऱ्यात समाधीजवळ विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. 'सकळ - तीर्थाचिये धूरे' असणारी पूज्य माता- पितरे व अंतरंगातील दैवत ही दोन्ही एकाच मूर्तीत साठविली आहेत. या गाभाऱ्याच्या पूर्व दिशेला एक लहान दार आहे. त्या पलीकडे शेजघर आहे. या शेजघरात पूजा-अर्चा याचे साहित्य ठेवण्यात येते. 

समाधीचे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा करायची पध्दत आहे. पूर्व दिशेने या प्रदक्षिणेस आरंभ होतो. दारातून गेल्यावर लगेच एक हेमाडपंथी पद्धतीने बांधलेला मंडप लागतो. त्यात सोळा खांब आहेत. या मंडपात गणेशाची फार जुनी मूर्ती आहे. श्रीगणपती चे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर लगेच मुक्ताबाईचा मंडप लागतो. तेथे मुक्ताबाईचे देऊळ आहे. हा मंडप सन १८८१ मध्ये आळंदीचे साक्षात्कारी स्वामी श्रीनृसिंह सरस्वती महाराज यांनी बांधला. प्रदक्षिणा करीत आपण महाद्वारापाशी येताना तेथे सोन्याचा पिंपळ म्हणून जो प्रसिद्ध अजान वृक्ष आहे, तो वाटेत लागतो. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे महापुण्य या वृक्षापाशी उदयाला आले आणि तेथेच संन्यासी महाराजांची गाठ पडली. आणि या ससगळ्या भावंडांचा जन्म झाला. माउलींच्या माउलीचे हे तपश्चर्येचे स्थान आहे. ज्ञानरायाच्या देवळात या वृक्षाखाली जो बसतो त्याचा संसार सुखाचा होतो. ते सुख अक्षय अनंत असे आत्मसुख आहे. यावर सर्व वारकऱ्यांचा दृढ विश्वास आहे. आळंदी हे तीर्थस्थान आहे. माउलींच्या संजीवन समाधी मंदिरात गेल्यावर प्रेम, वात्सल्य आणि ममतेने मनात वेगळीच भावना निर्माण होते. लक्ष्य वारकरी ऊन,वारा,पाऊस यांची तमा न बाळगता जवळपास वीस दिवस आळंदी ते पंढरपूर पालखीत चालत जातात. आपणही आज मनाने आळंदीत माउलींच्या दर्शनार्थ जाऊ या. 

रामकृष्ण हरी. 


सर्वेश फडणवीस

 8668541181