आज देवशयनी आषाढी एकादशी. महाराष्ट्रातील सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. खरंतर कित्येक वर्षांआधी उत्पन्न झालेल्या पुराणांपासून आषाढी एकादशीला मानाचे स्थान देण्यात आले आहे. पंढरपूरचा श्रीविठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आजच्याच दिवशी भुवैकुंठ असलेल्या पंढरपूरात वैष्णवांचा मेळा जमला आहे. श्री हरी विठ्ठलाची गर्जना करत आणि रामकृष्ण हरी हा नामघोष करत लाखो वारकरी पंढपूरला पायी चालत आले आहेत.
परंतु पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भक्तांच्या भेटीसाठी पांडुरंग गुरुपौर्णिमेला विदर्भातील धापेवाड्यात येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच दिवशी पंढरपूरचे मुख्य मंदिरही बंद असते. विदर्भ पंढरी म्हणून आज धापेवाड्याची ओळखल्या जाते आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधत प्रति पंढरपूर म्हणून ज्याची ओळख सर्वदूर झाली आहे अशा विदर्भातील धापेवाडा या तीर्थक्षेत्रातील पांडुरंगाच्या गाभाऱ्यात दर्शनार्थ जाणार आहोत.
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री विठ्ठलाचे रुक्मिणी माते बरोबर असलेले हे मंदिर आणि श्रद्धेय कोलबा स्वामी या संताच्या पुनीत व पवित्र चरणस्पर्शाने अभिमंत्रित झालेले हे मध्ययुगीन काळातील मंदिर आहे. येथील चंद्रभागा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते मंदिराच्या बाजूची हिरवीगार झाडी, श्रीविठ्ठलांचे सुंदर प्रशस्त आणि नयनमनोहर मंदिर परिसर याने मन मोहवून टाकणारे आहे.
धापेवाडा गावाच्या बस स्टॅण्डपासून साधारण पाऊण कि.मी. वर हे पवित्र स्थान असून दर्शनीय कक्षेचा प्रचंड विस्तार असल्याने हे मंदिर लगेच मनात भरते. साधारण वर्षभर भाविकांनी गजबजलेले हे मंदिर म्हणजे एका चौकोनी वाड्यासारखे असून तटबंदीची भिंत सर्व वास्तुस आपल्या कवेत घेणारी आहे. आपण प्रवेश मार्गावर पोहोचल्यावर वरचे कठडे सुंदर सुशोभीत असून त्याचे समान आकार आहेत. व्हरांड्यात चहू बाजूंना अतीव सुंदर व प्रशस्त असे स्तंभ असून मंदिराचे सर्व वजन जणू त्यांनी पेललेले आहे. आत शिरताच प्रशस्त अशा ओवऱ्यांनी मंदिर पूर्णपणे सुसज्ज आहे. मध्यभागी श्रीविठ्ठलाचे मंदिर आहे. आजूबाजूला असणाऱ्या चार ही ओवऱ्यावर कदाचित प्राचीन काळी तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय असावी. आतल्या चौकात उतरण्यास पायऱ्या असून त्यातूनच चढून ओट्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. आता जीर्णोद्धार झाल्याने मंदिर प्रशस्त आणि अधिक देखणे झाले आहे.
आज या मंदिराचे नवीन रूप बघतांना देवदर्शनाच्या आधीच डोळे तृप्त होतात. लाकडी मेहरपी कमानी, लाकडी स्तंभ, त्यावरील सुशोभन, कोरीव छत त्यातून झुंबरे बघत या सभामंडपातूनच आपण आत गर्भगृहात जातो. आज सभामंडपाचा तळ मात्र आधुनिक टाईल्सनी सजविला आहे. यामुळे सभामंडपाची रंगसंगती तर इतकी आकर्षक आहे की, त्यातील रंगसंगती सूर्याच्या प्रकाशात अधिकच चकाकते. मंदिर पूर्वाभिमुख असल्याने सूर्यनारायण आपल्या किरणाने श्रीविठ्ठलरुखमाईस वेगळीच आभा निर्माण करतात. मंदिराच्या मधल्या भागातून आत गेल्यावर सुंदर मूर्ती बघायला मिळतात. कंबरेवर हात ठेऊन श्रीविठ्ठल उभे आहेत, सोबतीला जगन्माता रुक्मिणीही आहे. या मूर्ती अत्यंत सुंदर व लावण्यमयी आहेत. गर्भगृह, प्रदक्षिणा पथ तसेच कळस अतिशय प्रमाणबद्ध आहे. गर्भगृहास दक्षिणेकडूनही मार्ग आहे. गर्भगृहात गेल्याबरोबर आपण पंढरपुरात तर नाही, असा भास होतो. आज प्रवेश मार्गावर जीर्णोद्धार झाल्याने गर्भगृहाची शोभा अधिकच वाढली आहे. विठ्ठल - रखुमाई चे दर्शन घेताच मन प्रसन्न होतेच, पण एका वेगळ्याच भावविश्वात भक्त जातात.
नागपूर पासून अवघ्या २८ किमीवरील हे स्थळ म्हणजे श्रद्धेय श्रीकोलबा स्वामींचे जणू एक जिवंत स्मारकच होय. मंदिराच्या शेजारी स्वामींची जीवन चित्रे, काही पौराणिक चित्र, प्रसंग आदी अतीव सुंदर रुपात चित्रीत केलेली दिसतात. चित्रांचे भाव, रंगसंगती, प्रसंगानुरूप वस्तुनिष्ठता यांमुळे सर्वच चित्र भावस्पर्शी आहेत. या मंदिराची एक आख्यायिकाही सांगितली जाते. इ.स. १६५७ साली उमरेड तालुक्यात बेला या छोट्याशा गावी कोलाबा स्वामींचा जन्म झाला. ते पांडुरंगाचे निःस्सीम भक्त होते. वडील वासुदेव व आई देवकी म्हणजे ते भगवान श्रीकृष्णांचे वंशजच म्हणायचे. पंढरपुराची त्यांना प्रचंड ओढ होती, पण विठुरायांना त्यांनी धापेवाडा नगरी जावे अशी आज्ञा केली. धापेवाड्यास येताच त्यांचा संबंध धर्मशेट्टी बाबांशी झाला. पुढे ते आदास्यास त्यांना घेवून गेले व मकरंदपूरी गोसाव्यांच्या सान्निध्यात त्यांनी हे जग सोडले. कोलबा स्वामी अत्यंत व्यथित झाले. आदास्याच्या देवळात त्यांनी वर्षभर मुक्काम ठोकला. एके दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. कोलबाजी धापेवाड्यास जा, चंद्रभागेच्या बाहुली या विहिरीत मी तुला दर्शन देईन. स्वप्न खरे ठरले साक्षात परमेश्वरांनी त्यांना दर्शन दिले. सोबत उमाजी बाबा सुरतसिंह जमादार, विठ्ठलजी पेंढणे आदी संत होते. इ.स. १७४१ ला तेथे श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमांची प्राण प्रतिष्ठा झाली, कालांतराने पुढे नंदीघाट, रंगशाळा, सभामंडप आदी बांधण्यात आले. पुढे देवालयाचे अधिक बांधकाम श्रीगोविंदसिंह, सीतारामसिंह, वेळेकर, खोलकुटे, जमादार, गडकरी, निंबाळकर आदी भक्त यांनी केले. येथील श्रीविठ्ठलांच्या मस्तकी शिवपिंड असून ही मूर्ती स्वयंभू आहे असे म्हणतात.
आषाढी-कार्तिकी एकादशी, पौर्णिमा, प्रतिपदा या तिथींना तेथे यात्रा भरते. पायी दिंड्या येण्याचे हे विदर्भातील एकमेव स्थान आहे. श्रीभगिरथी बाई जमादार यांनी इ.स. १९०६ साली १२ चाकांचा सागवानी लाकडाचा रथ परमेश्वरचरणी अर्पण केला. पुढे रुद्र प्रतापसिंहांनी जुन्या माहितीच्या आधारे २००१ साली चित्रमय ग्रंथ लिहिला, त्यात एकूण २६ चित्रे आहेत. स्वयंभू विठ्ठल-रुख्मिणीच्या प्राण-प्रतिष्ठेनंतर २१ वर्षांनी वयाच्या १०५ व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि आजही त्यांच्या विशाल मठात ती जागृत समाधी आहे. पुढे हे स्थळ संतांचे जणू माहेरघरच ठरले. त्यात आडकुजी बाबा, आनंदीबाबा, घुसंत महाराज, वारामाई, ब्रह्मचारी महाराज, झेंडेवाले महाराज अशा अनेक संतांच्या परीसस्पर्शाने धापेवाडा पवित्र झाले. वर्षभराचे विविध कार्यक्रम, महापूजा, दिंड्यांची व्यवस्था, भोजन-निवास व्यवस्था, आदी सर्व सोई मंदिरांचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने करतात. त्यात महापूजेला येणाऱ्या अतिथींचे यथोचित स्वागत तसेच इतर सर्व कार्यक्रम अतिशय योजनाबद्ध होतात. अशा या विदर्भातील पंढरपुर असणाऱ्या धापेवाडा येथे सावळे सुंदर अशा श्रीविठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनार्थ एकदा नक्की जायला हवे.
रामकृष्ण हरी ..
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment