नागपूर - भंडारा रस्त्यातील हे अत्यंत रमणीय ठिकाण अंबानगरी अर्थात अंभोरा आहे. अति उंच कडा विदर्भात अंभोरे गावात असून याच पार्श्वभूमीवर त्यास कोलासुरानचे पहाड म्हणतात. आकाशात झेप घेणारे पक्षी हमखास सरळ चैतन्यश्वराच्या प्राचीन मंदिराच्या छतावर येऊन स्थिरावतात.वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं अंभोरा हे देवस्थान आहे त्यामुळे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक दृष्टीने हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. भरगच्च पसलेली झाडी, नद्यांचे विस्तृत पात्र, मऊशार रुपेरी वाळू आणि थोड्या अंतरावर टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि या निसर्ग सौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर बघताच सर्व दु:ख विसरायला लावणारे आहे. कदाचित म्हणूनच इथल्या महादेवाचे नावही चैतन्यश्वर आहे. कारण चैतन्य इथल्या कणाकणात ठासून भरल्याचे बघता क्षणीच जाणवते.
अंभोरा येथे पाच नद्यांचा संगम, मुकुंदराजाची समाधी, चैतन्यश्वरांचे पितळी कळस, धर्मशाळा, भूगर्भाचा तुटलेला कडा, नद्यांचे पाणी आणि घनदाट अरण्य असे निसर्गाचे अद्भुत दर्शन बघायला मिळते. या अंभोरा नगरीचे प्राचीन नाव अंबनगरी, त्याची झाली अंबानगरी व आता आपण तिचे आधुनिक नाव ठेवले श्रीक्षेत्र अंभोरा आहे. आपल्या मायमराठीचे आद्य ग्रंथ समजतात ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी. पण या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या १०० वर्षे आधी आपल्या विदर्भातील एका विद्वानाने "विवेकसिंधु" नावाचा ग्रंथ लिहिला. त्या विद्वानाचे नाव आहे मुकुंदराज. ते एका अर्थाने मराठीचे आद्य ग्रंथकार ठरतात. त्यांची भूमी श्री क्षेत्र अंभोरा आहे. अंभोऱ्यात अनेक पुरातन अवशेष आहेत. पण पूर्व दिशेच्या उंच कड्यावर असलेल्या श्रीचैतन्यश्वरांचे देऊळ त्या सर्व पुरावशेषात सर्वोत्तम असेच आहे. अंभोरा हे एका अर्थाने पाच नद्यांच्या संगामावरील बेट असून त्याच्या मध्यभागी पूर्व दिशेस उंच जाणाऱ्या पायऱ्यांनी वर चढत गेलो की, आपण त्या प्राचीन मंदिरात पोहोचतो. वरच्या माथ्यावरून जो निसर्ग सौंदर्याचा देखावा दिसतो तो शब्दांच्या पलीकडचा आहे.
माथ्यावरून खाली दिसणाऱ्या पाच नद्या हातात हात घालून वैनगंगेच्या कुशीत विसावतात. आपले पाणी एकजीव करतात. वैनगंगेच्या पात्रात कोट्यावधी वर्षांपूर्वी डोंगराची रांग होती. वैनगंगेच्या प्रवाहाने त्यात खिंडार पडली. त्यामुळे जगातील भूगर्भ शास्त्रज्ञ हा झालेला बदल पाहण्यास येथे येतात. देवस्थानच्या परिसरात उंचावरून वाहणारे वारे आपल्याला एका जागी खिळवून ठेवतात. चैतन्यश्वराचे मंदिर हे महादेवाच्या पुरातन मंदिरासारखेच आहे. पांढर्या चुन्याने रंगविलेले हे मंदिर दुरुनही लक्ष वेधून घेते. १२ वर्षाच्या महाव्रतानंतर ब्रम्हगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्यश्वर प्रगट झाले असे म्हणतात. त्यामुळे सर्व दु:ख विनाशक आणि सुखाचा वर्षाव करणारा इथला महादेव चैतन्यश्वर म्हणून भक्तप्रिय आहे.
प्रवेशद्वारातून आत जाताच पूर्वाभिमुख चैतन्यश्वराचा सभामंडप नजरेत भरतो. सभामंडपातून पूर्वेकडचे दृश्य केवळ कल्पनाचित्र असावे असे आहे. येथील स्तंभ संगमरवरी असून गर्भगृह छोटे आहे. हेमाडपंथी शैलीतील या मंदिराचे बांधकाम आहे. गर्भगृहात शिवाची जागृत पिंड असून काशीच्या विश्वनाथाचा अंश त्यात आहे. व तो एका दिव्य पुरुषाने श्रीहरिहरनाथ नावाच्या व्यक्तीने तो अंश आणला. चैतन्यश्वर मंदिर अत्यंत प्राचीन असून कळस हा द्रविडीय पद्धतीचा असून त्यावर उत्तर भारतीय प्रभाव स्पष्ट दिसते. गाभाऱ्यात शिवपिंडीवर पितळ्याचा पंचमुखी नागराज आहे. या मंदिरातील घंटेचा नाद जेव्हा आसमंतात निनादतो. तेव्हा विलक्षण अनुभूती जाणवते. स्वच्छ, सुंदर नीट नेटका परिसर बघून मन प्रफुल्लित होते. महाशिवरात्र, प्रदोष, श्रावण सोमवार व शिवपंचमीस प्रचंड मोठी यात्रा भरते.
या मंदिराच्या निर्माणाची एक कथा सांगितली जाते. या अंभोऱ्यात साधारणपणे हजारो वर्षांपूर्वी हरिहरनाथ नावाची व्यक्ती जन्मास आली. हरिहर जातीने ब्राह्मण होते. त्यांनी १२ वर्षे पाशुपत्य व्रत केले. काशीस अनुष्ठान केले. पट्टशिष्य रघुनाथ ऊर्फ रामचंद्र यांच्या समवेत ते व्रतस्थ राहिलेत. हरिहरांनी आपल्या अलौकिक शक्तीने मुकुंदराज नावाच्या ज्योतिषास प्रभावित केले. त्याची गंमत अशी, हरिहरचा शिष्य रघुनाथ माधुकरी मागण्यास मुकुंदराजांच्या घरी गेले व परतताना त्यांना म्हणाले, उद्या तुझा मृत्यू आहे. रघुनाथ घाबरले, कारण मुकुंदराज ज्योतिषी होते. (पण ज्योतिषाने कधीही कुणाचा मृत्यू सांगायचा नसतो. ती चूक त्यांच्याकडून झाली) रघुनाथाने हा प्रसंग गुरुंना कथित केला. घाबरू नको, मी चटईवर निद्रा घेईन. तू माझे पाय चेपत बस. झाले यम आले पण चटईला स्पर्श न करता यमदूत निघून गेले. दुसऱ्या दिवशी पुनः रघुनाथ 'ओम भवती भिक्षा देही' म्हणत मुकुंदाकडे आले. अरे तू जिवंत कसा? महाराज माझ्या गुरुंना विचारा. तुझे गुरु मृत्यू टाळू शकणारे गुरु आध्यात्मिक उंचीचे असले पाहिजे. मुकुंदराज आले आणि त्यांना शरण गेले. गुरुशिष्य संपर्कात पुढे त्यांनी शके १११० मध्ये विवेकसिंधु हा ग्रंथ लिहिला. आज त्यांच्या समाध्या तेथे सुस्थितीत आहेत.
अर्थातच वर सांगितल्याप्रमाणे पाशुपत्य व्रत समाप्तीनंतर हरिहरनाथांनी पंचनद्यांच्या संगमात यज्ञ केला. शिव प्रसन्न झाले हरिहरा मी लघुअंशाने अभोऱ्यात स्थिरावलो आहे असे म्हणून यज्ञ ज्वालेतून साक्षात शिवाने त्यांना दर्शन दिले, तेव्हापासून नाथसंप्रदायाची काशी असे या स्थळाचे नामाभिधान झाले. मुकुंदराज लिहितात, 'वैनगंगेच्या तीरी मनोहर अंबानगरी' येथे प्रकटले श्रीहरि जगदिश्वरा, विवेकसिंधु ग्रंथ प्रकट जाहला . संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या शंभर वर्षे आधी हा ग्रंथ जन्माला आला आहे,
चैतन्यश्वर मंदिर परिसरात धर्मशाळा, पटांगण, वृंदावन, पाकगृह, हरिनाथ-रघुनाथ समाधी, गणेश विठ्ठल रुख्मिणी नाथसंप्रदायी समाध्या जागोजागी आहेत. पुढे या स्थळाचा विकास ठवकर परिवाराने केला. या कार्यात त्यांना इतर भक्तांनी साथ दिली. तर असे या विदर्भाच्या काशीस व उंच कड्यामुळे रम्य वाटणाऱ्या अंभोरा नगरीचे दर्शन आपण घ्यायलाच हवे. मनोहर अंबानगरी व विवेकसिंधु ग्रंथाचे जन्मस्थान म्हणून हीच ती अंभोरा नगरी होय, येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान श्रीचैतन्येश्वर आपणा सर्वांना दीर्घ आयुरारोग्य देवो व आपल्या मनोकामना पूर्ण करो,हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment