Monday, January 30, 2023

◆ राष्ट्रांकुर - सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे - १९४८

भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीरचक्राचे तिसरे मानकरी सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे आहेत. त्यांचा जन्म २६ जून रोजी धारवाड जिल्ह्यातील हवेली या गावात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा बोर्डाच्या शाळेत झाले त्यानंतर पुढील शिक्षण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या चेंदिया या गावात झाले. त्यांचे वडील राघोबा राणे हे पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. रामा राघोबा राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नायक पदी नेमणूक झाली.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राणे यांची निवड कोर ऑफ इंजियनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये झाली. तेथे त्यांना सेकंड लेफ्टनंट म्हणून पद दिले गेले.

१९४८ च्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले आणि तेथून राजौरी कडे कूच केली. ८ एप्रिल, १९४८ ला सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे- बॉम्बे इंजिनीअर्स- यांना नौशेरा - राजौरी मैल क्र. २६ येथून अत्यंत डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्यावरचे सुरुंग आणि अडथळे काढून टाकण्याचे काम करण्यास सांगितले होते. त्या दिवशी अकरा वाजता 'नादपूर - दक्षिण' च्या जवळ, सेकंड लेफ्टनंट राणे आणि त्यांचे पथक, पुढील रस्त्यावर पेरलेले सुरुंग काढून टाकत, वाहतूक सुरळीत करण्याच्या कामास सुरुवात करण्यासाठी, रणगाड्याजवळ उभे होते. इतक्यात शत्रूसैन्याकडून त्या भागात गोळा फेक करण्यास सुरुवात झाली. त्यांच्या पथकातील दोन माणसे त्यात शहीद झाली आणि पाच जण जखमी झाले. राणेही त्यात जखमी झाले.

९ एप्रिलला सकाळी सहा वाजता त्यांनी पुन्हा कामास सुरुवात केली. दुपारी ३ वाजेपर्यंत ते काम करत होते. रणगाड्यांना जाण्यासाठी पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम पार पडले, तेव्हाच त्यांनी काम थांबवले. सशस्त्र फौजा पुढे निघाल्या तेव्हा तेही एका रणगाड्यात बसून निघाले. पुढे गेल्यानंतर त्यांना रस्त्यामधे पाईनवृक्षाचा अडथळा असल्याचे आढळले. त्यांनी लगेचच खाली उतरून, ते झाड उचलून बाजूला फेकून दिले आणि थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली. यावेळी संध्याकाळचे पाच वाजले होते. डोंगरातील रस्ता नागमोडी वळणावळणाचा होता. पुढच्या रस्त्यावरच्या अडथळ्यामधे रस्त्यावरचा छोटा पूलच उध्वस्त केला होता. सेकंड लेफ्टनंट राणे उतरून लगेच कामाला लागले. ते काम सुरु करणार इतक्यात शत्रूने मशीन गनमधून गोळ्यांचा वर्षाव सुरु केला. पण असामान्य धैर्य आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणाऱ्या राणेंनी पर्यायी मार्ग तयार केलाच आणि सशस्त्र फौजा पुढे निघाल्या. आता संध्याकाळचे सव्वासहा वाजले होते. सूर्यप्रकाशही कमी झाला होता रात्रीचा मुक्काम तिथेच होता आणि ११ एप्रिलला सकाळी सहा वाजता त्यांनी पुन्हा कामास सुरुवात केली. ११ वाजेपर्यंत चिंगासचा रस्ता बनवून वाहतुकीस खुला केला आणि त्यापुढचा रस्ता सुरक्षित करण्यासाठी ते सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले. राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले. या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांवर हल्ला केला आणि अधिक जखमी केले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याला आणि शत्रूच्या माऱ्याखाली केलेल्या परिश्रमांबद्दल त्यांना ८ एप्रिल १९४८ रोजी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. 

३१ जानेवारी २०२० ला बॉंबे सॅपर्सच्या स्थापनेला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात, श्रीमती राजेश्वरी राणे यांनी हे परमवीर चक्र त्यावेळेसचे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांना सुपूर्द केले. हे पदक घरी राहण्यापेक्षा लष्कराकडेच राहीले तर अधिकाऱ्यांना आणि जवानांना त्यातून प्रेरणा मिळत राहील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. युद्धानंतर राणे लष्करात राहिले आणि २५ जून १९५८ रोजी मेजर पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर १९५८ पासून ते ७ एप्रिल १९७१ पर्यंत राणे पुनर्नियुक्त अधिकारी म्हणून सैन्यात कार्यरत होते. १९७१ मध्ये त्यांनी पूर्ण निवृत्ती घेतली. पुढे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत. एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४ पासून २५ वर्षे सेवेत होते. कालांतराने कारवार येथे आयएनएस चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आजही सुस्थितीत आहे. त्यांच्या अद्भुत कामगिरी आपल्याला सदैव प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या स्मृतीस सादर अभिवादन.

- सर्वेश फडणवीस

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day3

Friday, January 27, 2023

◆ राष्ट्रांकुर - नायक जदुनाथसिंह - १९४९

भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि मरणोत्तर परमवीरचक्राचे दुसरे मानकरी नायक जदुनाथसिंह आहेत. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९१६ रोजी एका गरीब शेतकरी कुटुंबात कजुरी जि. शाहजहानपूर, उत्तर प्रदेश या खेड्यात झाला. आठ भावंड यांच्यात जदुनाथ हे तिसरे अपत्य होते. त्यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी झाले. बालपणी त्यांना कुस्तीचा आणि शरीरसौष्ठवाचा छंद होता, त्यामुळेच त्यांना हनुमानभक्त बाल ब्रह्मचारी हे बिरुद चिकटले आणि त्या बिरुदानुसार ते शेवटपर्यंत अविवाहित राहिले.

पुढे २१ नोव्हेंबर १९४१ रोजी फत्तेगढ येथे राजपूत रेजिमेंटमध्ये त्यांची निवड झाली. सुरुवातीचे एक वर्षाचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची राजपूत रेजिमेंटच्या क्रमांक एक बटालियनमध्ये नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी दाखविलेल्या शौर्य आणि नेतृत्व गुणांमुळे त्यांना नायक पदावर पदोन्नती मिळाली आणि ते सेक्शन कमांडर झाले.

१९४७ साली देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीर या भारताच्या अखत्यारीतील भागात घुसखोरांच्या नावाखाली छुपे युद्ध पुकारले. ६ फेब्रुवारी १९४८ रोजी ताइनधर येथील पहारा चौकी याचे नेतृत्व नंबर दोनचे नायक जदुनाथ सिंग यांच्याकडे होते. ती आघाडीची चौकी होती तरीसुद्धा संरक्षणार्थ फक्त नऊ जवान होते. चौकीचा ताबा मिळविण्यासाठी शत्रुसैन्याने जोरदार हल्ले केले; पण जदुनाथांनी उच्चतम धैर्याने आणि धीरोदात्त नेतृत्वाने तुटपुंज्या सैन्यबळावर लष्करी डावपेचांचा उपयोग करून शत्रुसैन्याला परतवून लावले. या धुमश्चक्रीत त्यांचे चार जवान जखमी झाले. त्यानंतर लगेचच दुसऱ्या हल्ल्यात संयमी जदुनाथांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने मोठ्या आणि आक्रमक अशा शत्रुसैन्याला नामोहरम केले; मात्र या हल्ल्यात सर्व जवान जखमी झाले होते. नायक जदुनाथांचाही उजवा हात दुखावला होता, तरीसुद्धा त्यांनी जखमी स्टेन गनरकडून स्टेनगन स्वतःकडे घेतली. शत्रू पाठीशी येऊन पोहोचला असतानाही त्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची तमा न बाळगता अत्यंत शांतपणे आणि धीराने सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी उद्युक्त केले. त्यांनी केलेला गोळीबार एवढा विध्वंसक होता की, होणाऱ्या पराजयाचे रूपांतर विजयात झाले.

नायक जदुनाथ या हल्ल्यात जखमी झाले होते; त्यांनी एकहाती प्रतिकार करण्याचा निर्धार केला आणि ते चौकीबाहेर आले आणि स्टेनगनने शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात शत्रुसैन्य पुरते गोंधळले व सैरावैरा पळू लागले; मात्र यावेळी जदुनाथांच्या छातीत आणि डोक्यात गोळ्या घुसल्या ते त्याठिकाणी पडले. या नॉन कमिशन्ड अधिकाऱ्याने शत्रूशी एकाकी लढत देऊन त्यावेळी विजयश्री खेचून आणली. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल ६ फेब्रुवारी १९४८ रोजी शहिद झालेल्या नायक जदुनाथ सिंग यांना भारतीय सेनेच्या सर्वोच्च परमवीरचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत पाकिस्तान युद्धात काश्मीरला पाकिस्तानपासून वाचवणाऱ्या सैनिकांच्या यादीत आजही नायक जदुनाथ यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 

- सर्वेश फडणवीस 

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day2








Tuesday, January 24, 2023

◆ राष्ट्रांकुर - मेजर सोमनाथ शर्मा - १९४७

परमवीर चक्राचे पहिले मानकरी मेजर सोमनाथ शर्मा आहेत. मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ साली हिमाचल प्रदेशातील दाढ येथे झाला. त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा सैन्यातील उच्च स्तरावरील अधिकारी होते. त्यांचे बंधू लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा व लेफ्टनंट जनरल विश्वनाथ शर्मा आणि बहीण मेजर कमला तिवारी यांच्यासह जवळपास संपूर्ण परिवारच सैन्यदलात आपली कामगिरी बजावत होते. देशभक्ती आणि शौर्य तर त्यांच्या रक्तातच भिनलेलं होते. नेतृत्व शौर्य आणि प्रतिकार करण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांमध्ये होती आणि म्हणूनच मेजर सोमनाथ शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य सैन्यदलात होते. 

कश्मीरमधील उत्तम कामगिरीमुळे त्यांना मरणोपरान्त परमवीर चक्राने गौरविण्यात आले. त्यांना पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना श्रीनगर विमानतळावर वीरमरण आले. ही घटना सन १९४७-४८ मध्ये भारत-पाक युद्धाच्या वेळेस कश्मीरमध्ये घडली. ते 4th बटालियन ( कुमाऊँ रेजिमेंट)मधे त्यावेळी सेवा देत होते .

३१ ऑक्टोबर १९४७ रोजी सोमनाथ शर्माची बदली श्रीनगरला झाली. त्यांच्या उजव्या हाताला हॉकी खेळताना दुखापत झालेली असूनही ते युद्धासाठी श्रीनगरला गेले. ३ नोव्हेंबर १९४७ रोजी सोमनाथ शर्मांच्या तुकडीला कश्मीर खोऱ्यातील बदगाम येथे लढण्याचे आदेश देण्यात आले. तेथे त्यांच्या तुकडीस पाकिस्तानी सैन्याने वेढा घातला. शर्मांना कळून चुकले पाकिस्तानी सेना येथून पुढे सरकली तर श्रीनगरचा विमानतळ धोक्यात येईल. त्यांनी धैर्याने शत्रूचा प्रतिकार करायचे ठरवले. त्याच दरम्यान एक तोफ गोळा जवळच फुटल्याने त्यांना वीरमरण आले. भारतीय सैन्याला उद्देशून त्यांचे शेवटचे वाक्य होते, "शत्रू ५० यार्डात आलेला आहे. आमच्यापेक्षा अनेक पटीने संख्या जास्त असून आम्हीं भयानक गोळीबारास सामोरे जात आहोत. मी येथून एक इंचही मागे सरकणार नाही. अगदी शेवटचा जवान आणि शेवटची गोळी असेपर्यंत येथे आम्ही लढत राहू".

या लढाईदरम्यान नं. १ बटालियन कुमाऊँ रेजिमेंट बदगामला पोहोचली व त्यांनी शत्रूचा हल्ला परतवून लावला. आपण ही लढाई जिंकून काश्मीर खोऱ्यासारखा स्वर्गाहुन सुंदर भाग जिंकून मिळवला परंतु मेजर सोमनाथ शर्मा यांच्यासारचे अवघे २४ वर्षांचे त्यांनी दिलेलं हे बलिदान नेहमीच सर्वश्रेष्ठ राहील. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले परमवीर चक्राचे मानकरी मेजर सोमनाथ शर्मा आहेत. आपल्या धीरोदात्त कामगिरीने त्यांनी भारतीय सेनादलामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या स्मृतीस सादर प्रणाम.

- सर्वेश फडणवीस

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day1

राष्ट्रांकुर..


भारतीय सैनिक शौर्य, निर्धार अन्‌ निष्ठा यांचे मूर्तिमंत प्रतीक. सियाचीनच्या -50 अंशापासून रणरणत्या वाळवंटाच्या + 50 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत, असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा हा सैनिक. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतो आणि म्हणून तुम्ही आपापल्या उबदार घरट्यात सुखाची झोप घेऊ शकता. तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा असा जो तो म्हणजे सैनिक आहे. जिद्‌द, चिकाटी आणि पूर्ण समर्पित होऊन कार्य करण्याची प्रेरणा सैनिकांकडून मिळतं असते. 

ज्या अभेद्य कवचामुळे आपण सुरक्षित आहोत ते कवच म्हणजे- सैनिक. कृष्णाच्या गीतेतील कर्मयोग्याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे- सैनिक. आपले घर उन, वारा, पाऊस या सर्वांपासून रक्षण करते त्याप्रमाणे सैनिक स्वतःला मृत्यूच्या दाढेत ढकलून आपल्या देशाचे शत्रूपासून रक्षण करतो. असा हा सैनिक सर्वांना कळला पाहिजे. सैनिक या व्यक्तिरेखेला अनंत पैलू आहेत. हे पैलू जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्राच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी त्यांच्या बलिदानाची आठवण काल पराक्रम दिवसाच्या निमित्ताने मा. पंतप्रधानांनी स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. भारताच्या गौरवशाली इतिहासातील असे शहीद म्हणजे परमवीरचक्र मिळवणारे २१ पराक्रमी वीर आहेत. या शौर्यगाथा आपल्या सर्वांनाच राष्ट्राचा विचार करून आपली सर्वोच्च कृती करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ठराव्यात यासाठी या समकालीन नायकांना या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. 

सैन्यदलाबद्दल आणि पर्यायी सैनिकांबद्दल नितांत आदर, अभिमान, श्रद्धा, विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा, ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही, आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. खरंतर राष्ट्र ही संकल्पना आपल्या सर्वांच्या मनात सदैव तेवत रहावी आणि त्यानुसार आपली कृतीही व्हावी यासाठी २१ दिवस या राष्ट्रांकुरांची ही लेखमाला लिहिण्याचा प्रयत्न करतोय. चला तर मग, हा राष्ट्रभक्तीचा अंकुर आपण आपल्या मनात जतन करू, जोपासू आणि वेळ येईल तेव्हा राष्ट्रर्पण करू. आदरणीय अनुराधा प्रभुदेसाई अर्थात सगळ्या सैनिकांची अनुमावशी यांच्या 'सैनिक' पुस्तकातील या ओळी मला प्रचंड आवडतात, 

माघारी जेव्हा जाल परतून,
ओळख द्या आमची त्यांना 
आणि सांगा,
तुमच्या 'उद्या' साठी आम्ही आमचा 'आज' दिला.

 सर्वेश फडणवीस

#rashtrankur  #ParamVirChakra

Tuesday, January 17, 2023

मध्यवर्ती संग्रहालय अर्थात सेन्ट्रल म्युझियम चे आत्मकथन..


नमस्कार मंडळी. आज माझं मन मोकळं करण्याचा प्रयत्न करणार आहे. खुप वर्ष झाले, काही क्षण विस्मृतीत गेले आहेत पण तरीही जे आठवतंय ते तसंच सांगायचा प्रयत्न करतोय. 

मी मध्यवर्ती संग्रहालय अर्थात काहींच्या भाषेत सेन्ट्रल म्युझियम. माझा जन्म स्वातंत्र्याच्या पूर्वीचा. त्या काळी मध्य प्रांतातील सिव्हिल लाईन्स भागात गेली १५८ वर्षे झाली याच जागी स्थिर आहे. अनेक बदल माझ्या डोळ्यादेखत बघितले मग तो रस्ता रुंदीकरण असो किंवा वैयक्तिक बदल असो. आज भारतात ज्या संंग्रहालयाच्या स्थापनेला १५० पेक्षा जास्त वर्षे पूर्ण केली आहेत, अशा मोठ्या १० संग्रहालयात ‘मध्यवर्ती संग्रहालय’ नागपूर म्हणून माझा चौथा क्रमांक लागतो. स्थापना म्हणाल तर सन १८६३ रोजी आणि आता महाराष्ट्रातील सर्वात जुनी म्हणजे वयाने सगळ्यात मोठी आहे. माझ्या स्थापनेच्या बाबतीतली पहिली बैठक २७ ऑक्टोबर १८६२ साली झाली. या इमारतीचा नकाशा कॅप्टन कोब यांनी तयार केला. सर रिचर्ड टेम्पल हे नागपूर प्रांताचे आयुक्त असताना सन १८६३ मध्ये या संग्रहालयाचा अर्थात माझा रीतसर पायाभरणी समारंभ झाला आणि पुढे स्थापना झाली. सन १८६३ पासून आजपर्यंतच्या दीडशेपेक्षा अधिक वर्षांच्या कार्यकाळात मी अनेक बदल बघितले आहेत. भारतातील जुन्या संग्रहालयापैकी एक मी असल्याने माझ्याकडे विविध प्रकारचे पुरावशेष, शिल्पे, चित्रे, प्राणी संग्रहित आहेत आणि त्यांच्या आधारावरच माझ्या विविध दालनाची रचना करण्यात आली आहे. 

सध्या माझ्या संग्रहालयात विभिन्न विषयांची दहा दालने आहेत. पहिला पक्षी विभाग या विभागात निरनिराळ्या प्रकारचे पक्षी ठेवण्यात आले आहेत. आशिया, युरोप आणि अमेरिकेतील काही पक्षी आहेत. हे पक्षी कॅप्टन बकमफिल्ड यांनी १८७३ साली मला दिलेत. पुढे प्राकृतिक इतिहास दालन आहे ज्यात भूगर्भीय प्रारूपातील खनिजे, जीवाष्मे, हाडे आणि संबंधित वस्तू ठेवल्या आहेत. सस्तन प्राणी दालनात मांसाहारी आणि शाकाहारी प्रकारातील विविध वन्यप्राण्यांचे आकर्षक प्रदर्शन भरले आहे. 

पुढे गेल्यावर शस्त्र दालन आहे ऐतिहासिक काळात युध्दात वापर होणाऱ्या विविध शस्त्र प्रकारातील हत्यारे या दालनांत प्रदर्शित केले आहेत, यामध्ये मुघल, मराठा, शीख, ब्रिटिश आणि आदिवासी काळातील शस्त्रे प्रदर्शित केली आहेत. पुढे गेल्यावर शिल्पकला दालन आहे. त्याच्या समोर पुरातत्त्वीय विभागातील महत्त्वाचे दालन आहे. या दालनात प्राचीन काळ इसवी सन पहिले-दुसरे शतक ते इसवी सनाच्या १७ व्या शतकापर्यंतचे शिल्प प्रदर्शित करण्यात आले आहेत. वाकाटकांनी विदर्भासह मध्य भारतात इ.स. २५० ते इ.स. ५०० पर्यत राज्य केले. वाकाटक राजे कलेचे भोक्ते होते आणि त्यांनी विपुल प्रमाणात शिल्पकलेला प्रेरणा दिली आणि त्यांची ठराविक शिल्पे इथे प्रदर्शित केली आहे. 

नागपुरातील गोंड आणि भोसले काळातील शिल्पे देखील येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. पुढे पुरातत्त्व दालन आहे ज्यात मानवी विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या प्राचीन दगडी हत्यारे, ताब्यांची आणि लोखंडी हत्यारे येथे रचून ठेवलेली आहेत. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी मानव किती प्रगत होता याची प्रचिती या पुरावशेषांद्वारे आपल्याला सहज होते. या सोबतच दुर्मिळ पोथ्या, प्राचीन विदर्भातील आणि भारतातील नाणी येथे आहेत. पुढे हस्तकला दालनाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये पितळी धातूच्या विविधोपयोगी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. थोडं पुढे चित्रकला दालन आहे आणि हे विदर्भातील चित्रकलेचे प्रदर्शन असणारे एकमेव दालन आहे. या चित्रकला दालनाची मांडणी, आता आधुनिक पध्दतीने केले आहे. जसं पुढे जातो मग पुढे गेल्यावर आपण नागपूर वारसा स्थळांच्या दालनात जातो . यामध्ये गतवैभवाची साक्ष पटवून देण्यात प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारके महत्त्वाची भूमिका पार पाडतात. याच वारशाचे महत्त्व तुम्हा सगळ्यांना पटवून देण्याकरिता छायाचित्रांच्या साहाय्याने प्रदर्शन या दालनात मांडण्यात आले आहे. पुढे गेल्यावर आदिवासी दालन आहे आपल्या आदिवासींची संख्या मध्यप्रांतात प्रामुख्याने दिसून येते. त्यांचे सण, परंपरा, रूढी, चालिरीती, सामाजिक आणि धार्मिक पध्दतीचे अवलोकन आधुनिक काळात अतिशय महत्त्वाचे ठरते. जातांना समोर गॅलरीमध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळापर्यतचे अनेक शिलालेख ठेवले आहे. तसेच संग्रहालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत विविध शिल्पे याशिवाय विदर्भातील उत्खननातील संंस्कृतीच्या पाऊलखुणा आजही सुस्थितीत ठेवले आहे. 

माझ्यात कालांतराने बदल होत गेले. पूर्वी मी तसा शहराच्या बाहेरच शांत ठिकाणी होतो. अनेकजण मला भेटायला स्वतःहून येत होते. सुट्टीच्या दिवशी तर बिलकुल वेळ पुरत नव्हता. पण आता कुणी जास्त इकडे फिरकत नाही. मी रोज सकाळी १० वाजता तयार होऊन तुम्हा सर्वांची दिवसभर वाट बघतो पण १-२ माणसं सोडली तर आता कुणीही येत नाही. आजही राष्ट्रीय सणांना मला छान नटून थटून तयार केले जाते. तेव्हा माझा उत्साह नेहमी सारखाच असतो. आता शहराचा कायापालट झाला आहे. माझ्या अगदी समोर मेट्रो स्टेशन झाले आहे. मी ते माझ्या जागेतून बघत बसते आणि वाटतं कुणीतरी येईल मला भेटायला, माझ्याशी हितगुज करायला पण हल्ली कुणाला वेळच नाही इथे यायला. मध्यंतरी सर्वेश त्याच्या मावशी ला घेऊन आला आणि त्याच्याशी निवांत गप्पा मारत असतांना माझे हे आत्मकथन मांडले. त्याने शब्द दिला की जमेल तेव्हा तो येईल..जमलं तर तुम्ही पण या..छान गप्पा मारू आणि माहितीचा खजिना माझ्याकडे आहेच..तो वेळोवेळी रिता करत जाईलच..या मग..वाट बघतोय...

- सर्वेश फडणवीस

Thursday, January 12, 2023

◆ देशप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक

 

स्वामीजींचे जीवन चरित्र वाचतांना त्यांच्या कुठल्या पैलूला स्पर्श केला तरी अद्भुत आणि एकमेवाद्वितीय असेच स्वामीजी होते हे सदैव जाणवतं. स्वामीजी एकदा स्वत: संबंधी बोलताना म्हणाले होते की ते "घनीभूत भारत" आहेत. त्यांचे भारत प्रेम इतके प्रगाढ होते की ते देशप्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक ठरले. भारत आणि विवेकानंद असे अद्वैत निर्माण झाले. 

भगिनी निवेदितांच्या शब्दांच्या प्रतिध्वनीतून हीच धारणा दिसून येते. त्या म्हणतात "भारतासाठी स्वामीजींच्या भावना तीव्र प्रेमाच्या होत्या. त्यांच्या रुधिरात भारताची स्पंदने जाणवत असत. त्यांच्या नसानसांतून भारताचे ठोके ऐकायला येत असत. भारत त्यांचे मनोराज्य होते किंवा दिवास्वप्न असावे. त्यांना भारताचीच स्वप्ने पडत असत. इतकेच नव्हे तर ते स्वतः भारतच होत असत. स्वामीजी म्हणजे जणू काही रक्तमांस देहधारी भारताचे मूर्तिमंत स्वरूप होत! तेच भारत होते, ते इंडिया होते. ते भारताच्या आध्यात्मिकतेचे, पावित्र्याचे, ज्ञानाचे, सामर्थ्याचे, दूरदृष्टीचे आणि विधिलिखिताचे प्रतीक होते. "

स्वामीजींच्या जीवनाचा अभ्यास करताना, ते सर्वच क्षेत्रांत असामान्य होते ही गोष्ट आपल्याला मान्यच करावी लागते. भारतावर इतके निःसीम प्रेम करणारा, देशाविषयी अत्यंत स्वाभिमानी असणारा आणि देशाच्या भल्यासाठी इतका झटणारा असा दुसरा कुणीही नव्हता आणि नाही. त्याचबरोबर अकार्यक्षम आणि घाबरणाऱ्यांवर तुटून पडणारा आणि फटके मारणारा देखील दुसरा कुणीही नव्हता. ह्या दोन्ही टोकांच्या भूमिका ते धारण करू शकले कारण त्यांना भारतीयांची मानसिकता कळली होती. एक प्रेमळ माता जसे बाळाचे मन जाणत असते आणि बाळापेक्षा जास्त त्याची गरज तिला कळत असते, अगदी त्याचप्रमाणे स्वामीजींनी भारताला जाणले होते. स्वामीजींच्या विचारांतून भारताचे परिपूर्ण रूप दिसते. भूतकाळ समजतो, वर्तमानाचे महत्त्व उमगते आणि भविष्यकाळ खुणावतो. म्हणूनच रवींद्रनाथ टागोर रोमांरोलां ह्यांना म्हणाले होते, “तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंदांचा अभ्यास करा." 

सर्वेश

Monday, January 9, 2023

मज आवडते ही मनापासुनी शाळा..

मज आवडते ही मनापासूनी शाळा 
लाविते लळा ही जसा माउली बाळा 

बालभारतीच्या पुस्तकातील प्र.के अत्रे यांची ही कविता. शाळेत जाऊन आल्यापासून मनात सतत रुंजी घालत होती. शाळा हा शब्दच किती आनंद देणारा आहे. शाळा शाळेच्या आठवणी, शाळेतील शिक्षक, शाळेतील मित्र कुठेही भेटले तरी जो आनंद होतो तो वर्णन करण्याच्या पलीकडचा असतो. शाळेत असतांना असं वाटायचं की पटकन मोठं व्हायचे. नको तो अभ्यास, नको ती शाळेची कटकट आणि नको त्या परीक्षा पण तेच शाळेत एखादा कार्यक्रम असला की शाळेत जाण्याचा उत्साह थोडा जास्त असायचा आणि यावेळी पण त्याच उत्साहात शाळेत गेलो. शाळेत बदल झाला होता. बदल म्हणजे रंग, नव्या इमारती, स्वच्छता, नव्या प्रयोगशाळा पण नाविण्याचा स्वीकार करतांना शाळेने आपले जुनेपण आजही जपून ठेवले होते. बरेच शिक्षक आता निवृत्त झाले आहेत त्यामुळे नवे शिक्षक आणि त्या नव्या शिक्षकांच्या प्रति नव्या विद्यार्थ्यांचा आदरही तसाच होता आणि हे बघून समाधान वाटले. मराठी शाळेतील आपुलकी आणि व्यक्ती निर्माणाची प्रक्रिया ही जरा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. कारण आजही माझ्या शाळेत १५०० विद्यार्थी शिक्षण घेतात यातच शाळेचे वेगळेपण अनुभवता येतं आहे. 

जे संस्कार शाळेने केले ते शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही ही शाळेची ताकद असते. ज्या वयात प्रार्थना, काही स्तोत्रे, पसायदान, वंदे मातरम शाळेने शिकवले त्याची आजही आवर्जून आठवण येते. शाळेतील स्नेहसंमेलन आणि इतर खेळाचे सामने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा आणि आनंद काही औरच होता. आजही तीच ओळख अनेक शाळांनी जपली आहे त्यात केशवनगर माध्यमिक विद्यालय अग्रस्थानी आहे आणि कायमच राहील हे नुकत्याच आलेल्या अनुभवातून लिहितोय. 

शाळेत असतांना शिक्षकांचा वेगळाच धाक आणि शिस्त होती. तसे  सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागतात. जर मस्ती केली आणि अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ती त्यांची एक जबाबदारी असते आणि कर्तव्यही. कारण याच त्यांच्या शिस्त आणि कर्तव्यातून उद्याचा एक चांगला नागरिक तयार होणार असतो. सगळेच शिक्षक तत्परतेने आणि जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतात. सगळ्याच विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल मान-सन्मान असतो आणि तो आजही राखला आहे. आज या माध्यमातून अनेक शिक्षक जुळले आहेत आणि त्यांच्याशी प्रसंगी बोलतांना आजही लहान व्हावेसे वाटते आणि पुन्हा शाळेत आणि वर्गातील बेंचवर बसावेसे वाटते खरंतर शाळेत आणि वर्गात गेल्यावर जेव्हा सरांनी फोटो काढला त्यावेळी नकळत डोळेच पाणावले आणि सहज वाटून गेलं की लहानपण देगा देवा. आजही आपल्या जवळपास राहणारे शिक्षक भेटले आणि त्यांची आपली प्रत्यक्ष भेट जरी झाली तरी आनंदच होतो आणि त्यांना आपली प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणतात. आम्ही शिकविले आणि तुम्ही शिकलात म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात. कारण त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी आणि अभिमान वाटतो.

शालेय शिक्षण पूर्ण होऊन १४ वर्षे आणि अधिक उलटली. पण शाळेतल्या आठवणी तशाच आहेत. शाळा आणि शाळेतील शिक्षक हे रसायन कायमच वेगळे असतात. आजही शाळेच्या आठवणीत प्रत्येकजण रमून जातो. ही आठवणींची साठवण कायम असते. कारण शाळा आणि शाळेच्या आठवणी या प्रत्येकाला हव्याहव्याशा असतात. जेव्हा शाळेत गेल्यावर समोर विद्यार्थी गणवेश घातलेले बघितले आणि सहज भूतकाळातील शाळेचे दिवस आठवले आणि पुन्हा त्या आठवणींच्या गावी काही वेळ स्थिरावत पुढच्या कामाला लागतो. कारण शाळेचे ते दिवस परत येत नाही पण आठवणींच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात असतात आणि याच कवितेत कवी म्हणतात, 

पसरवा नाव शाळेचे,चहूकडे 
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा 
जी देशासाठी तयार करिते बाळा 
लाविते लळा ही, जसा माउली बाळा
मज आवडते मनापासुनी शाळा 
 
✍️ सर्वेश फडणवीस

Keshavnagar High School,Nagpur