Tuesday, June 29, 2021

शाळेच्या सुखद आठवणी !!

आज स्थानिक दैनिकात हा pic बघितला आणि काहीं काळ बघतच राहावंसं वाटलं. सद्य परिस्थिती जरी वेगळी असली तरी शाळा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी शाळा आणि त्याच्या आठवणी या कायम हृदयाच्या एका कुपीत असतात मग शाळेतील कुणीही, कुठेही आणि कधीही भेटले तर त्याचा सुगंध कायम दरवळवत असतो. शाळेविषयी वाटणारी आत्मीयता प्रत्येकात लपलेली असते यात शंका नाही आणि ही आत्मीय भावना चिरकाळ टिकणारी सदैव नित्यनूतन मनस्वी आनंद देणारी असते.

शहरातील शाळा म्हणजे काही मजल्यांची विस्तीर्ण,मोठी इमारत असतें. चारी बाजूंनी वर्ग व मध्ये भले मोठे प्रशस्त मैदान की त्या प्रशस्त मैदानात राष्ट्रगीत पासून खेळायचे तास आणि स्नेहसंमेलन पण व्हायचे. केचे सरांच्या मार्गदर्शनाखाली कब्बडीचे,मल्लखांब, रोपमल्लखांब, उंच उडी, गोळा फेक असे सामने व्हायचे. त्यावेळी मैदानाच्या दोन बाजूंना वर्ग व मोठी झाडे होती. पर्यावरणाच्या कल्पना वझलवार मॅडम त्यासाठी आग्रही असायच्या. मग राखी पौर्णिमेला झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सारखा उपक्रम ही आनंदाने साजरा होताना वेगळीच मजा होती आजही तो उत्साह  आठवणीत आहे.

दर शनिवारी सकाळची शाळा आणि चार तास असायचे ती सकाळची शाळा पण खूप छान वाटायची त्यात योगा, कवायत, डंबेल्स व लेझिम शिकवले जायचे. वाद्यांच्या सुरात कवायतीचे प्रकार व्हायचे ते नुसते आठवले तरी मन सुखावून जाते. आजच्या शाळांचे वेळापत्रक वेगळे आहे पण तरी पुन्हा ते दिवस येतील हा विश्वास आहे. सध्याची पिढी हे सगळं मिस करते आहे पण हे ही दिवस जातील आणि पुन्हा नव्याने शाळा सुरू होतील. दप्तर, पुस्तकं,वॉटरबॅग,डबा वगरे घेऊन शाळेत जातांनाचे दिवस वेगळे होते आणि त्याचे वेगळेपण कायमस्वरूपी राहील.

वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे। 
सहज हवन होते नाम घेता फुकाचे। 
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह, 
उदभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म।

ही प्रार्थना व्हायची आणि मग एकत्र डबे खाणे व्हायचे. जे संस्कार शाळेने केले ते शेवटच्या श्वासापर्यंत विसरत नाही ही शाळेची ताकद आहे. ज्या वयात प्रार्थना काही स्तोत्रे,पसायदान, वंदे मातरम शाळेने शिकवले त्याची आजही आवर्जून आठवण येते. शाळेतील स्नेहसंमेलन आणि इतर खेळाचे सामने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा व आनंद काही औरच होता.आजही तीच ओळख अनेक शाळांनी जपली आहे त्यात केशवनगर माध्यमिक विद्यालय अग्रस्थानी आहे आणि कायमच राहील.

शाळेत असताना मुख्याध्यापक म्हणून पाचपोर सरांचा एक वेगळाच धाक व शिस्त होती. तसे आमचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. जर मस्ती केली व अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ती त्यांची एक जबाबदारी होती. कारण याच त्यांच्या शिस्त व कर्तव्यातून उद्याचा एक चांगला नागरिक तयार होणार होता. सगळेच शिक्षक तत्परतेने व जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असत. सगळ्याच विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल मान-सन्मान होता व तो आजही राखला आहे. आज या माध्यमातून अनेक शिक्षक जुळले आहेत आणि त्यांच्याशी प्रसंगी बोलतांना आजही लहान व्हावेसे वाटते आणि पुन्हा शाळेत आणि वर्गातील बेंचवर बसावेसे वाटते. आपल्या जवळपास राहणारे शिक्षक आजही भेटले व त्यांची आपली प्रत्यक्ष भेट जरी झाली तरी आनंदच होतो व त्यांना आपली प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणतात. आम्ही शिकविले व तुम्ही शिकलात म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात. कारण त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी व अभिमान वाटतो.

शालेय शिक्षण पूर्ण होऊन १४ वर्षे व अधिक उलटली. पण शाळेतल्या आठवणी तशाच आहेत. १५ ऑगस्ट व  २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांना शाळेचे रूप वेगळेच असायचे. शाळा आणि शाळेतील शिक्षक हे रसायन कायमच वेगळे असतात. आज आभासी जगात शाळेतील अनेक मित्र,मैत्रिणी,शिक्षक जेव्हा भेटतात तो आनंद निराळाच जो प्रत्येक जण बऱ्यापैकी अनुभवत असतो. आधी भेट होते पुढे नंबर एकमेकांना दिल्या जातात आणि सध्या व्हाट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून शाळेतील मित्रांचा ग्रुप बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतोच. आता भेटीचे रूपांतर पुन्हा गाढ मैत्रीत होत शाळेच्या आठवणीत प्रत्येकजण रमून जातो. ही आठवणींची साठवण कायम असते. कारण शाळा आणि शाळेच्या आठवणी या प्रत्येकाला हव्याहव्याशा असतात. आता पुन्हा नव्यानं शाळा सुरू झालेल्या आहेत. पण सद्यस्थितीत ऑनलाइन शाळा सुरू आहेत. जेव्हा लहान मुले,सायकलवर गणवेश घालून जाणारी मुलं बघितली आपल्याला आपुसक आपले शाळेचे दिवस आठवतात आणि पुन्हा त्या आठवणींच्या गावी काही वेळ स्थिरावत आपण पुढच्या कामाला लागतो. कारण शाळेचे ते दिवस परत येत नाही पण आठवणींच्या माध्यमातून कायमस्वरूपी स्मरणात असतात.
 
✍️ सर्वेश फडणवीस 

Keshav Nagar #शाळा #केशवनगर

Wednesday, June 23, 2021

जाणता राजा !! 🚩🚩

जेष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. महाराजांनी सर्व श्रेष्ठ पुरुषांचे पूजन करून दक्षिणा व वस्त्रे अर्पण केली, आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, आज त्यांच्या शिवबाचा राज्याभिषेक होता, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्या माउलीला कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. सुवर्ण चौरंगावर महाराज व सोयराबाईसाहेब बसले, सप्तनद्यांच्या जलाने त्यांचा महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर राजांनी राजपोषाख चढविला, अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णुंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबियांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे साडेचार वाजले होते, सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायऱ्या चढतांना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, “क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय” अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रुंच्या धारा वाहू लागल्या. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते, ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला “औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.” पन्नास वर्षांपासून जिजाऊ पाहत असलेले स्वप्न शिवबाने आज पूर्ण केले होते, मातेच्या ममतेचे पांग फेडून राजे हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले होते. राजे सिंहासनावर आरूढ झाले व एकेकाने त्यांचे अभिनंदन करण्यास प्रारंभ केला. कविराज भूषण यांनी आपल्या खास शैलीत दरबारात आनंदकाव्य सादर केले.

“इंद्र जिमी जंभ पर, वाडव सुअंभ पर |
रावण सदंभ पर, रघुकुल राज है ||१||
पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर |
ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है ||२||
द्रावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर |
भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है ||३||
तेजतम अंस पर, कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंच्छ बंसपर, शेर सिवराज है ||४||

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरु झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले होते, विजय खेचून आणला होता. ही विजयश्री पाहून इतरांचा स्वतःवरील विश्वास वाढला. आज हीच विजयश्री आपण पुढच्या पिढीला देताना स्वतःला भाग्यवान असंच समजायला हवं. 

#हिंदू_साम्राज्य_दिन  #राज्याभिषेक_दिन
 #छत्रपती_शिवाजी_महाराज #श्रीमंतयोगी

Saturday, June 19, 2021

तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद..

भगवति तव तीरे नीरमात्राशनोहं विगतविषयतृष्ण:कृष्णमाराधयामि  
सकलकलुषभंगेस्वर्गसोपानसंगे 
तरलतरतरंगे देवि गंगे  प्रसीद।। १।। 

श्रीमद आदि शंकराचार्य यांचे हे गंगाष्टक. हे अष्टक ऐकतांना, म्हणतांना सुद्धा आपण आपल्या स्थानाववरून गंगेच्या काठावर असल्याचा तो गंगेचा प्रवाह अनुभवू शकतो इतकी विलक्षण रचना त्यांनी केली आहे. 

गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय,काव्यमय वर्णन करणे तसे सोपें नाही. श्रीमद आदि शंकराचार्य आणि थोरले स्वामी महाराज अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी प्रत्येक नदीवर स्तोत्र रचले. गेय आणि विशिष्ट छंदात असलेल्या रचना आजही अनेकांच्या ओठी आहेत. थोरले स्वामी महाराज वर्णन करतांना म्हणतात, 

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।।

अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ,अविरल वाहते आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले,गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. मागच्यावर्षी काहीकाळ सगळं स्तब्ध झाल्यावर गंगेचा स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आपण बघितला आहे. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य,शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात , 'गंगा मैय्या की जय!'

स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान पहिल्यांदा घडले. खरंतर तो अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका विलक्षण आहे. प्रयागराज कुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारी होती. प्रयागराज ला राहिल्यावर गंगेत डुबकी मारल्यावर दुसऱ्या दिवशी काशीत पोहोचलो. दशाश्वमेध घाटावर गंगेचे पुन्हा दर्शन घेतले दिवसभर काशी पालथी घातली पुन्हा सायं आरतीसाठी गंगेच्या काठावर येऊन बसलो. देव,देश,धर्माच्या सीमा ओलांडलेली शेकडो माणसं तिथं बघितली आणि मनात एक क्षण विचार आला की खरंच गंगा किंवा नदी महात्म्य हे अभ्यासनीय आहे. सूर्यास्तानंतर काही क्षणांत दिव्यांच्या झमगटात गंगेची आरती सुरू झाली. गंगेचा प्रवाह शांत असला तरी सायं आरतीच्यावेळी गंगेच्या पाण्यात वेगळेपण जाणवत होते. ते बघितले आणि मनःशांती या शब्दाची ताकद अनुभवली. 

व्रतनिष्ठ, तेजोमूर्ती,चारित्र्यसंपन्न, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला. पतीतपावनी गंगा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. संत कबीर यांच्या गंगेच्या काठावरील रचना असो किंवा मग जगन्नाथ पंडित यांची गंगा लहरी म्हणजे तर गंगेचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहे. असेच मध्यंतरी सौ.धनश्री  यांची गंगालहरी वरील प्रवचने ऐकली. गंगादशहरा निमित्ताने गंगालहरी वरील तीन प्रवचनांचे पुन्हा श्रवण करणे म्हणजे या निमित्ताने पर्वणीच होती. यु ट्यूबवर ती उपलब्ध आहेत नक्की ऐकता येईल. आज गंगा दशहरा या निमित्ताने भगवती गंगा आम्हा सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.. 

हर हर गंगे !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गंगादशहरा

Monday, June 14, 2021

गगन भरारी घेणारे - श्री.अमित वाईकर..

आज 'पुढे पडलेले मराठी पाऊल' या लेखमालेत ज्यांच्याबद्दल लिहायला घेतो आहे ते आहेत श्री.अमित वाईकर. शब्दशः खऱ्या अर्थाने हे पुढे पडलेले मराठी पाऊल आहे असे म्हणावेसे वाटते. आज मराठी माणसाने जगभरात आपला झेंडा फडकवला आहे. २३ एप्रिल २०२१ हा दिवस आजही कायम स्मरणात आहे. machinmaker मधील त्यांच्या कार्यावरील लेख वाचनात आला आणि क्षणात भारावून गेलो. मग गूगल गुरू ची मदत घेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली. यु ट्यूबवरील मुलाखत बघितल्या आणि श्री.अमित वाईकर या नावाने मनावर गारुड निर्माण केले. आज गगन भरारी घेणारे श्री.अमित वाईकर हे मूळ नागपूरचे आहेत हे सांगायला आनंद होतो.

श्री.अमित वाईकर आज सोशल मीडियावर नाही. पण त्यांच्या पत्नी सौ.अपर्णा वाईकर यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या मदतीने सहज संवाद घडला तो थेट नागपूर आणि शांघाय. खरंतर हे अंतर म्हणावे तसे सोपे नाही पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा लक्षात आलं पृथ्वी गोल आहे आणि जग जवळ आहे. कारण संवाद साधत असतांना अनेक गोष्टी जुळत गेल्या आणि पुढे सव्वा तास जो संवाद घडला त्यातून त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतांना प्रचंड भारावून गेलो. आपणांस ही नक्कीच अभिमान वाटेल असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

श्री.अमित वाईकर आज डोहलर ग्रुप या बलाढ्य जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून शांघायमधून कार्यरत आहे. नागपूर- मुंबई-पुणे-दिल्ली-जर्मनी-शांघाय आणि आता काही दिवसांत थायलंड हे नवे मुक्कामाचे ठिकाण त्यांचे असणार आहे. २०१९ सालचा  ‘प्रवासी भारतीय सन्मान’ हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चीनमधील पहिला प्रवासी भारतीय,तो ही उद्योग क्षेत्रात आणि एका मराठी नागपूरकर व्यक्तीला मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात अर्थात वाराणसी येथे मिळणे म्हणजे भाग्योदयच म्हणावे लागेल. काशी विश्वनाथाच्या नगरीत या सन्मानाने गौरविण्यात येणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहे. खरंतर अनेकांचे स्वप्न असते एकदा तरी प्रत्यक्ष पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींना जवळून बघावे, त्यांना भेटावे पण श्री.अमित वाईकर प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या सोबत पंगतीला जेवायला सुद्धा बसले. त्यावेळेच्या विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या बाजूला भोजनाचा आस्वाद घेणे म्हणजे स्वर्ग ही ठेंगणे झाले असावे हीच अनुभूती त्यांची झाली असावी. खरंतर हे सगळं वर्णन ऐकतांना सुद्धा भारावून गेलो होतो. आज जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षात भारत आणि उर्वरित जग यांची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे आणि  या बदलत्या चित्राचा एक भाग म्हणजे अनिवासी भारतीयांच्या संघटित शक्तीचा उदय आहे असेच म्हणता येईल. २०१४ नंतर यात जो बदल घडत आहे त्याचे साक्षीदार आपण आहोंत.

श्री.अमित वाईकर यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. खरंतर हे क्षेत्र माझ्यासाठी नवे होते. त्यांच्याकडून  जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,"भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी मुख्यत: बदलली, ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. या बदलाचे ते शिल्पकार आहेत. अनिवासी भारतीय जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक आहेत; त्यांच्या अनुभवाचा,ज्ञानाचा,संपर्काचा आपल्या देशासाठी कसा वापर करून घेता येईल,याचा विचार पहिल्यांदा केला तो वाजपेयी यांनी. अनिवासी भारतीयांची संघटित शक्ती देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावू शकते. ही दूरदृष्टी आणि व्यापक विचार अटलजींचा होता हे सहज लक्षात येईल आणि यातून प्रवासी भारतीय सन्मान ही संकल्पना सत्यात उतरली."

श्री.अमित वाईकर हे उर्दूचे गाढे अभ्यासक स्व.डॉ.विनय वाईकर यांचे पुत्र असून त्यांनी काही काळ शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्यांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांघायमध्ये स्वागत करण्याचा मानही मिळाला होता. डोहलर ही १८० वर्षे वयाची जर्मन कंपनी आहे. दीड अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या कंपनीचे ते एक मुख्य घटक आहे. आज इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपुलकी,ममत्व आणि कायम सकारात्मक वलय निर्माण करणारे  प्रेरणादायी व्यक्ती म्हणून श्री.अमित वाईकर यांची ओळख सार्थकी ठरेल.संवादातून सुद्धा विलक्षण प्रतिभासंपन्न कायम सकारात्मक आणि उत्साही उर्जावान असलेले जाणवत होते.'जे जे उत्तम उदात्त,उन्नत' या सावरकर उक्तीचा ध्यास घेतलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.अमित वाईकर.

त्यांच्या एका मुलाखतीत श्री.अमित वाईकर छान सांगतात, "भारतीयांची मल्टिटास्किंग अ‍ॅबिलिटी,मल्टिडायमेन्शनल थिंकिंग आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांनी आणि जीवनमूल्यांनी दिलेलं एक स्थैर्य यामुळे व्यावसायिक संदर्भात कोणतंही आव्हान असो, त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी आपण एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार करू शकतो आणि अशी अनेक आव्हानं एकाचवेळी पेलू शकतो. हे असं चौफेर विचारांचं भान आणि निर्णयक्षमतेचा आवाका आपली व्यवस्थाच आपल्याला देते. भारतीयांकडे असलेलं हे कौशल्य फार दुर्मीळ आहे आणि म्हणूनच ते कळीचं ठरतं आणि त्या जोरावरच आपण भारतीय यशस्वी होतो." हीच यशस्वीतेची व्याख्या ते गेली अनेक वर्षे सत्यात उतरवत आहेत.

आज गेली १२ वर्ष झाली चीनमध्ये काम करत असताना भारतातून इकडे येऊन या देशाशी व्यापारी किंवा अन्य संबंध जोडू इच्छिणाऱ्या देशबांधवांसाठी ते दुवा ठरले आहेत. दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांमध्ये शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध राहावे यासाठी ते सतत प्रयत्नरत आहे. आज चीन शत्रू राष्ट्र आहे अशी ओरड असतांना ते म्हणतात,चीनमधल्या लोकांनी गेली कित्येक दशकं जगभरात जाऊन,यश मिळवून आपल्या संपर्कातून चीनला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत विशेष योगदान दिले आहे. बदलत्या काळाने देशसेवा आणि मायभूमीशी निष्ठा या संकल्पनांना कितीतरी वेगळे आयाम दिले आहेत आणि आज त्यांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. विदेशात असले तरी भारताशी,नागपूरशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्यांच्या मुलाखतीत ते नागपूरचा कायम उल्लेख करतात. नागपूरात दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगीतिक कार्यक्रम ते आयोजित करतात.

समाजाचे देण आपण लागतो या भावनेतून कायमच सामाजिक सेवेसाठी सदैव तत्पर असणारे श्री.अमित वाईकर आज दीपस्तंभ फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थेशी जुळून आहेत. दीपस्तंभ फाऊंडेशन संचालित मनोबल निर्माण अभियान या देशातील ३०० दिव्यांग,अनाथ,वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण,उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. आम्रपाली ,गर्जे मराठी,प्रहार यासारख्या संस्थांना सतत मदत करत आहेत. या टप्प्यावर मागे वळून बघतांना कृतज्ञतेची भावना त्यांच्या ठायी सहज जाणवते.

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।। प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या याच विचारांवर ते सतत पुढें मार्गस्थ होत आहेत. श्री.अमित वाईकर यांची वाटचाल अशीच उत्तरोत्तर गगन भरारी घेणारी दिग्विजयी व्हावी हीच सदिच्छा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख१०

Thursday, June 10, 2021

अंकुर चे बीजनिर्माते : श्री.रवी काशीकर - श्री. माधव शेंबेकर

आज ज्यांच्या कार्याबद्दल लिहायला घेतले आहे ते आहेत प्रसिद्ध उद्योजक आणि द्व्यमित्र ज्यांच्या मैत्रीला सुद्धा अर्धशतकाहुन अधिक काळ झाला आहे असे श्री.रवी काशीकर आणि श्री. माधव शेंबेकर. नागपूर आणि विदर्भात सर्वदूर हे नाव परिचित आहेच पण संपूर्ण भारतात अंकुर सीड्स हे नाव बी-बियाणे क्षेत्रांत क्रांती घडवण्यासाठी अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. अंकुर चे बीजनिर्माते म्हणून हे दोन मित्र ५० हुन अधिक वर्ष झाली सातत्याने कार्यमग्न आहे. आज ६०० कोटी हुन अधिकचा टर्नओव्हर असतांना सुद्धा प्रसिद्धीचे वलय न बाळगता त्यांचे कार्य नियमितपणे सुरू आहे. श्री.माधव शेंबेकर यांच्याशी या कार्याबद्दल बोलतांना सहजता आणि आपलेपणा जाणवत होता. आपुलकी,ममत्व आणि साधेपणा या त्रीसूत्रीच्या आधारावर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची मने नक्कीच जिंकून घेतली असतील हा विश्वास वाटतो. कारण फोनवर झालेल्या संवादातून मला सगळ्यात पहिले हेच जाणवले. 

अंकुर बियाणे प्रायव्हेट लिमिटेड ही बी-बियाणे क्षेत्रांत कार्य करणारी कंपनी बियाणे उद्योगातील एक सर्वमान्य आणि प्रत्येकाला योग्य ती मदत करणारी कंपनी बनली आहे. कापूस, शेतातील पिके आणि भाजीपाल्यामध्ये बियाण्यांना बरीच प्रमाणात बियाणे उपलब्ध करून देणारी ही प्रमुख भारतीय संस्था आहे. आपल्याकडे देशातील जवळपास सर्वच राज्यात आज अंकुर सीड्स चे नेटवर्क आहे. नागपूर व्यतिरिक्त दिल्ली, हैदराबाद, गांधीनगर येथे ही कंपनी चा विस्तार झाला आहे. चतुष्कोनात असलेली ही चार ठिकाणं आणि जवळपास १६ राज्यांत आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे आणि खते यांची पूर्ण मदत करण्यासाठी अंकुर सीड्स कटिबद्ध आहे. 

अंकुर सीड्स उद्योगाची सुरुवात ही प्रेरणादायी आहे. श्री.रवी काशीकर यांच्या विचारातून अंकुरची निर्मिती झाली. त्यांचे वर्धेला छोटेसे कृषी केंद्र होते. १९६८ साली सुरू झालेल्या या दुकानाचे टर्न ओव्हर त्यावेळी दोन हजार रुपये होते. पुढे ते आपल्या वर्गमित्राला अर्थात श्री माधव शेंबेकर यांना आणायला शेंबा गावी गेले. माधवराव दुसऱ्या दिवशी बँकेच्या नोकरीत जॉईन होणार होते पण श्री रवी काशीकर हे त्यांना घेवून नागपुरात आले. १९७१ साली दोघांनी मिळून नागपुरात कृषी केंद्र सुरू केले आणि तेथून खऱ्या अर्थाने अंकुरचा प्रवास सुरू झाला. आज या कृषी केंद्राचे टर्न ओव्हर सुद्धा ४० कोटीहुन अधिक आहे. कृषी केंद्र सुरू केल्यावर कंपनी स्थापन करण्याचे स्वप्न बघत ते सत्यात उतरविण्यासाठी चिकाटी,सातत्य,परिश्रम करण्याची तयारी होतीच आणि त्यातून पुढे १९७६ साली अंकुरचे बीजारोपण झाले. 

अनेक नात्यांमधील एक निखळ आणि निस्वार्थी नातं म्हणजे मैत्री. दोन समविचारी एकत्र आले की मैत्री ही ओघाने होतेच पण त्याच मैत्रीचे फलित आजही इतके वर्ष झाले तरी टिकून आहे. ही घट्ट मैत्री पुढे उद्योग क्षेत्रातही सतत फुलत गेली. त्याकाळी भविष्याची स्वप्न रंगवताना ज्या मातीत आणि संस्कारात आपण वाढलो त्याच्याप्रति आपले कर्तव्य आहे आणि आपण समाजाचे देणं लागतो या भावनेतून त्यांचा उद्योग सुरू झाला आणि आज त्याची वाटचाल जागतिक पटलावर होते आहे. कारण साधारण नव्वद च्या दशकांत APSA - ( Asia Pacific Seed Association) चे दोन वर्षे Governing Council Member म्हणून श्री माधव शेंबेकर कार्यरत होते. श्री मकरंद सावजी हे सुद्धा आज पूर्णवेळ कार्यरत आहे. स्व.श्री. दादा औरंगाबादकर, स्व.श्री बालूअण्णा उमाळकर, स्व.श्री.विजय काशीकर यांनी पण अंकुर सीड्सच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे. उद्योगाची आर्थिक बाजू श्री दिलीप रोडी सांभाळत आहेत. सहा मराठी मंडळी एकत्र आली आणि त्याचे फलित आपण आज अनुभवू शकतो. अंकुर सीड्स आज सामाजिक क्षेत्रातही अग्रेसर आहे.

खरंतर ज्या मूलभूत गोष्टींवर संपूर्ण शेती उभी राहते ती म्हणजे सकस बी-बियाणे आणि यासाठी काहीतरी करण्याच्या जिद्दीने त्यांचा उद्योग सुरू झाला. अंकुर सीड्स या उद्योगाची निर्मिती शेती आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून झाली आहे. ज्या वातावरणात शेती करायची आहे तेथील हवामान साथ देईल अशी बीजनिर्मिती करणे,पुढे त्याचा दर्जा उत्तम असणे, त्याला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देत त्यातून उत्कृष्ट उत्पादन कसे येईल याचा विचार करणे याच वैचारिक उद्देशाने अंकुर सीड्सची स्थापना झाली आणि आज त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आज येथील बियाणे अत्यंत माफक दरात शेतकऱ्यांना दिले जातात. अनेक राज्यात अंकुर सीड्सच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन प्रात्यक्षिक दिले जाते. दरवर्षी एक लाखाहुन अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाऊन प्रात्यक्षिक दिल्या जाते. आज प्रत्येक राज्यात बियाणे योग्य वेळेत पोहोचवणं हे सुद्धा म्हणावे तसे सोपे काम नाही पण अंकुर सीड्स ने मागच्यावर्षी आणि यावर्षी लॉकडाऊनच्या काळात ही शेतकऱ्यांपर्यंत वेळेत बियाणे पोहोचवले आहेत. मागच्यावर्षी थोडा त्रास झाला पण मागचा अनुभव असल्याने यावेळी वेळेत बियाणे पोहोचलेली आहेत.  

उद्योग सुरू करतांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पण एकमेकांना धीर देत आपल्या हातून तर चूक झाली नाही ना हे तपासून बघून त्यावर तोडगा काढला जातो आणि त्यामुळे पुढे वाटचाल दमदार होते. सहा जणांनी गेली कित्येक वर्ष एकत्र कामं केलीत त्यामधे वैचारिक मतभेद ही झाले पण मन भेद झाले नाही. आज सहा जणांचे अंकुर सीड्स एक कुटुंबच झाले आहे आणि प्रत्येकाला वैयक्तिक कौटुंबिक श्रीमंती पण लाभलेली आहे आणि येणारी नवी पिढी सुद्धा त्याच जोमाने उद्योगात कार्यतत्पर आहे. सौ.मंजिरी सिंग,श्री.वैभव काशीकर, डॉ.अश्विन काशीकर, डॉ. प्रतीक्षा मायी,श्री.साईश काशीकर,श्री.विशाल उमाळकर, श्री.मनिष औंरगाबादकर ही नवी पिढीसुद्धा त्याच जोमाने कार्य करते आहे आणि अंकुर सीड्स उद्योग नवी भरारी घेण्यासाठी तयार होते आहे. 

आज अंकुर सीड्स संशोधनात्मक कार्य करते आहे. अनेक नामवंत शास्त्रज्ञ तेथे कार्य करत आहेंत. मध्य भारतातील सगळ्यात मोठी लॅबोरेटरी नागपूर पासून साधारण २० किमी.जवळ असलेल्या नेरी गावी आहे. अद्ययावत अशी सगळी आयुधं त्याठिकाणी आहे. संशोधनातून जे नवीन वाण तयार होतात ते तेथून शेतकऱ्यांना दिल्या जातात. नवीन ज्या काही गोष्टी केल्या जातात ते करण्यासाठी या लॅबची बरीच मदत होते आणि त्यामुळे आता सगळे बियाणे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरत आहे. बियाणे उद्योगात संशोधनासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

या उद्योग क्षेत्रात नव्याने येणाऱ्या उद्योजकांना ते सांगतात,'कष्ट आणि कष्ट,काम आणि काम अर्थात इमानदारीने काम करा.यश अगदी तुमच्या बाजूला आहे. ज्यांच्यामध्ये हे सगळं काम करण्याची सचोटी आहे,तयारी आहे त्यांनी अवश्य पुढे यायला हवे.' हेच त्यांचे धोरण आहे आणि हाच त्यांचा यशस्वी उद्योजक असल्याचा मंत्र आहे असेही म्हणता येईल. 

अंकुर सीड्स ही बीजोत्पादन असणारी कंपनी आज आर्थिक उत्पादनात देशातील पहिल्या पांचमध्ये आपले स्थान मिळवून आहे. प्रत्येकाचे काम करणे हे एकच ध्येय असल्याने उद्योगाचा आलेख सतत वर्धिष्णू होतो आहे. कौशल्य,मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण बदल करत शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य सकस बियाणे उत्पादन करणारी असलेली कंपनी अंकुर सीड्स आणि त्याचे निर्माते श्री रवी काशीकर आणि श्री माधव शेंबेकर यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहेत. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख९

Monday, June 7, 2021

प्रसन्न पटवर्धन - 'प्रसन्न' अनुभव देणारी 'पर्पल'

प्रसन्न - पर्पल या खाजगी बसने आपल्यापैकी प्रत्येकाने प्रवास केला असेलच. प्रवासात प्रत्येकाला चांगले-वाईट अनुभव येत असतात. प्रवास सुखाचा आणि आरामदायी व्हावा यासाठी सुद्धा आपण योग्य नियोजन करतो. पण या सुखासीन आणि आरामदायक प्रवासासाठी ज्यांनी मेहनत घेतली आणि आज जे यशस्वी उद्योजक म्हणून जगन्मान्य आहेत, प्रसन्नता ज्यांच्या बोलण्यातून सहज जाणवते असे आहेत प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स चे सर्वेसर्वा श्री प्रसन्न पटवर्धन. प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्यूशन च्या माध्यमातून त्यांचा उद्योग सुरू आहे. 

श्री प्रसन्न पटवर्धन यांच्या प्रवासाविषयी अधिक जाणून घेताना आश्चर्य वाटेल आणि पुढच्यावेळी या खाजगी बसने प्रवास करतांना आपल्याला तो प्रवास अधिक आनंददायी ठरेल कारण प्रसन्न पर्पल मराठी उद्योजकाची देण आहे. आज १३०० हुन अधिक बसेस त्यांच्या देशांतर्गत सुरू आहे. गेले दीड वर्ष झाले कोविडमुळे प्रवास बंद असला तरी आजही आपल्या ग्राहकांच्या ते सतत संपर्कात आहे. त्यांच्याशी बोलतांना जाणवतं की माणूस कितीही मोठा असला तरी सहजपणा आणि आपलेपणाने तुम्ही कुणाला ही जिंकू शकता कारण दीड तासाहून अधिक वेळ संवाद साधत असतांना तो संवाद प्रेरणादायी आणि काही अनुभवातून हसवणारा होता. आज BOCI जी non profit organization,not for profit आणि passenger industry led & managed oragazition आहे त्या संस्थेचे प्रसन्न पटवर्धन प्रेसिडेंट आणि फाऊंडर प्रेसिडेंट पण आहेत. २००३ साली सुरू केलेल्या त्यांच्या या प्रयत्नांना २०१६ साली यश मिळाले. 

साधारणपणे १९६४ साली प्रसन्न पटवर्धन यांच्या वडिलांनी 'प्रसन्न ट्रॅव्हल्स' हा छोटेखानी वाहतूक व्यवसाय सुरु केला. पुणे विद्यापीठातील कर्मचा-यांना वाहतूक सेवा पुरविण्याची जबाबदारी त्यांच्या वडिलांवर होती तर वडिलांचे बंधू यांचा हॉटेल आणि डेअरीचा बिझनेस होता. घरात लहानपणापासून व्यवसायाचे धडे त्यांना मिळत होते. प्रसन्न पटवर्धन यांच्या बाबतील सांगायचे तर त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं. काही कारणाने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्याचे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले. मग वडिलांना एका वेळेस बिझनेस बंद करण्याची पाळी आली होती. त्याचक्षणी प्रसन्न पटवर्धन यांनी ओळखलं आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला आपली गरज आहे. मॅनेजमेंट कोळून प्यायलेले प्रसन्न पटवर्धन यांनी आपल्या वडिलांचा व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली आणि आज त्याची भरभराट आपल्याला दिसते आहे. प्रसन्न पटवर्धन यांना कौटुंबिक श्रीमंती लहानपणापासून लाभलेली आहे. आज लॉकडाऊन असल्याने पुन्हा कुटुंबीयांबरोबर ते छान वेळ घालवत आहे. नवनवीन तंत्रज्ञान हाताळणे आणि रोज नवी गोष्ट शिकण्याची जिद्द आजही नियमितपणे सुरू आहे. 

प्रसन्न पटवर्धन यांचा मॅनेजमेंटचा अभ्यास असल्याने त्यांनी सर्वप्रथम वडिलांच्या बिझनेसमध्ये वेगाने बदल करण्यास सुरुवात केली. खरंतर आता नव्या इतिहासाची पायाभरणी होत होती आणि ही नव्या इतिहासाची नांदी भविष्यात खूप मोठ काहीतरी करणार या विश्वासाने सतत धडपडणारी होती कारण प्रसन्न ट्रॅव्हल्स आता वडिलोपार्जित व्यवसायाकडून कॉर्पोरेट कंपनी बनत चालली होती. सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण ऑफिसची डागडुजी केली. नवीन गाड्या खरेदी केल्या पुढे गाड्यांमध्ये साफसफाई, पडदे, म्युझिक सिस्टीम,एअर कंडिशनर अशा अनेक सुविधा त्यांनी ग्राहकांना दिल्या. १९८५ साली तीन लाख रुपये कमवित असतांना पुढील १० वर्षाचे नियोजन त्यांनी केले आणि त्या दहा वर्षात त्यांनी १० कोटींची मजल मारली होती. फिलिप्स, टेल्को सारख्या कंपन्या प्रसन्न ट्रॅव्हलच्या ग्राहक यादीत होत्या. दिवसागणिक कंपनीतील गाड्या, टेम्पोची संख्या ही सतत वाढत चालली होती. हा प्रवास म्हणावा तसा सोपा नव्हता. रोज या क्षेत्रांत नवे कायदे येत होते त्याचा अभ्यास करणे ते आपल्या व्यवसायात लागू करणे खरंतर ते बदल त्रासदायक होते पण त्यातही प्रसन्न पटवर्धन यांनी त्या कायद्याचा अभ्यास केला आणि लगेच अंमल बजावणी केल्याने पुढे त्यांची वाटचाल सुखकर झाली.

१९८८ साली प्रसन्न पटवर्धन यांनी बस वाहतूक सेवेत प्रवेश करायचे ठरवले. त्यांनी आपल्या ताफ्यातील चार कार, दोन टेम्पो विकून १० लाख रुपयांची गुंतवणूक करुन पहिली एसी बस विकत घेतली. पुण्यातील त्या काळातील ती पहिली खाजगी आणि एसी बस होती. प्रसन्न पटवर्धन  सांगतात की, "आम्ही यामध्ये काही काळ अपयशी ठरलो. पुढे आम्ही बस मार्ग बदलले. त्यानंतर आम्हाला चांगल प्रॉफिट मिळत गेलं." पुढील चार वर्षात प्रसन्न ट्रॅव्हल्स यांनी कोल्हापूर-पुणे, अकोला-पुणे आणि बंगलोर-पुणे या मार्गावर बस सेवा सुरु केल्या. यानंतर बस सेवा हा प्रसन्न ट्रॅव्हल्सचा मुख्य व्यवसाय बनला आणि आज १३०० बसेस दिमाखात रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. आज अष्टविनायक असो का गोवा- गणपतीपुळे अनेक सामान्य कुटुंब यांच्यामुळे सुखाचा प्रवास करू शकतात. या क्षेत्रात एफडीआय आणण्याचा पहिला मान त्यांच्या नावे आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण बसची माहिती एका क्लीकवर त्यांना दिसते. जिद्द,चिकाटी, सातत्य आणि अविश्रांत परिश्रम त्यासाठी सतत प्रवास यामुळे आज यशस्वी उद्योजक म्हणून ते नावारुपास आले आहेत. 

२००९ साली ५० कोटींची मोठी गुंतवणूक त्यांच्या बिझनेसमध्ये आली. अंबित प्राग्मा वेन्चर्सने प्रसन्न ट्रॅव्हल्समध्ये ५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यानंतर कंपनीने मागे वळून बघितलेच नाही. कारण पुढे नवी ओळख उदयास येणार होती.  प्रसन्न ट्रॅव्हल्स 'प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्यूशन' म्हणून आता नावारूपाला आली आहे. आज प्रसन्न-पर्पलच्या खाजगी बसेस मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली राज्यात १००० हुन अधिक बस रस्यावर धावणाऱ्या आहेत,त्यापैकी ७५० अधिक बस कंपनीच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. आज वाहतुक क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या प्रसन्न पर्पल कंपनीने ४० हुन अधिक वर्षे पूर्ण केले आहे. पंजाब मधील लुधियाना सारख्या शहरात गेल्या ६ वर्षांपासून स्थानिक शहरी बस सुविधा ही स्वतः प्रसन्न पर्पल चालवत आहे. त्याबरोबरच दिल्ली,सुरत,पुणे आणि मुंबईत ही सुविधा योग्य पद्धतीने सुरू आहे. अद्ययावत यंत्रणेने सज्ज असे ऑफिस आहे. आज तेथे चार हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे. शहर, इंटरसिटी, कर्मचारी, स्कूलबस, ‘हॉप ऑन हॉप ऑफ’, लक्झरी बस सेवा सेवांमध्ये प्रसन्न पर्पल सध्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. तसेच खेळाडूंचे दौरे, कलाकारांची वाहतूक व्यवस्थेसाठीही प्रसन्न पर्पल सदैव तत्पर आहे. 

आजच्या नवीन उद्योजकांना ते सांगतात की,आपण व्यवसाय करतांना फार छोटी स्वप्न बघतो म्हणून स्वप्न मोठी बघायला हवी. Calculated रिस्क असलेली ability आपल्यात निर्माण व्हायला हवी. बिझनेस Discipline आपल्याकडे यायला हवा. 
आज स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने चाकोरीबद्ध आयुष्य न जगता वाहतूक क्षेत्रांत स्वतःची ओळख निर्माण करणारे श्री प्रसन्न पटवर्धन यांचा प्रवास सतत सुरू आहे. महिन्यातून २०-२२ सलग प्रवास करणारे प्रसन्न पटवर्धन यांनी सद्य परिस्थितीमुळे स्वल्पविराम घेतला आहे पण येणाऱ्या काळात पुन्हा तो गरुडभरारी घेणारा असेल यात शंकाच नाही आणि त्याबद्दल ते ही खूप आशावादी आणि सकारात्मक आहेत. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख८ Prasanna Purple

Thursday, June 3, 2021

पूर्णब्रह्मची अन्नपूर्णा जयंती कठाळे

पूर्णब्रह्म !  या नावातच तृप्ततेची ढेकर दिल्याचे समाधान सहज मानवी मनाला होईल इतकी ताकद या एका शब्दांत आपल्याला जाणवते. ' अन्न हे पूर्णब्रह्म'  या लहानपणीच्या मिळालेल्या  संस्कारातून पूर्णब्रह्म चा प्रवास सुरु झाला असं म्हणता येईल. शून्यातून विश्वनिर्मितिचा प्रवासच आपल्यासमोर उलगडणार आहे. जयंती डोणगावकर ते जयंती प्रणव कठाळे हे नाव नागपूरात विशेषतः महाल भागातील अनेकांना परिचित आहे पण आज हे नाव कर्नाटकातील बंगलोर सारख्या समृद्ध शहरातून जागतिक स्तरावर पूर्णब्रह्म ची अन्नपूर्णा म्हणून विश्वविख्यात झाले आहे. 

आज महाराष्ट्रीयन विशेषतः मराठी जेवणाला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. पिझ्झा, पास्ता,इटालियन च्या जमान्यात पुरणपोळी याला जगात सर्वोत्तम खाद्य करण्याचें धाडस २००६ साली त्यांनी केले. सुरुवातीला घरातूनच त्यांनी खाद्य पदार्थ देणे सुरू केले परंतु प्रत्यक्षात हे स्वप्न हॉटेलच्या रुपात २०१२-१३ साली सुरू झाले. खरंतर सहा वर्षे ही संकल्पना सत्यात उतरायला लागली आणि अमेरिकेत एका स्पॅनिश शेफ ने स्वतः पुरणपोळी करत पूर्णब्रह्म आज खऱ्याअर्थाने जगन्मान्य झाले आहे. 

१४ वर्ष आयटीमध्ये नोकरी करणारी, चांगला पगार असलेली अनेक वर्षं परदेशातही राहिलेल्या जयंती ताई आहे. पण महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे घरात होणारे पदार्थ त्यांना स्वस्थ बसू देईना. बाहेर देशात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर चायनीज, पंजाबी, इटालियन असे वाटेल ते पदार्थ खाण्यापेक्षा माझ्या मातीत होणारे, घरची चव देतील असे पदार्थ माझ्या देशात आणि परदेशात का पोहोचवू नयेत या गोष्टीने त्या अस्वस्थ झाल्या. पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक दिवस तिने आयटीतील सुखाची नोकरी सोडण्याचे ठरवले आणि बंगलोर मध्ये ‘पूर्णब्रह्म’ उदयास आले . मराठी माणसाकडे स्वयंपाकातील इतकी चांगली कला आणि परंपरा असताना ते पदार्थ अमराठी माणसांपर्यंत आणि विशेषतः परदेशात का पोहोचू नयेत या एकाच ध्येयाने जयंती ताईंचा प्रवास सुरु झालाय. आमचा संवाद सुरू होता तो सुद्धा त्यांच्या किचनमधून. फोन स्पिकरवर आणि त्या काम करत होत्या. कारण मला मिक्सरचा,भांड्याचा आवाज येत होता आणि न राहवता मी शेवटी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की,'तुझ्याशी बोलतांना माझा स्वयंपाकही सुरू आहे.' जिद्द,चिकाटी आणि परिश्रम हीच त्यांच्या यशस्वी जीवनाची किल्ली आहे. दीड तास बोलतांना त्यांच्या बोलण्यात करारीपणा आणि प्रसंगी  सहजपणा जाणवत होता पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास आणि जिद्द त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत होती.  

साधारणपणे नागपुरातील महाल भागात मध्यमवर्गीय,चाकोरीबद्ध कुटुंबात जडणघडण झाली असल्याने आजी, आई, काकू, आत्या, मामी, मावशी यांच्याकडून स्वयंपाकाची उपजत असणारी आवड त्यांना काहीतरी करण्याची ऊर्जा देणारी ठरली. हे सगळं करत असतानाच महिलांनी व्यवसायात यावे,त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी जयंती कठाळे विशेष प्रयत्नशील आहेत. येत्या काळात ५ हजार नवीन शाखा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. परदेशातील मराठी माणसाला आपल्या देशाची कमी भासू नये म्हणून त्याला अगदी गरम तूप,भात आणि मेतकूट मिळावे यासाठी त्या अक्षरश: दिवस रात्र एक करत आहेत. 

अनेकदा हॉटेलमध्ये आल्यावर लहान मुले खाण्यासाठी त्रास देतात. त्यांच्यासाठी पौष्टीक आणि तरीही वेगळ्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ पूर्णब्रह्ममध्ये उपलब्ध आहेत. एकत्र कुटुंबात असल्याने त्यांना कौटुंबिक श्रीमंती लाभली आहे. आपले हॉटेल चालविण्यापासून ते देशातील आणि परदेशातील महिलांना पूर्णब्रह्मच्या शाखा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना सगळीकडे त्या फक्त नऊवारी नेसून फिरत आहेत. आयटीमध्ये असतांना आधी फॉर्मल शर्ट आणि पँट घालणारी महिला मागच्या काहीं वर्षांपासून अचानक सतत नऊवारीमध्ये कशी राहू शकते, तेही या काळात. असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या लहान मुलांपासून ते मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या बदलामध्ये मोलाचा वाटा आहे आणि आज पूर्णब्रह्मची नऊवारी नेसलेली जयंती कठाळे विश्वविक्रमी वाटचाल करत आहेत. 

आज आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा विचार करणार्‍या जयंती कठाळे यांचा ‘फ्रँचायझी’ देतानाही महिलांना प्राधान्य देण्याकडे कल असतो. काही वर्षे इन्फोसिस मध्ये काम केल्याने त्यांच्या आदर्श म्हणजे ‘इन्फोसिस’च्या संस्थापिका सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती आहेत. सुधा मूर्ती यांनी जयंती कठाळे यांच्या आग्रहाखातर ‘पूर्णब्रह्म’ला भेट दिली आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. 'माझी रेणुका माऊली' हे बॅकग्राउंड असलेले गाणे आणि अनेकांना ते बघतांना कुणीतरी आपल्याघरी जेवायला आले की काय असे वाटत होते. इतका साधेपणा,सहजपणा व्हिडिओमध्ये जाणवत होता. 

नवीन उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याबद्दल त्या सांगतात,‘मोठे स्वप्न बघा. ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा. वाटेत ठेच लागून खाली पडाल, तरीही उठून पुन्हा मार्गक्रमण करा. पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा.. यश नक्की तुमचेच होईल’ हा मूलमंत्र अनेक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक देतात आणि स्वतःही त्याचे पालन करतात मी आजवर ज्यांच्याशी संवाद साधला ते याच वाटेवरून मार्गक्रमण करत आहे आणि आज सगळेजण यशोशिखरावर आहेत असेच एक मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठमोळ्या अस्सल नागपूरी जयंती कठाळे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत. 

'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या जयंती कठाळे यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. संवाद साधत असतांना त्यांनी त्यांची एक शायरी ऐकवली जी खूप आवडली त्या म्हणतात, 

' गम ना कर जिंदगी बहुत बडी है 

चाहत की महफिल तेरे लिए ही सजी है 

एकबार मुस्कुराकर तो देख , 

तकदीर खुद तुझसे मिलने तेरे बाहर खडी है ।।'

✍️ सर्वेश फडणवीस 

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख७