Saturday, May 28, 2022

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला...

हे गीत म्हणजे ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर फिरतांना सावरकरांच्या मनात उसळलेल्या मातृभूमीच्या विरहाचे शब्दरूप असेच म्हणता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे साहित्य खरं तर हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. विशेषतः सावरकरांच्या कविता याची उंची वेगळीच आहे. देशासाठी कर्तव्य कठोर, ध्येयनिष्ठ असलेले सावरकर अंतर्यामी आणि खूप हळवे होते, संवेदनशील होते. या कवितेचा शब्द आणि शब्द मातृभूमीवरील निरतिशय प्रेमातून आलेला आहे. प्रत्येक शब्दातून जाणवते ती मातृभूमीप्रती असलेली व्याकुळ ओढ. मातृभूमी म्हणजे सावरकरांचा श्वास होता. त्याच अधिकाराने ते सागराला जाब विचारतात. तूच मला माझ्या प्रिय भारत भू पासून लांब आणलेस ना ! आता मला परत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी देखील तुझीच आहे. कधी कौतुकाने तर कधी प्रेमळ धमकी देऊन सावरकर सागराला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात.

महाराष्ट्रात हे काव्य अत्यंत लोकप्रिय झाले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नाद-स्वर माधुर्याने अलंकृत झालेले हे काव्य ऐकताना राष्ट्रीय भाव अगदी नकळत जागृत होऊन डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. पुढे बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी ही सावरकर या चित्रपटात मनापासून गायिलेले हे गीत ही त्याच तोडीचे आहे. या काव्याची पार्श्वभूमी ही तितकीच सुंदर आहे.

१४ नोव्हेंबर १९५३ रोजी दादरच्या चौपाटीवर काही तरुणांनी सावरकरांनाच प्रश्न केला की ही कविता लिहिण्यामागील उद्देश काय ? आशय कोणता ? याची विचारणा केली असता स्वतः सावरकर सांगतात. या कवितेत सागर हा शब्द जाणीवपूर्वक वापरलेला आहे. कारण अरबी समुद्र हे परकीयांनी दिलेले नाव आहे. या समुद्राचा पूर्वी अरब आणि ब्रिटिश व्यापारासाठी व राजकीय कामासाठी वापर करीत असत. म्हणून ‘सागर’हा शब्द मुद्दामून वापरला आहे आणि अभिमानाने वापरला आहे. सावरकरांच्या मते भारताच्या अवतीभवतीचे समुद्र ह्या सर्वांना त्यांच्या संस्कृती व भौगोलिक अस्तित्वाप्रमाणे नाव देणे क्रमप्राप्त आहे. पूर्वेकडील सागरास पूर्वसागर किंवा गंगासागर,पश्चिमेचा पश्चिम सागर किंवा सिंधू सागर , दक्षिणेकडील असलेला दक्षिण सागर किंवा हिंदु महासागर. ते निष्ठून सांगतात की हिंदुस्थानात जरी अनेक धर्माचे लोक राहत असले तरी हा देश सर्वस्वी हिंदूंचाच आहे.

या कवितांमधील स्फूर्ती काय हे समजून घेताना सावरकरांच्या मनावर इंग्लन्डमधील त्या वेळच्या राजवटीचा परिणाम काय झाला असेल हे लक्षात येईल. ब्रायटनला एका छोट्याशा गावात दमलेला, शक्तीहीन व काळजीने ग्रासलेल्या अवस्थेत ते लंडन सोडून काही काळ राहिले. व येथेच १० डिसेंबर १९०९ रोजी संध्याकाळी हे काव्य लिहिले गेले. यावेळी सावरकरांसोबत निरंजन पाल ही होते. किनाऱ्यावर इंग्रजी कुटुंबे आनंदात खेळताना पाहून त्यांना आपल्या मातृभूमीची आठवण आली आणि त्या आठवणीने दाटून आलेल्या भावना त्यांनी सागरास उद्देशून जे निवेदन केले तेच हे अजरामर काव्य “ सागरा प्राण तळमळला ”.

या काव्याबाबत निरंजन पाल म्हणतात की, सुरुवातीला सावरकर अत्यंत हळुवार आवाजात पुटपुटत होते. जसे सुचेल तसे स्वतःशीच गुणगुणत होते. ते मराठी बोल होते. देहभान विसरून सावरकर गुणगुणत होते. हळूहळू त्यांचे डोळे पाणावले,अश्रू ओघळले आणि गळा दाटून आला. ते स्फुंदून स्फुंदून पुढे लहान मुलासारखे रडू लागले.

ह्या काव्यात सागराची महानता दर्शविली आहे. सागरास उद्देशून असलेले हे काव्य आपल्या मातृभूमीकडे नेण्याविषयी विनवणी करते आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या भावना आणि हृदयातील लाटा व भावनांचे तरंग कल्लोळ हे एखाद्या पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आहेत. ही कविता म्हणता म्हणता ती आकाशापर्यंत पोहोचली.

नभी नक्षत्रे, बहुत एक परि प्यारा। मज भरत भूमीचा तारा ।।

यावरून त्यांचा मातृभूमीप्रति असलेला विरह लक्षात येईल. सावरकरांची ही सागरास अर्पण केलेली कविता तिला धमकी देण्यासही मागे पुढे पाहत नाही. सागरास सावरकर म्हणतात की,तू जर माझ्या मातृभूमी कडे परत नेले नाहीस तर माझी मातृभूमी अगस्ती ऋषीना सांगून तुला एका आचमनात पिऊन टाकण्यास भाग पाडेल.

कथिल हे अगस्तीस आता रे । जो आचमनी एक क्षणी तुज प्याला।।

सावरकरांच्या ह्या काव्याच्या वेळी झालेली अवस्था म्हणजे अगदी लहान मुल जसं आपल्या आईकडे गाऱ्हाणं  करून मनाच्या वेदनांना वाट मोकळी करून देत अगदी तसंच जाणवतं. सागराकडे बघत आपल्या कुटुंबीयांच्या आठवणीने व्याकुळ झालेले सावरकर म्हणतात,

ती आम्रवृक्ष वत्सलता रे ।
नवकुसुमयुता त्या सुलता रे।
तो बाल गुलाबहि आतां रे।

ती आम्रवृक्ष वत्सलता म्हणजे मोठे बंधू बाबाराव व येसूवहिनी, नवकुसुम म्हणजे पत्नी यमुना अर्थात माई व बाल गुलाब म्हणजे पुत्र प्रभाकर यांना उद्देशून आहे.

हे काव्य सागरास अर्पण करताना सावरकर हे सागरप्रेमी आहेत असे म्हंटले तर ते अर्धसत्य ठरेल कारण सागरदेखील सावरकरांवर तेवढेच प्रेम करत होता आणि त्याने आपल्या लाटांच्या साह्याने मार्सेलीसचा किनारा गाठण्यास मदत कशी केली हे आपण जाणतोच म्हणजेच सावरकरांनी सागरास केलेली विनवणीने वचनपूर्ती केली आहे असेच म्हणता येईल.

सावरकर चरित्राचा अभ्यास केला तर एक योगायोग लक्षात येईल की मनातील भावना व्यक्त करायच्या असोत किंवा इंग्रजी कायद्याला धाक दाखवायचा असो हा सागर(समुद्र) नेहमीच सावरकरांच्या सहाय्याला धावून गेलाय. हे काव्य वाचताना कुणाच्याही मनाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही. मातृभूमीविषयी उत्कट प्रेमाचा आविष्कार म्हणजे ही कविता. सावरकर समजून घ्यायचे असतील तर हे काव्य जरूर अभ्यासावे.  ज्यावेळी हे काव्य सावरकरांना स्फुरले त्यावेळी त्यांना पुत्रशोक झालेला होता आणि त्याही वेळी त्यांनी मनाचा तोल न जाऊ देता राष्ट्रहित सर्वोपरी हीच भावना जागृत ठेवली. सावरकर जयंतीचे औचित्य साधत आपणही राष्ट्रहित सर्वोपरी हीच भावना जागरूक ठेवावी हीच सदिच्छा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस