Saturday, July 25, 2020

रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या, प्राणास घेऊनी हाती !!


२६ जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस आहे. २१ वर्षांपूर्वी  याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. आज आपण सर्वजण मजबूत तटबंदी असलेल्या एका किल्ल्यात अर्थात आपल्या घरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निश्चिंत स्वतःची काळजी घेत आहोत पण आपले सैनिक त्या तटबंदीवर अहोरात्र पहारा देत भक्कमपणे उभे आहेत देशरक्षेचे व्रत घेतलेले आपले सैनिक आहेत. आज स्वतःची पूर्ण काळजी घेत ते उभे आहेत. खरे तर त्यांच्या 'तिथे' उभे असण्यामुळेच भारतातील प्रत्येक नागरिक मोकळा श्वास घेऊ शकतो. आपण त्यांचे ऋणातच राहायला हवे आणि त्यांचे उतराई आपण कधीच होऊ शकणार नाही. आज त्या खऱ्या महानायकांचा आदर्श आम्ही ठेवला पाहिजे.

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. कारगिल व द्रास परिसरातील अति उंच दुर्गम जागी हे ठिकाण आहे. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ते परत मिळवण्यात यश मिळाले. 

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. आणि आज त्याची परिणीती म्हणून २६ जुलै कारगिल विजय दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. आज ह्या युद्धाला २१ वर्ष पूर्ण झाली आहे. या युद्धात भारतीय सैनिक जो देशकार्य आणि देशभक्तीचा ऊर्जा स्रोत मानला जातो तो कार्यतत्पर होता. कुठल्या ही लढाईसाठी स्वतःच्या प्राण अर्पण करण्यासाठी तत्पर असणारा आमचा सैनिक हा प्रत्येक भारतीयाचा रोल मॉडेल आहे आणि राहील यात तिळमात्र शंका नाहीच. कसा आहे आमचा भारतीय सैनिक ? सैनिकसेवा व समाजप्रबोधनाच्या कार्यात वाहून घेतलेल्या एक व्रतस्थ कार्यकर्त्या,भारतीय सैनिक व सामान्य नागरिकांमध्ये भावनात्मक बंध जुळावेत ह्यासाठी लक्ष्य फौंडेशन ची स्थापना करणाऱ्या, विद्यार्थ्यांना सैनिक कळावा ह्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सौ.अनुराधा प्रभुदेसाई आपल्या "सैनिक" पुस्तकात लिहितात,

भारतीय सैनिक म्हणजे शौर्य,निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे . देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर,निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे. भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा,असामान्य कर्तृत्व,उच्च मनोबल,अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.

सैन्यदलाबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य अभिमान वआदर असायलाच हवा. जमिनीपासून कित्येक मैल दूर जाऊन समुद्राच्या पृष्ठभागावर तसेच पाणबुडीतून दोनशे मीटरपेक्षाही जास्त खोल जाऊन टेहळणी करणारे नौदल, आकाशात उंच उंच जाऊन हवाईटेहळणी करणारे वायुदल आणि रक्त गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत बर्फाच्छादित शिखरांवर अथवा वाळवंटात अंगाची लाही लाही करून रक्त जाळणाऱ्या उन्हाच्या वणव्यात कणखरपणे उभे ठाकलेले पायदळ ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. हया तीनही दलांच्या समन्वयाने जिंकलेले कारगिल युद्ध हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील युध्दतज्ज्ञांच्या प्रशंसेस पात्र ठरले. त्यातील पायदळाने जिंकलेल्या ऑपरेशन विजयची ही झलक...अर्थात कारगिल. 

१९९९ चे कारगिल युध्द, ८० डिग्री चढाई असलेले सतरा हजार फूटांचे बर्फाच्छादित डोंगरकडे, उणे बत्तीस अंश तापमान,पाठीवर वीस किलो वजनाची युध्दसामुग्री, रात्रीच्या निबिड अंध:कारात करावी लागणारी इंच इंच चढाई. कधी चढाई दोरखंडावरून तर कधी निसरड्या बर्फावरून! एकीकडे डोंगरमाथ्यावर ठाण मांडून बसलेल्या शत्रुकडून अहर्निश होणारा बॉम्बवर्षाव तर दुसरीकडून बोफोर्सगन्समधून शत्रुवर डागल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांचा भडिमार! 'छोडो मत उनको' म्हणत बंदुकांच्या ट्रिगरवरील बोटही न काढता शेवटच्या श्वासापर्यंत लढून कोसळणारे सहकारी! अत्युच्च बलिदान देणारे हे भारतीय लष्करातील तेजोनिधी अर्थात आपले लढवय्ये शिपाई . कारगिल युध्दात चार जणांचा भारत सरकारने परमवीरचक्र हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव केला. 'शत्रू समोर उभा ठाकला असताना जमिनीवर, समुद्रात अथवा आकाशामध्ये केलेले अलौकिक शौर्याचे, धैर्याचे कृत्य अथवा प्राणांचे बलिदान, यासाठी हे परमवीरचक्र मरणोत्तरही दिले जाते. दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, अदम्य साहस व प्रखर राष्ट्रनिष्ठेची ज्वलंत उदाहरणेच म्हणजे कारगिल युद्ध आहे. असेच एक उदाहरण आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांचे. 

'या तो तिरंगा लहराकर आऊँगा, या तिरंगे में लिपटकर, मगर जरूर आऊँगा' असे म्हणणारे कॅप्टन विक्रम बात्रा यांचे वय होते निव्वळ पंचवीस. पॉईंट ४८७५ वर करारी हल्ला चढवणारा, अशक्य हा शब्दच ठाऊक नसलेला, उमदा, धाडसी, परिपक्व नेतृत्व व लढवय्या जवान ह्या गुणांची उत्कृष्ट सांगड घातलेला १३ जम्मू काश्मिर रायफल्सचे हे अधिकारी. कारगिल युध्दातील भौगोलिक दृष्ट्या महत्वाचा पॉईंट ५१४० त्याची उंची जास्त होती. शत्रुने त्यावर भक्कम ठाणे उभारले होते. शत्रुला नामोहरम करण्यासाठी पश्चिमेकडून १३ जॅकरिफचे जवान हल्ला करीत होते. कॅप्टन बात्रांचे टोपणनाव होते 'शेरशहा'. शत्रुची त्यांच्यावर नजर होती. ते जसेजसे शत्रुच्या जवळ जाऊ लागले तशी शत्रुची दाणादाण उडू लागली. घाबरलेल्या शत्रुने फुकाचा आव आणत विनाकारण ह्या सिंहाला डिवचले आणि स्वतःच्या मृत्युला आमंत्रण दिले. 'शेरशहा उपर आ रहे हो, अब वापस नही जाओगे' कॅप्टन उत्तरले 'एक घुटेमे उपर आता हूँ! देखते है कौन उपर रहेगा और कौन नीचे.' आपले शब्द खरे करत सरळसोट कड्यावरून शत्रुला अशक्यप्राय वाटणाऱ्या बाजूने ते वर चढले आणि शत्रुला भिडले. त्यांच्या प्रखर हल्ल्यापुढे शत्रुचा निभाव लागणे कालत्रयी शक्य नव्हते. खाली कोसळणाऱ्याआपल्या सहकाऱ्यांना बघून शत्रुचे सैनिक पाठीला पाय लावून भागो भागो' म्हणत पळून गेले. कॅप्टन विक्रम बाबांनी मोठया प्रमाणात दारूगोळा हस्तगत केला. 

तुम्ही मोठी कामगिरी बजावलीत. आता तुम्ही थोडा आराम करा' असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर ते म्हणाले ‘सर ये दिल मांगे मोअर' मला अजून बंकर उद्ध्वस्त करायचे आहेत. कॅप्टन विक्रम पॉईंट ४८७५ वर कूच करू लागले. शत्रुची मोठी कुमक तिथे होती. सोबतचा कॅप्टन नवीन जखमी झाल्यावर या उमद्या अधिकाऱ्याने नेतृत्वाची धुरा उत्स्फूर्ततेने स्वतःच्या खांद्यावर घेतली. इतक्यात एक सैनिक जखमी झाला. त्याला सुरक्षित ठिकाणी खेचून आणण्यासाठी निघालेल्या आपल्या सुभेदाराला 'तू पीछे हट! तू बालबच्चेवाला है' असे म्हणत स्वत: आगडोंबात उडी मारली. शत्रु याच क्षणाची वाट पहात होता. त्यांनी स्वयंचलित बंदूकामधून तुफान गोळीबार सुरू केला. धनुष्यातून सुटलेला बाण असावा तसे ते गोळ्या चुकवत पळत राहिले. पॉईंट ४८७५ वर अरूंद वाटेने पोहोचत ते शत्रुच्या अंगावर धावत गेले. पण निकराने जीवाच्या कराराने लढणाऱ्या या शूरवीराच्या छातीत गोळी लागली. त्या जखमी अवस्थेतही त्यांनी शत्रुची दाणादाण उडवली. त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तो आपले कर्तव्य पूर्ण बजावूनच! पॉईंट ४८७५ वर भारताचा झेंडा फडकला. पॉईंट ४८७५ चे 'कॅप्टन विक्रम बात्रा टॉप' असे नामकरण करून ह्या शेरशहाच्या कतृत्वाला सलाम केला गेला. मृत्युनेही क्षणभर थांबून या बेडर वृत्तीला मुजरा केला असेल, कारण मृत्युच्या हातात हात घालून ते जगले. भरभरून जगले, आणि जीवन कसे आणि किती जगावे यापेक्षा देशासाठी जीवन कसे झुगारावे याचा संदेश देऊन गेले.

खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त,निष्ठा,समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे . दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो,शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी,आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो. सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.  

सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्व सीमांवर वादळवाऱ्यात,बर्फात,पावसात,सैनिक चोवीस तास कडक पहारा देत असतो. तुम्ही निश्चित रहा ,मी जागा आहे असे तो छातीठोकपणे सांगतो.  सीमेपासून दूर असलेल्या शहरातील माणसं -आपल्या ठिकाणी आपलं घर,आपली गाडी,मुलं हाच भारत आणि हेच जग मानणारी माणसं आज बघायला मिळत आहेत. आज आपण कुणाच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगतो आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सैनिक हाच राष्ट्राचा आत्मा आहे हे सांगताना आपल्याला अभिमानच वाटला पाहिजे.

आजचा तरुण हा देशभक्तीने ओतप्रोत भरलेला आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दिवस बाजूला ठेवले तर बाकी दिवसांना आपलं देशप्रेम हे खरंच जागृत असतं का. हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आज प्रत्येक जाणकार,सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी तरुणाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने न जाता त्या वाऱ्याचा  रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत जरुरी आहे. आज वेळ आली आहे आपल्याला अंतर्मुख होण्याची ज्यांनी ज्यांनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या झालेल्या युद्धात शत्रूचा निःपात करण्यासाठी स्वतःच्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या सुखांना तिलांजली दिली ; त्यांच्या त्यागाला आपण खरंच लायक आहोत का ? 

सैन्यदलाबद्दल नितांत आदर,अभिमान,श्रद्धा,विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा,ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही,आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे.  सैनिकांचा सन्मान करणे,त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे. २६ जुलै च्या अतुलनीय कामगिरीसाठी त्यात प्राणार्पण झालेल्या आणि आजवर देशसेवेसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वंदन करूया. शौर्य दक्षम युध्दाय । बलिदान परम् धर्म: ।। या न्यायाने आमचा सैनिक कार्य करतो आहे.

या खऱ्या महानायकांकडून प्रेरणा घेऊन चला २०२० चा भारत हा सुदृढ, संयमी आणि देशप्रेमी अशा असामान्य तरूणांचा देश बनवत नवा भारत घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया..

नागालँडमधील कोहिमा येथील भव्य युद्धस्मारकामध्ये एका योध्याच्या स्मारकावर कोरलेले शब्द प्रत्येकाने आज  आपल्या हृदयातही कोरून ठेवायला हवेत. 

माघारी जेव्हा जाल परतून ,ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा, तुमच्या उद्या साठी आम्ही आमचा आज दिला. 

जयहिंद !! 

Thursday, July 23, 2020

गीतारहस्य


भगवद्गीता हा सर्वसामान्यपणे सर्व माहितीचा ग्रंथ आहे. सर्वच आध्यात्मिक संस्थांचा तो पायाभूत ग्रंथ आहे, पण तो निवृत्तीनंतर अभ्यास करावयाचा ग्रंथ आहे, अशी चुकीची समजूत आपल्याकडे आहे. सर्वच आध्यात्मिक अभ्यास ग्रंथांकडे वृद्धत्व आल्याशिवाय बघायचे नाही,अशी एक चुकीची समजूत आपली झालेली आहे. हे सर्व ग्रंथ वागावे कसे याचे मार्गदर्शन करतात. गीता ही निवृत्तिमार्ग सांगणारी आहे, या विचाराचे खंडन करण्यासाठी या गीतारहस्य ग्रंथाचा जन्म आहे. "गीतारहस्य" लोकमान्य टिळकांनी मंडाले येथे तुरुंगात लिहिले. 

एकांतवासाला तुरुंगात कंटाळून कैदी आत्महत्या करतात किंवा नैराश्याने मनावर परिणाम करून घेतात. अशा ठिकाणी या कर्मयोग्याने संपूर्ण जगाने दखल घ्यावा असा ग्रंथ लिहिला. त्यासाठी लागणारे संदर्भग्रंथ, सरकारने परवानगी दिल्यानंतर पुण्याहून येत असत; पण आपल्याला कोणकोणते ग्रंथ लागणार आहेत, ते तुरुंगात बसून आठवणे, मग ते मागवणे आणि नंतर त्यांचा अभ्यास करून, टिपणे काढून "गीतारहस्य" सारखा कर्मप्रेरक ग्रंथ लिहिणे आणि तेसुद्धा वयाच्या पन्नाशीनंतर? हातात त्रोटक सामग्री असताना,असंख्य बंधने असताना आणि अगणित असुविधा असताना, हे काम सोपे तर नव्हतेच. खरे तर ते अशक्य कोटीतलेच कार्य होते. टिळक म्हणूनच ते करू शकले. आज "गीतारहस्य" ला ११० वर्ष झाली. 

प्रचंड आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि अभ्यासाचा दांडगा व्यासंग यामुळेच सर्व विरोधी गोष्टी असूनही त्यांचा बाऊ न करता टिळक हा ग्रंथ लिहू शकले. तुरुंगवासाचा काळ कसा वापरता येऊ शकतो हे त्यांनी स्वकर्तृत्वाने दाखवून दिले. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणही स्मृती शताब्दी सांगता सप्ताह म्हणून आजपासून गीता रहस्य जमेल तसा वाचण्याचा प्रयत्न करु शकतो. चला जमेल तसा आपल्या परीने गीता रहस्य समजण्याचा प्रयत्न करूया. 

#लोकमान्य  #टिळकजयंती #गीतारहस्य #स्मृतीशताब्दी

Wednesday, July 22, 2020

जीवनाला कलाटणी देणाऱ्या टप्प्यावर...



सर्वप्रथम जीवनाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यावर यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आता आपण ह्या टप्प्यावर असतांना राष्ट्रहित जपण्यासाठी आदर्श युवक म्हणून समाजासमोर येणार आहात. विद्यमान पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे समर्थपणे भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी तत्पर आहेत. आज  भारताची विश्वगुरुपदाकडे यशस्वीरीत्या वाटचाल सुरू आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपणंही आपल्या कर्तव्याचे पालन करण्याची आज गरज आहे. आज स्वामी विवेकानंद तरुणांचे आदर्श असायला हवे. ते म्हणतात,जग जिंकण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे. भारताचा सर्व जगावर विजय हेच आपल्यासमोर महान ध्येय आहे. प्रत्येकाने त्यासाठी तयार असले पाहिजे. ह्याहून काहीच कमी नको आणि त्याकरिता आपण सिद्धता केली पाहिजे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. भारतीयांनो, उठा व आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने जग जिंकून घ्या. जडवाद व तज्जन्य दुःखे यांचे निराकरण जडवादाने कधीही होणार नाही. आध्यात्मिकतेने पाश्चिमात्य देशांवर जय मिळविला पाहिजे. त्यांनाही हळूहळू हे उमजत आहे की राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर आध्यात्मिकता अंगी बाणविली पाहिजे. ते याविषयी उत्सुक असून याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

या ज्ञानाचा पुरवठा कोठून होणार आहे तर भारताच्या प्राचीन थोर ऋषींचा संदेश घेऊन प्रत्येक देशात जाण्यासाठी तयार असलेले लोक कोठे आहेत? हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध असलेली माणसे कोठे आहेत? सत्याच्या प्रसारासाठी असे वीर पुरुष हवे आहेत आणि ते आपल्यातीलच आहेत हाच विश्वास ठेवायला आपल्याला आता सिद्ध व्हायचे आहे.

वेदान्तातील थोर तत्त्वे व संदेश परदेशात जाऊन विशद करण्यासाठी असेच शूर कार्यकर्ते हवे आहेत. जगाला हे सारे हवे आहे, अन्यथा जगाचा नाश ओढवेल. अवघे पाश्चिमात्य जगत आज जणू काही ज्वालामुखीच्या तोंडावर बसले आहे. उद्याच त्याचा स्फोट होऊन त्याचे तुकडे तुकडे उडू शकतील. जगाचा प्रत्येक कोपरान् कोपरा पाश्चिमात्यांनी धुंडाळलेला असूनही त्यांना शांती लाभलेली नाही. ही शांती आज भारत जगाला देण्यासाठी कटिबद्ध आहे. आज भारत तरुणांचा देश आहे. ह्या तरुणांच्या साथीने भारत जगावर अधिराज्य गाजवू शकतो. विश्वगुरु भारताचे स्वप्न तरुणांच्या प्रयत्नाने होणार आहे. परिवर्तनाची नांदी सुरू झाली आहे. आज आपण राष्ट्रहित जपत सदैव तयारीत असायला हवे. आज आनंदात सगळेच विद्यार्थी या टप्प्यावर भांबावून गेलेले दिसतात पण प्रत्येकाने शांतपणे ही स्थिती हाताळायला हवी. आयुष्यातील ह्या टप्प्यावर जबाबदार नागरिकाचे काही कर्तव्याची जाणीवही ठेवण्याची गरज आहे. 

सामाजिक जीवनात अनेक ठिकाणी आपण आपल्या काही सामाजिक जबाबदा-या पार पाडतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. आपल्या आजूबाजूला आपण ब-याच वेळा चिमुकल्यांना विविध ठिकाणी राबताना पाहतो. काम करण्याचे वय नसताना अनेक धोकादायक आणि कठीण कामे त्यांना करताना पाहतो. आपल्यापैकी किती जण या विरोधात आवाज उठवतात? एकीकडे लहान मुले म्हणजे ‘देशाचे आधारस्तंभ’ म्हणायचे आणि दुसरीकडे याच ‘आधारस्तंभांना’ राबताना पाहून गप्प बसायचे, हे कितपत योग्य वाटते? आपण ‘जबाबदार नागरिक’ असाल तर आपल्या आजूबाजूला असलेल्या एनजीओंना, सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती नक्कीच दिली पाहिजे.

देशावर माझं प्रेम आहे...पण ते उफाळून येतं फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला. इतर दिवशी मी देशासाठी काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याकडे नाही. स्वतःच्या जगण्यामध्ये देशासाठी जगणं आम्ही विसरुन गेलो आहोत. त्यामुळेच अत्याचार, भ्रष्टाचार अशा विकृतींनी डोकं वर काढलं आहे. देश महासत्ता होण्यासाठी प्रत्येकानंच देशाच्या विकासाचं स्वप्न पाहावं आणि ते पूर्ण करण्यासाठी तत्परता ही दाखवण्याची गरज आहे. इतिहासात घडल्याप्रमाणे भारताला जर एक शक्तिशाली राष्ट्र बनवायचं असेल तर बदलाची सुरुवात स्वतःपासून करायला हवी आणि आजच्या तरुणाने ते ठरवले तर तो सहज ते आचरणात आणू शकतो.

आज काही अपवाद वगळता शिस्तीचा आणि आपला तसा दूरान्वयानेही संबंध येत नाही. तसे नसते, तर आपण ट्रॅफिक सिग्नल पाळले असते, रस्त्यावर थुंकलो नसतो, रांगेचे महत्त्व आपल्याला वेगळे सांगायला लागले नसते, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने बोललो नसतो.. वगैरे वगैरे. सध्या आपल्यावर ‘कोरोना’ नामक महामारीचे संकट कोसळले आहे, की आपल्याला शिस्त पाळणे आवश्‍यक झाले आहे. पण आपण शिस्त पाळतो का? हा खरा प्रश्‍न आहे. चला बदल घडवून आणणे हे आपल्या हातात आहे. स्वामी विवेकानंदांच्या चैतन्यपूर्ण आणि आवेशपूर्ण शब्दांत हीच ताकद जाणवते ते म्हणतात,

" भारत पुन्हा उठेल - संदेहच नाही. पण जडाच्या शक्तीने नव्हे, चैतन्याच्या शक्तीने. ध्वंस-विनाशाचा झेंडा नाचवून नव्हे,
शांति-प्रेमाची विजयपताका फडकवीत.... एक जिवंत दृश्य मात्र माझ्या दृष्टीला दिसत आहे ते हे की आपली ही प्राचीन भारतमाता पुनश्च जागृत झाली आहे. नवसंजीवन लाभून पूर्वीपेक्षाही अधिक महिमाशाली होऊन आपल्या सिंहासनावर गौरवाने अधिष्ठित झाली आहे. शांतीच्या आणि आशीर्वादांच्या शब्दांनी समस्त वसुधातलावर तिच्या शुभनामाचा जयघोष करा."

नात्यातील विश्वास...



नारायण मूर्ती व सुधा मूर्ती ह्यांच्यावरील काहीही वाचतांना कायमच वेगळा अनुभव असतो. असाच एक प्रश्न वाचला. खूप साऱ्या लोकांनी नारायण मूर्तीना सुधा मूर्ती ह्यांना इन्फोसिसमध्ये न घेण्याच्या भूमिकेवरून प्रश्न केले होते. त्यांच्या प्रश्नांचा रोख असायचा, सुधांसारख्या विभागीय शाळा परीक्षा आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रथम आलेल्या,संगणक विषयात सुवर्णपदक मिळविणाऱ्या,स्वप्रकाशाने तेजोमय असणाऱ्या स्त्रीला केवळ गृहिणी बनवून ठेवणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय नव्हता का? 

नारायण मूर्तीऐवजी सुधा मूर्ती ह्यांनी  या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्या लिहितात, “त्यांची स्वप्ने माझ्या स्वप्नाहून श्रेष्ठ आहेत. माझे स्वप्न कुंपणातले स्वप्न आहे. माझे काम माझ्या भविष्यापर्यंत,परंतु त्यांचे स्वप्न विशाल आहे. त्यांचे स्वप्न देशाची संपत्ती कशी वाढेल, या प्रश्नाशी संबंधित आहे. त्यामुळे मला असे बिलकूल वाटत नाही की, कंपनी सोडण्याचा निर्णय घेऊन मी काही चुकीचे केले आहे. जर माझे स्वप्न त्यांच्या स्वप्नाहून वेगळे आणि मोठे असते तर मला खात्री आहे की, देशाच्या विकासासाठी त्यांनी मी जो त्याग केला आहे, त्याहून अधिक त्यागाची तयारी दाखविली असती. त्या पुढे म्हणतात, हा त्याग कष्टप्रद होता; परंतु या गोष्टीला टाळता येणे शक्य नव्हते.

एका अनुचित निर्णयानंतरही त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली. केवळ घर सांभाळून त्या थांबल्या नाहीत. शिक्षण, लेखन आणि सामाजिक कार्यात त्यांनी आपली म्हणावी अशी दखलपात्र ओळख निर्माण केली. विचार माणसाला केवळ वैचारिकदृष्ट्या घडवतात, संस्कार देतात असे नव्हे,तर समृद्धी व संपन्नताही देतात याचे मूर्ती मूर्तीमंत उदाहरण आहेत नारायण मूर्ती व सुधा मूर्ती. 

✍️ सर्वेश फडणवीस

#Infosys #NarayanMurthy #SudhaMurthy  #PrideofIndia

Monday, July 13, 2020

सखा नागझिरा - किरण पुरंदरे

नुकतंच एक पुस्तक वाचून संपवले. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये त्याच चर्चा,त्याच त्या बातम्या हे सगळं नकोसे होत असतांना छान जंगलात फिरून आलो. किरण पुरंदरे लिखित " सखा नागझिरा" ह्या पुस्तकातून नागझिरा जंगल सफारी एकदम मस्त झाली. २०११ ला त्यांचं स्वाक्षरी असलेलं पुस्तक हाती पडले. बऱ्याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा आनंद काही वेगळाच होता. जंगल,जंगल सफारी ह्यावरील पुस्तक वाचनाची अनुभूती कायमच वेगळी असते. व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तकं म्हणजे तर शब्दांत सांगता येणार नाही इतकी विलक्षण आहेत. विदर्भ रुक्ष आहे. तिथे गेल्यावर गरमी असते आणि झाडे नाही अशी काहींची तक्रार असतांना ज्या नागझिराचे जंगल साऱ्या पक्षी आणि प्राणी प्रेमींना खुणावते,व्यंकटेश माडगूळकर आणि मारुती चितमपल्ली ह्यांसारखी मंडळी जिथे रमली ते नागझिरा विदर्भात आहे. 

आज आपण माणसांच्या जंगलात राहतो. पण मोबाईल आणि इतर गॅझेटसच्या गर्दीत आपला एकमेकांसोबतचा संवाद सुद्धा हरवत चाललाय. निसर्ग तर खूप दूर आहे. अशा या यंत्रवत धावत्या काळात असेही एकजण आहे जे पक्ष्यांशी गप्पा मारतात, झाडांशी संवाद साधतात, शहरापेक्षा जंगलात रमतात त्यांचे नाव श्री किरण पुरंदरे. 

त्यांचे 'सखा नागझिरा' हे तर अफलातून पुस्तक आहे. तब्बल ४०० दिवस सलग नागझिऱ्याच्या जंगलात एकट्याने दिवसरात्र लपून अत्यंत कष्टपूर्वक गोळा केलेल्या माहितीचा हा ठेवा आहे. शास्त्रीय माहितीची बैठक असलेलं तरीही वाचकाला खिळवून ठेवणारं व प्रत्यक्ष तिथे नेणारं हे अभयारण्यावरचं मराठीतलं तरी संग्रही व वाचनीय पुस्तक आहे. यामध्ये त्यांनीच काढलेले अत्यंत सुंदर फोटोही आहेत. सखा नागझिरा या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘सखा नागझिरा’ तील वास्तव्याचे लपाणातून (लपायची जागा) घेतलेल्या अनुभवांचे, बदलत्या ऋतूंचे, पाणवठ्यावरच्या निस्तब्ध रात्रींचे वर्णन वाचून आपण थक्क होतो. किरण पुरंदरे ह्यांचे पुस्तकं वाचताना, त्यांचं बोलणं एकताना, त्यांच्या सहवासात आपणही निसर्गाशी एकरूप होतो. त्यांच्या उत्साहाची,तळमळ आपणही अनुभवू शकतो इतकी ताकद त्यांच्या लेखणीत आहे.

नागझिरा जंगलातील ४०० दिवसांचा प्रवास सांगताना पुरंदरे म्हणतात, ‘मला निसर्गाच्या सर्व गोष्टींचे कुतूहल आहे, म्हणून मी जंगलात जातो. या ४०० दिवसांत मी सर्व ऋतूचक्र निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली. ४ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात मी राहिलो. जवळपास पंधराशे किमींचा पल्ला सायकलने गाठला आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्याबरोबर निसर्ग होता. जंगलातला कोणताही प्रकल्प हा तेथील स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या निसर्ग संवर्धन प्रकल्पात नागझिरा येथील आदिवासींचा विश्वास संपादन केला. देशात १३ हजारांहून अधिक पक्षांच्या प्रजाती आहेत. त्यातील ५४० प्रजाती राज्यात आढळतात. कोतवाल, नीलपंखीसारखे पक्षी शेतकऱ्याचे मित्र आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पुरंदरे यांनी नागझिरा जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या साह्याने जंगलातील पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पर्यावरणस्नेही पाणवठ्यांची निर्मिती जागोजागी करत वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ह्या काळात आदिवासी मुलांना शिकवण्याचे कामही त्यांनी केले. पुरंदरे यांना बहुतांश पक्षांचे आवाज हुबेहुब काढता येतात आणि त्यांनी आवाज काढल्यावर पक्षीही प्रतिसाद देतात याचे प्रात्यक्षिक पुरंदरे अनेकदा करत असतात. 

एकदम काळजाला भिडेल अशी भाषा,नागझिऱ्याच्या निसर्ग संपदेच सौंदर्यपूर्ण वर्णन आणि त्याबरोबरच तिथल्या प्रश्नांची जगाला जाणीव होईल असे संवेदनशील लिखाण यामुळे थोड्याच दिवसात हे पुस्तक वाचून संपून जाते. खरंतर निसर्ग कायमच खुणावत असतो. हिरव्याकंच वळणवाटा आणि आजूबाजूला नसलेली मतलबी माणसं. असं वाटतं सगळं विसरून आयुष्य झोकून द्यायला एक निसर्गासारखं दुसरं रसायन नाही. एक १००% निसर्गप्रेमी माणूस, कविमनाचे, जंगलाविषयी अपार प्रेम असलेले, तिथल्या मातीशी एकरूप झालेले पक्षीवेडे किरण पुरंदरे आणि त्यांचे अत्यंत वाचनीय पुस्तक " सखा नागझिरा".

✍️ सर्वेश फडणवीस 

#नागझिरा #किरण_पुरंदरे