नारायण मूर्ती व सुधा मूर्ती ह्यांच्यावरील काहीही वाचतांना कायमच वेगळा अनुभव असतो. असाच एक प्रश्न वाचला. खूप साऱ्या लोकांनी नारायण मूर्तीना सुधा मूर्ती ह्यांना इन्फोसिसमध्ये न घेण्याच्या भूमिकेवरून प्रश्न केले होते. त्यांच्या प्रश्नांचा रोख असायचा, सुधांसारख्या विभागीय शाळा परीक्षा आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रथम आलेल्या,संगणक विषयात सुवर्णपदक मिळविणाऱ्या,स्वप्रकाशाने तेजोमय असणाऱ्या स्त्रीला केवळ गृहिणी बनवून ठेवणे हा त्यांच्यावर केलेला अन्याय नव्हता का?
नारायण मूर्तीऐवजी सुधा मूर्ती ह्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्या लिहितात, “त्यांची स्वप्ने माझ्या स्वप्नाहून श्रेष्ठ आहेत. माझे स्वप्न कुंपणातले स्वप्न आहे. माझे काम माझ्या भविष्यापर्यंत,परंतु त्यांचे स्वप्न विशाल आहे. त्यांचे स्वप्न देशाची संपत्ती कशी वाढेल, या प्रश्नाशी संबंधित आहे. त्यामुळे मला असे बिलकूल वाटत नाही की, कंपनी सोडण्याचा निर्णय घेऊन मी काही चुकीचे केले आहे. जर माझे स्वप्न त्यांच्या स्वप्नाहून वेगळे आणि मोठे असते तर मला खात्री आहे की, देशाच्या विकासासाठी त्यांनी मी जो त्याग केला आहे, त्याहून अधिक त्यागाची तयारी दाखविली असती. त्या पुढे म्हणतात, हा त्याग कष्टप्रद होता; परंतु या गोष्टीला टाळता येणे शक्य नव्हते.
एका अनुचित निर्णयानंतरही त्यांनी अनेक शिखरे पादाक्रांत केली. केवळ घर सांभाळून त्या थांबल्या नाहीत. शिक्षण, लेखन आणि सामाजिक कार्यात त्यांनी आपली म्हणावी अशी दखलपात्र ओळख निर्माण केली. विचार माणसाला केवळ वैचारिकदृष्ट्या घडवतात, संस्कार देतात असे नव्हे,तर समृद्धी व संपन्नताही देतात याचे मूर्ती मूर्तीमंत उदाहरण आहेत नारायण मूर्ती व सुधा मूर्ती.
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment