नुकतंच एक पुस्तक वाचून संपवले. सध्याच्या लॉकडाऊन मध्ये त्याच चर्चा,त्याच त्या बातम्या हे सगळं नकोसे होत असतांना छान जंगलात फिरून आलो. किरण पुरंदरे लिखित " सखा नागझिरा" ह्या पुस्तकातून नागझिरा जंगल सफारी एकदम मस्त झाली. २०११ ला त्यांचं स्वाक्षरी असलेलं पुस्तक हाती पडले. बऱ्याच वर्षांनी पुन्हा वाचण्याचा आनंद काही वेगळाच होता. जंगल,जंगल सफारी ह्यावरील पुस्तक वाचनाची अनुभूती कायमच वेगळी असते. व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तकं म्हणजे तर शब्दांत सांगता येणार नाही इतकी विलक्षण आहेत. विदर्भ रुक्ष आहे. तिथे गेल्यावर गरमी असते आणि झाडे नाही अशी काहींची तक्रार असतांना ज्या नागझिराचे जंगल साऱ्या पक्षी आणि प्राणी प्रेमींना खुणावते,व्यंकटेश माडगूळकर आणि मारुती चितमपल्ली ह्यांसारखी मंडळी जिथे रमली ते नागझिरा विदर्भात आहे.
आज आपण माणसांच्या जंगलात राहतो. पण मोबाईल आणि इतर गॅझेटसच्या गर्दीत आपला एकमेकांसोबतचा संवाद सुद्धा हरवत चाललाय. निसर्ग तर खूप दूर आहे. अशा या यंत्रवत धावत्या काळात असेही एकजण आहे जे पक्ष्यांशी गप्पा मारतात, झाडांशी संवाद साधतात, शहरापेक्षा जंगलात रमतात त्यांचे नाव श्री किरण पुरंदरे.
त्यांचे 'सखा नागझिरा' हे तर अफलातून पुस्तक आहे. तब्बल ४०० दिवस सलग नागझिऱ्याच्या जंगलात एकट्याने दिवसरात्र लपून अत्यंत कष्टपूर्वक गोळा केलेल्या माहितीचा हा ठेवा आहे. शास्त्रीय माहितीची बैठक असलेलं तरीही वाचकाला खिळवून ठेवणारं व प्रत्यक्ष तिथे नेणारं हे अभयारण्यावरचं मराठीतलं तरी संग्रही व वाचनीय पुस्तक आहे. यामध्ये त्यांनीच काढलेले अत्यंत सुंदर फोटोही आहेत. सखा नागझिरा या पुस्तकाला उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘सखा नागझिरा’ तील वास्तव्याचे लपाणातून (लपायची जागा) घेतलेल्या अनुभवांचे, बदलत्या ऋतूंचे, पाणवठ्यावरच्या निस्तब्ध रात्रींचे वर्णन वाचून आपण थक्क होतो. किरण पुरंदरे ह्यांचे पुस्तकं वाचताना, त्यांचं बोलणं एकताना, त्यांच्या सहवासात आपणही निसर्गाशी एकरूप होतो. त्यांच्या उत्साहाची,तळमळ आपणही अनुभवू शकतो इतकी ताकद त्यांच्या लेखणीत आहे.
नागझिरा जंगलातील ४०० दिवसांचा प्रवास सांगताना पुरंदरे म्हणतात, ‘मला निसर्गाच्या सर्व गोष्टींचे कुतूहल आहे, म्हणून मी जंगलात जातो. या ४०० दिवसांत मी सर्व ऋतूचक्र निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली. ४ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात मी राहिलो. जवळपास पंधराशे किमींचा पल्ला सायकलने गाठला आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्याबरोबर निसर्ग होता. जंगलातला कोणताही प्रकल्प हा तेथील स्थानिक लोकांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून मी माझ्या निसर्ग संवर्धन प्रकल्पात नागझिरा येथील आदिवासींचा विश्वास संपादन केला. देशात १३ हजारांहून अधिक पक्षांच्या प्रजाती आहेत. त्यातील ५४० प्रजाती राज्यात आढळतात. कोतवाल, नीलपंखीसारखे पक्षी शेतकऱ्याचे मित्र आहेत. त्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पुरंदरे यांनी नागझिरा जंगलात राहणाऱ्या आदिवासींच्या साह्याने जंगलातील पशुपक्ष्यांना पाणी पिण्यासाठी पर्यावरणस्नेही पाणवठ्यांची निर्मिती जागोजागी करत वनसंवर्धनाचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ह्या काळात आदिवासी मुलांना शिकवण्याचे कामही त्यांनी केले. पुरंदरे यांना बहुतांश पक्षांचे आवाज हुबेहुब काढता येतात आणि त्यांनी आवाज काढल्यावर पक्षीही प्रतिसाद देतात याचे प्रात्यक्षिक पुरंदरे अनेकदा करत असतात.
एकदम काळजाला भिडेल अशी भाषा,नागझिऱ्याच्या निसर्ग संपदेच सौंदर्यपूर्ण वर्णन आणि त्याबरोबरच तिथल्या प्रश्नांची जगाला जाणीव होईल असे संवेदनशील लिखाण यामुळे थोड्याच दिवसात हे पुस्तक वाचून संपून जाते. खरंतर निसर्ग कायमच खुणावत असतो. हिरव्याकंच वळणवाटा आणि आजूबाजूला नसलेली मतलबी माणसं. असं वाटतं सगळं विसरून आयुष्य झोकून द्यायला एक निसर्गासारखं दुसरं रसायन नाही. एक १००% निसर्गप्रेमी माणूस, कविमनाचे, जंगलाविषयी अपार प्रेम असलेले, तिथल्या मातीशी एकरूप झालेले पक्षीवेडे किरण पुरंदरे आणि त्यांचे अत्यंत वाचनीय पुस्तक " सखा नागझिरा".
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment