Friday, September 30, 2022

⚜️ आधारवेल : रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई

एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक मोठमोठ्या 
राजकीय आणि सामाजिक उलाढाली घडल्या आणि उत्तरार्ध नवीन सामाजिक बदल घडत होते. दोन्हीं विभागांत कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या व्यक्तिमत्वांत आणि कर्तृत्वांत कालानुरूप फरक दिसून येतो. राणी लक्ष्मीबाई यांनी पहिले अर्धशतक आपल्या अद्वितीय गुणांनी गाजविलें. झाशी संस्थानचे प्रमुख सुभेदार गंगाधररावांचे निधन झाल्यावर झाशीची रणरागिणी लक्ष्मीबाई या आधारवेलीने संस्थानाची नव्याने घडी बसवली. 

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १८ नोव्हेंबर १८३५ मध्ये बनारस येथे झाला. इ. स. १७४३ मध्ये पेशव्यांनी निर्माण केलेल्या झांशी संस्थानचे प्रमुख सुभेदार गंगाधरराव यांच्याशी त्यांचा विवाह
झाला. मूलबाळ होण्यापूर्वीच इ. स. १८५३ साली सुभेदार गंगाधरराव वारल्यानंतर त्या वेळच्या गव्हर्नर-जनरलने लक्ष्मीबाईस दत्तक पुत्र घेण्याची परवानगी नाकारली. कंपनी सरकारविरुद्ध दावा लावण्यासाठी राणीने जॉन लँग याला आपला वकील नेमले. लँग याने राणीचें वर्णन पुढील शब्दांत केले आहे "मध्यम बांध्याची अतिशय सुदृढ अशी ही स्त्री होती. माझ्या मते तिचा चेहरा सौंदर्यदृष्टीने विचार केल्यास जरा जास्त गोल होता. एवढी गोष्ट सोडल्यास या वयातही तिच्या चेहऱ्यांत भरपूर आकर्षण आहे. लहानपणी तिची गणना सौंदर्यवती स्त्रियांत होत असली पाहिजे. तिच्या चेहऱ्यावरून कोणीही तिच्या कुशाग्र बुद्धीची कल्पना करू शकेल. तिच्या नाकाची ठेवण व टपोरे आणि बोलके डोळे हे तिच्या सौंदर्याचे विशेष म्हणून सांगता येतील. "

राणीने इंग्लंडच्या कोर्टात त्यावेळी लावलेला दावा निष्फळ ठरला आणि झांशी राज्य विलीन करून राणीला महिना पांच हजार रुपये पेन्शन देण्याचे ठरले. पूर्वीचा लवाजमा बाळगून त्यावेळी जगण्यास ही रक्कम अगदीच अपुरी होती. राणीच्या स्वाभिमानी स्वभावास हे नियंत्रण दिवसेंदिवस असह्य होऊ लागले. " मी माझी झांशी सोडणार नाहीं " या एकाच वाक्याचा जप करीत राणी आंतल्या आंत धुमसत होती. पण बराच काळ तिला कांहीही करतां आलें नाहीं.

१० मे १८५७ रोजी मेरठ आणि दिल्ली या ठिकाणी फौजेंतील कांहीं शिपायांनीं ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारले. हळूहळू हा वणवा सर्व उत्तर भारतांत पसरला. ५ जूनला झांशी बंडात सामील झाली आणि ९ जूनला सर्व संस्थानांत राणीची सत्ता प्रस्थापित झाल्याचे जाहीर करण्यांत आलें. या दिवसापासून ४ एप्रिल १९५८ पर्यंत सर रोज याच्याशी राणीने यशस्वी रीतीनें सामना देऊन झांशीचें स्वातंत्र्य टिकविले. शत्रुसैन्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले तेव्हां ब्रिटिश सैन्याची फळी फोडून ती निसटली. वाटेंत बुंदेलखंडांत काल्पी व कूंच येथे ब्रिटिश सैन्याशी तिनें घनघोर संग्राम केला. यानंतर तिची तात्या टोपेशीं गांठ पडली. दोघांनी परत सैन्याची जमवाजमव सुरू केली. रजपूत आणि ब्राह्मण सैनिकांचे पायदळ व रोहिले आणि मुसलमान यांचीं घोडदळे सज्ज झाली. बरोबरीनें सर्व कष्ट राणीने हंसतमुखानें सहन केले आणि स्वतः युद्धांत भाग घेतला. तिच्या एका नोकरानें ग्वाल्हेरच्या मेजर मॅक्फसेनला यासंबंधी सांगतांना असे म्हटले आहे कीं, "राणीची अशी पद्धतच असे की स्वतः घोडदळाचे नेतृत्व करायचे आणि किरमिजी रंगाची विजार, त्याच रंगाचे जाकीट आणि पांढरा फेटा बांधून ती घोड्यावर चढली कीं ' हा पुरुष की स्त्री' हे कोणालाहि ओळखतां येत नसे." 

२३ मे १८५८ ला ग्वाल्हेरच्या पूर्वेस १०० मैलांवर असलेले
यमुनेच्या कांठावरील काल्पी हे ठिकाण जनरल रोझने जिंकले. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी जंगलाचा आश्रय घेतला. ह्यू रोझला वाटले की बंडाचा बीमोड झाला. म्हणून त्याने सैन्याला रजा दिली. परंतु राणी आणि तात्या टोपे यांनी अचानक छापा घालून ४ जूनला ऐन उन्हाळ्यांत ग्वाल्हेरचा प्रसिद्ध किल्ला जिंकला. ग्वाल्हेरचा राजा किल्ल्यांतून पळाला आणि बहुतेक सर्व सैनिक राणीच्या बाजूला येऊन मिळाले. त्यावेळी मध्यभारतांतील परिस्थितीचा आढावा घेतांना सर ह्यू रोझनें असें म्हटलें आहे कीं, "राणीची उच्च कुलीनता, सैनिकांना ती दाखवीत असलेलें औदार्य आणि तिचें धैर्य यामुळे ती एक प्रबळ व धोकेबाज शत्रु बनली आहे. ग्वाल्हेरच्या सैन्यांत उत्कृष्ट शिस्तीचे आणि शिक्षण घेतलेले शूर शिपायी असल्याने या प्रथम श्रेणीच्या सैन्यानिशीं राणीचा पाडाव करणे ही अत्यंत कठीण कामगिरी होऊन बसलेली आहे "
ग्वाल्हेरच्या किल्ल्याजवळ मोरार या ठिकाणीं जनरल रोझ १६ जूनला पोहोचला. कँपचा कांहीं भाग व दारूगोळ्याचा सांठा त्यानें आपल्या ताब्यात घेतला. दुसऱ्या दिवशीं ब्रिटिश सैन्यानें फूलबाग येथें राणीच्या घोडदळावर हल्ला केला. ब्रिटिश सैनिकांजवळ आधुनिक पद्धतीच्या तोफा आणि बंदुका होत्या. त्यामुळे तलवारी आणि जुन्या पद्धतीच्या बंदुकांनी सज्ज अशा राणीच्या सैन्याचा पाड लागेना. राणी स्वतःच लढाईचे नेतृत्व करीत होती. तिनें शौर्याची शिकस्त केली. पण दुर्दैवानें ती या लढाईत मारली गेली.

लढाई प्रत्यक्ष पाहिलेल्या एका माणसानें असें लिहून ठेवलें आहे कीं, "राणी,तिच्या पतीची एक प्रेयसी जी तिच्यासारखाच वेष करी व नेहमी तिच्याजवळ राही, सुमारे ४०० घोडेस्वार सोबत घेतले असतांना ब्रिटिश सैन्य चालून येत असल्याची बातमी तिला मिळाली. लागोपाठ ५० निवडक आयरिश घोडेस्वार बंदुकीच्या फैरी झाडीत जवळ येऊन ठेपले. राणीजवळ फक्त १५ स्वार थांबले, बाकीचे घाबरून पळून गेले. राणी पटकन् घोड्यावर स्वार झाली. पण ओढ्यावरून उडी मारण्यास घोडा कचरूं लागला. इतक्यांत तिच्या बरगडीत एक गोळी येऊन घुसली. लगेच एका ब्रिटिश सैनिकाने तिच्या डोक्यावर जोराचा वार केला. तशा स्थितींतही ती थोडी पुढे गेली व धाडकन् खालीं पडून तिचें १८ जून १८५८ साली प्राणोत्क्रमण झालें. शेजारी असलेल्या लोकांनीं तेथेंच तिचें दहन केलें.” अशा रीतीनें ही शूर महिला घरापासून, आपल्या नातेवाइकांपासून दूर युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करतां करता धारातीर्थी पडली. झाशी संस्थांनची ही आधारवेल सदैव तिच्या पराक्रमाने स्मरणात राहणार आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळसहावी

Thursday, September 29, 2022

⚜️ आधारवेल : पुण्यश्लोक अहिल्याबाई

" मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावाचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते. त्या काळच्या परिपाठानुसार पतीमागोमाग सती जाण्याची त्यांनी तयारी केली. मल्हारराव यांना दुसरा कोणाचाच आधार नसल्यानें त्यांनी अहिल्याबाईंना सती न जाण्याची विनंती केली कारण आपल्या पराक्रमाने मल्हारराव जाणून होते की, इंदूर संस्थानच्या आधारवेल म्हणून अहिल्याबाईच योग्य आहे.  

अहिल्याबाई मराठवाडा भागातील चोंडी-चापडगाव या गांवच्या रहिवासी होत्या. पाटील माणकोजी शिंद्यांची ही मुलगी. इ. स. १७४३ मध्ये एकदां पेशव्यांच्या सैन्याचा तळ या खेड्यांत पडला होता. मल्हाररावही सैन्यासहित या वेळीं पेशव्यांबरोबर होते.  पेशव्यांनी आठ वर्षांच्या चिमुरड्या अहिल्येस सहज पाहिले आणि त्यांच्या बद्दल त्यांचे मत अतिशय अनुकूल झालें. अहिल्याबाई सुस्थळी पडाव्या असे वाटून त्यांनी आपले सरदार मल्हारराव होळकर यांना खंडूजींशी त्यांचा विवाह करावा अशी सूचना केली. लग्न ठरले. विवाहसमारंभ मोठ्या थाटात झाला.

दुर्दैवानें खंडुजी अतिशय आळशी, सुखासीन आणि बेजबाबदार वृत्तीचे निघाले. त्यांनी अहिल्याबाईस छळले नाहीं पण त्यांच्या गुणांचीही कदर केली नाही. उलट वयोमानानें अहिल्याबाई अतिशय कर्तृत्ववान आणि कर्तव्यदक्ष बनल्या. मल्हारराव सुद्धा अहिल्याबाईंवर राज्याची कामे निर्वेधपणे सोपवत असत. सारी वसुली, पत्रव्यवहार आणि सैन्याच्या व्यवस्थेची सर्व कामे मल्हाररावांनी त्यांना शिकवली. कित्येक वेळां ते अहिल्याबाईंना युद्धावरहही आपल्याबरोबर नेत असत. अहिल्याबाईना दोन मुले झाली- मालेराव आणि मुक्ताबाई. ह्यांच्या सहवासांत त्यांची वैवाहिक जीवनांतील उदासीनता बरीच कमी झाली पण त्यांच्या शेवटच्या आयुष्यात मुलांनीही त्यांना दुःखच दिले. 

सती न जाण्याचा विचार पक्का केल्यानंतर त्यांनी आपले सर्वस्व राज्यकारभारांतच खर्च करण्याचें ठरविलें. त्यांची जन्मतः असलेली धार्मिक वृत्ती आयुष्यांतील दु:खामुळे वाढतच गेली.  दिवसाचा बराच वेळ त्या पूजा-अर्चा, ध्यान, चिंतन आणि पुराणश्रवण यांत घालवत असत. मल्हारराव स्वर्गवासी झाल्यानंतर मालेरावांकडे औपचारिकरीत्या सुभेदारी आली. परंतु त्याच्या अंगांत कुवत नसल्यानें प्रत्यक्षांत सर्व राज्यकारभार अहिल्याबाईच पाहत होत्या. पेशव्यांना त्यांच्या वकुबाची पूर्ण कल्पना असल्यामुळे मालेरावांच्या निधनानंतर त्यांनी संस्थानची प्रमुख म्हणून अहिल्याबाई यांनाच मान्यता दिली. त्यांचा दत्तकपुत्र तुकोजीराव हा फक्त सेनापति म्हणून काम करत होता.

उत्तम प्रशासक न्याय म्हणून अहिल्याबाईंची ख्याति सर्वदूर होती.
तडजोड आणि मार्दव हे गुण त्यांच्यात भरपूर असले तरी जिथे गरज असेल तेथें त्या वज्रापेक्षांहि कठोर होत असत. त्यांच्या आमदनीच्या सुरुवातीस चंद्रावत नांवाच्या रजपूत जमातीनें बंडाळी सुरू केली. त्यांच्या पुढाऱ्यानें आपले राज्य इंदूरच्या राज्यास जोडण्यासाठी मल्हाररावाकडे सुपूर्त केलें होतें. परंतु मल्हारराव स्वर्गवासी झाल्याबरोबर आपले स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. या वेळी तुकोजी उत्तर हिंदुस्थानांत एका मोहिमेवर गुंतला होता परंतु त्यांच्यासाठी अहिल्याबाई वाट बघत बसल्या नाहीं. असलेल्या काही अधिकाऱ्यांसह स्वत: जाऊन त्यांनी या बंडाचा बीमोड केला. ह्या घटनेचा राज्यांतील लोकांवर इतका परिणाम झाला की, परत त्यांनी त्रास देण्याचा कधीही  प्रयत्न केला नाहीं. अनंत फंदी हा प्रसिद्ध मराठी शाहीर एकदां सातपुड्यांतून प्रवास करत असतांना भिल्लांनी त्याला अडविले. परंतु आपण अहिल्याबाईकडे जात आहोत असे सांगतांच भिल्लांनी त्याला रक्षण देऊन सुखरूप पोचविले. 

स्वतःच्या मुलांबाबत अहिल्याबाई अतिशय दुर्देवी ठरल्या. मालेराव मनानें फार कमकुवत होते. पुढे त्यांचे डोके फिरले आणि त्यांतच त्यांचा अंत झाला. या दुःखात अहिल्याबाई असतांनाच राघोबा (पेशव्यांचे चुलते ) इंदूरजवळ आले होते. राज्यांत पुरुष वारस नाहींत असे दिसतांच स्वारी करण्याचा त्यांनी बेत केला. अहिल्याबाईस ही गोष्ट समजतांच त्यांनी स्त्रियांचा एक सैन्य विभाग तयार केला आणि राघोबास असें कळविलें कीं, " माझी व आपली रणांगणांतच भेट व्हावी अशी आपली इच्छा दिसते. या गोष्टीस माझी मुळींच हरकत नाहीं. माझा पराभव झाला तरी मी स्त्रीच आहे. पण जर का उलट झाले तर मात्र आपली काय अवस्था होईल याचा विचार करून मग युद्धास सज्ज व्हावे." या संदेशातील मर्म ओळखून राघोबा यांनी आपला बेत बदलला आणि " आपल्या सांत्वनार्थ मी आपणांस भेटू इच्छितों ”असा त्यांनी अहिल्याबाईस निरोप पाठविला.

पुढचा काळ शांततेत गेला. म्हातारपणामुळे जावई स्वर्गवासी झाले आणि त्यांची एकुलती एक मुलगी मुक्ताबाई सती गेल्या. ह्या प्रसंगानें त्यांना इतका जबर धक्का बसला कीं, तीन दिवस त्या अन्नास शिवल्या देखील नाहीं आणि त्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाहीं. पुढें शेवटपर्यंत त्यांनी अतिशय खडतर प्रकारें जीवन व्यतीत केले. १३ ऑगस्ट १७९५ साली अहिल्याबाई स्वर्गवासी झाल्या. 

स्वतःच्या सूक्ष्म निरीक्षणानें मराठी राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या
सर जॉन माल्कमनें अहिल्याबाईसंबंधीं असें म्हटलें आहे कीं, " त्यांची अंतर्गत राज्यव्यवस्था आश्चर्य वाटावी इतकी नमुनेदार होती. त्यांच्या मर्यादा लक्षांत घेऊन असें म्हणावेसें वाटतें कीं ती एका विशुद्ध मनाची आणि आदर्श राज्यकर्ती होती."

अहिल्याबाईंचे स्मारक, त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळें या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कलकत्ता ते बनारस रस्ता तयार करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या "पुण्यश्लोक" झाल्या. इंदूर संस्थानचा  कारभार त्यांनी अत्यंत कर्तबदारीने जवळजवळ तीस वर्षे सांभाळला. मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले. पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या चरणी नमन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळपांचवी

Wednesday, September 28, 2022

⚜️ आधारवेल : पराक्रमी राणी दुर्गावती ।।

मध्यप्रदेश हे राज्य स्त्री राज्यकर्त्यांनी आपल्या पराक्रमाने, नेतृत्वाने, युद्ध कौशल्याने गाजवले नव्हे तर आजही त्यांच्या पराक्रमाचा ठेवा नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. त्यांच्यामुळे मुघल शासकांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. याच मुघल शासकांना हादरवणारी एक शूरवीर वीरांगना राणी दुर्गावती आहे. इतिहास हा ऐतिहासिक असतो. हा ऐतिहासिक ठेवा पिढी दर पिढी हस्तांतरित करतांना तो मुळात आपल्याला माहिती असायला हवा असे कायमच वाटते. अपार पराक्रमी, शौर्यवान, आणि सुव्यवस्था ठेवणारी राणी दुर्गावती या आधारवेलीचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

राणी दुर्गावती यांचा जन्म राजपूत चंदेल राजा किरत राय यांच्या कुटुंबात झाला. राणी दुर्गावती यांचे वडील हे सुध्दा शूरवीर योद्धे होते ज्यांनी महमूद गजनी ह्या क्रूर लुटकर्त्याचा पराभव केला होता त्यामुळे स्वाभाविकच राज्यशासन आणि युध्द कौशल्याचे बाळकडू राणी दुर्गावती यांना लहानपणापासून घरातूनच मिळाले होते. तलवारबाजी, घोडेस्वारी, नेमबाजी यात दुर्गावती निपुण होत्या. ५ ऑक्टोबर १५२४ साली दुर्गाष्टमी या तिथीला जन्म झाल्यामुळे "दुर्गावती" असे त्यांचे नामकरण करण्यात आले.

पुढे राणी दुर्गावती यांचा विवाह गोंड राजवंशातील राजा दलपत शाह यांच्याबरोबर झाला. राजा दलपत शाह यांच्याकडे गोंडवाना राज्याची जबाबदारी त्यांचे वडील राणा संग्राम सिंह यांनी दिली होती, परंतु विवाहाच्या नेमक्या आठ वर्षानंतर राजा दलपत शाह यांचा मृत्यू झाल्याने राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्गावती यांनी माळव्याच्या बाज- बहादुराचा हल्ला आपल्या शौर्याने आणि संघटनकौशल्याने परतवून गोंडवानाचे रक्षण केलें. इतकेच नव्हे तर मोंगलांच्या जोरदार हल्ल्यालाही त्यांनी यशस्वी रीतीनें तोंड दिलें. सधनतेत या राज्याचा नंबर बराच वर लागत होता. चोहो बाजूंनीं आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या धोरणानुसार अकबराने इ. स. १५६४ मध्ये पहिल्या असफखानास गोंडवनावर स्वारी करण्यास पाठविलें. या वेळीं वीर नारायण या आपल्या अल्पवयी मुलाच्या नांवानें राणी दुर्गावती मोठ्या हुशारीनें राज्य- कारभार पहात होती. अबुल फजलनें आपल्या दैनंदिनीत असे नमूद करून ठेवले आहे की राणीचे अगदी बारीकसारीक गोष्टीकडेही लक्ष असे. संकटांची पूर्वकल्पना करून त्यांना तोंड देण्याची तयारी करून ठेवण्याची त्यांची हातोटी असामान्य होती.

अकबराच्या दरबारात राणी दुर्गावतीच्या शौर्य आणि साहसा सोबतच तिच्या रूप सौंदर्याची वार्ता पसरली. त्यावेळी गोंडवाना राज्यावर राणी दुर्गावती ही एक महिला राज्यकर्ती आहे याची सुजात खान याला माहिती होती व त्याने दुर्गावतीला सामान्य स्त्री समजून गोंडवाना वर आक्रमण करण्याची योजना आखली पण पुढे त्यात त्याचा दारूण पराभव झाला. या ऐतिहासिक विजयामुळे राणी दुर्गावतीने नावलौकिक मिळवला आणि आपल्या पराक्रमाने मुघलांची दाणादाण उडवली होती.

बाजबहादुर आणि इतर शत्रूंना वारंवार तोंड दिल्यामुळे राणीला युद्धविषयक अनुभवही खूप मिळाला होता. त्यांच्या सैन्यांत वीस हजार उत्कृष्ट घोडेस्वार होते. राणी दुर्गावती यांना मांडलिक राजाकडून अमाप द्रव्यं मिळालें होतें. बंदूक आणि बाण मारण्यांतील त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. शिकारीचा त्यांना विलक्षण नाद होता. आसमंतात् वाघ आला आहे असें समजलें तर त्याला ठार केल्याखेरीज त्या पाणीसुद्धां घेत नसे. पहिला असफखान चालून येत आहे असे समजतांच त्यांनी प्रतिकाराची जय्यत तयारी केली. शत्रूच्या सामर्थ्याची कल्पना जेव्हां त्यांच्या अधिकाऱ्यांनीं त्यांना दिली तेव्हां त्या म्हणाल्या, " तो न्यायी बादशहा (अकबर) जर स्वतः आला असता तर मी त्याचा सन्मान करणे इष्ट ठरलें असतें. पण या यः कश्चित् सरदारापुढें नमणें मी कधींच मान्य करणार नाहीं. यांपेक्षां धारातीर्थी मरण आलेले शतपटीनें बरें. " एवढे बोलून त्यांनी अंगावर चिलखत चढविलें आणि हत्तीवर स्वार झाल्या. सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या त्या शूर राणीकडे पाहून प्रजाजनांचे डोळे आदरानें भरून आलें होते. खानाच्या सैन्याचा त्यांनी लागोपाठ दोनदां बीमोड केला. तसाच रात्रभर पाठलाग चालू ठेवून त्याचा पूर्ण पराभव करावा असा त्यांचा विचार होता. पण त्यांचे अधिकारी या गोष्टीस कबूल होईनात.

दुसऱ्या दिवशीं सकाळीं पुन्हां युद्ध सुरू होतांच राणीबरोबर फक्त तीन सैनिक उरले. त्यांनी शत्रूशीं मुकाबला केला. शेवटी त्या खूप जखमी झाल्या. त्यांच्या सेवकांनीं त्यांना सुरक्षित स्थळीं नेण्याचें ठरविलें, पण रणांगणात मृत्यु अगर विजय याखेरीज तिसरा विचार त्यांना पसंत पडेना. त्या आपल्या सेवकांना म्हणाल्या,
" युद्धांत पराजय तर झालाच आहे. आणखी पळून जाण्याच्या अपकीर्तीची त्यांत भर कशाला ? शत्रूच्या हातीं माझें नखही
लागतां कामा नये. हा भाला घ्या व माझ्या हृदयांत खुपसून मला वीरमरण द्या. " अशा रीतीनें सुमारें १६ वर्षे राज्य करून राणी दुर्गावती यांनी देशासाठी शेवटी आपले प्राण वेंचले.

अनेक वर्षे या भागांत प्रशासक म्हणून काम केलेल्या स्लीमन याने 'रॅम्बल्स् ऍण्ड रीकलेक्शन्स् ऑफ् ॲन् इंडियन् ऑफीशिअल' या नांवाचें एक पुस्तक लिहिलें आहे. राणी दुर्गावती विषयीं त्यांत तो म्हणतो, " दोन टेकड्यांमधील चिंचोळ्या पट्टींत ज्या ठिकाणीं राणी दुर्गावतीनें देह ठेवला तेथें त्यांची छोटीशी समाधी बांधलेली आहे. या समाधी शेजारी दोहों बाजूंस दोन मोठ्या आकाराचे गोल दगड आहेत. प्रचलित लोककथेनुसार राणीच्या नौबतींनींच या दगडांचें रूप धारण केलें आहे. मध्यरात्रीच्या सुमारास येथून चौघड्यांचा आवाज येतो. आपल्या गतप्राण झालेल्या शेकडों योद्धयांना राणी जणूं या आवाजानें पुन्हां युद्धास उभे राहण्याचे आव्हान करीत असते. " राणीच्या समाधीच्या बाजूनें जाणारे शेकडो भाविक लोक आसपासचे स्फटिकाप्रमाणे चकचकीत छोटे दगड उचलून मोठ्या आदराने ते समाधीवर वाहतात.

राणी दुर्गावतीच्या स्मृति जबलपूर जवळील नर्रई गावातील लोकांनीं शेकडो वर्षे अतिशय आदराने जतन केल्या आहेत. स्वाभिमानी, शूर आणि साहसी राणी दुर्गावतीला वीरमरण याच ठिकाणी आले. आज तिथे राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे आणि तिच्या स्मृती निरंतर अनेकांना प्रेरणा देणाऱ्या आहे. गोंडवाना राजवंशाची आधारवेल असणाऱ्या राणी दुर्गावती यांना नमन.

✍️ सर्वेश फडणवीस

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळचौथी

Tuesday, September 27, 2022

⚜️ आधारवेल : जगन्माता श्रीसारदादेवी !!

मानवजातीच्या उद्धारासाठी अवतरलेल्या वर्तमानयुगात भगवान श्रीरामकृष्ण यांची दिव्यलीला परिपूर्ण करण्याकरिता साक्षात ब्रह्मशक्ती श्रीसारदादेवींच्या रूपात त्यांची सहधर्मचारिणी म्हणून भूतलावर प्रकट झाली. जडवादाच्या - भोगवादाच्या - घोर अंधकारात मग्न अशा वर्तमान जगासमोर दिव्य मातृभावाचा परमपावन असा आदर्श श्रीसारदादेवींनी प्रस्थापित केला. श्रीसारदादेवींचे हे दिव्य मातृत्व आदर्श कन्या, आदर्श पत्नी, आदर्श गृहिणी, आदर्श संन्यासिनी, आदर्श गुरू इत्यादी अनेकविध रूपांतून प्रकट झाले होते. पावित्र्य, सरलता, प्रेम, करुणा, त्याग, सेवा यांसारख्या असंख्य दैवी गुणांनी विभूषित असे त्यांचे सोज्वळ जीवन आणि त्यांच्या श्रीमुखातून सहजपणे निघालेले उपदेश मोहग्रस्त आणि संसारासक्त जीवांना परमप्राप्तीचा मार्ग दाखविणारे होते. श्रीरामकृष्ण यांच्या आधारवेलीवर श्रीसारदादेवी यांनी रामकृष्ण मठाचे कार्य व्यापक उंचीवर नेऊन ठेवले आहे.

श्रीसारदादेवी यांचा जन्म बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील जयरामवाटी या गावी गुरुवार,२२ डिसेंबर १८५३, मार्गशीर्ष कृष्ण सप्तमी तिथीला झाला. सारदादेवी यांच्या वडिलांचे नाव रामचंद्र मुखोपाध्याय आणि आईचे नाव श्यामासुंदरी देवी असे होते. सारदादेवींनी आपल्या जन्माबद्दल म्हटले आहे - “माझाही जन्म त्यांच्यासारखाच (श्रीरामकृष्णांसारखाच) झाला. माझी आई देवदर्शनासाठी शिहड येथे गेली होती. परत येताना एकाएकी शौचाला लागल्यामुळे ती तशीच एका झाडाखाली बसली. शौचाला झाले नाही पण वाटू लागले की उदरात एक प्रकारचा वायू शिरला आहे आणि सारे शरीर जड झाले आहे. आई तशीच बसून होती. ज्या झाडाखाली ती बसली होती त्या झाडावरून एक पाच-सहा वर्षांची सुंदर बालिका खाली आली. तिच्या अंगावर लाल रेशमी वस्त्र होते. जवळ येऊन तिने पाठीमागून आईच्या गळ्याभोवती आपले सुकुमार हात घातले. म्हणाली, 'आई, मी तुझ्या घरी येईन.' इतक्यात आई भोवळ येऊन पडली. थोड्या वेळाने लोकांनी तिला उचलून आणले. त्या बालिकेनेच आईच्या उदरात प्रवेश केला होता. त्यानंतरच माझा जन्म झाला."

वयाच्या सहाव्या वर्षी श्रीसारदादेवी यांचा विवाह श्रीरामकृष्ण यांच्याशी झाला. चोवीस वर्षीय श्रीरामकृष्ण आणि सहा वर्षाच्या श्रीसारदादेवी होत्या. दक्षिणेश्वरी कालीमंदिरात श्रीरामकृष्णांची प्रखर साधना सुरू होती. श्रीरामकृष्णांनी एकीकडे आपल्या त्यागपूर्ण जीवनाचा आदर्श पत्नीसमोर ठेवून उच्च अशा आध्यात्मिक उपलब्धीसाठी आवश्यक असलेले गुण अंगी बाणण्याचे शिक्षण त्यांना दिले, तर दुसरीकडे आपल्या दैनंदिन गृहस्थ जीवनाला आवश्यक असणारे कामकाज, देव, ब्राह्मण, अतिथी यांची सेवा, गुरुजनांप्रती श्रद्धा, लहान मंडळीवर प्रेम, कुटुंबातील लोकांची सेवा आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टी त्यांना शिकवल्या. कुटुंबातील सर्वांचे स्वभाव आणि त्यांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन त्यांच्याशी कसे वागले पाहिजे, नावेमध्ये किंवा गाडीत बसताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, प्रत्येक वस्तूकडे कसे लक्ष ठेवावे लागते, दिव्यात वात कशी ठेवावी लागते या साऱ्या गोष्टी श्रीरामकृष्णांनी सारदादेवींना शिकवल्या. बारीकसारीक गोष्टीही त्यांनी सोडल्या नाहीत. परंतु त्याचबरोबर त्यांनी त्यांना साधन-भजन, ध्यान-धारणा, समाधी यांबद्दलही उपदेश केला. श्रीरामकृष्णांची शिकवण्याची हातोटी विलक्षण होती.

कालांतराने श्रीरामकृष्णांनी एकदा दक्षिणेश्वरला श्रीसारदादेवी यांची जगदंबेच्या त्रिपुरसुंदरी षोडशीरूपात अमावस्येच्या दिवशी ५ जून १८७२ रोजी पूजा केली. श्रीसारदादेवींचे खरे स्वरूप त्यांच्या दृष्टीसमोर स्पष्टपणे प्रकटले होते. षोडशीपूजेच्या माध्यमातून श्रीरामकृष्णांनी फक्त श्रीसारदादेवींमधील दिव्य मातृत्वाला जागृत केले असे नाही तर या पूजेद्वारे त्यांनी संपूर्ण स्त्रीजातीला गौरवान्वित केले. तिला सर्वोच्च सन्मानाचे पद प्रदान केले. "या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।" हा मंत्र श्रीरामकृष्णांनी केलेल्या श्रीसारदादेवींच्या षोडशीपूजेने सार्थ झाला होता.

श्रीसारदादेवी अगदी पहिल्यांदा इ.स. १८७२ मध्ये दक्षिणेश्वरी आल्या होत्या. तेव्हापासून १५ ऑगस्ट १८८६ मध्ये श्रीरामकृष्णांनी महासमाधी घेतली तोपर्यंतचा साधारण पंधरा वर्षांचा काळ हा श्रीसारदादेवींचा साधनाकाल म्हणता येईल. यावेळची त्यांची सर्वात मोठी साधना म्हणजे श्रीरामकृष्णांची सेवा. या सेवेच्या माध्यमातूनच त्यांचे दांपत्यजीवन परिपूर्ण झाले होते. श्रीसारदादेवींचा अवतार विश्वमातृत्वाचा आविष्कार करून देण्यासाठी झाला होता. या कालावधीमध्ये त्या आदर्श पत्नीच्या रुपात आपल्याला दिसून येतात. पति-पत्नी यांनी संसारात कसे राहावे हाही आदर्श श्रीरामकृष्ण व सारदादेवी यांच्या दांपत्य - जीवनावरून आपल्याला कळून येतो.

श्रीरामकृष्ण संघाची स्थापना व्हावी, संघाचा प्रसार व्हावा म्हणून श्रीसारदादेवी कायम व्याकुळ असत श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी श्रीसारदादेवी पुढे आल्या होत्या. श्रीरामकृष्णांच्या  एका संन्यासी भक्ताजवळ त्या बोलल्या होत्या, त्या म्हणाल्या की देहत्यागानंतर मी त्यांची प्रार्थना करत असे," तुमच्या नावाने ज्या तरुण मुलांनी घरदार सोडले, त्यांना जाड्याभरड्या अन्नवस्त्राची ददात पडू देऊ नका. तुमचा आदर्श, तुमचा मनोभाव हृदयात बाळगून त्यांनी एकत्र राहावे व संसारतापाने दग्ध झालेल्या संसारी लोकांनी त्यांच्याकडे यावे, त्यांच्याकडून गोष्टी ऐकून शांती प्राप्त करावी, यासाठीच तर संघ स्थापन व्हावा." आणि ही इच्छा पूर्ण झाली. स्वामी विवेकानंद आणि इतर संन्यास्यांच्या प्रयत्नाने श्रीरामकृष्ण संघ कालांतराने रामकृष्ण मठ म्हणून सर्वदूर ओळखल्या जाऊ लागला. श्रीरामकृष्ण परमहंसांनी केलेल्या कार्याच्या आधारवेली असणाऱ्या श्रीसारदादेवी यांनी कार्यात सुसूत्रता आणली आणि २० जुलै १९२० रोजी रात्री दीड वाजता शिवयोग साधत श्रीसारदादेवी यांनी महासमाधीद्वारा आपले अवतार कार्य संपविले. स्थूल दृष्टीने श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी झालेला वियोग चौतीस वर्षांनंतर संपुष्टात आला. श्रीरामकृष्णांच्या अवतार समाप्ती नंतर रामकृष्ण मठाच्या आधारवेल असणाऱ्या श्रीसारदादेवी यांनी दया, करूणा, सहानुभूतीने आणि मातृत्वाच्या स्पर्शाने हजारो लोकांच्या जीवनात सुगंध पसरविला.

लोककल्याणासाठी, लोकशिक्षणासाठी श्रीसारदादेवींनी देह धारण केला होता ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी केलेली सर्वांची सेवा. एकीकडे 'ब्राह्मी स्थिती' आणि दुसरीकडे'अबाध कर्म' - हे दोन त्यांच्या जीवनाचे मुख्य पैलू होते. साधन-भजन यांमध्ये आणि सेवेमध्ये त्या समान भावाने मग्न होत. असा समन्वय असलेले जीवन क्वचितच पाहावयास मिळते. श्रीसारदादेवींच्या सुकोमल चरणी शिरसाष्टांग नमस्कार.

✍️ सर्वेश फडणवीस

#आधारवेल #लेखमाला #नवरात्र #माळतिसरी

Monday, September 26, 2022

⚜️ आधारवेल : राजमाता जिजाबाई !!

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा तो काळ होता. मुस्लीम राजसत्ता साऱ्या भारतभर धुमाकूळ घालत होती. सर्व भारतीय जनता अन्यायाच्या आणि अमानुषतेच्या घोड्यांच्या टापांखाली तुडवली जात होती. विशेषत: महाराष्ट्रात हे क्रौर्य फार प्रकर्षाने दिसत होते. कारण तेराव्या शतकापर्यंत येथे देवगिरीच्या रामदेवराव यादवांची सुखी, समृद्ध सत्ता नांदत होती. त्यांच्या छायेखाली मराठी माणूस कलास्वाद घेत, दानधर्म करीत, शांत समृद्ध जीवन जगत होता. धान्य, कापड यांचा परदेशी व्यापार चालत होता आणि अचानक अल्लाउद्दीन खिलजी आपल्या अफाट आणि दमदार सेनेसह महाराष्ट्रात घुसला. कोणाला कल्पनासुद्धा आली नाही. सुखी जीवनाचा असा क्षणात विध्वंस झाला. शत्रुला प्रतिकार झालाच नाही, त्यामुळे तो आला आणि आपली फौज आणि अंमल येथे ठेवून गेला. खऱ्या अर्थाने अराजकाला सुरूवात झाली. अल्लाउद्दीनने जाताना प्रचंड लूट बरोबर नेली होती. त्यामुळे मराठी माणूस दरिद्री झालेला होता. त्यातच तो मनानेही खचला होता. घरदार, बायका- मुलं, गुरं-ढोर कशाची शाश्वती राहिली नव्हती. गोठ्यातली गाय किंवा घरातील स्त्री केव्हा नाहीशी होईल याचा नेम राहिला नव्हता. जुनी मंदिरे फोडून तेथे मशिदी उभ्या राहत होत्या. सक्तीने धर्मांतरे होऊ लागली. कारण मोगलांचे मराठी भाषेवर, धर्मावर, देवावर, शास्त्रांवर, इतिहास -परंपरा कशाकशावर प्रेम नव्हते, उलट कट्टर वैरच होते. येथे जे जे आहे ते आपल्यासाठीच आहे असे समजून हे यवन वागत होते, राहत होते. सर्वावर सत्ता गाजवीत होते पण हे होत असतांना जिजाबाईंचे मन उद्विग्न होत होते.

मालोजी नावाच्या दुसऱ्या एका सरदारास निजामशहाने पुणे व सुपे आणि शिवनेरी व चाकण हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते आणि या मालोजी राजांचा मुलगा शहाजी याच्याशीं जिजाबाईंचा इ. स. १६०५ मध्ये विवाह झाला. विवाहा नंतर या उभयतांचीं कांहीं वर्षे सुखाचीं गेलीं, पण नंतर शहाजी आणि लखुजी जाधव यांचे कांहीं कारणानें वैमनस्य आलें. लखुजी जाधव दिल्लीच्या औरंगजेबास मिळाले. शहाजी मात्र निजामशहाशीं एकनिष्ठ राहिले. निजाम शहाने शहाजीस आपला प्रमुख सल्लागार व सेनापति नेमले. 'पति कीं पिता ' असा यक्षप्रश्न जिजाबाईपुढे उभा राहिला. कर्तव्यबुद्धीनें भावनेवर मात करून जिजाबाईंनी माहेराचे पाश कायमचे तोडून टाकले. या कौटुंबिक विरोधांत जिजाबाईच्या धैर्याचा, निश्चयाचा आणि बाणेदारपणाचा चांगलाच कस लागला. हेच गुण पुढें शिवाजी महाराज यांच्यातही पुरेपूर उतरले. शहाजी राजांनी जिजाबाईना राजकारणाचे धडे दिले, घडवले आणि त्यातूनच राजमाता जिजाबाई शहाजी राजे गेल्यावर सुद्धा मराठ्यांच्या साम्राज्याच्या आधारवेलीवर बहरल्या आणि जिजाबाईनी पुत्र शिवाजी घडवला.

जिजाबाईंचा जन्म गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर १२ जानेवारी १५९८ रोजी सूर्योदयावेळी झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे जिजाबाईंचे जन्मगाव होते. लखोजीराव जाधव हे जिजाबाई यांचे वडील, तर माळसाबाई या त्यांच्या आई होत्या. आई आणि वडील या दोघांचीही घराणी अत्यंत कर्तृत्ववान आणि संस्कारसंपन्न अशी होती. जिजाबाईंच्या बाबतीत विलक्षण आश्चर्य घडले होते. आजही मुलासाठी नवस बोलल्याचे आपण ऐकतो, परंतु जिजाबाईंच्या आईने अर्थात माळसाबाईंनी कर्तृत्वसंपन्न मुलगी जन्माला यावी म्हणून नवस बोलला होता.

जिजाबाई यांचे कर्तृत्व, त्यांचा स्वाभिमान, त्यांची निष्ठा, त्यांचा पराक्रम मराठी मुलुखासाठी समर्पित होता. मराठी मुलुखातील शूरवीर पुरुष आपले रक्त सांडत होते, झुंजत झुंजत मरत होते, परंतु सारे काही परकीयांसाठी होते. आजवर दास्यत्वाचे क्रूर फटके सहन केलेल्या जिजाबाईंना आता दास्यत्वाची कल्पनाच सहन होत नव्हती, त्यांना स्वतःचे राज्य हवे होते, स्वतंत्र तक्त हवे होते, स्वतःचा झेंडा हवा होता, आपली फौज हवी होती, आपला तोफखाना हवा होता, आपला सेनापती हवा होता, आपला प्रधान हवा होता, आपले स्वतःचे सार्वभौम राष्ट्र हवे होते. आपले हे विलक्षण स्वप्न लहानग्या शिवबाकडून पूर्ण करण्याचा निश्चय त्यांनी शिवजन्माच्या पूर्वीपासूनच घेतला होता.

खरंतर गरोदर असताना घोड्यावरून शिवनेरीच्या दिशेने घौडदोड करणाऱ्या जिजाबाईंनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढच रोवली, असे म्हणावे लागेल. अस्मानी-सुलतानी संकटांची बिकट वाट सगळीकडे असताना ही धुरंधर माता किल्ले शिवनेरीवर इ.स. १६३० मध्ये विसावली आणि ह्या सद्गुणी पुत्राला जन्म देऊन 'शिवाई' देवीचा कृपाप्रसाद म्हणून शिवाजी नामकरण करून इतिहासाचे बाळकडू त्यांनी त्याला जन्माला आल्यापासून पाजले. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील पन्नासपैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता जिजाबाई होत्या. आई तुळजाभवानीला त्यांनी प्रार्थना केली होती की कुळाला, देशाला, धर्माला अभिमान वाटेल असा पुत्र जन्माला येऊ दे.

ज्यावेळी पुण्याची जहागीर मिळाली, तेव्हा राजे अवघे १४ वर्षांचे होते. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या. शिवाजीराजेंना प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. राष्ट्र आणि धर्म हे संस्कार करण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना महाभारत आणि रामायणातील कथा सांगितल्या. न्यायनिवाडा करण्याचे धडे महाराजांना त्यांच्या कडूनच प्राप्त झाले. जिजाबाई शिवाजीमहाराजांच्या आद्यगुरू होत्या.

जिजाबाई यांचे सारे आयुष्य म्हणजे स्वराष्ट्रभक्तीने पेटलेला एक उत्स्फूर्त आविष्कार आहे. भारतीय इतिहासातील ते असे काही तेज:पुंज नाव आहे की, ज्याची तुलना क्वचितच इतर कोणाशी होऊ शकते. राजमाता जिजाबाईंचे संपूर्ण आयुष्यच फार धामधुमीत गेलेले आहे. नियतीने त्यांची पदोपदी परीक्षा पाहिली आहे. परंतु आपले सत्त्व, आपला स्वाभिमान या लोकविलक्षण स्त्रीने कदापिही सोडला नाहीच, उलट तत्कालीन गलितगात्र समाजाला स्फूर्ती देण्याचे, त्याच्यामध्ये चैतन्य उत्पन्न करण्याचे लोकविलक्षण काम या राजमातेने केले. राजमाता जिजाबाई लोकमाता होत्या. ही उपाधीसुद्धा त्यांना आपल्या प्रजेविषयी जो कळवळा वाटत होता त्यामुळे प्राप्त झालेली होती.

पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत राजमाता जिजाबाई लढत राहिल्या. राजमाता जिजाबाई ऐंशी वर्षे जगल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण पाहिल्यानंतर अवघ्या तेरा दिवसांतच रायगड लगतच्या पाचाड गावी इ.स.१६७४ मध्ये त्यांनी देह ठेवला.

एका कर्तृत्ववान, तडफदार, अभिमानी स्त्रीचे अस्तित्व संपल्यावर मागे राहिल्या होत्या फक्त सुगंधी स्मृती ज्या कस्तुरीप्रमाणे आसमंत भरून टाकणाऱ्या; तर पुढची कित्येक शतके प्रेरणा देणाऱ्या त्या स्मृतीतून आणि स्वतःच्या जीवनातून त्यांनी खूप काही शिकवले. पुढील पिढ्याही त्यातून बरेचसे शिकतील. कारण स्वदेशाभिमान जागविणाऱ्या अशा आधारवेलींची आजही गरज आहे. राजमाता जिजाबाईंच्या पवित्र,स्फुर्तिदायी स्मृतींना शतशः प्रणाम.

✍️ सर्वेश फडणवीस

छायाचित्र साहाय्य - राजा श्रीमंत भवानराव पंतप्रतिनिधी यांनी काढलेले राजमाता जिजाबाईंचे काल्पनिक चित्र.

#आधारवेल #माळदुसरी

Sunday, September 25, 2022

वेणास्वामी !!

समर्थ शिष्य वेणास्वामी इतकीच आपल्याला त्यांची ओळख आहे. पण सोळाव्या शतकात बालविधवांच्या फार मोठ्या समस्या होत्या. विधवांचे जीवन भयानक होते. त्या काळात समर्थ रामदासस्वामींनी विधवा स्त्रियांना संप्रदायात प्रवेश दिला त्यातील काहींना मठपती बनवले त्यातील मिरज मठाच्या मठपती म्हणून वेणास्वामी यांची निवड समर्थांनी केली. हे त्या काळातील क्रांतिकार्य समर्थांनी घडवले. अत्यंत कणखर मनाच्या असलेल्या वेणास्वामी समर्थ संप्रदायाच्या आधारवेली वर स्थिरावल्या आणि संप्रदाय कार्य व्यापक उंचीवर नेले. वेणा ते वेणास्वामी ही आधारवेल चिंतनीय आहे. 

वेणा यांचा जन्म इ.स. १६२७ मध्ये झाला. कोल्हापूर येथील राधिकाबाई आणि गोपजीपंत देशपांडे यांच्या त्या कन्या होत्या. गोपजीपंत देशपांडे हे कोल्हापूरमधील मान्यवर गृहस्थ होते. वेणाबाईंच्या घरात रामोपासना परंपरेने चालत आली होती. त्यामुळे राम उपासनेचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून चालत आले होते. रामकथा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय त्यांचा होता. वेणाच्या सद्गुणांचे संवर्धन व्हावे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उजळावे त्यांच्या प्रज्ञेचा प्रकाश सर्वत्र पसरावा असे आईवडिलांना वाटत होते आणि त्यासाठी त्यांनी जवळच्या पत्की गुरुजींच्या द्वारे स्वतंत्र शिक्षणाची व्यवस्था केली. कालांतराने मिरजेच्या देशपांडे घराण्यातीलच दत्तात्रेय नावाच्या मुलाशी वेणाबाईंचे लग्न झाले. विवाहानंतर वेणाबाई मिरजेला गेल्या आणि काही काळातच, वयाच्या दहाव्या वर्षी वेणाबाईंना वैधव्य आले. दिवसामागून दिवस जात होते. वीस वर्षांच्या वेणाबाई सासरच्या अंगणात तुळशीवृंदावनाजवळ बसून संत एकनाथांचे भागवत वाचीत असत. भागवत आणि भावार्थ रामायण याने वैधव्याची जखम भरून निघत होती. 

अचानक एके दिवशी ' जय जय रघुवीर समर्थ ' असे म्हणत समर्थ भर दुपारी बारा वाजता भिक्षेसाठी आले. अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ वेणाबाई भागवत वाचीत बसल्या होत्या. एवढे बलदंड आणि तेजस्वी पुरुष त्यांनी पहिल्यांदाच बघितले होते. भिक्षा देऊन त्यांनी सतत समर्थांचा ध्यास घेतला आणि पुढे राधिकाबाई आणि गोपजीपंतासह वेणाबाईंनी समर्थ रामदास स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले. वेणाबाईंना समर्थांनी कीर्तन करण्याची अनुमती दिली होती. त्या मध्ययुगीन काळात विधवा स्त्रीने कीर्तन करणे ही एक क्रांतीच होती. त्याकाळी समाजाच्या उद्धारासाठी क्रांतिकारक पाऊल उचलणाऱ्या सर्वच संतांना जननिंदेला सामोरे जावे लागले आणि समर्थही त्याला अपवाद नव्हते. वेणाबाई,अक्काबाई,अंबिकाबाई या स्त्रियांना त्यांनी अभ्यासास प्रवृत्त केले. वेणाबाईंना तर खूप त्रास सहन करावा लागला. त्यांचे समर्पण म्हणजे एक कसोटीच होती. कोल्हापूर हे त्यांचे माहेर तर मिरज हे सासर होते. समर्थ मिरजेला आणि कोल्हापूरला नेहमी जात होते आणि तिथे त्यांची नेहमी कीर्तने होत. वेणाबाई त्यांच्या कीर्तनांना आवर्जून जात असत. सासू - सासरे संत एकनाथ महाराजांचे अनुगृहीत होते. त्यामुळे सासर आणि माहेर घरातून कोणताच विरोध नव्हता. 

समर्थ प्रत्येक रामनवमी उत्सवाच्या आधी निवडक शिष्य घेऊन भिक्षेसाठी जात असत. त्या काळात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला चाफळात ठेऊन उत्सवाची सर्व जबाबदारी त्याच्यावर सोपविली जात असे. एक वर्ष ही जबाबदारी वेणाबाईंवर सोपविण्यात आली. नेतृत्वाचे गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. विशिष्ट पद्धतीने त्याचा विकास घडवून आणावा लागतो. वेणाबाई समर्थांच्या आज्ञेने चाफळ मठात आल्या. समर्थांनी त्यांना अक्कास्वामींच्या स्वाधीन केलं. संस्कृत, मराठी, हिंदी, उर्दू या भाषांवर वेणाबाईंनी प्रभुत्व मिळवलं. ग्रंथवाचन,ग्रंथलेखन, काव्यरचना आणि गुरुसेवा हा त्यांचा दिनक्रम बनला. समर्थांनी त्यांची योग्यता ओळखून पुढे स्वतंत्र मठाचा कार्यभार त्यांच्यावर सोपवला आणि वेणाबाई त्यांच्या सासरच्या गावी अर्थात मिरजेला 'वेणास्वामी' बनून 'मिरज- मठाधिपती' झाल्या. या काळात मंगल रामायण,छंदो रामायण,संकेत रामायण,लव कुश रामायण,शब्द रामायण,भाषा रामायण अशी अनेक रामायणे, सीतास्वयंवरसारखे ग्रंथ आणि विपुल अभंग रचना अशी मोठी काव्यरचना वेणास्वामींनी केली. धर्मजागृतीचे कार्य करणाऱ्या त्या एक श्रेष्ठ समर्थ सांप्रदायिक मठपती बनल्या.

खरंतर प्रवृत्ती हेच वेणास्वामींचे सासर होते आणि निवृत्ती हे त्यांचे माहेर होते. हे फक्त तिघांना ठाऊक होते. एक समर्थ, दुजी वेणाबाई अन् त्या दोघांचे जीवनातील अद्भुत नाट्याचे साक्षीदार असलेले रामराय. कालांतराने पूर्वरंग संपला आणि उत्तररंग सुरू झाला. 

बंद विमोचन राम । माझा बंद विमोचन राम ।।

सकळही ऋषीमुनी भजती जयासी । एकचि तो सुखधाम ।।

सद्गुरुकृपया ओळखीला जो। कौसल्येचा राम ।।

भावभक्तीच्या सुलभ साधनी । पुरवी सकळही काम ||

शरणही वेणा आत्मारामा । पावली पूर्णविराम।।

बंधनातून सोडवणारा राम केवळ सद्गुरुकृपेने मला दिसला असे भावगर्भ पद वेणास्वामींनी कीर्तनासाठी घेतलं. उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकार समर्थ संप्रदायात फक्त वेणास्वामींना होता. सज्जनगडावर रामरायाच्या आणि समर्थांच्या साक्षीने वेणास्वामी उत्तररंगाची सांगता करत होत्या. वेणास्वामींनी कीर्तन सांगता केली आणि त्याच पावलांशी समर्पण करत वेणास्वामी  समर्थांच्या चरणी पूर्णविराम पावल्या होत्या. 

त्याकाळी माणुसकीचा गळा घोटणाऱ्या, रूढीने माथी मारलेलं वैधव्य आणि त्याने दुर्दैवी जिणं झुगारुन देणाऱ्या एका तेजस्विनीची ही यशोगाथा आहे. जननिंदेचं हलाहल पचवून तमसो मा ज्योतिर्गमय ! मृत्यो मा अमृतं गमय !! असं म्हणत जीवन मुक्तीच्या मार्गावर, आपल्या कडकडीत वैराग्यानं, उत्कट गुरुभक्तीने आणि उदंड प्रयत्नाने समर्थ संप्रदाय आधारवेलीच्या गुरुपीठावर अधिष्ठीत झालेल्या समर्थ शिष्या वेणास्वामींची ही संजीवक जीवन कथा आहे. समर्थ शिष्य वेणास्वामींच्या चरणी नमन.

✍️ सर्वेश फडणवीस

# आधारवेल #माळपहिली


Saturday, September 24, 2022

निसर्गाची मुक्त नजाकत - मुक्तागिरी जैनमंदिर समूह !

मुक्तागिरी हे क्षेत्र विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमा रेषेवर असून विदर्भास ते जवळचे आहे. मुक्तागिरी हे जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. मुक्तागिरीला ‘जैन धर्मीयांची काशी’ असेही म्हणतात. हे ठिकाण महाराष्ट्राच्या अमरावती पासून जवळपास ६५ कि.मी. दूर आहे. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत ५२ पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी सहाशे पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या अतिशय महत्वाच्या क्षेत्रांपैकी हे एक आहे. याच मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आज जाणार आहोंत. 

जैन साधूंना वर्षा ऋतूत हिंसेच्या भीतीने फिरणे शक्य नसे. त्यामुळे ते एका ठिकाणी मुक्काम करत असत. सुरुवातीच्या काळात जैन साधू मनुष्य वस्तीपासून दूर असलेल्या गिरिकंदरात राहून तप करीत होते. नंतरच्या काळात डोंगरात कोरलेल्या लेण्यांमध्ये ते राहू लागले. ही लेणी म्हणजे जैन मंदिरेच होती. इ. स. पू. दुसऱ्या शतकात ओरिसा राज्यात उदयगिरीवर कोरलेले राणी गुंफा नावाचे जैन लेणे प्रसिद्ध आहे. सर्व भारतात अशी सुमारे २०० जैन लेणी किंवा गुहामंदिरे आहेत. अनेक ठिकाणी जैन साधूंच्या समाधीवर स्तूप किंवा चैत्य बांधलेले असून अशा स्मारकांच्या कडेने दगडी कठडे, नक्षीची प्रवेशद्वारे, दगडी छत्र्या, कोरीव काम केलेले दगडी खांब आणि अनेक पुतळे आढळतात. हीच त्यांची प्राचीन वास्तु-शिल्पकला आज अनेक ठिकाणी बघायला मिळते त्याचा अनुभव आपण मुक्तागिरी येथे सुद्धा घेऊ शकतो.

जैनांमध्ये नंदराजांच्या काळी म्हणजे सुमारे २,५०० वर्षांपूर्वी मूर्तिपूजा सुरू झाली असावी. या मूर्ती मुख्यतः तीर्थंकरांच्या असतात पण त्यांच्या प्रभावळीमध्ये यक्ष, यक्षिणी, गणपती, अंबिका, लक्ष्मी, सरस्वती, शिव, विष्णू यांच्या मूर्तीही परिवार देवता म्हणून असतात. सर्व तीर्थंकरांच्या मूर्ती सारख्याच असतात पण त्यांच्या सिंहासनांवर त्यांची जी चिन्हे कोरलेली असतात तसेच त्यांच्या सन्निध असलेल्या क्षेत्रपाल, यक्ष, यक्षिणी आणि त्यांची वाहने यांवरून ती मूर्ती कोणत्या तीर्थंकराची आहे, हे ठरविता येते आणि त्यांच्या काही मूर्ती फारच भव्य आहेत.

जैन मंदिरांची रचना साधारणतः हिंदू मंदिरांप्रमाणेच असते. मंदिराच्या भोवती असलेल्या तटबंदीतून अनेक कोनाड्यांतून जैनमूर्ती बघायला मिळतात. प्रवेशद्वार किंवा द्वारमंडप आणि तेथील तोरण नक्षीकामाने पूर्णपणे व्यापलेले असते. मंदिरासमोर अखंड पाषाणाचे व नक्षीचे ब्रह्मस्तंभ व मानस्तंभ उभे असतात. मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याचा सुशोभित मार्ग असतो. प्रथम आपण देवकुलिकेमध्ये प्रवेश करतो. समोरच अनेक नक्षीदार स्तंभांवर आधारलेला सभामंडप किंवा मुखमंडप असतो. त्यातील छत व भिंती कोरीव किंवा रंगवलेल्या वेलबुट्टीने आणि चित्रांनी भरलेल्या असतात. त्यात जैन पुराणांतील कथा आणि तीर्थंकरांच्या जीवनातील प्रसंग चित्रित केलेले असतात. त्यानंतर गूढमंडप लागतो. त्याला अंतराळ असेही म्हणतात. तेथून आपण गर्भगृहात अर्थात गाभाऱ्यात जातो. तेथील मूर्तींची षोडशोपचार पूजा होत असते. दिगंबरांच्या मूर्तींना मुकुट आणि कुंडले नसतात. तसेच त्यांच्या पूजेत हिंसा टाळण्यासाठी फुलेही वापरत नाहीत. श्वेतांबर मात्र फुले वापरतात आणि मूर्तीच्या नऊ अवयवांची पूजा करतात. दिगंबर फक्त चरणपूजा करतात. काही जैन मंदिरांची शिखरे आमलक (कलाशाकार) पद्धतीची असतात, तर काहींना एक उंच शिखर आणि बाजूंनी उपशिखरे असतात. उत्तरकालीन जैन मंदिरांवर क्वचित इस्लामी शैलीचा घुमट बांधलेला असतो.

मुक्तागिरी आज महाराष्ट्र - मध्यप्रदेश प्रांताच्या महत्त्वपूर्ण अशा पर्यटन स्थळांमधील एक असून निसर्ग आणि धार्मिक क्षेत्र याचे मिलन इथं बघायला मिळते. मुक्तागिरीच्या जवळच सुंदर धबधबा आहे. साधारणपणे जुलै-नोव्हेंबर धबधबा पूर्ण यौवनात असतो. साधारण उंची ८० फूट असून तुषार स्नानासाठी हे स्थळ आज जगभर ज्ञात आहे. या धबधब्याच्या पायथ्याशी साधारण इ.स. १० व्या व ११ व्या शतकातील प्रस्तरात कोरून काढलेला एक भव्य गुंफा समूह बघायला मिळतो. येथील मंदिर समूह चढतांना स्वर्गारोहणाचा आभास होतो. देवालये खूप स्वच्छ आणि नीटनेटकी आहेत. रात्रीच्या रम्य चांदण्यात मुक्तागिरीचा मंदिर समूह अतिशय सुंदर दिसतो. पौर्णिमेच्या रात्री शीतल वातावरण, निसर्गाची मुक्त उधळण, शांत निसर्ग रम्य वातावरणात प्रत्येकाला उत्साह व आल्हाददायक असेच वाटते. 

देश-विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात जैन बांधव वर्षभर दर्शनासाठी येतात. मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र जरी असले तरी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी विविध धर्मांतील पर्यटक गर्दी करतात. येथे प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळता प्रवेश सुरू राहतो. येथील सर्व मंदिर वेगवेगळ्या शतकांतील असून, काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे ४०० फूट उंच पर्वतावर आहेत. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुक्तागिरीचा उल्लेख होतो.

केशर आणि चंदनमिश्रीत पाण्याची वृष्टी होण्यामागे देखील एक दंतकथा ऐकण्यात येते. असे म्हटले जाते की इथे एक मुनी ध्यान करत असताना त्यांच्यापुढे एक मेंढी (शेळी) मृत पावली. तेव्हा त्या मुनींनी त्या मेंढीच्या कानात नमोकार मंत्र म्हटला, त्यामुळे ती मेंढी जिवंत झाली आणि एक देवता बनली. तेव्हापासून या स्थानाला मेंढागिरी सुध्दा म्हटले जाते. त्या दिवसाला येथील लोक निर्वाण दिवस असे सुद्धा म्हणतात. ज्या दिवशी ही घडना घडली तेव्हा देवी-देवतांनी येथे केशर आणि चंदन मिश्रित पाऊस पाडला होता. तेव्हापासून आजतागत येथे काही विशिष्ठ दिवशी आणि चौदसला केशर आणि चंदनाचा वर्षाव होतो. दिवाळीनंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. असे म्हणतात की जर कुणी भक्त पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करून या ठिकाणी गेले तर परत येताना त्यांच्या वस्त्रांचा रंग पिवळा झालेला दिसतो.

जैनांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे पट्टदकल, हळेबीड, देवगढ, खजुराहो, सोनागिरी, मुक्तागिरी, कुंडलपूर, चितोड, अबूचा पहाड, शत्रुंजय पर्वत, गिरनार, पालिताणा, चंपा, पावापुरी इ. ठिकाणी आहेत. वारा, ऊन, पाऊस, ध्वनी, पक्ष्याचे कुंजन, रातकिड्यांचा आवाज, धबधब्याचा निर्गुण,निराकार ध्वनी व तो अनुभवण्यासाठी मुक्त निसर्गाचा आनंद व आस्वाद घेण्यासाठी एकदा तरी इथे अवश्य भेट द्यावी. कॅमेरा आणि बॅग पॅक करत मुक्तागिरीतील निसर्गाची मुक्त नजाकत उधळण्यासाठी हे अद्वितीय जैन मंदिर अर्थात सिद्धक्षेत्र समूह बघण्यासाठी मुक्तागिरीला एकदा तरी नक्की यावे. 

सर्वेश फडणवीस 


Saturday, September 17, 2022

जेथ जगाचे जीवसूत्र , श्री मोहिनीराज असे ।।

प्रवरा नदीच्या तीरावर वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील एक सुंदर असे नेवासे गाव. याच ठिकाणी सकल संतांचे लाडके संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आज भागवत धर्माचे आध्यत्मिक पीठ म्हणूनही या गावाची ओळख आहे. याच नेवासे गावाच्या मधोमध तेथील ग्रामदैवत भगवान विष्णूच्या दश अवतारांपैकी एक मोहिनी अवतारचे श्री मोहिनीराज मंदिर आहे. जगातील एकमेव असे हे प्राचीन मंदिर आजही सुस्थितीत आहे.  याच श्री मोहिनीराज मंदिराच्या गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जाणार आहोत. 

श्री मोहिनीराज मंदिराचे सर्व बांधकाम हेमांडपंथी स्थपती शैलीमध्ये आहे. प्रत्येक दगड हा नक्षीने कोरलेला आहे. हे नक्षीकाम बघण्यासाठी मंदिर अभ्यासक आवर्जून या मंदिराला भेट देतात. विविध प्रकारच्या मूर्ती येथील दगडावर कोरलेल्या आहेत.मोहिनीराज मंदिर अतिशय पुरातन असून, त्याचे बांधकाम अहिल्याबाई होळकरांचे दिवाण श्री. चंद्रचूड जहागीरदार यांनी करून घेतले आहे. 

श्री मोहिनीराज मंदिर बांधकामाबद्दल एक आख्यायिका सांगितले जाते. ती अशी श्री. चंद्रचूड जहागीरदारांना स्वप्नात दृष्टांत झाला की, मोहिनीराजाची मूर्ती प्रवरा नदीच्या पात्रात आहे. बैलगाडीने मूर्ती घेऊन येत असताना ज्या ठिकाणी बैलगाडीची धाव तुटली त्याच ठिकाणी चंद्रचूड जहागीरदार यांनी हे भव्य हेमांडपंथी मंदिर बांधले आहे. येथील प्रवेशद्वारावर भालदार चोपदारच्या आकर्षक आणि सुबक मूर्ती आहेत. भगवान विष्णूची मोहिनी अवताराची ही मूर्ती जिला भक्त "मोहिनीराज" म्हणतात ती अर्धनारी नटेश्वर रूपातील याठिकाणी बघावयास मिळते.  

श्री मोहिनीराज मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर गाभाऱ्यात उंच सिंहासनावर शंख-चक्र-गदा,अमृताची कुपी, नाकात नथ, कमरेला पट्टा, डोक्यावर मुकुट,पायात तोडे व पितांबर परिधान केलेली मनमोहक साडेचार फूट उंचीची भव्य मूर्ती बघायला मिळते. याच मूर्तीच्या शेजारी सुंदर अशी महालक्ष्मीची मूर्ती आहे. अलंकार पूजा करतांना येथील मूर्तीला साडी व पितांबर दोन्ही नेसवतात त्यामुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. 

मोहिनी अवताराची अशी कथा ही प्रचलित आहे की, समुद्र मंथनातून निघालेले अमृत राक्षस गण पळवून नेतात. अमृत प्राप्ती साठी देवगण भगवान विष्णू ला शरण जातात. तेव्हा भगवान विष्णू मोहिनी चे रूप धारण करतात व अमृत प्राशन करण्यासाठी आपापसात भांडणाऱ्या राक्षस गणांसमोर येतात. मोहिनीच्या सौंदर्याला राक्षस गण भुलतात, अमृत वाटण्यात ही मोहिनी मदत करते म्हणून मोहिनी राक्षसांना मदिरा व देवांना अमृत पाजते. हा मोहिनी अवतार अहमदनगर जिल्ह्यातील सध्याच्या नेवासा गावाजवळील गोदावरीच्या तीरावर झाला असे अनेक भक्त मानतात.

श्री मोहिनीराज कथेचा सार ही प्रचलित आहे. देवांचा राजा इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून एकदा वनविहार करीत असतांना महर्षी दुर्वासांची त्यांना भेट होते. महर्षी दुर्वास इंद्राला प्रसादार्थ पुष्पमाला देतात परंतु राजा इंद्र पदाच्या गर्वाने ती माळ गळ्यात न घालता ऐरावत हत्तीच्या सोंडेत देतात व ऐरावत ती माळ पायदळी तुडवीतो. त्यामुळे कोपीष्ट महर्षी दुर्वास अपमानामुळे इंद्राला शाप देतात की 'ज्या ऐश्वर्यामुळे तु गर्विष्ट झालास ते ऐश्वर्य व राज्यपद यांचा नाष होईल.' महर्षीच्या शापामुळे इंद्राचे ऐश्वर्य नाष होते. त्यावेळी दानव युद्धात येतात आणि इंद्राचा पराभव करून राज्यपद हिरावून घेतात. दानवांचा राजा बळी राज्यपदावर बसतो. सर्व देव दानवांच्या राज्यात अत्यंत कष्टी होतात. यज्ञातील त्यांचा भाग त्यांना मिळत नाही. तेव्हा सर्व देव एकत्र येऊन भगवान महाविष्णुची प्रार्थना करुन सर्व ऐश्वर्य परत मिळविण्यासाठी उपाय विचारतात तेव्हा भगवान महाविष्णु, सर्व देव आणि दानव मिळून समुद्र मंथन करण्याचा सल्ला देतात. देव बळीराजाकडे जाऊन दानवांची मदत मागतात. समुद्र मंथनासाठी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी वापरतात. मंदार पर्वत पाण्यात ठेवल्यावर तो समुद्रात बुडू लागतो तेव्हा भगवान महाविष्णु भव्य कासवाचे रूप धारण करून पर्वतास तोलून धरतात. प्रथम देव वासुकीच्या मुखाकडे धरतात. परंतु दानव शेपटीकडे धरण्यास तयार होत नसल्याने देवांनी शेपटीकडे धरून व दानवांनी मुखाकडे धरून समुद्रमंथन सुरू होते. समुद्रमंथनातून १) हलाहल (विष) २) कौस्तुभमणी ३) पारिजातक ४) चंद्र ५) लक्ष्मी ६) शंख ७) रंभा ८) सात मुखाचा अश्व ९) राज १०) कामधेनु ११) धनुष्य १२) धन्वंत १३) अमृत १४) सुरा (दारू) अशी चौदा रत्ने निघतात. बारा रत्नाचे वाटप होतानाच दानव दारू कलश पळवून दंडकारण्यात नेतात. अमृत पळवून नेल्यामुळे देव पुन्हा चिंतेत पडतात ते अमृताचे महाविष्णु मोहिनीरूप घेतात आणी दंडकारण्यात जातात. तेथे दानव अमृता साठी एकमेकांशी भांडत असतात. मोहिनी रूपावर भाळले जाऊन ते मोहिनीला अमृत व दारूची वाटप करण्याची विनंती करतात. सर्व देव तेथे जमतात. देव दानवांच्या वेगवेगळ्या पंक्ती बसवून मोहिनीरूपात विष्णू देवांना अमृत व दानवांना दारू वाटतात. देवांना अमृत वाटतांना चंद्र आणि सूर्यामध्ये राहु नावाचा दानव देवरूपात येऊन बसतो. त्याने अमृत प्राषण करताच चंद्र सूर्य मोहिनी रुपातील विष्णुंना खुणवितात तेव्हा महाविष्णु मोहिनी रूपातच राहुचा शिरच्छेद करतात. तेच हे मोहिनीरूप ! महाविष्णुंनी मोहिनीरूप घेतले म्हणून या देवाला श्री मोहिनीराज असे म्हणतात व त्यांच्या शेजारी या मंदिरात लक्ष्मी आहे.

देशातील लाखो भाविकांचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज आहे. येथील यात्रा महोत्सव, शुद्ध सप्ताह म्हणजे रथसप्तमीपासून सुरु होतो. पौर्णिमेचा उत्सव पाच दिवस असतो आणि त्याच ठिकाणी मोठी गर्दी होत असते. या ठिकाणी तहसीलदार यांच्या हस्ते मानाची पूजा होते व उत्सव मूर्ती मंदिरातून पाकशाळेकडे वाजत गाजत मिरवणूक निघते. चार दिवस पंचधातूची सुबक उत्सव मूर्ती सर्वांच्या दर्शनासाठी खुली असते. चार दिवस उत्सव मूर्तीचे स्पर्श करून दर्शन करता येते. पाच दिवस संपूर्ण नेवासे गावाला अन्नदान होते आणि दानाचा मान मिळण्यासाठी अनेक जण प्रतिक्षेत असतात. एकमेवाद्वितीय असे श्री मोहिनीराज मंदिर एकदा आवर्जून बघण्यासारखे आहे. 

सर्वेश फडणवीस 


Friday, September 16, 2022

◆ भक्तीभावाची मांगल्यमूर्ती - एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी

कर्नाटक संगीताची पताका आपल्या जादुई आवाजाने जगभर नेणाऱ्या विदुषी गायिका म्हणजे भारतरत्न एम.एस. सुब्बालक्ष्मी. आपल्यापैकी अनेकांकडे रोजच्या दिवसाची सुरुवातच यांच्या व्यंकटेश सुप्रभातम ने होते. मदुरई षण्मुखनीदवु सुब्बुलक्ष्मी अर्थात प्रख्यात कर्नाटक शास्त्रीय गायिका एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी. अत्यंत लवचिक आणि कर्नाटकी संगीताचा बाज असलेला मोहक आवाज लाभलेल्या विदुषी म्हणजे भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी. 

आवाजाबरोबरच शब्दोच्चारावर विशेष भर देणाऱ्या गायिकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर घेता येईल. कपाळावर असलेलं ठसठसीत कुंकू, नाकाच्या दोन्ही नाकपुडीतील चमकी, कांजीवरम साडी आणि चेहऱ्यावरील सात्त्विक तेजाचा भाव हे सगळं बघतांना प्रसन्नतेची वेगळीच ऊर्जा जाणवते. मध्यंतरी यु ट्यूबवर त्यांची मुलाखत ऐकली होती त्यात त्यांनी म्हंटले होते, ‘मी एक विद्यार्थी आहे आणि संगीत हा महासागर आहे. जे गायचे आहे त्या गाण्याचा अर्थ समजून घेणे आणि प्रत्येक शब्दाचा अचूक उच्चार शिकून घेणे ही माझी सवय आहे’, आणि हे ऐकल्यावर जाणवले की त्यांनी उत्कृष्टतेचा किती ध्यास घेतला असेल. खरंतर भक्तीच्या रंगाला भाषेचा, जाती- पातीचा , देश-प्रांताच्या मर्यादा येत नाही हेच त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या आवाजाचे वेगळेपण हे त्याचेच द्योतक आहे. आत्मभान विसरून त्यांनी परमेश्वराला मारलेली आर्त हाक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एकच असते याची प्रचिती सुब्बुलक्ष्मी यांना ऐकतांना कायम जाणवते. सुब्बुलक्ष्मी यांच्या इतक्या गुणी पण विनयशील गायिका क्वचितच आढळतील. 

त्यांच्या यशाला विनम्रतेबरोबर आध्यात्मिकतेचेही भक्कम पाठबळ होते. आपल्या आयुष्यातील कोणतेही ‌मोठे निर्णय त्या कांची कामकोटी मठाच्या परमाचार्यांच्या अनुमतीनेच घेत असत. भारतातील अनेक भाषांतील संतांच्या भक्तिपर रचना त्यांनी गायिल्याच नाही तर लोकप्रियही केल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, नम्रता, आणि समर्पणशीलता ह्या गुणांची श्रीमंती त्यांच्याकडे बघितल्यावर सहज जाणवते. भक्तिभाव आणि सात्त्विकता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता आणि तोच त्यांच्या गायनातुनही जाणवतो. 'गायनातून आपण ईश्वर शोधतो आणि गायनाच्या माध्यमातूनच ईश्वराची पूजा करतो' ही त्यांची धारणा त्यांनी त्यांच्या स्वरांतून शेवटच्या श्वासापर्यंत साकारली होती. 

माझी रोज दिवसाची सुरुवात सुब्बुलक्ष्मी यांच्या सुप्रभातम ने होते तर दिवसाचा शेवट लताबाईंच्या एखाद्या गाण्याने होतो. या द्वय भारतरत्नांनी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे. 
भारतरत्न एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर अभिवादन.  

सर्वेश फडणवीस

Sunday, September 11, 2022

◆ वाग्वैभवी विवेकानंद !! 🚩🚩

स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाला आज बरोबर १२७ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

स्वामी विवेकानंद खरंतर हा सप्ताक्षरी मंत्र युवाचेतना जागृत करतो. प्रकांड बुद्धिमत्ता,ज्ञान,वैराग्य,धैर्य या गुणसंपदेने अलंकृत झालेल्या स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात विविध विषयांमध्ये असामान्य गती संपादित केली होती. वैखरीच्या साम्राज्यातील त्यांचे सम्राटपद सर्वतोपरी होते. वाणीच्या सामर्थ्याने स्वामीजींनी आपल्या राष्ट्राला जागे केले. भारतीय अध्यात्माला वेदांताच्या मूळ स्रोताकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या वाकशक्तीचा उपयोग केला. युवकांना विजीगिषु वृत्तीने भरून आणि भारून टाकले. संन्यासधर्माला समाजसेवेचे परिमाण दिले. अमेरिका आणि युरोपीय देशातील हजारोंना 'खऱ्या'भारताचा परिचय घडवला. 

वाचे बरवे कवित्व। कवित्वी बरवे रसिकत्व।
रसिकत्वी परतत्व। स्पर्शू जैसा ।। 

माउलींनी सांगितलेल्या या ओवींच्या उंचीचे वक्तृत्व स्वामीजींना लाभले होते. आज स्वामीजींचे जे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे ते ते सर्व,त्यांनी लिहलेली पत्र सोडून सगळे स्वामीजींच्या व्याख्यांनाचे संकलन आहे. ११ सप्टेंबर १८९३ हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या विजयासाठीच परमेश्वराने निवडला होता. या दिवसाच्या एका भाषणाने संपूर्ण विश्वपटलावर ह्या देशाचा सन्मानच झाला. भारत रानटी आणि असंस्कृत नाही याची हमी देणारे ते भाषण होते. भारतीयांचे पूर्वज बुद्धिविहीन,पराक्रमशून्य नव्हते याची ग्वाही देणारे हे भाषण होते. सर्व जगाला वंद्य असणारी महान संस्कृती भारतानेच निर्माण केली हा विश्वास देणारे ते भाषण होते. सर्वधर्म परिषदेचा मूळ हेतूच आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याचा असो की सर्व धर्मांचा परिचय परस्परांना होऊन जगाचे कल्याण करण्याचा असो पण स्वामीजींच्या महान व्यक्तित्वाचा यामुळे संपूर्ण जगाला परिचय झाला.

शिकागो सारख्या शहरात भरलेल्या परिषदेसाठी दहा हजाराच्या आसपास प्रतिनिधींची नोंदणी झाली होती. संपूर्ण जगातून अनेक अभ्यासक,चिंतक,विचारवंत,आणि धर्माचार्य या परिषदेसाठी आले होते. अशा वातावरणात स्वामीजी एक होते. स्वतः किंचित संभ्रमातही होते. कारण परिषदेपर्यंत पोचण्यातच त्यांची सारी शक्ती खर्ची पडली होती. अभ्यासाला वेळच मिळाला नाही. अनेक विचारवंत आपले विचार मांडत होते. अध्यक्षांनी स्वामीजींना अनेक वेळा बोलण्याचा आग्रह केला 'आत्ता नको,नंतर!'हेच स्वामीजींचे उत्तर होते. संध्याकाळ झाली. एक कौपीनधारी संन्यासी उभे राहिले. साधारण वाटणारा संन्यासी एका अद्भुत तेजाने प्रक्षेपण करतो आहे. असेच सर्वांना वाटले. सद्गुरू भगवान श्रीरामकृष्ण परमहंस आणि सरस्वती मातेचे स्मरण करून स्वामीजी एका वेगळ्याच दैवी स्वरूपात उभे राहिले. किंचित ओठ हलले आणि शब्द प्रगटले ,"अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो!" चारच शब्द...चारही दिशातून दिव्यच काहीतरी अवतरले. या चारच शब्दांनी चराचर भारून गेले. कित्येजण उभे राहिले. कित्येकजण आनंदाने ओरडू लागले. टाळ्यांचा तर प्रचंड कडकडाट होतंच होता. स्वामीजींना बोलणे शक्यच झाले नाही इतका प्रचंड आवाज होता. काही काळाने लोक शांत झाले आणि स्वामीजींनी आपले भाषण पूर्ण केले. इतर व्यक्तांच्या तुलनेने स्वामीजींचे भाषण अगदीच कमी वेळाचे होते,मोजके होते पण तरीही ते प्रभावी ठरले. स्वामीजींचे भाषण म्हणजे वेद उपनिषदांच्या ज्ञानाचाच कलोचित आविष्कार होता. दक्षिणेश्वरच्या मंदिरातील श्रीरामकृष्णांच्या चरणाशी बसून वेचलेल्या दिव्य संस्कारांचे ते प्रगटीकरणच होते. त्या भाषणातील प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणाचा भाव होता. शब्द साधे होते पण सच्चे होते. माउलींनी जसे ज्ञानेश्वरीमध्ये काही लक्षणं सांगितले आहे 'मितुले आणि साच'म्हणजे सत्याचेच प्रतिपादन हवे आणि नेमके हवे. बोलते जे अर्णव। पीयुषाचे ।।' बोलण्यात आग्रहाइतकेच आर्जव हवे.अगत्य हवे.माधुर्य ही हवे .ही सारी वैशिष्ट्य स्वामीजींच्या पहिल्या व्याख्यानात दिसतात. स्वामीजींची साद प्रेमपूर्ण होती. असे वक्तृत्वच प्रभावी असते जे विशुद्ध चारित्र्यातून आणि बुद्धीच्या परिपक्वतेतून प्रगट होते. 

शिकागो परिषदेत स्वामीजींनी 'हिंदुत्व'या विषयावरील निबंध सादर केला. त्याचे सुरेख वर्णन भगिनी निवेदितांनी केला आहे. स्वतंत्रपणे वाचनाचा तो विषय आहे. ते वाचल्यावर स्वामीजींच्या प्रभावी वक्तृत्वाचे रहस्य लक्षात येते. सर्वधर्म परिषदेतील एकाच भाषणाने स्वामीजी 'जगन्मान्य' झाले. सगळी वृत्तपत्रे स्वामीजींच्या परिषदेतील विजयाची घोषणा करू लागली. 'न्यूयॉर्क हेराल्ड' या वृत्तपत्राने लिहिले.."..या परिषदेतील सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंदच होते. ' . याप्रमाणे 'दि प्रेस ऑफ अमेरिका'यांनी लिहिले की ," स्वामीजींनी आपल्या भाषणाने त्या सभेला मोहित करून सोडले होते." प्रचलित प्रत्येक ख्रिस्ती पंथाचे पाद्री तिथे उपस्थित होते. परंतु स्वामीजींच्या वक्तृत्वाने साऱ्यांची भाषणे वाहून गेली होती. 'बोस्टन इव्हनिंग ट्रान्स्क्रिप्ट ' यांनी स्वामीजींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "विवेकानंद हे खरोखरच एक थोर पुरुष असून उदार,सरल व अत्यंत कळकळीचे आहेत आणि ज्ञानाच्या बाबतीत तर विश्वविद्यालयीन पंडितांपैकी कुणालाही त्यांची सर यायची नाही." हाच तो त्या दैववाणीचा प्रभाव होता. 

वाक्-गंगा स्वामीजींच्या मुखातून प्रगट होत होती पण ती गंगा देवलोकांतून आणण्यासाठी अनेक ऋषींनी,मुनींनी केलेले तप बोलण्यापाठी होते. वाग्भागीरथीच्या अवतारणात भगवान श्री रामकृष्ण परमहंस भगीरथ होते. विवेकानंदांनी ती भागीरथी शिवासारखी समर्थपणे आपल्या मस्तकी धारण केली होती. हा प्रभाव या तप परंपरेचा होता. स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव अजूनही चिरकाल टिकून आहेच. आज १२५ वर्ष होऊन सुद्धा ते शब्द सुवर्णाक्षरांनी अंकित व्हावे असेच आहेत. ते अजरामर भाषणाने भारताची जागतिक पातळीवर घेतलेली दखल प्रत्येकासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक अशीच आहे. भक्ती-ज्ञान- विवेक-वैराग्य यांचा अलौकिक ठेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे शब्द आपणास सदैव काही संदेश देतात. उत्तुंग प्रेरणा देत असतात. विवेकानंद यांनी आपल्या भाषणात विश्वाचे कल्याण करू शकणाऱ्या भगवद्गीतेचा संदर्भ दिला. आपल्या वागण्याने व शस्त्राने विनाकारण कोणीही कोणास त्रास देऊ नये, असे झाले तर, जीवनाचा अर्थ उमगेल आणि जीवन अर्थपूर्ण होईल. असे आहे ते भाषण… 

अमेरिकेतील माझ्या बंधूंनो, आणि भगिनींनो 

आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो. 

जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे. 

बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात. 'ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात. 

'जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो'. आजची ही पवित्र परिषद भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा आहे. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल. 

✍️सर्वेश फडणवीस

#VivekanandaInChicago 

Saturday, September 10, 2022

गजानन श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ..


श्री गणपती हे दैवत केवळ मोक्षसाधना करणाऱ्या गणेश भक्तांचेच नाही; तर शूरवीरांचेही आहे. तो विनायक आहे, तो गणपती आहे, तो तेहतीस कोटी देवांचा सरनोबत आहे, तो क्रांतिकारकांचा आहे. आज या गणेशाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवस आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाला. गणेशोत्सव हा झालाच पाहिजे, उत्साहात आणि आनंदात तो गाजला पाहिजे; पण त्यात थिल्लरपणा आणि अमंगळ धिंगाणा कधीच येऊ नये आणि आज याचीच प्रचिती आपल्याला पावलोपावली येते आहे. आजच्या गणपती उत्सवाचे चित्र नक्कीच बदलेले आहे आणि हा बदल सुखावह आहे. आज पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जाणार आहोत. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम सांगायचे की, गौरी-गणपती यांचा भाद्रपदातील उत्सव महाराष्ट्रात केव्हा सुरू झाला, हे सांगणे अवघड आहे. गौरी-गणपतीचे महात्म्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये गेली निदान एक हजार वर्षे निश्चित चालू आहे. कोणतेही मंगल कार्य सुरू करताना श्रीगणेशाचे स्तवन आणि पूजन हे केले जातेच. मग ते ग्रंथलेखन असो, की गडकोटांचे बांधकाम असो. श्रीज्ञानेश्वर माउलींनी आपला अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिताना श्रीगणेशाचे प्रथम स्तवन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासारखे प्रचंड दुर्ग बांधले. तेही प्रथम श्रीगणेशाचे पूजन करूनच. सुदैवाने आज राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी गडांवर महाराजांनी पूजन केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्ती आणि मंदिरे अस्तित्त्वात आहेत. 

महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात राजमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवाजीराजे हे प्रथम रहावयास आले तेव्हा त्यांनी पहिले नमन आणि पूजन केले श्री कसबा गणपतीचे. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे; पण एक विशेष गोष्ट अभ्यास करताना जाणवते की, मुघल सरदार शास्ताखान हा पुणे काबीज करून ऐन कसबा पेठेतच शिवाजी राजांच्या लाल महालात राहिला.

या लाल महालापासून कसब्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर फारतर पाऊणशे पावलावर असेल; पण औरंगजेबाच्या या मामाने म्हणजे शास्ताखानाने या गणेश मंदिराला कोणताही उपद्रव दिल्याची नोंद नाही. पुण्याचा कसबा गणपती खूप ऐतिहासिक आहे. शिवाजी राजांच्या आधीही हा श्रीगणेश होता. त्यावेळी राज्य अहमदनगरच्या निजामशहाचे होते. राज्याचा मुख्य वजीर होता मलिक अंबर. या अंबरानेही या गणेशाची आस्थाव्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी ‘श्री’ स उत्पन्न सुरू ठेवले होते. कसबा गणपतीचे विशेष महत्त्व सांगायचे तर आजही पुण्यातल्या लग्नकार्याचे किंवा कोणत्याही शुभकार्याचे पहिले निमंत्रण या गणपतीला दिले जाते. 

छत्रपती शहाजीराजे यांनी जिजामाता आणि बालशिवाजीला सुरक्षा हेतूने पुण्यात पाठवले. पुण्यात आल्यावर त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी डौलदार लाल महाल उभा राहत असतानाच, तेथील भग्न मंदिर आणि वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्याच कालावधीत जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून, पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूर्जाअर्चा आणि व्यवस्था देण्यात आली. ती आजतागायत अखंड सुरू आहे. या घटना इसवीसन १६४० ते १६४२ या कालावधीत घडल्याचे इतिहास सांगतो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. इथून पुढे पुणे शहर आकारास आले. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यावरही पहिला मानाचा गणपती म्हणून पालखी डोलत असते ती श्री कसबा गणपतीची. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्याची सुरुवात या गणपतीपासून केली. खरोखर, या गणेश उत्सवाची कल्पना ज्यांच्या अंतःकरणात प्रथम उमलली ते थोर प्रतिभावंतच आहे. या उत्सवाच्या संकल्पनेचा उगम शनिवारवाड्यातच असावा. कारण गणेश उत्सवासंबंधीची अनेक कागदपत्रे पेशवे दफ्तरात सापडतात. 

पुण्यातील कसबा पेठेच्या मध्यभागी हे मंदिर आहे. मंदिरांचे बांधकाम आणि आर्किटेक्चर साधारणतः उत्तर पेशवाईतील एखाद्या छान वाड्या सारखं वाटते. कसबा गणपती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपती मूर्ती स्वरूपात नाही तर तांदळा स्वरूपात गणपतीचं पूजन केले जाते. गाभाऱ्यामध्ये समोर एका कोनाड्यात गणपतीचा शेंदूर चर्चित तांदळा आहे. गाभाऱ्याबाहेर सभामंडप असून प्रदक्षिणेचा मार्ग आहे. प्रदक्षिणेच्या मार्गात बाहेर जाण्याचा मार्ग आणि एक भक्कम दरवाजा असं मंदिराचं स्वरूप आहे. काही वर्षांपूर्वीच मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण जीर्णोद्धार करताना मंदिराचे जुने स्वरूप तसाच ठेवून झाला आहे आणि त्यामुळे मंदिर अजूनही तसंच देखणे आहे. 

पुण्याच्या मूळ वस्तीत अर्थात, कसबा पेठेत कसबा गणेशाचे मंदिर आहे. पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी शिवछत्रपती कसबा गणेशाचे दर्शन घेत असत; म्हणून या गणरायाला 'श्री जयती गणपती' असे संबोधले जाते. पुढे १२ मावळांचा कारभार, स्वराज्यविस्तार, लाल महालावर छापा, पहिली राजधानी राजगड या सगळ्या घटना जयती गजाननाच्या साक्षीने घडत गेल्या. याचसाठी आज वर्तमानातही याचे स्थान महात्म्य वेगळे आहे. गणरायाची मूर्ती स्वयंभू असून, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार मनात घर करून राहतो. मूर्तीचे डोळे हिऱ्यांचे आणि नाभी माणकाची आहे. प्राचीन पुणे ते मध्ययुगीन पुणे हा दुवा जोडणारे हे एक महत्त्वाचे देवस्थान आहे. प्राचीन पुण्याच्या वस्तीजवळच हे मंदिर आहे. अतिशय देखणे आणि सुस्थितीत असलेले हे मंदिर उत्सव काळात भक्तांच्या उपस्थितीने आनंदून झालेले दिसते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कसबा गणपती मंदिर  कायम गजबजलेलं दिसतं. कारण प्राचीन ऐतिहासिक इतिहासाची साक्ष देत श्री कसबा गणपती मंदिर आजही दिमाखात उभे आहे. पुण्यातील मानाचे पांच गणपती आहेत त्यात कसबा गणपती हा अग्रक्रमावर आहे. प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून दर्शन घ्यावे असेच हे मंदिर आहे. 

सर्वेश फडणवीस


Saturday, September 3, 2022

देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु ..

भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात श्रीगणेश चतुर्थी यादिवशी पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. आज हा उत्सव जगभरात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा होताना दिसतो. या गणेशोत्सवाचे औचित्यसाधत नागपूरचे आराध्यदैवत असलेल्या वरदविनायक अर्थात टेकडी गणपतीच्या गाभाऱ्यात आज आपण दर्शनार्थ जाणार आहोंत.

‘ॐ नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या,जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’’ जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री. गणेशस्तवनाने केला आहे. ‘‘देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी...’ओम हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा प्रकाशक म्हणजे श्रीगणेश आहे. श्रीगणराजांना अग्रपूजेचा मान असल्याने ज्ञानेश्वर महाराज गणपतीस नमस्कार करतात. आजही घरातील मंगलकार्य करतांना श्री गणेशास अग्रपूजेचा मान आपल्याकडे देतात. नागपूरातील टेकडीचा गणपती हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले हे टेकडी गणपती देवस्थान चिरपुरातन असून सध्या नव्या रुपात बघायला मिळत आहे. 

विदर्भातील संस्कृती अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. त्यातही नागपूर प्रांतात ताम्राश्य संस्कृती होती. नयाकुंड, माहूरझरी, पवनार, टाकळघाट, कौंडण्यपूर येथील उत्खननातून प्राचीन संस्कृतीवर चांगलाच प्रकाश पडतो. नागपूर प्रांतात नागसंस्कृती होती. हरीवंशातही तसाच उल्लेख आलेला आहे. नागवंशीय राजे यांचा संबंध सातवाहन अन् वाकाटकांशी घनिष्ठ होता. भारशिव नाग हा सर्वश्रेष्ठ नाग होता. शिशंकु रुद्रसेन वाकाटक होता. तो भारशिव नागाचा नातू अर्थात मुलीचा मुलगा होता. त्यावेळी मातृसत्ताक पद्धती होती. त्यामुळे त्या नात्याने रूद्रसेन राज्यावर बसला होता. अन् भारशिवाचे राज्य हे वाकाटकाचे राज्य झाले. पवनी येथील शिलालेखात भारशिव नागाचा उल्लेख आहे. विदर्भात पद्मावती नवनागवंशात प्रसिद्ध असे तेरा नाग राजे होऊन गेले.पद्मावतीच्या नागाचा शेवटचा नाग राज म्हणजे गणपती होता. याची गणपतिन, गजेन्द्र गणपती आणि गणवेंद्र अशी नावे होती. गणपती नाग हा पश्चिम मालवाचा स्वामी होता. हा गणेशभक्त होता असा उल्लेख आहे. त्याने गणेश टेकडीवर 'गणेशपीठ' स्थापन केले असावे असे काही अभ्यासकांचे मत आहे. 

प्राचीन संस्कृतीचा अभ्यास करतांना एक गोष्ट सहजतेने लक्षात येते की नागपूरचा प्राचीन इतिहास फार मोठा आहे. नागपूरला बारा टोळ्या होत्या. लोखंडी पूलापलीकडील सीताबर्डी, धंतोली आणि तेलंगखेडी येथे त्या टोळ्या वास्तव्यास होत्या. यादवाचं अर्थात गवळ्यांचं राज्य सीताबर्डी येथे होतं. सीताबर्डी ही टोळी सर्वात सधन होती. गवळ्यांचं अन् गोंडांचं तसेच गोसाव्याचं राज्य अत्यंत सधन होतं, यांत शंका नाही. टेकडीवर गायी-म्हशी चरायच्या परंतु त्या काळात अगदी वरच्या भागाला शिव मंदिर होत. आजही ते तेथे आहे. टेकडीच्या पायथ्याला गणेश मंदिरे होती. एक मुख्य गणपती अन् त्यांच्या बाजुला दुसरा जो गणपती आहे त्याला 'फौजेचा गणपती' म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. टेकडीवरील गणेश मंदिर अत्यंत प्राचीन आहे यात शंका नाही. वाकाटकाच्या नंतर यादवांच्या काळांत या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. बाराव्या शतकात हेमाद्री पंडितांनी ते देऊळ बांधले होते. त्याकाळांतील खचलेले, तुटलेले अनेक खांब आणि मूर्ती स्वतः मी बघितल्यात,' असे श्री अ. ल. लिमये यांनीही लिहून ठेवले आहे. 

बख्त बुलंदशहाने देवगड वरून आपली राजधानी नागपूरला आणली अन् बारा टोळ्या एकत्रित करून त्याने आपली राजधानी इथे वसविली. बख्त बुलंदशहा देखील पराक्रमी पुरूष होता. त्याने राज्यविस्तार वाढविला. इ.स. १३१८ साली मुबारक खिलजी याने यादवांचे राज्य खालसा केले. त्यावेळी नागपूर परगण्यात गवळ्यांची लहान-लहान राज्ये होती. गोंडवाना परिसरात गोंडांची राज्ये होती. नागपूरचा त्यात अंतर्भाव होता. बख्त बुलंदशहानंतर चांद सुलतान गादीवर बसला. त्यांने नागपूरच्या वैभवात भर घातली. शुक्रवारी तलावाचे नूतनीकरण केले. पूर्वी हा तलाव जुम्मा तलाव म्हणून ओळखल्या जात होता. टेकडी गणपतीच्या पायथ्यापर्यंत शुक्रवारी तलावाचे पाणी पसरलेले होते. परंतु टेकडीवरच्या खचलेल्या देवळाकडे त्याचे लक्ष गेले नाही. चांद सुलतानाचा दासीपूत्र वलीशहाने सत्ता बळकावली अन् चांद सुलतानाची पत्नी रणकुंवर अन् तिच्या मुलांना कैदेत टाकले. पुढे रणकुंवर हिने यवतमाळ येथे असलेल्या पहिल्या रघुजीराजांना मदत मागितली. रघुजीराजांनी वलीशहाला पराभूत केले. त्यावेळी रणकुंवरने राज्याचे तीन भाग केले, दोन भाग आपल्या दोन मुलांना देऊन तिसरा भाग रघुजी राजाला दिला. रणकुंवरची दोन मुले म्हणजे बहाणशहा व अकबरशहा हे गादीवर बसले. बहाणशहाने निजामाचा आश्रय घेतला. शेवटी रघुजी राजांचीच सत्ता प्रस्थापित झाली. रघुजी राजाने बंगालपर्यन्त राज्यविस्तार केला. दुसऱ्या रघुजीराजाने नागपूरचे वैभव वाढविले. भोसल्यांची फौज सीताबर्डीवर राहत होती. त्यांनी राज्यविस्तार केला. राज्य अन् भोसल्यांचे नागपूर आणि त्यांच्या राज्याला वैभवाचे दिवस प्राप्त झाले होते. परंतु त्यावेळी या टेकडीवर भोसल्यांची फौज राहत होती. 

मुसलमान काळात या देवळाकडे दुर्लक्ष झाले असणे साहजिक आहे. यादवांची सत्ता संपल्यावर या देवळाकडे दुर्लक्ष झाले. कालौघात देऊळ खचले, मूर्ति दबल्या गेली. देवळाच्या दगडाचा उपयोग चांद सुलतान याने शुक्रवारी तलावाच्या बांधकामासाठी केला. हा तलाव सुंदर करून या तलावाचे पाणी शेतीसाठी वापरण्यात येत होते. मूर्ती मातीच्याखाली चांगलीच दबल्या गेली होती. १८६६ मध्ये रेल्वे स्टेशन ते सुभाष पुतळा या रस्त्याचे खोदकाम सुरू झाले. खोदकाम करतांना गणपतीची शेंदूर लावलेली मूर्ती सापडली होती. त्यामुळे ती पूजेतील मूर्ती होती यात काही शंका नाही. परंतु त्यावेळी हा रेजिमेंटल भाग असल्यामुळे अधिक खोदकाम करता आले नाही. त्यावेळी श्री भीमराव कुळकर्णी, शंकरराव जोशी हे पुजारी होते. सुरुवातीला मंदिर छोटेसे होते, आता त्याचा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असले, तरी मूर्ती उत्तराभिमुख आहे. गणपतीच्या मूर्तीच्या पाठीमागील भिंतीला लागून एक शिवलिंग आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या ठिकाणी नंदी बसवलेला दिसतो.

मंदिराचा गाभारा म्हणजे एक मोठा हॉल असून त्यात मध्यावर झाड आणि त्याखाली गणपतीची मूर्ती आहे. हा गणपती जवळजवळ पाच फूट रुंद आणि तीन फूट उंच असून इथे फक्त गणेशाचे तोंडच दिसते. त्यालाच डोळे आणि गंध लावून पूजा केली जाते. आजूबाजूला इतर लहान मोठी मंदिरे, मोठा दरवाजा आणि सर्व अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे देवस्थान झाले आहे. नागपूरला आलात की आवर्जून दर्शनार्थ जावे असेच हे टेकडी गणपती देवस्थान आहे. 

सर्वेश फडणवीस