Saturday, September 10, 2022

गजानन श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ..


श्री गणपती हे दैवत केवळ मोक्षसाधना करणाऱ्या गणेश भक्तांचेच नाही; तर शूरवीरांचेही आहे. तो विनायक आहे, तो गणपती आहे, तो तेहतीस कोटी देवांचा सरनोबत आहे, तो क्रांतिकारकांचा आहे. आज या गणेशाचा उत्सव भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा दहा दिवस आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाला. गणेशोत्सव हा झालाच पाहिजे, उत्साहात आणि आनंदात तो गाजला पाहिजे; पण त्यात थिल्लरपणा आणि अमंगळ धिंगाणा कधीच येऊ नये आणि आज याचीच प्रचिती आपल्याला पावलोपावली येते आहे. आजच्या गणपती उत्सवाचे चित्र नक्कीच बदलेले आहे आणि हा बदल सुखावह आहे. आज पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात आपण दर्शनार्थ जाणार आहोत. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे कायम सांगायचे की, गौरी-गणपती यांचा भाद्रपदातील उत्सव महाराष्ट्रात केव्हा सुरू झाला, हे सांगणे अवघड आहे. गौरी-गणपतीचे महात्म्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये गेली निदान एक हजार वर्षे निश्चित चालू आहे. कोणतेही मंगल कार्य सुरू करताना श्रीगणेशाचे स्तवन आणि पूजन हे केले जातेच. मग ते ग्रंथलेखन असो, की गडकोटांचे बांधकाम असो. श्रीज्ञानेश्वर माउलींनी आपला अलौकिक ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिताना श्रीगणेशाचे प्रथम स्तवन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासारखे प्रचंड दुर्ग बांधले. तेही प्रथम श्रीगणेशाचे पूजन करूनच. सुदैवाने आज राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी गडांवर महाराजांनी पूजन केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्ती आणि मंदिरे अस्तित्त्वात आहेत. 

महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात राजमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवाजीराजे हे प्रथम रहावयास आले तेव्हा त्यांनी पहिले नमन आणि पूजन केले श्री कसबा गणपतीचे. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे; पण एक विशेष गोष्ट अभ्यास करताना जाणवते की, मुघल सरदार शास्ताखान हा पुणे काबीज करून ऐन कसबा पेठेतच शिवाजी राजांच्या लाल महालात राहिला.

या लाल महालापासून कसब्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर फारतर पाऊणशे पावलावर असेल; पण औरंगजेबाच्या या मामाने म्हणजे शास्ताखानाने या गणेश मंदिराला कोणताही उपद्रव दिल्याची नोंद नाही. पुण्याचा कसबा गणपती खूप ऐतिहासिक आहे. शिवाजी राजांच्या आधीही हा श्रीगणेश होता. त्यावेळी राज्य अहमदनगरच्या निजामशहाचे होते. राज्याचा मुख्य वजीर होता मलिक अंबर. या अंबरानेही या गणेशाची आस्थाव्यवस्था व्यवस्थित चालण्यासाठी ‘श्री’ स उत्पन्न सुरू ठेवले होते. कसबा गणपतीचे विशेष महत्त्व सांगायचे तर आजही पुण्यातल्या लग्नकार्याचे किंवा कोणत्याही शुभकार्याचे पहिले निमंत्रण या गणपतीला दिले जाते. 

छत्रपती शहाजीराजे यांनी जिजामाता आणि बालशिवाजीला सुरक्षा हेतूने पुण्यात पाठवले. पुण्यात आल्यावर त्यांच्या निवास व्यवस्थेसाठी डौलदार लाल महाल उभा राहत असतानाच, तेथील भग्न मंदिर आणि वास्तूंचा जीर्णोद्धार केला. त्याच कालावधीत जिजाऊंनी कसबा गणेशाचे मंदिर बांधून, पुण्यभूमीत सोन्याचा नांगर फिरवून स्वराज्याचा अंकुर या मातीत पेरला. कर्नाटकातून आलेल्या ठकार कुटुंबाकडे गणरायाची पूर्जाअर्चा आणि व्यवस्था देण्यात आली. ती आजतागायत अखंड सुरू आहे. या घटना इसवीसन १६४० ते १६४२ या कालावधीत घडल्याचे इतिहास सांगतो. पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे. पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा गणपतीला पहिले मानाचे स्थान आहे. इथून पुढे पुणे शहर आकारास आले. सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाल्यावरही पहिला मानाचा गणपती म्हणून पालखी डोलत असते ती श्री कसबा गणपतीची. लोकमान्य टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्याची सुरुवात या गणपतीपासून केली. खरोखर, या गणेश उत्सवाची कल्पना ज्यांच्या अंतःकरणात प्रथम उमलली ते थोर प्रतिभावंतच आहे. या उत्सवाच्या संकल्पनेचा उगम शनिवारवाड्यातच असावा. कारण गणेश उत्सवासंबंधीची अनेक कागदपत्रे पेशवे दफ्तरात सापडतात. 

पुण्यातील कसबा पेठेच्या मध्यभागी हे मंदिर आहे. मंदिरांचे बांधकाम आणि आर्किटेक्चर साधारणतः उत्तर पेशवाईतील एखाद्या छान वाड्या सारखं वाटते. कसबा गणपती मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपती मूर्ती स्वरूपात नाही तर तांदळा स्वरूपात गणपतीचं पूजन केले जाते. गाभाऱ्यामध्ये समोर एका कोनाड्यात गणपतीचा शेंदूर चर्चित तांदळा आहे. गाभाऱ्याबाहेर सभामंडप असून प्रदक्षिणेचा मार्ग आहे. प्रदक्षिणेच्या मार्गात बाहेर जाण्याचा मार्ग आणि एक भक्कम दरवाजा असं मंदिराचं स्वरूप आहे. काही वर्षांपूर्वीच मंदिराचा जीर्णोद्धार झाला पण जीर्णोद्धार करताना मंदिराचे जुने स्वरूप तसाच ठेवून झाला आहे आणि त्यामुळे मंदिर अजूनही तसंच देखणे आहे. 

पुण्याच्या मूळ वस्तीत अर्थात, कसबा पेठेत कसबा गणेशाचे मंदिर आहे. पुण्यात वास्तव्य असताना प्रत्येक मोहिमेपूर्वी शिवछत्रपती कसबा गणेशाचे दर्शन घेत असत; म्हणून या गणरायाला 'श्री जयती गणपती' असे संबोधले जाते. पुढे १२ मावळांचा कारभार, स्वराज्यविस्तार, लाल महालावर छापा, पहिली राजधानी राजगड या सगळ्या घटना जयती गजाननाच्या साक्षीने घडत गेल्या. याचसाठी आज वर्तमानातही याचे स्थान महात्म्य वेगळे आहे. गणरायाची मूर्ती स्वयंभू असून, तिचा वैशिष्ट्यपूर्ण आकार मनात घर करून राहतो. मूर्तीचे डोळे हिऱ्यांचे आणि नाभी माणकाची आहे. प्राचीन पुणे ते मध्ययुगीन पुणे हा दुवा जोडणारे हे एक महत्त्वाचे देवस्थान आहे. प्राचीन पुण्याच्या वस्तीजवळच हे मंदिर आहे. अतिशय देखणे आणि सुस्थितीत असलेले हे मंदिर उत्सव काळात भक्तांच्या उपस्थितीने आनंदून झालेले दिसते. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री कसबा गणपती मंदिर  कायम गजबजलेलं दिसतं. कारण प्राचीन ऐतिहासिक इतिहासाची साक्ष देत श्री कसबा गणपती मंदिर आजही दिमाखात उभे आहे. पुण्यातील मानाचे पांच गणपती आहेत त्यात कसबा गणपती हा अग्रक्रमावर आहे. प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून दर्शन घ्यावे असेच हे मंदिर आहे. 

सर्वेश फडणवीस


No comments:

Post a Comment