कर्नाटक संगीताची पताका आपल्या जादुई आवाजाने जगभर नेणाऱ्या विदुषी गायिका म्हणजे भारतरत्न एम.एस. सुब्बालक्ष्मी. आपल्यापैकी अनेकांकडे रोजच्या दिवसाची सुरुवातच यांच्या व्यंकटेश सुप्रभातम ने होते. मदुरई षण्मुखनीदवु सुब्बुलक्ष्मी अर्थात प्रख्यात कर्नाटक शास्त्रीय गायिका एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी. अत्यंत लवचिक आणि कर्नाटकी संगीताचा बाज असलेला मोहक आवाज लाभलेल्या विदुषी म्हणजे भारतरत्न एम. एस. सुब्बालक्ष्मी.
आवाजाबरोबरच शब्दोच्चारावर विशेष भर देणाऱ्या गायिकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमावर घेता येईल. कपाळावर असलेलं ठसठसीत कुंकू, नाकाच्या दोन्ही नाकपुडीतील चमकी, कांजीवरम साडी आणि चेहऱ्यावरील सात्त्विक तेजाचा भाव हे सगळं बघतांना प्रसन्नतेची वेगळीच ऊर्जा जाणवते. मध्यंतरी यु ट्यूबवर त्यांची मुलाखत ऐकली होती त्यात त्यांनी म्हंटले होते, ‘मी एक विद्यार्थी आहे आणि संगीत हा महासागर आहे. जे गायचे आहे त्या गाण्याचा अर्थ समजून घेणे आणि प्रत्येक शब्दाचा अचूक उच्चार शिकून घेणे ही माझी सवय आहे’, आणि हे ऐकल्यावर जाणवले की त्यांनी उत्कृष्टतेचा किती ध्यास घेतला असेल. खरंतर भक्तीच्या रंगाला भाषेचा, जाती- पातीचा , देश-प्रांताच्या मर्यादा येत नाही हेच त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या आवाजाचे वेगळेपण हे त्याचेच द्योतक आहे. आत्मभान विसरून त्यांनी परमेश्वराला मारलेली आर्त हाक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात एकच असते याची प्रचिती सुब्बुलक्ष्मी यांना ऐकतांना कायम जाणवते. सुब्बुलक्ष्मी यांच्या इतक्या गुणी पण विनयशील गायिका क्वचितच आढळतील.
त्यांच्या यशाला विनम्रतेबरोबर आध्यात्मिकतेचेही भक्कम पाठबळ होते. आपल्या आयुष्यातील कोणतेही मोठे निर्णय त्या कांची कामकोटी मठाच्या परमाचार्यांच्या अनुमतीनेच घेत असत. भारतातील अनेक भाषांतील संतांच्या भक्तिपर रचना त्यांनी गायिल्याच नाही तर लोकप्रियही केल्या. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, नम्रता, आणि समर्पणशीलता ह्या गुणांची श्रीमंती त्यांच्याकडे बघितल्यावर सहज जाणवते. भक्तिभाव आणि सात्त्विकता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव होता आणि तोच त्यांच्या गायनातुनही जाणवतो. 'गायनातून आपण ईश्वर शोधतो आणि गायनाच्या माध्यमातूनच ईश्वराची पूजा करतो' ही त्यांची धारणा त्यांनी त्यांच्या स्वरांतून शेवटच्या श्वासापर्यंत साकारली होती.
माझी रोज दिवसाची सुरुवात सुब्बुलक्ष्मी यांच्या सुप्रभातम ने होते तर दिवसाचा शेवट लताबाईंच्या एखाद्या गाण्याने होतो. या द्वय भारतरत्नांनी आपले आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध केले आहे.
भारतरत्न एम्. एस्. सुब्बुलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर अभिवादन.
सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment