Sunday, September 11, 2022

◆ वाग्वैभवी विवेकानंद !! 🚩🚩

स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाला आज बरोबर १२७ वर्ष पूर्ण झाली आहेत. 

स्वामी विवेकानंद खरंतर हा सप्ताक्षरी मंत्र युवाचेतना जागृत करतो. प्रकांड बुद्धिमत्ता,ज्ञान,वैराग्य,धैर्य या गुणसंपदेने अलंकृत झालेल्या स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात विविध विषयांमध्ये असामान्य गती संपादित केली होती. वैखरीच्या साम्राज्यातील त्यांचे सम्राटपद सर्वतोपरी होते. वाणीच्या सामर्थ्याने स्वामीजींनी आपल्या राष्ट्राला जागे केले. भारतीय अध्यात्माला वेदांताच्या मूळ स्रोताकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या वाकशक्तीचा उपयोग केला. युवकांना विजीगिषु वृत्तीने भरून आणि भारून टाकले. संन्यासधर्माला समाजसेवेचे परिमाण दिले. अमेरिका आणि युरोपीय देशातील हजारोंना 'खऱ्या'भारताचा परिचय घडवला. 

वाचे बरवे कवित्व। कवित्वी बरवे रसिकत्व।
रसिकत्वी परतत्व। स्पर्शू जैसा ।। 

माउलींनी सांगितलेल्या या ओवींच्या उंचीचे वक्तृत्व स्वामीजींना लाभले होते. आज स्वामीजींचे जे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे ते ते सर्व,त्यांनी लिहलेली पत्र सोडून सगळे स्वामीजींच्या व्याख्यांनाचे संकलन आहे. ११ सप्टेंबर १८९३ हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या विजयासाठीच परमेश्वराने निवडला होता. या दिवसाच्या एका भाषणाने संपूर्ण विश्वपटलावर ह्या देशाचा सन्मानच झाला. भारत रानटी आणि असंस्कृत नाही याची हमी देणारे ते भाषण होते. भारतीयांचे पूर्वज बुद्धिविहीन,पराक्रमशून्य नव्हते याची ग्वाही देणारे हे भाषण होते. सर्व जगाला वंद्य असणारी महान संस्कृती भारतानेच निर्माण केली हा विश्वास देणारे ते भाषण होते. सर्वधर्म परिषदेचा मूळ हेतूच आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याचा असो की सर्व धर्मांचा परिचय परस्परांना होऊन जगाचे कल्याण करण्याचा असो पण स्वामीजींच्या महान व्यक्तित्वाचा यामुळे संपूर्ण जगाला परिचय झाला.

शिकागो सारख्या शहरात भरलेल्या परिषदेसाठी दहा हजाराच्या आसपास प्रतिनिधींची नोंदणी झाली होती. संपूर्ण जगातून अनेक अभ्यासक,चिंतक,विचारवंत,आणि धर्माचार्य या परिषदेसाठी आले होते. अशा वातावरणात स्वामीजी एक होते. स्वतः किंचित संभ्रमातही होते. कारण परिषदेपर्यंत पोचण्यातच त्यांची सारी शक्ती खर्ची पडली होती. अभ्यासाला वेळच मिळाला नाही. अनेक विचारवंत आपले विचार मांडत होते. अध्यक्षांनी स्वामीजींना अनेक वेळा बोलण्याचा आग्रह केला 'आत्ता नको,नंतर!'हेच स्वामीजींचे उत्तर होते. संध्याकाळ झाली. एक कौपीनधारी संन्यासी उभे राहिले. साधारण वाटणारा संन्यासी एका अद्भुत तेजाने प्रक्षेपण करतो आहे. असेच सर्वांना वाटले. सद्गुरू भगवान श्रीरामकृष्ण परमहंस आणि सरस्वती मातेचे स्मरण करून स्वामीजी एका वेगळ्याच दैवी स्वरूपात उभे राहिले. किंचित ओठ हलले आणि शब्द प्रगटले ,"अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो!" चारच शब्द...चारही दिशातून दिव्यच काहीतरी अवतरले. या चारच शब्दांनी चराचर भारून गेले. कित्येजण उभे राहिले. कित्येकजण आनंदाने ओरडू लागले. टाळ्यांचा तर प्रचंड कडकडाट होतंच होता. स्वामीजींना बोलणे शक्यच झाले नाही इतका प्रचंड आवाज होता. काही काळाने लोक शांत झाले आणि स्वामीजींनी आपले भाषण पूर्ण केले. इतर व्यक्तांच्या तुलनेने स्वामीजींचे भाषण अगदीच कमी वेळाचे होते,मोजके होते पण तरीही ते प्रभावी ठरले. स्वामीजींचे भाषण म्हणजे वेद उपनिषदांच्या ज्ञानाचाच कलोचित आविष्कार होता. दक्षिणेश्वरच्या मंदिरातील श्रीरामकृष्णांच्या चरणाशी बसून वेचलेल्या दिव्य संस्कारांचे ते प्रगटीकरणच होते. त्या भाषणातील प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणाचा भाव होता. शब्द साधे होते पण सच्चे होते. माउलींनी जसे ज्ञानेश्वरीमध्ये काही लक्षणं सांगितले आहे 'मितुले आणि साच'म्हणजे सत्याचेच प्रतिपादन हवे आणि नेमके हवे. बोलते जे अर्णव। पीयुषाचे ।।' बोलण्यात आग्रहाइतकेच आर्जव हवे.अगत्य हवे.माधुर्य ही हवे .ही सारी वैशिष्ट्य स्वामीजींच्या पहिल्या व्याख्यानात दिसतात. स्वामीजींची साद प्रेमपूर्ण होती. असे वक्तृत्वच प्रभावी असते जे विशुद्ध चारित्र्यातून आणि बुद्धीच्या परिपक्वतेतून प्रगट होते. 

शिकागो परिषदेत स्वामीजींनी 'हिंदुत्व'या विषयावरील निबंध सादर केला. त्याचे सुरेख वर्णन भगिनी निवेदितांनी केला आहे. स्वतंत्रपणे वाचनाचा तो विषय आहे. ते वाचल्यावर स्वामीजींच्या प्रभावी वक्तृत्वाचे रहस्य लक्षात येते. सर्वधर्म परिषदेतील एकाच भाषणाने स्वामीजी 'जगन्मान्य' झाले. सगळी वृत्तपत्रे स्वामीजींच्या परिषदेतील विजयाची घोषणा करू लागली. 'न्यूयॉर्क हेराल्ड' या वृत्तपत्राने लिहिले.."..या परिषदेतील सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंदच होते. ' . याप्रमाणे 'दि प्रेस ऑफ अमेरिका'यांनी लिहिले की ," स्वामीजींनी आपल्या भाषणाने त्या सभेला मोहित करून सोडले होते." प्रचलित प्रत्येक ख्रिस्ती पंथाचे पाद्री तिथे उपस्थित होते. परंतु स्वामीजींच्या वक्तृत्वाने साऱ्यांची भाषणे वाहून गेली होती. 'बोस्टन इव्हनिंग ट्रान्स्क्रिप्ट ' यांनी स्वामीजींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. "विवेकानंद हे खरोखरच एक थोर पुरुष असून उदार,सरल व अत्यंत कळकळीचे आहेत आणि ज्ञानाच्या बाबतीत तर विश्वविद्यालयीन पंडितांपैकी कुणालाही त्यांची सर यायची नाही." हाच तो त्या दैववाणीचा प्रभाव होता. 

वाक्-गंगा स्वामीजींच्या मुखातून प्रगट होत होती पण ती गंगा देवलोकांतून आणण्यासाठी अनेक ऋषींनी,मुनींनी केलेले तप बोलण्यापाठी होते. वाग्भागीरथीच्या अवतारणात भगवान श्री रामकृष्ण परमहंस भगीरथ होते. विवेकानंदांनी ती भागीरथी शिवासारखी समर्थपणे आपल्या मस्तकी धारण केली होती. हा प्रभाव या तप परंपरेचा होता. स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव अजूनही चिरकाल टिकून आहेच. आज १२५ वर्ष होऊन सुद्धा ते शब्द सुवर्णाक्षरांनी अंकित व्हावे असेच आहेत. ते अजरामर भाषणाने भारताची जागतिक पातळीवर घेतलेली दखल प्रत्येकासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक अशीच आहे. भक्ती-ज्ञान- विवेक-वैराग्य यांचा अलौकिक ठेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे शब्द आपणास सदैव काही संदेश देतात. उत्तुंग प्रेरणा देत असतात. विवेकानंद यांनी आपल्या भाषणात विश्वाचे कल्याण करू शकणाऱ्या भगवद्गीतेचा संदर्भ दिला. आपल्या वागण्याने व शस्त्राने विनाकारण कोणीही कोणास त्रास देऊ नये, असे झाले तर, जीवनाचा अर्थ उमगेल आणि जीवन अर्थपूर्ण होईल. असे आहे ते भाषण… 

अमेरिकेतील माझ्या बंधूंनो, आणि भगिनींनो 

आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो. 

जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालन-पोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे. 

बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात. 'ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात. 

'जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो'. आजची ही पवित्र परिषद भगवद्गगीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा आहे. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल. 

✍️सर्वेश फडणवीस

#VivekanandaInChicago 

No comments:

Post a Comment