Tuesday, February 21, 2023

अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः ।।

भगवान श्रीरामकृष्ण हे दिव्यत्वाची सजीव प्रतिमाच होते. त्यांचे जीवन म्हणजे सनातन धर्माचे मूर्त रूप होते. त्यांचे चरित्र म्हणजे स्थलकाल - निरपेक्ष असून अखिल मानवजातीला पथप्रदर्शन करणारे असे आहे. त्यांच्या जीवनातील अगदी सामान्य प्रसंगांना देखील गूढ गहन अर्थ आहे. त्यांच्या उक्ती म्हणजे नुसते शब्द नसून त्यांतून त्यांची अनुभूतीच प्रकटली आहे आणि याच कारणास्तव त्यात माणसाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याचे उत्कट सामर्थ्य आढळून येते. 

श्रीरामकृष्ण या नावाने सगळ्या जगात विख्यात झालेले हे कमळ, तेजाने आणि पावित्र्याने नटलेले हे कमळ,अंतर्बाह्य शुचिता धारण करणारे हे कमळ, दक्षिणेश्वरी फुलले आणि विकसित झाले. कमळ खरंतर चिखलात फुलते. कारण त्याकाळी जिकडे तिकडे नुसता चिखलच माजला होता. अधर्म बोकाळला म्हणजे परमेश्वर अवतार घेतात आणि भगवंतांनी गीतेत सांगून ठेवले आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणजे गदाधरच्या रूपाने प्रगट झालेला अवतार आहे. 

शके १७५७ फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भगवान श्रीरामकृष्ण यांचा जन्म झाला. सर्वत्र नवचैतन्याचा संचार झाला. दक्षिणेश्वराच्या या
महामानवाभोवती सर्वसंगपरित्यागी नवतरुण जमू लागले. त्यांचा संदेश त्यांनी सातासमुद्रापलीकडे पोहचविला. सगळे जग विस्मयचकित झाले. कोणी म्हटले, "दिव्य भावसमाधी पाहायची असेल तर दक्षिणेश्वरी जा"; कोणी म्हटले, "विसंगतीतून सुसंगती साधणारा हा स्वर्गीय स्वरमेळ आहे”; कोणी त्यांना 'समन्वयाचे आणि विश्वबंधुत्वाचे प्रणेते' म्हटले तर कोणी त्यांना 'युगावतार' म्हटले. भगवान श्रीरामकृष्णदेव गीतेतील वचन खरे करण्यासाठीच दक्षिणेश्वरी आले. त्यांच्या तिथी जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. 

ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे ।
अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः ॥
- स्वामी विवेकानंद

सर्वेश फडणवीस

Friday, February 17, 2023

राष्ट्रांकुर - लान्सनायक ऑनरेरी कॅप्टन करम सिंग - १९४८


भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे पाचवे मानकरी आहेत. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१५ रोजी सेद्रना जि. संग्रूर, पंजाब या खेड्यात एका शेतकरी सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडील सरदार उत्तम सिंग हे होते. करम सिंग यांनी सुरुवातीचे शालेय शिक्षण जन्मगावी घेतले आणि संग्रूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले मात्र पदवी घेण्यापूर्वीच त्यांनी शिक्षण सोडून लष्करात भरती होण्याचे ठरविले. १५ सप्टेंबर १९४२ रोजी दुसऱ्या महायुद्घाच्या वेळी ते शीख बटालियन मध्ये भरती झाले. त्यांनी म्यानमारमध्ये अतुलनीय पराक्रम केलाच, त्याशिवाय ‘ बॅटल ऑफ ॲडमन बॉक्स ’मधील त्यांच्या शौर्यपूर्ण, धीरोदात्त कामगिरीबद्दल त्यांना ‘सैनिकी पदक’ अर्थात मिलिटरी मेडल देऊन सन्मानित करण्यात आले होते. 

२३ मे १९४८ रोजी जम्मू-काश्मीर मधील टिथवाल भारतीय सैन्याने हस्तगत केले. शत्रूसैन्याने त्यानंतर रीचमर-गली आणि टिथवाल परत मिळवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. १३ ऑक्टोबरला ईद होती. त्यावेळी रीचमर-गलीवर, सैन्यावर हल्ला करायचा आणि टिथवालच्या बाजूने जाऊन श्रीनगरच्या खोऱ्यात उतरण्याचा शत्रूचा प्रयत्न होता. रीचमर-गलीमध्ये लान्सनायक करम सिंग एका तुकडीचे नेतृत्व करत होते. शत्रूसैन्याने बंदुकीच्या गोळीबाराने सुरुवात करून, तोफांचा तुफान हल्ला चढवला. शत्रूच्या तोफांचा मारा इतका अचूक होता की आपला असा एकही खंदक उरला नाही ज्याला नुकसान पोहोचले नाही.

एका खंदकापासून दुसऱ्या खंदकापर्यंतचे चरे उध्वस्त झालेले होते. लान्सनायक करम सिंग तरीही त्यातूनच फिरत होते. जखमींना धीर देत होते आणि सैनिकांना लढाईसाठी प्रोत्साहन देत होते. त्यादिवशी शत्रूने वेगवेगळे आठ हल्ले चढवले आणि अशाच एका हल्ल्यानंतर शत्रूला भारतीय पलटणीच्या हद्दीत पाय रोवता आला. त्यावेळी लान्सनायक करम सिंगांनी स्वतः जखमी झालेले असतानाही इतर काही साथीदारांच्या मदतीने शत्रूवर प्रतिहल्ला चढवला. समोरासमोर झालेल्या झटापटीत त्यांनी समोरील शत्रूगटातील अनेक जणांना ठार केले. कितीही कठीण परिस्थितीत न डगमगणारा नेता म्हणून लान्सनायक करम सिंग यांची प्रतिमा उभी राहिली. त्यांच्या अतुलनीय शौर्याने, त्यांनी त्यांच्या साथीदारांना त्यादिवशी स्फुरण दिले आणि आपण हा भाग पुन्हा आपल्याकडे आणू शकलो. त्यांच्या जाज्वल्य देशाभिमानामुळेच टिथवालच्या लढाईत त्या दिवशी भारतीय सैन्याला विजयश्री खेचून आणता आली. लष्करातून निवृत्त झाल्यावर ते जन्मगावी गेले आणि वृद्घापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अतुलनीय धैर्याबद्दल त्यांना परमवीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले शिवाय सन्मान्य कॅप्टन अर्थात ऑनरेरी कॅप्टन हे बिरुद त्यांना लाभले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 

- सर्वेश फडणवीस 

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day5



Saturday, February 4, 2023

◆ राष्ट्रांकुर - कंपनी हवालदार मेजर पिरुसिंग - १९४८


भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे चौथे मानकरी मेजर पिरुसिंग आहेत. त्यांचा जन्म राजस्थान येथील लष्करी परंपरा लाभलेल्या राजपूत शेतकरी कुटुंबात २० मे १९१८ रोजी रामपुरा बेरी या खेड्यात झाला. बेरीच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले परंतु शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांना शेतीच्या कामात मदत करु लागले. सुरुवातीपासून त्यांनी सैन्यात भरती होण्याचा ध्यास घेतला होता. वय कमी असल्यामुळे त्यांना दोनदा प्रवेश नाकारण्यात आला. अखेर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची राजपुताना रायफल्स क्रमांक सहाच्या बटालियनमध्ये निवड झाली. 

एक वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणानंतर त्यांची पंजाबमध्ये नेमणूक झाली. सैन्यदलात शिक्षणावर विशेष परिश्रम घेऊन त्यांनी ‘इंडियन आर्मी फर्स्ट क्लास सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन’ आणि इतर परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्या. पुढे त्यांना लान्सनायक म्हणून पदोन्नती मिळाली. मे १९४५ मध्ये त्यांना कंपनी हवालदार मेजर म्हणून पदोन्नती मिळाली परंतु ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यापदावर ते रुजू झाले. दुसऱ्या महायुद्घानंतर एप्रिल १९४६ च्या सुमारास त्यांना ‘कॉमनवेल्थ ऑक्युपेशन फोर्सेस’ च्या सेवेत घेण्यात आले आणि त्याकरिता ते जपानला गेले. तेथे ते सप्टेंबर १९४७ पर्यंत कार्यरत होते.

याच सुमारास देशाची फाळणी होऊन जम्मू-काश्मीरमध्ये विद्वेषाचा उद्रेक झाला आणि पाकिस्तानने छुपे युद्घ पुकारले. पिरु सिंग आणि त्यांच्या बटालियनच्या सैनिकांना विमानाने काश्मीरखोऱ्यात आणले गेले. त्यांच्यावर घुसखोरांना हुसकावून लावण्याची कामगिरी सोपविली गेली. १९४८ च्या उन्हाळ्यात झालेल्या लढाई मध्ये पिरु सिंगांनी पिरकंठी आणि लेडीगली ही ठिकाणे काबीज करताना महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. म्हणून त्यांची दारापरी या सुमारे ३३६ मी. उंच भागात पुढील लष्करी कारवाया करण्यासाठी निवड करण्यात आली होती.

डी-कंपनीचे हवालदार मेजर पिरुसिंग यांच्यावर टिथवालच्या दक्षिणेस असलेल्या टेकडीवर हल्ला करून, ते ठिकाण ताब्यात घेण्याची जबाबदारी आली. शत्रुपक्षाने त्या ठिकाणावर आपला ताबा प्रस्थापित केला होता आणि सर्व वाटा रोखून धरल्या जाव्यात यासाठी मेडियम मशीनगन (एम.एम.जी.) बसवल्या होत्या. जेव्हा आपण हल्ला केला, तेव्हा शत्रुपक्षाने एम.एम.जी. चा मारा केला आणि खंदकावरून खाली हातगोळे फेकले. पिरुसिंग त्यावेळी कंपनीच्या पहिल्या तुकडीत होते. त्यांच्या तुकडीतील अर्धेअधिक लोक शहीद झालेले अथवा जखमी झालेले असतानाही ते डगमगले नाहीत. गोळ्यांच्या हल्ल्यामुळे त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा होऊन त्यांचे कपडे फाटले होते. पण तरीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते शत्रूवर चालून गेले. चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ वाहत होते, डोळ्याला जखम झाली होती, तरी त्या अवस्थेत खंदकामधून बाहेर पडत त्यांनी शत्रूच्या पुढच्या ठिकाणावर हातगोळे भिरकावले. पुन्हा युद्धाची आरोळी ठोकत, हवालदार मेजर पिरुसिंग दुसऱ्या खंदकातून बाहेर पडले आणि तिसऱ्या खंदकाकडे झेपावताना, त्यांनी १८ जुलै १९४८ रोजी आपल्या शौर्यपूर्ण एकाकी लढतीने आपल्या साथीदारांपुढे असीम धैर्याचा वस्तुपाठ घालून दिला आणि त्यातच त्यांना हौतात्म्य आले. त्यांच्या या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना १९४८ साली मरणोत्तर परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. 

- सर्वेश फडणवीस 

#rahstrankur #राष्ट्रांकुर #Day4