Monday, May 31, 2021

बुकगंगेचे भगीरथ - श्री मंदार जोगळेकर


शनिवार ची संध्याकाळ खऱ्या अर्थाने सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली कारण संवाद सुरू झाला तो मायविश्वचे श्री मंदार जोगळेकर यांच्याशी. जवळपास तासभर हुन अधिक वेळ त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानणार नाही पण त्यांच्या ऋणात नक्की राहायला आवडेल. आज श्री मंदार जोगळेकर अमेरिकेत स्थायिक झालेले मराठी उद्योजक असले तरी पंधरा दिवस अमेरिकेत आणि पंधरा दिवस भारत असा त्यांचा सतत प्रवास सुरु असतो. अतिशय हरहुन्नरी,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री मंदार जोगळेकर आहे. ज्याप्रमाणे भगीरथाने गंगा आणली त्याप्रमाणे मंदार जोगळेकर यांच्यासारख्या आधुनिक भगीरथाने साहित्याची गंगा बुकगंगेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आणली. बुकगंगा प्रवासाबद्दल त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा असतांना त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेतांना आश्चर्य वाटलं. लेखाखाली त्यांच्या वेब साईटची लिंक देतोय आपण नक्की वाचून बघा एक व्यक्ती काय काय करू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री मंदार जोगळेकर आहे. वाचून आपण थक्क होतो आणि आऊट ऑफ द बॉक्स जात मी त्यांना पहिला प्रश्न विचारला दिवसाचे नियोजन कसे करता त्यात त्यांनी दिलेले उत्तर होते की," दिवसाचा किती वेळ आपण स्वतःसाठी घालवतो आणि सकारात्मकतेत घालवतो यावर दिवसाचे नियोजन ठरतं. समोरच्याला दिलेला वेळ आपण कटाक्षाने पाळला तर दिवसाचे नियोजन योग्य पद्धतीने झाले म्हणूनच समजा".

आर्थिकदृष्ट्या संपन्नता आणि व्यवसायातले यश पदरात पडूनही आयुष्यात जे हवे किंवा आयुष्यात काय हवे याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाले होते पण एका भारत भेटीत कन्याकुमारी आणि पौंडीचेरीला गेल्यावर तिथल्या अध्यात्मिक वातावरणात स्वतःच्या मनाचा वेध घेत आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा समाजासाठी कसा उपयोग करता येईल असा विचार करता तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यांची सांगड घालत सगळ्या विचार मंथनातून २००७ साली मायविश्वची संकल्पना प्रत्यक्षात साकार झाली. मायविश्वचा मुख्य व्यवसाय सोशल नेटवर्किंगचे सॉफ्टवेअर बनवण्याचा आहे. सोशल नेटवर्किंग म्हणजे केवळ गप्पा मारण्यासाठी नसावे तर समाजहितासाठी या तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग व्हावा हीच मंदार जोगळेकर यांची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांचे सतत प्रयत्नही सुरू आहे. 

मायविश्व च्या माध्यमातून बुकगंगा अर्थात ऑनलाइन पुस्तक विक्रीची सुरुवात १५ ऑगस्ट २०१० मध्ये झाली. ही संकल्पना त्यावेळी नवी होती. आज पुस्तके माणसाला मनापासून आनंद देत असतात. आयुष्यात जसे नाते संबंध असतात तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांची सोबत असते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर पुस्तके माणसाला सोबती सारखी चिटकत असतात. पुस्तक वाचनाचा छंद नसणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. अशी ही पुस्तके निखळ आनंद,समाधान,मानसिक शांती देत असतात. सद्य परिस्थितीत पुस्तकं जी प्रसन्नता निर्माण करत आहे त्याने असं वाटतं की पुस्तकांची सोबत कायम असायला हवीच. निवांत क्षणी माणसाचा एकटेपणा घालवण्याचा सगळ्यात चांगला सोबती म्हणजे अशी ही पुस्तके आणि याच पुस्तकांना टेक्नॉलॉजी च्या जोडीने सहजपणे वाचकांना उपलब्ध करून देण्याची संकल्पना सत्यात उरतली आणि त्याचा अनुभव आपण घेतला असेल कारण आज सगळे घरात असतांना बुकगंगा वरून मागवलेलं पुस्तक मिळाल्याचा आनंद प्रत्येकाने अनुभवला असेल. हा प्रवास म्हणावा तसा सोपा नव्हता. अकरा वर्षांपूर्वी हे माध्यम नवं होतं आणि या माध्यमातून असं काही होऊ शकतं यावर प्रकाशकांना आणि लेखकाला सुद्धा विश्वास बसत नव्हता पण भविष्याचा अचूक वेध घेत प्रत्यक्ष कृतीतून बुकगंगा आणि मायविश्वचा प्रवास सुरु झाला. छोट्या गावात व्यवसायाची पाळंमुळं जायला हवी यातून कोकणातील साखरपा या गावी सुद्धा बुकगंगा सुरू आहे आणि सर्व पुस्तकांची ई आवृत्ती तिथे तयार केली जाते. मराठी साहित्य विश्वात पुस्तक विक्रीसाठी कॉल सेंटर ही अनोखी संकल्पना बुकगंगेच्या माध्यमातून साखरपा या गावी सुरू झाली आणि आज वाचकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.

आजही तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. इंटरनेट फोफावू लागलं आहे. कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट,किंडल सारख्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सकडे तरुणाई आकर्षित झाली आहे. वाचनसंस्कृती कमी झाली आहे, अशी सर्वत्र ओरड असतांना आज बुकगंगा सारखे वाचन संस्कृतीचे दालन अनेकांच्या पसंतीस उतरले आहे. याच धारेत पुढे वाचनसंस्कृती अधिक वाढत जाईल, हा विचार करून 'ई-बुक'ची सुरुवात करण्यात आली. 'ई-बुक' म्हणजे कोणत्याही पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती आणि सध्या कोरोनाच्या काळात ई आवृत्ती वाचकांना दिलासा देणारी ठरली आहे. सर्व प्रकाशकांची सर्व पुस्तकं एका फोनवर किंवा एका क्लिकवर जगभरातील वाचकांसाठी घरपोच उपलब्ध करून देणारे व्यासपीठ म्हणजे बुकगंगा आहे. छापील पुस्तकांच्या ऑनलाईन विक्रीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे मराठी छापील पुस्तकं आता महाराष्ट्रबरोबरच अगदी छोट्या खेडेगावांत आणि अगदी सातासमुद्रापारसुद्धा पोहोचू लागली आहे. कारण वेळेत पुस्तक पोहोचवण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारे हे पुस्तकांचे महत्त्वाचे दालन आहे. 

आज मायविश्व च्या माध्यमातून ऑडिओ बुक निर्मितीचे कार्य सुरू आहे कारण हल्ली तरुण पिढी स्मार्टफोन चा वापर अधिक करते आणि तरुण मराठी ऐकतात,बोलतात पण वाचत नाही याच जाणिवेतून ऑडिओ बुक ची सुरुवात झाली आहे, बुकगंगा प्रकाशनाच्या माध्यमातून विविध पुस्तकांची निर्मिती, ड्रायव्हरपासून 'सीईओ'पर्यंतच्या वेगवेगळ्या स्तरांतल्या वेगवेगळ्या व्यक्तींचं 'बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन' करून देणारं व्हेरिफिकेशन- एक्स (Verification-X), केवळ सकारात्मक प्रेरणादायी, वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार मराठी लेख-बातम्या प्रसिद्ध करणारं 'बाइट्स ऑफ इंडिया डॉट कॉम' (Bytesofindia.com) हे पोर्टल, अशा विविध माध्यमांतून लोकल सेवा ते ग्लोबल सेवा देण्यासाठी मायविश्व टेकनॉलॉजि आणि बुकगंगा'ची टीम सदैव प्रयत्नशील आहे. 

आज वाचन विश्वात खऱ्या अर्थाने डिजिटल युगाची सुरुवात झाली आहे असे म्हणता येईल. मंदार जोगळेकर म्हणतात,"आज ई बुक्सला चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास शंभर टक्क्यांनी खप वाढला आहे. भारतातील इतर भाषांपेक्षा सर्वाधिक पंधरा हजार ई बुक्स मराठीत उपलब्ध आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. लॉक डाऊनच्या काळात अनेक प्रकाशकांनी ई बुक्सची नोंदणी केली आहे." खरंतर आज अनेक पुरस्कारांची श्रीमंती मंदार जोगळेकर यांच्या पाठीशी असतांना साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हीच ओळख त्यांना यथार्थ ठरेल असे वाटते. 

नवीन उद्योजकांना ते सांगतात की," व्यवसाय करतांना फायद्याबरोबरच आपण जी सेवा देतो आहे ती उत्तम दर्जाची असावी,लोकांना समाधान मिळाले पाहिजे आणि व्यवहारात पारदर्शकता हवी. हे मूलभूत तत्वे मनात पक्के झाले की व्यवसायात यशस्वी झाले म्हणूनच समजा." कमी लोकं जास्त काम कसे करू शकतील हा महत्त्वाचा विचार उद्योजकांनी करावा हा त्यांचा आग्रह आहे. आज मायविश्वच्या विविध प्रकल्पाचे काम सुरू आहे याबद्दल विचारले असता ते म्हणतात सर्व कामांचे व्यवस्थित नियोजन,पुढील तीन वर्षाच्या योजनांचा आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरू आहे त्यामुळे सगळे प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे.असं ते आवर्जून सांगतात. 

भाषा टिकली तर संस्कृती टिकून राहील,संस्कृती टिकून राहिली तर साहित्य टिकून राहील आणि साहित्य टिकवून ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत ही हवीच. याच तंत्रज्ञानाच्या सोबतीने आज ५०० हुन अधिक प्रकाशक आणि त्यांची दीड लाखाहुन अधिक मराठी पुस्तकं तसेच २००० हुन अधिक मोफत पुस्तके इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध करणाऱ्या तसेच मराठीला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख देण्याचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या श्री मंदार जोगळेकर यांना आपल्या कामाच्या यशाबद्दल पूर्ण खात्री आहे. साखरपा या कोकणातील छोट्याशा गावातून येत अमेरिकेसारख्या देशातही स्वतःच्या कर्तृत्ववाने यश संपादन करता येत हे त्यांनी सिद्ध केले आहे.श्री मंदार जोगळेकर यांची वाटचाल उत्तरोत्तर वर्धिष्णू व्हावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

www.mandarjoglekar.com 

http://www.bookganga.com

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख६




Thursday, May 27, 2021

सुवर्ण दालनाचे PNG ब्रदर्स : अक्षय गाडगीळ - रोहन गाडगीळ

PNG अर्थात पुरुषोत्तम नारायण गाडगीळ हे नाव आज आदराने घेतले जाते. बऱ्यापैकी मराठी कुटुंबातील कार्याप्रसंगी यांची आठवण होते आणि आपण मग लगेच भेट देऊन येतो. पण हे कुटुंब खूप प्रसिद्धी पराङमुख आहे असं वाटतं. ग्राहकांना आनंद देणे ही त्यांची प्राथमिकता पण तो आनंद देतांना त्यांच्याशी भावनिक नातं ते सहज निर्माण करतात. असाच भावनिक संवाद ज्या कुटुंबाशी झाला ते म्हणजे गाडगीळ कुटूंब आहे. खरंतर हे कुटूंब आणि त्यांचा व्याप खूप मोठा आहे. पण रोहन गाडगीळ यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याशी शांत आणि आत्मीय संवाद साधू शकलो याबद्दल स्वतःला मी भाग्यवान समजतो. 

हल्ली ब्रँड चा जमाना आहे आणि पीएनजी हा ब्रँड ग्राहकांच्या पसंतीस उतरणारा आहे. ब्रँडेड कपडे,ब्रँडेड वस्तू वापरणे म्हणजे स्टेटस झालेले आहे. या वस्तू वापरणारे म्हणजे श्रीमंत,सुखवस्तू घरातले असे समजले जाते. पण आता या वस्तू सर्रास सगळीकडे बरेच जण वापरताना दिसतात. ब्रँड म्हणजे वस्तूचा उत्तम दर्जा, वस्तूची गुणवत्ता व त्याबद्दल ग्राहकांच्या मनात असणारा विश्वास. आणि हा विश्वास निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे बाजारात त्या ब्रँडचा असणारा नावलौकिक आणि त्यांनी आपल्या ग्राहकाला दिलेली सेवा असेच म्हणता येईल. असे अनेक ब्रँड आहेत ज्यांनी ग्राहकांच्या मनात विश्वास,समाधान व गुणवत्ता याची प्रतिमा निर्माण केली आणि एक ट्रेडमार्क निर्माण केला आहे त्यातीलच एक म्हणजे पीएनजी ब्रदर्स. 

आज सगळेच ब्रँड हा दावा करतात की त्यांनी वस्तूची उच्च पातळीची तपासणी केली आहे. आपली बाजारातील पत किंवा नावलैकिक टिकविण्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या ब्रँडच्या दर्जाकडे विशेष लक्ष देत असते. त्यामुळे ब्रँड म्हणजे संबंधित वस्तूंबद्दल सर्वसामान्यांच्या मनात असणारी खात्री हे जरी असले तरी त्या ठिकाणी गेल्यावर आपुलकी आणि जिव्हाळा जपत ग्राहकांना आपलेसे करणे म्हणजे तो ब्रँड यशस्वी झाला म्हणूनच समजावे लागेल. पु.ना.गाडगीळ ब्रदर्स ज्वेलर्स असाच ब्रँड आहे ज्यांनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देत दागिन्यांच्या व्यवसायात चांगला जम बसविला आहे. आजच्या घडीला ग्राहक यांच्या दागिन्यांकडे ब्रँड म्हणून बघतात. 

पीएनजी ज्वेलर्स चा प्रवास १८३२ मध्ये सांगलीमधून सुरू झाला. 
अत्यंत उच्च व्यवसायिक मूल्ये आणि दर्जेदार ज्वेलरी यामुळे ग्राहकांची मने जिंकून या समूहाची यशोगाथा सुरू झाली आहे. पुढे सांगलीहून पुण्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हे दालन आहे. आज १८८ वर्षाहून अधिक काळ गेला तरीही पीएनजी ज्वेलर्स च्या उच्च व्यवसायाच्या मूल्यांची जाण त्यांच्या दालनात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला येत असतेच. ग्राहकांच्या प्रेमाच्या जोरावर जिद्द,चिकाटी आणि परिश्रमाने आता प्रत्येकाने आपला कार्यविस्तार केला आहे.

कै.श्रीकृष्ण गाडगीळ अर्थात राजाभाऊ यांनी १९९८ साली रत्नांचा स्वतंत्र व्यवसाय पुढे नेला आणि २००२ साली अक्षय गाडगीळ हे अकरावीत आणि रोहन गाडगीळ हे आठवीत असतांना राजाभाऊ यांचे अचानक निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी श्रीमती पद्मिनी गाडगीळ यांनी राजाभाऊ यांनी पेरलेल्या बीचे वटवृक्षात रूपांतर केले. खरंतर श्रीमती पद्मिनी गाडगीळ यांच्या काळात व्यवसाय वृद्धी झाली असेच म्हणता येईल कारण त्यांनी २००४ साली नवे दालन सुरू केले. पुढे अक्षय गाडगीळ आणि रोहन गाडगीळ यांनी राजाभाऊ गाडगीळ यांचे स्वप्न सत्यात उतरवून आज पीएनजी ब्रदर्स ची वाटचाल खऱ्या अर्थाने अनेकांना प्रेरणादायी होईल अशी केली आहे. 

पीएनजी ब्रदर्स उच्च प्रतीच्या गुणवत्तेसाठी ओळखले जात आहे. आज त्यांच्या ग्राहकांना खात्रीपूर्वक गुणवत्ता देण्यासाठी ते तत्पर आहेत. १९९८ साली सुरू झालेला प्रवास आज सहा वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे. पुण्यात पाच शाखा आणि नाशिक येथे एक शाखा सुरू आहे. लक्ष्मी रोड ला सहा मजले इमारतीत पूर्ण कॉर्पोरेट ऑफिस कार्यरत आहे. आज कौटुंबिक श्रीमंती गाडगीळ कुटुंबाकडे आहेच. कार्याप्रसंगी सगळेजण एकत्र येतात पण त्यात व्यवसाय हा कधीही चर्चेचा विषय नसतो. सगळेजण आपल्या व्यवसायाचे विस्तारीकरण योग्य पद्धतीने करत आहेत. 

आज कोविडमुळे यांना ही आर्थिक फटका बसला आहे त्यातूनही योग्य वाटचाल करण्याची तयारी आहे. सद्यस्थितीत आहे त्या सर्व सुविधा ग्राहकांना देणे हीच त्यांची प्राथमिकता आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ऑनलाइन सुविधा त्यांनी सुरू केली आहे. त्यांच्या वेब साईट ला भेट दिल्यावर त्याबद्दल अधिक आपणांस जाणून घेता येईल. उत्सवकाळात आणि लग्नसराई असतांना ग्राहकांच्या सोयीसाठी काही बदल करावे लागले आणि त्यांनी ते केले आहेत. खरंतर कुठलाही व्यवसाय हा जिद्द,चिकाटी, विश्वास, पारदर्शकतेशिवाय यशस्वी होऊ शकतच नाही. नाविन्याच्या दृष्टिकोनाबरोबर आपली पारंपरिक मूल्ये जोपासत गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलेले पीएनजी ब्रदर्स आज यशोशिखरावर आहेत. प्रसिद्धीच्या मागे न लागता शांतपणे काम करत राहणे हे त्यांच्याकडून प्रत्येकाने घेण्यासारखा गुण आहे आणि तो मला विशेष आवडून गेला आहे. रोहन गाडगीळ यांच्याशी बोलतांना ती नम्रता,ऋजुता आणि आपलेपणा मनात घर करून गेला.

या क्षेत्रातील नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करताना रोहन गाडगीळ सांगतात,की कुठल्याही उद्योग सुरू करतांना अभ्यास करणे आवश्यक आहे. तुमच्याकडे युनिक आयडिया असेल तर ती इम्प्लेमेंट करा आणि तुमच्या प्रॉडक्ट मध्ये युनिक काय आहे की ग्राहक तुमच्याकडे येईल त्याचा अभ्यास करा. प्रॉडक्ट मध्ये uniqness हवा. आयडिया मध्ये unqueness हवा. तुम्हाला कायम अपडेट राहावे लागणार. कारण स्पर्धा ही तुमच्याच अवतीभवती असणार आहे. 

आज ज्या पद्धतीने वाटचाल सुरू आहे त्याने ते समाधानी आहेत. सद्यस्थितीत जे सुरू आहे त्यालाच सुरू ठेवणे हे प्राधान्यक्रम त्यांचा आहे. २-३ वर्षांनी पुन्हा सगळं सुरळीत झाले की पीएनजी ब्रदर्स पुन्हा नव्या दालनाने ग्राहकांच्या सुविधेत असेलच. आज खऱ्या अर्थाने परंपरा आणि संस्कृती जपणारे मराठी उद्योजक कमी आहेत पण PNG ब्रदर्स यांनी आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा मेळ उत्तम साधला आहे त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

✍️ सर्वेश फडणवीस 

http://sarveshfadnavis.blogspot.com/2021/05/png.html

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख५ 

PNG Brothers

Monday, May 24, 2021

परीक्षित प्रभुदेसाई यांचा लख्ख करणारा पितांबरी प्रवास ..


आज परीक्षित प्रभुदेसाई यांच्याबद्दल लिहायला व्यक्तिशः आनंद होतो आहे. नव्या दमाचा तरुण,युवा यशस्वी उद्योजक म्हणून परीक्षित प्रभुदेसाई अनेकांना परिचित आहे. पण त्यांच्याशी बोलल्यावर जाणवतं की लहान वयात मोठी जबाबदारी असली तरी प्रसंगी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेतले की वाटचाल अधिक दमदार होते. हसत-हसत विचारांची देवाणघेवाण करतांना परीक्षित प्रभुदेसाई हे उद्याचे यशस्वी उद्योजक होणार यात शंका नाही कारण उद्योगात नवनवीन बदल करत आज त्यांची वाटचाल वर्धिष्णू होते आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले प्रभुदेसाई कुटुंब आजही तितकेच साधे आणि प्रत्येकाला आपलेसे वाटतात.  

परीक्षित प्रभुदेसाई लहानपणापासून कुटुंबातील व्यवसाय बघत आल्याने त्यात नाविन्य आणतांना कुटुंबाची भरभक्कम साथ त्यांना मिळते आहे आणि त्यातून त्यांचा यशस्वी प्रवास सुरु आहे. झी युवा सन्मान २०२० नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि. व्हाइस चेअरमन आणि मार्केटींग डायरेक्टर असलेले परीक्षित प्रभुदेसाई तितकेच दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे हे त्यांच्याशी बोलतांना सहज जाणवते.

खरंतर आज पितांबरी पावडर ही प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसलेच. प्रत्येकाकडे ठेवण्याच्या जागेत नक्कीच बदल असेल पण असं घर नसेलच जिथे पितांबरी पावडर नाही. माझा वैयक्तिक अनुभव असा की तांब्याचे संध्या पात्र,अष्टदळ आणि आचमन पळी चमकवण्यासाठी या पावडरचा मला खूप उपयोग होतो. पावडर घेणे आणि तांब्याची भांडी चमकवणे इतकाच संबंध येत असतांना यांच्याबद्दल अशी खूप काही माहिती नव्हती पण उद्या ते वापरतांना त्याकडे बघून समाधान वाटणार हे निश्चित आहे. कारण आज त्याच्या पॅकेजिंग कडे बघतांना जाणवतं कीं हा प्रवास म्हणावा तसा सोप्पा नाही. खरंतर पितांबरी गेली ३२ हुन अधिक वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे आणि ग्राहकांच्या विश्वासाने त्यांचा प्रवास सतत नवनवे शिखर गाठणारा आहे. भांडी घासायची पावडर ते चंदनाची झाडं आणि लेमन ग्रास ऑईल,दिपशक्ती तेलापासून ते स्वतःच्या जमिनीत उगवलेल्या फुलांच्या नैसर्गिक सुगंध व अर्कापासून तयार केलेल्या देवभक्ती अगरबत्त्या, बांबू उत्पादन असा मोठा प्रवास आज पितांबरी समूहातून होतो आहे. विविध उत्पादने आणि उत्तम दर्जाची गुणवत्ता यामुळेच पितांबरी घराघरांत पोहोचली आहे. भारतात जवळपास सर्व ठिकाणी आणि भारताबाहेरही २६ होऊन अधिक देशांमध्ये या उत्पादनांची निर्यात होते. आज पितांबरीची १६२ वेगवेगळ्या पॅकिंगमधली ८२ होऊन अधिक अभिनव उत्पादनं ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पितांबरी या नावातच पितळ, तांब,बरी असा उल्लेख आला आहे. या नावासाठी सुद्धा १५ दिवसांचा अवधी लागलेला आहे. पितांबरी आपल्या उत्पादनांची कायम जाहिरात करत असते आणि या उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी देखील असते. पितांबरी उद्योग समूहाचे वैशिष्ट असे की त्यांच्या उत्पादनांचे संशोधन हे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला उत्तर शोधण्याच्या वेडाने प्रेरित झालेले दिसून येते. आपण महाराष्ट्रातील माणसं पितळी भांडी कमी वापरतो पण दक्षिण भारतामध्ये पितळी वस्तूंचा वापर जास्त असल्याने तेथे पितांबरी उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

श्री रविंद्र प्रभुदेसाई हे रसायनशास्त्र अभ्यासक असल्याने त्यांनी प्रथम घरीच संशोधन करून वेगवेगळी उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. अशातच त्यांनी हॉटेल ताज येथे पितळी भांड्यांना साफ करण्यासाठी वेगळे गुणधर्म असलेल्या पावडरचा शोध लावला, ती पावडर म्हणजे आजची पितांबरी आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेली या पावडर सोबत पुढे त्यांनी होमकेअर, हेल्थकेअर, ऍग्रीकेअर आणि फूडकेअर अशा ४ मुख्य दिशा ठरवून त्यासंबंधित ५० हुन अधिक उत्पादने तयार केली आहेत. मराठी व्यावसायिकांनी लघुव्यवसायामध्ये अडकून न राहता, मोठी स्वप्ने पहावी असे ते कायमच सांगतात. नोकरी करून ठराविक पगार घेण्यापेक्षा स्वतः नवनवीन उत्पादने तयार करून लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवणे हे रविंद्र प्रभुदेसाई यांचे स्वप्न होते आणि आज परीक्षित प्रभुदेसाई ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. रसायन विरहित गुळाचे उत्पादन आणि पुढे त्यातून गूळ पावडर हे देखील त्यांच्या हटके विचारांचे उदाहरण आहे. आज परीक्षित प्रभुदेसाई यांचा प्रवासही मुळापासून सुरू झाला आहे त्यामुळे या पदावर असतांना सुद्धा मुळाशी असलेले प्रश्न त्यातून मिळणारे समाधान अशी मोठी शिदोरी त्यांच्याजवळ आहे. 

परीक्षित प्रभुदेसाई यांना नव्या उद्योजकांनी या क्षेत्रात येण्याबदल विचारले असता ते म्हणाले," उद्योग करताना सामाजिक भान ठेवावे, यासाठी पहिले कारण म्हणजे चांगल्या गोष्टींमागे आर्थिक पाठबळ देता यावे, आणि दुसरे कारण असे की त्यामुळे व्यावसायिक विरोधक कमी होतात आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो आणि त्यातून व्यवसाय अधिक वृद्धिंगत होत राहतो. व्यावसायिकांनी सरकारवर अवलंबून न राहता, एकमेकांमध्ये मागणी-पुरवठा तत्वानुसार संबंध जोपासले पाहिजे हाच त्यांचा उद्योग मंत्र आहे आणि हे बाळकडू त्यांना लहानपणापासून घरातून मिळाले आहे आणि याच तत्वावर पितांबरी ची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 

कोरोनाकाळात सुध्दा कंपनीची वाटचाल दमदार अशीच झाली आहे. थोडा त्रास झाला पण तरी त्यावर उपाययोजना करत काम नियमितपणे सुरू होते आणि आजही सुरू आहे. मानसिक शांतता असेल तरच आपण व्यवसायवृद्धी चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास परीक्षित प्रभुदेसाई नव्या येणाऱ्या उद्योजकांना देतात. व्यावसायिक यश मिळविण्यासाठी गुणवत्ता,कल्पकता आणि सातत्य या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात. गेल्या ३२ वर्षांच्या वाटचालीत पितांबरी उद्योग समूहाने या त्रिसूत्रीच्या आधारे प्रगतीचे उत्तुंग शिखर गाठत ग्राहकांच्या उपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत स्वत:चा वेगळा ठसा निर्माण केला आहे.  

परीक्षित प्रभुदेसाई यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल जाणून घेतांना ते म्हणतात,"उद्योगविश्वात वावरताना आम्ही ग्राहकाला देव मानले. ग्राहकांच्या सोयीची उत्पादने बाजारात आणली तर ती लोकप्रिय होतात, हा आमचा अनुभव आहे." पितांबरी च्या यशाचे हेच रहस्य आहे. आज या वयात ही जबाबदारी आणि सकारात्मक भावनेने होत असलेली यशस्वी वाटचाल नक्कीच अनेकांना प्रेरणादायी आहे. आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेतच.

✍️ सर्वेश फडणवीस 

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख४



Thursday, May 20, 2021

मॉड्युलर फर्निचर चे दालन " स्पेसवूड " निर्माण करणारे विवेक देशपांडे - किरीट जोशी !!


खऱ्या अर्थाने कालची संध्याकाळ प्रेरणादायी आणि खूप काही शिकवणारी होती. दिवसभराची मरगळ तासाभराच्या संवादाने क्षणात दूर झाली आणि संवाद झाल्यावर सहज मनात आले की यशस्वी उद्योजक असाच एका रात्रीत होत नाही. सातत्य,परिश्रम, मेहनतीच्या बरोबर आज ही माणसं यशोशिखरावर गेली आहेत. २०१४ मध्ये देशांत परिवर्तन घडले आणि प्रधान नेतृत्वाने 'स्टार्टअप इंडिया' आणि 'वोकल फॉर लोकल' असा नारा दिला आणि त्याची सुरुवात खरंतर २३ वर्षांपूर्वी सुरू झाली असं म्हंटल तर आश्चर्य वाटणार नाही पण आज ज्यांच्या प्रवासावर लिहायला घेतोय ते आहेत विवेक देशपांडे आणि किरीट जोशी आणि त्यांची कंपनी स्पेसवूड फर्निचर प्रा. लि. ही नागपूरस्थित देशातील दुसरी मोठी फर्निचर निर्माण कंपनी आहे. त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेतल्यावर त्यांच्याबद्दलचा आदरभाव सहज वाढेल असाच त्यांचा प्रवास आहे. 'मैत्र जीवांचे' या माउलींच्या पसायदानातील शब्दांचे सामर्थ्य या द्वय मित्रांच्या वाटचालीत सहज जाणवते.

समर्थांनी पण मैत्रीची व्याख्या करतांना सांगितले आहे,

मित्र तो पाहिजे ज्ञानी । विवेकी जाणता भला ।
श्लाघ्यता पाहिजे तेथे । येह लोक परत्रही ।।

समर्थ यात सांगतात की अभ्यासू ,विवेकी,अंतर्बाह्य भला,सत्याने वागणारा,कीर्तीने स्मरणात राहणारा तो मित्र असावा. मुळात दोन सम विचारी एकत्र आले तर तिथे ओघाने मैत्री ही आलीच. मग त्यात विचारांचे आदान-प्रदान अपेक्षित आहेच. याच विचारातून मैत्री दृढ होण्यास मदत होते. अशी दृढ मैत्री पुढे वर्षानुवर्षे टिकून राहत आणि त्या मैत्रीतून मोठे उद्योजक होण्याचा प्रवास आज श्री विवेक देशपांडे आणि श्री किरीट जोशी यांचा आहे आणि त्यांची स्पेसवूड सारखी कंपनी ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यास तत्पर आहे.

१९९४ मध्ये ऑफीस फर्निचर बनवण्यासाठी एक छोटंसं वर्कशॉप त्यांनी सुरु केलं आणि मग हळूहळू 'मॉड्युलर किचन्स फर्निचर' ही संकल्पना सर्वांत आधी स्पेसवुड फर्निचर यांनी समोर आणली म्हणजेच भारतीयांना या आधी किचनच्या फर्निचरची संकल्पना माहितीच नव्हती. महाराष्ट्रातील नागपूरसारख्या शहरातून त्यांनी सुरु केलेल्या या व्यवसायामुळे आज महाराष्ट्राला,विदर्भाला आणि नागपूरकरांना अभिमान वाटावा असा यांचा प्रवास आहे.

श्री विवेक देशपांडे आणि श्री किरीट जोशी हे दोघे पहिल्यांदा
विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग कॉलेज येथे भेटले. तिथे त्यांची मैत्री झाली आणि त्यांनी व्यवसाय सुरु करण्याचे ठरवले. कॉलेज मध्ये असताना श्री विवेक देशपांडे इतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असलेल्या मुलांची Applied Mechanics विषयाची शिकवणी घेत असत पुढे ते अभ्यासाच्या नोट्सही विकू लागले आणि त्या मिळकतीतून त्यांनी प्रकाशन व्यवसाय सुरु केला. बऱ्यापैकी पैसे कमावल्यावर त्यांनी एस्सार स्टील आणि एस्सार शिपिंग या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये पैसा गुंतवला. त्यादरम्यान दोघांनीही सोबतच एकाच कंपनीत नोकरी केली. घरच्यांनी सांगितले की व्यवसाय जरूर करा पण व्यवसाय करताना तो चालतो कसा त्यातील बारकावे अभ्यासा, त्याचे निरीक्षण करा आणि त्यातून त्यांनी काहीकाळ नोकरी केली. हे दोघे नेहेमी नव्या संधींच्या शोधात असायचे. सुरुवातीला व्ही.आय.पी आणि गोदरेज अशा मोठ्या कंपन्यांना ते माल बनवून द्यायचे. या संपूर्ण प्रवासात त्यांना नवे तंत्रज्ञान सापडले आणि त्यांनी ते भारतात आणले, मग झपाट्याने त्यांचा व्यवसाय वाढतच गेला.

सुरुवातीला लेबर चौकातून लेबर आणून त्यांना काम दिले आणि महिन्याचा पगार ही दिला आणि ती सगळी माणसं आजही त्यांच्या सोबत आहे. जिथे त्या काम करण्याऱ्या माणसांच्या सायकली दिसायच्या आज तिथे चारचाकी गाड्या दिसत आहे. आज कार पार्कींग ला जागा पुरत नाही इतका बदल त्यांनी २३ वर्षात बघितला आहे. आपण त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी करतोय याचे समाधान त्यांना आहे. कौटुंबिक श्रीमंती या द्व्य मित्रांना लाभली आहे. घरातील माणसांनी कंपनी संदर्भातील कधीही कुठल्या कामात विरोध दर्शविला नाही त्यामुळे  हा त्यांचा प्रवास निरंतर सुरू आहे.

संवाद साधत असतांना श्री विवेक देशपांडे यांनी यशस्वी उद्योजकांना मंत्र दिला ते म्हणाले," जेव्हा तुम्ही मित्राबरोबर व्यवसाय करता तेव्हा मैत्री ही अधिक दृढ होत जाते. किरीट जोशी दूरदृष्टीने योजना तयार करत असतो आणि मी ते अंमलात आणतो, तो स्वप्न पाहतो आणि मी ते साकारत असतो हे सगळं आमच्या मैत्रीच्या, प्रेम,विश्वास,आदर आणि भागीदारीच्या भक्कम पैलूंवर शक्य आहे. आम्ही त्यातूनच आज काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे.”

नागपूर येथे १५ एकर जमिनीवर कंपनीचा उत्पादन प्रकल्प आणि मध्यवर्ती भांडारगृह कार्यरत आहे. डिसेंबर २०२० मध्ये आगीत काही कोटींचे नुकसान झाले. कंपनीतील पाचही प्राॅडक्शन युनिट पूर्णपणे जळाले. पण हे दोघेही हिम्मत हरले नाही. २३ वर्ष ईश्वरीकृपेने सगळं छान झाले आहे आणि यातूनही पुढे चांगलं होणार आहे या विश्वासाने पुन्हा नव्याने प्रकल्प उदयास येतो आहे. आज आणखीन दोन उत्पादन प्रकल्प बुटीबोरी स्थित औद्योगिक क्षेत्रात सुरू आहे. ८०० हुन अधिक कर्मचारी या सगळ्या प्रकल्पात कार्यरत आहे. चांगल्या पगाराच्या नोकरीला बगल देत ही द्वय मित्रांची जोडी आज वर्षाला कोटींची उलाढाल असणाऱ्या फर्निचर कंपनीची मालक बनली आहे.

आज स्पेसवूडचे देशव्यापी जाळे पसरविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असून देशातील २५ हुन अधिक शोरूम्सची दालने ग्राहकांना आकर्षित करत आहे. शून्यातून विश्वनिर्मिताचा प्रवास हा स्पेसवूडचा फर्निचरचा आहे. ६५ हजार रुपयांनी सुरू झालेला हा व्यवसाय आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेतो आहे. मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध कुटुंबातील ह्या द्वय मित्रांनी एक स्वप्न बघितलं जे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी चिकाटी,सातत्य आणि सतत नवनवीन बदल करत प्रसंगी अडचणींना सामोरे जात आज त्यांची वाटचाल यशोशिखरावर आहे. खरतर त्यांची गाथा अतिशय प्रेरणादायी आहे.

आगामी वर्षांत महिन्याला एक याप्रमाणे स्पेसवूड विक्री दालने विस्तारत नेण्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी हे दोघेही कटिबद्ध आहेत. कंपनीने स्वमालकीच्या विक्री दालनांव्यतिरिक्त, स्नॅपडील, अमेझॉन,पेपरफ्राय, फॅबफर्निश,फ्लिपकार्ट यांसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांवरूनही विक्री सुरू केली आहे. रिलायन्स, अदानी, जेट एअरवेज, अ‍ॅक्सेन्च्यर, कॅपजेमिनी, क्योनी ट्रॅव्हल्स वगैरे कंपनी त्यांचे ग्राहक आहेत. शिवाय, पेनिन्सुला, कोलते-पाटील डेव्हलपर्स, डीएसके, माव्‍‌र्हल वगैरे बांधकाम व्यावसायिकांकडून कंपनीच्या मॉडय़ूलर किचन्सना खूप मागणी मिळत आहे. आज दिल्ली, गुडगाव, मुंबई,पुणे,बंगलोर,हैदराबाद येथे ही फर्निचरला भरपूर मागणी आहे आणि आज ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले हे फर्निचर त्यांच्या आवडीचे झाले आहे.

तरुण उद्योजकांनी या क्षेत्रात येण्याबद्दल विचारले असता ते सांगतात, ”बुद्धीच्या जोरावर आज आपण कोणत्याही व्यवसायात उतरू शकतो, त्यासाठी फक्त पैसाच लागतो असं नाही तर साहस हे महत्वाचं आहे. जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्ही सर्वस्व ओता, ताबडतोब यश मिळावे अशी अपेक्षा ठेवू नका बघा तुम्ही पुढे यशस्वी उद्योजक होता की नाही."

चाकोरीबद्ध आयुष्य न जगता काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या मित्रांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि श्री विवेक देशपांडे लहानपणापासून रामकृष्ण मठात जात असल्याने श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांची श्रीमंती त्यांच्या जवळ असल्याने त्यांना सतत काहीतरी करण्याची प्रेरणा आणि आध्यात्मिक बळ मिळत गेले आणि त्यातून त्यांचा प्रवास अधिक वर्धिष्णू झाला आहे. आज स्पेसवूड देशात दुसरी सगळ्यात मोठी फर्निचर कंपनी म्हणून आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. आज स्पेसवूडचे दालन प्रत्येक राज्यातील शहरात आणि गावात व्हावे हीच इच्छा आहे. आपल्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

✍️ सर्वेश फडणवीस

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख३

Spacewood

Monday, May 17, 2021

वीणा पाटील - जगभ्रमंतीची स्वप्नपूर्ती करणारी वीणा वर्ल्ड !!

वीणा पाटील यांच्याशी १५ मे अर्थात जागतिक कुटुंब दिवसाच्या दिवशी संध्याकाळी संवाद साधता आला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण त्यांच्या प्रेरणादायी प्रवासातून त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता आले. आज अनेक कुटुंबांना त्यातील माणसांना आणि वीणा वर्ल्डच्या संपूर्ण कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवण्याची ताकद वीणा पाटील यांच्या रक्तात असल्याचे जाणवते. खरंतर मनात दडपण होते की त्यांच्याशी कुठून आणि कसा संवाद साधावा पण त्यांच्या संवादातून त्यांचा प्रवास उलगडत गेला आणि जवळपास सव्वा तासाने एका योग्य ठिकाणी तो थांबला. वयाच्या ५० व्या वर्षी एखादा नवा उद्योग सुरू करतांना मनाची जी अवस्था असेल याची कल्पनाच करू शकत नाही. सामान्य माणूस या टप्प्यावर उत्तरायणाची स्वप्न रंगवत असतो पण वीणा पाटील यांनी यशस्वी उद्योजिका म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. आज वीणा वर्ल्ड ही पर्यटन व्यवसायातील अग्रणी संस्था त्यांनी उभी केली. तीस हुन अधिक वर्षांच्या फक्त अनुभवाच्या शिदोरीवर हा प्रवास सुरू झाला आणि आता प्रवास विश्वनिर्मितीकडे आहे. वीणा वर्ल्डची वाटचाल यशोशिखरावर आहे. मेहनत, चिकाटी, प्रामाणिकपणा, नावीन्य,कार्यतत्परता,सातत्य आणि जिद्द हे जीवनाचे सूत्र त्यांच्यात पूर्णपणे भिनले आहे.

असं म्हणतात की, परीसाच्या स्पर्शाने लोखंडाच सोनं होतं
पण वीणा वर्ल्ड च्या माध्यमातून वीणा पाटील यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाने ते प्रत्यक्ष अनुभवले आहें. त्यांच्याशी बोलतांना सकारात्मकता आणि आत्मविश्वास ह्या शब्दांचे मोल लक्षात आले. आजही कोरोना काळात त्यांनी त्यांच्या स्टाफमधील प्रत्येकाच्या मनात विश्वास आणि हे ही दिवस जातील आणि उद्याचा दिवस हा आपला असेल इतका आत्मविश्वास निर्माण केला आहे. कारण त्यांना पूर्ण खात्री आहे की येणारा काळ पर्यटन क्षेत्रासाठी सुवर्णकाळ असणार आहे. हा काळ आव्हानात्मक असला तरी पर्यटकांशी सतत संपर्कात राहणे हे त्यांना व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे वाटते. त्यामुळे टूर्स जरी काही काळ बंद असतील तरी काम हे आजही नियमितपणे सुरू आहे. 

कौटुंबिक श्रीमंती वीणा पाटील यांना फार लाभली आहे. वडील केसरी पाटील यांच्या शिस्तीत त्यांना व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासून मिळाले त्या सांगतात की,"जर तुम्हाला उद्या उद्योजक व्हायचे असेल तर ते धडे लहान वयात द्यायला हवे." वीणा पाटील यांचा जन्म एका लहानशा गावात झाला जिथे त्यावेळी एस. टी. सुध्दा येऊ शकत नव्हती. गावाचे पाटील असून सुद्धा वडिलांच्या तालमीत त्या तयार झाल्या आहेत. शेतातील पपईचे काप करून ते विकायचे आणि त्या पैशातून मासे आणून खायचे ही वडिलांची शिकवण होती. सुरुवातीला त्यांच्या प्रवासात त्यांची आई सावलीसारखी सोबत असायची कारण मुलीने एकटे बाहेर जाऊ नये ही आपल्या संस्कृतीची शिकवण होती. पण पुढे लग्न झाल्यावर त्यांचे यजमान सुधीर पाटील यांनी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली कारण वीणा पाटील यांचे वर्षातले निम्मे महिने विमान प्रवासात असायचे. त्यांची मुले नील आणि राज लहान असतांना त्यांना कधीही आई घरात नाही याची उणीव भासली नाही कारण त्यांना घरातून संस्कार मिळाले होते की आई कामानिमित्त, पैसे कमवण्यासाठी बाहेर आहे आणि आज वीणा पाटील म्हणजे पर्यटन हे समीकरण दृढ झाले आहे. 

वीणा वर्ल्ड ची सुरुवात २०१३ साली झाली आणि असं म्हणतात की एक महिला दुसऱ्या महिलेला समोर जाऊ देत नाही अथवा मदत करत नाही पण वीणा पाटील म्हणतात की सगळ्या महिलांनी त्यांना मदत केली कारण वीणा वर्ल्ड ची पहिली टूर ही लेडीज स्पेशल होती आणि त्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला. खरंतर  'वीणा वर्ल्ड' हे नाव राज ठाकरे यांनी सुचवले आहे. आज मराठी माणसांची आवड,त्यांचा कल आणि प्राधान्य लक्षात घेता वीणा पाटील यांनी पहिल्यांदा मराठी माणसांसाठी, मराठी टूर मॅनेजर सह युरोप,अमेरिका टूर्स सुरू केल्या म्हणून आज अनेक मराठी टूर ऑपरेटर्स युरोप- अमेरिका टूर्स करताना दिसतात आणि त्यामुळे पर्यटक वीणा वर्ल्ड सोबत जाणे पसंत करतात. 

वीणा वर्ल्ड वेगळं झाले कारण कुटुंब मोठे झाले की प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळणे फार गरजेचे असते आणि ते जर आपण देऊ शकलो तर जास्त काही चांगलं निर्माण होऊ शकतं आणि त्यातून हा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला वीणा पाटील यांच्या राहत्या घरी वीणा वर्ल्डच्या कामाची सुरुवात झाली. साधारणपणे ३०-३५ लोक रोज सकाळी ९- सायं ७ काम करत असत. त्यानंतर वीणा पाटील त्यांच्याकडे असलेल्या खानसामाच्या मदतीने स्वतः काही खायला करत असत. ते दिवस म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. ते सारे आठवले की वीणा पाटील आजही त्या आठवणींच्या गावी काही काळ स्थिरावतात आणि त्यावर भरभरून बोलतात. पुढे कामाचे स्वरूप वाढले आणि वसई विकास बँकेने ना नफा ना तोटा या तत्त्वाने ६ कोटी कर्ज मंजूर केले आणि पर्यटकांच्या विश्वासातून १ वर्षात रीतसर ते फेडू शकले. आज वीणा वर्ल्डच्या प्रवासाबद्दल प्रत्येक मराठी माणूस जाणून आहे. तेथील प्रत्येक शिलेदाराने ध्येय ठेवून जिद्दीने, मेहनतीने वीणा वर्ल्ड एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. माणूस हा फक्त पैशासाठी काम करीत नाही तर तो आपल्या कामामध्ये आपले समाधान शोधत असतो आणि हेच कारण आहे की वीणा वर्ल्ड मधील प्रत्येक कर्मचारी एकमेकांत बांधल्या गेले आहे. वीणा पाटील अभिमानाने म्हणतात की,"veena world is really blessed by the people ". 

या क्षेत्रांत नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्यांना त्या सांगतात की, "ध्येय निश्चित करा,त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग ठरवा आणि मग जिद्दीने मार्गक्रमण करायला शिका. अडचणींची पायरी व्हा, अडथळ्यांचा आधार घेऊन उडी मारा आणि संकटांचे संधीत रुपांतर करा ही त्यांची शिकवण आहे." आज त्या स्वतःच्या लेखनातून प्रसंगी स्तंभलेखनातून तीच पारदर्शकता,स्ट्रॅटेजी त्या कायम सांगत असतात. २५ हुन अधिक वर्षे लेखन प्रवासाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आपल्या घरचा संवाद जाणीवपूर्वक, विचारपूर्वक असावा ह्याबद्दल त्या आग्रही आहेत त्यातून आत्मविश्वास निर्माण होईल आणि सहज बदल घडू शकेल हा त्यांना विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत डिसिजन घेण्याची क्षमता वाढवता आली पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचे एक वाक्य मनात घरून गेले त्या म्हणतात, " माझ्या स्पर्धकांनी माझी अधिकाधिक कॉपी करावी म्हणजे मला अधिक नवं सुचत जातं." बहुदा यशस्वी उद्योजकाचे हेच वेगळेपण आहे. 

कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरणार असेल तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार जगभर ज्यापद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली आहे. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडणार नाहीत, हे वास्तव आहे. किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही याबद्दल शंका होती पण जानेवारीत थोडं सुरळीत असतांना एका महिन्यात दहा हजार बुकींग वीणा वर्ल्ड मध्ये झाल्या. शेवटी मर्यादित क्षमता लक्षात घेता अनेकांना थांबवावे लागले. पण आता सगळं सुरळीत झालं की अनेकांची जगभ्रमंती पुन्हा सुरू होणार हे निश्चित आहे. कारण मानवी मन एका ठिकाणी फार काळ स्थिर राहत नाही त्याला बदल हा हवाच असतो त्यामुळे पर्यटन हे अधिक व्यापक होणार आहे हा विश्वास त्यांना आहे. 

आज लॉकडाऊनमुळे घरात असतांना अनेक कामांना वेळ देता येतोय याबद्दल त्या आनंदी आहे. आजही त्यांची पहिली प्राथमिकता ही सकाळी १०- सायं ७ वीणा वर्ल्ड च्या कामाला आहे. त्यानंतर गार्डनिंग,योग,ध्यान,वाचन,पॉडकास्ट ऐकणे,नेटफलिक्स वेब सिरीज बघणे आणि खरंतर गेली कित्येक वर्षे त्यांना असं घरात राहणे जमलेच नाही पण या आलेल्या परिस्थितीमुळे त्या घरात आनंदी आहेत. रोज रात्री १० ला दिवस संपून पहाटे ५ ला त्यांचा दिवस सुरू होतो.अमूलाग्र बदल घडवत जिद्दीने त्यांनी वीणा वर्ल्डचा आलेख सतत वर्धिष्णू ठेवला आहे. सतत काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न पर्यटकांना वीणा वर्ल्ड कडे आकर्षित करणारा आहे. आज त्यांचे सहकारी,मित्र, वेगवेगळे उद्योग,व्यवसाय करून आर्थिक अडचणींवर मात करत आहेत कारण त्या म्हणतात की रिकामे बसु नये त्याने मनात वेगवेगळे विचार येतात आज आलेल्या अडचणींवर मात करण्याची आवश्यकता आहे. शेवटी बोलण्याच्या ओघात त्यांनी छान सांगितलं ' बचेंगे भी,लढेंगे भी और जीतेंगे भी '. हीच सकारात्मकता आणि हाच विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावा हाच या लेखमालेचा उद्देश आहे. वीणा पाटील यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि वीणा वर्ल्ड च्या प्रवासाने अशीच जगभ्रमंती पर्यटकांना उत्तरोत्तर होत रहावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख२ 
#VeenaWorld Veena World

Thursday, May 13, 2021

इंद्रनील चितळे - प्रवास चितळे बंधू (मिठाईवाले) ते चितळे एक्सप्रेस व्हाया हर्बी ..

आज अक्षय्य तृतीया. खरंतर हा साडे तीन मुहूर्तातला पूर्ण मुहूर्त आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधत या नव्या लेखमालेची सुरुवात करतोय अर्थात आज या सणानिमित्ताने सगळ्यांच्या घरी गोडधोड होणार तर काही जण स्विगी, झोमॅटो मधून चितळे यांचे श्रीखंड,आम्रखंड तत्सम गोड पदार्थ घरी मागवत सण साजरा करणार आहे. आज त्यांच्याच प्रवासाविषयी अधिक जाणून घेतल्यावर तो गोडवा अधिक वाढेल ही खात्री आहे. चितळे बंधू ( मिठाईवाले) ते चितळे एक्सप्रेस व्हाया हर्बी या यशस्वी उद्योगाचे सारथ्य करणारे प्रसिद्ध उद्योजक इंद्रनील चितळे यांच्याबद्दल लिहितांना मनस्वी आनंद होतो आहे. आज या माध्यमातून इंद्रनील चितळे यांच्यारूपाने एक चांगला मित्र मिळाला आहे कारण या लेखमालेच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधता आला आणि संवादातून मैत्रभाव निर्माण झाला आहे. या संपूर्ण लेखमालेच्या प्रवासात त्यांची विशेष मदत झाली आहे. आज चितळे कुटुंबाचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मिती असा आहे.

खरंतर चितळे कुटुंबीय मूळचे भिलवडी (जि. सांगली) येथील आहे. भास्कर चितळे यांनी १९२० मध्ये सातारा जिल्ह्य़ातील लिंबगोवे या छोट्याश्या खेडय़ात दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सात भाऊ आणि पाच बहिणी अशा चितळे यांच्या कुटुंबातील भाऊसाहेब हे ज्येष्ठ असल्याने वडिलांच्यापश्चात तेच आधारस्तंभ झाले. वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून त्यांनी वडिलांसोबत दुग्धव्यवसायात पदार्पण केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मुंबई हे ब्रिटिश सैन्याच्या हालचालीचे केंद्र होते. इतर वस्तूंबरोबरच सैन्याला मोठ्या प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासेल हे ओळखून भास्कररावांनी मुंबईतील तांबे अँड सन्सबरोबर भागीदारी करार केला. तेथील व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी रघुनाथराव यांना मुंबईला पाठविले. युद्ध संपल्यावर ही भागीदारी संपली आणि सांगली-मुंबई अशा वारंवार चकरा मारणाऱ्या तेव्हाच्या तरुण रघुनाथराव यांनी व्यवसायासाठी पुण्याची निवड केली आणि चार पिढ्यांपासून पुणे आणि चितळे हे समीकरण अधिक दृढ होऊ लागले.

चितळे यांच्या दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली. यातील बंधू या शब्दाला महत्त्व आहे. कारण एकत्र कुटुंबाचे ते द्योतक असावे. गेली ७० हुन अधिक वर्षे चितळे बंधू हा व्यवसाय बघत आहेत. ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हा ब्रँड जगभर पोहोचविण्यामध्ये पहिल्या पिढीतील रघुनाथराव आणि राजाभाऊ यांची मेहनत,कल्पकता दिसून येते. पुढे त्यात सातत्य आणि चिकाटी आणि नाविन्यपूर्ण बदल करत बाकरवडी याचे उत्पादन सातासमुद्रापार जाण्यासाठी चारही पिढ्यांनी आपल्यापरीने अथक परिश्रम घेतले आहेत. आज चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व तरुण उद्योजक इंद्रनील चितळे करत आहेत. चितळे आणि बाकरवडी आज एका नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. कामाप्रति निष्ठा आणि प्रसिध्दी परांगमुख राहत इंद्रनील चितळे यांचे कार्य सुरू आहे. २००० हुन अधिक कामगार त्यांच्याबरोबर काम करत आहेत आणि या कामाचा आलेख सतत वर्धिष्णू होतो आहे. २०१७ सालापासून चितळे एक्सप्रेसच्या माध्यमातून चितळे बंधू यांचे नवे दालन आज महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात दिमाखात उभे आहे.

इंद्रनील चितळे एक तरुण यशस्वी उद्योजक आहे. चितळे हा ब्रँड त्यांना खरंतर घरातूनच मिळाला पण या ब्रँडला नवी झळाळी देण्याचे कार्य गेली १० वर्ष ते सातत्याने करत आहे. चव,दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर गेली दहा वर्षांपासून त्यांची यशस्वी घौडदौड सुरू आहे. नवनवीन आव्हाने स्वीकारत स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सच्या सोबतीने आज चितळे ग्रुपचा टर्नओव्हर दुपटीहून अधिक वाढवत शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात परदेशात जाऊन आणि नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली आणि आज अमेरिकन भारतीयांबरोबर अमेरिकेन माणूसही या बाकरवडीचा आस्वाद घेतो आहे.

सुरुवातीला विविध मशीन्सच्या मदतीने व्यवसाय कसा सुधारता येईल हे पाहणे त्यांचे उद्दिष्ट होते. सर्व विभागांत काम करून फॅक्टरी कशी चालते हे समजून घेत व त्यानंतर ती कशी वाढवता येईल, याचा आराखडा त्यांनी मांडला. हा आराखडा मांडायचे कारण हे होते की- स्वतःची दुकाने वाढवायला खूप मर्यादा होत्या. कारण या व्यवसायात ताजा माल विकला जातो. त्याची शेल्फ लाईफ कमी असते. शिवाय एका दुकानात किती ग्राहकांना सेवा देता येते, यावर मर्यादा असतात. त्यामुळे दर्जात तडजोड न करता दुकाने वाढवून व्यवसाय वाढवणे शक्य नव्हते. सेंट्रलाइज प्रॉडक्शन करून पुरवठा करणे म्हणजे पॅकेजिंग करूनच मिठाई विकणे व त्यातून व्यवसाय वाढवणे शक्य होते. त्याचा आणखी एक फायदा असा होतो की, पॅकेजिंग करून विकायचे असेल तर फक्त आपल्याच दुकानात नव्हे, तर डिस्ट्रिब्युशन चेनद्वारे हजारो इतर दुकानांतसुद्धा माल विकता येणार होता. त्यामुळे २०१७ मध्ये एक धाडसी निर्णय घेण्यात आला आणि चितळे एक्सप्रेसच्या माध्यमातून आज तो यशस्वी झालेला आहे. स्वतःची दुकाने वाढवण्याऐवजी जास्तीत जास्त उत्पादनांची निर्मिती करणे, त्यांच्या पॅकेजिंगमध्ये इनोव्हेशन आणणे आणि जगभरात स्वतःची डिस्ट्रिब्युशन चेन उभारणे- असा धोरणात्मक निर्णय तो होता. त्यावेळी त्यांना थोडं दडपण होते कारण या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. आज जवळपास काही लाख दुकाने जगभरात त्यांची प्रॉडक्ट्‌स विकत आहेत. ठिकठिकाणचे सुपर मार्केट, किराणा माल दुकाने, ऑनलाईन वेबसाईटवर किंवा सॉफ्टवेअर कम्पनी मधील व्हेंडिंग मशीनमध्ये सुद्धा ही उत्पादने मिळतात. घराण्याची तत्त्वे जपून ही ग्रोथ मिळवणे; त्यासाठी लागणारे फंडिंग, मार्केटिंग, सेल्स, क्वालिटी कंट्रोलिंग कसे असावे, हे सर्व ते सध्या पाहत आहे. कुटुंबाच्या मदतीशिवाय आणि सहकार्याशिवाय हे काहीही शक्य नाही असे इंद्रनील आवर्जून सांगतात. कुटुंब आणि कौटुंबिक श्रीमंती याविषयी इंद्रनील चितळे भरभरून बोलतात आणि हे संस्कार पिढीदरपिढी मिळालेलं संचित आहे असं क्षणात वाटतं.

आज चितळे यांचे सर्व प्रॉडक्ट ऑनलाईन उपलब्ध आहे. ग्राहक ते बिनधास्तपणे उचलत आहे कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनात तो विश्वास संपादन केला आहे. आज त्यांनी स्वतःची मूल्ये आणि तत्व समजून घेतली आहे कारण ते म्हणतात की," एकदा ग्राहकाला आमची मूल्ये पटली की, तो आमचा कायमचा ग्राहक बनतो आणि आमच्या आजोबांनी हे शिकवलं आहेच की, रिपीट कस्टमर महत्त्वाचा!"  आणि आज पहिल्या पिढीतील ही शिकवण आणि हाच आत्मविश्वास चौथ्या पिढीत ठळक दिसतोय.

कोविड नंतरचे जग कसे असेल ही चर्चा सर्वत्र होत असताना सद्य परिस्थितीवर विचारले असता इंद्रनील चितळे म्हणाले की, इव्होल्युशन असे आहे की,आम्ही सेलिब्रेशन प्लेअर आहोत.जसे की आज ग्राहकाला चांगले वाटले,एखाद्याचा रिझल्ट लागला आहे,कुणी नवे घर घेतले आहे अथवा प्रोमोशन झाले म्हणून आनंद साजरा करण्यासाठी चितळेंची मिठाई विकत घेत असतात. आज सेलिब्रेशनपुरते मर्यादित न राहता मॉडर्न लाईफसोबत कसे लिंक करता येईल,हे पाहावे लागेल. हेल्थ असेल अथवा डे टू डे गुड्‌स असतील इतक्या वाईड रेंजमध्ये प्रॉडक्ट्‌स वाढवून दहा ते वीस लाख दुकानांत आमचे प्रॉडक्ट्‌स विकता येतील का? आणि त्याचबरोबरीने इतर देशांत उत्पादन करून इंटरनॅशनल प्लेअर आपण बनू शकतो का? आणि हे करताना व्हॅल्यू एडिशन करणारी कंपनी म्हणून चितळे ब्रँड उभा राहील का? या स्ट्रॅटेजीवर इंद्रनील चितळे सध्या काम करत आहेत.

आज इंद्रनील चितळे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर लक्षात येतं की त्यांना व्यायाम करणे,बाईक चालवणे आणि म्युजिक ऐकण्याची प्रचंड आवड आहे. या संपूर्ण कामाच्या व्यापातून ते या स्वतःच्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढतात. पुस्तकं वाचन हा जिव्हाळ्याचा विषय आहे हे बोलतांना जाणवतं आणि त्यातल्या त्यात ऐतिहासिक आणि आत्मचरित्र विशेष आवडीचे आहेत कारण जे संदर्भ देत ते बोलत होते त्याने आपण भारावून जातो आणि जाणवतं उद्योजक यशस्वी असाच सहज होत नाही

आज मार्केट मध्ये येणाऱ्या नव्या उद्योजकांबद्दल विचारले असता ते सांगतात, देशाला उद्योजकांची गरज आहे. कारण उद्योजक हे जॉब्ज क्रिएटर आहेत. आपल्या देशाच्या इतक्या वर्षांच्या आर्थिक विचारसरणीत आपण जॉब्ज सिकर्स खूप बनवले, पण उद्योजकतेला महत्त्व देऊ शकलो नाही. त्यामुळे जॉब क्रिएशन ही गोष्ट आपल्याकडे सेलिब्रेट होत नाही. ज्यांना कोणाला शक्य वाटते आहे. ज्यांना वाटते आपल्याकडे ती क्षमता आहे, त्यांनी हे नक्की करून पाहावे. आपण देशाच्या विकासाकरता काय हातभार लावू शकतो आणि फक्त आपला प्रॉफिट नाही तर ओव्हरऑल एक इकोसिस्टीम कशी उभी करू शकतो याच्यावरती लक्ष द्यायला हवे. असा विचार केल्यास यश मिळतेच. तेव्हा स्पर्धात्मक पद्धतीने बिझनेस करा, सोशल मीडियाचा योग्य वापर,उत्तम फायनान्शियल बॅकअप ठेवला,आपल्या स्ट्रेंथबद्दल जाणून घेतलं,तर आपला व्यवसाय नक्कीच यशस्वी होतो. आपण प्रगत देशातील कल्पना भारतात कॉपी करणार असू, तर आपले स्टार्ट-अप यशस्वी होऊ शकणार नाहीत. आपल्या देशाला विशिष्ट समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्टार्ट-अप्स आपणाला केले पाहिजे. ते जर का नीट केले, तर ते बिझिनेस नीट टिकतील. यासाठी थोडा संयम हवा आणि चिकाटी हवी. या दोन्ही गोष्टी हव्याच म्हणजे तुम्ही यशस्वी उद्योजक नक्की होऊ शकता.

आज दहा वर्षाच्या वाटचालीत मागे वळून बघतांना इंद्रनील चितळे यांना आत्मिक समाधान जाणवत आहे. चितळे बंधू वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याची त्याची इच्छा आहे. नुकतंच त्यांनी नवीन आयुर्वेदिक प्रॉडक्ट "herbea" नावाने सुरू केले आहे. आज हे प्रॉडक्ट ८०% जपान आणि जर्मनी येथे विकत घेतल्या जात आहे. जापनीज, जर्मन आणि इंग्रजी या तिन्ही भाषेत ही साईट आहे. https://myherbea.com लिंक वर जाऊन प्रॉडक्ट बद्दल अधिक जाणून घेता येईल. नवनवीन बदल करत असतांना अनेक आव्हाने येतात. त्यातूनच नवं काहीतरी उदयास येतं आणि उद्याची नवी पहाट ही सोनेरी क्षणांनी आनंद देणारी ठरते. इंद्रनील चितळे यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख१

Wednesday, May 12, 2021

पुढे पडलेले मराठी पाऊल..🚶🚶‍♀️

सध्या कोरोना आणि तत्संबंधी बातम्यांच्या नकारात्मकतेच्या गर्दीत काहीतरी सकारात्मक आणि अनेकांना प्रेरणादायी वाटावे या हेतूने नवी लेखमाला लिहिण्याचा विचार आला. लेखमाला प्रेरणादायी असावी हा उद्देश्य ठेवूनच विचार करतांना वाटलं की यावेळी मराठी उद्योजकांबद्दल लिहावे कारण आपल्याला कोरोनाने अनेक गोष्टी शिकवल्या पण उद्योजकांना ज्या प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो आणि प्रत्येक यशस्वी उद्योजक आलेल्या प्रत्येक संधीचे सोन्यात रूपांतर करतो. अशा यशस्वी उद्योजकांची गौरवशाली गाथा " पुढे पडलेले मराठी पाऊल.." या नावाने नव्या लेखमालेच्या माध्यमातून लिहायला घेतो आहे.

'मराठी पाऊल पडते पुढे' असे आपण नेहमी म्हणतो पण या लेखमालेच्या निमित्ताने 'पुढे पडलेले मराठी पाऊल..' जे आज यशोशिखरावर असतांनाही अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत अशा उद्योजकांच्या कार्याबद्दल,त्यांच्या आजच्या एकंदर परिस्थितीबद्दल या लेखमालेच्या निमित्ताने आपल्याला वाचायला मिळणार आहे.

आपण बऱ्याच वेळा आपआपसात बोलत असतो कि मराठी लोकांनी व्यवसाय क्षेत्रात उतरायला पाहिजे, व्यवसाय करायला पाहिजे पण आपण जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा विचार करतो तेव्हा आपल्याला खूप समस्यांना तोंड द्यावे लागते आणि मग आपण व्यवसायिकतीकडे मागे बघत व्यवसायाचा विचार मनात ठेवतो पण तो आचरणात आणत नाही. प्रत्येकवेळी चर्चा होते पण त्यावर मार्ग मिळेलच असे नाही. या लेखमालेच्या निमित्ताने एक ध्यास,एक पाऊल,मराठी उद्योजक घडवण्याकडे असणार आहे.

आज उद्योजक म्हटलं कि त्यांचा काही ना काही व्यवसाय असतो हे प्रत्येकाला माहीतच आहे पण लक्षात घ्यायला हवं की त्या यशस्वी व्यवसायाच्या मागे त्यांची अफाट अशी मेहनत असते आणि त्यांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करता येत नाही. उद्योगाची भरभराट होत असतांना त्यांच्याकडे सकारात्मकतेचे जे वलय असतं त्यातून त्यांचा विश्वास अधिक दृढ होत असतो. अशाच काही प्रेरणादायी उद्योजकांबद्दल त्यांच्या गौरवशाली कार्याबद्दल या लेखमालेतून जाणून घेऊ या… 

✍️ सर्वेश फडणवीस

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #मराठी_उद्योजक #लेखमाला

Thursday, May 6, 2021

श्री समर्थ स्थापित चाफळ राम मंदीर !!

येई वो घनश्यामा, भक्तवत्सल रामा ।।
अंत किती पाहासी, लपून कां राहसी ?
दिनवत्सला बापा,क्षाळी रे पापा ।।
शून्य जग भासते,मन मनी स्फुंदते ।।

समर्थांची भावसमाधी उतरली. पूर्वेकडचा उतार उतरून मांड नदी ओलांडून समर्थ निघाले कृष्णातीराकडे. डोळ्यासमोर सतत अंगापूरचा डोह तरळत होता. पाप-पुण्याच्या खूप वरची पायरी म्हणजे आत्मशुद्धी. आणि या शुद्धीचा विचार जनमानसामध्ये रुजवायला समोर आत्म्याचंच एक प्रतीक हवं. एक सगुण रूप हवं. जे आजवर इथं जलवासात होत त्याला मी जनमानसासमोर आदर्शरूपात उभं करण्याचा प्रयत्न करत आहे आणि समर्थांनी डोहात उडी घेऊन प्राचीन शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असलेली पाषाणमूर्ती पाण्यावर आली. पाठोपाठ ती मस्तकावर धारण केलेले सुस्नात समर्थ डोहाच्या मध्यातून घाटाच्या पायऱ्यांकडे येऊ लागले. साऱ्या समर्थ शिष्यांनी उत्स्फूर्तपणे जयजयकार केला.. “जय जय रघुवीर समर्थ... !!”

रवींद्र भटांच्या “भेदीले सूर्यमंडळा” या कादंबरीत हे वर्णन वाचताना वाटत होते की एकदा तरी चाफळ ला जाऊन या राम मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घ्यावे आणि कोकणात जातांना आडवाटेवर चाफळची पाटी वाचली. बघण्याची उत्सुकता होती त्यामुळे थेट चाफळच्या राम मंदिरात जाता आले. खरंतर सज्जनगड, शिवथरघळ हे मनाला भुरळ घालणारे आहेतच पण त्याच्याच बरोबर चाफळ चे राम मंदिर मनःशांतीच्या शोधार्थ निघालेल्या पांथस्थाला आत्मीक समाधान देणारे स्थान आहे. तिथलं वातावरण आल्हाददायक, प्रसन्नता देणारे आहे. अवतीभवतीचा परिसर मन आनंदून टाकणारा आहे. 

जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला त्यावेळी साधारण दुपार झाली होती. मंदिरात तसं गुरूजींशिवाय कुणीही नव्हते. राम मंदिरात रामाचे दर्शन घेऊन तिथे रामरक्षा म्हणताना विलक्षण अनुभव आणि  समाधान मिळाले. तो अंगावर रोमांच आणणारा अनुभव आजही स्मरणात आहे. आयुष्यात प्रत्यक्ष एकदा तरी श्री समर्थ स्थापित या रामाचे दर्शन घ्यावे. अतिशय सुंदर आणि प्रशस्थ मंदिर परिसर आणि रामाची अतिशय रेखीव मूर्ती येथे आहे.

श्रीराम समर्थ !! 

सर्वेश..

Tuesday, May 4, 2021

आठवणीतील खजिना ✨✨

काही गोष्टी या कायम स्मरणात असतात. अशीच ही घटना. २४ एप्रिल २००७ ला एका घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आदरणीय नानासाहेब शेवाळकर यांच्या घरी जाण्याचा योग आला. घरी गेल्यावर त्यांच्या अभ्यासिकेत आ.नानासाहेब काहीतरी सांगत होते आणि त्यांची लेखनिक ते सगळं टिपत होती. त्यांचं घर ही बघण्यासारखे आहे. प्रशस्त दिवाणखाना,प्रसन्न देवघर वगरे बघितल्यावर पहिल्या मजल्यावरील त्यांच्या अभ्यासिकेत गेल्यावर विलक्षण ऊर्जा जाणवत होती. आ.नानासाहेबांचे छायाचित्र ते ज्या ठिकाणी बसायचे त्याच्या मागे लावले होते . टेबल,खुर्ची आणि अवतीभवती श्रीमंत करणारी पुस्तकं आणि त्यांना मिळालेले सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह अगदी व्यवस्थित ठेवले होते. त्या अभ्यासिकेत साक्षात सरस्वती निवास करते की काय इतकी विलक्षण प्रसन्नता जाणवत होती. तो प्रसंग आजही डोळ्यांसमोर तसाच आहे. त्या वयात इतकी समजही नव्हती की त्यांच्याशी कसे बोलावे आणि काय बोलावे आणि कशाबद्दल बोलावे. पण त्यांना फक्त बघणे हीच खूप मोठी पर्वणी होती. गेलो आणि  डोकं टेकवत नमस्कार केला आणि आजूबाजूला बघितले आणि निघालो. निघतांना त्यांनी आवाज दिला आणि भेट म्हणून या दोन कॅसेटचा संच दिला. या दोन कॅसेट म्हणजे सीता चरित्र आणि दुर्योधन चरित्र आहे. आजही ही भेट जपून ठेवली आहे.

आ.नानासाहेबांच्या घराचा एक नियम जो मला प्रचंड आवडला आणि त्यानंतर जमेल तसा आचरणात आणण्याचा आजही प्रयत्न करतोय तो म्हणजे घरातून कुणीही-कधीही उपाशी बाहेर पडत नाही. आ.नानासाहेबांना आलेल्या प्रत्येकाला खाऊ घालण्याची फारच आवड होती त्यांची ती आवड आजही शेवाळकर सदनात कटाक्षाने पाळली जाते आहे. आज काळाच्या ओघात कॅसेट कालबाह्य झाली तरी त्यांनी दिलेली ही भेट जपून ठेवली आहे. आम्हा नागपूरकरांना खऱ्या अर्थाने साहित्य क्षेत्रात स्वतःच्या वाङ्मयीन ऐश्वर्याने श्रीमंत करणारे विद्यावाचस्पती,वक्ता दशसहस्त्रेषु आ.राम शेवाळकर आहेत. 

नुकतेच आ.मारुती चितमपल्ली हे सोलापूरला स्थायिक होणार म्हणून नागपूरकरांच्या वतीने शेवाळकरांच्या घरी त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यावेळी आ.चितमपल्ली सरांनी निघतांना सांगितलेले शब्द आजही आठवणीत आहे ते म्हणाले होते " या घरात सरस्वती निवासाला आली आहे,आणि तिची सदैव कृपा राहणार आहे." खरंच यातच सारं आलं आहे. आ.नानासाहेब शेवाळकर आमच्या सदैव स्मरणात राहणार आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🏼🙏🏼

✍️ सर्वेश फडणवीस