Saturday, December 25, 2021

भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।


हे शब्द मनाला कायमच भुरळ घालणारे आहेत. ही कविता,त्या कवितेतील शब्दांची उंची,त्याची व्यापकता यासाठी श्रद्धेय भारतरत्न अटलजी कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहेत. निव्वळ सत्तेसाठीच राजकारण चाललेल्या देशातले राजकारणी कधी आवडले नाहीत.. पण कळत्या वयात मन जिंकलं ते म्हणजे अटलजी यांनीच. नेता,पुढारी,विचार,तरुणाईवरचा प्रभाव,आदर्श, राजकारण कसं असावं याची प्रचीती यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांकडे पाहिल्यावर यायची. आजतागायत अनेक भाषणंही ऐकली ती फ़क्त यांचीच. जरा कधी उमेद कमी झाली की आजही संसदेतल्या हळव्या कवीह्र्दय मनाच्या अटलजींच्या जुन्या भाषणांचे व्हिडीयो शोधुन शोधुन पाहतो त्यांच्या त्या ठहराव असल्या आवाजात हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ.. गीत नया गाता हूँ किंवा मग लोकसभेतील बहुमत सिद्ध करतांना केलेलं भाषण असो,ऐकताना आजही तितकाच सरसरून जिवंत काटा येतो...

काही माणसांचं ’फ़क्त’ असणंच फ़ार असतं कारण तिथं प्रचंड विश्वास असतो. मग हरलो तरी त्याचं काही वाटत नाही तसं माझ्यासाठी अनेक वर्ष राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या अटलजींचं असणं होतं. आज विद्यमान भारतीय जनता पार्टी चे भव्य स्वरूप बघून त्यांना नक्कीच अत्यानंदच झाला असता.. संसदेत एका भाषणात त्यांनी छान संबोधन केले  "सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेंगी .. सरकारे  जायेंगी.. ..पार्टीया बनेंगी बिखरेगी..मगर ये देश रेहना चाहिये.. इस देश का लोकतंत्र रेहना चाहिये"  खडे बोल आणि प्रसंगी हळवं मार्गदर्शन करतील ते अटलजी आजही यु ट्युबवर बघतांना जवळचे वाटतात…गेल्या शतकाने बरेच महाने नेते पाहिले असतील पण देशाला देव मानना-या.. विरोधकांनांही वंदनीय अशा या शतकातला एकमेव अखेरच्या अजातशत्रू भारतरत्न अटलजी यांना बघण्याचे भाग्य आपल्या पिढीला लाभले आहेत. त्या महान व्यक्तीमत्वाला शत: शत: वंदन !! शेवटी माणूस देह रूपाने नसला तरी त्याचे शब्द हे कायम सोबत करत असतात आणि त्यातच आज त्यांचे अजरामर काव्यापैकी एक..

भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।
हिमालय इसका मस्तक है, गौरीशंकर शिखा है।
कश्मीर किरीट है,पंजाब और बंगाल दो विशाल दो कंधे है।
विन्धाचल कटि है,नर्मदा करधनी है।
पूर्वी और पश्चिमी घाट,दो विशाल जंघाएँ है।
कन्याकुमारी इसके चरण है,सागर इसके पग पखारता है।
पावस के काले-काले मेघ,इसके कुंतल केश हैं।
चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं।
यह वंदन की भूमि है,अभिनंदन की भूमि है।
यह तर्पण की भूमि है,यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,इसका बिंदु-बिंदु गंगाजल है।
हम जिएँगे तो इसके लिए,मरेंगे तो इसके लिए।
मरने के बाद भी गंगाजल में बहती हुई
हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सूनेगा तो
एक ही आवाज आयेंगी- भारतमाता की जय

 -अटल बिहारी वाजपेयी

✍️ सर्वेश फडणवीस 

#SadaivAtal #AtalBihariVajpayee #ataljayanti

Tuesday, December 14, 2021

संगीतम् परमानंददायकम्..


या भूतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे असं म्हणतात आणि ते खरं ही आहे असं वाटतं. त्‍यामुळेच, की काय राजे महाराजे त्यांच्या वाड्यात सांगीतिक मेजवानी मोठ्या हर्षोल्हासात साजरे करत असावेत कारण नुकताच असा अनुभव ग्वाल्हेर येथील बैजाताल मोतीमहाल येथे अनुभवता आला.

ग्वाल्हेरच्या शिंदे राज घराण्यातील सांगीतिक मैफिली जिथं व्हायच्या त्या स्थानावर जाता आले. हे स्थान बघितले आणि मन काहीकाळ भूतकाळात रमले. ते सगळं वैभव बघतांना मनात सारखा विचार येत होता की,त्या काळात या स्थानावर किती मैफिली गाजल्या असतील,प्रत्येक मैफील अविस्मरणीय असेल. ते वातावरण,तो उत्साह शब्दांच्या पलीकडचा असेल. तिथेच तानसेन ही काही काळ गायला होते असे म्हणतात. ग्वाल्हेर महालाजवळ आजही हे स्थान दिमाखात उभे आहे. जिथे राजे-महाराजे,राण्या आणि त्यांचे मंत्रिमंडळ या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेत होते. 'बैजाताल' मोतीमहाल हे स्थान आज ज्या पद्धतीने जतन करून ठेवले आहे ते बघून आपण काहींकाळ त्या काळात आहोंत असाच भास होतो. मला वाटतं बैजाताल हे रात्रीच बघण्यासारखे आहे. रात्री तिथं गेल्यावर दिव्यांच्या प्रकाशात तेथील सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. क्षणभर मनात विचार आला की त्या काळात इथं ज्या मैफिली गाजल्या असतील त्या नक्कीच स्वर्गीय आनंद देणाऱ्या असतील.

तिथे गेल्यावर असं ही सांगण्यात आलं की ते वैभव पुन्हा अनुभवण्यासाठी काही वर्षांपूर्वी तानसेन महोत्सव याच स्थानावर घेण्यात आला होता पण जागा कमी पडत असल्याने आता तो महोत्सव तानसेन स्मृती स्थळावर होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक या महोत्सवात आपलीं कला सादर करतात. खरंच हे वैभव बघून वाटतं आपण ज्या चिरपुरातन संस्कृतीचे पाईक आहोत ती नक्कीच वर्षानुवर्षे मिळालेलं संचित आहे. खरंतर संस्कारांना संक्रमित करण्यात संगीताचे योगदान महत्वपूर्ण आहे. स्वतःच्या गायकीत तल्लीन झालेला गायक श्रोत्यांच्या हृदयात आपल्या स्वतःचे भावविश्व संक्रमित करत असतो आणि त्यामुळेच संस्कारांचा प्रवाह अबाधित राहिला आहे. आपल्या पूर्वजांनी संगीत हे संस्कार विकसित करणारे सक्षम साधन मानले आहे आणि त्यामुळेच की काय ही अशी स्थानें आजही दिमाखात उभी असून त्या ऐतिहासिक काळाची साक्ष देत सुस्थितीत आहेत. हेच वैभव टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित येत पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. जो अनुभव हे बघतांना आला तेच शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#incredibleindia #mpmarvels #gwaliordiaries

Monday, December 13, 2021

भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩


वेदांच्या अखेरच्या रचनेतील भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला गेला आहे. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे आणि आजच्या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' म्हंटले आहे.  महाभारतातल्या भीष्म पर्वा मध्ये गीतेचा उल्लेख आढळतो. गीतेत एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि जगात एकमेवाद्वितीय ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायिली' जाते. लिहिण्याची साधने उपलब्ध नव्हती तेव्हापासून हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची प्रथा आहे आणि म्हणून संथा रुपात गीता सांगितली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते,शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे म्हणून गीता ही शाश्वत आहे.

श्रीवेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे -

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता ॥

गीता सुगीता करण्याजोगी आहे. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून
तिचा अर्थ आणि भाव अंत:करणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान् श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झाली आहे.

कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र
अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. गीतेबद्दल कायमच वेगळेपण जाणवते आणि आज मोक्षदा एकादशी निमित्ताने ह्यावर लिहिताना वेगळ्याच भावना आहे.खरंतर भक्ती योगात भगवंताने वेगळं काय सांगितलं आहे.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि...
तत्कुरुष्व मदर्पणम्।।

म्हणजेच तू जे काही काम करशील.  ते तू मला अर्पण करून टाक. म्हणजेच थोडक्यात त्याचं कर्तृत्व सोडून दे... कुणीतरी पाठिशी आहे म्हणून तू पुढे आहेस,हे लक्षात ठेव आणि ह्याच गीता तत्त्वावर प्रत्येकाची वाटचाल दृढ व्हावी हीच गीता जयंती निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#गीता_जयंती  #मोक्षदा_एकादशी

Wednesday, December 8, 2021

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

कालच्या घटनेने मनात विचारांची कालवाकालव निर्माण केली आहे. जी घटना घडून गेली त्याबद्दल सारखे वेगवेगळे विचार येत होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अनाम वीरा या कवितेच्या ओळीं ओठावर येत होत्या. लताबाईंनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेलं हे शब्द आहेत. अशा शब्दांना खरंतर विविध वाद्यांची गरज नसतेच. व्हायोलिन, बासरी आणि संथ तबला असला तरी लताबाईंनी कवितेला पूर्ण न्याय दिला आहे. १९६३ मध्ये रेकॉर्ड केलेली कविता आजही डोळ्यात पाणी आणते. काल यु ट्यूबवर सतत लुपवर हेच ऐकत होतो. मनात रुंजी घालणारी ही कविता प्रत्येकाच्या ओठावर नव्हे तर श्लोक किंवा मंत्र असल्यासारखी मुखोद्गत असायला हवी तेव्हा आपले सैनिक आणि त्यांचे राष्ट्रासाठी असलेले बलिदान येणाऱ्या पिढीला कळणार आहे. 

भारतीय सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे . देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर,निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे. भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा,असामान्य कर्तृत्व,उच्च मनोबल,अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.

खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त,निष्ठा,समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे . दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो,शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी,आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो. सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.

सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्व सीमांवर वादळवाऱ्यात, बर्फात,पावसात,सैनिक चोवीस तास कडक पहारा देत असतो. तुम्ही निश्चित रहा ,मी जागा आहे असे तो छातीठोकपणे सांगतो. सीमेपासून दूर असलेल्या शहरातील माणसं -आपल्या ठिकाणी आपलं घर,आपली गाडी,मुलं हाच भारत आणि हेच जग मानणारी माणसं आज बघायला मिळत आहेत. आज आपण कुणाच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगतो आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सैनिक हाच राष्ट्राचा आत्मा आहे हे सांगताना अभिमानच वाटला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने कार्यतत्पर राहण्याची अधिक गरज आहे.

सैन्यदलाबद्दल नितांत आदर,अभिमान,श्रद्धा,विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा,ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही,आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे.  सैनिकांचा सन्मान करणे,त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे आणि काल कविता ऐकत असतांना हे सगळे विचार मनात आले. भारतीय सैन्यातील हुतात्म्यांना, सैन्यदलातील आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या सर्व वीरपुत्र अन् वीरकन्यांना आणि त्यांच्या तलवारी आपल्या मानसिक आधारानं धारदार ठेवणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना सादर नमन आहे. कमेन्ट बॉक्स मध्ये लिंक देतोय नक्की ऐका.. अनाम वीरा..

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

✍️ सर्वेश फडणवीस

Sunday, November 14, 2021

इतिहासपुत्राचे भूलोकांतून जाणे..

लेखणी आणि वाणीतून गेली ६६ वर्षे शिवचरित्राचा मंत्र सतत जपणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज वयाच्या शताब्दी वर्षात या भूलोकांतून दूर निघून गेले. "शिवाजी महाराज' हा सप्ताक्षरी मंत्र शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आयुष्यभर सतत जपत राहिले. या मंत्राच्या साह्याने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठी घराघरात पोहोचवला. मराठी मनाची मरगळ दूर केली. बाबासाहेबांनी इतिहासाचे वेड लावले. त्यांच्या आणि गो.नी.दांडेकर या द्वय मित्रांच्या प्रेरणेने अनेक शिवभक्त आणि गडप्रेमी निर्माण झाले. ऐतिहासिक वस्तू, वास्तू आणि कागदपत्रे यांच्याकडे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहण्याची दृष्टी शिवशाहिरांना मुळात होतीच पण अनेक अभ्यासक आणि संशोधकांना त्यातून प्रेरणा मिळाली. इतिहास हा विषय रुक्ष समजला जातो. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत:च्या खास शैलीत कथन करून चैतन्यरूपात समाजासमोर तो साकारला आणि इथेच त्यांचे वेगळेपण दिसून आले होते. 

छत्रपतींचा इतिहासात जाणून घेण्यासाठी उत्साही तरुण गडकोटांवर जाऊ लागले. बाबासाहेबांकडून तो तेजस्वी इतिहास समजावून घेऊ लागले. शिवचरित्राच्या अभ्यासाचे, संशोधनाचे, श्रवणाचे,अध्यापनाचे एक नवे पर्व सुरू झाले होते. सनावळी आणि दप्तरांमधला इतिहास शिवशाहिरांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि लालित्य पद्धतीने अनेक पिढ्यांना ऐकवला आहे. बाबासाहेबांची वाणी तेजस्वी होती. घरातून लहानपणापासून शिवाजी महाराज आणि गड-किल्ले यांचा संस्कार त्यांना मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या भक्तीचा विषय होता आणि राजा शिवछत्रपती हा एकच ध्यास त्यांना होता. सहाव्या वर्षांपासून वडिलांबरोबर त्यांनी किल्ले,वाडे,महाल,मंदिरे पाहण्यास सुरुवात केली होती. इतिहासाचे साक्षीदार शोधण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी विमानाने मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास केला. शिवचरित्राची कागदपत्रे मिळवली. शिवचरित्र लिहून तयार झाले ते प्रकाशित करण्यासाठी पैसे नव्हते. तेव्हा पैसे जमवायला बाबासाहेबांनी मैलोनमैल प्रवास केला. पुढे  लोकवर्गणीतून ग्रंथ प्रकाशित झाला.  याच शिवचरित्राची इतिहास वाचकांनी अक्षरशः पारायणे केली. 

बाबासाहेब पुरंदरे यांचे एकूण साहित्य उत्कट शिवभक्ती, उत्तुंग प्रतिभा यातून निर्माण झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व साहित्यकृतींशी एकरूप झालेले आढळते. 'style is the man himself' हे वचन त्यांच्या एकूण एकाहून एक सरस अशा साहित्यकृतींना लागू पडते. याचा अर्थ असा की, त्यांची भाषाशैली उपरी आणि उसनी वाटत नाही. आपले लेखन परिणामकारक व प्रभावी व्हावे म्हणून त्यांना वेगवेगळ्या युक्त्यांचा अवलंब करावा लागत नव्हता. शिवकाळाशी इतके समरस होते की जणू जिवंत भूतकाळात वावरत आहेत असे आपल्याला जाणवत होते. 'राजा शिवछत्रपती' आणि 'शिवभारत' बाबासाहेब पुरंदरे यांच्या एकमेवाद्वितीय भाषाशैलीचे उज्वल उदाहरण आहे. इतिहास आणि साहित्य या दोन्हीचे असे एक विलक्षण मिश्रण त्यात झाले आहे, की तो रुक्ष इतिहास नव्हे, रम्याद्भुत ऐतिहासिक कादंबरी नव्हे तर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून एक असे रसायन प्रकट झाले आहे. 

बाबासाहेबांचे शिवचरित्रावर पहिले जाहीर व्याख्यान २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूर येथे झाले. तेव्हापासून "शिवचरित्रकथन' हा त्यांचा ध्यास नि श्वास बनला. १२००० हुन अधिक व्याख्याने झाली,जाणता राजा सारखे महानाट्य साकारणारे पुढे भारतभर आणि परदेशातही त्याचे प्रयोग झाले. व्यासंग हीच त्यांची विश्रांती होती. वेळेबाबत ते सदैव तत्पर होते. बाबासाहेबांचा गौरव करताना प्रा. शिवाजीराव भोसले म्हणाले होते, "बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे. संस्था म्हणावं तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. शाबास, शाहिरा शाबास! इतिहासानंसुद्धा तुला मुजरा करावा इतका मोठा माणूस तू ! या सत्त्वहीन, तत्त्वहीन जगात शिवचरित्राचा जागर करीत राहा. तुझ्या जागरणाला महाराष्ट्रातील सारी दैवतं जातीनं हजर राहतील आणि तुझ्या शिवकथेत न्हालेला हा महाराष्ट्र तेजस्वी इतिहासाची पुनरावृत्ती घडवील आणि खंडतुल्य अशा या प्रजासत्ताकास आनंदभुवनाचे ऐश्वर्य प्रदान करील. हे घडावं यासाठी हे इतिहासपुरुषा, शतायुषी हो!'... हे शब्द खरे ठरण्याच्या क्षणाची महाराष्ट्र वाट आतुरतेने वाट पाहतो आहे.  खरंतर हे शब्द ही खरे ठरले आहेतच.. शतायुषी वर्षात काळच त्यांना आपल्यापासून दूर घेऊन गेला आहे. अशा ऋषीतुल्य माणसांचा परिसस्पर्श आपल्याला झाला यासाठी आपण भाग्यवान आहोत. 

आज आठवणीत असलेले बाबासाहेब, त्यांनी सांगितलेला राजाचा इतिहास आपल्याला पुढच्या पिढीला सांगण्याचे उत्तरदायित्व आता आपल्या शिरावर आहे. राजा शिवछत्रपतींचा इतिहास बाबासाहेबांच्या वाणीतून आपण जसा ऐकला तसा येणाऱ्या प्रत्येक पिढीत तो हस्तांतरित करणे हेच आपले आद्यकर्तव्य आहे आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल . त्यांच्या सारखी सतत कार्यमग्न आणि कार्य करण्याची प्रेरणा सदैव बाबासाहेबांच्या कार्यातून आपल्याला मिळत राहील हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. त्यांच्या आत्म्यास परमेश्वर चरणी स्थान मिळो हीच त्याच्याचरणी प्रार्थना आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..🙏🏻

✍️ सर्वेश फडणवीस

Friday, November 5, 2021

एकात्मता स्तोत्र

भारतीय स्वातंत्र्याने ने आज ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. हे अमृतमहोत्सवी वर्ष समाजातील एकता,समता,बंधुता, ही भावना जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही निरंतर वाटचाल करतो आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नित्त्य, नैमित्तिक शाखांच्या माध्यमातून राष्ट्रजागरण व जागृतीचे काम अखंड चालू ठेवले आहे, त्याचसोबत असंख्य स्वयंसेवक तन, मन, धन समर्पित करुन हे राष्ट्र परम वैभवाला नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रवास उज्वल आणि आशय प्रगल्भ आहे, चाल दमदार आणि यशाचा आलेख सतत वर्धिष्णू आहे. मागील लेखात आपण प्रार्थनेविषयी जाणून घेतले आज आपण संघाच्या प्रातः स्मरणीय एकात्मता स्तोत्राचे चिंतन करण्याचा प्रयत्न करूया.

संघाचे प्रातः स्मरणीय एकात्मता स्तोत्र हे सर्वांप्रती आत्मीयता दर्शवणारे आहे..! या स्तोत्राने कानाभोवताली गुंजारव करत कधी मनाला रुंजी घातली कळलेच नाही. स्तोत्र फलदायी व्हायला ते आधी मनात रुजायला हवे. स्तुती करायला रचलेले काव्य म्हणजे स्तोत्र. त्या इष्ट देवतेच्या परिपूर्ण गुणांचे वर्णन म्हणजे स्तोत्र. अशाच एकात्मता स्तोत्राबद्दल ऐकतांना अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली. एकात्मता म्हणजे सगळ्यांचे ध्येय एक असणे. प्रत्येक कार्याच्या आधी राष्ट्र व धर्म एकत्र येत आणि राष्ट्र उन्नती व राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना जपत हे राष्ट्र परम वैभवाप्रत नेण्यासाठी प्रत्येक  स्वयंसेवक ह्या एकात्मता स्तोत्राचे नियमित पठण करतो आहे . एकात्मता म्हणजे सगळ्यांचा आत्मा एकच आहे. खरंतर एकात्मतेची जाणीव व्हायला हवी व समान गुणांची बांधिलकी जुळत एकत्र येत या राष्ट्राचे स्मरण करावे यासाठी प्रातः स्मरणीय स्तोत्र म्हणजे एकात्मता स्तोत्र. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १९८५ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने या स्तोत्राला अनुमती दिली आहे. आज याला ३६ वर्ष म्हणजे साधारपणे ३ तप होवून सुद्धा स्वयंसेवक त्याचे नित्य पठण करतात आणि रोज प्रभात शाखेत याचे सामूहिक पठण होते.

पूजनीय डॉक्टरांचा विचार खूप दूरदृष्टीचा आणि व्यापक होता . संघांच्या कामांतील विविधता आणि त्यांची व्याप्ती हे एकंदर राष्ट्राण आहे. संघ आज वैश्विक स्तरावर नावाजला जातोय पण हा प्रवास शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. संघ स्थापनेच्या वेळी संघाचे नावही ठरलेले नव्हते. समाजात तितकीशी नावाजली नसलेली,ध्येयनिष्ठ अशी ८-१० माणसे केवळ डॉ. केशव बळीराम हेडगेवार नावाच्या एका राजकीय- सामाजिक कार्यकर्त्यावर असलेल्या प्रेमाखातर एकत्र आली आणि आज ९७ वर्षाच्या वाटचालीनंतर ' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ' या बिरुदाखाली चालणारे सामाजिक- सांस्कृतिक काम अव्याहतपणे देशभरात सुरू आहे. आपल्या कर्तव्याचे स्मरण करीत, तिच्याप्रती असलेल्या प्रेमाचा उद्घोष करीत,तिच्या उज्ज्वल भवितव्याविषयी हे स्तोत्र म्हणत असतात. जनमानसावरील भारताच्या एकात्मतेचा संस्कार दृढमूल करतील अशा प्रातिनिधिक नावांचा यात उल्लेख केला आहे.

जमीन कसदार असेल तर पीक मोत्यांचे येते. त्यातून ज्या भरतभूमीला नररत्नांची खाण म्हणून गौरवले जाते, त्या भूमीचा कस तो काय वर्णन करावा. त्या भूमीचे, तिच्यात अंगभूत असलेल्या पंचमहाभूतांचे, तिच्या पर्वतनद्यादी आभूषणांचे आणि एकूणच साऱ्या पार्श्वभूमीचे स्तवन सुरवातीच्या काही श्लोकांतून केलेले आहे.

ओम् नमः सच्चिदानंदरूपाय परमात्मने ।
ज्योतिर्मयस्वरूपाय विश्वमांगल्यमूर्तये ॥ १ ॥

विश्वमांगल्याची चिरंतन ज्योत आणि सर्व पंचमहाभूतांची अभेद्य संघटना आणि संघटन म्हणजे संघ. त्या आनंदमयी मातेस पहिले वंदन!

प्रकृतिः पंचभूतानी ग्रहलोका स्वरास्तथा ।
दिशः कालश्च सर्वेषां सदा कुर्वंतू मंगलम् ॥ २ ॥

सर्व ग्रहनक्षत्रे, ही सृष्टी, हा परिसर आकाशपाताळादी सर्व लोक व त्यांना बंधनात ठेवणाऱ्या दशदिशा आणि काळ हे आम्हा सर्वांचे नेहमी कल्याण करोत.

रत्नाकरा धौतपदां हिमालयकिरीटीनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वंदे भारतमातरम् ॥ ३ ॥

समुद्रवसना भारतमातेला देवतात्मा हिमालय मुकुटाप्रमाणे शोभून दिसतो. ऋषी, महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी आदी महापुरूषांच्या अशा या महन्मातेला आमचे प्रणाम असोत.

महेंद्रो मलय सह्यो देवतात्मा हिमालयः ।
ध्येयो रैवतको विंध्यो गिरिश्चारवलिस्तथा ॥ ४ ॥

उत्कलप्रदेशाचे भूषण असलेला आणि महर्षी परशुरामाचे कायमचे निवासस्थान असणारा महेंद्र पर्वत, दक्षिण भारताचे भूषण ठरणारा निलगिरी (मलयगिरी) पर्वत, स्वातंत्र्याची मंगल लेणी ठरलेले कोटकिल्ले अंगाखांद्यावर बाळगणारा सह्याद्री पर्वत, देवदेवतांची तीर्थक्षेत्रे असल्यामुळे गौरव पावलेला हिमालय पर्वत, वनराज सिंहांचे वसतीस्थान असणारा रैवतक (गिरनार) पर्वत, वयोवृद्ध गिरीराज विंध्याचल तथा महाराणा प्रतापांची आठवण देणारा अरवली पर्वत हे सर्व संस्मरणीय आहेत.

गंगा सरस्वती सिंधुब्रह्मपुत्रश्च गण्डकी ।
कावेरी यमुना रेवा कृष्णा गोदा महानदी ॥ ५ ॥

गंगा,सरस्वती, आर्यसंस्कृतीची आद्य सिंधू , ईशान्य भारताची रक्षिणी ब्रह्मपुत्रा, गंगेची पुष्टीवर्धिनी गण्डकी, दण्डकारण्यातील अक्षयसरिता कावेरी,कृष्णाची यमुना, स्फटिकप्रस्तरांतून झेपावणारी रेवा (नर्मदा), कृष्णप्रस्तरांत शोभून दिसणारी कृष्णा, दक्षिणगंगा गोदावरी तसेच विंध्यकुमारी महानदी ह्या नद्या आपले जीवन सरस करतात. समृद्ध करतात. म्हणूनच त्यांचेही स्मरण आपणांस प्रेरक आहे.

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका ।
वैशाली द्वारिका ध्येया पुरी तक्षशिला गया ॥ ६ ॥

रामजन्मभूमी अयोध्या, कृष्णजन्मभूमी मथुरा, पहाडी प्रदेशातून सखल प्रदेशात गंगावतरण होते ते हरिद्वार (मायापुरी), देवाधिदेव महादेवाचे निवासस्थान काशी, परंपरागत विद्यानगरी कांची, सम्राट विक्रमादित्याची राजधानी उज्जैन (अवंतिका), जगन्नाथाची रथयात्रा आजही चालवणारी जगन्नाथपुरी (नीलांचल), पाणिनी अन् कौटिल्यल्यकालीन विश्वविद्यालय तक्षशीला, तसेच भगवान बुद्धाला जिथे ज्ञानप्राप्ती झाली ती गया यांचे स्मरण आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारशाची आठवण करून देते.

प्रयागः पाटलिपुत्रं विजयानगरं महत्
इन्द्रप्रस्थं सोमनाथः तथाअमृतसरः प्रियम् || ७ ||

गंगा यमुनेच्या पवित्र संगमाचे स्थान प्रयाग, सम्राट चंद्रगुप्ताची राजधानी पाटलीपुत्र, कृष्णदेवरायाची राजधानी विजयानगर, पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ, गौरवशाली इतिहासाचे सोमनाथ आणि अमृतसरोवरवेष्ठित हरमिंदरसाहेबांचे पवित्र मंदिर असलेले अमृतसर यांचे स्मरण आपल्याला आपल्या प्रेरणांचे दर्शन घडवते.

चतुर्वेदाः पुराणानी सर्वोपनिषदस्तथा ।
रामायणं भारतंच गीता सद्दर्शनानी च ॥ ८ ॥

जैनागमास्त्रिपिटका गुरूग्रंथः सतां गिरः ।
एष ज्ञाननिधिः श्रेष्ठः श्रद्धेयो हृदी सर्वदा ॥ ९ ॥

चारही वेद, अठरा पुराणे, सर्व उपनिषदे, रामायण, महाभारत, गीता आणि सद्दर्शने; तसेच जैनागम, त्रिपिटक, गुरूग्रंथसाहेब आणि सज्जनांची वचने ही आमची श्रद्धास्थाने आहेत.


अरुंधत्यनसूया च सावित्री जानकी सती ।
द्रौपदी कण्णगी गार्गी मीरा दुर्गावतीस्तथा ॥ १० ॥
पतिव्रतांचा आदर्श ठरल्यामुळे सप्तर्षींसोबत आकाशात चमचमणारी अरुंधती, दत्तात्रेयांनी जिच्यापोटी जन्म घेतला ती महासती अनुसया, प्रत्यक्ष यमाकडूनही पतीचे प्राण परत मिळवणारी सावित्री, पत्नीत्वाचा आदर्श ठरलेली भूमीकन्या जानकी, पतीचा अनादर सहन न झाल्याने पित्याकडील यज्ञात भस्म होणे पत्करणारी दक्ष प्रजापतीची कन्या सती (पार्वती), अलौकिक पतीव्रता द्रौपदी, पतीवरील अन्याय त्याच्या मृत्यूनंतरही राजसभेत वाद करून दूर करणारी सती कण्णगी, जनकसभेत पती याज्ञवल्क्य याजसोबत शास्त्रार्थात भाग घेणारी ब्रह्मवादिनी गार्गी तसेच कृष्णभक्त संत मीराबाई या स्त्रिया आपल्या संस्कृतीतील स्त्रीत्वाच्या आदर्श आहेत.

लक्ष्मीरहल्याचन्नम्मा रुद्रमांबा सुविक्रमा ।
निवेदिता सारदा च प्रणम्या मातृदेवता ॥ ११ ॥
महाराणी लक्ष्मीबाई, प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच काकतीय सम्राज्ञी रुद्रमांबा यांच्या कथा आजही आम्हाला स्फुरण देतात. यांच्याचप्रमाणे समाजहितैषी भगिनी निवेदिता व रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी शारदादेवी याही आम्हाला पूजनीय आहेत.

श्रीरामो भरतः कृष्णो भीष्मो धर्मस्तथार्जुनः ।
मार्कंडेयो हरिश्चंद्रः प्रल्हादो नारदो ध्रुवः ॥ १२ ॥

मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्री राम, ज्याच्या नावाने आपला देश "भारत" म्हणून ओळखला जातो तो भरत, योगेश्वर कृष्ण, प्रतिज्ञेचा गौरव  ज्यांनी आपल्या आचरणाने वाढवला ते पितामह भीष्म, सर्वश्रेष्ठ धर्मपरायण युधिष्ठिर, महान धनुर्धर अर्जुन, बालपणातच अपमृत्यूशी यशस्वी झुंज देणारे महर्षी मार्कंडेय, सत्यवचनी राजा हरिश्चंद्र, परमभक्त प्रल्हाद, धर्मोल्लंघनावर मनोवैज्ञानिक उपचार करणारे महर्षी नारद तसेच घोर तपश्चर्या करून अढळपद प्राप्त करून घेणारा बाल ध्रुव हे आमचे वर्तणुकीचे आदर्श आहेत.

हनुमांजनको व्यासो वसिष्ठश्च शुको बलिः ।

दधीचिर्विश्वकर्माणौ पृथुर्वाल्मीकिभार्गवाः ॥ १३ ॥

स्वामीनिष्ठेचे चिरंतन प्रतीक रामभक्त हनुमान, आत्मज्ञानी मिथिलानरेश जनक महाराज, "व्यासोच्छिष्ठं जगत् सर्वं" असे ज्यांच्याबाबत म्हटले जाते ते महर्षी व्यास, प्रत्यक्ष श्रीरामाला "योगवासिष्ठ्या"चा उपदेश करणारे गुरूवर्य वसिष्ठ, राजा परीक्षिताला मृत्यूपूर्व सात दिवसांत भागवत कथा कथन करणारे व्यासांचे पुत्र दैत्यगुरू शुक्राचार्य, बळाच्या जोरावर देवलोकावर अधिराज्य करणारा प्रल्हादाचा नातू बळीराजा, उन्मत्त वृत्रासुराच्या निर्दालनासाठी वज्र तयार करण्याकरता ज्यांनी स्वतःच्या अस्थी दिल्या ते दधीची ऋषी, "सुदर्शन चक्र, त्रिशूळ व वज्र" इत्यादी अमोघ शस्त्रांचा निर्माता आद्य स्थपती विश्वकर्मा. ज्याच्या कृषीविकासाच्या धोरणांमुळे ही धरणी एवढी संपन्न झाली की तिला पृथ्वी हे नाव प्राप्त झाले तो पृथू राजा, रामायणकार महर्षी वाल्मिकी तसेच चिरंजीव धनुर्धर परशुराम अशा अनेकानेक महापुरूषांच्या चरीत्रांचा समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे.

भगीरथश्चैकलव्यो मनुर्धन्वन्तरिस्तथा
शिबिश्च रन्तिदेवश्च पुराणोद् गीतकीर्तय ॥१४॥

आपल्या अविरत प्रयत्नांनी ज्याने पृथ्वीतलावर गंगावतरण केले व "प्रयत्नांना" भगीरथ हे विशेषण प्राप्त करून दिले तो राजा भगीरथ, गुरूदक्षिणेच्या स्वरूपात ज्याने आपल्या उजव्या हाताचा अंगठाही सहज कापून दिला तो परमशिष्य एकलव्य, आदीपुरूष मनू, चौदा रत्नांतील एक रत्न आणि आयुर्वेदाचे जनक आचार्य धन्वंतरी, शरणागत कबुतरास जीवन देण्यासाठी ससाण्यास स्वतःचे शरीर अर्पण करणारा शिबीराजा तसेच दुष्काळात जनतेला सर्वस्व वाटून टाकणारा राजा रंतिदेव यांची कीर्ती पुराणांमध्ये सांगितलेली आहे. हे सर्व आमचे स्फुर्तीस्त्रोत आहेत.

बुद्धा जिनेन्द्रा गोरक्षः पाणिनिश्च पतंजलिः
शंकरो मध्व निंबार्कौ श्री रामानुजवल्लभौ ॥१५॥

अज्ञानामुळे भासमान असणाऱ्या जरामरणादी दुःखांवर विचारपूर्वक विजय मिळवण्याची व अहिंसामर्गाने संयमित जगण्याची बुद्धी ज्याराजपुत्र सिद्धार्थाने तपचरणाने मिळवली तो भगवान बुद्ध, जैन विचारधारेचा जनक महावीर, महान् हठयोगी गोरक्षनाथ, "अष्टाध्यायी"सारख्या व्याकरणशास्त्राचा रचयिता पाणिनी, प्रसिद्ध योगसूत्रकार पतंजली, अद्वैतमताचे आद्य पुरस्कर्ते शंकराचार्य, द्वैतवादाचे प्रवक्ते वैष्णव मध्वाचार्य, द्वैत व अद्वैत वादांची सांगड घालणारे निंबार्काचार्य, विशिष्ताद्वैतमताचे प्रतिपादक रामानुजाचार्य तसेच शुद्धाद्वैतमताचे जनक वल्लभचार्य या साऱ्यांनी आम्हाला सद्धर्माची शिकवण दिली.

झूलेलालोथ चैतन्यः तिरुवल्लुवरस्तथा
नायन्मारालवाराश्च कंबश्च बसवेश्वरः ॥१६॥

इसवी सनाच्या १० व्या शतकात जबरीच्या सार्वत्रिक धर्मांतराचे प्रयत्न विफल करणारे झुलेलाल, महान कृष्णभक्त चैतन्य महाप्रभू, तिरुक्कुरलाचे रचयिता तिरुवल्लुवर, शैव आणि वैष्णव संत, कंबरामायणकार रामभक्त कंब तसेच वीरशैव संप्रदायाचे संस्थापक बसवेश्वर यांनी आमच्या धर्मभावना सन्मार्गी लावल्या.

देवलो रविदासश्च कबीरो गुरुनानकः
नरसिस्तुलसीदासो दशमेषो दृढव्रतः ॥१७॥

धर्मांतरितांना पुन्हा स्वधर्मात प्रवेशाचा मार्ग सुकर करणारे देवलस्मृतीचे रचनाकार देवल, थोर संत रोहिदास, महान् स्पष्टवक्ता संत कबीर, शिख पंथाचे संस्थापक गुरू नानक, "वैष्णव जन तो तेणे कहिये" या सुप्रसिद्ध भजनाचे रचयिता नरसी मेहता, "रामचरितमानसकार" संत तुलसीदास तसेच शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंह यांनी आमची सद् अभिरुची तेवत ठेवली.

श्रीमत् शंकरदेवश्च बंधू सायण माधवौ
ज्ञानेश्वरस्तुकारामो रामदासः पुरन्दरः ॥१८॥
आसामात भागवत धर्माचा प्रसार करणारे शंकरदेव यांनी भागवत धर्माचे सार सांगणारा "गुणमाला" ग्रंथ लिहीला. मध्वाचार्य तथा सायणाचार्य यांनी विजयानगरचे साम्राज्य वैभवास नेले. भागवत धर्म महाराष्ट्रात वाढला याचे श्रेय ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांचे आहे. त्याबाबत असे म्हणतात की "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस". शिखांचे चौथे गुरू रामदास तर सर्वश्रुतच आहेत. मात्र "तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई" हा आगळा संदेश आपल्या रामदासस्वामींनी दिलेला आहे. पुरंदरदासांचे वर्णन तर "कर्नाटकाचे तुकाराम" असेच करतात. या सर्वांची शिकवण आम्हाला संयमित सहजीवनाला सामर्थ्याची जोड देण्यास सांगते.

बिरसा सहजानन्दो रामानन्दस्तथा महान्‌

वितरन्तु सदैवैते दैवीं सद्ड्गुणसंपदम्‌ ॥१९॥

बिरसा मुंडा यांनी दक्षिण बिहार, ओरिसा तसेच मध्यप्रदेशातील विजनवासी जनतेला संघटित करून इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. स्वामी सहजानंदांनी उद्धव संप्रदायाची स्थापना केली. रामानंदांनी लोकाभिमुख धर्माचा प्रचार केला. कबीर, रोहीदास, सेना न्हावी, पद्मावती आदी त्यांचेच शिष्य होत. या सर्व महात्म्यांनी त्यांच्या दैवी गुणसंपदेचा वारसा आम्हाला दिलेला आहे.

भरतर्षिः कालिदासः श्रीभोजो जकणस्तथा
सूरदासस्त्यागराजो रसखानश्च सत्कविः ॥२०॥
नाट्यशास्त्राचे आद्याचार्य भरतमुनी, "अभिज्ञान शाकुंतलम्, मेघदूत, रघुवंश" इत्यादी महाकाव्यांचा रचयिता महाकवी कालीदास, बहुविद्याविशारद राजा भोज, होयसाळ शैलीचा प्रख्यात शिल्पशास्त्री जकणाचार्य ज्याने "हळेबिडू, बेलूर, सोमनाथ" इत्यादी मंदिरांचे शिल्प घडवले, "सूरसागर" रचयिता सूरदास, "धनराज पंचरत्न" कर्ता त्यागराज तसेच "सवैय्यां"चा कर्ता रसखान यांनी आमचा इतिहास कलासमृद्ध केलेला आहे.

रविवर्मा भातखंडे भाग्यचन्द्रः स भूपतिः
कलावंतश्च विख्याताः स्मरणीया निरंतरम्‌॥२१॥
महान चित्रकार राजा रविवर्मा, आधुनिक संगीतशास्त्राचे प्रवर्तक भातखण्डे गुरूजी तसेच ललितकलेचा आश्रयदाता मणिपूरचा राजा भाग्यचंद्र आदी विख्यात कलावंत सदैव स्मरणीय आहेत.

अगस्त्यः कंबु कौन्डिण्यौ राजेन्द्रश्चोल वंशजः
अशोकः पुश्य मित्रश्च खारवेलः सुनीतिमान्‌ ॥२२॥

दण्डकारण्यात वैदिक संस्कृतीची ध्वजा फडकवल्यावर सप्तसिंधूंपलीकडे जावा,सुमात्रा  द्विपांवर सम्यक संचार करणारे महर्षी अगस्ती, प्रागैतिहासिक काळात कंबोडिया सारख्या प्रदेशावर अधिकार करून तेथील सर्वतोमुखी विकास केल्यामुळे त्या देशास स्वतःचे नाव देणारा राजा कंबू, आग्नेय आशियात फुनान साम्राज्य स्थापणारा भारतीय कौण्डिण्य, मलाया द्विपापर्यंत साम्राज्यविस्तार करणारा चौल राजेंद्र, पराक्रमाने कलिंगविजय मिळवणारा अन् त्यातील नरसंहाराने व्यथित होऊन बौद्ध धर्म स्वीकारणारा सम्राट चण्डाशोक, अधोगतीस पोहोचलेल्या अखेरच्या मौर्य नृपतीस बाजूस सारून यवनांना पळवणारा सेनापती पुष्यमित्र शुंग व यवनराज दिमित्राचे आक्रमण परतवण्याकरता मगधराजाशी शत्रुता विसरून संधी करणारा चेदिराज खारवेल यांच्या स्मरणाने आमची संघशक्ती जागृत होते.

चाणक्य चन्द्रगुप्तौ च विक्रमः शालिवाहनः
समुद्रगुप्तः श्रीहर्षः शैलेंद्रो बप्परावलः ॥२३॥
कौटिलीय अर्थशास्त्राचा रचयिता आर्य चाणक्य, हिंदुकुशपर्वतापर्यंत प्रशासन करणारा सम्राट चंद्रगुप्त, अवंतीच्या स्वतंत्रतेसाठी शकांचा पराभव करणारा शककर्ता सम्राट विक्रमादित्य, पैठणला नवी राजधानी वसवणारा शककर्ता शातवाहन राजा शालिवाहन, आर्यावर्तात सुवर्णयुग आणणारा दिग्विजयी सम्राट समुद्रगुप्त, हूणांच्या वर्चस्वापासून मुक्त असे एकछत्री साम्राज्य स्थापून कन्नौजला त्याची राजधानी करणारा राजा हर्षवर्धन, ब्रह्मदेशावर सत्ता गाजवणारा कलिंगराज शैलेंद्र तसेच अरबस्थानापर्यंत पाठलाग करून अरबांना परास्त करणारा चितौडाधिपती बाप्पा रावळ यांचे स्मरण आम्हाला "परं वैभवं नेतुं एतद् स्वराष्ट्रम्" ह्या आमच्या निर्धाराची आठवण करून देते.

लाचिद्भास्कर वर्मा च यशोधर्मा च हूणजित्‌
श्रीकृष्णदेवरायश्च ललितादित्य उद्बलः ॥२४॥
मामापेक्षा देश मोठा म्हणून मुगल सेनेला फितुर झालेल्या मामाचा शिरच्छेद करणारा वीर अहोम सेनापती लाचित बडफुकन, कुशल प्रशासक राजा भास्करवर्मा, महाक्रुर हूण राजा मिहिरकुल याचा पराभव करणारा मंदसौरनरेश यशोधर्मा, विजयनगरचा प्रसिद्ध शास्ता कृष्णदेवराय व आक्रमण हाच संरक्षणाचा राजमार्ग मानून "तुर्क, मुस्लिमादी" आक्रमकांचा त्यांचे घरापर्यंत जाऊन पाठलाग करून त्यांना परास्त करणारा ललितादित्य मुक्तापीड आम्हाला स्वसंरक्षणाचे धडे देतात.

मुसुनूरिनायकौ तौ प्रतापः शिवभूपतिः
रणजितसिंह इत्येते वीरा विख्यातविक्रमाः ॥२५॥
महान संघटक मुसुनुरी नायक (प्रोलय व कप्पय), मेवाड नरेश महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज तसेच काशी विश्वनाथ व हरमिंदर मंदिरावर सुवर्णकलश चढवणारा महाराजा रणजीतसिंह यांचे विक्रम विश्वविख्यात आहेत. त्यांचे स्मरण आमच्या विजिगिषू वृत्तीत भर घालते.

वैज्ञानिकाश्च कपिलः कणादः सुश्रुतस्तथा
चरको भास्कराचार्यो वराहमिहिरः सुधीः ॥२६॥
सांख्यसूत्रांचे रचयिता कपिल मुनी, वैशेषिक सूत्र प्रणेता महर्षी कणाद, प्रख्यात शल्यविशारद सुश्रुत, कायाचिकित्सेवर "चरकसंहिता" लिहीणारे चरकऋषी, गुरूत्वाकर्षणाचा शोध लावणारे भास्कराचार्य तसेच बृहत्संहितेचे रचयिता वराहमिहिर आमच्यातील वैज्ञानिक प्रेरणांना दृढमूल करतात.


नागार्जुनो भरद्वाजः आर्यभट्टो वसुर्बुधः
ध्येयो वेंकटरामश्च विज्ञा रामानुजादयः ॥२७॥
रसायनशास्त्राच्या व आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी भावास राज्य सोपवणारा नागार्जुन, प्राचीन विमानविद्येचे प्रणेते भरद्वाज ऋषी, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा सिद्धांत मांडणारे प्रख्यात गणितज्ञ आर्यभट्ट, वनस्पतींना जीव असतो असा शोध लावणारे जगदीशचंद्र बोस, प्रकाशावरील "रामनप्रभाव" शोधून काढणारे चंद्रशेखर वेंकटरमण व श्रेष्ठ गणितज्ञ रामानुजम् आमच्या संपन्न वैज्ञानिक परंपरेची आम्हाला आठवण देतात.

रामकृष्णो दयानंदो रवींद्रो राममोहनः
रामतीर्थोऽरविंदश्च विवेकानंद उद्यशाः ॥२८॥
स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस, आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद, गीतांजलीकार रविंद्रनाथ ठाकूर, ब्राह्मोसमाजसंस्थापक राजा राममोहन राय, स्वामी रामतीर्थ, योगी अरविंद तसेच स्वामी विवेकानंद यांचा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभलेला आहे.

दादाभाई गोपबंधुः टिलको गांधीरादृताः
रमणो मालवीयश्च श्री सुब्रमण्यभारती ॥२९॥
थोर समाजसुधारक दादाभाई नौरोजी, दीनदुःखितांचे कैवारी गोपबंधू दास, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" असा उद्घोष करणारे लोकमान्य टिळक, अहिंसेचे पूजक महात्मा गांधी, रमण महर्षी, पंडित मदन मोहन मालवीय तसेच सुब्रह्मण्यम् भारती अशा थोर पुरूषांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे.

सुभाषः प्रणवानंदः क्रांतिवीरो विनायकः
ठक्करो भीमरावश्च फुले नारायणो गुरुः ॥३०॥

सुभाषचंद्र बोस, भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक प्रणवानंद, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, भिल्ल सेवा मंडळाचे संस्थापक ठक्कर बाप्पा, घटनाकार आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे प्रखर पुरस्कर्ते महात्मा फुले तसेच हिंदू संघटक नारायण गुरू अशांचे स्मरण आम्हाला प्रेरणा देते.

संघशक्तिप्रणेतारौ केशवो माधवस्तथा
स्मरणीयाः सदैवैते नवचैतन्यदायकाः ॥३१॥
संघनिर्माता डॉ. हेडगेवार व संघविस्तारक गोळवलकर गुरूजी यांचे स्मरण सदैव चैतन्यदायी भासते.

अनुक्ता ये भक्ताः प्रभुचरण संसक्तहृदयाः
अनिर्दिष्टाः वीराः अधिसमरमुद्ध्वस्तरिपवः
समाजोद्धर्तारः सुहितकर विज्ञान निपुणाः
नमस्तेभ्यो भूयात् सकलसुजनेभ्यः प्रतिदिनम्‌ ॥ ३२॥
या भारतवर्षात असे अनेक ईश्वरी आविष्कारास जवळ असणारे महापुरुष होऊन गेले ज्यांची नावे वर उल्लेखित नाहीत. असेही अनेक अज्ञात वीर होऊन गेले ज्यांनी रणांगणावर शत्रूचा विध्वंस केला. त्याचप्रमाणे अनेक समाजोद्धारक व उपयुक्त विज्ञानाविष्कारात निष्णात असे दिग्गज होऊन गेलेत. पण त्याची नावे ज्ञात नाहीत. अशा सर्व महात्म्यांना आमचे वंदन आहे.एकात्मतास्तोत्राची अखेर त्यांच्या स्मरणाशिवाय होऊच शकणार नाही.

इदमेकात्मतास्तोत्रं श्रद्धया यः सदा पठेत्‌
स राष्ट्रधर्मनिष्ठावान् अखंडं भारतं स्मरेत्‌ ॥३३॥

हे एकात्मतास्तोत्र जो श्रद्धेने म्हणेल तो राष्ट्रभक्त अखंड भारताचेच स्मरण करेल. यात संशय नाही.

॥ भारत माता की जय ॥

चांगल्याचे अनुकरण करण्याची ओढ मनुष्याला जीवनहेतूच्या जवळ घेऊन जात असते. मग निर्माण होते कुतुहल. की खरंच,जीवनाचा हेतू काय असावा ? अनादी कालापासून मनुष्याला हे कोडे कुतुहलाचे ठरलेले आहे.आणि यातूनच मनुष्य जीवनाची वाटचाल करत असतो.

मानवी मन मुळातच संवेदनशील असते.ज्या सृष्टीतील चराचरांनी त्यांना घडवले त्यांचे स्मरण आपल्यालाही प्रेरक ठरू शकेलं या विश्वासातूनच प्रातःस्मरणीय एकात्मता स्तोत्र अर्थात भारतभक्तीस्तोत्राची रचना झाली असावी. मनुष्यस्वभाव समाजशील असल्यामुळे,विचार हे त्याच्या अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असल्यामुळे आणि हे स्तोत्र तर जीवनहेतूच्या एवढे जवळ नेणारे आहे की आपले आयुष्य जर उन्नत करायचे असेल तर आपण हे स्तोत्र मुखोद्गत केलेच पाहीजे. एवढेच नव्हे तर समजून उमजून त्याचे मननही केले पाहीजे.

सर्वेश फडणवीस


Thursday, November 4, 2021

अष्टलक्ष्मी स्तोत्रम्


आज लक्ष्मीपूजन .. लक्ष्मी भारताच्या सर्वदूर भागात विविध रुपात पूजली जाते. तिचा उत्साहाने केलेला उत्सव संपूर्ण जगाला कौतुकाने बघण्यास भाग पाडते. अशाच लक्ष्मीच्या अष्टलक्ष्मी स्तोत्रम् याविषयी आज काही चिंतन ..

स्तुती करायला रचलेले काव्य म्हणजे स्तोत्र. त्या इष्ट देवतेच्या परिपूर्ण गुणांचे वर्णन म्हणजे स्तोत्र. अशाच अष्टलक्ष्मी स्तोत्राबद्दल ऐकतांना अर्थ जाणून घेण्याची इच्छा झाली आणि त्यातून एका एका श्लोकाचे चिंतन सुरू झाले आणि या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. अष्टलक्ष्मी अर्थात आदि लक्ष्मी,धन लक्ष्मी,विद्या लक्ष्मी,धान्य लक्ष्मी,धैर्य लक्ष्मी,संतान लक्ष्मी,विजय लक्ष्मी,राज लक्ष्मी या आहेत. या सर्व प्रसन्न व्हाव्या यासाठी या स्तोत्राचे पठण अधिक लाभदायक आहे. 

आदिलक्ष्मी 

सुमनसवन्दित सुन्दरी माधवी चन्द्र सहोदरी हेममये ।

मुनिगणमण्डित मोक्षप्रदायिनी मन्जुळभाषिणी वेदनुते ।

पञ्कजवासिनी देवपूजित सद्गुणवर्षिणी शान्तियुते ।

जयजय हे मदुसूदन कामिनी आदिलक्ष्मी सदा पालय ते ॥ १ ॥

आपल्या मूळ स्त्रोताचे ज्ञान होणे, हीच ‘आदि लक्ष्मी’ होय. मग नारायण आपल्या नजीक असतात. ज्याला आपल्या स्त्रोताचे ज्ञान होते तो सर्व भयापासून,भीतीपासून मुक्त होतो आणि संतोष,आनंद प्राप्त करतो. हीच आदि लक्ष्मी होय. आदि लक्ष्मी निव्वळ ज्ञानी व्यक्तींजवळ असते आणि ज्याच्याजवळ आदि लक्ष्मी असते समजा कि त्याला ज्ञान प्राप्त झालेय.

धान्यलक्ष्मी

अयि कलिकल्मषनाशिनी कामिनी वैदिकरुपिणी वेदमये ।

क्षीरसमुद्भव मंगलरुपिणी मन्त्रनिवासिनी मन्त्रनुते ।

मन्गलदायिनी अम्बुजवासिनी देवगणाश्रित पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मी सदा पालय ते ॥ २ ॥

धन लक्ष्मी जवळ असली तरी धान्य लक्ष्मी ‘आहे’ असे म्हणू शकत नाही. धन आहे परंतु काही खाऊ शकत नाही. भाकरी, भात, साखर, मीठ खाऊ शकत नाही. याचाच अर्थ धन लक्ष्मी आहे पण धान्य लक्ष्मीचा अभाव आहे. ग्रामीण भागात मुबलक धान्य असते. तेथील लोक दोन चार दिवस कोणालाही खायला-प्यायला घालायला हयगय करत नाहीत.कारण धन नसले तरी धान्य आहे. तेथील लोक छानपैकी खातात. शहरी लोकांच्या तुलनेत तेथील लोकांच्या आहाराची गुणवत्ता आणि प्रमाण देखील जास्त असते. त्यांची पचन क्षमता देखील चांगली असते. धान्याचा वापर आणि सन्मान करणे म्हणजेच धान्य लक्ष्मी. जगात सर्वांना भोजन गरजेचे आहे. अन्न खराब करू नका, वाया घालवू नका. बहुतेकवेळा जेवढे अन्न बनते तेवढेच वाया जात असते, फेकून दिले जाते. इतरांना देत पण नाहीत. असे कदापि करू नका. अन्नाचा सन्मान करणे हीच धान्य लक्ष्मी होय.

धैर्यलक्ष्मी

जयवरवर्णिनी वैष्णवी भार्गवी मन्त्रस्वरुपिणि मन्त्रमये ।

सुरगणपूजित शीघ्रफलप्रद ज्ञानविकासिनी शास्त्रनुते ।

भवभयहारिणि पापविमोचनी साधुजनाश्रित पादयुते ।

जयजय हे मदुसूदन कामिनी धैर्यलक्ष्मी सदा पालय ते ॥ ३ ॥ 

घरी सर्व काही आहे-धन आहे, धान्य आहे, सारी संपन्नता आहे पण आपण भित्रे आहोत. श्रीमंत कुटुंबातील मुले बहुतेकवेळा भित्री असतात. हिम्मत म्हणजे धैर्य एक संपत्ती आहे. नोकरीतील लोक नेहमी आपल्या वरिष्ठांना घाबरून असतात. व्यापारी निरीक्षकांना घाबरून असतात. आम्ही नेहमी अधिकाऱ्यांना विचारतो कि तुम्हाला कसा सहाय्यक आवडेल – तुमच्या समोर नेहमी घाबरलेला कि धैर्याने जो तुमच्याशी संपर्क करेल? जो सतत तुमच्या समोर घाबरलेला असेल तो नेहमी खोटे बोलत राहील, खोट्या गोष्टी, सांगत राहील. अशा व्यक्तीसोबत तुम्ही काम करू शकणार नाही. तुम्ही असा सहाय्यक पसंत कराल जो धैर्याने काम करेल आणि इमानदारीने तुमच्याशी बोलेल. हे आपल्या आंतमध्ये अशी शक्ती आहे, दिव्य शक्ती आहे जी सतत आपल्या सोबत असते. हि धैर्य लक्ष्मी होय. धैर्य लक्ष्मी असली तरच जीवनात प्रगती होते. ज्या प्रमाणात धैर्य लक्ष्मी असेल त्या प्रमाणातच प्रगती होईल. व्यापार असो किंवा नोकरी, धैर्य लक्ष्मीची आवश्यकता असतेच.

गजलक्ष्मी

जयजय दुर्गतिनाशिनी कामिनी सर्वफलप्रदा शास्त्रमये ।

रथगज तुरगपदादि समावृत परिजनमण्डित लोकनुते ।

हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित तापनिवारिणी पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी सदा पालय ते ॥ ४ ॥

राज लक्ष्मी म्हणा किंवा भाग्य लक्ष्मी म्हणा दोन्ही एकच आहेत – सत्ता. एखादी व्यक्ती मंत्रिपद प्राप्त करून काहीही सांगायला, बोलायला लागला तरी त्याचे कोणीही ऐकत नाही. त्याची सत्ता कोणीही मान्य करत नाही. बऱ्याच कार्यालयात देखील असे दिसते. मालकाचे कोणीही ऐकत नाही पण क्लार्कचे ऐकतात. त्याचा हुकुम चालतो. एका ट्रेड युनियनच्या प्रमुखाजवळ जितकी राज अर्थात गजांत लक्ष्मी असते तेवढी शहरातील मिल मालकाकडे नसेल. शासन करण्याची क्षमता म्हणजे राज लक्ष्मी अर्थात गजांत लक्ष्मी आहे.

सन्तानलक्ष्मी

अयि खगवाहिनी मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमये ।

गुणगणवारिधी लोकहितैषिणी स्वरसप्त भूषित गाननुते ।

सकल सुरासुर देवमुनीश्र्वर मानववन्दित पादयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी सन्तानलक्ष्मी सदा पालय ते ॥ ५ ॥

अशी मुले जे प्रेम देणारे असतील, प्रेमाचे नाते  टिकवणारी असतील तर ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे ताण तणाव येत नाही किंवा ताण कमी होतो ती संतान लक्ष्मी होय. ज्या मुलांमुळे सुख, समृद्धी, शांती मिळेल ती संतान लक्ष्मी होय. आणि ज्या मुलांमुळे भांडण, तणाव, त्रास, दुःख, पिडा होईल ती संतान लक्ष्मी नव्हे.

विजयलक्ष्मी 

जय कमलासनी सद्गतिदायिनी ज्ञानविकासिनी गानमये ।

अनुदिनमर्चित कुंकुमधूसर भूषित वासित वाद्यनुते ।

कनकधरास्तुति वैभव वन्दित शन्कर देशिक मान्य पदे ।

जयजय हे मधुसूदन कामिनी विजयलक्ष्मी सदा पालय ते ॥ ६ ॥

काही व्यक्तींच्या कडे सर्व साधन सुविधा असतात तरीदेखील ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळत नाही. जे काम हातात घेतील ते काम बिघडले म्हणून समजा, काम होणारच नाही. म्हणजे विजय लक्ष्मीची कमी आहे. बाजारातून काहीतरी आणायला गेले तर ते मिळणार नाही, रिक्षात बसतील तर रिक्षा बिघडेल, टॅक्सीने बाजारात पोहोचले तर दुकाने बंद झाली असतील. तुम्हाला असे वाटेल कि मी स्वतः जाऊन काम केले असते तर बरे झाले असते. अगदी छोटे काम देखील करू शकणार नाहीत. येथे विजय लक्ष्मी कमी असते. परिस्थिती तरी विपरीत असेल किंवा काही कारणे तरी सांगतील. कोणत्याही कामात सफलता न मिळणे म्हणजे विजय लक्ष्मीची कमतरता असं म्हणता येईल.

विद्यालक्ष्मी

प्रणत सुरेश्र्वरी भारती भार्गवी शोकविनाशिनी रत्नमये ।

मणिमयभूषित कर्णविभूषण शान्तिसमावृत हास्यमुखे ।

नवनिधिदायिनी कलिमलहारिणी कामित फलप्रद हस्तयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय ते ॥ ७ ॥

देवी लक्ष्मी आणि सरस्वतीचे चित्र पाहिले कि लक्षात येईल कि लक्ष्मी पाण्याच्या वर कमळामध्ये स्थित असते. पाणी अस्थिर असते म्हणून लक्ष्मी देखील पाण्याप्रमाणे चंचल आहे. मात्र विद्या लक्ष्मी सरस्वती पाषाणावर स्थिर आहे. विद्या, ज्ञान येते तेंव्हा जीवनात स्थिरता येते. आपल्या हातून विद्येचा देखील दुरुपयोग होऊ शकतो. शिकणे हा एकमेव उद्देश्य असेल तर ती विद्या लक्ष्मी होऊ शकत नाही. शिकणे आणि शिकल्यावर त्या शिक्षणाचा वापर कराल तेंव्हा ती विद्या लक्ष्मी होईल.

धनलक्ष्मी

धिमिधिमि धिन्धिमि धिन्धिमि धिन्धिमि दुन्दुभि नाद सुपूर्णमये ।

घुमघुम घुंघुम घुंघुम घुंघुम शन्खनिनाद सुवाद्यनुते ।

वेदपुराणेतिहास सुपूजित वैदिककमार्ग प्रदर्शयुते ।

जयजय हे मधुसूदन कामिनी धनलक्ष्मी सदा पालय ते ॥ ८ ॥

धन लक्ष्मी सर्वाना माहिती आहेच, धनाच्या इच्छेपोटी आणि अभावामुळे माणूस अधर्म करतो. हिंसा, चोरी, फसवणूक यासारखी चुकीची कामे करतो. परंतु डोळे उघडून पहात नाहीत कि आपल्याजवळ काय आहे. जोर जबरदस्तीने धन लक्ष्मी येत नाही, आली तरी सुख, आनंद देत नाही तर निव्वळ दुःखच देते. काही व्यक्ती धन म्हणजेच लक्ष्मी मानतात आणि तिला प्राप्त करणे हेच लक्ष्य बनवतात. मरेपर्यंत पैसे गोळा करतात, बँकेत ठेवतात आणि मरून जातात. ज्यांनी धन हेच लक्ष्य बनवले आहे ते दुःखीच होतात. काही व्यक्ती धनाला दोष देतात. पैसे नाहीत तेच ठीक आहे, पैसा चांगला नाही, पैशामुळे हे घडते-ते घडते, हा सर्व गैरसमज आहे. धनाचा सन्मान करा, सदुपयोग करा, मग धनलक्ष्मी स्थिर होईल. लक्ष्मीची पूजा करा. लक्ष्मी चंचल असते, म्हणजे ती सतत चालत राहते. चालत राहिली तरच तिचे मुल्य आहे नां. बंद राहिली तर तिचे काहीही मुल्य नाही. म्हणून धनाचा सन्मान आणि सदुपयोग करा.

खरंतर हे आठ प्रकारची लक्ष्मी एक दुसऱ्याशी संलग्नित आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे हे आठही धन कमी अधिक प्रमाणात असतात. आपण त्यांचा किती सन्मान करतो,वापर करतो ते आपल्यावर अवलंबून आहे. या आठ लक्ष्मींचे नसणे याला अष्ट दारिद्र्य म्हणतात. लक्ष्मी असो किंवा नसो - नारायण नक्की प्राप्त होतील. कारण नारायण दोन्हीत आहेत. लक्ष्मी नारायण आणि दरिद्री नारायण. दरिद्री नारायणाला भोजन दिले जाते तर लक्ष्मी नारायणाची पूजा केली जाते. साऱ्या जीवनाचा प्रवाह हा दरिद्र नारायणाकडून लक्ष्मी नारायणाकडे, दुःखाकडून समृद्धीकडे आणि जीवनातील रुक्षपणाकडून अमृताकडे जात असतो आणि त्यामुळेच या अष्टलक्ष्मीची नियमित उपासना करणे इष्ट ठरेल असे वाटते. येणारी दिवाळी सुख,शांती,समृद्धी आणि भरभराटीची जावो हीच अष्टलक्ष्मीचरणी प्रार्थना आहे. 


Tuesday, November 2, 2021

गजांतलक्ष्मी !! ✨ 🐘


धनत्रयोदशी मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा सर्वश्रुत आहे. सोनं म्हणजे संपत्ती. या मुहूर्तावर सोनं खरेदी केल्याने संपत्तीमध्ये वाढ होत जाते असा विश्वास आहे. आपल्या घरात संपत्ती स्थिर राहून त्यात उत्तरोत्तर वाढ होत राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. लक्ष्मी आपल्या वास्तूत स्थिर राहावी म्हणून ‘गजांतलक्ष्मी’चा उपयोग केला जातो. या गजांतलक्ष्मी बद्दल कायमच मनात वेगळी भावना आहे. 
 
ज्याच्या दारी हत्ती झुलतात तिथे सर्व प्रकारचं सुख नांदतं, अशी आपल्याकडे धारणा आहे. आजही केरळमध्ये यश, कीर्ती आणि वैभवाच्या वृद्धीसाठी हत्तीची जोडी पाळण्याची परंपरा आहे. तसंच घरातही गजांतलक्ष्मीची मूर्ती ठेवण्याची परंपरा आहे. गजांतलक्ष्मी बद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते. 

दुर्योधनाने जेव्हा पांडवांचं राज्य हडप करून त्यांना वनवासाला पाठवलं तेव्हा हे राज्य परत कसं मिळवायचं, याबद्दल भीमाने कृष्णाला विचारलं. तेव्हा कृष्ण म्हणाला, ‘जी व्यक्ती आपल्या घरात गजांतलक्ष्मीची स्थापना करेल त्याच्या घरी संपत्ती कायम टिकून राहील. तेव्हा तू गजांतलक्ष्मीला तुझ्या घरी स्थापन कर. गेलेलं राज्य तुला परत मिळेल आणि ते टिकून ही राहिल.’

भीमाने कृष्णाला गजांतलक्ष्मी कुठे मिळेल, असा प्रश्न केला. त्यावर कृष्ण म्हणाला, ‘इंद्राचा हत्ती ऐरावत हाच मुळात गजांतलक्ष्मी आहे. त्याला तू तुझ्या दारात आण म्हणजे तुला तुझं राज्य परत मिळेल आणि ते टिकून ही राहिल.’ भीमाने इंद्राकडे जाऊन ऐरावताची मागणी केली. इंद्राने भीमाला सांगितलं की ‘तू या ऐरावातला उचलू शकलास तर तू त्याला घेऊन जाऊ शकतोस.’ ,हे ऐकून भीमाने आपली संपूर्ण शक्ती लावून ऐरावताला उचललं आणि आपल्या दारात आणलं. नंतर काही दिवसांतच पांडवांना त्यांचं राज्य परत मिळालं आणि टिकूनही राहिलं.

गजांतलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती. ही मूर्ती सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असावी. तिचा पुढे असणारा उजवा पाय म्हणजे प्रगतीचं लक्षण, आत वळलेली सोंड म्हणजे संपत्ती राखणारी. या मूर्तीवर सोन्याचा वर्ख असावा. गंडस्थळावर गोमुखअसावं. तसंच कमलपुष्प,गणेश, हरिण आणि मोराच्या प्रतिमा या लक्ष्मीवर कोरलेल्या असाव्यात. अशा सर्व शुभचिन्हांनी परिपूर्ण असलेल्या गजांतलक्ष्मीच्या मूर्तीचं मुख उत्तरदिशेकडे असावं. या गजांतलक्ष्मी बद्दल कायमच अप्रूप वाटतं. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी याच मुहूर्तावर आज संध्याकाळी झालेले गजांतलक्ष्मी चे पूजन. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

सर्वेश फडणवीस

Saturday, October 30, 2021

करुणालये मोक्षदानी,भवानी महालक्ष्मी माये ..

करवीर अर्थात कोल्हापूर. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्रीमहालक्ष्मी मंदिर म्हणजे करवीर नगरीचा मानबिंदू अशी ओळखच झाली आहे. कोल्हापूर हे देवीक्षेत्र आहे, महालक्ष्मी क्षेत्र आहे. ते करवीर पीठ आहे. या पिठात दत्तात्रेयांना महालक्ष्मी असलेली रेणुका जगदंबा भिक्षा देते आहे.

दिवाळीची चाहूल लागलेली आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. दिवाळीत अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. आई महालक्ष्मी अर्थात अंबाबाई हिचे एकमेवाद्वितीय विश्वविख्यात मंदिर कोल्हापूर येथे आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत आज आपण कोल्हापूर येथील आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाणार आहोत.

श्री महालक्ष्मी मंदिर आणि करवीरनगरी असा उल्लेख अनेक पूराणांमध्ये आढळतो. भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण जागेतील या मंदिराची वास्तू पश्चिमाभिमुख आहे. साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास जाणवतो. तसेच या भूप्रदेशाची भौगोलिक स्थिती ध्यानी घेऊन पर्यावरणाचा अभ्यासही त्या काळच्या अज्ञात स्थापत्य विशारदांनी केल्याचे जाणवते. राजकीय स्थित्यंतरात आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात या मंदिराची पुनर्रचना झाली आहे. 

कोल्हापूर शहराच्या मध्यावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामामध्ये काळ्या-निळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. या पाषाणामुळे देवीच्या मंदिराची भव्यता अधिक शोभून दिसते. इ.स. ५५० ते इ.स. ६६० या चालुक्यांच्या शासन काळामध्ये या मंदिराचे बांधकाम केल्याचे शिलालेख आहेत. एकूणच स्थापत्य कलेच्या अविष्कारावरून आणि इतिहासातील दाखल्यांवरून चालुक्य राजा मंगलेशच्या कारकीर्दीमध्ये या मंदिरामध्ये महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचे आढळते. महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे. बाराव्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर,महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही शिलालेख आहेत. चालुक्यांबरोबरच, राष्ट्रकुट, शिलाहार आणि यादव या राजघराण्यांनी देखील महालक्ष्मीला आराध्य दैवत मानल्याचे दाखले आढळतात. चालुक्‍याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३व्या शतकात नगारखाना,कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत. १७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि अंबाबाई अवघ्या महाराष्ट्राची आज आद्यदेवता बनली आहे. 

महालक्ष्मी मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून, त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वारे असल्याने येथे येणे-जाणे सोयीचे आहे. त्यातील पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार तर उत्तर दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उर्वरित दरवाजे पूर्व तसेच दक्षिण दिशेला आहेत. कोणत्याही दरवाजाने प्रवेश केल्यावर मंदिर सभोवतालच्या चौफेर प्रांगणात आपण येतो. मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धपणासह तेथील सुबकता नजरेत भरते. मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणीनंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीनकाळचे आहेत. तसेच देवालयाची रचना तीन गाभाऱ्यांत विभागली आहे. सुमारे २६,००० चौ. फूट क्षेत्रावरील मंदिर जमिनीपासून तसे उंचावर आहे. सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आपल्या नजरेत भरणारा आहे. भक्कम, काळ्या, पाषाणांच्या अनेक शिळांवर शिल्पकाम, नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य शिल्पे बघत राहावे असेच आहे. दोन मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच, परंतु संपूर्ण मंदिरावरती अनेक देखण्या मूर्तीची कलाकृती वाखाणण्यासारखी आहे. मंदिर बाह्य़ भिंतीवरील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सादर करताना शिल्पकारांनी सजावटीच्या कोंदणात उभारलेल्या स्त्रियांच्या विविध मूर्तीच्या भावमुद्रा खूपच सजीव व सहजसुंदर भासतात. 

पहिल्या-दुसऱ्या मजल्याच्या बाहेरील बाजूस आणि मंदिर शिखर शिल्पाचे कोरीव काम पाहताना पुन्हा एकदा शिल्पकारांच्या दूर दृष्टीचा प्रत्यय येतो. मजल्यावरील दगडी महिरपी आणि त्याच्यावरील नक्षीकाम बघतांना कमीत कमी जागेतील प्रमाणबद्धपणा निश्चितच जाणवते. मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह,विष्णू,दत्त,तुळजाभवानी,विठ्ठल,राधाकृष्ण, हनुमंत यांच्या सुबक मूर्तीनी मंदिराची शान वाढवली आहे. मंदिर शिखर आणि कळसाची रचना मंदिराच्या भव्यतेला साजेशी आहे.

गाभाऱ्यातील महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची असून ती तीन फूट उंच आहे. चबुतऱ्यावरील ही देखणी मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हाती गदा तर डाव्या हाती ढोल,खालील उजव्या हातात म्हाळुंग (महालुंग) व डाव्या हातात मानपत्र आहे. देवीच्या मस्तकी उत्तराभिमुख लिंग असून पार्श्वभागी नागफणा आहे. तिचे वाहन सिंह आहे. कोल्हापूरची आई महालक्ष्मीची मूर्ती दुर्गेच्या स्वरूपातील (warrior God) म्हणून दुर्गेचे रूप असावे असं वाटतं. आपण महालक्ष्मीची प्रतिमा बघितली तर जिच्या दोन्ही हातात कमळ, एक हात योग मुद्रा आणि एक हात अभय मुद्रेत कमळावर बसलेली दाखवलेली जाते. त्यामुळे कोल्हापूरची आई अंबाबाई हे नामाभिधान योग्य वाटतं. वर्षांनुवर्षे होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्ती पाषाणाची झीज होत आहे त्यामुळे आता व्यवस्थित काळजी घेतली जाते आहे.

महालक्ष्मी दर्शनासाठी वर्षभर भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. मंदिरामध्ये दररोज विविध विधी केले जातात. त्यामध्ये भल्या पहाटे काकड आरतीने सुरूवात होते. सकाळी महापूजेनंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. दुपारची अलंकारपूजा झाल्यानंतर संध्याकाळी देवीची धूप आरती करण्यात येते. सर्वात शेवटी रात्री देवीच्या विश्रांतीसाठी शेजआरती होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी तीन महत्त्वाचे उत्सव होतात. त्यामध्ये पहिला एप्रिल महिन्यातील रथोत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. देवीची गावात रथामधून मिरवणूक काढण्यात येते.नवरात्रोत्सवही परंपरागत सुरू आहे. 

आई महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात होणारा किरणोत्सव म्हणजे वास्तुकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. महालक्ष्मी मंदिरात ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक,देवदुर्लभ चमत्कारच आहे .जगाचा तारणहार सूर्यनारायण भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचीती या किरणोत्सवप्रसंगी येते. कार्तिक महिन्यात म्हणजेच ९, १०,११ नोव्हेंबर आणि माघ महिन्यात ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी या ठरावीक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव आपणास घेता येतो. दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तसमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याची तेजस्वी सूर्यकिरणे क्रमाक्रमाने महालक्ष्मी देवीचे चरण, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि अखेरीस काही वेळात मुखमंडलासह महालक्ष्मी देवीचे सर्वांग उजळून टाकतो. गाभाऱ्यातील हे क्षण अनुभवायला मिळणे हे हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभासंपन्न होते याची साक्ष देत आहे. 

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर महत्त्वाच्या शहरांमधून राज्य परिवहन मंडळाच्या थेट बस आहेत. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर बसने ३७६ किमी असून, रेल्वेचा प्रवास ४६५ किमीचा आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दररोज महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटते. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुणे-सांगली मार्गे कोल्हापूरला जाते.

करवीर निवासिनी आई अंबाबाई भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी आहे. आई अंबाबाई तुम्हाआम्हा सर्वांवर सदैव कृपा करो हीच तिच्याचरणी प्रार्थना आहे. विष्णुदास महाराजांनी रचलेल्या आरतीतील शब्द जगतजननी अंबाबाई चे वर्णन यथार्थ दर्शवणारे आहेत..ते म्हणतात,

अदिक्षीरसागर रहिवासी । जय जय कोल्हापुरवासी । अंबे भुवनत्रयी भ्रमसि । सदानिज वैकुंठी वससी । दुर्लभ दर्शन अमरांसी । पावती कशी मग इतरासी । करुणालये मोक्षदानी । भक्त जे परम जाणती वर्म । सदा पदी नरम । कृपेने त्याची सदुपाये । संकटी रक्षिसी लवलाहे ।।

जय जय नदिपती प्रिय तनये । भवानी महालक्ष्मी माये ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते !!

विश्वव्यापीनी,सकलसौभाग्यकल्याणी आई रेणुकेच्या गाभाऱ्यात आपण मागच्या आठवड्यात गेलो. आई रेणुकेचे दर्शन घेत आपण माहूर गडावरून सरळ नांदेड-लातूर मार्गाने अंबाजोगाई स्थानावर येतो. भगवती योगेश्वरीचे हे स्थान अतिशय प्राचीन तर आहेच; त्याचबरोबर अनेक राजवंश व त्यांच्या राजवटीची तेथील इतिहासाची ओळख करून देणारे आहे. आजपर्यंत जे शिलालेख आणि उत्कीर्ण लेख उपलब्ध झाले त्यामधून चालुक्य, मंगळवेढ्याचे कलचुरी आणि देवगिरीचे यादव या राजघराण्याच्या उपलब्ध इतिहासात आजही या मंदिराची साक्ष देत हे चिरपुरातन मंदिर दिमाखात उभे आहे. 

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती (जयवंती) नदीच्या काठी वसलेले एक गाव म्हणजे अंबाजोगाई. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी हे अर्धे पीठ आहे. मराठीचे आद्य कवी, 'विवेकसिंधु' कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे जागृत स्थान आहे. 

अंबाजोगाई हे देवीस्थान आहे. या स्थानाशी देवीभक्त व देवी उपासक मोठ्या प्रमाणावर संबंधित आहेत. अनेकांची योगेश्वरी कुलदेवता आहे. भूचरनाथ हे नाव देवी उपासकांचे परंपरादर्शक आहे. ‘नाथ’ पदान्त देवी उपासकांच्या ज्या ज्या परंपरा आहेत, त्यापैकी भूचरनाथ एक आहे. अंबादेवी परंपरेतील गुरुशिष्य शके १०६६ मध्ये अंबाजोगाईला होऊन गेले. तसेच ‘योगेश्वरी माहात्म्य’ नावाच्या स्थल पुराणातही बुटीनाथादि सिद्धांच्या ज्या कथा आहेत, त्या पाहता ‘नाथ’ पदान्त अंबादेवी उपासकांचे व तपस्वी सत्पुरुषाचे हे स्थान होते हे स्पष्ट होते. अंबाजोगाई नावाने हे स्थान आज प्रसिद्ध असले तरी स्थल माहात्म्यकार मात्र जो उल्लेख करतात तो महत्त्वाचा आहे. स्थलमाहात्म्यकार ‘योगेश्वरी माहात्म्य’ शीर्षकाने आपल्या ग्रंथाचा उल्लेख करतात तसेच प्रचलित नावदेखील ‘अंबाजोगाई’ असे आहे. जोगाई म्हणजे योगिनी.

 अंबाजोगाईच्या मध्यातून वाहणाऱ्या जयंती (जयवंती) नदीच्या पश्चिम तीरावर पुराणकाळापासून योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे हे मंदिर असून मुख्य मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिर परिसरात दक्षिणाभिमुख महाद्वारातून प्रवेश केल्यावर समोरची दीपमाळ दिसते. पूर्वाभिमुख द्वारातून मंदिरात प्रवेश करताच मुख्य मंदिराचा उंचच उंच कळस व चार लहान कळस, मुख्य मंदिराच्या शिखरांवर विविध मूर्ती,आकृत्या दिसतात. मुख्य मंदिरात पूर्व-पश्चिम व उत्तरेस द्वारे असून पश्चिमेचे द्वार भांडारगृहाकडून असल्याने ते बंदच असते. भक्त पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून मुख्य मंदिरात प्रवेश करतात. मुख्य मंदिराचा गाभारा आणि त्याची दगडी हेमाडपंती रचना अत्यंत भक्कम व सुबक

आहे. मुख्य गाभाऱ्यातील उत्तराभिमुख असलेल्या योगेश्वरीचा ओंकाराकृती भव्य शेंदरी तांदळा अत्यंत प्रसन्न तरीही किंचित भयंकर जाणवतो. दैत्याचे निर्दालन व सृजनांचे रक्षण करण्यासाठी अवतरलेली योगिनी उग्र असूनही सुहास्यवदना अशी भासते. मुख्य गाभाऱ्यातील उजव्या बाजूस कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन होते. सभामंडपातून गणपती, केशवराज, देवीची भोगमूर्ती, महादेव इ.चे दर्शन घेऊन उत्तरद्वारातून बाहेर पडताच समोर भलेमोठे होमकुंड आहे. होमकुंडावरच मुख्य मंदिराच्या समोर भव्य असा सभामंडप आहे.

मंदिराच्या पराकोटास पूर्व-पश्चिम व उत्तर बाजूने दरवाजे आहेत. सभामंडपात नगारखान्याकडे जाण्याच्या मार्गावर दंतासुराची प्रतिमा (शिर)दिसते. भक्तांच्या सोयीसाठी ओवऱ्या बांधलेल्या आहेत. नैऋत्य दिशेतील ओवरीत रेणुकामातेची मूर्ती दिसते. मोराची ओवरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ओवरीत ‘श्रीकृष्णदयार्णवांनी हरीवरदा' हा ग्रंथ लिहिताना वास्तव्य केले होते. मंदिराच्या उत्तरेकडील द्वारातून बाहेर पडल्यानंतर समोर दीपमाळ व त्यापलीकडे सर्वेश्वर तीर्थ दिसते. या तीर्थावर पश्चिमेस रुद्र भैरव व महारुद्र मंदिरे आहेत. तटबंदीच्या पश्चिम दारातून बाहेर पडताच जवळच मायामोचन तीर्थ दिसते. या तीर्थाजवळ काळभैरव, अग्निभैरव, महारुद्र, गणेश आणि नारदेश्वर यांची लहान मंदिरे आहेत. या तीर्थाजवळूनच सर्वज्ञ दासोपंत व आद्य कवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता आहे.

भगवतीच्या आठही दिशांना एकेक योगिनी विराजमान असते. अशा आठ आहेत. प्रथमा ते पौर्णिमेसह १५ व अधिक एक अशा १६ योगिनी अमृतकलेसह शोभायमान असतात. पण योगिनी ६४ योगिनीची दिव्यरूपता त्यांच्या ज्योतिमयतेतून सुगंधासह पाझरत असते व ही रूपता भगवतीच्या केशकलापावर अशा तर्‍हेने आकृतिमान असतात. हळूहळू त्याची रूपबंधता शिखररूपात झळाळत असते. हिंदू मंदिराला शिखर असते व शिखरासह हिंदू देवदेवतांचे मंदिर पाहिले की शिखराला वंदन करण्यास आपण हात जोडतो. शिखराची निर्मिती भगवतीच्या मस्तकावरील सुगंधित परिमळासह ज्योतिरूपात असलेल्या योगिनीतून झालेली आहे. सुगंध व ज्योत असे हे दृश्य आहे. याचीच खूण म्हणजे हिंदू परंपरेतील स्त्री आपल्या मस्तकावरील केसांना पुष्पाने शोभा देते. आपल्या डोक्यावरील केसांना गजरा व पुष्पांनी शोभायमान करण्याची हिंदू स्त्रीची पद्धत आहे व विश्वातील समस्त स्त्री वर्गात पुष्पांनी शोभा आणणारी हिंदू परंपरेत आढळते. मस्तकावरील केसांचे सौंदर्य भगवतीच्या शिखररूप सुगंधित ज्योतिमय योगिनीचे आहे. अशा योगिनींच्या आकृतिबंध (श्री यंत्रमय) समूहात भगवती योगेश्वरी जगदंबा विराजमान आहे. ती षोडशी त्रिपुरा आहे. रत्नांनी लखलखणारी, तेजाने तळपणारी, प्रकाशाने प्रज्वलित ज्योतिरूप योगिनींच्यासह पुष्पांनी सुशोभित, अंगप्रत्यंगातून सुगंध परिमळाची ही अमृता, ही श्रीपाद श्री वल्लभेश्वरी, ही शिवा, ही शिवाची पार्वती देवदेवेश्वरी समस्त योग्यांची कुमारी योगेश्वरी आपल्या ६४ योगिनींसह अंबादेवी, अंबाजोगाई दर्शनास आलेल्या वधूवरांसह समस्त भक्तांना सुख देण्यास तत्पर आहे. अंबाजोगाईला गेल्यावर योगेश्वरी चे दर्शन घेताना आरतीतील शब्द गुणगुणताना आपणही म्हणू लागतो, 

अनंत रूप शक्ती तुझ योग्य माते।

योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते।।

व्यापक सकळा देही अनंत गुण भरिते।

निळकंठ ओवाळू कैवल्य माते।।

जय देवी जय देवी जय योगेश्वरी।

महिमा न काळे तुझा वर्णिता थोरी।।

जय देवी जय देवी…

सर्वेश फडणवीस 

Tuesday, October 26, 2021

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी

मळवट लेपन तुझेच चिंतन मूर्ती तव नयनी

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी

सत्यरूप तव मजला दावुनी, भवबाधा ना सुनी

विकास करण्या झणी मुक्ती दे। जीवन फळयोनी ।।

सणवार असले की सगळीकडे आनंदी, प्रसन्न वातावरण असतं. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते. आरतीचे वेगळेपण अद्भुत असेच आहे. अशीच माहूरगड निवासिनीं आई रेणुकेची पारंपरिक आरती नवरात्र पर्वकाळात म्हणतांना साक्षात रेणुकेचे दर्शन होते. विकासानंद नाथांनी केलेली ही आरती म्हणजे साक्षात माहूर निवासिनी रेणुकेच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन नकळत होते. 

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची रेणुकामाता आहे. आई रेणुका ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुळदेवी आहे. माहूरगड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरनगरी प्रत्येक युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होती. कृतयुगात त्यास आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर आणि कलीयुगात मातापूर म्हणजेच माहूर या नावाने ओळखले जाते. माहूरला मातापूर म्हणताना एक घटना कारणीभूत आहे, ती अशी की ब्रम्हा,विष्णू आणि महेशाने महासती अनसूयेच्या सतीतेजाला प्रसन्न होऊन माहूर येथील अत्री-अनसूया आश्रमामध्ये अनसूयेची बालके झाली. अशा त-हेने महासती अनसूया तिन्ही देवांची माता झाली म्हणूनही मातापूर म्हणून याचे माहात्म्य सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. कुठल्याही शास्त्र, पुराणाचा दाखला घेऊन रेणूका मातेचे माहात्म्य, चरित्रस्मरण केल्यास मातेच्या अलौकिक तेजाचे गुणवर्णन आपणास ऐकावयास मिळते. आदिशक्तीचा संपूर्ण पृथ्वीवर पूर्णरूपाने वास सह्याद्री पर्वतावरील मातापूर म्हणजेच माहूरगडावर आहे.

सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी, गंधर्व, किन्नर, तपस्वी आणि प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश यांचेसह जगत्वंद्य श्री दत्तात्रेय यांचा नित्य वास माहूर गडावर आहे. ह्या भूमीला कोरी भूमी म्हणतात. म्हणजे अत्यंत शुचिर्भूत, कशाचीही बाधा न झालेली अशी रेणूका नगरी पुण्यनगरी आहे. 

पृथ्वीच्या पाठीवर एवढे दिव्य आणि परमपावन स्थान कोठेच नाही. सर्व तीर्थाहून अत्याधिक साक्षात्कारी,जागृत स्थान म्हणूनही आपल्या विश्वव्यापी तेजाने झळकत आहे. कारण ब्रम्हांडातील आद्यशक्ती, विश्वमोहिनी, विश्वव्यापिनी, देवमाता, सकल कल्याणी,मुक्तीदायिनी माहूरगडावर आजही वास करून आहे आणि आपल्या निस्सीम भक्तास साक्षात्कार दाखवून दर्शनाचा लाभ देत आहे. 

देवांचा वास असलेल्या रेणुकानगरी माहूर गडावर आपण जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा सर्वप्रथम आदिशक्ती रेणूकेची स्तुतीसुमने गातअसलेल्या वृक्ष-वेली, निर्झर, पशु-पक्षी हिरव्यागार मायेच्या पदराखाली सुखात राहणारे दरी-डोंगरे पाहिले की तत्काळ आत्मशुद्धी होऊन रेणूकेचरणी नतमस्तक होण्यास मन आतूर होते. सह्याद्री शिखरावर ही निसर्गदेवता अनादी काळापासून येथे वास करून आहे. ह्या निसर्ग देवतेने रेणूकेच्या कृपेने ह्या सह्याद्री पर्वतावर सर्वच देवी-देवता, ऋषी- मुनी, संत-महंत यांना आपल्यात सामावून रेणूकेला प्रणिपात केला आहे. आपल्या मातेच्या घरी तिच्या कृपा सावलीमध्ये हे सर्वच देवी-देवता, ऋषी-मुनी, तपस्वी नित्य वास करीत रेणूकेची अर्चना-उपासना आणि स्तुती करीत आहे. आई रेणूकेच्या दर्शनाभिलाषेने येणाऱ्या प्रत्येकांवर हे स्थान कृपादृष्टी ठेवून आहे.

पहाटे प्रथम प्रहरी सूर्य आपल्या पहिल्या किरणांनी आपल्या तेजाने रेणूकेस अभिवादन करतो. तद्नंतर विश्व कल्याणाच्या कार्याकडे वळतो. सूर्याच्या पहिल्या किरणांनी सह्याद्री गडावरील निसर्गदेवता तेजाने न्हाऊन निघते आणि पशु-पक्षी आपली पहाटेची भूपाळी गाऊन स्वरांजली अर्पण करतात. दऱ्या खोऱ्यातून वाहणारे निर्झर ताल धरू लागतात. सूर्याच्या ह्या पहिल्या किरणाबरोबर सर्व तीर्थादी तीर्थांनी शुचिभुर्त होऊन सह्याद्री शिखरावर वास करीत असलेले ऋषी-मुनी, देवगणही देवीची प्रार्थना करू लागतात. हिरव्यागार वनदेवतेवर सूर्य जेव्हा रेणूका दर्शनानंतर आपली सोनेरी किरणे पसरू लागतो, तेव्हा मात्र ही सद्गुणी वनदेवता हिरव्यागार शालुवर अनेक रूपी सुवर्ण भुषणे घालून रेणूका भक्तांच्या स्वागताला सज्ज होते. 

गडावर कमलमुखी रेणूकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादि काळापासून येथे असावे,असे सांगण्यात येते. शालिवाहन कालीन ह्या मंदिराचा विस्तार इ.स. १६२४ च्या सुमारास केला आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारले गेले आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्या प्रवेशद्वारातून आपण जेव्हा प्रत्यक्ष रेणूकेच्या मंदिरात

प्रवेश करतो. पूर्वाभिमुख असलेला रेणूकेच्या तांदळास्वरूप तेजः पुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते, तेव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमलन आपले चित्त केद्रित करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनयन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणूकेने परिधान केला आहे. हिरवे पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमूर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत.

भाळी मळवट लावलेला असून, मुखामध्ये तांबुल रंगलेला आहे. हजारो सूर्याचे तेज तिच्या मुखावर प्रकटलेले आहे. तीचे दर्शन घेतांना अत्यंत चित्तवेधक-भेदक नजर सरळ आपल्या हृदयामध्ये जाते.रेणकेचे भव्य मुखकमल पाहताक्षणी तिच्या पराक्रमाचे, शौर्याचे।महन्मंगल रूप प्रत्यक्ष आपणासमोर उभे राहते. 

सभामंडपात पुत्र परशुराम गणेश रूपात थांबला आहे. असे सौभाग्यक्षणी रेणुकेचे रूप आपल्या मनात घर करून राहते. देवीच्या अगदी जवळ परशुरामाची मूर्ती आहे. रेणूकेच्या मंदिराभोवती अनेक देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराच्या जवळच जमदग्नीचे स्थान म्हणून एक शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाचे दर्शन करून मगच रेणूकेचे दर्शन करावे, असा शिरस्ता येथे आहे. मंदिराच्या दक्षिणेस उत्तराभिमुख टुमदार तुळजाभवानीचे मंदिर आहे, तर अलीकडे पूर्वाभिमुख महालक्ष्मीचे मंदिर आहे. दक्षिणेला गडाच्या पायथ्याजवळ परशुरामाचे स्वतंत्र मंदिर आहे. 

इथे जाण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, किनवट, यवतमाळ आणि पुसद येथून महाराष्ट्राच्या राज्य परिवहनच्या बसेस आहेत. मुंबई वरून जाण्यासाठी रेल्वेने नांदेडपर्यंत यायचे नंतर बस किंवा टॅक्सीने माहूर जायचे. इथे भाविकांना राहण्यासाठी सोय आहेत. लॉज, हॉटेल, शासकीय विश्रामगृहे, भक्त निवास देखील उपलब्ध आहेत.

पृथ्वीवर प्रकट होण्यापूर्वी आदिशक्ती रेणूकेने जे महन्मंगल स्वरुप, परम पावन तेज यासोबतच सर्वच दिव्यगुणांनी युक्त असे रूप धारण केले, ते माहूर गडावर एकमेवाव्दितीय असे आहे. म्हणूनच संत विष्णूदास म्हणतात, 

सव्यभागि दत्त-अत्रि वामभागि कालिका ।

धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥

✍️ सर्वेश फडणवीस


गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी !!


श्रीमद आदि शंकराचार्य यांचे भवानीअष्टक आणि त्यातील प्रत्येक श्लोकातील शेवटचे चरण म्हणजे गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी. याचा अर्थ आई तूच माझा आधार आहेस,आश्रय आहेस,रक्षण करणारी आहेस. खरंतर मंदिर आणि मूर्ती हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. भारतातील काही प्राचीन मंदिरे आणि नव्याने उभारली जाणारी मंदिरे जनसामान्यांच्या श्रद्धेची ठिकाणे आहेत. मंदिरे अनेकांच्या आकांक्षाना वाव देत असतात, ती भक्तांना दर्शनासाठी असतात, कलाकारांच्या कलेला ती उंची प्रदान करणारी असतात. मंदिरे उंचच उंच शिखरांची व कलासमृद्ध असतील तर ते बघतांनाही आश्चर्य वाटते. ती डोळा भरून पाहावीत,अभ्यासावीत. कारण ती भक्तांना दिलासा देतात, पांथस्थांना सावली देतात, संन्याशांना विसावा देतात,वानप्रस्थींना आसरा देतात, कलाकारांना चेतना देतात, भक्तांना ऊर्जा देतात, वाट चुकलेल्यांना मार्गावर आणतात, कोणाला रसिकाची दृष्टी देतात तर कोणाला पौरुष शिकवितात,नास्तिकांना डोळस करतात, तर आस्तिकांना अस्तित्वाची जाणीव करून देतात. अशी ही मंदिर डोळाभरून बघावीत. अशाच काही मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आजपासून जाणार आहोत. 

मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे गर्भगृहात आत जायचे असते. गर्भगृह ही संज्ञा मानवी शरीररचनेला सूचित करते. येथून प्रत्यक्ष जीवाचा उद्भव होतो. सृष्टीला चालना देणारे परमात्म्याच्या रूपातील परमोच्च तत्त्व तेथे वास करून असते. मन स्थिर राहण्यासाठी,श्रद्धेला अवकाश प्राप्त होण्यासाठी,अहंकार गळून पडण्यासाठी, आपण मंदिरात जातो आणि तिथे गेल्यावर त्या देवतेपुढे नतमस्तक होत असतो.तेथील अक्षय्य ऊर्जा घेत गाभाऱ्यातून आपण बाहेर पडतो.

आदिशक्तीचे जागर पर्व अर्थात घट नवरात्राची सुरुवात झाली आहे. या जागर पर्वात आज आपण महाराष्ट्रातील साडे तीन पीठापैकी एक पूर्ण पीठ असलेले श्री तुळजाभवानी आईच्या दर्शनार्थ जाणार आहोत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवस्थान आहे. तुळजापूरची आई भवानी हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षांतून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. 

आई तुळजाभवानीच्या दर्शनार्थ येणाऱ्या भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर आणि परिसर अशा काही ठरावीक गोष्टीच माहीत असतात. परंतु यापलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूर येथे अनेक अशा प्रथा- परंपरा जपलेल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. खरंतर साडेतीन शक्ती पीठांपैकी फक्त श्री तुळजाभवानीची मूर्ती तिच्या जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढय़ाच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. त्यामुळे वर्षांतून तीन वेळा म्हणजे भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीच्या मूर्तीला सिंहासनावरून काढून पलंगावर झोपविले जाते. ज्याला देवीचा निद्राकाल म्हणतात. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढय़ाच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवतेला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत बघायला मिळत नाही.

श्री तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा तसेच रात्रीची प्रक्षाळपूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात, त्या वेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पानेरी मठाचे महंत व सोळाआणे कदम पुजारी या घराण्यातील स्त्री- पुरुषांना आहे. यांच्याव्यतिरिक्त कुणीही असला तरी तो देवीच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नाही. श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्तीबाबतचा एक अस्सल पुरावा तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शिलालेखात सापडतो. या शिलालेखात तुळजाभवानीची मूर्ती स्वत: स्थापित केल्याचा उल्लेख या शिलालेखात असून सदरचा शिलालेख हा शके १३२० म्हणजे इ. स. १३९८ चा असून परसराम गोसावी याने ही मूर्ती दिल्याचा उल्लेख यात आहे. शिलालेखाला अस्सल पुराव्याचे स्थान देण्यात येते हे महत्त्वाचे आहे. शक्तिपीठाची निर्मिती हा विषय महत्त्वाचा असल्याने अनेक पुराणात तुळजाभवानीच्या नावाचा उल्लेख आलेला आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान वरचे असून छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्यासह अनेकांची ती कुलदेवता आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही चल मूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनविलेली ही मूर्ती साधारणपणे २x३.१५ इंच आकाराची अष्टभूजा मूर्ती असून मंदिरातील गाभाऱ्यात सिंहासनावरील एका खाचेत बसविली जाते. मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता दीड फूट लांबीचा क्रुस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून मेण बसविले जाते. याकरिता मूर्तीच्या खालच्या बाजूला ६’’ लांबीचा क्रूस ठेवलेला आहे. त्यामुळे तुळजाभवानीची मूर्ती बाहेर काढून प्रत्यक्ष विधीकरिता वापरली जाते. 

साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूर प्रथा-परंपरा, पूजाअर्चा याबाबतीतच नव्हे तर देवीची मूर्ती अशा सर्वच बाबतीतली भिन्नता आहे. माहूरला मूर्तीऐवजी तांदळा आहे तर वणीला एका मोठय़ा दगडावर देवी प्रतिमा शिल्पांकन करण्यात आलेली आहे. मूर्तिशास्त्रानुसार कोल्हापूर आणि तुळजापूरच्या मूर्तीत काही प्रमाणात साम्य असले तरी तुळजाभवानीची मूर्ती पूर्णत: चलमूर्ती म्हणजे उत्सवाला बाहेर काढून परत त्याच ठिकाणी बसविली जाते.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची श्री तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही पूर्ण पीठं तर वणीची सप्तशृंगी हे अर्धपीठ म्हणून परिचित आहे. तुळजाभवानी ही महिषासूरमर्दिनी असल्याने तिला वीरांची देवता म्हटलं जातं. त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाची ती कुलदेवता असल्याने तुळजाभवानीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. म्हणूनच कदाचित कोल्हापूर, माहूर आणि वणीच्या मंदिरात तुळजाभवानीचं मंदिर आहे. त्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिर परिसरात इतर तीन शक्तिपीठांचा समावेश करण्यात आलेला नाही. 

तुळजाभवानी म्हणजे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी ती त्वरिता! त्वरितावरूनच तुळजापूर नामाभिधान तयार झालं. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे दोन नवरात्र महोत्सव असून या उत्सवापूर्वी देवाला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं. याला देवीचा निद्राकाल म्हणतात. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरविलं जातं.

तुळजाभवानीची पूजाअर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. निद्राकालावधीत देवी ज्या पलंगावर झोपतात तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानाची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी एका तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापनासुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. न्हावी समाजाकडे सनई-चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे प्रत्येक जाती-धर्माला इथं परंपरेनं सेवेचा अधिकार आहे.

भक्तांनी लाखोचे दान देणारी तुळजाभवानी पहिला नैवेद्य हा भाजीभाकरीचा ग्रहण करते. तो उपरकर घराण्याकडून येतो. तुळजाभवानीच्या सेवेत खंड पडू नये म्हणून अनेक सेवेकरी रात्रंदिवस झटत असतात. त्यातही एक विशेष सेवा म्हणजे तुळजाभवानीला उन्हाळय़ात उकाडा लागू नये म्हणून पलंगे सलग तीन महिने आई तुळजाभवानीला वारा घालतात. या सोबतच चैत्रशुद्ध बलिप्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. 

मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून तुळजाभवानी मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. निजाम राजवटीपासून तुळजाभवानी मंदिरात संस्थानची निर्मिती झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे प्रमुख आहेत. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरी प्रत्यक्ष देवीची पूजा अर्चा कदम घराण्यातील १६ घरांकडे आहे. 

तुळजापुरात देवीच्या सेवेत सर्व जातीधर्माना स्थान आहे. देवीच्या नैवेद्यात मांसाहार, तर येथील काळभैरवाला नैवेद्यानंतर गांजाची चिलीम तोंडात दिली जाते. याशिवाय अख्खे गावही अनेक परंपरा पाळते. तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडित असल्याने तिच्या प्रथापरंपराही काही वेगळय़ाच असणार आणि त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. कुळधर्म म्हणून अनेक कुटुंबात देवीच्या नावाने गोंधळ घालण्यात येतो. 

तुळजापूर देवस्थान सोलापूर पासून ४५ किमी, उस्मानाबाद पासून २२ किमी, लातूर पासून ७७ किमी व नळदुर्ग पासून ३२ किमी आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथे रेल्वे स्टेशन आहे. तसेच लातूर, सोलापूर, उस्मानाबाद व नळदुर्ग येथून तुळजापूरला एस टी बसची सुविधा आहे. तुळजाभवानी मंदिर बस स्थानकापासून पश्चिम बाजूस ५०० मीटर च्या अंतरावर आहे.

श्रीतुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी त्यामुळे ज्याप्रमाणे आई सर्वाना सामावून घेते त्याप्रमाणे इथे गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी असे सर्वच सण साजरे होतात. एवढेच नव्हे तर वैष्णवांचा गोपालकालाही आषाढी एकादशीला इथं साजरा होतो. गुढीसोबतच सर्व राष्ट्रीय सणाला मंदिरावर राष्ट्रध्वजही फडकविण्याची परंपरा इथं कायम आहे. या प्रमाणपरंपरेला प्राचीन इतिहास आहे. बदलत्या जगात आजही त्याचे मनोभावे पालन केले जाते. तुळजाभवानीच्या मंदिरातील  प्रथापरंपरा अगदी निर्विघ्नपणे पुढे चालू आहेत. मातृत्व ही परमोच्च भावना आहे प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक अवस्थेत आपण तिच्यासमोर नतमस्तकच व्हायला हवे म्हणूनच म्हणावेसे वाटते.. 

उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो 

उदोकारे गर्जती कार महिमा वर्णू तिचा हो.. 

सर्वेश फडणवीस




Wednesday, October 13, 2021

कर्तृत्वशालिनी - मेजर दिव्या अजित कुमार !!

भारतीय लष्करातील मेजर दिव्या अजित कुमार भारतीय लष्कराच्या इतिहासात तलवारीचा सन्मान मिळवणाऱ्या पहिल्या महिला कॅडेट आहेत.चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी (ओटीए) मध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर - स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त करणाऱ्या पहिली महिला कॅडेट बनल्या आहेत.

भारतीय लष्करी अधिकारी मेजर दिव्या अजित कुमार यांना सैन्यदलात जाण्याची ओढ होती. चेन्नईमधील मध्यम वर्गीय कुटुंबात त्यांचे लहानपण गेले. मेजर दिव्या महाविद्यालयीन जीवनात एनसीसीमध्ये सक्रियपणे सहभागी होत्या. त्यांनी एनसीसीमध्ये बेस्ट कॅडेट म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रजासत्ताक दिनाच्या वेळी त्यांनी आपल्या ट्रूपच्या संचलनाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्व कौशल्यांमुळे त्यांना अखिल भारतीय एनसीसी गर्ल्स कंटिनेंट कमांडर म्हणून देखील निवडले गेले आणि 'ऑल इंडिया बेस्ट परेड कमांडर' चा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिला महिला भारतीय आहेत.

मेजर दिव्या अजित कुमार यांना २०१० मध्ये आर्मी कॉर्प्समध्ये कमिशन देण्यात आले. त्यांनी काही काळ ओटीए चेन्नई येथे प्रशिक्षक म्हणून काम केले आणि संयुक्त राष्ट्र मिशनचा एक भाग म्हणून दक्षिण सुदानलाही गेल्या. मेजर दिव्या यांना नोकरी व्यतिरिक्त खेळांमध्ये खूप रस आहे. त्यांना बास्केटबॉल मध्ये सहभागी होणे आणि विविध विषयांवर चर्चा करायला आवडतं. त्या प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आणि तालवाद्याचे त्यांना ज्ञान आहे.

भारतीय लष्करातील आव्हानांविषयी मेजर दिव्या म्हणतात,
“ भारतीय लष्करात कुठलाही भेदभाव होत नाही. मिळालेल्या संधीला आव्हान म्हणून घेतले आणि जर एक मुलगी म्हणून मी ते करू शकते, तर प्रत्येक इतर मुलगी ते करू शकते. फक्त स्वप्नांचे अनुसरण करणे महत्त्वाचे आहे. ” स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या जिद्दीने त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. मेजर दिव्या अजित कुमार यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.

✍️ सर्वेश फडणवीस

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख८

Tuesday, October 12, 2021

कर्तृत्वशालिनी - मेजर मिताली मधुमिता

मेजर मिताली मधुमिता हे नाव अनेकांना अपरिचित असेच आहे. पण भारतीय लष्करात शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शौर्य पदक देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या सैनिकांना दिले जाते. खरंतर हा सन्मान सैन्य दलातील असाधारण शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो. 

फेब्रुवारी २०१० सालची ही घटना आहे. मेजर मिताली मधुमिता, अफगाणिस्तानमधील काबूल येथे संयुक्त राष्ट्राच्या मिशनवर होत्या. काबूलमधील कार्य करतांना आपल्या इतर सहकाऱ्यांची सुरक्षा तपासणे ही त्यांची प्राथमिकता होती. जेव्हा त्या आपल्या ड्युटीवर तैनात होत्या तेव्हा एक दिवस भारतीय दूतावास येथील परिस्थिती विषयी त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही, तेव्हा मेजर मधुमिता यांनी इतर सहकाऱ्यांना फोन केला, तेव्हा त्यांना समजले की, काबूलमधील भारतीय दूतावासावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपले कर्तव्य बजावले. घटनास्थळी त्यांना आढळून आले की आपले इतर सहकारी जखमी झाले आहेत. गोळ्या उडत आहेत आणि ग्रेनेड स्फोट होत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य म्हणून जे प्रशिक्षण दिले होते ते केले, लोकांना सोडवण्यासाठी निःशस्त्र उडी मारली, दूतावासात अडकलेल्या भारतीयांसह इतर अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि वैद्यकीय मदतीसाठी तत्काळ स्थानिक मदत गोळा केली.

कर्तव्याच्या आवाहनापलीकडे धैर्य आणि शौर्याचे हे निखळ प्रदर्शन करणाऱ्या पहिल्या शौर्य पदकाने सन्मानित मेजर मिताली मधूमिता आहेत, मेजर मधुमिता यांना शौर्यासाठी सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले, जो पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या आहेत. आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला राहिल्या आहे. 

ओरिसामधील शिक्षकी  कुटुंबातून आलेल्या मेजर मधुमिता या लहानपणापासून मदतीला तत्पर होत्या. कुटुंबातून मिळालेले हे संस्कार त्यांना त्या परिस्थितीत कामी आले. मेजर मधुमिता यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी आईप्रमाणे शिक्षिका व्हावे, परंतु त्यांनी लष्करात जायचे पक्के ठरवले होते आणि पुढे २००० साली त्यांनी प्रवेश घेतला. मेजर  मधुमिता जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताच्या संवेदनशील भागात देखील काहीकाळ तैनात होत्या. जेव्हा त्यांना कायमस्वरूपी कमिशनची विनंती नाकारण्यात आली तेव्हा त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. कारण त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत प्रवेश मिळाला होता, ज्यामुळे लष्करी अधिकारी ५ ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी काम करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल मधुमिताच्या बाजूने निर्णय देईपर्यंत (त्यांचा रँक वाढला होता) त्यांनी ती लढाई शेवटपर्यंत लढली.

त्या म्हणतात, “भारत एक महान देश आहे, मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. आम्ही सैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य करतो ते शक्य तितके चांगले करतो आणि आम्ही येथे सर्व वेळ राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहोत, जेणेकरून तुम्ही शांतपणे सर्व वेळ विश्रांती घेऊ शकाल. ”

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख७

Monday, October 11, 2021

कर्तृत्वशालिनी - फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहना सिंग

आपण नेहमीच म्हणत आलोय की स्त्रिया या पुरूषांपेक्षा कुठल्याही प्रकारे कमी नाहीत. त्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने हे सिद्धही करून दाखवलंय. २१ व्या शतकात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत असताना लढाऊ विमान एकटीने चालवत फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहना सिंग यांनी एक नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे. फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी,भावना कांथ आणि मोहना सिंग या तिघींची भारताच्या इतिहासात नोंद झाली आहे. या तिघींची भारताच्या पहिल्या 'फायटर पायलट' म्हणजेच 'लढाऊ वैमानिक' महिला म्हणून निवड झाली आहे. नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते "नारी शक्ती सन्मानाने"त्यांना गौरविण्यात आले आहे. 

पक्षांप्रमाणे आकाशात भरारी घेणं हे अवनी चतुर्वेदीचं वेड होतं आणि लहानपणापासून तिने बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं आहे. आपल्या पुरुष सहकाऱ्यांसोबत हकिमपेठ मध्ये असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या बेसमध्ये या तिघींनी ट्रेनिंग घेतले आहे. ज्या पद्धतीचे ट्रेनिंग पुरुष पायलट याना दिली जाते तेच ट्रेनिंग मिळाले आहे. केवळ महिला आहोत, म्हणून कोणतीही सूट दिली गेली नाही आणि आपल्या सरंक्षण दलाचे हे वेगळेपण कायमच आवडून जाते. 

 अवनी चतुर्वेदी ही दिल्लीची २७ वर्षीय नौदल अधिकारी लढाऊ विमान एकटीने चालवणारी पहिली महिला लढाऊ विमान पायलट ठरली आहे. "मिग-२१ बायसन" नावाचे लढाऊ विमान अवनीने गुजरातमधील जामनगर भारतीय वायूसेनेच्या तळावरून चालवले आहे. अवनी चतुर्वेदी सोबतच भावना कांथ आणि मोहना सिंग यांची जून २०१६ मध्ये लढाऊ विमानाच्या नौदल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. सगळ्यानी आपले एकेरी लढाऊ विमान उड्डाण केले आहे. 

पहिल्या विमान उड्डाणासाठी या प्रत्येकीला हवाई दलाकडून प्रशिक्षण देण्यात आले तसेच हवाई दलातील प्रशिक्षकांसह दोन आसनी जेट विमानामध्ये प्रशिक्षित करण्यात आले आहे. लढाऊ विमान उड्डाणाचे मुलभूत प्रशिक्षण घेतल्यानंतर हकिमपेठ येथे किरण लढाऊ जेट्सवरदेखील सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर बिदर वायूदल येथे हॉक एडव्हान्स ट्रेनर जेट्सवरही एका वर्षाचे प्रशिक्षण घेतले आहे.

 शत्रूच्या सीमेत विमान कोसळले आणि युद्धबंदी म्हणून पकडल्या गेल्या तरी त्या डगमगणार नाहीत. पुरुष लढाऊ वैमानिकांच्या युद्धकाळातील हिमतीचे कौतुक होते, हे कौतुक आपल्याही वाट्याला येणार याची त्यांना खात्री आहे, कारण त्यांनीही खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्याही मनात तीच जिद्द आणि तोच लढाऊ बाणा आहे. नुकताच त्यांनी प्रवेश घेतला असल्याने त्या या क्षेत्रात आजही कार्यरत आहेत. 

बिहारच्या भावना कांत, राजस्थान च्या मोहना सिंग आणि मध्य प्रदेशच्या अवनी चतुर्वेदी या तिघी तरुण-उमद्या महिला वैमानिक हवाई दलाच्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये तैनात आहे. मोहना सिंग यांना हवाई दलाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही वायुसेनेत वैमानिक होते. ते युद्धसामग्रीवाहक विमानांचे वैमानिक होते. आज तिसऱ्या पिढीच्या मोहना यांनी एक पाऊल पुढे टाकत लढाऊ विमानांची जॉयस्टिक हाती घेतली आहे आणि त्याबद्दल ती कौतुकास पात्र आहे. 

विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी महिलांसाठी 'फायटर एअरक्राफ्ट' ची संधी महिलांना उपलब्ध करून दिली आहे. फ्लाईंग कॅडेट अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहाना सिंग यांनी या सुवर्ण संधीचे सोने केले. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख६


Sunday, October 10, 2021

कर्तृत्वशालिनी - फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

१९९९ चे कारगिल युध्द, ८० डिग्री चढाई असलेले सतरा हजार फूटांचे बर्फाच्छादित डोंगरकडे, उणे बत्तीस अंश तापमान,पाठीवर वीस किलो वजनाची युध्दसामुग्री, रात्रीच्या निबिड अंध:कारात करावी लागणारी इंच इंच चढाई. कधी चढाई दोरखंडावरून तर कधी निसरड्या बर्फावरून! एकीकडे डोंगरमाथ्यावर ठाण मांडून बसलेल्या शत्रुकडून अहर्निश होणारा बॉम्बवर्षाव तर दुसरीकडून बोफोर्सगन्समधून शत्रुवर डागल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांचा भडिमार! 'छोडो मत उनको' म्हणत बंदुकांच्या ट्रिगरवरील बोटही न काढता शेवटच्या श्वासापर्यंत लढून कोसळणारे सहकारी! अत्युच्च बलिदान देणारे हे भारतीय लष्करातील तेजोनिधी अर्थात आपले लढवय्ये शिपाई होते त्यात वायुदलाचे नेतृत्व करत होत्या फ्लाईट लेफ्टिनेंट गुंजन सक्सेना. 

फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना युद्धात जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय वायुसेनेच्या अधिकारी आहेत. १९९४ मध्ये त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. २५ महिलांच्या गटात त्या होत्या. महिला हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थींची ही पहिली तुकडी होती. १३२ फॉरवर्ड एरिया कंट्रोलचा भाग म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग उधमपूर एअर फोर्स कॅम्पमध्ये होती. तिथे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ८ वर्षे सेवा केल्यानंतर २००४ मध्ये त्यांचा हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यकाळ संपला. गुंजन सक्सेना आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांची खरी ओळख "कारगिल गर्ल " या नावाने देखील आहे. गुंजन सक्सेना यांना साहसासाठी शौर्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी शौर्याने दाखवून दिले की, महिलाना युध्द भूमीवर देखील स्वतःचे कर्तृत्व सिध्द करता येते.  

१९७५ मध्ये एका मध्यमवर्गीय आर्मी कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजन नेहमीच हुशार आणि महत्वाकांक्षी होत्या. गुंजन सक्सेना यांचे वडील लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सक्सेना आणि भाऊ लेफ्टनंट कर्नल अंशुमन सक्सेना हे दोघेही भारतीय लष्करात सेवा करत असल्याने सैन्यदलात जाण्याचे त्यांच्याकडून निश्चित होते. पुढे हंसराज कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सफदरगंज फ्लाइंग क्लबमध्ये त्या जात असत. भारतीय वायुसेनेत पहिल्यांदा महिला वैमानिकांची भर्ती करण्यात आली आणि त्यावेळी एसएसबी परीक्षा पास करत वायूदलात त्यांनी प्रवेश घेतला. वायूदलात महिलांनी भर्ती होणे सोपे नव्हते. मात्र त्यांच्या बॅचच्या महिलांनी वायूदलात विमान उडवत इतिहास रचला. 

१९९९ च्या कारगिल युध्दा दरम्यान त्यांनी चीता हॅलिकॉप्टर उडवले होते. पाकिस्तानी सैनिक मिसाइल लाँचरद्वारे हल्ला करत होते. गुंजन यांच्या हॅलिकॉप्टरवर देखील मिसाइल हल्ला करण्यात आला होता मात्र त्या थोडक्यात बचावल्या. अनेक जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम त्या करत होत्या.कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवले होते. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होते.

त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणतात, भारतीय लष्कराच्या जखमी सैनिकांना बाहेर काढणे हे युद्धाच्या दरम्यान सर्वात जास्त प्रेरणा देणारे आहे. अपघातग्रस्त सैनिकांना युद्धभूमीवरून बाहेर काढताना तुम्हाला धीर आणि संयम या दोन्ही गोष्टींचे मोल समजते. जेव्हा तुम्ही सैनिकांचा जीव वाचवता तेव्हा खूप समाधानकारक भावना असते कारण देशभक्तीची जाणीव प्रत्यक्षात युद्धभूमीवर जाणवते. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. पेंगविन इंडिया प्रकाशित "द कारगिल गर्ल" हे आत्मचरित्र मुळातून वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे. देशभक्तीचे संस्कार घरातून मिळाले तर अनेक गुंजन सक्सेना सैन्यदलात येतील हाच विश्वास वाटतो. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख५

Saturday, October 9, 2021

कर्तृत्वशालिनी - कॅप्टन रुची शर्मा (निवृत्त)

भारतीय लष्करात महिला स्वयंस्फूर्तीने प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. त्याने सैन्यदलाची शक्ती नक्कीच वाढते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महिलांनी स्वतःच्या संपूर्ण समर्पण आणि कौशल्याने अनेकांची मने जिंकून घेतली आहे पण आलेल्या  संधीचे सोनं करण्याची ताकद त्यांच्यात आहे असं वाटतं. काही वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती,लष्करात महिलांची संख्या कमी होती त्यातही जिद्द आणि चिकाटीने त्यांनी परिस्थितीवर मात केली आणि स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी कारकीर्द पूर्ण केली. आज ज्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोंत त्या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला पॅराट्रूपर कॅप्टन रुची शर्मा आहे. 

कॅप्टन(निवृत्त) रुची शर्मा. खरंतर कॅप्टन रुची शर्मा यांचा प्रवास १९९६ मध्ये सुरु झाला जेव्हा त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये कमिशन मिळाल्याने त्या देशातील पहिल्या महिला ऑपरेशनल पॅराट्रूपर बनल्या आहे. ऑपरेशनल पॅराट्रूपर एक लष्करी पॅराशूटिस्ट आहे ज्यांना पॅराशूट घातलेल्या विमानातून उडी मारण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आकाशात विशिष्ट अंतरावरून पॅराशूटच्या साह्याने उडी मारण्याचे कार्य पॅराट्रूपर करतात म्हणजेच ते एखाद्या विशिष्ट ठिकाणी उतरतात. पॅराट्रूपर यांचा सहसा युद्धांदरम्यान सरप्राईज हल्ल्यांमध्ये विशेष सहभाग असतो. 

कॅप्टन रुची शर्मा सशस्त्र दलातील कुटुंबातून आल्या आहे.त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते त्यामुळे शिस्तीचे वातावरण घरात होते. देशासाठी काही तरी करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले. महिलांना फक्त डॉक्टर आणि परिचारिका म्हणून सैन्यात कमिशन मिळू शकते हे त्या जाणून होत्या पण त्यांना पॅराट्रूपर म्हणून कार्य करायचे होते.पुढे कमिशन मिळाल्यापर्यंत,भारतीय सैन्यात इतर सेवांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर, जिथे सर्व कारवाई होत असे, तिथे त्या आघाडीवर होत्या परंतु महिलांना लढाऊ भूमिका घेण्याची परवानगी नव्हती. परंतु आता बरेच बदल झाले आहे. स्वप्नवत वाटावे अशीच त्यांची वाटचाल आहे. कॅ.रुची शर्मा यांना नेहमीच असे वाटत होते की पॅराट्रूपर्सची स्वतःची एक आभा असते आणि त्यामुळे त्यांनी लीगमध्ये प्रवेश करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत प्रशिक्षण पूर्ण करत त्यांची ऑपरेशनल पॅराट्रूपर म्हणून पुढे निवड झाली.

ऑपरेशनल पॅराट्रूपर होण्याच्या आव्हानांबद्दल रुची शर्मा म्हणतात की, ऑपरेशनल जवानांना अनेकदा शत्रूच्या रेषेच्या पलीकडे सोडले जाते आणि त्यांना आत्मनिर्भरता आणि इतर पैलूंवर प्रशिक्षण दिले जाते कारण त्यांना तासनतास चालावे लागते. निश्चित पोहोचण्याचे ठिकाण माहिती नसते, अतिशय खडतर प्रशिक्षणाला सामोरं जावं लागतं आणि त्यातून ऑपरेशनल पॅराट्रूपरची निवड होते. सुरुवातीला त्यांना वाटले की हे कठीण काम आहे. पण यामुळे त्यांना सर्वोत्तम काम करण्यास प्रेरणा मिळाली. प्रशिक्षणादरम्यान पाठीवर १० किलो भार घेऊन ४० किमी धावावे लागले. शारीरिक श्रमाची पराकाष्ठा न करता प्रशिक्षण पूर्ण झाले. कॅप्टन रुची शर्मा यांची पहिली उडी १९९७ मध्ये होती आणि त्यांनतर २००३ मध्ये वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी निवृत्ती स्वीकारली. 

कॅप्टन रुची शर्मा यांनी निवृत्तीनंतर अनेक महिलांना आपल्या देशाची सेवा करण्यास प्रवृत्त केले आहे आणि सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लष्करी शाळेत प्राचार्य म्हणून काही काळ सेवा दिली आहे. तरुणांना सैन्यदलात भरती होण्यासाठी मार्गदर्शक म्हणून त्या सदैव तयार असतात. भारताच्या राष्ट्रपतींकडून कॅप्टन रुची शर्मा याना गौरविण्यात आले आहे. त्या तरुणांना सांगतात,जेव्हा तुमच्याकडे राष्ट्रासाठी काहीतरी करण्याची तीव्र भावना असते, तेव्हा ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म मध्ये आणि देशाची सेवा करणे यापेक्षा अधिक योग्य काहीही असू शकत नाही. कॅप्टन रुची शर्मा यांच्या भावी वाटचालीस सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख४