Saturday, October 30, 2021

करुणालये मोक्षदानी,भवानी महालक्ष्मी माये ..

करवीर अर्थात कोल्हापूर. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी करवीर निवासिनी महालक्ष्मी अथवा अंबाबाई म्हणजे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेले श्रीमहालक्ष्मी मंदिर म्हणजे करवीर नगरीचा मानबिंदू अशी ओळखच झाली आहे. कोल्हापूर हे देवीक्षेत्र आहे, महालक्ष्मी क्षेत्र आहे. ते करवीर पीठ आहे. या पिठात दत्तात्रेयांना महालक्ष्मी असलेली रेणुका जगदंबा भिक्षा देते आहे.

दिवाळीची चाहूल लागलेली आहे. सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. दिवाळीत अमावस्या तिथीला लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे. आई महालक्ष्मी अर्थात अंबाबाई हिचे एकमेवाद्वितीय विश्वविख्यात मंदिर कोल्हापूर येथे आहे. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधत आज आपण कोल्हापूर येथील आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाणार आहोत.

श्री महालक्ष्मी मंदिर आणि करवीरनगरी असा उल्लेख अनेक पूराणांमध्ये आढळतो. भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण जागेतील या मंदिराची वास्तू पश्चिमाभिमुख आहे. साऱ्या मंदिराच्या बांधकामात हवा-प्रकाशाचा मेळ साधण्यासाठी योग्य दिशांचा अभ्यास जाणवतो. तसेच या भूप्रदेशाची भौगोलिक स्थिती ध्यानी घेऊन पर्यावरणाचा अभ्यासही त्या काळच्या अज्ञात स्थापत्य विशारदांनी केल्याचे जाणवते. राजकीय स्थित्यंतरात आलेल्या राज्यकर्त्यांच्या काळात या मंदिराची पुनर्रचना झाली आहे. 

कोल्हापूर शहराच्या मध्यावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बांधकामामध्ये काळ्या-निळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे. या पाषाणामुळे देवीच्या मंदिराची भव्यता अधिक शोभून दिसते. इ.स. ५५० ते इ.स. ६६० या चालुक्यांच्या शासन काळामध्ये या मंदिराचे बांधकाम केल्याचे शिलालेख आहेत. एकूणच स्थापत्य कलेच्या अविष्कारावरून आणि इतिहासातील दाखल्यांवरून चालुक्य राजा मंगलेशच्या कारकीर्दीमध्ये या मंदिरामध्ये महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली असल्याचे आढळते. महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मूळ मंदिराला जोडून गरूड मंडप उभा आहे. बाराव्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर,महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही शिलालेख आहेत. चालुक्यांबरोबरच, राष्ट्रकुट, शिलाहार आणि यादव या राजघराण्यांनी देखील महालक्ष्मीला आराध्य दैवत मानल्याचे दाखले आढळतात. चालुक्‍याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३व्या शतकात नगारखाना,कचेरीचे बांधकाम तसेच मंदिराच्या आवारात दिपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दिपमाळा अस्तित्वात आहेत. १७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या. त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि अंबाबाई अवघ्या महाराष्ट्राची आज आद्यदेवता बनली आहे. 

महालक्ष्मी मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी उभारलेली असून, त्याच्या चारही बाजूस भली मोठी प्रवेशद्वारे असल्याने येथे येणे-जाणे सोयीचे आहे. त्यातील पश्चिमेकडील दरवाजास महाद्वार तर उत्तर दरवाजा म्हणजे घाटी दरवाजा म्हणून ओळखला जातो. उर्वरित दरवाजे पूर्व तसेच दक्षिण दिशेला आहेत. कोणत्याही दरवाजाने प्रवेश केल्यावर मंदिर सभोवतालच्या चौफेर प्रांगणात आपण येतो. मंदिराच्या दर्शनी भागी येताच मंदिर वास्तूची भव्यता आणि प्रमाणबद्धपणासह तेथील सुबकता नजरेत भरते. मंदिराचा बाहेरील भाग मूळ मंदिर उभारणीनंतर जोडला असला तरी मंदिरातील गर्भगृह आणि सभामंडप प्राचीनकाळचे आहेत. तसेच देवालयाची रचना तीन गाभाऱ्यांत विभागली आहे. सुमारे २६,००० चौ. फूट क्षेत्रावरील मंदिर जमिनीपासून तसे उंचावर आहे. सर्व मंदिर वास्तू म्हणजे जागोजागी उत्कृष्ट शिल्पकलेचा आविष्कार आपल्या नजरेत भरणारा आहे. भक्कम, काळ्या, पाषाणांच्या अनेक शिळांवर शिल्पकाम, नक्षीकाम करून मंदिर सौंदर्य शिल्पे बघत राहावे असेच आहे. दोन मजली मंदिर वास्तू तर भव्य आहेच, परंतु संपूर्ण मंदिरावरती अनेक देखण्या मूर्तीची कलाकृती वाखाणण्यासारखी आहे. मंदिर बाह्य़ भिंतीवरील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना सादर करताना शिल्पकारांनी सजावटीच्या कोंदणात उभारलेल्या स्त्रियांच्या विविध मूर्तीच्या भावमुद्रा खूपच सजीव व सहजसुंदर भासतात. 

पहिल्या-दुसऱ्या मजल्याच्या बाहेरील बाजूस आणि मंदिर शिखर शिल्पाचे कोरीव काम पाहताना पुन्हा एकदा शिल्पकारांच्या दूर दृष्टीचा प्रत्यय येतो. मजल्यावरील दगडी महिरपी आणि त्याच्यावरील नक्षीकाम बघतांना कमीत कमी जागेतील प्रमाणबद्धपणा निश्चितच जाणवते. मंदिराच्या बाहेरील बाजूस नवग्रह,विष्णू,दत्त,तुळजाभवानी,विठ्ठल,राधाकृष्ण, हनुमंत यांच्या सुबक मूर्तीनी मंदिराची शान वाढवली आहे. मंदिर शिखर आणि कळसाची रचना मंदिराच्या भव्यतेला साजेशी आहे.

गाभाऱ्यातील महालक्ष्मी देवीची मूर्ती रत्नशिलेची असून ती तीन फूट उंच आहे. चबुतऱ्यावरील ही देखणी मूर्ती चतुर्भुज असून तिच्या वरच्या उजव्या हाती गदा तर डाव्या हाती ढोल,खालील उजव्या हातात म्हाळुंग (महालुंग) व डाव्या हातात मानपत्र आहे. देवीच्या मस्तकी उत्तराभिमुख लिंग असून पार्श्वभागी नागफणा आहे. तिचे वाहन सिंह आहे. कोल्हापूरची आई महालक्ष्मीची मूर्ती दुर्गेच्या स्वरूपातील (warrior God) म्हणून दुर्गेचे रूप असावे असं वाटतं. आपण महालक्ष्मीची प्रतिमा बघितली तर जिच्या दोन्ही हातात कमळ, एक हात योग मुद्रा आणि एक हात अभय मुद्रेत कमळावर बसलेली दाखवलेली जाते. त्यामुळे कोल्हापूरची आई अंबाबाई हे नामाभिधान योग्य वाटतं. वर्षांनुवर्षे होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्ती पाषाणाची झीज होत आहे त्यामुळे आता व्यवस्थित काळजी घेतली जाते आहे.

महालक्ष्मी दर्शनासाठी वर्षभर भक्तांचा ओघ सतत सुरू असतो. मंदिरामध्ये दररोज विविध विधी केले जातात. त्यामध्ये भल्या पहाटे काकड आरतीने सुरूवात होते. सकाळी महापूजेनंतर महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. दुपारची अलंकारपूजा झाल्यानंतर संध्याकाळी देवीची धूप आरती करण्यात येते. सर्वात शेवटी रात्री देवीच्या विश्रांतीसाठी शेजआरती होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये दरवर्षी तीन महत्त्वाचे उत्सव होतात. त्यामध्ये पहिला एप्रिल महिन्यातील रथोत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे. देवीची गावात रथामधून मिरवणूक काढण्यात येते.नवरात्रोत्सवही परंपरागत सुरू आहे. 

आई महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात होणारा किरणोत्सव म्हणजे वास्तुकलेचे सर्वोत्तम उदाहरण आहे. महालक्ष्मी मंदिरात ठरावीक सहा दिवस अनुभवायला येणारा किरणोत्सव म्हणजे आमच्या पूर्वजांनी दिशासाधनाद्वारे साधलेला अलौकिक,देवदुर्लभ चमत्कारच आहे .जगाचा तारणहार सूर्यनारायण भूतलावरच्या आई जगदंबेच्या दर्शनासाठी किती आतुर आणि उत्सुक आहे याची प्रचीती या किरणोत्सवप्रसंगी येते. कार्तिक महिन्यात म्हणजेच ९, १०,११ नोव्हेंबर आणि माघ महिन्यात ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रुवारी या ठरावीक दिवसातच या किरणोत्सवाचा अनोखा अनुभव आपणास घेता येतो. दिवसभरात तेजाने तळपणारा सूर्यनारायण सूर्यास्तसमयी पश्चिम दिशेकडे मार्गक्रमण करतो, तेव्हा त्याची तेजस्वी सूर्यकिरणे क्रमाक्रमाने महालक्ष्मी देवीचे चरण, नंतर मूर्तीच्या मध्यभागी आणि अखेरीस काही वेळात मुखमंडलासह महालक्ष्मी देवीचे सर्वांग उजळून टाकतो. गाभाऱ्यातील हे क्षण अनुभवायला मिळणे हे हजारो वर्षांपूर्वी ही असामान्य कलाकृती निर्माण करणारे शिल्पकार किती प्रतिभासंपन्न होते याची साक्ष देत आहे. 

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला जाण्यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर व इतर महत्त्वाच्या शहरांमधून राज्य परिवहन मंडळाच्या थेट बस आहेत. मुंबई ते कोल्हापूर हे अंतर बसने ३७६ किमी असून, रेल्वेचा प्रवास ४६५ किमीचा आहे. मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून दररोज महालक्ष्मी एक्स्प्रेस सुटते. महालक्ष्मी एक्स्प्रेस पुणे-सांगली मार्गे कोल्हापूरला जाते.

करवीर निवासिनी आई अंबाबाई भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी आहे. आई अंबाबाई तुम्हाआम्हा सर्वांवर सदैव कृपा करो हीच तिच्याचरणी प्रार्थना आहे. विष्णुदास महाराजांनी रचलेल्या आरतीतील शब्द जगतजननी अंबाबाई चे वर्णन यथार्थ दर्शवणारे आहेत..ते म्हणतात,

अदिक्षीरसागर रहिवासी । जय जय कोल्हापुरवासी । अंबे भुवनत्रयी भ्रमसि । सदानिज वैकुंठी वससी । दुर्लभ दर्शन अमरांसी । पावती कशी मग इतरासी । करुणालये मोक्षदानी । भक्त जे परम जाणती वर्म । सदा पदी नरम । कृपेने त्याची सदुपाये । संकटी रक्षिसी लवलाहे ।।

जय जय नदिपती प्रिय तनये । भवानी महालक्ष्मी माये ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

1 comment: