मळवट लेपन तुझेच चिंतन मूर्ती तव नयनी
आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी
सत्यरूप तव मजला दावुनी, भवबाधा ना सुनी
विकास करण्या झणी मुक्ती दे। जीवन फळयोनी ।।
सणवार असले की सगळीकडे आनंदी, प्रसन्न वातावरण असतं. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते. आरतीचे वेगळेपण अद्भुत असेच आहे. अशीच माहूरगड निवासिनीं आई रेणुकेची पारंपरिक आरती नवरात्र पर्वकाळात म्हणतांना साक्षात रेणुकेचे दर्शन होते. विकासानंद नाथांनी केलेली ही आरती म्हणजे साक्षात माहूर निवासिनी रेणुकेच्या गाभाऱ्यातील मूर्तीचे दर्शन नकळत होते.
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची रेणुकामाता आहे. आई रेणुका ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाची कुळदेवी आहे. माहूरगड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूरनगरी प्रत्येक युगात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध होती. कृतयुगात त्यास आमलीग्राम, त्रेतायुगात सिद्धपूर, द्वापारयुगात देवनगर आणि कलीयुगात मातापूर म्हणजेच माहूर या नावाने ओळखले जाते. माहूरला मातापूर म्हणताना एक घटना कारणीभूत आहे, ती अशी की ब्रम्हा,विष्णू आणि महेशाने महासती अनसूयेच्या सतीतेजाला प्रसन्न होऊन माहूर येथील अत्री-अनसूया आश्रमामध्ये अनसूयेची बालके झाली. अशा त-हेने महासती अनसूया तिन्ही देवांची माता झाली म्हणूनही मातापूर म्हणून याचे माहात्म्य सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहे. कुठल्याही शास्त्र, पुराणाचा दाखला घेऊन रेणूका मातेचे माहात्म्य, चरित्रस्मरण केल्यास मातेच्या अलौकिक तेजाचे गुणवर्णन आपणास ऐकावयास मिळते. आदिशक्तीचा संपूर्ण पृथ्वीवर पूर्णरूपाने वास सह्याद्री पर्वतावरील मातापूर म्हणजेच माहूरगडावर आहे.
सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी, गंधर्व, किन्नर, तपस्वी आणि प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू, महेश यांचेसह जगत्वंद्य श्री दत्तात्रेय यांचा नित्य वास माहूर गडावर आहे. ह्या भूमीला कोरी भूमी म्हणतात. म्हणजे अत्यंत शुचिर्भूत, कशाचीही बाधा न झालेली अशी रेणूका नगरी पुण्यनगरी आहे.
पृथ्वीच्या पाठीवर एवढे दिव्य आणि परमपावन स्थान कोठेच नाही. सर्व तीर्थाहून अत्याधिक साक्षात्कारी,जागृत स्थान म्हणूनही आपल्या विश्वव्यापी तेजाने झळकत आहे. कारण ब्रम्हांडातील आद्यशक्ती, विश्वमोहिनी, विश्वव्यापिनी, देवमाता, सकल कल्याणी,मुक्तीदायिनी माहूरगडावर आजही वास करून आहे आणि आपल्या निस्सीम भक्तास साक्षात्कार दाखवून दर्शनाचा लाभ देत आहे.
देवांचा वास असलेल्या रेणुकानगरी माहूर गडावर आपण जेव्हा प्रवेश करतो, तेव्हा सर्वप्रथम आदिशक्ती रेणूकेची स्तुतीसुमने गातअसलेल्या वृक्ष-वेली, निर्झर, पशु-पक्षी हिरव्यागार मायेच्या पदराखाली सुखात राहणारे दरी-डोंगरे पाहिले की तत्काळ आत्मशुद्धी होऊन रेणूकेचरणी नतमस्तक होण्यास मन आतूर होते. सह्याद्री शिखरावर ही निसर्गदेवता अनादी काळापासून येथे वास करून आहे. ह्या निसर्ग देवतेने रेणूकेच्या कृपेने ह्या सह्याद्री पर्वतावर सर्वच देवी-देवता, ऋषी- मुनी, संत-महंत यांना आपल्यात सामावून रेणूकेला प्रणिपात केला आहे. आपल्या मातेच्या घरी तिच्या कृपा सावलीमध्ये हे सर्वच देवी-देवता, ऋषी-मुनी, तपस्वी नित्य वास करीत रेणूकेची अर्चना-उपासना आणि स्तुती करीत आहे. आई रेणूकेच्या दर्शनाभिलाषेने येणाऱ्या प्रत्येकांवर हे स्थान कृपादृष्टी ठेवून आहे.
पहाटे प्रथम प्रहरी सूर्य आपल्या पहिल्या किरणांनी आपल्या तेजाने रेणूकेस अभिवादन करतो. तद्नंतर विश्व कल्याणाच्या कार्याकडे वळतो. सूर्याच्या पहिल्या किरणांनी सह्याद्री गडावरील निसर्गदेवता तेजाने न्हाऊन निघते आणि पशु-पक्षी आपली पहाटेची भूपाळी गाऊन स्वरांजली अर्पण करतात. दऱ्या खोऱ्यातून वाहणारे निर्झर ताल धरू लागतात. सूर्याच्या ह्या पहिल्या किरणाबरोबर सर्व तीर्थादी तीर्थांनी शुचिभुर्त होऊन सह्याद्री शिखरावर वास करीत असलेले ऋषी-मुनी, देवगणही देवीची प्रार्थना करू लागतात. हिरव्यागार वनदेवतेवर सूर्य जेव्हा रेणूका दर्शनानंतर आपली सोनेरी किरणे पसरू लागतो, तेव्हा मात्र ही सद्गुणी वनदेवता हिरव्यागार शालुवर अनेक रूपी सुवर्ण भुषणे घालून रेणूका भक्तांच्या स्वागताला सज्ज होते.
गडावर कमलमुखी रेणूकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादि काळापासून येथे असावे,असे सांगण्यात येते. शालिवाहन कालीन ह्या मंदिराचा विस्तार इ.स. १६२४ च्या सुमारास केला आहे. हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारले गेले आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्या प्रवेशद्वारातून आपण जेव्हा प्रत्यक्ष रेणूकेच्या मंदिरात
प्रवेश करतो. पूर्वाभिमुख असलेला रेणूकेच्या तांदळास्वरूप तेजः पुंज मुखकमलाचे दर्शन आपणास होते, तेव्हा अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमलन आपले चित्त केद्रित करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनयन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणूकेने परिधान केला आहे. हिरवे पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमूर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत.
भाळी मळवट लावलेला असून, मुखामध्ये तांबुल रंगलेला आहे. हजारो सूर्याचे तेज तिच्या मुखावर प्रकटलेले आहे. तीचे दर्शन घेतांना अत्यंत चित्तवेधक-भेदक नजर सरळ आपल्या हृदयामध्ये जाते.रेणकेचे भव्य मुखकमल पाहताक्षणी तिच्या पराक्रमाचे, शौर्याचे।महन्मंगल रूप प्रत्यक्ष आपणासमोर उभे राहते.
सभामंडपात पुत्र परशुराम गणेश रूपात थांबला आहे. असे सौभाग्यक्षणी रेणुकेचे रूप आपल्या मनात घर करून राहते. देवीच्या अगदी जवळ परशुरामाची मूर्ती आहे. रेणूकेच्या मंदिराभोवती अनेक देवी-देवतांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मंदिराच्या जवळच जमदग्नीचे स्थान म्हणून एक शिवलिंग आहे. ह्या शिवलिंगाचे दर्शन करून मगच रेणूकेचे दर्शन करावे, असा शिरस्ता येथे आहे. मंदिराच्या दक्षिणेस उत्तराभिमुख टुमदार तुळजाभवानीचे मंदिर आहे, तर अलीकडे पूर्वाभिमुख महालक्ष्मीचे मंदिर आहे. दक्षिणेला गडाच्या पायथ्याजवळ परशुरामाचे स्वतंत्र मंदिर आहे.
इथे जाण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, किनवट, यवतमाळ आणि पुसद येथून महाराष्ट्राच्या राज्य परिवहनच्या बसेस आहेत. मुंबई वरून जाण्यासाठी रेल्वेने नांदेडपर्यंत यायचे नंतर बस किंवा टॅक्सीने माहूर जायचे. इथे भाविकांना राहण्यासाठी सोय आहेत. लॉज, हॉटेल, शासकीय विश्रामगृहे, भक्त निवास देखील उपलब्ध आहेत.
पृथ्वीवर प्रकट होण्यापूर्वी आदिशक्ती रेणूकेने जे महन्मंगल स्वरुप, परम पावन तेज यासोबतच सर्वच दिव्यगुणांनी युक्त असे रूप धारण केले, ते माहूर गडावर एकमेवाव्दितीय असे आहे. म्हणूनच संत विष्णूदास म्हणतात,
सव्यभागि दत्त-अत्रि वामभागि कालिका ।
धर्म-अर्थ-काम-मोक्ष कल्पवृक्ष रेणुका ॥
✍️ सर्वेश फडणवीस
No comments:
Post a Comment