मेजर मिताली मधुमिता हे नाव अनेकांना अपरिचित असेच आहे. पण भारतीय लष्करात शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शौर्य पदक देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या सैनिकांना दिले जाते. खरंतर हा सन्मान सैन्य दलातील असाधारण शौर्य किंवा बलिदानासाठी दिला जातो.
फेब्रुवारी २०१० सालची ही घटना आहे. मेजर मिताली मधुमिता, अफगाणिस्तानमधील काबूल येथे संयुक्त राष्ट्राच्या मिशनवर होत्या. काबूलमधील कार्य करतांना आपल्या इतर सहकाऱ्यांची सुरक्षा तपासणे ही त्यांची प्राथमिकता होती. जेव्हा त्या आपल्या ड्युटीवर तैनात होत्या तेव्हा एक दिवस भारतीय दूतावास येथील परिस्थिती विषयी त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही, तेव्हा मेजर मधुमिता यांनी इतर सहकाऱ्यांना फोन केला, तेव्हा त्यांना समजले की, काबूलमधील भारतीय दूतावासावर आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला आहे. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आपले कर्तव्य बजावले. घटनास्थळी त्यांना आढळून आले की आपले इतर सहकारी जखमी झाले आहेत. गोळ्या उडत आहेत आणि ग्रेनेड स्फोट होत आहेत. त्यांनी त्यांचे कर्तव्य म्हणून जे प्रशिक्षण दिले होते ते केले, लोकांना सोडवण्यासाठी निःशस्त्र उडी मारली, दूतावासात अडकलेल्या भारतीयांसह इतर अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले आणि वैद्यकीय मदतीसाठी तत्काळ स्थानिक मदत गोळा केली.
कर्तव्याच्या आवाहनापलीकडे धैर्य आणि शौर्याचे हे निखळ प्रदर्शन करणाऱ्या पहिल्या शौर्य पदकाने सन्मानित मेजर मिताली मधूमिता आहेत, मेजर मधुमिता यांना शौर्यासाठी सेना पदक देऊन सन्मानित करण्यात आले, जो पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिली महिला ठरल्या आहेत. आजपर्यंत हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या एकमेव महिला राहिल्या आहे.
ओरिसामधील शिक्षकी कुटुंबातून आलेल्या मेजर मधुमिता या लहानपणापासून मदतीला तत्पर होत्या. कुटुंबातून मिळालेले हे संस्कार त्यांना त्या परिस्थितीत कामी आले. मेजर मधुमिता यांच्या आईची इच्छा होती की त्यांनी आईप्रमाणे शिक्षिका व्हावे, परंतु त्यांनी लष्करात जायचे पक्के ठरवले होते आणि पुढे २००० साली त्यांनी प्रवेश घेतला. मेजर मधुमिता जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताच्या संवेदनशील भागात देखील काहीकाळ तैनात होत्या. जेव्हा त्यांना कायमस्वरूपी कमिशनची विनंती नाकारण्यात आली तेव्हा त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. कारण त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत प्रवेश मिळाला होता, ज्यामुळे लष्करी अधिकारी ५ ते १५ वर्षांच्या कालावधीसाठी काम करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल मधुमिताच्या बाजूने निर्णय देईपर्यंत (त्यांचा रँक वाढला होता) त्यांनी ती लढाई शेवटपर्यंत लढली.
त्या म्हणतात, “भारत एक महान देश आहे, मला भारतीय असल्याचा खूप अभिमान आहे. आम्ही सैनिक म्हणून आम्ही आमचे कर्तव्य करतो ते शक्य तितके चांगले करतो आणि आम्ही येथे सर्व वेळ राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहोत, जेणेकरून तुम्ही शांतपणे सर्व वेळ विश्रांती घेऊ शकाल. ”
✍️ सर्वेश फडणवीस
#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख७
No comments:
Post a Comment