‘शं नो वरुण:’ या घोषवाक्याने भारतीय नौसेनेची जगाला ओळख आहे. अर्थात वरूण (पर्जन्य देवता) आमच्यावर सदा प्रसन्न राहो आणि याच कल्याणाची कामना करणारी भारतीय नौसेना अविरत कार्य करते आहे. आज याच नौसेनेतील अधिकारी सर्जन रीअर ऍडमिरल शीला सामंता मथाई यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नौदलात ३६ वर्षांहून अधिक काळ सेवा आणि भारतीय नौदलात या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.
सर्जन रीअर ऍडमिरल शीला सामंता मथाई यांनी १९८५ मध्ये भारतीय नौदलात प्रवेश केला. पुण्याच्या प्रतिष्ठित सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले,त्यांना त्यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कलिंग ट्रॉफी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी बालरोगशास्त्रात एमडी केले आणि मुंबई विद्यापीठातून नियोनेटोलॉजीमध्ये डीएम केले. २००३ साली यूके येथील कॉमनवेल्थ व्हिजिटिंग फेलोशिप देण्यात आली आहे आणि २०१४ मध्ये फाउंडेशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ची फेलोशिपही बहाल करण्यात आली आहे.
आज बालरोगतज्ञ म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पोर्ट ब्लेअर आणि गोवा येथील नौदल रुग्णालयांमध्ये बालरोग विभाग आणि मुंबई आणि पुण्यातील सेवा आणि छावणी रुग्णालयांमध्ये नवजात अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. त्यांचा प्रवास म्हणावा तसा सोपा नाहीच. प्राध्यापक आणि विभागप्रमुख - बालरोग, एएफएमसी, पुणे, संचालक आणि डीन, इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन, मुंबई आणि कमांड मेडिकल ऑफिसर - ईस्टर्न नेव्हल कमांड विशाखापट्टणम या प्रतिष्ठित पदांवर त्यांनी काम केले आहे.
ऍडमिरल शीला सामंता मथाई भारतीय नौदलातील सर्वात वरिष्ठ सेवा करणाऱ्या महिला अधिकारी आहेत आणि सध्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या कमांड मेडिकल ऑफिसर पदावर त्या कार्यरत आहेत. यातील विशेष कार्यासाठी १९९३ मध्ये नौदल प्रमुख प्रशंसा, २०१२ मध्ये विशिष्ठ सेवा पदक आणि २०२१ मध्ये नौसेना पदक त्यांना देण्यात आले आहे.
संरक्षण कुटुंबातील पार्श्वभूमी असल्याने, ऍडमिरल मथाई यांनी कलकत्यातील लॉरेटो स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. वडील आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये नामांकित सर्जन म्हणून काम करत होते. आयुष्याच्या सुरुवातीलाच पालकत्व गमावल्यामुळे त्यांना दिवंगत वडिलांच्या पाऊलावर चालण्याची प्रेरणा मिळाली आणि सशस्त्र दलात करिअर करण्यासाठी त्यांनी पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि पुढे मागे वळून पाहिले नाही. पुढे त्यांचे लग्न केएमएस हॉस्पिटल, केरळ येथे कार्यरत सर्जन सीएमडीई केआय मथाई, व्हीएसएम (निवृत्त) यांच्याशी झाले, केआय मथाई, व्हीएसएम (निवृत्त) यांनी स्वतः ३५ वर्षांहून अधिक काळ नौसेनेत सेवा केली आहे.
ऍडमिरल मथाई त्यांच्या क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे. वैद्यकीय जर्नल्समध्ये त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून गौरविण्यात आले आहे, जर्नल ऑफ मरीन मेडिकल सोसायटीच्या मुख्य संपादक असण्याव्यतिरिक्त त्यांचे बालरोग शास्त्रावर पुस्तक प्रकाशित झाले आहे. भारतीय नौसेनेतील तरुण सहकाऱ्यांना ऍडमिरल मथाई सतत मार्गदर्शन करत असतात. बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या ऍडमिरल शीला सामंता मथाई यांना लघुकथा लिहिणे,मॅरेथॉन धावणे आणि पक्षी निरीक्षण करणे असे अनेक छंद आहेत. ट्रेकिंग सारख्या साहसी कार्यात देखील त्यांनी भाग घेतला आहे.
भारतीय नौदलात गेल्या ३५ वर्षांत त्यांनी अनेक अनुभव घेतले आहेत. त्याबद्दल त्या म्हणतात,
" कधीही नाही म्हणू नका; सर्व काही शक्य आहे. आपले डोके आणि आपले हृदय या दोन्हीसह कार्य करा - ते सर्वोत्तम परिणाम देते. गणवेशात नेहमी सेवेला स्वतःपुढे ठेवा म्हणजे कधीही चुकीचे होणार नाही. जेव्हा तुम्ही पांढरा गणवेश परिधान करता, तेव्हा स्वत: ला एक महिला अधिकारी म्हणून विचार करू नका; फक्त स्वत: ला एक अशी व्यक्ती समजा ज्याला गणवेश घालण्यात अभिमान आहे कारण संरक्षण वर्दीमध्ये आपण पुरुष किंवा महिला नाही - आपण सर्व योद्धा आहोत."
सर्जन व्हाइस एडमिरल शीला मथाई यांची भारतीय नौदलातील कारकीर्द प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून सदिच्छा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख३
No comments:
Post a Comment