Sunday, October 10, 2021

कर्तृत्वशालिनी - फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना

१९९९ चे कारगिल युध्द, ८० डिग्री चढाई असलेले सतरा हजार फूटांचे बर्फाच्छादित डोंगरकडे, उणे बत्तीस अंश तापमान,पाठीवर वीस किलो वजनाची युध्दसामुग्री, रात्रीच्या निबिड अंध:कारात करावी लागणारी इंच इंच चढाई. कधी चढाई दोरखंडावरून तर कधी निसरड्या बर्फावरून! एकीकडे डोंगरमाथ्यावर ठाण मांडून बसलेल्या शत्रुकडून अहर्निश होणारा बॉम्बवर्षाव तर दुसरीकडून बोफोर्सगन्समधून शत्रुवर डागल्या जाणाऱ्या तोफगोळ्यांचा भडिमार! 'छोडो मत उनको' म्हणत बंदुकांच्या ट्रिगरवरील बोटही न काढता शेवटच्या श्वासापर्यंत लढून कोसळणारे सहकारी! अत्युच्च बलिदान देणारे हे भारतीय लष्करातील तेजोनिधी अर्थात आपले लढवय्ये शिपाई होते त्यात वायुदलाचे नेतृत्व करत होत्या फ्लाईट लेफ्टिनेंट गुंजन सक्सेना. 

फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना युद्धात जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय वायुसेनेच्या अधिकारी आहेत. १९९४ मध्ये त्यांनी वायुसेनेत प्रवेश केला. २५ महिलांच्या गटात त्या होत्या. महिला हवाई दलाच्या प्रशिक्षणार्थींची ही पहिली तुकडी होती. १३२ फॉरवर्ड एरिया कंट्रोलचा भाग म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग उधमपूर एअर फोर्स कॅम्पमध्ये होती. तिथे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. ८ वर्षे सेवा केल्यानंतर २००४ मध्ये त्यांचा हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यकाळ संपला. गुंजन सक्सेना आता निवृत्त झाल्या आहेत. त्यांची खरी ओळख "कारगिल गर्ल " या नावाने देखील आहे. गुंजन सक्सेना यांना साहसासाठी शौर्य पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी शौर्याने दाखवून दिले की, महिलाना युध्द भूमीवर देखील स्वतःचे कर्तृत्व सिध्द करता येते.  

१९७५ मध्ये एका मध्यमवर्गीय आर्मी कुटुंबात जन्माला आलेल्या गुंजन नेहमीच हुशार आणि महत्वाकांक्षी होत्या. गुंजन सक्सेना यांचे वडील लेफ्टनंट कर्नल अनुप कुमार सक्सेना आणि भाऊ लेफ्टनंट कर्नल अंशुमन सक्सेना हे दोघेही भारतीय लष्करात सेवा करत असल्याने सैन्यदलात जाण्याचे त्यांच्याकडून निश्चित होते. पुढे हंसराज कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सफदरगंज फ्लाइंग क्लबमध्ये त्या जात असत. भारतीय वायुसेनेत पहिल्यांदा महिला वैमानिकांची भर्ती करण्यात आली आणि त्यावेळी एसएसबी परीक्षा पास करत वायूदलात त्यांनी प्रवेश घेतला. वायूदलात महिलांनी भर्ती होणे सोपे नव्हते. मात्र त्यांच्या बॅचच्या महिलांनी वायूदलात विमान उडवत इतिहास रचला. 

१९९९ च्या कारगिल युध्दा दरम्यान त्यांनी चीता हॅलिकॉप्टर उडवले होते. पाकिस्तानी सैनिक मिसाइल लाँचरद्वारे हल्ला करत होते. गुंजन यांच्या हॅलिकॉप्टरवर देखील मिसाइल हल्ला करण्यात आला होता मात्र त्या थोडक्यात बचावल्या. अनेक जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम त्या करत होत्या.कारगिल युद्धात फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवले होते. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. दरम्यान कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होते.

त्यांच्या मुलाखतीत त्या म्हणतात, भारतीय लष्कराच्या जखमी सैनिकांना बाहेर काढणे हे युद्धाच्या दरम्यान सर्वात जास्त प्रेरणा देणारे आहे. अपघातग्रस्त सैनिकांना युद्धभूमीवरून बाहेर काढताना तुम्हाला धीर आणि संयम या दोन्ही गोष्टींचे मोल समजते. जेव्हा तुम्ही सैनिकांचा जीव वाचवता तेव्हा खूप समाधानकारक भावना असते कारण देशभक्तीची जाणीव प्रत्यक्षात युद्धभूमीवर जाणवते. त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. पेंगविन इंडिया प्रकाशित "द कारगिल गर्ल" हे आत्मचरित्र मुळातून वाचनीय आणि संग्रही असावे असेच आहे. देशभक्तीचे संस्कार घरातून मिळाले तर अनेक गुंजन सक्सेना सैन्यदलात येतील हाच विश्वास वाटतो. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#कर्तृत्वशालिनी #नवरात्र #लेख५

No comments:

Post a Comment