Wednesday, March 2, 2022

असा रामशास्त्री पुन्हा न होणे..


राम शेवाळकर !! मराठी सारस्वताच्या दरबारातील मानाचे पान. आपल्या आयुष्यात काही माणसांची उणीव सतत जाणवत राहते. मग त्या माणसांच्या आठवणीच आपल्यासोबत असतात. राम शेवाळकर असंच एक व्यक्तिमत्त्व होते. वाङ्मय चळवळीचा आधार तर होतेच पण विनोबा ते बाबा आमटे आणि मंगेशकरांपासून ते चितमपल्ली पर्यंत साऱ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय होते. त्यांच्याकडून कधी कुणी उपाशी बाहेर पडलाच नाही. माणसांना भेटावे, त्यांच्याशी गप्पा कराव्या हा त्यांचा छंद अनेकांनी अनुभवला असेलही पण कुठल्याही नवोदित लेखकाच्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना देतांना कधीही आढेवेढे घेतले नाही. आज अनेक पुस्तकं वाचतांना त्यांची प्रस्तावना वाचतानाच पुस्तकाची उंची लक्षात येते. कोविड काळात यु ट्यूबवरील त्यांची भाषणे, व्याख्याने ज्या पद्धतीने ऐकल्या गेली आणि आजही ऐकल्या जातात त्यातूनच त्यांचे मोठेपण लक्षात येते. माहितीचे चालतेबोलते विद्यापीठ म्हणजेच नानासाहेब होते. आज नानासाहेबांची जन्म जयंती आहे. 

मागच्यावर्षी मारुती चितमपल्ली सर कायमस्वरूपी सोलापूर मुक्कामी जात असतांना छोटेखानी निरोप समारंभ शेवाळकर यांच्या घरी ठेवला होता. त्यावेळी तेथून निघतांना भावुक झालेल्या चितमपल्ली सरांनी दारातच उद्गार काढले आणि म्हणाले, " हे सरस्वतीच घर आहे इथे सरस्वती निवासाला आली आहे, माझं भाग्य थोर आहे की येथून मी नव्या मुक्कामाला जातो आहे." आणि मग तेथून निघतांना मन काहीकाळ भूतकाळात रमले आणि जे आठवणीत होते ते टिपून ठेवले होते. 

आयुष्यात आनंद आणि कृतार्थतेचे अनेक क्षण आले त्यातील पहिला कायमस्वरूपी स्मरणात राहणारा क्षण म्हणजे आ. नानासाहेबांची त्यांच्याच घरी झालेली भेट आहे. साधारणपणे २००७ सालची घटना आहे. एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी सायं ४-४.३० च्या दरम्यान त्यांच्या शंकर नगर मधील घरी पोहोचलो. आत गेल्यावर वेगळीच निरव शांतता जाणवली दारातून आत प्रवेश केल्यावर नानासाहेबांच्या सुविद्य पत्नी विजयाताई बाहेर आल्या. क्षेमकुशल विचारले आणि सहज बोलण्याच्या ओघात विचारलं की आ. नानासाहेब कुठे आहेत तर त्यांनी आवाज दिला आणि त्यांच्याकडील गडी माणूस समोर आला आणि जिन्याने पहिल्या मजल्यावरील त्यांच्या अभ्यासिकेत घेऊन गेला. 

अभ्यासिकेत प्रवेश करतांना बाहेरच्या भागात त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार आणि सन्मानचिन्ह व्यवस्थित जतन करून ठेवले होते. ते बघत बघत त्यांच्या अभ्यासिकेत प्रवेश केला. त्या अभ्यासिकेतील विवेक रानडे यांनी काढलेले छायाचित्र बघूनच भारावून गेलो होतो. त्यावेळी आ. नानासाहेब लेखनिकेला काहीतरी सांगत होते आणि लेखनिक ते टिपून घेत होती. ते सगळं झाल्यावर त्यांनी विचारपूस केली आणि विविध विषयांवर गप्पा झाल्या. मुळात त्या वयात काय बोलावे आणि कसे आणि कितपत बोलावे याबद्दल अगदीच अनभिज्ञ होतो. पण छान बोलणे झाले, निघतांना नमस्कार केला आणि त्यांनी थोडं दूर गेल्यावर आवाज दिला थांब म्हणाले..थांबलो आणि मग एक कॅसेट भेट म्हणून दिली त्यांच्याच व्याख्यानांची ती कॅसेट आजही जपून ठेवली आहे. सीता आणि द्रौपदी चरित्र त्यात आहेत. खरंतर आजही ती भेट आणि तो आठवणींचा काळ समृद्ध करणारा आहे.  

शेवटाकडे येतांना आ. नानासाहेबांवर  Prakash Edlabadkar यांच्या "अर्घ्य " कवितेचीच मदत घ्यावीशी वाटते. कवितेचा शेवट करतांना ते लिहीतात, आणि ते शब्दशः खरं आहे. 

गंगौघ ज्याची असे शब्दधारा 
सारस्वताच्या नभातील तारा
स्मृतीने जयाच्या उजळून जाणे 
असा रामशास्त्री पुन्हा न होणे 

सर्वेश फडणवीस