Monday, January 24, 2022

आठवणीतला प्रजासत्ताक !! 🇮🇳


सलग दोन वर्षे अर्थात २०१९ आणि २०२० दिल्लीच्या राजपथावर परेड बघण्याचे भाग्य लाभले आहे. २०२० ला बिटिंग रिट्रीट ही बघता आले आहे. दरवर्षी दूरदर्शनवर बघतांना वाटायचं एकदा तरी हे प्रत्यक्षात बघायला हवंच. बऱ्यापैकी २६ जानेवारीची सुरुवात प्रत्येक भारतीय सकाळी दूरदर्शनवर परेड बघूनच घालवतो. तो राष्ट्र कुळाचार झाला आहे. पण प्रत्यक्षात राजपथावर परेड बघणे म्हणजे पर्वणीच आहे. ज्या पद्धतीने दिल्ली नटलेली असते ते बघून आपण काही काळ भारावून जातो . तो जोश, उत्साह आणि राष्ट्रभक्तीने मंतरलेला तो परिसर बघतांना आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याबद्दल गर्व होतोच कारण त्या वातावरणात इतके मोहवून टाकणारे भव्य आयोजन म्हणजे ही परेड असते. सकाळी दिल्लीच्या थंडीत, कुडकुडत परेड बघतांना काही तास राष्ट्रीय अस्मिता अधिक जागरूक झालेल्या असतात आणि थंडी असून सुद्धा उत्साहाने वातावरणात गर्मी असते. हाच अनुभव तिथं गेल्यावर येतो. 
 
२६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्थापन झाले. अर्थात आपण भारतीय राज्य घटना स्वीकारून प्रजासत्ताक झालो. गेल्या ७२ वर्षात एखाद धोका सोडला तर भारतातील लोकशाही अगदी सुरळीत सुरू आहे. स्वातंत्र्य आपल्याला भारतीय संविधानाने दिले. संविधान प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे. खरं तर जे संविधान नागरिकांना भारतात जगण्याचा अधिकार देतो; तेच संविधान भारत संघराज्याच्या नागरिकांकडून काही अपेक्षा करते.

आपण जेव्हाही संविधानावर चर्चा करतो तेव्हा केवळ आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मिळालेल्या हक्कांची चर्चा करतो. ते हक्क आपल्याकडून कुणी हिरावून घेऊ शकत नाहीत, शिवाय ती हक्क हिरावून घेतली तर संवैधानीक अथवा अगदी असंवैधानिक मार्गानेही तो मिळवण्यासाठी आपण भांडण्यास तत्पर असतो. संविधानाने आपल्याला समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्म स्वातंत्र्याचा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क बहाल केले आहेत.
गणतंत्र आणि नागरिक हे एकमेकांसाठीच बनले आहेत. सुखी , समाधानी , सुरक्षित आणि शांत समाज जीवनासाठी आपली कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडणे हेच प्रत्येकाचे लक्ष्य असले पाहिजे आणि हीच भावना जपत राष्ट्रहित सर्वतोपरी हेच उद्दिष्ट समोर ठेवून सार्वजनिक जीवनातील वाटचाल करावी असं मनापासून वाटतं.

आपण आपल्या अधिकाराची मागणी करीत असताना आपली समाजाप्रती, देशाप्रती असलेली कर्तव्ये सुद्धा तेवढीच महत्वाची आहेत याचे भान सर्वांनी पाळल्यास एक सुखी , समृद्ध ,आणि गौरवपूर्ण,आत्मनिर्भर, विश्वगुरु भारत पुन्हा उभा राहील यात शंकाच नाही. 

राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस नक्कीच साजरा करावा. २६ जानेवारी आणि झेंडावंदन आणि राजपथावरील भारताची आन,बान,शान असलेली परेड हे एक वेगळेच समीकरण आहे . प्रत्येक भारतीय नागरिकाला जो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला तरी हा  गौरव सोहळा बघताना अभिमान वाटावा अशी ही परेड असते. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी हा सोहळा प्रत्यक्ष उपस्थित राहून अनुभवावा. रक्षा मंत्रालय आणि विविध संस्थेच्या माध्यमातून ह्याचे enclosure मिळवता येते. ज्या पद्धतीने ही परेड संपन्न होते तेथील प्रत्येक छोटी गोष्ट बघतांना ह्या देशाचे पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगणे म्हणजेच राष्ट्रहित जपणे होईल. खरंच गर्व होतो आपण भारतीय असल्याचा..

आयुष्यात एकदा तरी २६ जानेवारीची परेड बघायचीच. राजधानी दिल्ली गाठायचीच. थंडीत ह्या राजपथावरील उत्साह अवर्णनीय असतो. खरं तर रोजची लढाई ,आपण सगळेच लढतो.पण लढायची शिस्त शिकवते ,ती ही परेड. परेड बघून शिस्तीत जगायला शिकतो तो माणूस, ही परेड बघून सगळे एक आहोत, सगळे सारखे आहोत.
सगळ्यांना बरोबर घेवून चाललात,की देश पुढे जाणार आहे ह्याची जाणीव होते. सीमेवर लढणाऱ्यांची आठवण करून देते, ती ही परेड. कौतुकसोहळा हा देशाचा,तो चुकवायचा नाहीच."
भारत माता की जय 
वंदे मातरम !!

✍️ सर्वेश फडणवीस

#Memories #RepublicDay #Parade

Wednesday, January 12, 2022

विवेकानंद केंद्र,कन्याकुमारी

कन्याकुमारी येथील विवेकशिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक म्हणजे स्वामीजींनी पाहिलेल्या उज्वल भारताच्या स्वप्नाचे प्रतीकच आहे. म्हणूनच,विवेकानंद केंद्र या संघटनेची स्थापना हा मा. एकनाथजी रानडे यांच्या ध्यासाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हटला पाहिजे. ७ जानेवारी १९७२ रोजी स्थापना झालेल्या विवेकानंद  केंद्राचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. खरंतर या केंद्राची स्थापना आणि शिलास्मारकाची कथा म्हणावी तशी सोपी नाही. अवघड वळणावरून या संघटनेचे कार्य नित्यनुतून आणि सतत वर्धिष्णू आहे. या संघटनेबद्दल मनात कायमच आत्मीयता आहे. 

विवेकानंद केंद्राचे ( जनरल सेक्रेटरी) मा.भानुदासजी धाक्रस असो वा इतर जीवनव्रती असोत ज्यांच्या संपर्कात आलो त्यांनी स्वामीजींच्या प्रती, मा.एकनाथजींच्या प्रती जो आदरभाव निर्माण केला त्याला शब्दांत मांडणे तसे कठीण आहे. एकदा आपल्या शहरातील,गावातील विवेकानंद केंद्रात भेट द्यावी आणि जो अनुभव येईल तो नक्कीच सकारात्मकता प्रदान करणारा असेल यात शंकाच नाही. 

कोट्यवधी देशभक्त नागरिकांच्या मनःपूर्वक सहभागातून
विवेकानंद स्मारकाचे शिल्प उभे राहिले आणि पाठोपाठच सामाजिक उत्थान, समानता आणि पुरुषार्थसंपन्नता यांनी युक्त अशा राष्ट्रपुनरुत्थानाच्या कामात उत्साहाने रसरसलेल्या युवक युवतींचे संयोजन करणाऱ्या 'विवेकानंद केंद्र' या संघटनेची स्थापना झाली. अध्यात्म, सेवा आणि संघटन ही विवेकानंद केंद्राच्या कार्याची त्रिसूत्रीच आहे. समस्त मानवतेच्या शाश्वत कल्याणाची हमी देणाऱ्या वेदान्त तत्त्वज्ञानाच्या आधारावर राष्ट्राची उभारणी आणि सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्षेत्रात विवेकनिष्ठेने कार्यरत असलेल्या युवाशक्तीचे संयोजन या दोन प्रमुख उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विवेकानंद केंद्र सतत प्रयत्नशील आहे. या दृष्टीने तरुण, समर्पित आणि सेवाभावी जीवनव्रती कार्यकर्त्यांची फळी संघटित करण्यावर विवेकानंद केंद्राचा विशेष भर आहे. रूढार्थाने संन्यासी नसलेल्या, पण संन्यस्त वृत्तीने समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक युवतींचे सजीव संघटन हे केंद्राच्या कार्याचे समर्पक वर्णन ठरेल. अनेक परिचित, मित्र-मैत्रिणी आज "जीवनव्रती" म्हणून कार्य करत आहेत. त्यांचे अरुणाचल आणि इतर प्रांतामधील अनुभवकथन म्हणजे पर्वणीच असते. 

देशभरात या प्रकारचे काम विविध हेतुपूर्ण उपक्रमांच्या आधारे निरंतर चालू आहे. सुदूर पूर्वांचलाच्या क्षेत्रात ग्रामीण-वनवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि विद्यालयांचे विस्तृत जाळे निर्माण करण्यात आले आहे. योगाभ्यासाच्या प्रसारातून निरामय, संतुलित आरोग्याची आराधना, सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाची व्यवस्था, ग्रामीण भागातील तरुणांना समुचित तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, परंपरा आणि संस्कृतीविषयीचे कालसंगत संशोधन,उद्योजकताविकास, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, साहित्यनिर्मिती-प्रकाशन आदी विविधांगी उपक्रम जागोजागी आयोजित करण्यात येतात आणि त्यातून देशभक्तीची ज्योत सतत तेवत राहावी यासाठी विवेकानंद केंद्र सदैव तत्पर आहे. आज केंद्राची वाटचाल सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे सुरू आहे. ५० वर्षे सतत कार्य करणाऱ्या विवेकानंद केंद्राच्या पुढील वाटचालीस सदिच्छा आहेत. स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत हे लेखन करतोय. 

✍️ सर्वेश फडणवीस

#विवेकानंद_केंद्र