Monday, September 28, 2020

भिक्षेकऱ्यांना सन्मान मिळवून देणारे - डॉ.अभिजित सोनावणे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.अभिजित सोनावणे. पुण्यातील हे डॉक्टर खरंतर कुठल्या चकचकीत दवाखान्यात भेटणार नाही तर ते भेटतात मंदिराच्या बाहेर कारण त्यांचे रुग्ण तिथे बाहेर बसलेले असतात. आश्चर्य वाटेल पण मंदिर,गुरुद्वारा,चर्च, मशीदीच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकरी असलेल्या अनेकांसाठी आज ते देवदूत बनलेले आहेत. आज सोहम ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. समाजानं टाकून दिलेल्या माणसांना आपलंसं करून आत्मसन्मान प्राप्त करून देणं, हेच डॉ. अभिजीत सोनावणे ह्यांचे ध्येय आहे. 

डॉ.अभिजित ह्यांच्यामधली मानवता बघून त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. आयुष्य कसं जगावं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिलाय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं, तर आपल्या असण्याची जाणीव एखाद्याला असणं म्हणजे आयुष्य आणि आपल्या नसण्याची उणीव भासणं म्हणजे आयुष्य! डॉक्टर फॉर बेगर्स अशीच डॉ.अभिजित सोनवणे यांची ओळख आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या चार वर्षांत अनेक आजी-आजोबा आणि दहा युवकांच्या जीवनामध्ये स्वावलंबनाची पहाट उगवली आहे. आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा ‘अभिजात’ मार्ग डॉ. सोनवणे यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ते स्वत:च जीवन संपविण्याच्या विचारात होते. पण, अनेकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करीत त्यांना श्रमाचे मोल जाणवून देण्यामध्ये आज त्यांना समाधान लाभत आहे. 

आयुर्वेदातलं शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या डॉ.अभिजित ह्यांनी समविचारी तरुणीशी लग्न केलं आणि समोर एक ध्येय ठेवून एका छोट्या गावात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आपण आपल्या कर्तृत्वावर जगायचं असं अभिजीत ह्यांनी ठरवलं; पण त्या गावात अभिजीतची प्रॅक्टिस काही केल्या चालेना. काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी गावचे सरपंच अभिजितला म्हणाले,' बाळा, तू अजून तरुण आहेस. कष्ट करण्याची ताकद तुझ्यात आहे. तुझ्याकडे लोक येत नाहीत, तर तू लोकांकडे जा.’सरपंचाचं म्हणणं ऐकून डॉ. अभिजित ह्यांनी रोज गावातल्या लोकांकडे जायला सुरुवात केली. तपासणी फी फक्त पाच रुपये होती. असं असतानाही लोक पैसे तर देणं सोडाच, पण त्यांच्याकडून तपासून घ्यायलाही तयार होत नसत. काय करावं, या गोष्टीचा विचार करून डॉ.अभिजित ह्यांना वेड लागायची वेळ आली. ते गावातल्या एका मंदिराजवळ जाऊन तिथल्याच पायरीवर बसून आकाशाकडे एकटक नजर लावून बघू लागले. मनात सगळे नकारात्मक विचार सुरू झालेले होते. पुढे सगळा काळाकुट्ट अंधार दिसायचा. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षं घातली. आता निदान पोटापुरतं तरी मिळावं असं वाटत असताना तेवढंही मिळू नये या विचारानं अभिजित नैराश्येच्या गर्तेत जात होते. तासनतास तिथे बसलेल्या डॉ.अभिजित ह्यांना त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असायचे. हळूहळू डॉ.अभिजित आणि त्यांची मैत्री झाली. डॉ.अभिजित ह्यांचे दुःख त्यांना न बोलता समजलं. त्या आजोबांनी अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसं तोंड द्यायचं याचे जणू काही धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी डॉ.अभिजीत ह्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. ‘आम्ही तुझे आहोत’ हा आधार दिला आणि त्यांना भिक्षेपोटी मिळालेलं चांगलं अन्न ते डॉ.अभिजित ह्यांना खायला घालू लागले. स्वतः मात्र शिळे खाऊ लागले. डॉ.अभिजित ह्यांच्यासाठी ते चांगले पदार्थ वेगळे काढून देऊ लागले. इतकंच नाही, तर लोकांनी समोर टाकलेले पैसेही ते नकळत डॉ.अभिजीतच्या सॅकमध्ये टाकत होते. त्या पैशांवर डॉ.अभिजित ह्यांचे दिवस कसेबसे निघत होते.

असेच दिवस जात असताना डॉ.अभिजित ह्यांच्यासमोर एक संधी आली. स्वप्नवत असावे अशीच ती घटना होती कारण आता त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती. त्यांना चार लाख रुपये पगार मिळणार होता. चमत्कार व्हावा तशी सगळी परिस्थिती पालटली होती. पुढे डॉ.अभिजित ह्यांची रोजची खाण्याची भ्रांत संपली आणि त्याचं राहणीमान सुधारलं. 

पण डॉ. अभिजितच्या डोळ्यांसमोर ते वृद्ध आजी-आजोबा कायमच यायचे. त्यांचं प्रेम आठवायचं. ‘ते नसते तर...’ असे अनेक प्रश्न त्यांना येत होते. आता त्यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची, या प्रश्नानं त्याचं मनात सारखा विचार येत असे आणि मनाचा निर्धार पक्का करून डॉ.अभिजित ह्यांनी १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते रस्त्यावर आले. पुढे काय करायचं ठाऊक नव्हते; पण मनात एक मात्र नक्की होतं. ज्या आजी-आजोबांनी आपल्या घासातला घास काढून दिला,त्यांचं ऋण चुकतं करायचं होतं आणि डॉ.अभिजित ह्यांनी भिक्षेकऱ्यांना मदत करण्याचे,त्यांना सन्मानाने वागवण्याचे महत्कार्य सुरू झाले. ते म्हणतात,' भिक्षेकऱ्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमानं वागा. त्यांना सन्मानानं वागवा आणि मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.’ ज्या व्यक्तींना समाजानं टाकून दिलंय, त्यांना आपलंसं करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच आता डॉ.अभिजित सोनावणे ह्यांचे ध्येय बनलं आहे. 

डॉ.अभिजित सोनावणे ह्यांनी ‘सोहम ट्रस्ट’ नावाची एक संस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ते करत आहेत. या संस्थेला आर्थिक मदत करायची असल्यास Social Health And Medicine Trust (SOHAM TRUST) या नावे चेक काढून अगदी एक रुपयापासून जमेल तेवढी मदत करू शकता. त्याची पत्नी डॉ.मनीषा सोनावणे ट्रस्टची अध्यक्षा असून,त्या त्यांना त्यांच्या या सगळ्या कामात मदत करतात. आजवर चाळीस हुन दररोज अधिक भिक्षेकऱ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे महत्कार्य ते करत आहे. डॉ.अभिजित ह्यांचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडून मिळतो. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे 

Saturday, September 26, 2020

टेलीफोनचे आत्मकथन … ☎️


नमस्कार मंडळी. हल्ली कोरोनामुळे आपण सगळेजण घरातच आहोत. तसा मी तर कायमच घरात असतो. पण ह्या लॉकडाऊन मुळे माझा वापर ही वाढला आणि अनेक दिवसांपासून आपल्याशी मनातलं काही बोलायची इच्छा होती. आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस. आज माझ्या प्रवासाबद्दल खरंतर काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित आवडेल ही कारण आता मी हळूहळू कालबाह्य होतो आहे. माझं अस्तित्व संपण्यातच जमा झाले आहे. पण तरीही अनेकांच्या दिवाणखान्यात आजही माझ्यासाठी एक कोपरा,कुणाकडे टेबलवर कुणाकडे भिंतीवर,फ्रिजवर माझ्यासाठी जागा आहेच. आधी माझा जन्म झाला माझ्यानंतर कॉडलेस फोन आला त्यानंतर पेजर आला त्यानंतर मोबाईल आला आणि आता स्मार्टफोन आहे. माझी जडणघडण ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही नवनवीन प्रयोग करत गेलात आणि मी घडत गेलो. तसं म्हंटल तर आज माझी चौथी पिढी आता तुमच्याजवळ आली आहे. 

Mr. Watson! Come here, I want to see you.’’ १८ मार्च १८७६ रोजी उच्चारलेले हे वाक्य जगाच्या इतिहासात अमर झाले, कारण ते वाक्य बोलणारे शास्त्रज्ञ होते- अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि ऐकणारे शास्त्रज्ञ होते- बेलचे सहकारी थॉमस वॅटसन. दोघेही बाजूबाजूच्या खोलीत बसले होते. पण हा संवाद झाला तो बेल यांनी तयार केलेल्या दूरध्वनी यंत्रावर. दूरध्वनी यंत्राची चाचणी घेण्यासाठी बोललेले आणि पलीकडे ऐकू गेलेले हे पहिले वाक्य होते.  पत्र्याच्या दोन डब्यांना तारेने जोडून एका डबीतून बोललेले पलीकडे ऐकण्याचा खेळ आपण लहानपणी खेळला आहे आणि विज्ञानाच्या पुस्तकांतही वाचला आहे. 

सामान्यत: ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात. ऐकणाऱ्याच्या कानावर आपटतात. कानातील पडदा त्या लहरींमुळे थरथरतो. त्यामुळे आतील यंत्रणा कार्यान्वित होते. मेंदूला योग्य तो संदेश जातो आणि ऐकणारा ध्वनी ऐकतो. जर ध्वनीचे उगमस्थान ऐकू येण्याच्या कक्षेत असेल तरच ही प्रक्रिया पूर्ण होते. पण जेव्हा हे अंतर काही मीटर किंवा दोन पूर्ण वेगळ्या भौगोलिक स्थानापर्यंत वाढते तेव्हा तयार होणाऱ्या ध्वनिलहरी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते. 

माझा शोध लागण्यापूर्वी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून तारायंत्रे (Telegraph) वापरात आली. आदिम काळापासून धूर अथवा अग्नीच्या साहाय्याने सांकेतिक संदेश देण्याची परंपराच नवीन विद्युत् तंत्रज्ञानाच्या आधारे दूर संदेशवहनाच्या कामी येऊ लागली. इ. स. १७६८ पासून या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. प्रत्येक अक्षरासाठी एक तार वापरण्यापासून ते काही संकेत तयार करून, ते विद्युत् तारांमार्फत पाठवले जाऊ लागले. यातूनच १८३७ मध्ये सॅम्युअल मोर्सने एक सांकेतिक लिपी तयार केली; जी तारायंत्राच्या ‘डा’ आणि ‘डिट’ या दोन आवाजांत बांधली गेली होती. त्या भाषेला ‘मोर्स कोड’ म्हणतात. अगदी आत्तापर्यंत जलद संदेशवहनाकरता तारा पाठवण्याची पद्धत चालू होती.

पूर्वीच्या काळातील फोनच्या तबकडीवरील हवे ते आकडे फिरवून तयार होणारे स्पंद दूरध्वनी केंद्राकडे पोहोचत असत. (या पद्धतीला pulse dialing म्हणतात.) आधुनिक दूरध्वनी संचामध्ये आपण आकडे लिहिलेली बटणे दाबून हवा तो आकडा केंद्राकडे पोहोचवतो. बटन दाबल्यावर तयार होणारा आवाज केंद्राकडे पोहोचतो आणि आपल्याला हवा तो आकडा केंद्राला कळतो. (या पद्धतीला DTMF-dual-tone multi-frequency म्हणतात.)

हा आकडा कळल्यावर पूर्वी केंद्रात असलेले कर्मचारी त्या आकडय़ाच्या दूरध्वनी संचाशी संपर्क जोडून देत असत. आता हीच प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक तंत्र वापरून स्वयंचलित केलेली आहे.  संपर्क साधल्यावर दोन्ही दूरध्वनी संच एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद सुरू होतो. हळूहळू माझ्यात ही बदल होत गेले आणि संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आता धातूच्या तारेऐवजी काचेचे तंतू असलेल्या तारा (Fibre Optics) वापरतात. तसेच विद्युत् चुंबकीय लहरी उपयोगात आल्यापासून दोन संचांमध्ये थेट तारेमार्फत संपर्क न होता तो ‘संच-केंद्र-उपग्रह-केंद्र-संच’ अशा साखळीतून होतो.

खरं तर आता मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी संच हा जणू आपला एक नवीन अवयवच असल्यासारखा वापरला जातोय आणि नुसते बोलणे आणि ऐकणे या मूळ क्रियांबरोबरच इतर बरेच नवनवीन प्रयोग करत आहात. सध्या ह्याची मागणी खूप असल्याने मी थोडा दुर्लक्षित झालो असेल पण अनेकांच्या घरी आजही मी आहे आणि ते प्रसंगी माझा वापर करतात. सर्वेशकडे सुद्धा मी १९९९-२००० च्या दरम्यान आलो आणि जवळपास २० हुन अधिक वर्ष झाली आणि त्यांच्यातला एक झालो आहे. दोन-तीनदा त्यांनी सुद्धा मला परत पाठवण्याची व्यवस्था केली होती पण इतकी वर्षांची सोबत असल्याने आमचे ऋणानुबंध टिकून आहेत आणि गुण्या-गोविंदाने आम्ही एकमेकांच्या सोबत आहे.

चला येतो मी. निघण्याची वेळ झाली. भेटू पुन्हा कधीतरी..


  • सर्वेश

#telephone 

Thursday, September 24, 2020

हत्तीच्या संवेदना जाणणारे - आनंद शिंदे !!

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत हत्ती मित्र आनंद शिंदे. मारुती चितमपल्ली म्हणतात,प्राण्यांच्या,पक्षांच्या जितके जवळ तितके ते आपल्याला जवळ करतात आणि जीवही लावतात. आनंद शिंदे हे असे नाव आहे, की जी व्यक्ती हत्तींशी सहज संवाद साधू शकते. आश्चर्य वाटतं पण ते म्हणतात, ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत दिसतं. मी हत्तींकडून माणुसकी शिकलो,' मुळात पत्रकार असलेले आनंद शिंदे यांना फोटोग्राफीची आवड त्यामुळे ते फोटो पत्रकार झाले. ह्या निमित्ताने संपूर्ण भारतभर त्यांचा प्रवास सुरु असतो. असंच एकदा केरळमध्ये मार्शल आर्ट आणि कथकलीवर फोटो फिचर करण्यासाठी ते गेले असता तिथे त्यांना हत्ती भेटले आणि या हत्तींनी त्यांचं अख्खं जगणंच व्यापून टाकले. 

केरळमधलं प्रसिद्ध त्रिशूल नावाचं फेस्टिव्हल आनंद शिंदे ह्यांनी शूट केलं. त्या फेस्टिव्हलमध्ये असलेले हत्ती त्यांनी पहिल्यांदा शूट केले आणि रांगेत असलेले हत्ती ते बघत राहिले. हत्ती ताकदवान म्हणून त्यांना माहिती होते, पण त्याचं हृदय किती मऊ आहे हे त्यांना एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीनं आपल्या चार पायांच्या मध्ये माहुताला बसायला जागा दिली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंद शिंदे ह्यांना सर्वप्रथम कळलं.

पुढे केरळमध्ये कृष्णा नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय मोडला होता. ते बघून त्यांना वाईट वाटत होतं. कृष्णा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्‍हमलिंगची भाषा वापरतो. सात किमी पर्यंत एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी सहज संवाद साधू शकतो हे विशेष आणि आश्चर्यकारक आहे. हत्तीच्या पोटातून धुमारायुक्त आवाज ऐकायला येतो. आनंद शिंदे ह्यांनी भरपूर प्रयत्न केल्यावर त्यांना घशातून आवाज काढता आला. कृष्णाशी संवाद साधण्याच्या अथक प्रयत्नांनंतर कृष्णानं कान हलवून ते येण्याचा आनंद व्यक्त केला. खरंतर कृष्णा आणि आनंद शिंदे यांच्यात जवळीक निर्माण व्हायला दीड महिना गेला. सकाळ ते रात्रीपर्यंत आनंद शिंदे कृष्णाच्या पिंजर्‍याजवळ बसून राहायचे.

आनंद शिंदे ह्यांना हत्तींनी झपाटून टाकले होते. कारण त्यांना हत्तींच्या संदर्भात अनेक गोष्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोक्तपणा येतो. तसच ते एकमेकांची थट्टा, चेष्टा करत असतात, इतकंच काय माणसाला मित्र मानल्यावर त्याचीही ते चेष्टा करतात. ह्याबाबत त्यांच्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. हत्तीच्या ह्याच वेडामुळे ह्यांच्या पत्नीने अर्थात श्रेया शिंदे ह्यांनी त्यांचं मन ओळखून, हत्तीशिवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्यांचा नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि ‘आपण आर्थिक बाजू सांभाळू तू हे काम निर्धास्तपणे कर’ असं सांगून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या  पुढे आनंद शिंदे ह्यांनी ‘ट्रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ ही विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने एक संस्था स्थापन केली. हत्तींची कमी होणारी संख्या, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर ह्या संस्थेच्या माध्यमातून आज काम केलं जातं. 

असं काही काम करत असतानाच आपल्याला नकळत मार्गदर्शक ही मिळतोच. डॉ. जेकब अ‍ॅलेक्झांडर जे त्रिवेंद्रम झोनचे व्हेर्टनरी डॉक्टर आहेत. यांनी आनंद शिंदे ह्यांना खूप मदत केली प्रसंगी मार्गदर्शन ही केले. कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे सांगितलं आणि ह्यातूनच आनंद शिंदे आता वाघ, बिबट्या, सिंह यावरही अभ्यास करत आहे. हत्तींप्रमाणेच इतर प्राण्यांशी संवाद साधणंही आनंद शिंदे ह्यांना जमायला लागलं आहे. डॉ.जेकब अ‍ॅलेक्झांडरच्या संधीमुळेच त्यांना अशा अनेक गोष्टी करता आल्या. खरंतर हत्तीमित्र म्हणून आनंद शिंदे आज पूर्ण हत्तीमय झाले आहेत. ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे त्यांच्या डोळ्यात त्यांना पहिल्यांदा दिसतं.पसायदानात आपण नेहमी म्हणतो, "भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे" पण खऱ्या अर्थाने ही ओवी आचरणात आणणारे आहेत आनंद शिंदे. नुकतीच विदर्भातील बऱ्याच भागात पूरग्रस्त परिस्थिती होती. गडचिरोली भागामध्ये आलेल्या महापुरात ब्रम्हपुरी परिसरातील गावांसाठी आनंद शिंदे ह्यांच्या ट्रंक कॉल द वाईल्डलाईफ फाउंडेशन संस्थेमार्फत मदत म्हणून गुरांसाठी चारा पाठवण्यात आला.कारण या संस्थेचे मुख्य काम हे हत्ती संवर्धन बरोबर वन्य जीवन संदर्भात चालतं. स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी झळकली नाहीच. पण पूरग्रस्तांना ट्रक भरलेले पशुखाद्य मिळाले. यापूर्वी देखील ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनने जमेल तशी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेगवेगळ्या मदती केलेल्या आहेत. लॉकडाऊन च्या काळात सुद्धा रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न पुरवण्याचे महत्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. 

आनंद शिंदे ह्यांनी हत्ती ह्या महाकाय प्राण्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिलीच पण मदतीसाठी सुद्धा तत्परता दाखवण्याची दृष्टी दिली आहे. आनंद शिंदे ह्याच्यासाठी स्वतःचा प्रवास नावाप्रमाणेच आनंद देणारा असला तरी तुम्हांआम्हां साठी रोमांचित करणारा आणि प्रेरणादायी असा आहे आणि जगण्याचं एक नवं भानही देणारा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे

Monday, September 21, 2020

व्यसनमुक्तीच्या मुक्तांगणातील - मुक्ता पुणतांबेकर !!


आज ज्यांच्या बद्दल लिहायला घेतोय त्या आहेत मुक्ता पुणतांबेकर. त्यांची ह्या माध्यमातील प्रत्येक पोस्ट सकारात्मकता देणारी असते. मुक्तांगण सारख्या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करणारे डॉ.अनिल अवचट आणि डॉ.अनिता अवचट. साहित्यिक म्हणून परिचित असलेले अनिल अवचट असंख्य व्यसनी लोकांना नवजीवन देणारे त्यांचे 'बाबा' म्हणूनही आज परिचित आहेत. चौतीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेला मुक्तांगणचा वटवृक्ष चांगलाच बहरला आहे आणि आज मुक्ता पुणतांबेकर ही डॉ. अनिल व अनिता अवचट ह्यांची कन्या त्याच आत्मीयतेने मुक्तांगणचा सांभाळ करते आहे. 

खरंतर मुक्तांगणची प्रवास म्हणावा तसा सोपा नव्हता. जवळ पैसे नव्हते. खूप अडचणींना सामोरे जात मुक्तांगण उभे राहिले आणि आज एक रोल मॉडेल म्हणून ही वास्तू उभी आहे. हा प्रवास खरंतर शून्यातून सुरू झाला आहे. त्याच्या स्थापनेचा इतिहासही रंजक आहे. मुंबईत केईएम रुग्णालयात डॉ.आनंद नाडकर्णी व्यसनमुक्ती प्रकाराचा प्रयोग करत होते, आणखी एक दोन हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु होती, मात्र केईएम वगळता बाकीची केंद्रे बंद पडली होती. पुढे डॉ.आनंद नाडकर्णी ह्यांच्याशी चर्चा करून,त्यांच्या कामाचे प्रत्यक्ष स्वरूप बघून डॉ.अनिल अवचट आणि मानसोपचार तज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.अनिता अवचट ह्यांनी २९ ऑगस्ट १९८६ रोजी सर्व तयारीनिशी मुक्तांगणची स्थापना केली. खुद्द पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई उद्घाटनाला आले आणि पु.ल. ह्यांनी शुभेच्छा देतांना हे केंद्र लवकर बंद व्हावे हीच अपेक्षा ठेवली. 

आज मुक्तांगणात समाजातील सर्व स्तरातील, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातले रुग्ण आहेत. त्या सर्वांना एकसारखी वागणूक दिली जाते. स्वावलंबित्व शिकवले जाते. त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. काम करायला कर्मचारी मिळतोय म्हणून नाही, तर व्यसनी रुग्णाला कामात सतत गुंतवून ठेवणे, हा त्यामागील शुद्ध हेतू असतो. रिकाम्या डोक्याने वावरणाऱ्या  व्यसनी माणसाला वारंवार व्यसन करण्याची इच्छा होऊ शकते म्हणून त्याच्या हाताला आणि मेंदूला काम देण्याचा मुक्तांगणचा अट्टहास असतो.सुरुवातीला काही दिवस रुग्णाची खूप चिडचिड होते, पण ते नंतर एवढे तयार होतात की आपणहून प्रत्येक कामासाठी पुढाकार घेतात. मुक्ता ताईंच्या एका मुलाखतीत एका रुग्णाचा अनुभव ऐकला त्यात ते सांगतात की आज व्यसनमुक्ती मुळे हाताला मिळेल ते काम करतो, मग तो विचारही मनात येत नाही.

आज मुक्तांगणात आलेल्या रुग्णांना दारू न पिताही एकत्र बसता येते, ह्याचे कारण म्हणजे तेथील घरगुती वातावरण आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये जसे खेळीमेळीचे वातावरण असते,तसेच मुक्तांगण येथे आहे. इथे येणारे रुग्ण खरंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, कोणी कलाकार तर कोणी कवी,कोणी गायक तर कोणी वकील. जे त्यांच्या व्यसनापायी घरच्यांच्या आणि समाजाच्या नजरेतून उतरलेले असतात असा प्रत्येकजण इथे येत असतो. मुक्तांगणमध्ये मात्र त्यांना त्यांचा मान परत मिळवून दिला जातो. त्यांचीच ओळख त्यांना नव्याने करून दिली जाते,जगण्याची उमेद जागवली जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे इथून व्यसनमुक्त झालेले रुग्ण नवीन आयुष्याची पुन्हा नव्याने त्याच जिद्दीने सुरुवात करतात. काही जण बरे झाल्यावरही इतर पीडित रुग्णांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मित्रत्वाच्या नात्याने मदत करतात आणि ते तेथून जातच नाही. तिथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगण्याचे प्रशिक्षण दिले जाते, नव्हे तशी सवयच लावली जाते.

ह्याच व्यसनमुक्तीच्या अवतीभवती असलेली सगळी बाजू जी दुर्लक्षित होणार नाही ह्याची ही काळजी मुक्तांगण मध्ये घेतली जाते. आज व्यसनांपायी उध्वस्त झालेल्या संसाराची घडी बसावी म्हणून सहजीवन सभा भरतात. बायकांना त्यांच्या अडचणी मोकळेपणाने सांगता याव्यात म्हणून सहचारी गट चालवतात. अंकुर सारख्या उपक्रमातून व्यसनी बापाच्या वागणुकीने कंटाळून झालेल्या मुलांना एकत्रित करत मनोरंजनातून सुखाचे क्षण मिळवून देत आहे.

मुक्तांगणाने केवळ रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचाच नाही,तर पोलीस,न्यायव्यवस्था ह्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. व्यसनी गुन्हेगाराकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहावे, त्याची शिक्षा कमीतकमी असावी, त्याला चांगले जगण्यास उत्तेजन मिळावे, यासारख्या गोष्टी कायदेतज्ञांच्या मदतीने त्यांनी कायद्यात आणल्या आहे. आपल्या स्वयं च्या मुलाखतीत मुक्ताताई सांगतात, आनंद मिळवण्याचे अनेक रस्ते आहेत, ते शोधून काढा. निसर्गात,संगीतात,वाचनात,कामात स्वत:ला अडकवून घ्या, म्हणजे व्यसनाची गरज लागणार नाही. घरी एकत्र येत एकमेकांना वेळ द्या,रात्री शक्यतोवर एकत्र जेवायला बसा, संवाद साधा,सोशल मीडियाच्या जगात असल्याने संवादाचा अभाव आज दिसतोय आणि त्यावरही त्या चिंता व्यक्त करतात. आज सर्वप्रथम आपल्या आयुष्याच्या मुक्तांगणात स्वच्छंदपणे फिरून या आणि ते शक्य झाले नाही, तर मुक्तांगणाला जरूर भेट द्या. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे 







एक टप्पा आउट..


शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, 'नावात काय आहे'? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही. मान्य होणार नाही म्हणजे आपण काही थोरामोठय़ांविषयी सवंग किंवा उगाच वादग्रस्त विधानं करून लोकप्रियता मिळवणाऱ्यांपैकी नाही. पण ह्या माध्यमातून एका नावाबद्दल मला लिहावसं वाटतं त्यांच्या टाईमलाईन, त्यांच्या लेखसंग्रहाविषयी लिहावसं वाटतं आहे.  खरंतर त्यांच्या पुस्तकातून त्यांची ओळख तर होतेच पण रोजच्या जगण्याचा मूलमंत्र लेखक तन्वीर सिद्दीकी देतात. एक टप्पा आउट भाग १ आणि एक टप्पा आउट भाग २ हे लेख संग्रह हाती आले. हा वीकेंड खऱ्या अर्थाने आनंद देणारा होता, शुक्रवारी पुस्तकं आली,पहिल्यांदा सहज चाळली आणि मग वाचायला घेतले. हृषीकेश वडके ह्याच्या ऋचित प्रकाशनाने ही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि आतील पेपर ही उत्तम आहे. त्यामुळे बघता क्षणीच पुस्तक आवडतं. खरंतर फेसबुकच्या विश्वातील ही श्रीमंत माणसं आहेत. लेखक तन्वीर सिद्दीकी ह्यांच्या टाईमलाईन वर जरी चक्कर मारून आलो तरी आपल्याला माहितीचा खजिना तर मिळतोच पण तन्वीर ह्यांची प्रत्येक छोट्या-छोट्या घटनेकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोनाची  ओळख होते. तन्वीर ह्यांनी सकारात्मकतेचे वलयच पांघरले की काय इतका भास त्यांचा लेख संग्रह वाचतांना होतो.

सहज सोपी भाषा आणि रोजच्या जगण्यातील समृद्ध अनुभव ही लेखनाची ताकदच म्हणता येईल. हा लेख संग्रह वाचतांना जाणवतं की बऱ्याच घटना आपल्याही अवतीभवती नकळत घडत असतात. आपण दुर्लक्ष करतो पण तन्वीर आपल्या पुस्तकांत तीच घटना तोच प्रसंग वेगळ्या नजरेतून बघण्याची दृष्टी देतात. आपुलकी, ममत्व, माणुसकी,प्रेम, त्याग,जिद्द,उमेद ह्या सर्व गुणांनी युक्त हे दोन्ही भाग परिपूर्ण आहेत. सहजपणे व्यक्त होण्याला  सहज आणि सोपे शब्दही आपलेसे करणारे वाटतात. शब्दांची ताकद वाचतांना जाणवते. पहिल्या भागात ४२ आणि दुसऱ्या भागात ३१ लेख आहेत. ह्यामधील प्रत्येक लेखाची स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे कुठल्याही पानापासून सुरू केलं तरी वाचतांना तोचतोचपणा जाणवत नाहीच. प्रत्येक पानावर नवा विचार देतांना ते अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि बदलण्याची ताकद ह्या दोन्ही बाबी पुस्तकांत आहे. काही प्रमाणात का होईना पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. म्हणून एकदा हे पुस्तक वाचाच.. संग्रही असावे असे तर आहेच पण भेट म्हणून ही देण्यास उत्तम असे एक टप्पा आउट.

एक टप्पा आउट - १ व २ 
ऋचित प्रकाशन, पुणे 
मूल्य ₹१०० व ₹१२०

✍️ सर्वेश फडणवीस

Friday, September 18, 2020

सतार खेडोपाडी नेण्यासाठी कटिबद्ध असलेले - विदुर महाजन !!


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत श्री. विदुर महाजन. सतारीच्या माध्यमातून रागसंगीताचा खेडोपाडी प्रचार करण्याचे अभियान प्रसिद्ध सतारवादक आणि लेखक विदुर महाजन यांनी सुरू केले आहे. नुकताच त्यांचा स्वयं चा व्हिडिओ बघितला आणि मग फ़्रेंड लिस्ट मध्ये ते दिसले. कुणी कुणाला request पाठवली ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञ असलो तरी मला त्यांच्या कार्यातून प्रचंड प्रेरणा मिळाली आहे. 

खरंतर सतार एक भारतीय तंतुवाद्य सितार, सेतार, सेतारा अशा विविध नावांनी हे वाद्य ओळखले जाते. सतारीवर विविध प्रकारे स्वर निर्माण करता येत असल्याने हे वाद्य अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. भारतीय रागसंगीत हे शहरी लोकांसाठी आणि लोकसंगीत, लावणी वगैरे ग्रामीण लोकांसाठी हे समीकरणं आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेले आहे पण विदुर महाजन या ज्येष्ठ व प्रतिथयश कलाकाराने मात्र सर्व समजुतींना छेद देत एक प्रयोग केला आणि आज महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातील सुमारे एक लाख ग्रामीण लोकांना सतारीच्या माध्यमातून आपलं भारतीय रागसंगीत ऐकवलं आहे. आज ह्या रागसंगीताबद्दल,ह्या वाद्याबद्दल अनेकांना माहिती देत नवीन विद्यार्थी घडवून आणत आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ही नवनवीन प्रयोग ते करत आहेत. सतारीच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील लोकांना भारतीय रागसंगीताचा परिचय करून देण्याचे खरंतर हे त्यांचे व्रतच चालू आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा सतत प्रवास सुरु आहे.

पं.रविशंकर यांच्यामुळे सतार हे वाद्य जगभर पोहोचले असले तरी देशातील ग्रामीण भागात सतार या वाद्याविषयी फारशी माहिती नाही. सतारवादन करणारे विदुर महाजन तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास आहेत. तेथेच गेली पंचवीस वर्षे त्यांची संगीत संस्था चालू आहे. ‘मैत्रबन’ नावाचे संगीत शिक्षण वर्ग आहेत. आज ग्रामीण क्षेत्रातील अनेक मुले त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध सतार वादनाचे शिक्षण घेत आहेत. विदुर महाजन ह्यांच्या अमेरिका आणि युरोप दौऱ्यांसह गेल्या २८ वर्षांत सातशेहून अधिक सतारवादनाच्या मैफली झाल्या आहेत. 

खेडोपाडी सतार ह्याची त्यांनी सुरुवात केली ती त्यांच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगरूळ या गावापासून. गावाच्या ऊरुसामध्ये सतारवादन करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे वाद्य पाहून ग्रामस्थ अचंबित झाले आणि त्यांनी त्याबद्दल असंख्य प्रश्न विचारले. त्यातूनच ही अभिनव संकल्पना जन्माला आली आणि  ‘सतारीच्या माध्यमातून रागसंगीताचा खेडोपाडी प्रचार’ या अभियानाची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी आणि या संगीताचा आनंद लुटण्यासाठी संगीत कळण्याची गरज नाही, परंतु हे वाद्य माहिती व्हावे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या अभियानाच्या माध्यमातून नगर, नाशिक, सातारा, पुणे, नंदूरबार, धुळे,जळगाव,सोलापूर,सिंधुदुर्ग आणि रायगड अशा दहा जिल्ह्याचा त्यांनी प्रवास केला. श्री.विदूर महाजन ह्यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री नेहा महाजन त्यांच्याबरोबर या उपक्रमात असतेच ती उत्तम सतारवादक आहे आणि ती सिनेमातदेखील कामे करते. 

अनेकांना ह्याबद्दल माहिती व्हावी ह्या हेतूने त्यांनी व्हिडिओ करण्याचे ठरवले. दीपक थॉमस हा सिनेमा फोटोग्राफर आहे. दीपकने तळेगावला जाण्यायेण्याच्या केवळ खर्चात ठिकठिकाणचे कार्यक्रम शूट करून देण्याचे मान्य केले. परंतु त्याने दोन-तीन कार्यक्रमांचे स्वरूप व तेथील लोकांचा प्रतिसाद पाहिला आणि त्याने त्याच्या कंपनीमार्फत ‘टेकिंग रागसंगीत टू व्हिलेजेस’ या विषयावर ‘द व्हिलेज राग’ या नावाचा लघुपट बनवला आहे. संपूर्ण लघुपट विदूर महाजन यांच्‍या उपक्रमावर चित्रित करण्यात आला आहे. 

विदुर महाजन हे मनस्वी कलावंत आहे. सतार व सतारीचा उपयोग जनमानसासाठी करण्याचे त्यांचे उद्दीष्ट प्रेरणादायीच आहे. आज विदूर महाजन विलक्षण समाधानात आहे, की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासात नमूद नाही अशी घटना घडण्यास ते कटिबद्ध आहेत. कुठलाही कलावंत कलेची आत्ममग्नता आणि कलेचे सामाजिक परिमाण जपणारा असतो आणि मनस्वीपणे जीवनाची क्षेत्रे कलास्पर्शाने तरल, हळुवार करत असतो. शास्त्रीय संगीतकला सर्वसामान्य माणसांपर्यंत नेण्याचा विदुर महाजन ह्यांचा उपक्रम अनुकरणीय तर आहे पण प्रेरणादायी सुद्धा आहे. अशीच माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. खरंतर त्यांच्याशी परिचय होणे ही देखील आपली भाग्योदयाची नांदीच म्हणता येईल. श्री.विदुर महाजन ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभकामना. 

- सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे #लेखमाला


वाग्वैभवी विवेकानंद..


स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की, डोळ्यापुढं येतं ते त्यांचं अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. स्वामी विवेकानंद यांच्या भाषणाला आज बरोबर १२६ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने...
 
‘स्वामी विवेकानंद’ हा सप्ताक्षरी मंत्र युवाचेतना जागृत करतो. प्रकांड बुद्धिमत्ता, ज्ञान, वैराग्य, धैर्य या गुणसंपदेने अलंकृत झालेल्या स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात विविध विषयांमध्ये असामान्य गती संपादित केली होती. वैखरीच्या साम्राज्यातील त्यांचे सम्राटपद सर्वोतोपरी होते. वाणीच्या सामर्थ्याने स्वामीजींनी आपल्या राष्ट्राला जागे केले. भारतीय अध्यात्माला वेदांताच्या मूळ स्रोताकडे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या वाक्शक्तीचा उपयोग केला. युवकांना विजीगिषु वृत्तीने भरून आणि भारून टाकले. संन्यासधर्माला समाजसेवेचे परिमाण दिले. अमेरिका आणि युरोपीय देशातील हजारोंना ‘खर्‍या’ भारताचा परिचय घडवला.

 
वाचे बरवे कवित्व। कवित्वी बरवे रसिकत्व।
रसिकत्वी परतत्व। स्पर्शू जैसा॥
 
माउलींनी सांगितलेल्या या ओवींच्या उंचीचे वक्तृत्व स्वामीजींना लाभले होते. आज स्वामीजींचे जे साहित्य आपल्याला उपलब्ध आहे ते ते सर्व, त्यांनी लिहिलेली पत्र सोडून सगळे स्वामीजींच्या व्याख्यानांचे संकलन आहे. ११ सप्टेंबर १८९३ हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या विजयासाठीच परमेश्वराने निवडला होता. या दिवसाच्या एका भाषणाने संपूर्ण विश्वपटलावर या देशाचा सन्मानच झाला. भारत रानटी आणि असंस्कृत नाही याची हमी देणारे ते भाषण होते. भारतीयांचे पूर्वज बुद्धिविहीन, पराक्रमशून्य नव्हते याची ग्वाही देणारे हे भाषण होते. सर्व जगाला वंद्य असणारी महान संस्कृती भारतानेच निर्माण केली हा विश्वास देणारे ते भाषण होते. सर्वधर्मपरिषदेचा मूळ हेतूच आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याचा असो की, सर्व धर्मांचा परिचय परस्परांना होऊन जगाचे कल्याण करण्याचा असो. पण, स्वामीजींच्या महान व्यक्तित्वाचा यामुळे संपूर्ण जगाला परिचय झाला.
 
शिकागोसारख्या शहरात भरलेल्या परिषदेसाठी दहा हजारांच्या आसपास प्रतिनिधींची नोंदणी झाली होती. संपूर्ण जगातून अनेक अभ्यासक, चिंतक, विचारवंत आणि धर्माचार्य या परिषदेसाठी आले होते. अशा वातावरणात स्वामीजी एक होते. स्वतः किंचित संभ्रमातही होते. कारण, परिषदेपर्यंत पोहोचण्यातच त्यांची सारी शक्ती खर्ची पडली होती. अभ्यासाला वेळच मिळाला नाही. अनेक विचारवंत आपले विचार मांडत होते. अध्यक्षांनी स्वामीजींना अनेक वेळा बोलण्याचा आग्रह केला ‘आत्ता नको, नंतर!’ हेच स्वामीजींचे उत्तर होते. संध्याकाळ झाली. एक कौपीनधारी संन्यासी उभे राहिले. साधारण वाटणारा संन्यासी एका अद्भुत तेजाने प्रक्षेपण करतो आहे. असेच सर्वांना वाटले. सद्गुरू भगवान श्रीरामकृष्ण परमहंस आणि सरस्वती मातेचे स्मरण करून स्वामीजी एका वेगळ्याच दैवी स्वरूपात उभे राहिले. किंचित ओठ हलले आणि शब्द प्रगटले, “अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो!” चारच शब्द...चारही दिशातून दिव्यच काहीतरी अवतरले. या चारच शब्दांनी चराचर भारून गेले. कित्येक जण उभे राहिले. कित्येक जण आनंदाने ओरडू लागले. टाळ्यांचा तर प्रचंड कडकडाट होतच होता. स्वामीजींना बोलणे शक्यच झाले नाही, इतका प्रचंड आवाज होता. काही काळाने लोक शांत झाले आणि स्वामीजींनी आपले भाषण पूर्ण केले. इतर वक्तांच्या तुलनेने स्वामीजींचे भाषण अगदीच कमी वेळाचे होते, मोजके होते. पण, तरीही ते प्रभावी ठरले. स्वामीजींचे भाषण म्हणजे वेद-उपनिषदांच्या ज्ञानाचाच कलोचित आविष्कार होता. दक्षिणेश्वरच्या मंदिरातील श्रीरामकृष्णांच्या चरणाशी बसून वेचलेल्या दिव्य संस्कारांचे ते प्रगटीकरणच होते. त्या भाषणातील प्रत्येक शब्दात प्रामाणिकपणाचा भाव होता. शब्द साधे होते. पण, सच्चे होते. माऊलींनी जशी ज्ञानेश्वरीमध्ये काही लक्षणं सांगितली आहेत. ‘मितुले आणि साच’ म्हणजे सत्याचेच प्रतिपादन हवे आणि नेमके हवे. ‘बोलते जे अर्णव। पीयुषाचे॥’ बोलण्यात आग्रहाइतकेच आर्जव हवे, अगत्य हवे, माधुर्यही हवे, ही सारी वैशिष्ट्य स्वामीजींच्या पहिल्या व्याख्यानात दिसतात. स्वामीजींची साद प्रेमपूर्ण होती. असे वक्तृत्वच प्रभावी असते जे विशुद्ध चारित्र्यातून आणि बुद्धीच्या परिपक्वतेतून प्रगट होते.
 
शिकागो परिषदेत स्वामीजींनी ‘हिंदुत्व’ या विषयावरील निबंध सादर केला. त्याचे सुरेख वर्णन भगिनी निवेदितांनी केले आहे. स्वतंत्रपणे वाचनाचा तो विषय आहे. ते वाचल्यावर स्वामीजींच्या प्रभावी वक्तृत्वाचे रहस्य लक्षात येते. सर्वधर्म परिषदेतील एकाच भाषणाने स्वामीजी ‘जगन्मान्य’ झाले. सगळी वृत्तपत्रे स्वामीजींच्या परिषदेतील विजयाची घोषणा करू लागली. ‘न्यूयॉर्क हेराल्ड’ या वृत्तपत्राने लिहिले, ‘या परिषदेतील सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंदच होते.’ याप्रमाणे ‘दि प्रेस ऑफ अमेरिका’ यांनी लिहिले की, ‘स्वामीजींनी आपल्या भाषणाने त्या सभेला मोहित करून सोडले होते. प्रचलित प्रत्येक ख्रिस्ती पंथाचे पाद्री तिथे उपस्थित होते. परंतु, स्वामीजींच्या वक्तृत्वाने सार्‍यांची भाषणे वाहून गेली होती.’’बोस्टन इव्हनिंग ट्रान्स्क्रिप्ट’ यांनी स्वामीजींचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विवेकानंद हे खरोखरच एक थोर पुरुष असून उदार, सरल व अत्यंत कळकळीचे आहेत आणि ज्ञानाच्या बाबतीत तर विश्वविद्यालयीन पंडितांपैकी कुणालाही त्यांची सर यायची नाही. हाच तो त्या दैववाणीचा प्रभाव होता.
 
वाक्-गंगा स्वामीजींच्या मुखातून प्रगट होत होती. पण, ती गंगा देवलोकांतून आणण्यासाठी अनेक ऋषींनी, मुनींनी केलेले तप बोलण्यापाठी होते. वाग्भागीरथीच्या अवतारात भगवान श्री रामकृष्ण परमहंस भगीरथ होते. विवेकानंदांनी ती भागीरथी शिवासारखी समर्थपणे आपल्या मस्तकी धारण केली होती. हा प्रभाव या तप परंपरेचा होता. स्वामीजींच्या भाषणाचा प्रभाव अजूनही चिरकाल टिकून आहेच. आज 125 वर्षे होऊनसुद्धा ते शब्द सुवर्णाक्षरांनी अंकित व्हावे असेच आहेत. ते अजरामर भाषणाने भारताची जागतिक पातळीवर घेतलेली दखल प्रत्येकासाठी दिशादर्शक आणि मार्गदर्शक अशीच आहे. भक्ती-ज्ञान-विवेक-वैराग्य यांचा अलौकिक ठेवा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. त्यांचे शब्द आपणास सदैव काही संदेश देतात, उत्तुंग प्रेरणा देत असतात. विवेकानंद यांनी आपल्या भाषणात विश्वाचे कल्याण करू शकणार्‍या भगवद्गीतेचा संदर्भ दिला. आपल्या वागण्याने व शस्त्राने विनाकारण कोणीही कोणास त्रास देऊ नये, असे झाले तर, जीवनाचा अर्थ उमगेल आणि जीवन अर्थपूर्ण होईल.
 
असे आहे ते भाषण...
अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो,
आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिंदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणार्‍या वक्त्यांचेही आभार मानतो. जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणार्‍या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असं नाही, तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशांतील आणि धर्मांतील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणार्‍या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात आजही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणार्‍या व आजही त्यांचं पालन-पोषण करणार्‍या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे.
 
बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकाच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यवधी लोक आजही या ओळींचं पारायण करतात. ‘ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे-तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात.’

‘जो माझ्यापर्यंत येतो, तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो.’ आजची ही पवित्र परिषद भगवद्गीतेमधील या सिद्धांताचाच पुरावा आहे. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बर्‍याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या सार्‍यांनी पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केलीय. कितीतरी संस्कृतींचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानवसमाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र, आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना (मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं) आणि माणसा-माणसांमधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल.’
 
- सर्वेश फडणवीस

Thursday, September 17, 2020

अलौकिक नोहावे !! लेखमाला


फेसबुक आणि सोशल मीडिया !! आज ह्याचा उपयोग कुणी किती आणि कसाही करु शकतो. ह्या माध्यमाची ताकद मुळातच वेगळी आहे. खरंतर विचारांचे आदान-प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे फेसबुक आहे. काही दिवस पोस्ट न करण्याचा निर्णय घेतला आणि सहज friend list मध्ये चक्कर मारली तर त्यात वेगळेपण जपणारे भेटले. ह्या माध्यमात खूप वेगवेगळी माणसं आहेत. काहींच्या कार्याला समजून घेतांना काही क्षण वाटलं खरंतर मी भाग्यवान आहे की ह्यांच्या लिस्टमध्ये मला स्थान मिळाले आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालून त्याला जिंकायचे आणि त्याचवेळी आपला विवेक, नैतिक भूमिका आणि आग्रह कमी होऊ द्यायचे नाहीत,अशी विलक्षण क्षमता असणारे अनेकजण लिस्ट मध्ये आढळले. ही माणसं इतक्या वेगळ्या वाटेने जात आज समाजात उत्तम कार्य करत आहेत. येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी,प्रसंगी त्यांच्या कार्याची अधिक ओळख व्हावी आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेता ह्यावे ह्यासाठी.. "अलौकिक नोहावे !! " ही लेखमाला घेऊन येतो आहे. 

मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रती ।।’ ही माउलींची तिसऱ्या अध्यायातील १८१ वी ओवी आहे.आज  साधेपणानं वागण्याचं सूत्र ज्यांनी अंगी बाणले त्यांच्या कार्याची ओळख व्हावी ह्याच शुद्ध हेतूनं ही नवी लेखमाला ..

✍️ सर्वेश फडणवीस 





Thursday, September 10, 2020

मन में है विश्वास !!


होंगे कामयाब होंगे कामयाब,हम होंगे कामयाब एक दिन
हो हो हो मन मे है विश्वास,पुरा है विश्वास 
हम होंगे कामयाब एक दिन

सध्या कोरोनानामक महामारीच्या सावटाखाली आपण आहोत. ह्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर येणार आहोतच. सद्यस्थितीचे वर्णन वाचतांना सुद्धा अंगावर काटा येतो. देशात आज ४४ लाख रुग्णांचा आकडा पार केला असून कोरोना संक्रमणात आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यात गेल्या काही आठवड्यांमध्ये मुंबईबाहेर विशेषतः पुणे, नागपूर येथे संक्रमितांचा आकडा वाढत आहे. 

ह्याच धर्तीवर नागपुरात कोरोनासंक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ने मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरु केल्या आहेत. संशयितांचे वेळेत झालेले परीक्षण हे प्रसार रोखणे आणि कोरोनाचा मृत्युदर कमी करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न चांगला आहेच. परंतु सध्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारी व्यवस्थाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. म्हणूनच एनएमसीने सामाजिक संघटनांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीने एनएमसीच्या साथीने "मिशन विश्वास" मोहीम हाती घेतली. हे काम मुळात खूप वेगळं आहे. आपत्तीच्या वेळी संघाचे कार्यकर्ते आणि संघटन देशपातळीवर व्यापक योजना आखण्यात आणि त्यावर काम करण्यासाठी सदैव तत्पर असतेच. ह्याचा एक भाग म्हणून रा.स्व.संघ लोककल्याण समितीचे कार्यकर्ते एनएमसीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधत कोरोना रुग्णांची सूची तयार करतात. या नंतर रुग्णांना तातडीने चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. हवी तशी मदतही करण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.

प्रसंगानुरूप रुग्णांच्या कुटुंबियांना दैनंदिन आवश्यक वस्तू, औषधे स्वयंसेवकांकडून पुरवली जातात. त्यांच्याशी फोनवर संवाद साधतांना जी माहिती मिळते ती निःशब्द करणारी आहे. दररोज नवा अनुभव मिळत असतो. ही अनुभवांची शिदोरी ही रोज नवा विचार देत असते. साधारणपणे १ तास जातो हे करायला.  रोज ५ हुन अधिक व्यक्तींना फोन करून विचारपूस करण्याचा प्रयत्न असतो. मागील काही दिवसात १५ हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांचा शोध घेण्यात स्वयंसेवकांना यश आले आहे. ह्या अनुभवांवर ही स्वतंत्र लेखन होईल इतके अनुभव रोज येत असतात. 

मेडिकलच्या टीम बरोबर संघाचे आरोग्य विषयक असलेले सेवांकुर आयाम मधील कार्यकर्ते ही काम करतांना दिसत आहेत. महानगरपालिकेच्या प्रभागात काही जण प्रत्यक्ष जाऊन प्रसंगी आपला जीव धोक्यात घालत मिशन विश्वास मध्ये कार्य करत आहेत. आपले काम करताना कार्यकर्ते शारिरीक अंतर राखत असून फेस मास्क, फेस शिल्ड, हँड सॅनिटायझर आदी सर्व सुरक्षिततेच्या साधनांचा उपयोग करीत आहेत. आपल्या नेमलेल्या कामासह कोरोनापीडित आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोबल उंचावण्याचे काम करतांना सद्यस्थितीबद्दल ऐकतांना आणि वाचतांना वाईट वाटतं. आपण एवढ्या मोठ्या महामारीसाठी एकत्र येण्याची हीच वेळ आहे. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते.. 

निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें !
स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें !!

✍️ सर्वेश फडणवीस 

#मिशन_विश्वास #RSSorg #NMC

Tuesday, September 8, 2020

रानवाटेच्या विश्वात...

वाढदिवसाच्या दिवशी पुस्तके घेण्याची सवयच लागली आहे. सवयीचा भाग म्हणून ह्यावर्षी साहित्य प्रसार केंद्रात गेल्यावर मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तकं आणली. खरंतर कथा,कादंबरी,ललित ह्यानंतर चौथा प्रकार म्हणजे चितमपल्ली सरांची पुस्तकं आहेत. सहज,सोपी भाषा आणि अरण्याचे दर्शन,जंगलाची ओळख हा त्यांच्या लेखनशैलीचा बाज मनाला स्पर्शून जाणारा आहे. विदर्भ आणि इथली वनसंपदा येथील जंगल ह्यामुळे वाचतांना जी सहजता जाणवते ते शब्दांतीत आहे आणि चितमपल्ली ह्यांच्या पुस्तकांतील  निसर्ग त्यांच्या लेखणीतून अजून वेगळा आनंद देणारा ठरतो. 

नुकतंच "रानवाटा"पुस्तक वाचून संपले. रानवाटेच्या विश्वात दोन दिवस कसे गेले समजले नाहीच. साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनाची पुस्तक रुपात भेट होणे हा ही अनुभव छान आहे. अत्यंत सुबक मांडणी, सुटसुटीत छपाई, चांगला कागद आणि तितकंच वेळोवेळी दर्जेदार साहित्य प्रकाशित करणं ही या प्रकाशनाची वैशिष्ट्येच म्हणावी लागतील. १५० पानी पुस्तकांत १५ लेखाचे हे एकप्रकारे संकलनच आहे. विविध वृत्तपत्र, दिवाळी अंकांसाठी लिहिलेले लेखाचं एकत्रित केलेला रानफुलांचा गुच्छ असंच म्हणता येईल असे हे पुस्तक आहे. १९९१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त असे पुस्तक रानवाटा. अतिशय आटोपशीर प्रस्तावना स्वतः चितमपल्ली ह्यांनी लिहिलेली आहे. निसर्गाच्या भावविश्वाला शब्दांत मांडण्याची किमया ही फार कमी जणांना लाभली आहे त्यात चितमपल्ली अग्रक्रमावर म्हणता येईल इतके सहज लेखन त्यांच्या लेखणीत जाणवते. 

रानवाटा पुस्तकांत महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशातील वन्यजीवनाचे बारकावे टिपलेले आहेत. वन विभागात असल्याने चितमपल्ली ह्यांनी जंगल पिंजून काढले आहेत. त्यांच्या आईला रानवाटांची माहेरओढ होती तिचा तो वसा घेऊनच त्यांनी तीन तप रानवाटेने भटकंती केलेली आहे. डॉ.सलीम अली ह्या जगप्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाशी निकटचा संपर्क आल्याने "पक्षीनिरीक्षण" ह्या लेखात त्यांनी अनेक बारकावे टिपले आहेत. खरंतर सामान्यपणे जंगलात गेल्यावर वाघ दिसावा ह्या आशेनं जाणाऱ्या प्रत्येकाला चांगलाच धडा मिळणार आहे. कारण "अरण्यवाचन" ह्या नावाने स्वतंत्र लेखन चितमपल्ली ह्यांनी ह्या पुस्तकांत केले आहे. "पाडस" ह्या लेखात भामरागड आणि माडिया गोंड आदिवासींच्या विषयीं चांगली माहिती दिली आहे. १९७८ साली डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्याविषयी ऐकून,प्राणिसंग्रहालयाविषयी जाणून त्यांनी घेतलेली भेट आणि त्या संपूर्ण परिसराविषयी जे वर्णन करून ठेवले आहे ते जास्त भावले कारण नुकतंच हेमलकसा येथे भेट दिल्यामुळे ही असेल पण १९७८ साली परिस्थितीचा विचार करता अंगावर काटा येतो आणि त्यावेळी ह्या पती-पत्नी ह्यांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य सुरू केले ते ही स्वप्नांच्या पलीकडचे आहे हे वाचतांना आपण अभिमानाने काही काळ भारावून जातो. 

रानवाटा वाचून वन्यजीवन,जंगलभटकंती,पक्षीनिरीक्षण, रानातील घर,प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती,झाडांची माहिती ह्याची सुंदर अनुभूती वाचकाला मिळते. पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील "जो माणूस वनात रमतो,चाफा त्याच्या मनात फुलतो" ही ओळ मनात घर करून जाते. साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी ह्यांनी कैद केलेलं मुखपृष्ठ ही देखणे आहे. वाचनीय आणि संग्रही असे पुस्तक - "रानवाटा". 

रानवाटा - मारुती चितमपल्ली 

साहित्य प्रसार केंद्र

₹ २०० 

✍️ सर्वेश फडणवीस